माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल कस्टर्ड करायचा प्रयत्न केलेला. पण ते सेट झालच नाही. पॅक वर सांगितल्याप्रमाणे कोमट दुधात पावडर टाकून १ मिनिट मिक्स केलं आणि मग १५ मिनिटं जरासुद्धा हलवलं नाही. तरी पण ते सेट झालच नाही. माझं काय चुकलं? होल मिल्क घेतलं होतं. प्रयोगच होता पण तरीही वाइट वाटलं. आता त्या पातळ कस्टर्ड मिल्क चं काही करता येइल का?

फ्रीझमधे ठेवायचं असतं ना कस्टर्ड ? मी तरी 'उकळत्या दूधात पावडर टाकून ते मिश्रण कोमट झाले की फ्रीझमधे ठेवायचे' असेच वाचले/ऐकले आहे.

मला वाटतय पावडर कमी पडली असेल. उकळल्यावर थोड घट्ट व्हायलाच हव.
पावडर जुनी नाहिये न?? नाहितर त्यात थोड कॉर्नफ्लॉवर घालुन बघ.

पावडर तर जुनी नव्हती. मागच्याच आठवड्यात आणली मी. आणि त्या पॅक वर सांगितलं तेवढंच दुध पण घेतलं. पण त्या सुचनांमध्ये पुन्हा उकळण्याची सुचना नव्हती तसच सेट होउ द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे मी तसच ठेवलं. त्याचं मिल्कशेक बरं लागेल असं वाटतं आहे. बघते करून. नाही तर सरळ सिंकचा रस्ता दाखवते. Happy कमीच केलं हे नशीब.

नाही तर सरळ सिंकचा रस्ता दाखवते.>> अजुन फेकल नसल्यास चव घेवुन बघा आणि खायला योग्य असेल तर फ्लेवर मॅच होणारी ताजी फळ घालुन फ्रुट कस्टर्ड होईल.

कच्च्या केळींचे सारण करून पोळ्या करण्यासाठी केळी वाफवून सारण केले, पण ते खूपच भरभरीत झालेय. काही केल्या एकत्रित होत नाहीये (अतिशय कोरडे आहे). काय चुकले असेल? काय केले तर सारण मिळून येईल? लवकर सांगा प्लीज, अर्धा ते पाऊण तासात करायच्या आहेत. मदतीसाठी आगाऊ धन्यवाद!

अमी

मेधा, मृण्मयी, त्वरित उत्तराबद्दल धन्स! बटाटा उकडायला टाकूनच प्रत्युत्तर द्यायला बसलेय. आज सारणाच्या पोळ्या, उद्या धिरडी!

अमी

नवर्याला आवडते म्हणून, पहील्यांदाच होल मिल्क आणि हेवी क्रिम वापरुन बासूंदी केली, पण त्याला हल्की कडवट चव आली आहे. (साखर घातलेली हो..) माझं काय चुकल असेल???:(
आता त्याच काही करता येईल का? (फेकून देण्याशिवाय..तो शेवटचा पर्याय आहे)

mnp, मला बासुंदी करण्यातले खूप काही कळते असे नाही - पण पहिल्यांदा जो विचार मनात आला तो हा - दूध उकळवताना ते खाली लागले का? माझे तसे झाले होते - मला तरी ती फेकून द्यावी लागली होती.

अमी

बदाम भिजत घालून सोलतेवेळी, तो पिवळा वा तेलकट दिसला, तर तो कडवट असतो. तो टाकून देणे उत्तम. चारोळ्या पण तश्या नजरेला, वेगळ्या दिसतात.
दूधी, पडवळ, दोडका, काकडी हे पण कधी कधी कडू निघतात. त्यामूळे चिरण्यापूर्वी, त्याची चव घेणे चांगले. (या भाज्या नजरेला, वेगळ्या दिसत नाहीत.)

भांड्याचा दोष असेल. काय धातूचे भांडे होते? दुधात काही भेसळ असेल तर ते बघा. ( भारतात जास्त करून युरीआ वगैरे पण असू शकतो.)

काल सकाळी अनारस्याचे तांदुळ वाटुन पिठीसाखर कालवुन ठेवले. आज पाहिले तर पुर्ण dry आहे. ओलसर करण्यासाठी काय करावे लागेल Uhoh

त्यावर केळीचे पान घालून थोडावेळ झाकून ठेवावे. अगदी करताना त्यात दूधाची साय मिसळून मळून घ्यावे.

सगळ्यांना धन्स.
मामी,
मी उसगावात आहे त्यामूळे भेसळ नसावी अशी अपेक्शा आहे. हा, भांड इथल्या कूकवेअर सेट पैकी होते.(लोखंडी असावे) स्टील नव्हते एवढे नक्की. तेही कारण असेल.

मला जरा पुर्‍यांबद्दल फारच बेसिक प्रश्न पडलाय. मी एकतर तळण म्हणून पुर्‍यांच्या वाटेला जात नाही. पण आज काहीतरी वेगळं म्हणून श्रीखंड पूरीचा बेत केला. थोडक्यात काय तर सवय नाहीये. माझ्या पुर्‍या छान फुगल्या होत्या पण व्यवस्थीत निथळून पण तेलकट वाटत होत्या. काय कारण असावं? मी पीठ भिजवताना मीठ, साखर आणी गार तेलाचं मोहन घातलं होतं. मोहन घालायला नको होतं का? की गरम तेलाचं मोहन घालावं ? की अजून काही वेगळं कारण असावं?

पुर्‍यात थोडे मोहन लागतेच, पण तेलकट होण्याचे ते कारण नाही. पूर्‍या टोपलीत पेपर टाकून त्यावर काढत असत. किचन टॉवेलवर पण काढतात. याने थोडा तेलकटपणा कमी होतो. पण पूर्णपणे जात नाही.
उत्तर भारतात अश्याच पुर्‍या आवडिने खाल्ल्या जातात.
गोव्यात मात्र पुर्‍या चक्क नॅपकीनमधे पिळून खाताना मी बघितले आहे.
राजगिर्‍याच्या पिठाच्या पुर्‍या जरा कमी तेलकट होतात.
श्रीखंडाबरोबर, गवसण्या किंवा पिठपोळ्या हा कमी तेलकट पर्याय आहे.

प्राडी, मोहन जास्त झालं कणकेत आणि कणिक सैल भिजवली गेली असल्याची शक्यता आहेच.
पु-यांसाठी कणिक अगदी घट्ट भिजवावी लागते आणि मोहन अगदी धूर येईपर्यंत गरम करायचं आणि पिठात घालायचं.

पुर्‍या तळण्यापूर्वी १०-१५ मिनिटे फ्रीज मधे ठेवल्या तर तेल कमी पितात असे वाचले होते. माझा तळण्याशी संबंध नाही, त्यामुळे स्वानुभव नाही.

धन्यवाद सगळ्यांना. पीठ छान घट्ट भिजवलं होतं. कदाचित गार तेलाचं मोहन हेच कारण असावं. पुढच्या वेळी गरम तेल घालून बघेन. फ्रीजचा प्रयोग करायला पण हरकत नाही.

जाणकार सुगरिणींसाठी प्रश्न - ग्रीक योगर्टपासून श्रीखंड बनवलेय आज - उद्याच्या पाहुणे मंडळीसाठी (१६ - सगळेच मोठे). ग्रीक योगर्ट + साखर - हे दोनच घटक वापरले आहेत. चक्का नेहेमीसारखा घट्ट नाही, बराचसा सैलसर आहे. तर हे श्रीखंडासारखे घट्ट व्हावे यासाठी काय सूचना आहेत? थोडे फुल फेट सावर क्रीम मिसळू का? मी सहा पौंड दही घेतलेय अन तीन पौंड साखर घातली आहे (दही जरा आंबट होते). स्वाद छान आहे - फक्त consistency पातळ आहे. मदतीला येणार्‍यांना आगावू धन्यवाद!

अमी

Pages