माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुध जर यु एच टी असेल तर आंबट पदार्थ जास्त घालावा लागतो, पण साधारणपणे, एक लिटर दूधासाठी एक ते दिड कप पाणी पुरेल. (जास्त तयार ठेवायचे, इन केस ..)

सिंडरेला, मी करुन पाहीली भाकरी तु दिलेल्या पद्धतीनी. पण भाकरी भाजल्यवर ज्या बाजुने पाणी लावतो, ती बाजु पाहील्यावर दुष्काळ ग्रस्त जमीनीची आठवण झाली. मा.का. चु,?

पीठ जुनं असेल किंवा थापताना पीठ जास्त वापरलं गेलं असेल तर अशा भेगा दिसतात. शिवाय भाकरी तव्यावर घातल्याबरोबर लगेच पाणी लावायला पाहिजे नाहीतर पण भेगा पडू शकतात.

वरच्या टिप्स मधे माझी ( सिंडीकडून ऐकलेलीच ) अजून एक - वाटीभर पीठात एक टे स्पू कणीक मिसळली तर थापायला सोप्या पडतात.

ती बाजु पाहील्यावर दुष्काळ ग्रस्त जमीनीची आठवण झाली. मा.का. चु,?>>>>>
भाकरी वर पाणी फिरवण्याच टायमिंग चुकल कि तशा भेगा पडतात. पाणी फिरविताना भाकरी उलटली कि लगेच पाणि फिरवल पाहिजे. (आई आली आहे ना. तिला विचारल. :))
आई भाकरी करताना व्हिडीओ तयार करते आणि टाकते इथे.

हो एकाच बाजूला लावायचं. जी बाजू तव्यावर टाकल्यावर पहिल्यांदा आपल्याला दिसते तिला लग्गेच पाणी लावायचे. आणि लावायचं म्हणजे जरासं नाही, चांगली चपचपीत दिसली पाहिजे भाकरी. मग खालची बाजू भाजेपर्यंत वरच्या पाण्याची वाफ होऊन भाकरी आतून शिजते. मग तवा बाजूला करुन गॅसवर ती बाजू भाजायची.

माझी पण अशी भेगाळलेली भाकरी व्हायची. साबांची टीप अशी की वरच्या बाजूचे पाणी पूर्ण वाळून जायच्या आत भाकरी पलटायची. वरची बाजू शुष्क नाही झाली पाहिजे. कमी भाजली गेली तरी नंतर विस्तवावर भाजता येते. पण भेगा टळतात.

हो . पाणी एकाच बाजुला लावायचं. पण तव्यावर भाकरी टाकल्या बरोबर लावायचं, पटकन. थोडासा चटका बसतोच हाताला.भाकरीला भेगा जर पीठ जुनं असेल तर किंवा नीट मळलं नसेल तर पडतात.

वरच्या बाजूचे पाणी पूर्ण वाळून जायच्या आत भाकरी पलटायची. वरची बाजू शुष्क नाही झाली पाहिजे.>> भारी टीप आहे ही, हे पाळले तर नाही भेगा पडत.
झी, तु ती बाजुन प्रमाणापेक्षा जास्त वेळ भाजली अस्तील तर त्यानेही भेगा वाढु शकतात.

पीठ जुने आहे ते कसे ओळखायचे. मी या महिन्यातच बाजरीचे पीठ आणुन भाकरी करायचा प्रयत्न केला. ती मोडत तर होतीच पण कडवट पण लागत होती. Sad

इथे दुकानात मिळणारी पिठं जुनीच असतात. ज्वारी, बाजरीचं पिठ १५-२० दिवसातचं जुनं होतं. भारतातुन पिठं आणुन फ्रिजरमधे १-२ वर्ष पण टिकतात, तेव्हा हाच एक उपाय Happy

धन्स सर्वाना!! खास करुन सीमा, तुझ्या आईला !! माझ पीठ जुन नाही. भारतातुन आणलेल आहे. पण आता वरील टिप्स फॉलो करते. व्हिडिओ ची वाट पाहाते तुझ्या !!!!!

भाकरीचे जूने पिठ कडवट लागते. आणि जूने असेल तर विरी जाते. त्यात मैदा वा कणीक मिसळून भाकरी / थालिपिठ करता येते, पण खराब झाले असल्यास खाऊ नये.
भाकरईचे पिठ मळताना थोडा चिकटपणा आला पाहिजे. (तोपर्यंत मळले पाहिजे ) जूने पिठ असेल तर भिजवायला कडकडीत गरम पानी घ्यावे. पण भाकरिचे पिठ, आपल्या स्पीडनुसार, एक किंवा दोन भाकरीचेच मळावे.
भाकरीला पाणी लावताना, वरचे कोरडे पिठ भिजले पाहिजे, इतके पाणी लावायचे, आणि ते पुरते सुकायच्या आतच भाकरी उलटली पाहिजे. जर पाणी लावायला उशीर झाला तर तिचे तूकडे पडतात.
भाकरी तव्यावर टाकताना, तवा पुर्ण तापलेला असावा. भाकरी करण्यासाठी म्हणून खास खोलगट तवा मिळतो. तो जाडही असतो. (कोल्हापूरला हमखास मिळतो ) त्यावर भाकर्‍या छान होतात. तसेच त्यावर पिठलेही छान होते.

मला वाटत की तवा वव्यस्थीत तापलेला हवा. नॉनस्टीक तव्या वर बहुधा होत नसाव्यात भाकर्या !! खास तवा हवा !

अमया, एकदा भाकरी चं तंत्र जमलं की नॉनस्टिक तव्यावर सुद्धा चांगल्या करता येतात भाकर्‍या.. पिठाचे ताजे/जुने असणे, योग्य प्रमाणात गरम पाणी घालून पीठ चांगले मळलेले असणे, तवा चांगला तापलेला असणे, वर सांगितलेल्या प्रमाणे भाकरी तव्यावर टाकल्या - टाकल्या लगेच पुरेसे पाणी त्यावर फिरवलेले असणे, ते पाणी पूर्ण वाळण्या आधी ती परतणे आणि मग पाण्याची बाजू आणि दुसरी बाजू विस्तवावर टाकून नीट भाजली जाणे ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जाण्याची सवय झाली की तवा कुठलाही असला तरी भाकरी चांगली होते. सा.बा. ह्या मताशी सहमत होत नाहीत. त्यांना तोच तो एक भाकरीचा तवा लागतो.. पण मी केलेल्या भाकर्‍या कशावरच्या आहेत हे काही त्यांना खात्रीलायक रित्या सांगता येत नाही.. तात्पर्य..सगळा सवयीचा भाग आहे!
मला स्वताहाला (विसर्ग कसा द्यायचा मी विसरले!) पकडीने तवा पकडून विस्तवावर भाकरी भाजण्याची कसरत करायला आवडत नाही त्यामुळे हँडलवाला नॉन स्टिक तवा मला सोयीचा वाटतो.

मग बहिणाबाईं उगाच म्हणून गेल्यात का? आधी हाताला चटके तेव्हा मियते भाकर.. (त्यात आख्खी,सुवासिक, गोल, पापुद्रेदार, क्रॅक रेझिस्टंट अशी विशेषणं अ‍ॅड करणं ही काळाची गरज झाली आहे आता! Proud )

अ‍ॅडमिन, भाकरीसाठी एक वेगळा धागा उघडा प्लिज आणि इथल्या पोस्टी तिकडे डकवा प्लिज. म्हणजे भाकरी करु इच्छिणार्‍यांना इथे शोधाशोध करायला नको.... आगाउ धन्यवाद Happy

वेगळा तवा असतो व त्यात थालिपिटे पण मस्त होतात. ते वर जे पाणी फिरवितात त्याचा पापुद्रा सुट्तो. नॉन्स्टिक पेक्षा खमंग चव येणार तव्यावर. अगदी आइच्या तव्याची आठ्वण झाली दिनेशदांचे पोस्ट वाचून.
गॅस शेगडी वर एका साइड्ला तवा व दुसर्या बर्नर वर तो मोठा करून भाकरी भाजायची अशी आइची सिस्टिम होती. मी सर्व २-३ भाकर्यांचे पापुद्रे वर तूपमीठ घालुन खात असे व त्यांना खालील जाड भाग ठेवत असे. काय लाड! आई ७- ८ वर्शाची असल्यापासून शेतातील गडी व आजोबांसाठी भाकरी बनवित असे.

आता पोरांना पिझा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून देतो आपण. क्या लाइफ होगइ है अपनी.

Pages