विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोराल ऑफ द स्टोरी - कोणी पैसे ‘चुकुन’ पाठवले तर त्याला सांगायचे बँकेत जा आणि पैसे परत घे, मी देणार नाही. >>> बरोबर. त्या ब्यांकेने ते ट्रान्झॅक्शन रद्द करावे. ते सुद्धा ज्याच्या अकाउंट वर चुकून पैसे जमा झालेत त्याची रितसर परवानगी घेऊन. अन्यथा कसे कळणार कि खरेच ते ट्रान्सक्शन चुकून झाले होते . म्हणजे कोणी पैसे देऊन वस्तू खरेदी करून नंतर ते पैसे चुकून पाठविले गेले असा कांगावा बँकेसमोर केला आणि बँकेने त्याची पडताळणी न करता ट्रान्सक्शन रद्द केले तर?

Transferring funds to the wrong account
The bank cannot reverse the transfer unless it has approval from the beneficiary. The recipient's bank will usually contact the account holder to ask for permission to reverse the transaction. If the recipient refuses, you can take up the matter directly.

बँक ट्रन्स्फर स्कॅम कदाचित खरा नसावा कारण परवानगी घेतल्याशिवाय बँक परस्पर ट्रन्स्फर करु शकणार नाही.

<< If the recipient refuses, you can take up the matter directly. >>

म्हणजे काय? मुळात पैसे ट्रान्स्फर करताना बँक अकाउंट नंबर आणि नाव पडताळून बघत नाही का?

माझ्या खात्यात पैसे जमा झाले, मला फोन आला आणि जर मी सांगितले की मी पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर. अश्या परिस्थितीत तो काय करेल? (मग केस फ्रॉडची असो वा नसो.)

निव्वळ या कारणामुळेच मी शक्य तिथे फक्त क्रेडिट कार्ड वापरतो किंवा रोख रक्कम देतो. डायरेक्ट डेबिट, यूपीआय सारखे प्रकार ज्यात तुमच्या बँक अकाउंटमध्ये थेट हात घातला जातो, ते प्रकार मी वापरत नाही. Security आणि convenience यात मी नेहमी सिक्युरिटीला प्राधान्य देतो.

पैसे क्रेडिट करताना आम्ही नाव पडताळून पाहत नाही असा मेसेज / वॉर्निंग गेले काही महिने दिसतो.

RBI proposes beneficiary name verification for RTGS and NEFT transactions

ही गेल्या महिन्यातली बातमी आहे.

चुकीच्या खात्यात पैसे गेले तर काय? वर साधना यांनी दि लेल्या माहितीच्या पुष्ट्यर्थ.
https://www.indiatoday.in/business/story/incorrect-online-transaction-fo...

<< Shetty goes on to add that the most important thing to understand is that if a transaction has been made from your end, the bank
If nothing works out – wrong recipient is unresponsive or unwilling to return the funds – legal recourse might be your last option.

"There is very little legal recourse available apart from sending a legal notice to the unintended beneficiary for the return of funds unless you have a written statement from the unintended beneficiary. >>

This is so bad for me as a consumer. I would rather use a credit card that can be disputed very easily and invariably I get immediate credit for disputed amount also.

< मुळात पैसे ट्रान्स्फर करताना बँक अकाउंट नंबर आणि नाव पडताळून बघत नाही का? >

ऑनलाइन ट्रान्सफरच्या काही प्रकारांत खातेधारकाचं नाव दिसत नाही. तीच सोय सुरू करू असं रिझर्व बँक म्हणते आहे.

UPI and IMPS मध्ये नाव दिसतं. RTGS and NEFT मध्ये अद्याप तरी नाव पडताळायची सोय नाही.

नाव पडताळणी चालू केली तर काही समस्या येतील असे माझे मत आहे . जसे कि नाव हे तंतोतंत जुळायला हवे . आणि ते काय अचूक नाव आहे हे पैसे पाठविणाऱ्याला माहित असेलच असे नाही . उदा . मधले नाव वापरले आहे का? स्त्री लग्नानंतर कोणते आडनाव वापरत आहे ? इत्यादी.

कॅनडात ईमेल/ फोन नंबरला पैसे मिळण्याची लिंक जाते. ज्यावर क्लिक करून मिळणाऱ्या व्यक्तीने आपल्या बँकेत लॉगिन करून, सिक्रेट प्रश्नाचे उत्तर देऊन ( जे पाठवणर्याने सेट केलेले असते) ते पैसे मिळवायचे असतात. यात मिळवणाऱ्या व्यकीने ऑटो डीपोझिट सेट केलं असेल तर वरचे प्रश्न उत्तर लॉगिन पायरी गाळून पैसे काही मिनिटांत थेट खात्यात जमा होतात.
यात काही चूक झाली तर पाठवणाऱ्याने आपल्या बँकेला सांगून तक्रार दाखल करून ते पैसे वळते करणे शक्य असल्याची पडताळणी करायची असते. पैसे मिळणाऱ्या व्यक्तीचे नाव, खाते क्रमांक, बँक, शाखा इ. काहीही माहिती टाकण्याची गरज नसते. फक्त ईमेल वर काम होते. जो चुकण्याची शक्यता तुलनेने कमी असावी.

मुळात पैसे ट्रान्स्फर करताना बँक अकाउंट नंबर आणि नाव पडताळून बघत नाही का? >
हे जरी ठीक असलं तरी जो फ्रॉड आहे, तो मुद्दामच आपल्या खात्यात पाठवतो आहे ना?

गाडी चालवत असताना फोन आला, त्यावेळी वडील हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे प्रत्येक फोन घेत होतो. फोन ब्लूटूथवर होता त्यामुळे गाडी चालवत बोलणे सुरु ठेवले, समोरचा माणूस सांगत होता HDFC Ergo मधून बोलत आहे, तुम्ही २०१४ मध्ये एक पॉलिसि घेतली होती आणि ३ वर्षे पैसे भरून नंतर पैसे भरणे बंद केले. ५०००० भरले होते ते आता १,७५,००० झाले आहेत. जर काही केले नाही तर पैसे सरकार जमा होतील, तर तुम्हाला काय करायचे आहे. त्याला विचारले, माझे बँक डिटेल आहेत का तुझ्याकडे, तर तो हो म्हणाला. त्याला सांगितले एक काम कर, मी तुला फोनवर अँप्रोवल देत आहे की ते पैसे माझ्या अकाउंटला पाठवून दे. असा काही तो उचकला की माझे तेच काम आहे का, त्याला म्हटले फोन तूच केलास आणि सांगत आहे ते कर नाहीतर तुझ्या मॅनेजर ला आणि HDFC Ergo ला तक्रार करतो. त्यानंतर काही असभ्य शब्द उच्चारून त्याने फोन बंद केला.

यात घातलेले घोळ म्हणजे ३ वर्षे पैसे भरले तर ते एका विशिष्ट पटीत असावे म्हणजे बेरीज ३X होईल., इथेच मला शंका आली. HDFC Ergo बरोबर कधीच कुठली पॉलिसि घेतली नसल्यामुळे शक्य झाले ओळखायला की हा फ्रॉड आहे. आणि १० वर्षात ५०००० चे फक्त १,७५,००० म्हणजे खूपच कमी वाटले. Sad

काही वर्षांपूर्वी LIC करता आला होता, त्यावेळी त्याला सांगितले होते चेक नाहीतर डीडी रजिस्टर पत्त्यावर पाठवून दे.

HDFC Ergo ही जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. लाइफ नाही. जनरल इन्शुरन्स मध्ये मनी बॅक असतं का? फ्रॉडस्टर्सचा अभ्यास कमी पडला का?

नरेन..

मलाही असे कॉल आले होते. तुम्ही यासाली ही पॉलिसी घेतली वगैरे. आता फक्त एक हफ्ता भरा आणि पुढे मग चालू राहील वगैरे. एकदा एका बाईला सांगितले की २ लाखाची अमाउंट आहे म्हणतेस तर मला पाठव लगेच मी त्यातले २०% तुला देईन. असे मी ५०% पर्यंत वाढवले तर तिने कॉल कट केला.

असंच एकदा भारती अक्साकडून तुम्ही २०१२ ला पॉलिसी घेतली होती असा कॉल आला. मी त्या माणसाला म्हणालो की २०१२ ला भारती अक्सा कंपनी अस्तित्वातच नव्हती. लगेच कॉल कट झाला. खरं म्हणजे २०१२ ला भारती अक्सा अस्तित्वात होती की नाही ते मला माहित नव्हते. असेच काहीतरी बोललो होतो.

नरेन..

मलाही असे कॉल आले होते. तुम्ही यासाली ही पॉलिसी घेतली वगैरे. आता फक्त एक हफ्ता भरा आणि पुढे मग चालू राहील वगैरे. एकदा एका बाईला सांगितले की २ लाखाची अमाउंट आहे म्हणतेस तर मला पाठव लगेच मी त्यातले २०% तुला देईन. असे मी ५०% पर्यंत वाढवले तर तिने कॉल कट केला.

असंच एकदा भारती अक्साकडून तुम्ही २०१२ ला पॉलिसी घेतली होती असा कॉल आला. मी त्या माणसाला म्हणालो की २०१२ ला भारती अक्सा कंपनी अस्तित्वातच नव्हती. लगेच कॉल कट झाला. खरं म्हणजे २०१२ ला भारती अक्सा अस्तित्वात होती की नाही ते मला माहित नव्हते. असेच काहीतरी बोललो होतो.

माझ्या वडीलांना ही असे लाँग बॅक पॉलिसी घेतली होती वाले कॉल आले होते. पुढचा हफ्ता भरा म्हणुन. बर> आठवत नसलं तर, म्हणुन बाबांनी सांगितले, मी त्या तमुक इंशुरंस कंपनी ऑफिसात जाऊन पुढिल कारवायी करतो तर त्याला हे कॉलर एंटरटेन करत नाहीत Happy Wink हीच तर खरी मेख आहे.

पूर्वी लँड लाईन असताना आमच्याकडे असे कॉल एल आय सी पॉलीसी बाबत फार यायचे. येलो पेजेस फॉलो करून निवडक मंडळींना कदाचित टार्गेट केले जात असावे.

<< गाडी चालवत असताना फोन आला, त्यावेळी वडील हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे प्रत्येक फोन घेत होतो. >>

------ कधी तुम्ही एखाद्या महत्वाच्या फोनची अपेक्षा करत असताना किंवा ड्रायव्हिंग करतांना असा एखादा अनपेक्षित पण नकोसा कॉल येतो तेव्हा डोक्यात जातो. Angry

गाडी चालवत असताना फोन आला, त्यावेळी वडील हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे प्रत्येक फोन घेत होतो. .....
Submitted by नरेन. on 18 November, 2024 - 17:39

गेल्या ३० दिवसांतील घटना आहे का? असेल तर 'चक्षु पोर्टल'वर report करा.
चक्षु पोर्टल - https://sancharsaathi.gov.in/sfc/

माझी स्वतःची जेन्युईन चूक झाली होती....आईचा मोबाईल लॅपटॉप वरून रिचार्ज करताना... मोबाईल नंबर चुकला एका डिजिटसाठी आणि दुसर्‍याच माणसाला रिचार्ज झाले. 180 days चा रिचार्ज होता...मी बघू तर....म्हणून त्या माणसाला फोन करून सर्व सांगितलं...तर तो म्हणाला मेसेज आला आहे रिचार्ज चा पण तो पैसे नाही देणार कारण हा नवा फ्राॅड असू शकतो...त्याचं तरी काय चुकलं...माझे मात्र पैसे गेले

आजच मी ऐकलं ( पेपरमध्ये कदाचित उद्या येईल) की बंगलोरच्या एका व्यक्तीने नव्वद लाख रुपये गमावले, याच कस्टम्स-ड्रग्स वगैरे फ्रॉडमधे. मला खरोखरच समजत नाही की इतक्या घटना आजूबाजूला होत असताना अजूनही माणसं फसतात कशी? बातम्या वाचत नाहीत?
केशवकूल, डिजिटल अरेस्ट असा खरा काहीही प्रकार नसतो. पण फसवणूक करणारे लोक (स्वतः पोलिस आहोत असं सांगून) तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलंय आणि तुम्ही इतर कुणालाही संपर्क करू शकत नाही. सात-सात, आठ-आठ दिवस लोक अशा खोट्या अटकेत राहिलेले आहेत. स्काईपवर वगैरे व्हिडिओ कॉल सुरू ठेवतात.

धन्यवाद विक्षिप्त_मुलगा, करून पाहतो.

सोमवार, २५. ११ च्या दुपारी एक फोन आला, घेतला तर समोरून ऐकू आले हा कॉल रेकॉर्ड होत आहे, त्यामुळे मी एकही शब्द बोललो नाही, तर ३० सेकंदात फोन कट झाला. हा कुठला नवीन गफला आहे, काय असावे समजत नाही. कुरिअर आणि केवायसी फोन तर काही सेकंदात बंद करून ब्लॉक आणि स्पॅम म्हणून रिपोर्ट करतो.

Pages