मर्मबंधातील एखादे नाते ...मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 11 September, 2022 - 09:19

आई होणं हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील फार मोठा आनंदाचा क्षण असतो. आईच्या खांद्यावर मान विसावून झोपलेलं बाळ आईला अतीव समाधानाचे क्षण देत असतं पण अर्थात त्याचबरोबर बाळाच्या संगोपनाच्या जबाबदारीची ही जाणीव करून देत असतं. ती आई जर नोकरी करणारी असेल तर ही जाणीव अधिकच तीव्र बनते. माझ्या बाबतीत ही हेच घडलं. बाळ थोडं मोठं झाल्यावर पाळणाघराचा शोध मी घेऊ लागले.

त्याकाळात हल्ली असतात तशी अगदी प्रोफेशनल पाळणाघर ही संकल्पना जवळ जवळ अस्तित्वातच नव्हती. बहुत करून सगळी घरगुती स्वरूपाचीच असत. मी खूप पाळणाघर शोधली पण मनासारखं पाळणाघर मात्र मिळत नव्हतं. अगदी हतबल झाले होते. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे काळजाचा तुकडा अशा कात्रीत सापडले होते. पण आमच्या शेजारीणबाई माझ्या मदतीला धावून आल्या आणि सगळं चित्र क्षणार्धात बदललं. नंतर मुलगा झाल्यावर तो ही मी ऑफिसला गेले की तिकडेच राहू लागला. त्यांना अश्या काकू मिळाल्या हे त्यांचं आणि माझं दोघांचं ही पूर्व जन्मीच पुण्यचं म्हणावं लागेल.

त्यांचं प्रोफेशनल पाळणाघर नव्हतं आणि फक्त माझीच मुलं त्या संभाळत असतं. अतिशय मायेने आणि प्रेमाने त्या मुलांना सांभाळत असल्याने मुलं रुळली ही फार पटकन. मी निघताना थोडी मोठी झाली तरी त्यानी नेहमी मुलांना उचलून घेतलेलं असे. मुलं ही अगदी हात टाकून त्यांच्याकडे जात असत माझ्याकडून. माझ्यातल्या आईपणाला थोडी ठेच लागायची तेंव्हा पण लगेच मनात विचार यायचा की "ती रोज रडली असती तर मी ऑफिस ला जाताना .. त्या पेक्षा हे खूप चांगलं नाही का " !

काकूंवरच्या प्रेमामुळे त्या म्हणजे मुलांसाठी अगदी रोल मॉडेल होत्या. त्यांची प्रत्येकच गोष्ट मुलांना आवडत असे. “ आई , तू काकूंसारख्या काचेच्या बांगड्या रोज का नाही घालत ? तुला काकूंसारखे कपडे धुता येत नाहीत, झोपताना काकू फिरवतात तसा तू पण केसातून हात फिरव, काकूंसारखा भात तू का नाही कालवून देत ?” ही त्याची काही उदाहरण. एकदा तर मुलाने मला “आई तू पण काकुंसारखी गोरी हो ना आणि तू काकूंपेक्षा उंच का आहेस ग ? ” असे ही म्हटल्याचे आठवतंय. असो… एवढे वर्षात मला एक ही प्रसंग असा आठवत नाहीये की त्यावेळी मी काकूंच्या जागी असते तर काही वेगळे वागले असते.

मुलं हळूहळू मोठी होत होती. त्यांच्या शाळा सुरू झाल्या. मुलांना नीट भरवून, व्यवस्थित कपडे घालून त्या शाळेत पाठवत असत. रोज गॅलरीतून टाटा करत असत आणि ती घरी यायच्या वेळेस कायम गॅलरीत उभ्या असत. मुलांचा हट्ट म्हणून आठवड्यातून एक दिवस वेळात वेळ काढून शाळेत सोडायला ही जात असत.

माझी मुलगी साधारण पाचवी सहावीत असताना एक दिवस शाळा सुटून बराच वेळ झाला तरी घरी आलीच नाही. योगायोगाने मी त्या दिवशी लवकर घरी आले होते. काकू गॅलरीत येरझारा घालत होत्या. तेवढ्यात मुलगी येताना दिसली. ती न सांगता परस्पर मॊत्रिणी कडे गेली होती. त्या मला म्हणाल्या “ तिला जास्त रागावू नको . ह्या अर्धवट वयात मुलं असं करतात. मी समजावते तिला. ती पुन्हा नाही असं करणार.” एखादी दुसरी कोणी असती तर ह्याचा केवढा इश्यू केला असता.

मुलगी नववीत गेल्यावर त्यानीच तिला सांगितलं होतं, "आता तू मोठी झाली आहेस तेव्हा आता एकटी राहा घरी. मी आहेच शेजारी काही लागलं तर " . पण मुलीने त्याला साफ नकार दिला होता. आम्ही ते घर बदललं नसतं तर मुलगी लग्न होईपर्यंत मी घरात नसताना काकूंकडे राहिली असती. (स्मित)

मुलीची दहावी झाली आणि आम्ही ठाण्याला राहायला आलो. त्यावेळी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून "त्यांनी मला कशाला सोडून जाताय हे घर, मुलांशिवाय मला करमणार नाही अजिबात " असं सांगितलं होतं. अर्थात मुलांसाठी आणि माझ्या साठी ही हे तितकंच कठीण असणार होतचं. पण काही गोष्टींना आपला इलाज नसतो. असो.

ठाण्याला आल्यावर रोज जरी काकू भेटल्या नाहीत तरी फोनवर त्यांच्याशी गप्पा होत असत दररोज. शाळेतली काही सिक्रेट्स मला न सांगता त्यानाच सांगितली जातं.कधी कधी “ काकू माझं पुस्तक मिळत नाहीये शोधून द्या ना “ असा सवयीने फोन ही केला जाई त्याना. (स्मित )हळू हळू मुलं मोठी होत होती. आता फोन रोज केला जात नसला तरी काही विशेष घडलं असेल तर, रविवारी निवांतपणा मिळाला तर किंवा परिक्षेआधी, रिझल्ट लागल्यावर, वाढदिवसाला वैगेरे फोन केला जातच असे. सुट्टीत कधी कधी काकूंना भेटायला ही जात असत मुलं त्यांच्या घरी.

ह्या सगळ्या गोष्टी ही आता खूप जुन्या झाल्या आहेत. मुलांची मुलं आता पाळणाघरात राहातायत इतकी मुलं मोठी झाली आहेत. पण अजून ही त्यांचं काकूंशी असलेलं bonding तसंच आहे. मुलाच्या लग्नात त्याने “ आई, तू जशी तुला साडी घेशील तशीच काकूंना ही घे ” अस मला सांगितलं होतं ज्याचा मला अर्थातच खूप अभिमान वाटला होता.

ह्या वर्षी आमच्या तिकडच्या बिल्डिंगचा सार्वजनिक गणेशोत्सव स्पेशल होता म्हणून मुद्दाम काकूंनी त्याला " येऊन जा " असं सांगितलं होतं. खरं तर त्याच्या साठी हे कठीण होतं ऑफिस सांभाळून हे मला दिसत होतं. पण त्याने काकूंचा शब्द डावलला नाही. वेळात वेळ काढून तो जाऊन आलाच. त्यामागे काकूंच्या भावनांना प्राधान्य हेच अधिक होत गणपतीवरच्या श्रद्धे पेक्षा.

असं हे अनोखं नातं. ह्या नात्याची सुरवात जरी मी करून दिली असली तरी आता ह्या नात्यात माझी भूमिका दुय्यम झाली आहे ह्याचा मला मनापासून आनन्द आहे.

(थॅंक्यु मायबोली आणि गणेशोत्सव टीम ह्या विषयासाठी. अनेक दिवस हे लिहायचं मनात होतं, आज ह्या उपक्रमामुळे त्याला चालना मिळाली. )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय ममो. हे जिव्हाळ्याचे संबंध मुलांनी अजूनही जपलेत हे तर फारच आवडले.

ममो, काय सुंदर लिहीलंय.. मला माझ बालपण आठवलं.. माझीही आई नोकरी करायची तेव्हा आम्ही शेजारच्याच घरी वाढलो.. शाळेत सोडण्यापासून आम्हाला जेऊ घालण्यापर्यंत सगळ्या गोष्टी शेजारची काकू करायची.. आणि गम्मत म्हणजे त्यांनी कसलेच पैसे कधी घेतले नाहीत.. अजूनही मी आणि माझा भाऊ कधीही भारतात गेलो कि आमच्या दोनचार फेऱया त्यांच्याकडे असतातच.. वयामुळे आता तीचं किचन सुटलंय पण मी भेटायला येणार असेन तर अजूनही ती काळ्या वाटाण्याची उसळ किंवा पिठी यांसारखे माझ्या आवडीचे प्रकार करून खाऊ घालतेच.

मी पण वयाच्या ३ऱ्या वर्षापासून पाळणाघरात होतो. चाळीतले १ RK , बाहेर टॉयलेट याची कधीच गैरसोय झाली नाही. आमच्या काकूंनी अगदी मुलांसारखे वागवले. अजूनही त्यांच्या आमटीची चव आठवते . कधी ट्रेनचा गोंधळ झाला तरी आईला टेन्शन नसायचे. आम्ही त्यांच्याकडे राहून आज दुनिया फिरून आलो, पण दुःख हेच कि त्यांचा स्वतःचा मुलगा मात्र फार शिकला नाही. त्या पिढीचे कष्ट पाहिले तर आता स्वतः फारच प्रिव्हिलेजेड वाटतो. लग्नात स्टेजवर मला सगळ्यांसमोर "गुंड्या " म्हणणाऱ्या त्या एकच होत्या.

एक मजेदार किस्सा - त्यांच्या कडे एक कुटुंब पळणाघरासाठी चौकशीकरीता आले असता , मी एकदम ऐटीत अंगणात मारलेले झुरळ दाखवायला आणले होते. चांगलाच ओरडा बसला होता

सुरेख लिहिलयं!
मुलं आणि तुम्ही याबाबत भाग्यवान होता.तुमच्या मुलांनी हा जिव्हाळा जपला हे तर खूपच अभिमानास्पद आहे.

खुपचं आवडलं. माझा लेकही पाळणाघरात वाढला. मी रिलेट करू शकले बऱ्याच गोष्टी.
देवकी +१११ तुम्हा सगळ्यांचच कौतूक आहे.

मस्त !

ईथे ऑफिसमध्ये लंच टाईमला बायकांच्या गप्पांमध्ये हा विषय आणि ही चिंता असतेच. आपल्यामागे पोरांचे काय. कधी आपल्या कामधंद्याच्या नादात पोरांची हेळसांड झाली तर त्यावर बोलताना डोळे पाणावलेलेही पाहिले आहेत. त्यामुळे असे एखादे नाते आयुष्यात येणे किती नशीबाचे आहे समजू शकतो.

थॅंक्यु सगळ्यांना. सगळे प्रतिसाद ही खूप छान.

आमच्या कडे ही काकूंच्या हातची आमटी, भेंडीची भाजी ( घरी हात ही लावत नाहीत ) , आईस्क्रीम ह्याची अजून ही आठवण येते.

आमच्या ही ऑफिसमध्ये काहींना खूप काळजी असायची. मग घरी फोन करायचा ( तेव्हा फोन ही एवढा सुलभ नव्हता ) गाड्यांचा गोंधळ असला की वेगळीच घालमेल असायची. मी मात्र निर्धास्त असायचे काही emergnecy आली तरी त्या योग्य तेच करतील हा विश्वास होता मला.

त्याना आणखी दोन चार जणींनी विचारलं ही होतं मुलांना संभाळण्या बद्दल. त्या सहजपणे हा व्यवसाय वाढवू ही शकत होत्या , पण त्यानी नकार दिला होता. मला म्हणाल्या ही होत्या, "तुझा जसा माझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे तसा त्यांचा असेल की नाही सांगता येत नाही म्हणून नकोच ते. " तशी त्याना हे करण्याची फार गरज होती असे ही नाही. त्यांचं मस्त होतं सगळं पण खरच आमचं भाग्य थोर म्हणून मुलांना त्या मिळाल्या.

>>> अजून ही त्यांचं काकूंशी असलेलं bonding तसंच आहे. मुलाच्या लग्नात त्याने “ आई, तू जशी तुला साडी घेशील तशीच काकूंना ही घे ” अस सांगितलं होतं ज्याचा मला अर्थातच खूप अभिमान वाटला होता.
तुम्ही आणि काकू दोघीही आईपणाची परीक्षा एक्सेप्शनल मार्कांनी पास झालात! Happy

मस्त लिहिलंय. आम्ही भावंडं पाळणाघरात जात होतो, आणि पुढे माझ्या मुलांनाही ठेवलं / ठेवते आहे, त्यामुळे आधिकच भिडलं.

सुरेख. डोळ्यातून पाणी आलं.

माझी आई नोकरी करत नव्हती तरी शेजारच्या एक काकु आम्हाला अगदी प्रिय होत्या, माझी वेणी घालायच्या, त्यांचे ब्राह्मणी पद्धतीचेच पण कुडाळच्या असल्याने सढळ ओले खोबरे आणि मस्त तिखटसर पदार्थ मला खूप आवडायचे. त्यांच्याकडे गणपती असल्याने त्या मला नेहेमी हाताखाली मदतीला बोलवायच्या, उकडीचे मोदक मला त्यामुळे छान करता येतात. भाऊ बालवर्गात शाळेतून पळून यायचा तेव्हा काकु कडेवर घेऊन त्याला शाळेत सोडायला जायच्या सोबत छोटी मी असायचे. दुर्दैवाने त्या फार लवकर आमच्यातून निघून गेल्या. त्यांच्या दोन्ही मुलींशी आमचं सख्य आहे आणि त्या मुली कायम मला म्हणतात, अंजुताई आम्हाला आठवण येत नाही एवढी तुला आईची आठवण येते. साहजिक आहे त्या फक्त काकु नव्हत्या, माझी एक मैत्रीणही होत्या.

या निमित्याने मलाही लिहिता आलं, थॅंक यु हेमाताई आणि मायबोली.

स्वाती, शामली- अंजू ...धन्यवाद

तुम्ही आणि काकू दोघीही आईपणाची परीक्षा एक्सेप्शनल मार्कांनी पास झालात! Happy >> किती छान लिहिलं आहेस.

अंजू , किती गोड आठवणी आहेत. खूप सुंदर लिहिलं आहेस.

खूपच हृद्य लेख.
अजून एक महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे..घरात जर सासू बाई असतील आणि
त्यांनी मुलं सांभाळली तर चारदा बोलून दाखवतील, अपेक्षा ठेवतील...." आमची मुलं नव्हती हो असली हट्टी....." टाईप टोमणे मारतील
हे म्हणजे...म्हटले तर शेजारी आणि म्हटले तर आजीच्याच मायेने करणाऱ्या काकू...असे छान नाते होते. Happy

सुंदर लेख..!!
काकू अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.
अशी मायाळू माणसं मिळायला खरचं भाग्य लागतं.

खूप मस्त लिहिलंय मनीमोहोर! हे ऋणानुबंध खूप छान असतात खरंच.

माझ्या आईचं पाळणाघर होतं त्यामुळे अगदीच रिलेट करता आलं. मुलं खूप अ‍ॅटॅच्ड होऊन जातात हे अनुभवलंय. कित्येक लहानगी घड्याळ कळत नसलं तरी आईच्या येण्याची वेळ झाली कि बरोबर दारात जाऊन बसत. कसं कळायचं कोण जाणे. गलबलुन यायचं तेव्हा. नशीबाने मला कधी असं राहवं लागत नाही हे बरंच वाटायचं. आई पण त्यांचं खूप मायेनी करायची. आमच्या घरात जे बनेल ते त्यांच्या डब्यासोबत जेवायला द्यायची. मला कधी कधी जेलस वाटायचं आई त्यांच्याकडे जास्त लक्ष देते. मी चिडचिड केली की ती म्हणायची अगं तुझी आई तुझाजवळच आहे. तरी रडतेस, ती मुलं मग काय करतील बिचारी? काही एंजॉय करायची, काही तासनतास रडायची.
आता सगळे बरेच मोठे होऊन आपापल्या मार्गाला लागलेत पण आईला येऊन भेटतात नक्की. त्यांच्यातला बाँड तुमच्यासारखाच अनुभवलाय मी पण.

आंबट गोड, रुपाली विशे- पाटील, लंपन, आणि अंजली _१२ धन्यवाद सगळ्यांना.
आता इथे पाळणाघरात रहाणारी मुलं, त्यांच्या आया आणि पाळणाघर चालक असे सर्वांचे अनुभव , विचार वाचायला मिळतायत. अंजली_ १२ छान लिहिलय तुम्ही ही फारच.
आपली मुलं आपल्या गैरहजेरीत चांगल्या हातात आहेत हा विश्वास नोकरी करणाऱ्या आईसाठी फारच मोलाचा असतो.