हिंदी शब्दान्ची मराठीत भेसळ

Submitted by किरण on 18 April, 2010 - 00:16

मुंबईत रहाणार्‍या मराठी माणसाला मराठी आणि हिंदी ह्यांची चांगलीच जवळीक(?) असते. मात्र ह्या भाषांत वापरले जाणारे काही शब्द 'स्पेलींग' (आता ह्याला मराठीत काय म्हणावे बरे?) अगदी सारखे असले तरी त्याचा अर्थ व संदर्भ वा दोन्ही अतिशय वेगळा असू शकतो. त्यातून कधीकधी विनोदी प्रसंग निर्माण होतात त्याचे वेगळे बाफ आहेतच मात्र मराठीत एखादा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ नये म्हणुन त्याचे दोन्ही भाषेतील अर्थ येथे लिहावेत. काही शब्द तन्तोतन्त सारखे नसले तरीही त्यात चुकीची शक्यता असेल तरीही लिहावेत पण शक्यतो अगदी सारखे असणार्‍या शब्दांना प्राधान्य द्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोला
हिंदी : सांगितलं
मराठी: सांगा (ह्या शब्दाची लोक मराठीत फार भेसळ करतात...जसे "मी त्याला बोललो होतो")

सुन
हिंदी: ऐक
मराठी: मुलाची बायको

बाल
हिंदी: केस
मराठी: लहान

चारा
हिंदी: पर्याय (इसके सिवा कोई चारा नही...च- चष्म्याचा)
मराठी: गवत-प्राण्यांचे खाद्य (च-चमच्याचा)

चाटा
हिंदी:थोबाडीत मारणे (च- चष्म्याचा)
मराठी: चाटा (च-चमच्याचा)

माया
हिंदी: चमत्कार (यह तो सब भगवान की माया हैं)
मराठी: वात्सल्य

दंग
हिंदी: आश्चर्य (मैं दंग रह गया)
मराठी: व्यस्त असणे (मी कामात दंग होतो)

काटा
हिंदी: चावला (सापने कांटा)
मराठी: काटा (गुलाबात असतो तो...)

खत
हिंदी शब्दाचा अर्थः पत्र
मराठी शब्दाचा अर्थः शेतात घालायचं खत.

गज
हिंदी शब्दाचा अर्थः जमीन मोजण्याचे एक परिमाण
मराठी शब्दाचा अर्थः हत्ती, लोखंडी गज.

कुंडीवरून आठवले.. (विषयांतराबद्दल माफ करा)

शुक्रवार पेठेत सर्कस व्हिलात राहत होतो, तेव्हाची गोष्ट. ३१ डिसेंबरची पर्टी आटोपून आलो तेव्हा जिन्यातल्या कुंड्यांना लाथा झाडून आमच्यापैकी कुणीतरी त्या फोडल्या. अंधारात काहीच दिसत नसल्याने सारे गुपचूप जाऊन झोपले. दुसर्‍या दिवशी खडूस मालकीणबाई संपूर्ण जिन्यावर थयथयाट करीत चिडत-रडत-ओरडत होत्या.. ''मेरा कुंडी किसने फोडा??!!"

हे ''मेरा कुंडी किसने फोडा??!!" चे पालूपद त्यानंतर अनेक दिवस पुरले आणि सार्‍यांना खूप सासूरवासही झाला. पण आमच्या काही कानडी मित्रांची हसहसून पूरेवाट का झाली होती, ते नंतर कळले. Happy

या मालकीणमावशी म्हणजे दामू धोत्रेंच्या सूनबाई. अजूनही भेटायला जातो तेव्हा डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, 'सर्कस व्हिलाची रया गेली रे बाबा! कुंड्या फुटत होत्या, तेव्हा इथे गजबज होती. आता संपले. मीही संपणार बघ लवकरच. मग माझ्या या कुंड्यांकडे कोण बघणार??' Happy

''मेरा कुंडी किसने फोडा??!!">>> Rofl ह्या "कुंडी" प्रकरणाचा बर्‍याच जणांना अनुभव आहे तर!!!

असो, काल सारेगमपमध्ये ज्ञानेश्वर मेश्राम-अनिरुद्ध जोशीचे duet संपल्यावर अनिरुद्ध ज्ञानेश्वर विषयी बोलतांना म्हणाला, " 'माऊली' मित्र म्हणून आमच्याशी खुप छान 'व्यवहार' करतात..." ...आणि एकदम माबोवरच्या ह्या टॉपिकची आठवण झाली...असा शब्दप्रयोग ही खरोखर हिंदी शब्दाची मराठीत भेसळच म्हणायला हवी, नाही का? कारण -

व्यवहार
हिंदी: वागणूक (बर्ताव)
मराठी: धंद्याशी संबंधित शब्द आहे. त्याचा कोणाच्या वैयक्तिक वागणूकीशी काहीच संबंध नाही!

आमच्याकडे माझ्या आत्याचे मिस्टर आले होते. तेव्हाच नेमके कुंडीवाल्याला "कुंडी बेचनेवाला" असं ओरडत फिरायची बुद्धी झाली!!! आत्येचे मिस्टरांची हसून हसून वाट लागली होती. "काय काय व्विकायला येतात तुमच्य गावात.." असं कानडीतून आम्हालाच ऐकवत होते.

अजून एकः आमच्या कर्नाटक मंडळात एक काका आहेत. ते कायम काहीनाकाही विनोद करतच अस्तात. एकदा काहीतरी कार्यक्रम होता तेव्हा हॉलवाल्याने फुलाच्या झाडाच्या कुंड्या आणून ठेवल्या होत्या. त्या नक्की कुठे ठेवायच्या यावर चर्चा चालू होती. सर्वाचे त्यानी ऐकून घेतलं आणि ते म्हणाले.. "सर्वानी आपापल्या कुंड्या आपल्याचजवळ ठेवा. इकडे तिकडे नको!!!!"

आमच्या मराठीच्या प्रा.(कै)मृणालिनी जोगळेकर यांनी सांगितलेली गंमत ..कन्नड मधे सोन्याला 'बंगार' म्हणतात..तेव्हा मुंबईत आलेल्या एका कन्नड भगिनीला प्रश्न पडला की इथले फेरीवाले चक्क दारोदार सोने विकतात?

इथल्या मार्केटात मी सिताफल ओरडताना ऐकले म्हणुन गेलो तर त्या भैयाने लाल भोपळा ठेवला हातात >> भैय्याने गंडवलं Proud

मोड
हिन्दी अर्थ : वळण
मराठी अर्थ : मोड आलेली कड्धान्ये, सुट्टे पैसे

बास
हिन्दी अर्थ : दुर्गंधी
मराठी अर्थ : पुरे आता...

कल
हिन्दी अर्थ : काल
मराठी अर्थ : झुकते माप

मेला
हिन्दी अर्थ : जत्रा
मराठी अर्थ : निधन होणे

पार
हिन्दी अर्थ : पलिकडे ... नदिया के पार
मराठी अर्थ : वडाचा पार, आर-पार, अतिशय

पर
हिन्दी अर्थ : परन्तु
मराठी अर्थ : पंख ( हा अर्थ हिन्दी पण आहे)

Happy अरे हा.... वळण .... मी भाषांतर करताना गोंधळले वाटतं. आता बदलते.

मोड म्हणजे वळण्..मुडना=वळणे
काहे काही एफ एम मराठी निवेदक कार्यक्रम संपवताना 'अनुमती' मागत- हिंदीतल्या आज्ञा- इजाजत ची नक्कल करीत. पण आता ते निरोप घेतात.
ज्यांना भाषांतर कसे असू नये याचा आदर्श ऐकायचा असेल तर आकाशवाणी दिल्ली केंद्रावरल्या मराठीतल्या बातम्या ज्या महाराष्ट्रातली केंद्रे सहक्षेपित करतात त्या ऐकाव्यात.मराठी टीव्ही वृत्तवाहिन्या तर मी घाबरून पहात नाही.
निवडणुकीच्या काळात २ उमेदवारात काट्याची टक्कर असल्याचे वारंवार ऐकू येई.
हिंदीत ही तराजूच्या काट्याची असे पण मराठीत कसल्या? चुरशीची किंवा अटीतटीची लढत असे म्हटले तर जिभेला काटे टोचतात.

मध्यंतरी, काही वर्षांपूर्वी 'तू ही रे' ह्या नावाचा मराठी चित्रपट आला होता. आता हे नाव हिंदी असल्यास हरकत नाही. अनेकदा हिंदी चित्रपटाचे इंग्रजी नाव, मराठीचे हिंदी नाव वगैरे असतात. पण त्यात 'तू ही रे माझा मितवा' असं एक गाणंसुद्धा आहे. त्यात 'माझा' हा शब्द असल्याने ते मराठी असावं असं वाटतंय. मग आता मजा पहा. हिंदीत 'ही' चा अर्थ 'फक्त/केवळ' असा होतो, तर मराठीत शब्दाला जोडलेल्या 'ही' चा अर्थ 'सुद्धा/देखिल' असा होतो. मग 'तू ही रे' चा अर्थ नक्की काय होईल?

हिंदी अर्थ - फक्त तूच रे
मराठी अर्थ - तू सुद्धा रे (म्हणजे आणखी शंभर टाळकी आहेतच, त्यात भरीस भर म्हणून 'तूही रे')

Pages