लावतोय रिक्षावालाsss...

Submitted by तुमचा अभिषेक on 10 March, 2022 - 17:27

लावतोय रिक्षावालाsss...

संध्याकाळची वेळ ५.२५ पीएम

तशी आमची गार्डनला जायची वेळ पाचचीच. थोडेसे ऊजेडात खेळावे. ब्रेक घेत सुर्यास्त बघावा. मग थोडे अंधारात बागडावे. हे आमच्या गार्डनशैलीला साजेसे. पण आज ऊशीर झालेला. सोबत दोन नाही तर एकच मुलगा होता. त्यामुळे विचार केला आज एखादे छोटेसेच पण वेगळे गार्डन शोधावे.

ओला बूक केली असती तर बरे झाले असते. रिक्षावाला आधी पत्ता माहीत आहे म्हणालेला आणि आता फिरवत होता. सोबत माझा गूगलमॅपही फिरत होता. ब्रिजच्या खालून जायचे की वरून जायचे हा विचार करत आम्ही दोघेही रिक्षा साईडला घेऊन पाच मिनिटे थांबलो आणि कंटाळून पोरगा माझ्या मांडीवर डोके टेकवून झोपला.

रिक्षावाला खाली ऊतरून कोणाला तरी पत्ता विचारून आला आणि जे रिक्षा हाणली ते गार्डनच्या प्रवेशद्वारापाशीच येऊन थांबला. ते पाहून लक्षात आले की पंधरा मिनिटांपूर्वी याच रस्त्याने आपण गेलो होतो. पण आता चरफडण्याशिवाय ईलाज नव्हता. ओला कॅबचे सव्वाशे रुपये दाखवत होते आणि रिक्षाचे मीटर १७० रुपये पडले होते.

वाईट गोष्टी जेव्हा माझ्याशी घडतात तेव्हा त्या तीनचार एकदमच घडतात हा नेहमीचा अनुभव. गूगलवर शोधलेले नवीन गार्डन सुशोभिकरणासाठी महिनाभर बंद होते. सोबत खांद्यावर झोपलेले पोर होते. वैतागून फाटकावर एक लाथ मारली तसा आतला चौकीदार बाहेर आला. त्याला बघून 'मी नाही त्या गावचा' म्हणत खिश्यातला मोबाईल काढून कानाला लावायला गेलो आणि आईच्या गाssवात..!!

फोन खिश्यातून गायब होता !

मागे पळत जाऊन रस्ता चेक केला जिथे रिक्षा सोडली होती. येणार्‍या जाणार्‍यांची झडती घ्यायचाही विचार मनात आला. पण खांद्यावर झोपलेल्या पोराला पाहून आठवले की त्याला मांडीवरून खांद्यावर घेताना फोन बाजूलाच रिक्षाच्या सीटवर ठेवलेला. तो बहुधा तिथेच राहिला.

पुन्हा मागे फिरून गेटपाशी आलो. आता त्या बंद गेटवर लाथ नाही तर हात मारला. आतून पुन्हा वॉचमन बाहेर आला. त्याचाच फोन घेतला आणि माझ्या नंबरला रिंग देऊ लागलो. तीन रिंग वाया गेल्या, मग बायकोच्या नंबरला फोन लावला. सुदैवाने तो पाठ होता. यात माझी कसलीही हुशारी नसून आमच्या दोघांचा नंबर फक्त एका अंकाने वेगळा होता. तिने फोन उचलला तसे तिला सतत माझ्या नंबरवर फोन करत राहायला सांगून मी घरी परतायला ऊलट रिक्षा पकडली.

बसल्याबसल्या रिक्षावाल्याला माझ्या फोन गहाळ प्रकरणाची थोडक्यात माहिती देत त्याच्या फोनवरून माझ्या फोनला रिंग देऊ लागलो. आणि आईच्या गाssवात..!!

चक्क दुसर्‍याच रिंगला फोन ऊचलला गेला. समोरून त्या रिक्षावाल्याचा आवाज ऐकू आला आणि तो आनंदाचा धक्का अचानक सहन न झाल्याने मी रिक्षातच कलंडलो. खांद्यावरच्या मुलासह...

फोन गेला. फोनमधील सिम गेले. शेकडो पर्सनल फोटो आणि विडिओ गेले. डॉक्युमेंटस गेले. पासवर्ड गेले. आता सारे अकाऊंट बंद करत बसा. पोलिस स्टेशनला तक्रार करा. हजारो खर्चून नवीन फोन घ्या. तो चालू होईस्तोवर वर्क फ्रॉम होम थांबणार. फोनसोबत जो डेटा गेलाय तो रिकव्हर होईपर्यंत आयुष्य थांबणार... ईतके विचार एकाच वेळी येत डोकं जे भंजाळून उठलेले ते अचानक ब्रेक मारल्यासारखे शांत झाले. धक्का तर बसणारच होता.

पण छे, असा हरवलेला फोन ईतक्या सहजपणे कधी मिळतो का? आयुष्यात ईतक्या सहजपणे एखादा प्रश्न सुटत असेल तर समजावे हा नक्कीच त्या प्रश्नाचा दी एण्ड नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !!!

तो रिक्षावाला आता एपीएमसी मार्केटला होता. म्हणजे माझ्या घरापासून तसा जवळच होता. त्याला मी माझ्या घरचा पत्ता देऊन तिथे यायला सांगितले. गार्डनला जाताना त्याची रिक्षा मी बिल्डींगच्या दारातूनच पकडली असल्याने घरचा पत्ता वेगळा सांगावा लागला नाही.

मी घरी पोहोचलो. खांद्यावरच्या पोराला बेडवर झोपवले आणि बायकोच्या फोनवरून माझ्या नंबरवर पुन्हा फोन केला. तो रिक्षावाला आता वाशीला पोहोचला होता. म्हणजे आधी जिथे होता तिथून माझ्या घराच्या भिन्न दिशेला गेला होता. चूक माझीच होती. त्याला जे भाडे मिळाले ते घेऊन तो गेला. मुद्दाम माझा फोन परत करायला म्हणून तो कश्याला आपली वाट वाकडी करणार होता. ती देखील फुकटात.

मग मी माझी चूक सुधारली. त्याला म्हटले, दादा मीटर टाका आणि कुठलाही पॅसेंजर न घेता थेट माझ्या दारी या. तुमचे जे काही मीटरनुसार पैसे होतील ते मी चुकते करेन. साधारण साठ-सत्तर झाले असते, आपण शंभर देऊया म्हटले.

आता यातही एक गोची होती. त्याच्याकडे स्वतःचा फोन नव्हता. मोबाईल नसलेला रिक्षावाला मी प्रथमच बघत होतो. पण त्यामुळे केवळ मीच त्याला कॉल करू शकत होतो, पण तो मला कॉल करू शकत नव्हता. आमचे कनेक्शन वन वे होते. ते टू वे करायला त्याने मला माझ्या फोनचा पासवर्ड विचारला. आणि मी पटकन मुर्खासारखे ईंग्रजी आद्याक्षर "सी" सांगून मोकळा झालो. मग चूक लक्षात आली. त्यानंतर मात्र तो "सी" बनवायला त्या नऊ ठिपक्यातले नेमके कुठले ठिपके जोडायचे हे सांगितले नाही. तरीही एखाद्याने ठरवल्यास वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून ते शोधणे आता अवघड नव्हते. थोडक्यात मीच स्वत: एक "सी" ठरलो होतो.

साधारण वीस मिनिटात तो वाशी स्टेशनहून माझ्या घरी पोहोचणार होता. तोपर्यंत माझा नाक्यावर भजीपाव हादडून त्यावर चहा ढोसून झाला. पुन्हा त्याला कॉल केला. अंदाज, आता फारतर तो मागच्या वा त्यामागच्या सिग्नलला असेल. पण तो अजूनही वाशीच्याच एका सिग्नलला होता. कारण तो ट्राफिकमध्ये अडकला होता. असे तो म्हणत होता. पण हे कारण पटणारे नव्हते. माझा तो नेहमीचा येण्याजाण्याचा रस्ता होता. ट्राफिकची ईतकी कूर्मगती कधी अनुभवली नव्हती. कदाचित तो येताना पुन्हा भाडी घेत येत असावा असे वाटले.

असो, पण म्हणजे अजून वीस पंचवीस मिनिटे त्याला फोन करायला नको. ईतका वेळ बिल्डींगखाली ताटकळत ऊभे राहण्याऐवजी फारशी भूक नसतानाही मी पुन्हा नाक्यावर जाऊन पाणीपुरी चरून आलो. ती पाणीपुरी खाताना डोक्यात घोंघावणारे सारे विचार ईथे मांडणे निव्वळ अशक्यच. कारण फोन त्या रिक्षावाल्याकडे आहे हे समजून आता तासभर तरी उलटला होता. तरीही अजून तो माझ्या हातात आला नव्हता. त्यातल्या त्यात सुरक्षित हातात आहे हेच समाधान होते.

पण तासाभरानेही फोन हाती येणार नव्हताच. कारण आता जेव्हा मी त्याला फोन केला, तेव्हा मिळालेला धक्का आणखी पुढच्या लेव्हलचा होता. तो रिक्षावाला आता नेरूळला पोहोचला होता.

एव्हाना माझी सटकू लागली होती. पण तरीही मोठ्या धैर्याने मी संयम बाळगून होतो. कारण राक्षसाचा जीव ज्या पोपटात असतो तो पोपट त्या रिक्षाचालकाच्या मुठीत होता. त्यामुळे मला त्याच्याशी मिठू मिठू बोलणे भागच होते.

"दादा असे काय करता, मी म्हणालेलो ना तुम्हाला. तुम्ही मीटर टाका आणि माझ्याकडे या. मी पैसे देतो ना तुम्हाला तुमच्या भाड्याचे.."

"अहो साहेब, नेरूळचे भाडे मिळाले. दिडशे रुपयाचे. सोडणार कसे. मी येतो ना तुमच्याकडे. तुम्ही घाबरू नका. तुमचा फोन सुरक्षित आहे माझ्याकडे" ... फोन कट!

एक तर त्याला सहा ते सात वेळा फोन लावल्यावर कधीतरी तो फोन उचलायचा. आणि फोन उचलल्यावर असे धक्के द्यायचा. आता ईथून नेरूळला गेलाय. ते भाडे सोडलेय की अजून सोबत आहे, तिथून तरी पुढे सरळ माझ्याकडे येणार की पुन्हा रस्त्यात मिळेल तसे भाडे घेत येणार. कश्याची काहीच कल्पना नव्हती. किमान अर्धा तास तरी तो आता येत नाही हे समजले. आणि मनात भलसलते विचार येऊ लागले.

काय करत असेल तो? खरेच नेरूळला गेला असेल? की आतापर्यंत मला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ काढतोय? आणि या वेळेत मी जे त्याला माझा पासवर्ड सांगून बसलोय तो "सी" शोधतोय? मन चिंती ते वैरी न चिंती..... पण ईथे बहुधा माझा वैरी देखील हेच चिंतीत होता!

माझ्या हातात बायकोचा मोबाईल होता. त्यावर एक नोटीफिकेशन पॉप अप झाले. माय गेट सिक्युरिटी अ‍ॅप. कोण आले आहे हे चेक करून मी नेहमीप्रमाणे अ‍ॅप्रूव्ह करणार तोच ते नोटीफिकेशन गायब झाले. माझ्या आणि बायकोच्या दोघांच्या मोबाईलवर एकाचवेळी हे नोटीफिकेशन येते. त्यानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. याचाच अर्थ मी ईथून काही करायच्या आधीच ते माझ्या फोनवरून अ‍ॅप्रूव्ह केले गेले होते. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा माझा फोन...... आईच्या गावाssत!!

म्हणजे माझा फोन अनलॉक झाला होता. खुल गया था बदकिस्मती का ताला, मै सचमुच का सी बन गया था साला..

माझा फोन एका परक्या व्यक्तीच्या हातात होता. विवस्त्र झाला होता. आता तो त्याची काय विटंबणा करू शकतो वा करणार या कल्पनेनेच अंगावर काटा आला होता.

मी लगेच त्या रिक्षावाल्याला फोन केला,
"सरsss.... येताय ना."

नेरूळवरून सरळ या. मीटरही नका टाकू. दिडशे रुपये भाडे होते ना तुमचे. मी दोनशे रुपये देतो. फोन तातडीने हवा आहे. ऑफिसचा महत्वाचा कॉल येणार आहे. प्लीज या आता लवकर....

याआधीही मी त्याच्याशी सौजन्यानेच बोलत होतो. पण आता अगदी हवालदिल होत याचना करत होतो. त्याचे मात्र एकच पालुपद सुरू होते. घाबरू नका साहेब, तुमचा फोन सुरक्षित हातात आहे.

वीस मिनिटात आलोच बघा म्हणत त्याने फोन कट केला. मोजून पंधरा मिनिटे मी कळ सोसली. आणि पुन्हा फोन लावला..... आईss आईss आईच्या गावाssssssत!!

फोन स्विचड् ऑफ !

खेल खतम, पैसा हजम .... भेंss#चोद .. कचकचीत आणि अस्सल शिवी. तोंडावर कसलाही सायलेन्सर न लावता. फ्रस्ट्रेशन लेव्हल हाय हायपर हाय्येस्ट!

ती शिवी त्या अज्ञात रिक्षावाल्याला होती ज्याचा चेहराही माझ्या लक्षात नव्हता की माझ्या पांडू नशीबाला होती ठाऊक नाही. पण घुसली थेट माझ्याच काळजात होती. उभ्याउभ्याच मी कोसळलो होतो. एका यकिंश्चित रिक्षाचालकाने आपल्याला बघता बघता गंडवले हा वार जिव्हारी लागला होता. कोणत्या तोंडाने घरी परतायचे हे न समजल्याने पाच मिनिटे मी तिथेच एका खांबाचा आधार घेत उभा होतो. माणूसकीवरचा विश्वास उठला होता. रिक्षाचालक म्हणजे चोर जमात हा निष्कर्श काढला होता. माझ्या मनातल्या खळबळीची पर्वा न करत टिर्र टिर्र आवाज करत समोर येऊन थांबलेल्या रिक्षावाल्यातही मला आता तोच भामटा दिसत होता. आणि त्यानेदेखील चोरासारखेच ईकडे तिकडे बघत खिश्यातून एक काळानिळा चकचकीत मोबाईल काढला जो सेम अगदी..... आईच्या गावाssssत!!

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित स्वागत आहे. तेच म्हटलं अजून हजेरी लावली नाही ते. आमच्या मागे पण ब्लॅक रॉबिन, एक्स मॅन इ ठेवणीतले आयडी लागतात तेव्हा असाच सपोर्ट करा.

अहो शांत माणूस
तुम्हाला मी सपोर्ट करायला तयार आहे तर तुम्ही माझा सपोर्ट नाकारत आहात.
वर ते माझेच आयडी असल्याचा आरोप करत आहात.

मोबाईल रिक्षात हरवलाय, रिक्षावाल्यांचा युनियन लीडर मदत करायला तयार आहे, तर तुम्ही तो रिक्षावाला तुझाच साथीदार म्हणून त्याच्यावरच आरोप करत आहात Happy

Pages