गंध

Submitted by मामी on 9 February, 2022 - 15:43

नवरा गेलाय फिरतीवर, दुसर्‍या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ-तांदूळ धुऊन पातेलं गॅसवर ठेवून फोडणी केली. तितक्यात...

डिंग-डाँग... डिंग-डाँग... डिंग-डाँग...डिंग-डाँग... डिंग-डाँग....

पाच वेळा इतक्या घाईघाईनं म्हणजे मनूच ती! तिला धीर धरवणार नाही. धावत जाऊन मी दार उघडलं.

"मावशी, बघ गं कसं काय जमलंय मला ते!" दार उघडल्या उघडल्या तिनं काढलेलं गुलाबाच्या फुलाचं सुरेख चित्र मनूनं माझ्या डोळ्यांसमोर नाचवलं.

"अरे वा! गुलाब! किती सुंदर आहे हे चित्र. मनू, हे तर तुझं पोर्ट्रेट म्हणूनही चालून जाईल बरं. या चित्रातल्या गुलाबासारखीच तू दिसतेस बबडे. नेहमी हसणारी, नाचणारी, आनंदी."

"खरंच मावशी?" मनूचे मोठे मोठे डोळे आनंदानं भरून गेले. मला घट्ट मिठी मारून माझी पापीही घेतली तिनं. भारी लाघवी आमची मनू.

"चल, मी तुला खाऊ देते. मग आपण आजच्या पेपरातलं सुडोकू सोडवूयात."

मनू खुश झाली.

मनूला खाऊ देण्याकरता मी वळले अन् माझ्या नाकाला जाणवलेल्या वासानं एकदम घाबरलेच!...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

मनू म्हणजे आमच्या शेजारी राहणार्‍या कुटुंबातली लेक, मनकर्णिका. बारा वर्षांची मनू म्हणजे उत्साहाचा अखंड झरा. माझी आनंदाची ठेव. माझी मानसकन्याच जणू. आम्हांला मूलबाळ नाही, त्यामुळे लहान मुलीचे लाड करण्याची माझी सगळी ऊर्मी तिच्या हक्काची! मनूदेखील अगदी लहानपणापासून तिच्या घरी कमी आणि माझ्या घरी जास्त असायची.

अरेच्चा! पण मी कोण ते सांगितलंच नाही ना तुम्हांला? हं... नक्की काय सांगावं? माणसाची ओळख म्हणजे काय असतं नक्की? नाव? शिक्षण? पत्ता? ते तर प्रत्येकाकडे असतंच की! पण तरीही प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादं तरी वैशिष्ट्य, वेगळेपण असतं की नाही? जे इतरांकडे नाहीत असे विचार म्हणा, एखादी आगळी कला म्हणा, एखादं भव्य ध्येय म्हणा... माझ्याकडेही असं काहीतरी खास आहे. हे जे काही खास आहे ते आयुष्यभर मनात ठेवून वावरलेय मी.

पण आज घटनाच अशी घडलीये की कुणाला तरी सांगावसं वाटतंय. म्हणून मी लिहून काढतेय सगळीच कहाणी. अर्थात या कहाणीतले संदर्भ आणि नावं मात्र मी बदलली आहेत. घटनेतील कोणीही असामान्य नाही. तुमच्या आजूबाजूला वावरणार्‍या तुमच्यासारख्याच व्यक्ती आहेत. हे मी तुम्हांला सांगितलं नसतं तर तुमच्या लक्षातही कधी आलं नसतं इतकं सामान्य आयुष्य जगणार्‍या.

तर, मी वनिता काळे. एक साधीसुधी मध्यमवर्गीय स्त्री. साध्याच घरातली, साधी स्वप्नं, साध्या अपेक्षा असलेली मुलगी. कोकणातल्या एका साध्या खेड्यातल्या एकत्र कुटुंबातली. लग्न झालं तेही एका साध्या माणसाशी. नवर्‍याची सरकारी नोकरी आणि त्या नोकरीतल्या त्याच्या साध्या आकांक्षा. सोप्या वाटेवरून जाणार्‍या इतर असंख्य लोकांप्रमाणेच माझा नवराही. माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाही. कोणत्याही सामान्य गोष्टीबद्दल मला काही म्हणजे काहीच आक्षेप नाहीये. उलट सामान्य लोकांचा हेवा वाटतो मला. हे सामान्यत्व माझ्या वाट्याला का नाही आलं असं वाटून कधीकधी त्रासही होतो.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

माझ्या आयुष्यात उलथापालथ करणारा तो दिवस अजूनही तसाच्या तसा मला आठवतो. जेमतेम अकरा-बारा वर्षांची असेन मी. घरी मोठा गोतावळा. आजीआजोबा, आईवडील, दोन काका, दोन काकू, आम्ही सगळी सख्खी चुलत मिळून दहा भावंडं. घरची शेती, गाईगुरं, गडीमाणसं. लहानपण खूप मजेचं होतं. काही कटकटी, विवंचना नव्हत्या. श्रीमंती नव्हती पण काही कमीही नव्हतं. आनंदात होते मी. आणि मग एक दिवस...

मे महिन्याचे दिवस होते. भर दुपारची वेळ. आजोबा नेहमीच सगळ्यांच्या आधी एकटे जेवायचे आणि मग पडवीत त्यांच्या आरामखुर्चीत जाऊन बसायचे. मग आम्ही भावंडं जेवून त्यांच्याभोवती कोंडाळं करून बसायचो. गप्पा, हसणं-खिदळणं, चिडवाचिडवीला ऊत यायचा. क्वचित मारामारी आणि रडारडीही होत असे. पण ते तेवढ्यापुरतंच. आजोबा चट्दिशी आमची भांडणं सोडवून द्यायचे.

आमचे आजोबा आम्हां सगळ्यांचेच भारी लाडके. त्यांचीही आमच्यावर अत्यंत माया. त्यांना आमच्यावाचून आणि आम्हाला त्यांच्यावाचून करमायचंच नाही. माझी आणि आजोबांची तर खास दोस्ती. लहानपणी मी बरीच आजारी होते म्हणे. त्यावेळी आजोबांनी मला खूप सांभाळलं होतं. रात्ररात्र माझ्या उशाशी जागून माझी काळजी घेतली होती. त्यामुळे इतर नातवंडांपेक्षा त्यांची माझ्यावर काकणभर जास्तच माया होती.

तर त्या दिवशीही नेहमीच्या शिरस्त्यानुसार दुपारी आम्हां मुलांची जेवणं झाल्यावर मी पडवीत आजोबांच्या शेजारी जाऊन बसले. मला त्या दिवशी थोडं बरं नव्हतं म्हणून जेमतेम चार घास खाऊन मी सगळ्यांच्या आधी उठले होते. पडवीत आजोबा नेहमीप्रमाणे आरामखुर्चीवर डुलत डुलत सुपारी कातरत होते.

"आज लवकर जेवून आलीस वनिता. बरं नाहीये का?" आजोबा मायेनं म्हणाले.

"हो. म्हणून फार जेवण गेलं नाही."

"बरं बरं...." आजोबा डोळे मिटून तंद्रीत गेले होते.

आजोबांच्या खुर्चीशेजारीच जमिनीवर बसत असताना मला पहिल्यांदा 'तो' गंध जाणवला. ती जाणीवच काही वेगळी होती. अत्यंत वेगळाच गंध होता तो. खरं तर मी त्याल सुगंधच म्हटलं असतं, पण त्या वासात एक कारुण्य होतं. कारुण्य म्हणण्यापेक्षाही त्यात एक हताश अपरिहार्यता होती. काहीतरी खूप आवडीचं गमावल्यावर येणारी.

"आजोबा, हा कसला सुगंध?" मी काहीशा चमत्कारिक आवाजात बोलले असणार. कारण आजोबा एकदम दचकून जागे झाले.

"आँ? काय गं, काय झालं?"

"इथे काहीतरी वेगळाच सुवास येतोय. आधी कधीच मी असा सुवास अनुभवला नाहीये."

"सुवास? छे गं. मला नाही येत तो! हां, आतून गरमागरम भाताचा वास मात्र येतोय." आजोबा मिश्किलपणे हे म्हणता म्हणताच अचानक थबकले. माझ्याकडे दृष्टी वळवून त्यांनी मला जवळ बोलावलं.

" नक्की सांग. कसा आहे तो सुवास?" त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं.

" आजोबा, कसा आहे ते कसं सांगू? तो सुगंधही आहे आणि त्याचबरोबर दुर्गंधही आहे. म्हणजे छान वास घेतल्यावर आपल्याला कसा आनंद होतो ना? तसं नाहीये... या सुगंधाचा... श्वास... खोलवर... जात... असताना... आतून... काहीतरी... दु:खद... टोचत जातं.... "

मी हे म्हटलं आणि आजोबा थिजलेच! माझ्याकडे ते नुसतेच बघत राहिले. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव माझ्या डोळ्यांपुढे झरझर बदलत गेले. आधी काहीच न कळल्यासारखे बघत होते आजोबा. अचानक सत्य जाणवल्यासारखा एक तरंग त्यांच्या चेहर्‍यावर पसरत गेला. त्यांचा चेहरा विदीर्ण होत गेला, अतीव करुणेनं. मग पुन्हा काहीशा शाश्वत सत्याची जाणीव त्यांच्या शरीरात झिरपत गेली आणि मग चेहर्‍यावर उरला फक्त निग्रह!

मी ते भाव कसे कोण जाणे, पण अगदी पुस्तक वाचावं तसे वाचू शकत होते. आजूबाजूच्या अवकाशात केवळ एक स्तब्धता होती. मी आणि आजोबा जणू काही एका अनामिक कोषात होतो. त्यात इतरांना प्रवेश नव्हता. ते केवळ आम्हां दोघांतलं गुपित होतं, एक करुण गुपित!

किती वेळ गेला ते कळलंच नाही. पण पहिल्यांदा सावरले ते आजोबाच.

"वनिता बेटा, तू काही आता लहान नाहीस. मला तुला काही सांगायचंय. नीट लक्ष देऊन ऐक बेटा. सगळ्यांच्याच आयुष्यात सुखदु:ख कमीअधिक प्रमाणात असतातच. प्रत्येकाच्या आयुष्याचा पट वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला असतो. कोणते अनुभव कोणाच्या वाट्याला येतील हे त्या जगन्नियंत्याच्याच हातात असतं. कधीकधी एखाद्याच्या फाटक्या झोळीतही अवचितपणे एखादं रत्न टाकतो तो. आणि मग ते पेलायची ताकद नसली तरी आपल्याला आयुष्यभर त्या मौल्यवान वस्तूची राखण करावीच लागते. अगदी तिचं मूल्य आणि त्यामागचा कार्यकारणभाव समजला नाही तरीही."

"एकच लक्षात ठेव. तुला एक वेगळी शक्ती प्राप्त आहे. ती काय आहे हे तुला हळूहळू कळेलच. आणि एक सांगतो, तसं पाहिलं तर या शक्तीमुळे आपला फायदा काही नाही अन् आपलं नुकसानही काही नाही. ती केवळ आहे. ती का आहे यावर मी खूप विचार केला. कदाचित पुढे कधीतरी कोणत्यातरी भविष्यात मानवी पिढीला ती अतिशय उपयोगी पडणार असेल. म्हणून ती पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होत आहे. आपण केवळ त्या साखळीतले दुवे. बस्स. कधीतरी मानसिक त्रास होतोही, पण सरावशील तू बेटा याला. घाबरू नकोस. इतरही कित्येक जण असे असतील जगाच्या पाठीवर, अशीच वेगवेगळ्या ओझ्यांची गाठोडी बाळगणारे. ते आपल्याला कधीच कळणार नाही. तूही तुझ्याकडची ही शक्ती कोणाला कळू देऊ नकोस. अगदी कोणालाही नाही. केवळ तुझ्यापाशीच राहिल हे गुपित आणि हे व्रत तुला आयुष्यभर सांभाळावं लागेल. या जबाबदारीत कोणीही वाटेकरी नाही. तिचे परिणामही तुझे तुलाच सांभाळावे लागतील. स्वतःला खंबीर बनवावंच लागेल तुला. माझे आशीर्वाद आहेत बेटा तुला." बोलता बोलता आजोबा भावुक झाले. माझ्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी मला पोटाशी धरलं.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

वर्षभरानंतर घरात मुंज निघाली. लगबग सुरू झाली. घराची रंगरंगोटी, कपडेलत्ते, आमंत्रणं यात घर बुडून गेलं. दुसर्‍या दिवशी मुंज. आदल्या दिवशी सकाळी मला नेहमीपेक्षा बरीच लवकर जाग आली. बाकी सगळी भावंडं आजूबाजूला झोपलेली... घर काळोखात बुडालेलं... फक्त स्वयंपाकघरात खुडबुड जाणवली. आजीदेखील नेहमीपेक्षाही जास्त लवकर उठून आटपत होती बहुतेक. डोळे चोळत मी स्वयंपाकघरात गेले आणि तोच गंध पुन्हा आला. अगदी अंगावरच आला.

थबकून मी दारातच उभी राहिले. हा गंध इतर कोणताही असूच शकत नव्हता.

" काय गं, काय झालं? लवकर उठलीस होय? जा, पटकनी दात घासून ये माझ्या मदतीला." आजी म्हणाली.

"आजी, हा वास कसला गं?" मी सावधतेनं विचारलं.

"कसला वास? काल रात्री उशीरापर्यंत जागून तुझी आई न काकू शंकरपाळ्या करत होत्या. तो वास भरून राहिलाय."

मी यावर काहीच बोलले नाही पण मला माहित होतं की तो वास शंकरपाळ्यांचा नव्हता.

आता का येतोय हा वास? काय अर्थ त्याचा? मलाच कसा येतोय? मी काय करू? मी काय करणं अपेक्षित आहे? डोक्यात नुसती विचारांची भिरभिर भिरभिर होत राहिली... आणि होतच राहिली. त्याला ना काही उपाय होता ना कोणाकडे मन मोकळं करण्याची मुभा. पण नंतरच्या तीन-चार दिवसांच्या अखंड गडबडीत मनातलं वादळ बाजूला पडलं. ते एका सकाळपर्यंत....

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

मे महिन्यातल्या दुपारी पडवीत पहिल्यांदा जेव्हा तो गंध जाणवला होता त्यावेळी आजोबा काय सांगत होते ते मला कळत होतंही आणि नव्हतंही. शब्द समजत होते पण अर्थ नाही. आजोबांनी जे सांगितलं त्यामु़ळे मी गंभीर झाले होते, पण तेवढंच. बाकी आयुष्यात काही फरक पडला नव्हता. उलट आपण कोणीतरी आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि बाकीच्यांना हे माहीतच नाहीये हे वाटून जरा तोराच दाखवत फिरत होते. कधीतरी आजोबा याबद्दल अजून काहीतरी सांगतीलच तेव्हा बघू असा विचार करून मी तो प्रसंग मनावेगळा केला होता.

पण त्या दिवसानंतर मोजून दहा दिवसांत अचानक आजोबा वारले. आजारी नाही, काही नाही. नेहमीप्रमाणे दुपारी आरामखुर्चीत डुलक्या घेत होते ते पुन्हा उठलेच नाहीत. माझ्यासकट सगळं घर हादरलं आणि मग हळूहळू सावरलंही. या दु:खात त्या गंधाबद्दलतर मी पार विसरून गेले होते.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

...ती सकाळ पुन्हा एकवार माझ्यातल्या वेगळेपणाची जाणीव ठळक करून देणारी ठरली. एक विदारक सत्य अधोरेखित झालं.

मुंज होऊन दोन आठवडे उलटले असतील नसतील... मुंजीत उत्साहात वावरलेली माझी आजी त्या दिवशी सकाळी अंथरुणातून जागी झालीच नाही. मुलाबाळांच्या, नातवंडांच्या अशा भरलेल्या संसारातून ती अगदी अलगद उठून गेली. कोणाला अजिबात कल्पनाही न देता.

इतर कोणालाही नाही, केवळ मला पूर्वकल्पना देऊन....

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

नंतर नंतर असे हेलपाटून टाकणारे अनेक प्रसंग आले. शाळेतल्या माझ्या लाडक्या बाई रस्त्यातून येताना पाय मुरगळून खाली पडल्या अन् त्यांच्या डोक्याला मार बसला. त्यांना बघायला त्यांच्या घरी गेले असताना 'तो' तिथे होता. बाई दुखण्यातून कधी बर्‍या झाल्याच नाहीत. दोनेक आठवड्यातच वारल्या.

आमचा भिवा गडी. आम्हां सगळ्या भावंडांना अंगाखांद्यावर खेळवलेला. तो कसलासा आजार होऊन गेला. त्याच्या त्या शेवटच्या दिवसात त्याच्या अवतीभवती मला 'ती' जाणीव झाली होतीच.

असे अनेक प्रसंग. वेळा वेगळ्या, जागा वेगळ्या, कारणं वेगळी, व्यक्ती वेगळ्या. चिरंतन होत्या केवळ दोनच गोष्टी - एक मी आणि एक तो - निर्णायक, शाश्वत मृत्युगंध!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

मनूला खाऊ देण्याकरता मी वळले अन् माझ्या नाकाला जाणवलेल्या वासानं एकदम घाबरलेच!

त्याच वेळी मनूही ओरडली, "मावशी हा कसला गं वास?"

"अगं बाई, माझी फोडणी जळली वाटतं!!!" घाबरून मी स्वयंपाकघराकडे धावले.

पाठोपाठ मनूही स्वयंपाकघरात हजर झाली.

"नाही मावशी. हा जळलेल्या फोडणीचा वास नाहीये... काहीतरी छानसा वास आहे... पण त्याचबरोबर तो वाईटही आहे... इतका छान वास असूनही आतून रडावसं वाटतंय. तुला नाही येत आहे तो वास?"

पण मला फक्त जळलेल्या फोडणीचाच वास येत राहिला....

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

पूर्वप्रकाशित : मायबोली दिवाळी अंक, २०१४
https://vishesh.maayboli.com/index.php?q=diwali-2014/1573

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, मस्त. Happy
नाव बदल की गं. Don’t give it away!

धन्यवाद सगळ्यांना.

स्वाती, कथेच्या मध्यावर तसंही नावाचा खुलासा होऊन जातोच. तो सस्पेन्स नाहीये. वेगळा आहे. उलट हे नाव मला समर्पक वाटतं. दिवाळी अंकात बदललं होतं पण मला हे योग्य वाटतं.

मला दिवाळी अंकातील नाव जास्त आवडलेलं. काय होतं ते आठवत नाही.
अर्ध्यावर कळलं तरी तो एक शॉक असतोच. सुरुवातीला कळू नये वाटतं.

होय होय नाव बदल मामी.
+१०० टु स्वाती. अगं सगळं फोडतीयेस तू त्या नावाने.

मस्तच कथा आहे.

आधी वाचल्यासारखी का वाटतेय? >> ट्युलिप, कारण ही आधी मायबोलीच्या २०१४ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.

सर्वांना धन्यवाद.

येक इचारते बरं मामी, रागावू नका हां... न्हाई मंजे मायबोलीच्याच अंकात व्हती ना कथा... मंग 'थँक्यू' नि 'ढण्यवाद' असली काही प्रतिक्रिया देऊन त्योच जुना धागा वर काडाया जमलं नस्तं का?? अडाण्याचा प्रश्न न्हाई आवडला तर नगा मनावर घेऊ....

घ्या आता! सी तू किती वर्षं मायबोलीवर आहेस ग ?

दिवाळी अंक फडताळात असतो अन तिथं दुसर्‍या बोळातून जावं लागतं. तिथे प्रतिक्रिया दिली तरी इथे इतर लेखात तो लेख वर येणार नाही.

आत्ताच तुझ्या सुचनेनुसार तिथे प्रतिक्रिया देऊन आले आहे.

ह्म्म... वाटलंच होतं असं काहीतरी टेक्निकल असणार म्हणून आधीच म्हणाले की डंब क्वेश्चन (अडाण्याचा प्रश्न) आहे. माझ्या आठवणीत २-३ च दिवाळी अंक होते. नंतर तो उपक्रम बहुतेक बंद आहे.

Pages