माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - सोनू.

Submitted by सोनू. on 17 September, 2021 - 16:14

शिक्षण झाल्यानंतर मी जी नोकरीत चिकटले ती अक्षरशः चिकटूनच राहीले. लहानपणी व्हॉलीबॉल आणि मल्लखांबाचा सराव आणि स्पर्धा, गिर्यारोहण शिबीरे यांमधून कसाबसा अभ्यास सांभाळणारी मी, घाण्याच्या बैलासारखी नुसतं काम नी काम करत होते. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशीरा परत यायचं, आठवड्याची राहिलेली झोप शनिवारी पूर्ण करायची आणि रविवारी घरातली कामं आवरायची, बस इतकच चाललं होतं. आणि मग एक दिवस चण्डिगढच्या ऑफिसला नेमणूक झाली. दुपारी २ ते रात्री ११ च फक्त काम असल्याने रोज झोप पूर्ण होत होती आणि शनिवार जागेपणात जात होता. ऑफीसने दिलेल्या गेस्टहाऊस मधे राहत असल्याने घरची कामं करायचा राविवारही मोकळाच. त्यात बरेच जण फक्त १-२ आठवड्यासाठी मुंबई पुण्यातून चण्डिगढ ला येत असल्याने घुमेंगे फिरेंगे प्लॅन करूनच येत. जवळपास सगळ्याच विकेंडला भटकायचे प्लान बनायला लागले. चण्डिगढ, पंजाब, हरियाणा, जम्मू, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, काही काही म्हणून सोडलं नाही.
भटकायची इतकी सवयच लागून गेली होती की मग कोणी नसेल तरी एकटी भटकायला लागले. सकाळी उठून चण्डिगढहून नंगल ची ट्रेन पकडायची आणि लहराते खेत बघत नंगल धरणाजवळ नाश्ता करायचा. तिथून कड्याकपऱ्यातून जाणाऱ्या बसने भाकडा (भाक्रा) धरणाजवळ खूप सारे तळलेले मासे खायचे आणि परत दर्याखोऱ्यात पळणाऱ्या बसने पुढे जाऊन नैनादेवी डोंगरावर जाणारा उडन खटोला पकडायचा. डोंगर फिरून पलीकडच्या पायऱ्या उतरून बसने आनंदपूर साहिब गुरुद्वारा गाठून पराठे हादडायचे. तिथून चण्डिगढला पोहोचेपर्यंत रात्र व्हायची. पण मग चण्डिगढच्या बस स्टॉप पासून रात्री उशिरा घरापर्यंत चालत आल्यावर केअर टेकरचा ओरडा मिळायचा. चण्डिगढ कितीही चांगलं म्हटलं तरी शेवटी उत्तर भारतच तो! त्यावेळी ठरवलं, की अशा ठिकाणी भटकायचं जिथे रात्री मुलींनी एकटं फिरणं भीतीदायक नसेल. म्हणजे दक्षिण भारत. उत्तर भारतातील भटकायच्या ठिकाणांबरोबर दक्षिण भारतात चालत फिरणं अशी बकेट लिस्ट हळूहळू बाळसं धरायला लागली.

चण्डिगढची मोहीम संपून पुण्या मुंबईत परत आल्यावर ती बकेट लिस्ट बादलीत गेली आणि ती बादली उपडी ठेऊन, त्यावर बसून मी पुन्हा पूर्णवेळ ऑफिसचं काम करू लागले. आपत्ती व्यवस्थापनाची नवी जबाबदारी खांद्यावर पडल्याने दिवस-रात्र, शनिवार-राविवारही कामात जायला लागले. नाही म्हणायला आसपासची पर्यटन स्थळं, मग कंटाळा आला म्हणून अमेरिकेत काही दिवस रोड ट्रीप, वगैरे प्रकार झाले, पण बकेट लिस्ट खुणावत होती. एक दुसरी छोटी, लहानपणापासून जपून ठेवलेली बकेट लिस्टही होती आणि ती पूर्ण करायची एकमेव संधी हाती आली होती. म्हटलं आता बास, काहीतरी केलच पाहिजे. रिटायर व्हायला चाळीशीत पदार्पण करायची वाट बघायची गरज नाही. सुदैवाने लहानपणापासून आईबाबांनी केलेल्या संस्कारांमुळे "प्रमाणाबाहेर वायफळ खर्च" कधी केला नाही आणि केवळ अडीअडचणीच्या प्रसंगीच वापर करण्यासाठी ठेवलेली गंगाजळी पुरेशी साठली होती. वर हातखर्चालाही बऱ्यापैकी बटवा भरला होता. मग सरळ बॉसला म्हटलं आमचा रामराम घ्यावा. खूप डोकं फोडूनही सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे व्यवस्थित आहेत हे त्याला कळल्यावर तो म्हटला, जा मुली जा सुपर बॉस ला सांगून बघ Happy सुपर बॉस तर अवाकच झाला माझा जाण्याचा विचार ऐकून. म्हणाला, बाळा, तुझ्या करियरच्या जन्मापासून गेली हजारो वर्षे तू याच कंपनीत काम करतेयस. ये बाहरकी जालीम दुनिया तुम्हे जीने नही देगी. तर जायचच असेल तर सब्याटीकल रजा घेऊन जा. म्हटलं ती तर
६ महिन्यांची असते. आत्ता या क्षणी मी ज्या कामासाठी जातेय त्यासाठी जास्त वेळ लागेल. आणि काय आश्चर्य! परत फिरण्याच्या सगळ्या वाटा तशाच ठेऊन मला एक वर्षाची सुट्टी मिळाली. कामं पुर्ण करुन, शेवटी ऑफिसला बायबाय करून मी निघालेच!

त्यावेळच्या छोट्या बकेट लिस्टचं पूर्णत्व ८-९ महिन्यांत झाल्यावर माझी भटकंती बकेटलिस्ट परत डोकं काढायला लागली.
आता मी ही लिस्ट नीट करायला लागले. एकटीनेच प्रवास करायचा, जमेल तेवढं चालत फिरायचं, गंगाजळीला हात लावायचा नाही अशी सगळी उजळणी करून मी कामाला लागले. बंगलोरपासून सुरुवात करायची. मग मैसूरचा पॅलेस, देवराजा मार्केट, बोन्साय गार्डन आणि काही मंदिरे करून बंदीपूर अभयारण्याची सफारी करून उटी. उटीच्या गुलाबांची बाग आणि इतर बागा फिरून केरळातील पालकाड. तिथे धरण, किल्ला आणि इतर गोष्टी बघून मुन्नार. मुन्नारच्या चहाच्या बागांमधे फिरून मदुराईची देवळं. मग मात्र पूर्व किनारा धरण्यासाठी कन्याकुमारी गाठायचं. किनाऱ्याकिनाऱ्याने रामेश्वरम, पाँडिचेरी करत चेन्नईला सांगता आणि मग विमानाने घरी परत असा महिन्याभराचा भरगच्च कार्यक्रम ठरला. बॅकपॅक ट्रीप सारखं आयत्या वेळी राहण्याची सोय न करता साहसी सफर सारखी हटके राहण्याची सोय आधीच करून जायचं ठरवलं. उटी आणि मुन्नारला तंबूनिवास पक्का केला. पाँडिचेरीला आश्रमनिवास. बाकी ठिकाणी Airbnb किंवा तत्सम काही करत सगळी बुकिंग झाली. कपडे रोल करून बॅकपॅक कशी भरायची, सोलो ट्रीप ब्लॉग्स, जातेय त्या ठिकाणची अजून काही प्रेक्षणीय स्थळे व करता येण्यासारख्या गोष्टी वगैरे शोधाशोध करतानाच तमिळ अक्षरांची उजळणी, मल्याळम मधील तमिळ सारखी दिसणारी आणि वेगळी दिसणारी अक्षरे ओळखणे अशी पूर्वतयारी सुरू झाली. बस, रस्त्यावरच्या पाट्या नी दुकानांची नावं वाचता यायला हवीत ना! या सर्व पूर्वतयारीत पाँडिचेरीत स्कुबा डायविंग करू शकतो कळलं. मग त्या संदर्भात अजून शोधाशोध केल्यावर काही महिने कोर्स आणि काही महिने इंटर्नशिप करून यात करियर करता येऊ शकतं इतपत ज्ञान मिळालं. म्हटलं ३ दिवसांचा कोर्स करून बघू, आवडलं तर बकेटलिस्ट वाढवू.

बघता बघता दिवस सरले आणि मी मार्गस्थ झालेही. ठरल्याप्रमाणे बंगलोर, मैसूर, सफारी आणि उटी झाली. उटीचा टेंट एकदम भारी. त्या डोंगरावर राहायची व्यवस्था आहे हे शहरातल्या कोणाला माहीतच नव्हतं. रात्री उशिरा तिथे पोहोचले तेव्हा कळलं की तिथे मी एकटीच पर्यटक आहे आणि दूरच्या पत्र्याच्या घरात दोन केअर टेकर राहतील. गार वारा सुरू झाला आणि वीज गेली. त्या डोंगरावरच्या माझ्या तंबूतून खालच्या शहरातले दिवे आणि आकाशातले तारे छान चकाकत होते. तो मुलगा येऊन सांगून गेला की साहेबांचा फोन आला होता, तुम्हाला हवं असेल तर त्यांच्या हॉटेलात सोय करतो म्हणाले. पण मला तर असच राहायचं होतं ना, डोंगरदऱ्याचा आनंद घेत. पोटभर चांदणं पिऊन मस्त झोप लागली त्या रात्री. सकाळी डोंगरातून वाट काढत उतरून मग उटी पिंजून काढली. पालकाडला एका मस्त बंगल्यात एका प्रशस्त खोलीत सोय होती माझी. घरातच केरळी ब्रेकफास्ट आणि रात्री जंगी जेवण अशी राजेशाही सोय होती. मुख्य रस्त्यापासून घर २ किलोमीटर लांब होतं म्हणून तिथपर्यंत गाडीने सोडतो असं मागे लागणारा गोड मुलगाही होता. पण येताना रात्री मी एकटी चालत आले म्हणून थोडा रागे भरलाच!
पुढे मुन्नारलाही तंबूनिवास, फक्त हे नीट बांधलेले आरामदायी तंबू होते. तिथेही दोन दिवस मस्त भटकले आणि मग सुरू झाला उटीमधे सुटून गेलेला माझ्या तामिळनाडूचा प्रवास. तमिळ शिकल्यापासून ते वापरायची संधी मिळणार होती त्यामुळे जास्तच आतुरता होती. मदुराईचे मुख्य मीनाक्षी मंदिर आणि आजूबाजूची मंदिरे बघायला मजा आली. कन्याकुमारीची मंदिरेही प्रेक्षणीय. धनुष्यकोडीला जायचं तर माझे खूप लहानपणीचं स्वप्न होतं. समुद्रातला सूर्योदय आणि सूर्यास्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ दिसतो पण एकाच अरबी समुद्रातला. एका समुद्रातून उगवणारा आणि दुसऱ्या समुद्रात मावळणारा सूर्य कन्याकुमारीतून बघायची मजा काही औरच! पाँडिचेरीला पोहोचेपर्यंत मंदिरं बघून माझा जीव भरला होता, तरीही दोन तीन ठरवून ठेवलेली मंदिरं पाहिलीच! पीचावरमच्या चिपीच्या बेटांतून होडी फिरताना समुद्राच्या तळाची ओढ लागायला लागली होती.

स्कुबा कोर्स करताना इतकं काही भारी वाटत होतं की विचारू नका (आत्ता सांगणार पण नाहीय Happy ). दोन कोर्स केले तर कमी किंमतीत होतील म्हणून लगेच दुसरं बुकिंगही केलं. तिथल्या प्रशिक्षकांच्या पॅराग्लायडिंगच्या कथा ऐकून हे पण करून बघू असा विचार मनात आलाच. पण पुढे अजून जितके कोर्स ठरले होते ते केल्यावर आता यापुढे आयुष्यात मिशन स्कुबा डायविंग. परत त्या ऑफिसचं तोंड पाहायचं नाही अशी नवीन बकेट लिस्ट बनली.

घरी परत आल्यावर सगळा हिशोब केला. फिरताना एका एका रुपयाचा खर्च लिहून ठेवायची माझी सवय होतीच! खाण्यापिण्याचे "तिखट नको" याशिवाय जास्त लाड नव्हते माझे, पिणं तर दूरच. चालून दमायला झालं तर हात दाखवून लिफ्ट मागणं खूपच सोप्प होतं. इतर वेळी ट्रेन, बस, रिक्षा अशा मिळेल त्या वाहनातून फिरत होते. राहण्याचं बुकिंग तर मी जाताना करूनच गेले होते. या सगळ्यामुळे स्कुबा प्रशिक्षण आणि वाढलेले दिवस आणि त्यांचा दिवसांचा खर्च वगळता माझ्या बकेट लिस्ट प्रमाणे झालेल्या ३० दिवसांच्या भटकंतीचा प्रवास, राहणे, खाणेपिणे आणि इतर असा एकूण खर्च तीस हजार रुपायांपेक्षाही कमी झाला.

एक वर्ष संपत आलं होतं. ऑफिसला आता शेवटचा, कायमचा रामराम करायला पुण्यात आले तेव्हा काही दिवस तिथल्या घरात होते. भटकांतीनंतर लगेच घरात बसवत नव्हतं तेव्हा लक्षात आलं की अरे, इथे लोणावल्यातच पॅराग्लायडिंग शिकवतात. मग गेले लगेच उडायला. त्या गगनभरारी बद्दल मी लिहिलं आहे. बॉस आणि सुपर बॉसला सांगितलं की मी ऑफिस बाहेर नुसती जिवंत राहिले असे नाही तर मस्त एन्जॉय केलं आणि आता मी चालले माझी पाण्यात खेळायची बकेट लिस्ट पूर्ण करायला Happy

मग काय, पोहोचले पाँडिचेरीला परत. पहिल्या ट्रिप मधे राहायची सोय करून आले होते. तेव्हा मुक्काम वाढवावा लागला होता म्हणून एक शेअरिंग मधली खोली घेतली होती. फ्रेंच बाई होती माझ्याबरोबर. तिने एका फ्रेंच रेस्टॉरंट वाल्यांची ओळख करून दिली त्यांच्याकडे राहायची व्यवस्था होईल म्हणून. मग काही दिवस त्यांच्याकडे राहिले होते. अगदी कमी किंमतीत खोली मिळाली खाण्यापिण्यासकट. त्या बदल्यात रेस्टॉरंट मधे थोडी मदत करायची. खरं तर लोकांशी गप्पा मारायचं काम होतं. त्यामुळे परत त्यांच्याकडेच राहायला गेले. सकाळी साडे पाच ते संध्याकाळी साडे पाच स्कुबा प्रशिक्षण. संध्याकाळी साडे सहा ते रात्री १० रेस्टॉरंट मधे गप्पा, बस, मज्जाच मज्जा.

स्कुबा प्रशिक्षण मात्र खूप कठीण होतं. ती नळकांडी हवेने भरायची. कधी त्यात जास्तीचा ऑक्सिजन भरायचा, इकडून तिकडे न्यायची, बोटीवर चढवायची, लोकांना चढवायचे, अगदी दमछाक व्हायची. त्यात पुन्हा आपले कोर्स, पाण्यातली परीक्षा, लेखी परीक्षा हे पण. अधिकच्या ऑक्सिजन चे (Nitrox) आणि खोल पाण्यातले (deep dive - 40 meters underwater) चे कोर्स सोपे होते. Navigation च्या कोर्सला तर मजाच आली. एका मच्छीमार बोटीचे इंजिन समुद्रात पडले होते ते शोधून परत आणायचे होते. असली मदत डायविंग स्कुल वाले नेहमीच करतात. माझ्या कोर्सच्या वेळी नेमके हे काम आले. मी, माझा प्रशिक्षक आणि त्यांना मदत करणारा डाईव मास्टर असे तिघे गेलो. जिथे ते पडले होते ती जागा मच्छीमाराने दाखवली, किनाऱ्यापासून ६-७ किलोमीटर आत. नांगर टाकून खाली जाऊन शिकवल्या प्रमाणे विविध प्रकारचे search patterns वापरून ३७ मीटर खोलात ते इंजिन सापडलच. मग ते भले मोठे फिन्स पायात असताना दोघांनी ते धूड उचलून नांगरापर्यंत घेऊन यायची करामत पण केली आणि रिकव्हरीची साधने वापरून ते घेऊन वर पण आलो. जबरदस्त अनुभव! Rescue diver प्रशिक्षण सर्वात कठीण. पोहण्याची परीक्षा, आपण न बुडता बुडणाऱ्याला धरण्याची परीक्षा, धरलेल्या व्यक्तीला किनाऱ्यावर किंवा बोटीवर आणायचं, ते पण कृत्रिम श्वास देत देत, म्हणजे महा भयानक. त्यात माझ्या गटात मी सर्वात कमी शक्ती असलेली आणि बाकीचे दणकट, दांडगे धिप्पाड मुलगे. जोड्या बनवल्या की माझा जोडीदार मला बुडवल्या शिवाय राहायचाच नाही. सांगितलंच होतं आम्हाला की जो पर्यंत तुम्हाला तुमचं मरण समोर दिसत नाही तोपर्यंत बुडणाऱ्याची धडपड आणि मानसिकता कळणार नाही. कशी बशी जगले पुढची बकेटलिस्ट पूर्ण करायला.

पुढे इंटर्नशिप बरी चालली होती पण भयानक दमछाक होत होती. आठवड्यात एक दिवस सुट्टी असे पण बरेचदा मिळतच नव्हती. कधीकधी वाटायचं की एवढे कष्ट खरच करायचेत का? नुसतं मजा करायला शिकू. डाईव मास्टर होऊन लोकांना डाईव ला न्यायचे काम करण्यापेक्षा लागणारे कोर्स आणि लागणाऱ्या डाईव करून नुसतेच मास्टर स्कुबा डायवर होऊ. पण तरी काम सुरू होतच. रेस्टॉरंट मधे रोज जाणं जरुरी नव्हतं पण मालकांचं आणि माझं इतकं छान सूत जुळलं होतं की त्यांना भेटायला तरी मी थोडावेळ जात होते. आणि मग व्हायचं तेच झालं. समुद्राचं पाणी गढूळ होऊ लागलं होतं, जेलिफिश चहू बाजूंनी फिरत होते, आणि माझ्या कानात संसर्ग झाला. डॉक्टरांनी सांगितलं २ आठवडे तरी पाण्यात जायचं नाही. म्हटलं बास, आता या वयात कानाला त्रास नको द्यायला. अंडर वॉटर फोटोग्राफी चा कोर्स राहिला होता, तो करून मास्टर स्कुबा डायवर करून बास करायचं ठरवलं. पण मग या गढूळ पाण्यात नव्हतं शिकायचं. आता नवीन स्वच्छ सुंदर पाण्यात जायची इच्छा बकेटलिस्ट मधे जाऊन बसली आणि ती इच्छा लगेच पूर्ण पण झाली.

पाँडिचेरीला भेटलेला एक प्रशिक्षक अंदमानला कामाला गेला होता. त्याच्याशी बोलून १५ दिवसांनंतरचं अंदमानचं तिकीट काढलं. पंधरा दिवस खाणे, पिणे, फिरणे, नाचणे, रात्रभर भटकून सकाळी समुद्रातला सूर्योदय बघून मग घरी येऊन झोपणे अशी अक्षरशः चैन केली. हे असं बेधुंद, बेबंद परत जगायचं नक्की, हे देखील बकेटलिस्ट मधे गेलच!

अंदमानला सुरुवातीचे काही दिवस थिअरी आणि डाईव सेंटरमधे मदत असे गेले आणि कान एकदम चांगला बरा झाला याची खात्री झाल्यावर पाण्यातलं प्रशिक्षण सुरू झालं. मग डाईव साठी आलेल्या लोकांचे फोटो काढणे हे काम सराव म्हणून सुरू केलं. २० डाईव व्हायच्या आणि आम्ही दोन फोटोग्राफर. प्रत्येक डाईव नंतर किनाऱ्यावर पोहत येऊन, मेमरी कार्ड देऊन दुसरे घेऊन परत पाण्यात जायचं. ५-६ फेऱ्या तरी होत होत्या. मला लागणाऱ्या डाईव पूर्ण होत होत्या. काम झाल्यावर कधी कधी आम्ही दोघे फोटोग्राफर दूर दूर पर्यंत नुसतेच फिरायला, वेगवेगळ्या कोरल्सचे आणि माशांचे फोटो काढायला आत पर्यंत जायचो.
Nemo 1.jpg

आणि परत माझ्या कानाने धोका दिला. अंदमानच्या डॉक्टरने तर सांगितलं कधीच पाण्यात जायचं नाही. लागणाऱ्या डाईव आधीच पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तुका म्हणे त्यातल्या त्यात! आता नवीन काही शोधायचं. अरे हो, ते बेधुंद बेबंद जगणं आहे की बकेटलिस्टित.

काही महिने घरी येऊन कानासाठी चांगली ट्रीटमेंट घेऊन परत पाँडिचेरीला जायचं ठरवूनच टाकलं. माझी गर्डिंग एंजेल आहे एक. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, एवढच बोलून थांबत नाही ती, तर खरोखर कायम मदत करत असते. "नाही जमलं काही, किंवा कंटाळा आला काही करायचा किंवा नुसती आठवण आली तरी घरी ये, मी आहेच". आता असं म्हणणारं कोणी असेल तर आपण का कसली काळजी करावी? दोन महिन्यात कान ठीक करून "येते" सांगून मी परत पाँडिचेरीला हजर, त्याच त्या रेस्टॉरंट वाल्या माझ्या लाडक्या फ्रेंड कडे. त्यांना मी काका, आजोबा असे काही म्हटलेले आवडत नसे. नावाने हाक मारायची, सगळे फ्रेंच मॅनर्स पाळायचे, असे थोडेसेच नियम होते. ते चित्रकार होते. त्यांना त्यांच्या स्टुडिओ मधे मदत करायची, त्यांचा पत्रव्यवहार, इमेल्स आणि इतर सेक्रेटरी सारखं काम करायचं आणि रात्री रेस्टॉरंट मधे. त्या बदल्यात जेवण आणि स्वस्तात राहणं. काम पण रोजच नाही, माझं हुंदडणं संपलं की मगच. अजून काही तरी करूया, म्हणून क्रोशाचे दागिने, बुकमार्क, कीचेन वगैरे करून विकायचे ही काम करत होते. तिथे खूप लोकांशी ओळख झाली. काही अगदी जिवाभावाचे संगती बनले. फ्रांसमधे आलीस की थोडे दिवस तरी आमच्याकडे राहायचं म्हणजे राहायचंच असे म्हणणारे दहा तरी लोक आहेत आणि त्यांच्याशी अजूनही बोलणं होतं. त्यामुळे आता फ्रान्सला जायची नवी बकेट लिस्ट Happy

आणि मग करोना जवळ येऊ लागला आणि हळूहळू सगळं बंद व्हायला लागलं. ७-८ महीने उधळलेल्या म्हशीसाररखी, आय मीन, वासरासारखी आनंदाची लयलूट करून मी घरी परत आले. काही दिवस नुसते करोनाचे आकडे टीव्हीवर बघत, थोडे बागकाम, बाकी बच्चेकंपनी बरोबर खेळण्यात गेले. मग समुद्रात पाहिलेल्या गोष्टी क्रोशाने विणू लागले. कधी भाचेकंपनी साठी ड्रेस विणणे, कधी स्वतः साठी, कधी काय नी कधी काय.
Crochet Reef.jpg
करोना कमी होत चालला तसा प्लॅन बनवायला सुरू केलं. तारकर्ली च्या मित्राला म्हटलं मी तिथे येऊन राहीन, तुला स्कुबा साठी मदत करेन, त्या बदल्यात अधून मधून मी ही पाण्यात जाईन. कानाला त्रास द्यायचा नाहीय. मग केली सुरुवात समुद्राजवळ छोटसं घर शोधायला. आणि एके दिवशी माझ्या जुन्या ऑफिसातल्या सुपर बॉस चा फोन आला. आत्ताचा मुलगा सोडून चाललाय, ऑडिट सिझन आहे त्यामुळे नवीन उमेदवाराला ट्रेनिंग द्यायला वेळ नाही, लगेच येणारं कोणी हवय, येतेस का? म्हटलं माझी बकेट लिस्ट माहीत नाही का? ऑफीसात काम नाही करायचं मला, मी चालले तारकर्ली ला. म्हणाला तिथून कर काम आणि विकेंडला पाण्यात जा. म्हणे हल्ली सगळे वर्क फ्रॉम होम असल्याने काम खूप कमी असतं. मी का कू करतेय ऐकून म्हणाला की बाई, हा करोना लवकर जाणार नाही आणि तुला जास्त भटकायला मिळणार नाहीय. तरी पण वाटलच तर सहा महीने कसं वाटतं बघ नाही तर जा जिथे जायचं तिथे. हे बाकी मला पटलं. म्हटलं येते, पण चार दिवस तरी द्या. आणि लगेच चारच दिवसात मी काम सुरू पण केलं.

आता तारकर्लीला चांगलं नेटवर्क, पॉवर बॅकअप असलेलं घर हवं, ते ही समुद्रा जवळ, मालवण शहरात नाही. माहितेय, जास्त लांब नाहीय, पण गावाच्या ठिकाणी जाऊन फ्लॅटमधे राहणं मला पटत नव्हतं. खूप शोधाशोध करूनही हवं तसं काही मिळालं नाही म्हणून म्हटलं, चला, जरा अजून पुढे जाऊ आणि विकेंडला तारकर्ली ला येऊ. मग काय, पोचले की हो गोव्यात. रात्री काम संपलं की समुद्रकिनार्यावर चालायचं आणि विकेंडला गोवा दर्शन करायचं असं रुटीन थोडे आठवडे ठेऊन मग तारकर्लीला जाऊ म्हटलं. आता पैसे परत मिळू लागलेत तर फ्रान्सची बकेट लिस्ट परत डोकवायला लागली होतीच म्हणा!

आणि परत तो मेला करोना आलाच. सहा महिन्यांपेक्षा जास्त जॉब करीन असं तीन महिन्यांतच कबूल करून, दर महिन्याला येणाऱ्या Salary credited च्या मेसेज कडे हताश होऊन बघत, गोव्याच्या एका प्रसिद्ध समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टच्या एका रूम मधे खितपत पडलेय मी, फ्रान्सला जायची बकेटलिस्ट कधी पूर्ण होणार याची वाट बघत! Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages