Submitted by निशिकांत on 29 June, 2021 - 10:11
खेकड्याची चाल आता चालतो मी
जो पुढे जाईल त्याला ओढतो मी
सागराच्या तांडवाला टाळतो मी
शोधण्या मोती तळाला राहतो मी
धर्मशास्त्रातील तत्वे वाचलेली
वागताना बासनी गुंडाळतो मी
शोधली पळवाट मांसाहार खाण्या
जानवे खुंटीस तेंव्हा टांगतो मी
कोण मेले कोण जळते काय त्याचे !
आपुल्या पोळ्या चितेवर भाजतो मी
पाहिले अन् भोगले अन्याय इतके !
फक्त डोळेझाक करणे जाणतो मी
पारध्यांना हूल देवुन वाचलेल्या
सावजांच्या धडधडीला ऐकतो मी
जीत सत्त्याचीच होते शेवटी पण
मालिकांतुन दुष्ट खोटा गाजतो मी
दर्शनी "निशिकांत" कुस्ती खेळसी का?
वास्तवाला भीत दर्पण फोडतो मी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मंजुघोषा
लगावली--गालगागा X ३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गजल आहे चांगली, पण पुढे वाचत
गजल आहे चांगली, पण पुढे वाचत गेले की पहिल्या दोन ओळी थोडासा विसंगत वाटतात. अर्थात सर्वच कडव्यांतून समान अर्थ निघावा असे काही नसते आणि प्रत्येक कडवे हे आपल्यापुरते परिपूर्ण च असते; तरीही....
आवडली.
आवडली.