मला भावला रस्ता
काटेरी पण तुझ्या घराचा मला भावला रस्ता
युगेयुगे मी चालत आहे पुरून उरला रस्ता
दर्शन घ्याया प्रभो निघालो, अर्ध्यातच मी थकलो
श्वास मला दे पार कराया उरला सुरला रस्ता
भरकटलेले जीवन माझे पत्ता कुठला सांगू?
एकलव्य मी मला न कळला कुठून चुकला रस्ता
अभिमन्यूची जिद्द अंतरी, चक्र्व्यूह भेदावे
प्रवेशलो पण परतायाचा कुठे न दिसला रस्ता
अन्नधान्य देशास पुरविती घाम गाळुनी अपुला
शेतकर्यांना फास घ्यायचा कुणी दावला रस्ता?
अजब जाहले ! राजकारणी जेथे जेथे गेला
संग होउनी असंगासवे काळवंडला रस्ता
गांधी पुतळे चौकामधले प्रश्न स्वतःला करती
"दाखवला जो मी शुचितेचा कुठे हरवला रस्ता"?
सारे माझे मी सार्यांचा दहा दिशाही माझ्या
कशास चिंता उगा करावी कुठे चालला रस्ता
ध्येय गाठता यक्षप्रश्न हा काय करावे पुढती?
"निशिकांता" हे बरे जाहले नाही सरला रस्ता
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--लवंगलता--( प्रत्येक ओळीत २८ मात्रा )
वा वा वा !!
वा वा वा !!
मस्त!
मस्त!
छान.
छान.