आजमितीला मध्यमवर्गीय माणसाकडे असलेले विविध गुंतवणुकीचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत आहेत. FD चे रेट ५ ते ६ टक्क्यात आले आहेत आणि महागाई त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढत आहे. FD मध्ये पैसे ठेऊन निवांतपणे व्याजावर दिवस काढणे अतिशय अवघड होता जाणार आहे. विशेषतः शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची जास्त झळ बसते, बसणार आहे.
मध्यमवर्गीय माणसाकडे इक्विटी सोडून inflation वर मात करण्याचा अजून बहुपरीचित उपाय म्हणजे सोने. सोने या विषयावर माबोवर बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे सध्या तिकडे वळत नाही. माझ्या मते सोने, debt फंड्स आणि इक्विटी मार्केट या मध्ये विभागून गुंतवणूक करणे जास्त सोयीस्कर आहे. मार्केट कंडिशन प्रमाणे तिन्हींचे वेटेज कमी जास्त करत राहायला हवे. ज्याला सोने , इक्विटी, debt यातलया कोणत्या instrument ला कधी आणि किती वेटेज द्यायचे कळले तो यशस्वी गुंतवणूकदार
रिटेल,नोकरदार गुंतवणूकदारांना इक्विटी मध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड हा पर्याय बराच सोयीचा पडतो. शिवाय म्युच्युअल फंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात SIP द्वारे दर महिन्याला आपल्याला शक्य असलेली ठराविक रक्कम गुंतवता येते. मार्केट मध्ये हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. त्यातल्या कोणत्या कंपन्या चांगल्या, कोणाचे शेअर्स घ्यायला हवे, कधी घ्यायला हवे, किती प्रमाणात घ्यायला हवे हे कसे ठरवणार आणि ते बरोबर आहे हे नक्की कसे कळणार? शिवाय आपले नोकरी व्यवसाय सांभाळून आपण हे सगळे कसे मॅनेज करणार या अनेक समस्यांमुळे आपण म्युच्युअल फंड कडे वळतो. पण मागील भागात लिहिल्या प्रमाणे म्युच्युअल फंड हा पर्याय खरेच जाहिरात केला जातो तितका विश्वासार्ह आहे का? मागच्या भागात मी एक दोन ओळीत म्युच्युअल फंड्सच्या रिटर्न विषयी लिहिलं होतं ते अजून थोडेसे विस्तृतपणे लिहितो.
आत्ता मार्केट मध्ये उपलब्ध असलेले एकूण फंड्स १०४५. त्यातले ५७१ हे इक्विटी आणि हायब्रीड फंड्स आहेत. थोडावेळ आपण debt, Gold फंड्स बाजूला ठेऊ कारण ते इक्विटी बेस्ड नसतात, आणि index फंड, ETF पण विचारात घेत नाही कारण ते passively managed असतात.
५७१ इक्विटी आणि हायब्रीड फंड्स पैकी ३११ फंड्स चा १० वर्षांपेक्षा अधिकचा डेटा उपलब्ध आहे, म्हणजे ते १० वर्षांपेक्षा जुने आहेत. त्यातील फक्त १३५ फंड्सने निफ्टी ५० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत. आणि या ३११ फंडस पैकी फक्त ८ फंड्सने गेल्या १० वर्षात Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*
याच प्रकारे जर ५ वर्षांचा विचार केला तर ४२६ फंड्सचा ५ वर्षांपासून अधिक काळचा डेटा उपलब्ध आहे. या ४२६ फंड्स पैकी फक्त ७३ फंड्स ने Nifty Alpha Low Volatality ३० पेक्षा जास्त आणि फक्त १९ फंड्स ने Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत.*
जर इतके कमी फंड्स Nifty Alpha Low Volatality ३० आणि Nifty २०० momentum ३० या दोन इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देत असतील तर मग आपण म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे ?
हे झालं फक्त रिटर्न्सचं, आता मला वाटत असलेले म्युच्युअल फंड मधले बाकी इश्युज....
१. प्रत्येक फंड जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची थीम, त्याचे बाकी डिटेल्स प्रकाशित केले जातात, गुंतवणूकदारास उपलब्ध करून दिले जातात. पण त्या प्रकारे ५ ते १० वर्षे गुंतवणूक करून किती रिटर्न मिळाले असते हे कुठेही लिहिलेले नसते. जेव्हा आपण एखाद्या NFO मध्ये पैसे टाकतो तेव्हा बर्याचदा त्या थीमचे पास्ट रिटर्न उपलब्ध नसतात.
२. फंड मॅनेजर कोणता स्टॉक घेणार, का घेणार, कधी घेणार, किती विकणार, कधी विकणार, का विकणार, स्टॉक घ्यायचा आणि विकायचा क्रायटेरिया काय या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसते.
३. प्रत्येक फंडचा एक्सपेन्स रेशिओ ठरलेला आहे, काही काही फंड्स चा एक्स्पेंस रेशिओ तर २ ते २.७५ टक्के आहे. तो माझे पैसे गुंतवणार, स्वतःचे कमिशन घेणार आणि मग उरलेले रिटर्न मला देणार. माझ्या गुंतवणुकीवर २ ते २.७५ टक्के कमिशन घेऊन काम करणाऱ्या माणसावर माझा काही कंट्रोल नाही. त्याला कामावर ठेवणे किंवा काढणे एवढेच माझ्या हातात आहे. आणि शिवाय मला किती रिटर्न मिळणार हे त्याच्या माहिती, ज्ञान, जजमेंटवर अवलंबून आहे. त्याची काम करण्याची स्टॉक निवडण्याची पद्धत काय आहे आणि किती शास्त्रशुद्ध आहे ते मला माहित नाही.
४. म्युच्युअल फंड्सचे होल्डिंग्स:- कित्येक वेबसाईटवर तुम्हाला मुच्युअल फंडचे होल्डिंग बघायला मिळतील. त्यातील स्टॉक लिस्ट बघितली त्यात अनेक स्टॉक असे आहेत कि ज्याचे वेटेज ०.५%, १% वगैरे असते आणि काही काही म्युच्युअल फंड मध्ये ५०, १०० स्टॉक पण आहेत. ०.५%, १% वेटेज असणारा स्टॉक टोटल रिटर्न वर असा काय परिणाम करतो कि जेणे करून तो त्या फंड मध्ये आहे? क्वॅलिटी ऑफ स्टॉक विषयी मी फार प्रभुत्वाने बोलू शकणार नाही, पण तो मुद्दा सुद्धा विचारात घ्यायला हवा.
५.खरेदी विक्री वरील बंधने.:- तुम्ही केलेल्या SIP चे पैसे ज्या दिवशी फंड हाऊस कडे जातील त्या दिवशीची NAV तुम्हाला मिळणार. शिवाय फंड मध्ये गुंतवलेले पैसे काढणे वेळखाऊ काम आहे. शिवाय तुम्ही पैसे कधी काढत आहात त्यावर exit लोड पण विचारात घ्यावा लागतो.
आपण जर नीट विचार केला तर वरील सगळे प्रॉब्लेम इंडेक्स फंड किंवा ETF मध्ये गुंतवणूक केल्याने सुटतात
१. Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum ३० या दोन इंडेक्स चे रिटर्न कित्येक फंड्स पेक्षा जास्त आहेत ते मी वर लिहिले आहेच. या दोन इंडेक्स मध्ये कोणता स्टॉक येणार, त्याचा क्रायटेरिआ काय, त्याचे वेटेज कसे ठरणार, कोणता स्टॉक जाणार, कधी जाणार, त्याचा क्रायटेरिआ काय हे सगळे निफ्टी च्या वेबसाईट वर स्वच्छ लिहिलेले आहे. उगीच कोणाच्या तरी विचारक्षमतेवर अवलंबून स्टॉक ची खरेदी विक्री होत नाही. स्टॉकची एंट्री, एक्झिट, वेटेज याची पद्धत objective, well defined आहे.
या दोन्ही इंडेक्स चे गेल्या १५ वर्षांचे रिटर्न ( बहुदा back calculate करून) निफ्टी ने त्यांच्या वेबसाईट वर दिले आहेत.
२. कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले इंडेक्स फंड मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार हे माहित असल्यास त्यातील कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. फंड हाऊस, फंड मॅनेजर कोणतेही असले तरी फरक पडत नाही कारण शेवटी त्यांना इंडेक्स मध्ये जे स्टॉक ज्या प्रमाणात आहेत तेच त्या प्रमाणातच घ्यावे लागणार.
३. Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum ३० मध्ये जास्तीत जास्त ३० स्टॉक असणार आहेत.
४. आपण ज्या इंडेक्स मध्ये पैसे गुंतवणार आहोत तो जर ETF स्वरूपात उपलब्ध असेल तर आपण तो आपल्या सोयी प्रमाणे हवा तेव्हा विकू शकतो, विकत घेऊ शकतो. मी ज्या दिवशी तो विकला त्याच्या T+२ ला त्याचे पैसे माझ्या खात्यात जमा होतील.
शिवाय जर व्हॉल्यूम चांगला असेल तर ट्रेड, स्विंग ट्रेड करून, फ्री युनिट्स गोळा करणे, आपल्याकडे असलेल्या युनिट्सची सरासरी किंमत कमी करणे हे सर्व पण करता येऊ शकते.
मार्केट महाग असल्यावर युनिट्स विकून टाकणे आणि मार्केट ५ ते १० टक्के पडले कि तेच परत घेणे हे पण पर्याय उपलब्ध आहेत. खरेदीचे टायमिंग साधून, ट्रेड करून आपल्याकडील युनिट्सची सरासरी किंमत कमी करणे या विषयी पुढील एखाद्या भागात विस्तृतपणे लिहितो.
लेख अजून लांबू नये म्हणून मला म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधल्या न पटलेल्या अजून काही गोष्टी टाळत आहे. मी आजकाल कोणताही गुंतवणुकीचा पर्यात समोर आला कि खालील प्रश्न विचारतो, विशेषतः जर म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड कोणतेही प्रोडक्ट जर विचारात घ्यायचे असेल तर. तुम्ही जर फंड मध्ये गुंतवणूक करणार असाल करत असाल तर खालील प्रश्न स्वतःला/ गुंतवणूक सल्लागाराला, म्युच्युअल फंड विक्रेत्याला नक्की विचारा.
१. फंड कोणते स्टॉक घेणार, काय प्रमाणात घेणार, त्याचा क्रायटेरिया काय? फंड पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करण्याची फ्रिक्वेन्सी, पद्धत काय असणार आहे?
२. ज्या पद्धतीचे, पद्धतीने स्टॉक सिलेक्शन होणार आहेत त्यावर आधी काही डेटा उपलब्ध आहे का? तसे केल्यास किती रिटर्न येतात? ते Nifty Alpha Low Volatility ३० आणि Nifty २०० momentum ३० पेक्षा जास्त आहेत का?
३. फंडाचा एक्सपेन्स रेशिओ, एक्झिट लोड किती आहे. तुम्हाला जर म्युच्युअल फंडचे युनिट्स रीडिम करायचे असतील तर प्रोसेस काय आहे त्याला किती दिवस लागतात.?
४. फंड मॅनेजर कोण आहे? फंड हाऊसचे रेप्युटेशन कसे आहे? फंड मॅनेजर आणि फंड हाऊसने आधी मॅनेज केलेल्या फंड्स चे रिटर्न आणि turnover ratio काय आहे?
५. पोर्टफोलिओ मधील स्टॉकचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त वेटेज काय असणार आहे?
६. Setoral, market cap allocation किती आणि कसे केले जाणार आहे?
७. बेंचमार्क इंडेक्स कोणती आहे?
म्युच्युअल फंड घेताना तुम्ही कष्ट करून कमावलेले पैसे तुम्ही कमिशन देऊन एका माणसाला मॅनेज करायला देत आहात. ज्या पैशांवर आपले/आपल्या मुलांचे फ्युचर, निवृत्तीनंतरचे उत्पन्न अवलंबून आहे ते पैसे कोणाच्याही सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका. स्वतःचा गृहपाठ करून डोळसपणे गुंतवणूक करा.
* सर्व रिटर्न १ oct २०२० च्या बंद भावानुसार calculate केले आहेत.
माहितीचा स्रोत:-
https://www.niftyindices.com
www,rupeevest.com
Disclaimer:-
मी सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक सल्लागार नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, आर्थिक गुंतवणुकीसंबंधित काहीही पात्रता नाही. वर लिहिलेली सर्व माहिती एक शेअर मार्केटचा अभ्यास या दृष्टीने केलेली आहेत. वर लिहिलेल्या सर्व कॅल्क्युलेशन मध्ये चूक, human error असू शकतो. वरील लिखाणावर विसंबून कोणीही गुंतवणूक करू नये. केल्यास, लेखक जबाबदार नाहीत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपल्या सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
माझ्या मते तरी नक्कीच.
जर मी दहा वर्षे पंधरा वर्षे अशा कालावधीसाठी बघत असेn
तर इंटेक्स फोनचा पर्याय चांगला आहे का?>>>>>>
माझ्या मते तरी नक्कीच.
१० ते १५ वर्षे कालावधी साठी ईंडेक्स फंड(च) योग्य(च) आहेत. आपली किमान काही टक्के गुंतवणूक तरी ईंडेक्स फंड मधे असणे फायदेशीर असेल.
मी वर दिलेली
https://m.economictimes.com/markets/stocks/news/after-years-of-hiatus-wh...
Quote:- “ Resurgence of active v/s passive debate
The debate over active v/s passive investing has been gaining momentum, as several of the active funds are struggling to beat their respective benchmark(s). This is especially at a time when the benchmark indices have been growing from strength to strength, leading several investors to jump ship to low-cost options such as passive funds.”
ही जी लिंक आहे तो लेख Chintan Haria यांचा आहे जे ICICI Prudential AMC मधे Head of Product Development & Strategy आहेत. जे स्वतः लिहित आहेत की कित्येक Actively managed म्युच्युअल फंड त्यांच्याच बेस ईंडेक्स पेक्षा सुद्धा कमी परतावा देत आहेत.
जर मी दहा वर्षे पंधरा वर्षे
तुम्हाला जेव्हा काही उपडेटस् मिळतील तेव्हा कळवा इथे नक्की>>>>
१८ फेबला Nifty 200 momentum 30 वर NFO ( index fund) यायची शक्यता आहे
तसेच Nifty alpha low
तसेच Nifty alpha low volatility 30 साठी ETF वापरता का? का कुठला म्युच्युअल फंड आहे? ETF मध्ये कधी कधी Liquidity चा प्रॊब्लेम असतो>>>>
Icici ने या ईंडेक्स वर FOF साठी सेबीकडे ड्राफ्ट फाईल केला आहे. हा FOF, Nifty alpha low volatility 30 च्या ETF मधे गुंतवणूक करेल. हा फंड आल्यास Nifty alpha low volatility 30 मधे गुंतवणूक करणे सोप्पे होईल.
तुम्हाला जेव्हा काही उपडेटस्
तुम्हाला जेव्हा काही उपडेटस् मिळतील तेव्हा कळवा इथे नक्की>>>>
१८ फेबला Nifty 200 momentum 30 वर NFO ( index fund) यायची शक्यता आहे
>>> धन्यवाद अतरंगी.. आजच ही न्यूज पाहिली. एक चांगला रिव्वू मिळाला पट्टू चा
https://www.youtube.com/watch?v=lOIHCBJm4Qs
Icici ने या ईंडेक्स वर FOF
Icici ने या ईंडेक्स वर FOF साठी सेबीकडे ड्राफ्ट फाईल केला आहे. हा FOF, Nifty alpha low volatility 30 च्या ETF मधे गुंतवणूक करेल. हा फंड आल्यास Nifty alpha low volatility 30 मधे गुंतवणूक करणे सोप्पे होईल. >> व्वा चांगला पर्याय मिळेल मग. मी थोडी गुंतवणूक ईटीएफ मध्ये केलीय पण volume कमी असल्याने price volatility जास्त आहे अजून. long term मध्ये फार फरक पडेल असे वाटत नाही पण
एक चांगला रिव्वू मिळाला पट्टू
एक चांगला रिव्वू मिळाला पट्टू चा
https://www.youtube.com/watch?v=lOIHCBJm4Qs>>>>
मी जेव्हा Multifactor Indices बद्दल वाचन करत होतो तेव्हा पट्टू यांच्या ब्लॉग वरील लेख वाचले होते.
Alpha, Momentum, Beta वर आधारित Indices च्या limitation वर बाकी पण लेख आंतरजालावर आहेत. त्या limitation माहित असणे हाच Index Investing चा plus point आहे. किंबहुना फक्त Index Investingच नाही तर कोणत्याही objective, rule based trading set up चा महत्वाचा फायदा आहे. Known devil is better than an unknown angel.
Back testingच्या आधारे आपण गुंतवणूक कधी वाढवायची, कधी कमी करायची, काय केल्यास आपल्याला याच ईंडेक्स मधून जास्त फायदा मिळू शकेल याचा कयास बांधू शकतो.
Momentum based indices चा परतावा जसा जास्त आहे तसेच त्याचा Drawdown पण broad based Indices पेक्षा जास्त असणार. ज्यांना एवढा Drawdown बघायचा नसेल त्यांनी Low volatility stocks मधे गुंतवणूक करणे उत्तम. Low volatality based indices पण आहेत. त्यांचा Drawdown आणि परतावा दोन्ही Momentum based indices पेक्षा कमी आहे.
https://youtu.be/VKsG2MoiOUM
https://youtu.be/VKsG2MoiOUM
पट्टू यांचा Volatility, Momentum based investing चा व्हिडिओ.
एक सल्ला हवा होता. Momentum
एक सल्ला हवा होता. Momentum पकडणे expert असल्याशिवाय कठीण आहे त्याला knowledge पाहिजे. जर momentum साठी smallcase घेतली तर rebalancing exit entry याचे update मिळतील व काम सोपे होईल अशी आशा आहे. यावर काय मत आहे?
Momentum पकडणे expert
Momentum पकडणे expert असल्याशिवाय कठीण आहे त्याला knowledge पाहिजे.>>>>
मोमेंटम वर आधारीत कोणत्या स्मॉलकेस आहेत? त्याची लिंक द्याल का?
ज्याने स्मॉलकेस डिझाईन केली ते expert आहेत असे तुम्ही गृहित धरले आहे का? का धरले आहे?
UTI Nifty 200 Momentum 30 ईंडेक्स फंड पेक्षा स्मॉलकेस मधे गुंतवणूक करण्याचे फायदे काय आणि तोटे काय?
Smallcase is a universe.
Smallcase is a universe. ज्याने बनवली ते सर्वSEBI registered advisors आहेत. शिवाय weekly review करणारेही आहेत. Smallcase.com. वर पाहिले तर details कळतील. पण portfolio invest केल्या शिवाय कळत नाही except few free cases म्हणून कोणाला अनुभव/ माहिती असल्यास कळेल
दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण
दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करायची असेल तर म्युच्युअल फंड (SIP ) ला पर्याय नाही.
मी गेली बारा वर्षे या मार्गाचा वापर करतोय. आज मी खात्रीने सांगू शकतो कि म्युच्युअल फंड (SIP ) हा कॉर्पस निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे .
या विषयावर मी दुसऱ्या संकेतस्थळावर लिहितो आहे. मी ते इथेही देऊ शकतो ..
अर्थात मी इन्व्हेस्टर आहे, कन्सल्टंट नाही. आणि यात माझा काहीही वैयक्तिक फायदा नाही (हल्ली हे दुर्दैवाने सांगावे लागते )
दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण
दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करायची असेल तर म्युच्युअल फंड (SIP ) ला पर्याय नाही.>>>>
Index fund मधे पण SIP करता येते.
Smart beta indices कडे rule-based quant mutual fund या दृष्टीने पहा.
आज मी खात्रीने सांगू शकतो कि म्युच्युअल फंड (SIP ) हा कॉर्पस निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे .>>>>
सर्वोत्तम?
का बरे? बरेच पर्याय असतात/ आहेत की.
चांगले फंड कसे निवडावे? तुम्ही गुंतवणूक केलेले फंड कोणते? तेच का निवडले? त्यांनी गेल्या १२ वर्षात किती परतावा दिला? तुम्हाला किती परतावा (CAGR) मिळाला?
सविस्तर लिहा.
दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण
दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करायची असेल तर म्युच्युअल फंड (SIP ) ला पर्याय नाही.>>> असहमत. शेअर्स मधील इन्व्हेस्टमेंट जास्त रिटर्न्स देते. फक्त तेव्हडा अभ्यास पाहिजे. शेअर मार्केट जुगार आहे, इथे नशीब लागतं अशी विचारसरणी असणाऱ्यांचं ते काम नव्हे.
अतरंगी जी
अतरंगी जी
Index fund मधे पण SIP करता येते. >>>>>
इंडेक्स फंड हा म्युच्यअल फंडांचाही एक प्रकार आहे. त्यात सिप करता येते हे मला माहित आहे. पण मी लार्ज कॅप / मिड कॅप / फ्लेक्झी कॅप जास्त प्रेफर करतो.
सर्वोत्तम?
का बरे? बरेच पर्याय असतात/ आहेत की. >>>>>
मी सर्वोत्तम म्हटले आहे. एकमेव नाही. गुंतवणुकीचे अनेक प्रकार (असेट क्लास) आहेतच. त्यातला हा मला फायदा झालेला आणि दीर्घ मुदतीसाठी (१० + वर्षे)
उत्तम पर्याय आहे.
चांगले फंड कसे निवडावे? तुम्ही गुंतवणूक केलेले फंड कोणते? तेच का निवडले? त्यांनी गेल्या १२ वर्षात किती परतावा दिला? तुम्हाला किती परतावा (CAGR) मिळाला? >>>>>>
माझी म्युच्यअल फंडातील गुंतवणूकीचा डेट - इक्विटी रेशो २५-७५ % आहे. आत्ताच CAGR १२.७५% आहे. अर्थातच इक्विटी चा १५% च्या आसपास तर डेट चा ८-९ % च्या आसपास आहे
याबद्दल मी दुसऱ्या संकेतस्थळावर सविस्तर लिहिले आहे ... तेच इथेही देतो.
बोकलत जी
बोकलत जी
असहमत. शेअर्स मधील इन्व्हेस्टमेंट जास्त रिटर्न्स देते. >>>>>
मी सर्वोत्तम म्हटले आहे .. सर्वात जास्त परतावा देणारी नाही. मिळणारा परतावा (returns ) हा फक्त एक मापदंड (Parameter ) झाला. पण सिप च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी उत्तम (optimum ) परतावा देणारी , विविध असेट क्लास मध्ये गुंवणूकीची सुविधा देणारी, सिप मुळे सातत्य आणि आर्थिक शिस्त देणारी , स्थिर (Less fluctuation ), कमी जोखमीची , कमी गुंतागुंतीची , कमी वेळ खाणारी अशी योजना असल्याने मी सर्वोत्तम म्हटले आहे ...
माझी शेअर्स मधेही गुंतवणूक आहे ... पोझिशन ट्रेडिंग . फ्युचर्स असे धाडशी खेळ ही खेळून झालेत. आता मुच्यूअल फंड्स हा गुंतवणुकीचा मुख्य भाग आहे
निफ्टी ५० मधे ४ जानेवारी
निफ्टी ५० मधे ४ जानेवारी २०१० पासून जर SIP केली असती तरी १२.३६% CAGR मिळाला असता. bankbees किंवा बँक निफ्टी मधे गुंतवणूक केली असती तर १२.८४%. Smart beta indices किंवा factor based indices चे रिटर्न पडताळून पहा.
तुम्ही वापरलेले म्युच्युअल फंड, त्यांचा शार्प रेशिओ, स्टँडर्ड डेव्हीएशन ( तुम्ही एक रुपया मिळवण्यासाठी घेत असलेली जोखिम) या सर्वांचा विचार करा. त्या सर्वाची ईंडेक्स सोबत तुलना करुन पहा. मग स्वतःच्या खिशातले पैसे एका अनोळखी माणसाकडे गुंतवायला द्या. शिवाय चांगले फंड कसे निवडावे? तुम्ही गुंतवणूक केलेले फंड कोणते? तेच का निवडले? या विषयी सविस्तर लिहा. वाचायला आवडेल.
तुम्हाला झालेला फायदा चांगलाच आहे. पण फक्त तोच मार्ग सर्वोत्तम आहे, उत्तम आहे असा विचार करुन बाकी पर्यायांकडे डोळेझाक करु नका.
मार्केट मधे आपण बरोबर असणे हे सिद्ध करण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून कमीत कमी जोखिम घेऊन जास्तीत जास्त परतावा कसा आणि कुठून मिळवता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. माझ्यासाठी कमीत कमी कष्ट (अभ्यास्+वेळ) हा पण एक क्रायटेरिया आहे.
गुरुवारी की शुक्रवारी मिपावर सहज चक्कर टाकली तेव्हा तुमचे आणि अर्थक्षेत्र विभागात आलेले ईतर सर्व लेख वाचले, वाचत आहे.
अतरंगी जी
अतरंगी जी
मी इंडेक्स फंड वाईट आहेत असे म्हटलेच नाही ... मला फक्त २ हजार महिना सिप करायची असेल तर मी कदाचित इंडेक्स फंडात करीनही. ...
पण जर मला दहा हजार महिना सिप करायची असेल तर मी ४ हजार लार्ज कॅप मध्ये (दोन फंडात विभागून) , ३ हजार Flexi Cap मध्ये आणि २ हजार US Opportunity फंडात आणि एखादा हजार गोल्ड फंडात करीन.
(don't keep all your eggs in same basket हे नेहमीचे तत्व )
तसेच काही वर्षांनी रिस्ट्रक्चरिंग करताना एखादी FMP किंवा डेट फंड घेऊन पोर्टफोलिओ बॅलन्स करीन.
अर्थात हा प्रत्येकाच्या प्राधान्याचा (Preference) मुद्दा आहे ...
happy investing .....
मी पण म्युच्युअल फंड वाईटच
मी पण म्युच्युअल फंड वाईटच आहेत असे कधीच म्हणत नाही.
मी लेखात शेवटी माझे प्रश्न दिले आहेत. त्यांची जिथे समाधान कारक उत्तरे मिळतील मी तिथे SIP करेन, ती पण शंभरदा विचार करुन.
मार्केटमधे सर्वच जण जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी येतात. ते मिळवायचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे. प्रत्येकाचे स्वतःच्या अभ्यासातून/ दृष्टीकोनातून आलेले conviction वेगळे. तुमचे conviction हे म्युच्युअल फंड साठी दिसत आहे.
मेजॉरिटी म्युच्युअल फंड हे Nifty 200 momentum 30, nifty alpha low volatility 30, nifty low volatility 30, nifty alpha 50 ह्या indices पेक्षा लाँग टर्म मधे कमी परतावा देतील हे माझे मत आहे. का आहे त्याची कारणी मिमांसा द्यायचा प्रयत्न मी या मालिकेत केला आहे. असा पर्याय आहे हेच अनेकांना माहित नसते.
बाकी प्रत्येक जण स्वतःचे मेहतनीने कमावलेले पैसे कुठे गुंतवायचे हे कळण्याईतका सुजाण आहेच.
Happy INDEX investing.
अतरंगी जी
अतरंगी जी
इंडेक्स फंड हा म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार आहे..... वेगळा नाही ...
फक्त एकाच बाब निदर्शनात आणतो :
इंडेक्स फंड हे फक्त एकाच असेट क्लास मध्ये गुंतवणूक करतात : इक्विटी. ... तसेच त्याचा पोर्टफोलिओ इंडेक्स प्रमाणे असतो (Nifty म्हणजेच टॉप ५० कंपन्या) म्हणजेच ५० लार्ज कॅप कंपन्या ....
आता ह्याचा परिणाम म्हणजे इंडेक्स खाली गेला कि तुमचा पोर्टफोलिओ ही खाली जाणार ..
या उलट काही डेट फंड्स असतील, काही US opportunity फन्ड असतील , काही गोल्ड फंड असतील तर ? पोर्टफोलिओ जास्त बॅलन्स होईल असे नाही वाटत ?
बाकी तुम्ही उदाहरण दिलेल्या
ICICI Prudential Nifty Low Vol 30 ETF चे मागच्या दोन वर्षाचे रिटर्न्स १५.५६% (annualized ) आहेत
तर Canara Robeco Bluechip Equity Fund - Regular Plan - Growth या लार्ज कॅप फंडाचे रिटर्न्स 20.03% (annualized ) आहेत
दोन वर्षाचे रिटर्न्स दिलेत कारण ICICI Prudential Nifty Low Vol 30 ETF या फंडाने दोनच वर्ष पूर्ण केली आहेत ..
बाकी मर्जी अपनी अपनी
दिर्घ कालीन गुंतवणूकीचे
दिर्घ कालीन गुंतवणूकीचे पर्याय बघताना दिर्घकालीन विदा बघायला हवी. मी दोन भागात ते सविस्तर दिले आहे. लक्ष पुर्वक वाचले तर विषय लक्षात येऊ शकेल.
मुख्य प्रश्न गेल्या दहा ते पंधरा वर्षात किती म्युच्युअल फंड्स ने या ईंडेक्स पेक्षा जास्त परतावा दिला? पुढच्या दहा ते पंधरा वर्षात किती जण देऊ शकतील? हा आहे.
शिवाय Nifty Low Vol 30 चा शार्प रेशिओ, std deviation बघितले का? मी एक रुपया कमवायला किती जोखिम घेत आहे हे पडताळून पाहिले का?
गोल्ड, debt, US/China opportunities वगैरे विषय या धाग्यावर घेतलेले नाहीत. कारण धागा पोर्ट्फोलिओ कसा असावा यावर नाही. फक्त ईंडेक्स investing या विषयावर काढला होता.
दहा वर्षाहून अधिक काळ असलेला
दहा वर्षाहून अधिक काळ असलेला कुठलाही इंडेक्स फंड घ्या आणि त्याची तुलना Canara Robeco Bluechip Equity Fund - Regular Plan - Growth शी तुलना करा
खाली आहे तुमचे उत्तर ........ दहा वर्षा साठी ची तुलना
मुख्य प्रश्न गेल्या दहा ते
मुख्य प्रश्न गेल्या दहा ते पंधरा वर्षात किती म्युच्युअल फंड्स ने या ईंडेक्स पेक्षा जास्त परतावा दिला? पुढच्या दहा ते पंधरा वर्षात किती जण देऊ शकतील? हा आहे......
चांगले फंड कसे निवडावे? तुम्ही गुंतवणूक केलेले फंड कोणते? तेच का निवडले? या विषयी सविस्तर लिहा. वाचायला आवडेल.
असहमत. शेअर्स मधील
असहमत. शेअर्स मधील इन्व्हेस्टमेंट जास्त रिटर्न्स देते. फक्त तेव्हडा अभ्यास पाहिजे. शेअर मार्केट जुगार आहे, इथे नशीब लागतं अशी विचारसरणी असणाऱ्यांचं ते काम नव्हे.
असहमत. "Self Reporting Bias" ,"Sampling Bias","Survivor bias","data mining", "p hacking" असे घटक काढून टाकले तर इन्डेक्स फंडांना पर्याय नाही. मिरजेच्या मटका बाजाराचे मी अगदी जवळून निरिक्षण केले आहे. गेली वीसेक वर्षे न्यूयॉर्क मधल्या मोठ्या मोठ्या हेज फंड्स मध्ये कामही केले आहे. माणसे इथून तिथून सारी सेमच ! क्लाउड व शेकडो मशीन्स, प्रचंड डेटा, पी एच डी धारक स्टाफ, अति फास्ट नेटवर्क इतके सारे असूनही इन्देक्स फंडापेक्षा जास्त रिस्क अॅडज्स्टेड रिटर्न देणे हेज फंडसनाही अवघड आहे. केवळ गंमत म्हणून थोडेसे पैसे शेअर मार्केंट मध्ये गुंतवणे व टायमिंग करण्याचा प्रयत्न ठीक आहे पण इंडेक्स फंडांना पर्याय नाही.
मिरजेच्या मटका बाजारातही अथणीच्या एकाला कशी पंधरा हजाराची डबल लागली, पंधरा लाखाचे पेमेंट बुकीने कसे घरी जाऊन दिले, सोबत एक तोळ्याचे लॉकेटही भेट दिले अशा चविष्ट गप्पा रंगत, पण या मटका मार्केट पाई कित्येक देशोधडीला लागले त्यांची चर्चा होत नसे, survivor ship bias !
मी प्रयत्न केला, पण मला फारसे
मी प्रयत्न केला, पण मला फारसे कळत नाहिये.. काय करावे!
केवळ गंमत म्हणून थोडेसे पैसे
केवळ गंमत म्हणून थोडेसे पैसे शेअर मार्केंट मध्ये गुंतवणे व टायमिंग करण्याचा प्रयत्न ठीक आहे>>>पैशांसोबत गंमत केली तर देशोधडीला लागणारच. रच्याकने मिरजेत कुठे भरतो हा मटका बाजार. मिरजेच्या मटक्याची तुलना शेअर मार्केटसोबत होते म्हणजे एकदा भेट द्यायला हवी
मिरजेत अमर थिएटर शेजारच्या
मिरजेत अमर थिएटर शेजारच्या बोळात भरत असे . आर आर आबांची नजर लागली !
तिथल्या टपरीवर आजही मी गेलो तर न मागता माझा ब्रँड ची सिगारेट पुढे करेल !
ऑन अ सिरियस नोट, जे लोक वयाने तुलनेने लहान आहेत त्यांनी दर महा थोडे पैसे कमी एक्स्पेन्स असलेल्या इंडेक्स फंड मध्ये टकावेत. मार्केट वर जाऊदे नाहीतर खाली. लहान मुले एखादी बी पेरतात मग उगवले की नाही बघायला रोज उपटून बघतात, तसे करू नये.
हे धाग्याशी थेट संबंधित नाहीए
हे धाग्याशी थेट संबंधित नाहीए. मी निफ्टीमधल्या शेअर्सवर मिडियम . लाँग टर्मसाठी लक्ष ठेवून असतो. गेले वर्षभर jsw steel , टाटा स्टील हे दोन शेअर सर्वाधिक वधारलेल्यांत आहेत.
मी माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलियो पाहिला तर मेटल सेक्टरमध्ये १% ही गुंतवणूक नाही. (व्हॅल्यु रिसर्च वर हे पाहता येतं )
गेल्या महि न्यात टाटा स्टील घेऊया म्हणत बाय केलं तर चुकून टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स विकत घेतला गेला. तोही टाटा स्टीलला समांतर चालत असल्याने फायदा झालाच.
हे लिहायचं कारण म्हणजे आज टाटा स्टील चे निकाल आलेत आणि कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे.
म्युच्युअल फंड मेटल सेक्टरकडे इतके दुर्लक्ष का करीत असतील?
भरत तुमचा प्रश्न कळला नाही.
भरत तुमचा प्रश्न कळला नाही. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओबद्दल बोलत आहात तर तुमच्या कडे असलेले म्युच्युअल फंड हे काय प्रकारातले आहेत त्यावर कशात गुंतवणूक हे ठरणार. कुठल्या सेक्टरमधे किती गुंतवणूक हे देखील त्यानुसारच होणार. मेटल सेक्टरला किंमत नाही असे नाही तर अमुक म्युचुअल फंडमधे तो किती प्रमाणात असणे योग्य आहे असा विचार असतो.
खालच्या लिंक बघितल्यास तर इंडेक्स फंडातले स्टॉक्स आणि सेक्टर वेटेज बद्दल माहिती मिळेल.
https://www.traderscockpit.com/?pageView=nse-indices-stock-watch&index=N...
https://www1.nseindia.com/content/indices/ind_nifty_200.pdf
यात मेटल सेक्टरचे वेटेज ४.३ वगैरे आहे. आता यात पुन्हा सगळे एकाच टाईपच्या मेटल मधे नाही जाणार. तसेच मेटलवर अवलंबून असलेल्या इतर उद्योगात गुंतवणूक होते. जेव्हा मेटल सेक्टर मधे हालचाल होते तेव्हा या उद्योगांवर परीणाम होणार असतो. उदा. गाड्या किंवा बांधकाम. ते देखील लक्षात घेतले जाते.
माझ्याकडे दोन balanced fund ,
माझ्याकडे दोन balanced fund , 3 diversified equity funds आहेत.
गेल्या वर्षभरात चांगले चाललेले मी वर लिहिलेले दोन स्टॉक्स या एकाही फंडात बऱ्या प्रमाणात नाहीत.
मला फक्त याचं नवल वाटलं.
मेटल सेक्टर लॉंग टर्म साठी आकर्षक नसावा का?
टॉप होल्डिंग्ज इन्फोसिस, icici bank इ. आहेत.
>>मेटल सेक्टर लॉंग टर्म साठी
>>मेटल सेक्टर लॉंग टर्म साठी आकर्षक नसावा का?>>
तसे नाही. सामान्य गुंतवणूकदारासाठी स्टॉक्स घेताना जी जोखिम असते ती कमी व्हावी/विभागली जावी यासाठीच म्युच्युअल फंडमधे गंतवणूक केली जाते. कुठलाच सेक्टर कायम साठी आकर्षक नसतो. त्यात वर-खाली होत रहाते. त्या त्या वेळी कुठले सेक्टर्स कसे परतावा देत आहेत, किती ओवर प्राईस्ड, अंडर प्राईस्ड वगैरे विचारात घेतले जाणार. प्रत्येक फंडच्या स्टाईलनुसार काय होल्डिंग्ज, प्रमाण किती ते बदलते. त्याशिवाय मॅनेज्ड फंड असेल तर फंड मॅनेजरची स्वतःची स्टाईलही असणार. तुमच्याकडे जे डायवर्सिफाईड एक्विटी फंड्स आहेत त्यांच्या स्टाईलनुसार मेटलचे वेटेज किंवा कुठला स्टॉक ते बदलणार. तुमच्याकडे बॅलन्स्ड फंड आहे म्हणजे त्यात इक्विटी आणि डेब्ट दोन्ही आले. साधारण ६०-४०/७०-३० वगैरे आता त्यातले जे इक्वीटी आहे त्यातही असेच डायवर्सिफिकेशन होणार. तुम्हाला एखाद्या सेक्टरमधे जास्त गुंतवणूक हवी असेल तर थोडा सेक्टर फंड घ्यायचा मात्र त्यातून कदाचित परताव्याच्या मानाने जोखीम वाढू शकते.
Pages