रात्रीस खेळ चाले ३

Submitted by DJ....... on 8 March, 2021 - 11:47

सीझन ३

अगदी उत्सुकतेच्या शिखरावर चढूनच भल्या मध्यरात्री हा सीझन ३ बघायला सुरुवात केली. टायटल साँग न लागताच एपिसोड सुरु झाला त्यामुळे अनपेक्षितपणे तोल गेल्या सारखंच वाटलं. एपिसोड सुरू होतो तोच मुळी पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड अन दुसर्‍या सिझनचा शेवटचा एपिसोड घेऊन. आपण ठार केलेल्या सर्व माणसांच्या भुतांचा भास होत आण्णांचा मृत्यु होतो अन माई हंबरडा फोडते. दत्ता लगेच माधवला फोन करून कल्पना देतो. लगेच रघुकाका अन इतर गावकरी जमून आण्णांना नदीकाठी नेऊन क्रियाकर्म करतात तेव्हा माधव आणि अभिराम देखिल दिसतो. नदीच्या पाण्यात आण्णांच्या धगधगत्या चितेचे प्रतिबिंब उमटते अन भडकलेली चिता पाहून माधव, दत्ताला सावरण्याचा उपदेश करत रघुकाका सर्वांना परत फिरायला सांगतात. ते सर्वजण निघुन जातात पण कॅमेर्‍याच्या साक्षीने आपण मात्र आण्णांच्या चितेजवळच घुटमळत रहातो. नको म्हटलं तरी कॅमेरामन आपणाला पार चितेत घुसवतो Proud . शेवटी चितेतून मागे खेचत आपण नदीच्या पाण्यातल्या प्रतिबिंबात चिता बघत बसतो तेव्हा आण्णांचा आत्मा वर गेल्याचा भास होतो. Uhoh (हे फार भयानक चित्रण केलं आहे..!)
---------------------------------------------------------------------------०००--------------------------------------------------------------------------
मुंबईत कोण परुळेकर नामक एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक असतो त्याच्या मुंबईतल्याच टुमदार घरापासून सीनला सुरुवात होते. तो घाईगडबडीत आकेरीला निघालेला असतो जिथे त्याला आण्णा नाईकांचा वाडा इस्टेट एजंटकरवी विकत घ्यायचा असतो. तो अचानक निघालेला बघून त्याची बायको त्याला काळजीने बरेच प्रश्न विचारते परंतु त्या वाड्यात रिसॉर्ट बनवण्याच्या कल्पनेने परुळेकरवर पुर्ण ताबा घेतलेला असतो. तो एकटाच त्याच्या कारने आकेरीसाठी रवाना होतो तत्पुर्वी बायको त्याच्या हातात एक लाल धागा बांधते.

मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ-सावंतवाडी राज्यमार्ग अशी मजल-दरमजल करत आपण कधी परुळेकराच्या कार मधुन आणि कधी ड्रोनच्या माध्यमातून एरियल व्युने आकेरीतल्या नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर पोचतो तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. आधीच्या सीझनमधील हिरवीगार निसर्गरम्य भातखाचरं या सीझन मधे मात्र पेटवून दिल्यामुळे काळी-पिवळी-तपकिरी दिसत असतात. परुळेकर आपली बी.एम.डब्ल्यु. नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर फक्त २० फुट अलिकडे थांबवतो अन समोरुन येणार्‍या इसमास आण्णा नाईकांच्या वाड्याचा पत्ता विचारतो. तो माणुसही वेडेपणा करत पुढे जाऊन डावीकडे वळा (एरियल व्यु मधे आपणाला उजवीकडे वळायचं ते लक्ख दिसलेलं असतं..!) सांगायचं तर पुढे जाऊन उजवीकडे वळा असं सांगुन तिथून पोबारा करतो. शेवटी ते २० फूट अंतर पार करून परुळेकराची कार वाड्यासमोर थांबते अन दिवेलागणीच्या वेळेस पोचलेल्या परुळेकराच्या तोंडून (अन आपल्याही तोंडून Wink ) हुंड्या-झुंबरं ल्यालेला भारदस्त वाडा पाहून शब्द फुटतात - "मार्व्हलस..!!" Bw .

परुळेकर वाड्यासमोर पोचतो तोपर्यंत आपणही अनामिक ओढीने वाड्याचा साज-शृंगार भिरभिरत्या नजरेने डोळ्यात साठवू लागतो. वाड्याचं ते पेटंट फाटक, फाटकाच्या पिलरवर लावलेले प्रकाशाचे मोठे लाईटस, आतमधे माईचं वृंदावन, वाड्याची ओसरी, पायर्‍या, ओसरीच्या लाल दगडांच्या बिचीत लावलेला सफेद रंग (हा पांढरा रंग जरा नाजुक ब्रश ने दिला असता तर बरं झालं असतं असं वाटुन जातं Uhoh ), ओसरीतील झुला, वाड्याची काळं पॉलिश केलेली भारदस्त सागवानी चौकट, दरवाजा, कडी-कोयंडा, खिडक्या, भिंतींना दिलेला फिकट निळा रंग आणि पांढर्‍या रंगाने नजरेत भरलेले दारं, खिडक्या, खोल्यांच्या कोनांचे उठाव अन यासर्वांवर हुंड्या-झुंबरं यांच्या आरस्पानी काचेतून पसरलेला नाजुक प्रकाश यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो तसा तो परुळेकरही Bw .

वाड्यात शिरता शिरताच परुळेकराच्या हातात त्याच्या बायकोने बांधलेला लाल धागा फाटकाच्या बिचीत अडकून निघतो अन तिथेच लटकून रहातो. वाड्याच्या समोर आल्यावर मंत्रमुग्ध झालेला परुळेकर "घरात कोणी आहे का?" असं विचारतो तर आण्णांचा आवाज येतो "बूट ओसरीखाली काढून समोरच्या घंगाळातल्या पाण्याने हात-पाय धुवून या..!". सुचनेबरहुकुम परुळेकर सर्व सोपस्कर करतो अन बुट काढयला लागतो तेव्हा आपणाला दिसतं की आण्णांची खेटरं वाड्याकडे टाचा करून ठेवलेली आहेत. परुळेकरालाही असंच वाटत असतं नेमकं तेव्हाच आण्णांची भारदस्त मुर्ती हातात टॉवेल घेऊन परुळेकराच्या मागुन आपणाला सामोरी येते अन आपली १ सेकंद जाम टरकते. (आण्णांची तब्येत फार सुधारली आहे Wink ).

मग झुल्यात बसून आण्णा परुळेकराला येण्याचे प्रयोजन विचारतात. परुळेकर देखिल एका दमात वाडा विकत घ्यायला आलो असं सांगतो त्यावर आण्णा "दिला..!" असं हसत सांगतात. फुकट वाडा द्यायला निघालेल्या आण्णाला बघुन चपापलेला परुळेकर किंमत विचारतो त्यावर आण्णा त्याला गोल गोल घुमवतात. मधेच आतमधे नजर टाकून पाहुणे आलेत चहापाण्याचं बघा असं फर्मावतात. माई आता येईल मग येईल अशी आपण वाट बघत बसतो खरं पण झुल्याच्या किरकिरण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आपण माईला बघण्यासाठी आतुर झालेलो आपण मात्र आण्णा स्वतः जाऊन पितळी तांब्या-भांड्यातून पाणी आणतात तेव्हा मात्र हिरमुसले होतो. Uhoh (त्याच वेळी परुळेकरास पाटणकरणीने फास घेतलेलं अंगणातलं भेसूर झाड दिसतं.. अन तो चपापतो...!)

परुळेकर अन आण्णांच्या ओसरीतच गप्पा सुरु असतात. दिवाणखान्यात कधी जायला मिळणार अन तिथल्या भुईवरचं मडगुलं (चुन्याने रंगवलेली पेटंट नक्षी) अन रेखीव लाकडी जिना कधी बघायला मिळणार या विचारानं आपण सैरभैर झालेलो असतो. आण्णा अन परुळेकरच्या गप्पा सुरुच असतात तेव्हा आपण उगिचच उतावळेपणाने ओसरीतुन माजघराचा दरवाजा अन परसदाराचा वेध घेत असतो. चाणाक्ष कॅमेरामन आपल्या उत्सुकतेला वाटाण्याच्या अक्षता लावत आपणाला थेट आण्णांच्या खोलीतच घेऊन जातो. तिथला माहोल बघून आपले अन परुळेकराचेही डोळे दिपून जातात.

आण्णांच्या खोलियेत छताला २-२ झुंबरं अन खांबांवर डकवलेल्या हुंड्यांतून मंद प्रकाश पसरलेला असतो. आपलं मन मात्र अडकवलेली बंदुक, आण्णांचं सुप्रसिद्ध कपाट, ग्रामोफोन, मेजावरचं तांब्या-भांडं, आण्णांची खाट, तीमागची खीडकी, खिडकीतून दिसणारी बाव, समोरच्या दरवाजातून दिसणारी गॅलरी, भिंतींवरच्या आखिव-रेखीव तस्विरी, देवळ्या हे सर्व जिथं हवं तिथंच आहे का हे पहाण्यात गुंतलेलं असतं. त्याच वेळी आण्णा हसतमुख चेहर्‍याने परुळेकराला गोवा दाखवण्याच्या बोलीवर कपाटाचं दार उघडतात अन तिथला गोवा बघून आपल्याही चेहर्‍यावर मंद स्मित येतं Bw . कपाटाच्या आत आण्णांचा मुद्देमाल जसाच्या तसा असतो.. त्यात अजुन काही बाटल्यांची भर पडलेली दिसते. कपाटाच्या दारांवर आतील बाजुने भिवरी मदनिकेच्या अवतारात फोटोंवर चिकटवलेली असते. तिला बघुन आपणाला बरं वाटतं Bw .

परुळेकराला आण्णा भरपूर आग्रह करुन इतकं मदिरापान घडवतात की परुळेकराचा अक्षरशः पळूरेकर होतो Biggrin . मग नशेत चूर झालेल्या पळूरकराचं लक्ष समोरच्या भिंतीवरील तस्विरीकडे जातं अन तो ते चित्र पाहून त्याला दाद देत असतो तेव्हा आपण मात्र खूप नॉस्टेलजिक होतो. ते चित्र असतं लाल नऊवारी नेसून पाठमोरी उभी राहून आपणाकडे बघणार्‍या पाटणकरणीचं..! तिथं १४ जानेवारी २०१६ अशी तारिख असते. जुनं कॅलेंडर का लावलंय असं पळूरेकर विचारतो तेव्हा आण्णा उत्तरतात "काळ तिथंच तर थांबला..!" (ते ऐकुन आपणला जुने दिवस आठवून उगिच कावरं-बावरं व्हायला होतं Uhoh )

नशेत चुर्रर्रर्रर्र झालेल्या पळूरेकराला भिंतीवरील बंदुक दिसते अन तो अजुन रंगात येतो. आण्णा त्याला बंदुक काढुन त्यात बार भरून देतात अन रिकामी बाटली स्वतःच्या डोक्यावर ठेवत नेम धरायला सांगतात ते बघून पळूरेकराचा खरेच बार सुटतो Rofl Rofl Rofl . शेवटी आण्णांनी अतिशय आग्रह केल्याने परुळेकर शेवटी बंदुकीतुनही बार ठोकतो अन धुरात हरवलेल्या आण्णांच्या हाती फुटलेली बाटली दिसते. आण्णा पळूरेकरावर खूश होत खाली जेवणाची तयारी करण्यासाठी आवाज देतात अन खाली जातात (आपण पुन्हा एकदा ओढीने माई नाही निदान सरिताची लगबग बघायला स्वयपाक घरात जाण्यासाठी धडपडत असतो पण कॅमेरामनने थोपवून धरल्यामुळे आण्णांच्याच खोलीत चरफडत बसतो Uhoh ) त्यावेळी पळूरेकराला खाटेच्या मागच्या खिडकीतून खाली पाहिल्यावर बावीकडे कोणीतरी पळालेल्याचा भास होतो. शेवटी पळूरेकर उठून भेलकांडत जिना उतरू लागतो अन निम्यात येतो तेव्हा आण्णा वरुनच त्याला आवाज देतात तेव्हा तो अन आपणही चमकतो. या खोलियेत यायला १२ वाटा आहेत असं हसत हसत आण्णांनी सांगितलं अन ते पळूरेकराला पटलं तरी आपणाला माहित असतं की वर जायला ही एकच वाट आहे Wink

आपण पळूरेकरासोबत भेल्कांडत कपाळ्मोक्ष होणार तेवढ्यात वरील खोलित असणारे आण्णा समोर मुख्य दरवाजात जिन्याच्या तोंडाला पळूरेकराला सावरतात (आपण मात्र भुईवरील नक्षी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत रहातो अन जेव्हा ती दिसते तेव्हा खूप भ्रमनिरास होतो. संपुर्ण वाड्याला रिपेंट करणार्‍या पेंटरने नक्षीसाठी मात्र पाट्या टाकण्याचं काम केलं हे प्रकर्षाने जाणावतंं Uhoh ). मग आण्णा त्या पळूरेकराला जेवण्यासाठी गादीवर बसवतात (आपलं मन मात्र दिवाणखान्यातलं गणापती-लक्ष्मी-सरस्वतीचं चित्र बघण्यात रमतं..!) अन समोर चांदीच्या चौरंगावर चांदीच्या ताटात सुग्रास भोजन वाढलेलं असतं (आपण पुन्हा एकदा माई नाही निदान सरिताची लगबग बघायला मिळते का.. निदान छाया तरी आत्ता येऊन भोचकपणे काहीतरी बोलताना दिसेल किंवा गेला बाजार पांडु तरी "इसारलंय..इसारलंय.." करत हात झटकत आत येईल अशी वाट बघत बसतो..! पण हिरमोडच होतो.. कोण्णी कोण्णी येत नाही Uhoh ).

जेवण झाल्यावर आण्णा पळूरेकराला त्याच्या माडीवरच्या खोलियेत झोपवतात अन सकाळ होते तेव्हा इस्टेट एजंट परुळेकराला उठवत असतो. झापड आलेल्या परुळेकराला जाग येते खरी पण आपणाला समोरचं दृष्य बघून अतिशय धक्का बसतो. रात्री झुंबर-हुंड्यांनी उजळून निघालेल्या खोलीची अक्षरशः वाताहत झालेली असते. संपुर्ण खोली जाळ्या-जळमटांनी अन धुळीने भरलेली असते अन खाट, कपाट, मेज, खुर्च्या, बाकं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं.. छताची कौलं फुटलेली असतात. Uhoh Uhoh Uhoh एजंट परुळेकराला उठवतो तर परुळेकराने जेवणाऐवजी यथेच्छ माती खाल्लेली दिसते. घाबरलेला परुळेकर ओरडत जिन्यावरून खाली येतो खरा पण दिवाणखाना, ओसरी अन संपुर्ण वाडा इतका विद्रुप झालेला असतो की त्याच्या ऐवजी आपल्याच अंगावर भितीने अन संतापाने काटा उभा रहातो Uhoh :रागः

एजंट त्या परुळेकराला थांबवायचा अटोकाट प्रयत्न करतो पण परुळेकर कसाबसा बूट घालत कार मधे बसून पळ काढतो तेव्हा तो बुट घालताना रात्री करकरीत नवीन असणारी आण्णांची वहाण कुजून जीर्ण झालेली दिसते. आपणाला धक्का बसतो की नाईकांच्या वाड्याचं हे असं मातेरं का झालं असेल...? माई, सरिता, दत्ता, छाया, माधव, अभिराम, देविका कुठे आहेत..? निलिमाला नक्की कोणती शिक्षा झाली..?? असे असंख्य प्रश्न समोर उभे रहात असतानाच ४० मिनिटांचा लांबलेला पहिला एपिसोड समाप्त होतो.

प्रीकॅप मधे कोणीतरी गावगुंड त्या इस्टेट एजंटाला धमकावत असतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही म्हणुन जाब विचारत असतो. पाटणकरणीच्या (दुसर्‍या) घराच्या ठिकाणाहून भेसूर वाड्यावर कॅमेरा रोखलेला असतो अन त्या फ्रेममधे जुने पोतेरं झालेलं लुगडं नेसलेली म्हातारी पुसटशी दिसते (ही नक्कीच माई असणार यात शंका नाही.. तिला अशा अवतारात बघणे अतिशय क्लेशदायक ठरणार Uhoh )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या भागात माई वारलेली असते...
यात जिवंत आहे
इतकी वर्षे अभिराम ला आई कुठल्या अवस्थेत आहे ते माहित कसे नाही??
दत्ता पण आई च्या किती सांगण्यातला होता... मगे अचानक असा आई नी माधव ला वर्यावर कसा टाकून गेला

पहिल्या भागात माई वारलेली असते...>>>> ई...ई..ई....ई....ई....ई............................................... Biggrin
नाही हो माई पहिल्या भागाच्या पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या एपिसोडपर्यंत जिवंत असते. दुसर्‍या भागाच्याही पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंट होती... आताही तिसर्‍या सिझन मधे ती पहिल्या एपिसोड पासून आहेच.. तिला डेली काम असतंय बघा Biggrin

इतकी वर्षे अभिराम ला आई कुठल्या अवस्थेत आहे ते माहित कसे नाही??>> आभिरामने या भागात सांगितलं तसा तो अमेरिकेत जॉबला होता. तिकडे गेल्यावर नसेल येणं झालं. माईकडे आधीही कधी मोबाईल नव्हता त्यामुळे तिच्याशी बोलण्याचे कारणच सम्पले. आणि २ भाऊ अन १ बहिण असताना आईची असे हाल होतील असं अभिरामाला वाटलंच नसेल.

दत्ता पण आई च्या किती सांगण्यातला होता... मगे अचानक असा आई नी माधव ला वर्यावर कसा टाकून गेला>> दत्त्ता आईच्या खूप सांगण्यातला होता हे मान्य पण तो देखील बायकोचा बैलच होता.. आणि त्याची बायको सरिता किती वचवच करायची आठवतेय ना.. तिची वचवच ऐकुन घेण्यापेक्षा आईला एकटीला सोडून गेलेले बरे असं त्याला झालं असणार Biggrin

असो, मला तर या सिझन मधे पुन्हा प्रीकॅपचा वास येऊ लागला आहे. माई म्हणत होती की घरातली बाकी माणसं कुठं आहे ते कळेल हळु हळु.. मग कदाचित प्रीकॅप ओपन झालाच तर २००-२५० भाग टाकून त्यात सगळं बैजवार सांगितलं जाईल अन सीझनच्या शेवटला माई त्या भेसूर वाड्यात जळमटांच्या मागे फिरताना सिझन सम्पवला जाईल.

पण खरंच ते कपाटातले एव ढे दागि ने कुठे गेले? सुनेला जेल मध्ये ठेवले आहे का?
वाडा सोडला तरी बारके भाड्याचे घर मिळाले असते की. माधवाने नोकरी सोडली तरी फंड मिळाला असेल पेन्शन वगैरे.

अमा, अहो माधव बायकोच्या जेल मधे जाण्याने धक्का बसून वेडा झाला. वेड्याला कुठ्लं आलंय फंड आणि पेंशनचं भान. त्यात माई ही अशी अशिक्षित आणि घर सोडून बाहेरचं काहीच माहित नसणारी. त्यामुळे त्यांचे असे हाल सुरु आहेत. अभिराम आलाय म्हणजे हे हाल लवकरच संपतील.

कपाटातील दागिने कुठे गायब झाले ते काय कळणा नाय.. कदाचित छायाने ढापुन पोबारा केला असेल. तिचं काही सांगता येत नाही ती केव्हा काय करेल.

वेड्याला कुठ्लं आलंय फंड आणि पेंशनचं भान.>> अस्सं कंस्स. अस्स्सं कस्स्सं फंड अन पेन्शन ला नॉमिनी असतो तो बायको नायतर आर्चिस असेल. लेके भाग गये होंगे पागल को गांव मे छोडकर.

छाया विहिरीच्या तळाशी विश्रांती घेते आहे ना? म्हणजे असे गाण्यात होते. ती काय आत्महत्या करणार्‍यातली वाटत नाही.

छाया कसली आत्महत्या करते. विहिर बुजवून टाकायला अन नाईकांना पाण्याचे वांदे करुन ठेवायला मागेपुढे न पहाणार्‍यातली आहे ती. Proud

फंड अन पेन्शन ला नॉमिनी असतो तो बायको नायतर आर्चिस असेल. लेके भाग गये होंगे पागल को गांव मे छोडकर. >> मला तर वेगळीच शक्यता वाटते.. निलमीला अटक झाल्यावर कोर्ट कचेरीत सगळा फंड संपला असेल किंवा २ खुनांच्या गुन्हात निलमीला फाशीही झालेली असु शकते. त्या धक्क्याने आर्चिसाने काही बरं वाईट करून घेतलं नसलं म्हणजे मिळवली. या सर्वांचा परिणाम माधव सारख्या हळव्या मनाच्या माणासावर झाला असावा अन तो ठार वेडा झाला असावा.

अभिरामची बायको फक्त अंडुगुंडु बोलत होती ते फार इरिटेटींग वाटत होतं. इथल्या मराठी लेखात दुसरी भाषा वाली चर्चा आठवली.>>>>> तिच्यात आता भुते शिरणार आहेत मग ती मालवणी बोलायला सुरू करेल तेव्हा धक्का लागला पाहिजे ना म्हणून आता फक्त अंडुगुंडु बोलताना दाखवत असतील. Lol

आता माई हळूहळू भूतकाळ सांगणार आहे तेव्हा समजेलच काय झाले असेल तोपर्यंत आपण तर्कवितर्क करूया. भूतकाळ दाखविताना सगळे धागे दोरे जोडत सुसंगत दाखवला म्हणजे मजा येईल या सिझनलापण.

सुसंगतच दाखवतील. २ सीझनचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच तरी देखिल थोडं इकडं-तिकडं व्हायला लागलेच तर आपण आहोतच की दोरी खेचायला Proud

व्हय काय?... इसरलय..

मग दुसरा खून कोणाचा झालेला? परत पहिल्या सिझन ची उजळणी करावी लागेल वाटतं

दुसरा खून छायाच्या होऊ घातलेल्या नवर्‍याचा झाला.. तो पोलिस असतो.
------------०००-------------

कालच्या भागाची सुरुवातच साळगावकरांच्या घरी कावेरीच्या विव्हळण्याने होते. तिला ताप, थंडी आल्याने अभिराम, माई, साळगावकरीण चिंतेत बसलेले असतात. त्याच वेळी साळगावकर डॉक्टरला घेऊन येतो अन डॉक्टर कावेरीला तपासून औषधं देतो. ताप-थंडीच्य तपासणी अन औषधासाठी १५०० बिल केलं जातं ज्यात ५०० रुपये साळगावकराला कमिशन मिळणार असतं Wink . डॉक्टर निघून गेल्यावर मग माई पेटंट वाईट वाटून घेत तोंड कसनुसं करते अन मग पुढचं रडणं-भेकणं ओळखून अभिराम तिला हॉलमधे आणतो. तिथल्या चटईवर बसकण मारत माई पेटंट हंबरडा फोडते. ज्या कावेरीला भेटून १ तास देखील झाला नाही तिच्या ताप-थंडीबद्दलचं इतकं वाईट वाटून घेत फोडलेला हंबरडा बघून एखाद्या नव्या माणसाला वेगळंच काहितरी वाटू शकतं Proud (पण गेले २ सीझन आपण माईच्या ज्यात-त्यात हंबरडा फोडण्याच्या सवईला चांगलेच सरावलेले असल्याने तिच्या हंबरड्याचं काही वेगळं वाटून घेत नाही Biggrin ). मग त्या कावेरीसाठी पुन्हा एकदा साळगावकराच्या हॉलमधे बसून वाड्यातल्या देवाला हात जोडत गार्‍हाणं घालते अन तिथला अंगारा घेण्यासाठी उठू लागते. अभिराम तिला तिथून उठू न देता मनात नसलं तरी वाड्यातल्या देवघरातून अंगारा आणण्याचं वचन देत तिला चटईवर झोपवतो. अनोळखी माणसाच्या घरात यांचे चांगलेच हात पाय पसरु लागल्याचं आपणाला दिसतंच पण साळगावकरीण पण याबद्दल साळगावकराला चांगली झापत असतानाच अभिराम तिथं पोचतो अन साळगावकरीण वरमते Proud

मग साळगावकर अभिरामाला सांगतो की डॉक्टरांच्या औषधांबरोबर गावातल्या सुप्रसिद्ध रघुनाथ महाराजांचा अंगारा पण लाऊन घेऊ म्हणजे कावेरी मॅडमला लवकर बरे वाटेल. अभिराम यास तयार होत नाही पण साळगावकरीण अन साळगावकराची श्रद्धा बघून तिथं जायचं ठरवतो. रघुनाथमहाराजांच्या मठात पोचल्यावर तिथले पोस्टर बघून आपणाला समजतं की हे डोक्यावर मोरपिस लावलेले, पांढरी दाढी वाढवलेले, गळ्यात फुलमाळा घातलेले रघुनाथ महाराज म्हणजे आपले रघुकाकाच आहेत Bw . मग तिथल्या भक्तांची लगबग आणि स्वयंसेवकांची आस्थेने चौकशी अशी निरिक्षणे करत आपण अभिराम अन साळगावकरासोबत मठात पोचतो. तिथं बराच भक्तसंप्रदाय जमलेला असतो अन "रघु..रघू..रघू..रघू.." चा जयजयकार सुरू असतो. पुरुष अन स्त्रीया भक्तांवर कॅमेरा फिरत असताना एक बाई आपणाला ओळखीची वाटते अन आपण तिला चटकन ओळखतो.. अरे ही तर गेल्या सीझन मधली नाईकांच्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमाला येणारी पर्मनंट सवाष्ण..! Proud

तो आतला माहोल पाहून अभिरामाला शिसारी येत असते तरी तो बिचारा ते सर्व सहन करत साळगावकरासोबत मागच्या रांगेत बसतो. मग काही वेळाने रघुनाथमहाराज भक्तांच्या समस्या ऐकु लागतात अन त्या निराकरण करू लागतात. इतक्यात मघाशी साळगावकराकडून नवीन बकर्‍याची (अभिरामची) माहिती काढलेली स्वयंसेविका रघुनाथ महाराजांच्या कानी लागते अन तिचं बोलणं ऐकुन घेतल्यावर महाराज नुसत्या हाताने इशारा करत अभिराम आणि साळगावकराला तिथं बोलवतात. अभिराम तिथं आल्यावर रघुनाथ महाराज त्यला सांगतात की त्याची बायको थंडी तापाने फणफणली आहे म्हणुन तो इथे आलाय. ते ऐकून अचंबित झालेला अभिराम त्यांना हे कसं समजलं हे विचारतो तर साळगावकर त्याला सांगतो की ते अंतर्ज्ञानी आहेत वगैरे. आत्मस्तुती ऐकून रघुनाथ म. अभिरामास विचारतात की त्याला समोर कोण दिसतंय - मिरेचा कृष्ण की रुक्मिणीचा श्रीकृष्ण? अन त्याचवेळी त्यांच्या तोंडुन "तो बघताहा.. तो बघताहा.." हे पेटंट वाक्य निघतं अन अभिराम त्यांना "रघुकाका" अशी साद घालतो. Proud

आपणाला अभिरामाने ओळखलं असं लक्षात येताच रघुकाका तिथून विश्रांतीची वेळ झाली असं कारण देत काढता पाय घेतात अन त्यांचे स्वयंसेवक सर्व भक्तांना मठाच्या बाहेर जायला सांगतात. परंतू अभिराम साळगावकराला बाहेर जायला सांगत तिथेच थांबतो अन पाठिमागून चालत आलेल्या लाल साडीतील, लाल लिप्स्टीक, लाल टिकली लावलेल्या अन अंगबह्र सोन्याचे दागिने घातलेल्या छायाचे शब्द ऐकतो "रघुकाका नाही... रघुनाथ महाराज म्हणा..!" छायाला वर पासून खालपर्यंत न्याहळत अभिराम तिला हा काय प्रकार आहे असं विचारत असतानाच रघुकाका तिथुन आत निघुन जातात.

नंतर छाया स्वतःला "छाया माँ" म्हणवून घेत ती आता रघुनाथ महाराजांची पत्नी आहे अशी ओळख करून देते. त्यावर भयानक आश्चर्यचकित झालेल्या आपणासहित अभिरमही तिला डोकं जागेवर आहे का असं विचारतो. वडिलांच्या वयाच्या रघुकाकांसोबत लग्न केलेस अजून वेळ गेलेली नाही अन तिने परत वाड्यावर चलावं अन तिचं लग्न तो चांगल्या मुलाशी लाऊन देईल वगैरे वगैरे तेंव्हा छाया त्याला खूप प्रश्न विचारते की इतके दिवस बहिणीची आठवण आली नाही का? एकदा तरी पत्र पाठवून बहिणीची चौकशी केली का? तिला काय हवं काय नको हे विचारलं का? कित्येक रात्री तिने रडत घालवल्या. आण्णा गेल्यावर, भाऊ निघून गेल्यावर त्या वाड्यात गावच्या नजरा झेलत म्हातार्‍या आईसोबत ती कशी राहिली याबद्द्ल कधी डोक्यात विचार आला का व्गैरे वगैरे. हे सगळं ऐकुन आपणाला छायाची परिस्थिती आपोआप समजते. पण अभिराम तिला ते दोघे मिळून लोकांना फसवत आहेत असं म्हणतो तेव्हा ती त्याला एका खोलीत नेते जिथे पोती भरून पैसा आणि आणि पितळी हंडे भरून सोनं ठेवलेलं असतं (ते हंडे पाहून वाड्यातले हंडे इथे आहेत होय असं वाटून जातं Bw ). अजुन अशा ५ खोल्या भरून संपत्ती आहे हेही ती ऐकवते अन तिच्या एका निर्णयामुळे तिचं जीवन कसं पालटलं हे पटवून देते. त्यावर अभिराम तिला "एवढी संपत्ती काय कामाची जेंव्हा तिची आई दुसर्‍यांच्या घरी धुणी-भांडी करत आहे" असं सांगुन निरुत्तर करत तिथून निघुन जातो.

आजच्या भागात काय होणार हे प्रीकॅप मधे दाखवले ते असे - साळगावकराच्या कामगारांनी भेसूर वाड्याची स्वच्छता अन रंगरंगोटी, डागडुजी, लाईट फिटींग पूर्ण करून वाडा वापरायोग्य करून ठेवलेला असतो अन अभिराम माईसोबत तिथं पोचतो तेव्हा उजळलेला वाडा बघून तिच्याप्रमाणेच आपणही आनंदाने वाड्याचं रुपडं न्याहळत असतानाच टाईम स्लॉटचा शेवट होतो Bw

वाड्याची स्वच्छता अन रंगरंगोटी, डागडुजी, लाईट फिटींग पूर्ण करून वाडा वापरायोग्य करून ठेवलेला असतो >>>> किती महिने लागले असतील. तोवर अभिराम कुठे होता बघायला हवं . साधारण 2bhk च दुरूस्ती-रंगकाम काढलं की निदान 2 महिन्याची निश्चिंती होते. इथे तर मोडकळीस आलेला अख्खा वाडा आहे.

आजच्या भागातील छायाने केलेला युक्तीवाद थोडासा पटला, पण एकाच गावात राहून छायाला आईबद्दल काहीच माहिती नाही, किंवा छायाने आईला काहीच मदत करू नये हे काही पटल नाही.
त्याचप्रमाणे गावातल्या गावात रघू काकाचा रघुनाथ महाराज झाला, हे गावकर्यांना कस पचलं हे पण काही झेपलं नाही. असो, पांडूने कायतरी याचा विचार केलाच असेल. येईल हळुहळू बाहेर ते.

अभिरामची बायको थोरल्या जावेच्या पायावर पाय ठेऊन नविन नविन घोळ घालणार असं दिसतय. आजच्या भागात दत्ताचे पण दर्शन झाले. पण ते कोडं अजून उकललेलं नाहिये. एकंदरित रोज काहितरी उत्सुकता वाढवणारं दाखवतायत.

फक्त पहिला भाग च चांगला झाला .नंतर बाकी episode बिलकुल आवडले नाहीत.
ती बुवाबाजी,dr येतो तो भाग,छाया.
स्टोरी दुसऱ्या एपिसोड पासून च ढेपाळली आहे.
दिग्दर्शक,लेखक ह्यांची बिलकुल कुवत नाही .
100 एपिसोड च्या आताच सीरिअल la गाशा गुंडाळावा लागणार हे नक्की.
झी मराठी वरच्या सर्व सीरियल अतिशय बकवास आहेत.
त्या देव माणूस मध्ये मूर्ख पोलिस दाखवून झाले.आयपीएस ऑफिसर इतकी मूर्ख असते हे कही पटलं नाही.
मी झी मराठी बघणेच सोडून दिले आहे
त्या पेक्षा स्टार वरच्या सीरियल कथानक सोडत तरी नाहीत.

अभिरामची बायको थोरल्या जावेच्या पायावर पाय ठेऊन नविन नविन घोळ घालणार असं दिसतय....
नाही, उलट YouTube वरच्या काही video मध्ये तिच्यात अण्णा नाईक घुसतो आणि तिचा जीव घेतो असे काहीतरी दाखवले आहे. त्या अभिरामला संसार सुख देणारच नाही वाटते. कारण वच्छीने अण्णा नाईकाला शाप दिला होता ना की तुझा निर्वंश होईल का काहीतरी!

अभिरामने एवढे पैसे खर्च करून घराची रंगरंगोटी केली पण माईला पातळं आणि डोळ्यांना चष्मा काही घेऊन दिला नाही.

भोचकभवानी Proud
-------------------०००-------------------

परवाच्या भागाची सुरुवात होते तेच आकेरीची भातखाचरं एरियल ड्रोनने दर्शवत. अभिरामच्या गाडीतुन माई, कावेरी अन अभिराम वाड्यासमोर फाटकाच्या बाहेर उभ्या गाडीतून उतरतात अन घराकडे बघून माईच्या चेहर्‍यावरील भाव झरझर बदलतात अन ती फार आनंदी अन समाधानी दिसू लागते. वाड्याच्या बदललेल्या रुपड्याने तिच्याप्रमाणे आपणही खुश होतो. माई नव्या झालेल्या फाटकातून आत येताक्षणी "माजी तुळस..." करून वृंदावनाकडे जाते अन तुळशीच्या कुंडीला, वृंदावनाला कवेत घेत मायेने हात फिरवते. तिची तुळस परवा तर वाळालेली दिसत होती अन आज अचानक कशी काय डेरेदार झाली असं आपणाला वाटु शकतं पण एवढ्या मोठ्या वाड्याची दुरुस्ती करताना बरेच दिवस लागले असावेत त्यावेळी तुळस पण नवीन लावली असावी असं आपण मानून घ्यायचं Wink

तुळशी वृंदावनाचं कौतुक करून माई वाड्यासमोर येते अन खाली वाकून मनोभावे पहिल्या पायरीवर डोकं ठेकवते. तिला असं करताना आपणाला शहारून आल्याशिवाय रहात नाही Proud . मग माई अभिरामाला म्हणते की तिला माहित होते अभिराम तिच्या मनाची हाक ऐकुन जरूर येईल अन या घराला ठिकठाक करेल. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागतात अन कवेरीलाही गहिवरून येतं. शरीरात जीव असेपर्यंत हे घर पुन्हा मूळ स्वरुपात आलेलं बघून तिला तिच्या जन्माचं चीज झाल्यासारखं वाटलं हे ती बोलून दाखवते. आता या घरात पुन्हा गोकूळ नांदलेलं पहायचं आहे. मग ती लगबगीने घरात जाऊ लागते. ओसरीतून मुख्य दारात ते तिघेपण जातात तेव्हाच काहीतरी आठवून माई त्या दोघांना दरवाजातच थांबवून आत जाऊन येतंय असं म्हणात थेट स्वयपाक घरात जाते. जाताजाता बैठकीच्या खोलियेत आपण घुटमळतो अन आपल्या लक्षात येतं की दिवाणखान्यात गणपती-लक्ष्मी-सरस्वतीच्या चित्राखाली नवीन कॉट मांडलेली आहे तिथं आधी असणारं टेबल आण्णा-माईच्या फोटोच्या बाजुला लावलं गेलेलं आहे (प्रत्येक सिझनबर हुकुम फक्त या टेबलाची जागा तेवढी बदलत असते Proud ). दिवाणखान्यातले बदल न्याहाळल्यावर मग आपण माईसोबत स्वयपाक घरात जातो. आता ते स्वयपाक घर पुन्हा पहिल्यासारखंच एव्हाना अजुनच छान दिसत असतं. चूल, गॅस, सिलेंडर, फळ्या, मांडणी, फडताळ, भिंतीला टेकवलेला पाटा, खिडकीतल्या बरण्या सगळं कसं जिथल्या तिथं. मोठ्याशा टोपल्यांत पितळी भांडी, ताटं-वाट्या, तांबे सगळं कसं लख्खं मांडून ठेवलेलं असतं. अगदी, तांदूळ, पीठं, इतर स्वयंपाकाचं साहित्य पण आणुन ठेवलेलं असतं. हे सर्व बघून माईप्रमाणे आपणही समाधानी होतो अन आई अजुन का आली नाही हे बघायला अभिराम स्वयंपाक घरात येतो. त्याला बघून माई त्याच्यावर लटके रागे भरत पितळी पेल्यात तांदूळ भरत अभिरामाला घेऊन मुख्य दरवाजात येते. तिथं कावेरी नसते. ती थेट अंगणात जिथे पाटणकरणीने फास घेतलेला असतो त्या झाडाखाली उभा असते. कावेरीला त्या झाडाकडे गेलेली बघून माईच्या पायाखालाची जमीन सरकते अन ती हाका मारत तिला परत बोलावते अन उंबर्‍यावर तांदळाचा पेला ठेऊन माप ओलांडायला सांगते. कावेरीला हे नवीन असल्याने अभिराम तिला सोपस्कर सांगतो अन कावेरी अचानक लाथ मारून तो पेला जोरात लाथाडते Uhoh . तांदुळ भरलेला पेला जोरात समोरच्या भिंतीवर आदळतो अन तांदुळ पुर्ण दिवाणखान्यात पसरले जातात. ते बघून माई अन अभिराम चपापतात. तिची तब्येत बरी नसेल म्हणून तिने असे केले असावे असं वाटुन अभिराम कावेरील तिच्या खोलियेत घेऊन जातो अन माई सांडलेले तांदूळ भरू लागते. खोलित गेल्यावर अभिराम कवेरिला झोपवतो अन गोळ्या आणायला मेडिकल मधे जायला निघतो.

मेडिकलच्या समोर त्याची आर्टिगा पार्क करतो तेव्हा एक माणुस त्याचा पाठलाग करू लागतो. अभिराम मेडिकल मधे पोचणार इतक्यात त्याला आपला कोणीतरी पाठलाग करतंय हे जाणवतं अन तो मागे वळून बघतो तर मफलरने तोंड झाकलेला दारूडा माणूस त्याच्याकडे पैशांची याचना करत असतो. आई हॉस्पिटल मधे आहे अन तिच्या उपचारासाठी मदत करा असं त्या माणसाचं म्हणणं असतं. त्यावर अभिराम त्याला ओळखत त्याच्या चेहर्‍यावरचा मफलर बाजुला करतो तर तो दत्ता असतो. दारू पिलेला दत्ता अत्यंत झिंगलेला असतो अन खोटं बोलून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो हे अभिरामला कळतं. अभिराम त्याला वहिनी अन मुलं कुठं आहेत असं विचारतो तसा चपापलेला दत्ता पळून जातो. या प्रकाराने अभिराम खूप चिंतेत पडतो.

औषध घेऊन परत आल्यावर तो माईला दत्ताच्या बाबतीत विचारायला जातो पण आईला काळजी नको म्हणुन विचारत नाही. मग खोलीत गेल्यावर कावेरी अभिरामच्या मागेच लागते की परत बेंगलोरला जाउया म्हणुन. तो तिला खूप समजावतो पण व्यर्थ. मग तो बॅग भरून ठेवतो अन माईला भेटायला आत स्वयपाक घरात जातो. माई तिथं आजारी सुनेसाठी रटरटून पेज शिजवत असते. तिच्या डोळ्यात अभिराम अन नवीन सुनेप्रती खूप माया दिसत असते. तेवढ्यात अभिरम तिथं पोचतो अन माई त्याला उद्या बांगड्याचं कालवण करते असं म्हणते पण अभिराम तिला कावेरी पुन्हा बेंगलोरला जाउया असं म्हणतेय हे सांगतो. त्यावर माई त्याला आल्यासारखे ४ दिवस रहा असं म्हणते परंतू दुसर्‍याच क्षणाला ती ठिक आहे नंतर सवड काढून या असं मनाला मुरड घालुन सांगते.

बॅग भरलेला अभिराम कावेरीला चल असं म्हणतो त्यावर आजपर्यंत केवळ मल्ल्याळी बोलणारी कावेरी चक्क मराठीत बोलू लागते. बोलताना कपाळावरील केसांना पीळ मारत मी कुठेही जाणार नाही असं सांगते. त्यामुळे चपापलेला अभिराम मागे बघु लागतो तेवढ्यात माई तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन खोलित शिरते. माईला बघून कावेरी झपाटल्यासारखी अभिरामला म्हणते "आलीच बघ ही..." अन असं म्हणुन माईकडे रोखून बघत कपाळावरच्या बटांना पीळ घालू लागते. त्यावर माई अत्यंत चपापत डोळे मोठे करत कावेरीला न्याहाळू लागते अन तिच्या हातातील जेवणाचं ताट जमीनीवर सांडत एपिसोड संपतो.

प्रीकॅप मधे असं दाखवलं जातं की सरिता वाड्यावर आलेली असते अन मुख्य दारातून आत पाय टाकणार तेवढ्यात नऊवारी नेसलेली कावेरी जिन्यावरून ठुमकत ठुमकत खाली उतरत असताना सरिताला "हे माझं घर आहे" असं म्हणुन आडवते. पांडबा जिन्याखाली उभा असतो अन त्याला भिंतीवरील आरशात जिन्यावर लाल साडी घातलेली पाटणकरीण दिसते Proud

वाड्याची स्वच्छता अन रंगरंगोटी, डागडुजी, लाईट फिटींग पूर्ण करून वाडा वापरायोग्य करून ठेवलेला असतो >>>> किती महिने लागले असतील. तोवर अभिराम कुठे होता बघायला हवं . साधारण 2bhk च दुरूस्ती-रंगकाम काढलं की निदान 2 महिन्याची निश्चिंती होते. इथे तर मोडकळीस आलेला अख्खा वाडा आहे. >>>>>>>>हो आणि एवढं सगळं डागडुगीच , रंगरंगोटीचे काम केवळ ५ हजारात .

अभिरामने एवढे पैसे खर्च करून घराची रंगरंगोटी केली पण माईला पातळं आणि डोळ्यांना चष्मा काही घेऊन दिला नाही.

Submitted by भोचकभवानी on 28 March, 2021 - 17:20 >>>>
दिले कि नवीन पातळ आणि कावेरीने स्वतःच्या गळ्यातील चेन

कालच्या भागात दिलं ते सगळं Bw
-------------०००-------------
एपिसोड # ७

कालचा भाग बराच प्रवाही होता. सुरुवात होते तीच पांडबा अन अभिराम ओसरीत फुलांच्या माळा लावताना (पांडबा इकडे कसा आला ते काय कळणा नाय). मग कावेरी घरातून रांगोळीचा डबा घेऊन येते अन रांगोळी काढू लागणार तोच माई तिचा घावणाच्या पिठाचा डबा कुठं गेला म्हणत विचारत येते. तो घावणाच्या पिठाचा डबा कावेरीच्या हातात असतो अन त्या पिठाने ती रांगोळी काढायला निघालेली असते Proud . मग माई तिला रांगोळीचा डबो आणुन देते. अभिराम अन कावेरी दोघे मिळून रांगोळी काढतात. ते बघून माई अन पांडबा सुखावतात. आज नाईकांच्या वाड्यावर नवीन सुनेचं कौतुक करावं म्हणून माईने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला असत अन त्यासाठी ही सर्व लगबग सुरु असते. गावातल्या सवाष्णांना निरोप द्यायला म्हणुन माई पांडबाला सांगते अन ३-३ वेळा त्याच्याकडून वदवून घेते - "अभिरामचो लगीन झालेला असा अन माईने वाड्यावर हळदी-कुंकू ठेवलेला असा.. सगळ्यांनी येवा..!" (यावर पांडबाने काय निरोप दिला असेल हे वेगळं सांगायला नकोच Biggrin ). मग माई कावेरीला चांगली नऊवारी पातळ नेसवते अन तिचा अंबाडा वगैरे बांधून तिला चांगली नटवून-थटवून ठेवते. कावेरीला या रुपात बघून अभिरामच्या शिट्ट्या वाजतात Wink अन ते बघून माई त्याची फिरकी घेते. आपल्याला वाटतंच असतं की घराला नवंपण देण्यासाठी अभिरामाने एवढे पैसे खर्च केले मग माईला एखादं नवीन लुगडं घ्यायला काय झालं होतं अन नेमकं असं वाटत असतानाच अभिराम एका पिशवीतून नवीन पातळ माईच्या हातावर ठेवतो अन तिला ते नेसायला सांगतो. रडं अगदी जवळ असणार्‍या माईचा यामुळे ऊर अभिमानाने अन मायेने भरून येतो अन ती डोळ्यातून टिपं गाळत अभिरामाच्या चेहर्‍यावरून हात फिरवत असतानाच कावेरीही तिच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून माईला घालावयास देते. ते बघून माईला काय वाटतं ते सांगणं केवळ शब्दातीत आहे (आपलं नशीब की नवीन लुगड्यावर सोन्याची चेन मिळाल्यावर माईने हंबरडा फोडला नाही Proud ).

३-३ वेळा माई अन अभिरामच्या साक्षीने निरोप वदवून घेतलेला पांडबा तो सांगायला गावात रवाना होतो. पहिल्याच ठिकाणी एका विधवेला तो "माईनं लगीन केल्याहा... अभिरामने हळदीकुंकवाक वाड्यावर बोलावलाहा..!" असं सांगून हळदीकुंकवाला वाड्यात बोलवतो Proud . मग तिथून पुढे जो दिसेल त्याला मग अगदी मध्यमवयीन पुरुषांपासून ते म्हातार्‍या आजोबांना अन सवाष्ण बायकांपासून ते विधवांना तो "माईनं लगीन केल्याहा.. म्हणान अभिरामाने वाड्यावर हळदी-कुंकू ठेवल्यान.. सगळ्यांका बोलवलाहा.." असं सांगत आख्खं गाव पालथं घालतो Biggrin Biggrin Biggrin सगळ्या बायका अन पुरुष माईनं या वयात लगीन केलं म्हणून आचंबित होतात Rofl .

मग पुढच्या शॉटमधे एक जुनं घर दाखवलं जातं (जे वच्छीचंच मांगरातलं घर पुर्वेच्या बाजूने दाखवलं की काय अशी शंका येते) जिथं मध्यमवयीन सरिता उभी असते अन तिच्याकडे एक जमीनदार दत्ताची चौकशी करत असतो. आगाऊ पैसे घेउन दत्ता त्याच्याकडे कामाला गेलेला नसतो अन तो कुठं आहे असं वैतागून जमीनदार सरिताला ओरडत असतो. तेवढ्यात झिंगलेला दत्ता तिथं पोचतो अन बाबा-पुता करत त्या जमीनदाराला त्याच्याकडे कामासाठी येण्याचं कबूल करत कसाबसा घालवतो. मग दत्ताला पैशांवरून झापत सरिता अतिशय मोठा तमाशा करते. दत्ताची खराट्याने अक्षरशः धुलाई करते. हे करत असताना सरिता दोन तीन वेळा चांगली धडपडलेली दाखवली आहे (घराच्या आतलं शुटींग बघत असताना हे घर नक्कीच आबा अन वच्छीचं असावं याची खात्री पटू लागते). मग मार खाल्लेला दत्ता कसाबसा सरिताला ढकलून देत घरातुन पोबारा करतो अन त्याच्या मागे सरिता पण पळत जाते. दत्ता तिला सापडत नाही पण ४-५ सवाष्ण बायका नटून-थटून निघालेल्या मात्र दिसतात. सरिता त्या बायकांना त्या कुठं निघाल्या आहेत हे विचारते तेव्हा त्या बायका तिला तिच्या सासूने लगीन केलंय त्यासाठी अभिरामने जे हळदी-कुंकू ठेवलंय त्यासाठी वाड्यावर निघाल्यात असं हसून सांगतात. त्यांचं बोलणं ऐकुन सरिताचं टाळकं सटकतं की म्हातारीने या वयात कसं काय लग्न केलं म्हणुन Proud . मग ती तिच्या घरात जाऊन बोचकं खोलून २-३ साड्या बघते अन त्यातली एक जरा बरी साडी नेसून वाड्यावर नेमका काय प्रकार सुरू आहे हे बघण्यासाठी जायला निघते.

इकडे वाड्यावर सवाष्ण बायका पोचलेल्या असतात अन नवं पातळ नेसलेली माई सर्व बायकांना अगदी आगत्याने या या करत बैठकीच्या खोलित गणपती-लक्ष्मी-सरस्वती चित्राच्या भिंतीपाशी ठेवलेल्या खाटेवर बसवते. सगळ्या बायका अभिरामचे कौतुक करत असतात की नाईकांचा वाडा पुन्हा पहिल्या सारखा झाला अन ते ऐकुन माईच्या अंगावर मूठभर मांस चढतं. मल्याळी मुलगी सून म्हणुन आली हे ऐकल्यावर बायका मुद्दाम माईची टर उडवून तिची गंमत करत असतात तेव्हाच आपली सरिता घराबाहेर आली असावी असं तिची वचवच ऐकू आल्यामुळे आपण आधीच हेरतो. तिचा आरडा-ओरडा ऐकुन आत सवाष्ण बायका, माई, अभिराम देखिल चपापतात.

माई लगेच घराबाहेर येत सरिताला ती इथे कशाला आली म्हणून जाब विचारते तेव्हा या घरावरचा हक्क अजून सोडलेला नाही अन ते घर अजुनही आपलंच आहे अशा अत्यंत कोडगेपणाने सांगत सरिता माईला बाजुला सारत घरात घुसते. तिला बघून अभिरामही टरकतो. कावेरी देखील कावरीबावरी होते. चपापलेल्या सवाष्ण बायका चुळबुळ करू लागतात तेव्हा सरिता वचवचत एकेका सवाष्णीचं बिंग फोडायला सुरुवात करते तशा त्या बायका लगबगीने उठून वाड्यातून पोबारा करतात Proud . मग माई सरिताला ती इथे का आली हे विचारू लागते तेव्हा माईच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून सरिता तिला हा दागिना कुठे लपवला होता असं विचारते Proud . त्यावर माई तिला चांडळणी असं संबोधत सगळा पैसा, दागिने फुंकून टाकून आता या सोन्याच्या चेन वर पण डोळा ठेवते का असं म्हणत ती चेन तिच्या नवीन सुनेने - कावेरीने दिली आहे असं सांगते तेव्हा सरिताचा रोख कावेरीकडे वळतो. तिला हाताला घट्ट पकडत सरिता नुसती वचवच वचवच करू लागते तसं आपल्याला वरवर वाईट वाटलं तरी या बयेची वचवच या भागातही तशीच राहिली याचं सुखही वाटतं Bw (पण सरिता वच्छीच्याच अभिनयाची कॉपी करत आहे हेही यावेळी प्रकर्षाने जाणवतं..! Uhoh ). सरिताच्या हातातून कावेरीचा हात कसाबसा सोडवत अभिराम कावेरीला ओसरीत नेऊन बसवतो अन पुन्हा आत आल्यावर सरिता अभिरामाला तिने अन दत्ताने अभिरामाच्या शिक्षणासाठी काय काय खस्ता काढल्यात त्याची आठवण करून देते. तिचं किंचाळत बोलणं कावेरीला असह्य होतं अन ती पाटणकरणीने फास घेतलेल्या झाडाच्या पारावर जाऊन बसते ( अन त्याक्षणी आपणाला 'फिरून पुन्हा भोपळे चौकात' आल्याचा भास होतो Proud ). तिथं अपेक्षेप्रमाणे तिच्या कानात वारं शिरतं अन ती थेट कदमताल करत दिवाणखान्यात जायला निघते...

इकडे दिवाणखान्यात अभिरामवर ओरडणार्‍या अन माझो वाटो मला देऊकच व्हयाचा गजर करणार्‍या सरिताला कसेबसे थांबवत माई तिच्यापुढे हळदी-कुंकवाचे ताट धरते अन यातले हळदी-कुंकू तिचं तिने लावून घ्यावं घरातून निघून जावं असं म्हणते. त्यावर उसळलेली सरिता माईला घराचा वाटा मागते नेमकं त्याच क्षणी कानात वारं शिरलेली कावेरी तिथं पोचते अन माईच्या हातात असलेल्या अन सरितासमोर धरलेल्या हळदी-कुंकवाच्या ताटाला खालच्या बाजूने जोरात हात मारत वर उडवते. २-३ अ‍ॅंगलने आपण हळदीकुंकू हवेत उधळलं गेलेलं आपण पहातो अन त्याच क्षणी सरिताचं थोबाड हळदी-कुंकाने यथेच्छ रंगलेलं पाहून आपणाला - 'बरं झालं हिला असंच पाहिजे होतं' असंही वाटून जातं Biggrin (या शॉटला मात्र आपणाला गेल्या सीझन मधे आण्णा नाईकाने गोळीचा बार उडवत माईच्या हातातलं हळदी-कुंकवाचं ताट उधळून दिल्याचा प्रसंग आठवतो अन त्या उधळलेल्या हळदी-कुंकवाने काशीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेल्या वच्छीचा चेहरा असाच रंगलेला आठवून काय हा योगायोग असंही वाटतं. सरिता आता वच्छी बनली की काय अशी शंका आल्याशिवाय रहात नाही....!!). असं थोबांड लाल-पिवळं झालेली सरिता अनपेक्षित हल्ल्याने पुरती थिजून गेलेली असते तेंव्हाच कावेरी चक्क मराठीत बोलत सरिताला - "हे घर माझं आहे.. त्यावर माझा हक्क आहे.. तू इथून निघून जा..!" असं दात ओठ खात ठणकाऊन सांगते अन हे ऐकून सरिता सहीत अभिराम अन माईची देखिल भंबेरी उडते. आता आजच्या भागात काय होतंय हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

कालच्या भागाची सुरवात मिसली होती माझी पण टेंशन नॉट..Dj वृत्तान्त येणार माहीत असा. Happy

आदल्या भागाच्या शेवटी कावेरी मराठीत बोलते त्याबद्दल कोणालाच काही वाटले नाही का? त्याबद्दल काहीच दाखविले नाही का?

मग पुढच्या शॉटमधे एक जुनं घर दाखवलं जातं (जे वच्छीचंच मांगरातलं घर पुर्वेच्या बाजूने दाखवलं की काय अशी शंका येते >>>>> हो हो. मलाही ते घर वच्छीचंच वाटले. खासकरून तो मधला खांब पहिला तेव्हा.

Pages