एक प्यार का नगमा है: गीतकार संतोष आनंद यांची ह्रदयस्पर्शी कहाणी

Submitted by अतुल. on 23 February, 2021 - 02:18

एक प्यार का नगमा है... माझं अत्यंत आवडतं गाणं. गाण्याला अजोड उंचीवर नेऊन ठेवणारे लतादीदी आणि मुकेशजी. आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल. पण त्याचे गीतकार कोण, सध्या कुठे आहेत. काही माहित नव्हतं. जगाच्या विमृतीत गेलेला हा गीतकार. या व्यतिरिक्त त्यांनी कितीतरी सुंदर गाणी त्या काळात दिलीत. जसे कि:

मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...

आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गीत लिहिणाऱ्या आनंद यांना उत्कृष्ट गीतलेखनासाठी तब्बल दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण पुढे दिवस फिरले. काळ कोणासाठी थांबतो? एकुलता एक मुलगा अत्यंत चांगल्या अधिकारीपदाच्या सरकारी नोकरीत होता. त्यावर अफरातफरीचे आरोप झाले. तब्बल २५० करोडपर्यंत आकडा गेला. अडकला. अखेर २०१४ साली यात गुंतलेल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे सुसाईड नोट मध्ये लिहून बायको आणि चार वर्षाच्या मुलीसमवेत रेल्वेखाली उडी मारली. छोटी मुलगी केवळ नशिबाने वाचली. तीच आता संतोष आनंद यांचा एकमेव आधार आहे "जिंदगी और कूछ भी नही, तेरी मेरी कहाणी है". गाण्याच्या चित्रीकरणात सुद्धा चित्रपटाचा नायक (मनोजकुमार) पत्नीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एका छोट्या मुलासमवेत हे गाणे गाताना दाखवलाय. आज त्याहूनही अधिक कसोटीची वेळ वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी गीतकार संतोष आनंद यांच्यावर आली आहे.

परवा इंडियन आयडॉलने प्रथमच त्यांना अनेकानेक वर्षांनी मंचावर आणले आणि हि त्यांची हि कहाणी ऐकून उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. नेहा कक्कर घळघळा रडली. तिने त्यांना पाच लाख रुपयांची भेट देऊ केली. पण आपण आयुष्यात कधी कुणाकडे काही मागितले नाही असे विनम्रपणे सांगताना संतोष आनंद भावूक झाले. अखेर "हि तुमच्या नातीने दिलेली भेट आहे असे समजा" असे म्हणून सद्गदित झालेल्या नेहा ने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत गायिले "जिंदगी और कूछ भी नही, तेरी मेरी..." पण यापुढे ती गाऊ शकली नाही.

हा व्हिडीओ जरूर पहा. अंतर्मुख करेल:
https://youtu.be/xO0AlIXuKu4

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो, आना और जाना है

आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है...

आपल्या लेखणीने अजोड आणि अद्वितीय गोडीची गाणी लिहून आपल्या सर्वाच्या मनाला केवळ संतोष आणि अपार आनंद देणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य आणि यातून सावरायची शक्ती देवो हि सदिच्छा!

-अतुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, मी पण पहिला हा एपिसोड आधी वाटलं TRP साठी as usual चॅनेल ने टार्गेट केलं आहे, पण जेव्हा त्यांनी ५ लाखाची देणगी नाकारली तेव्हा वाटलं खरं असेल हे सगळं on the spot शूट झालं असेल, देवाच्या कृपेने त्यांना काम मिळोत

Sad !

इतक्यात बऱ्याच शोज मध्ये येऊन गेले आहेत ते. कविसंमेलनात भाग घेतात.
दुबई येथे त्यांचा सन्मान झाला तेव्हा संगीतकार विशाल ददलानी उपस्थित होते.
https://www.google.com/search?q=santosh+anand&oq=santosh+anand&aqs=chrom...

विशाल ददलानी अनेक सामाजिक उपक्रमात असतात पण वाच्यता करत नाहीत.

नेहा कक्कर गायिका म्हणून कधीच आवडली नाही. जज म्हणून तिचे तिथे असणे खुपतेसुद्धा.

पण आपल्या देशात मूळ मुद्दा सोडून इतर गोष्टींवर टीका करणारे जास्त आहेत. तिच्या जज असण्यावर आक्षेप मान्य पण तिने गाऊ नये/ शो मध्ये रडू नये अश्या गोष्टींवरून टार्गेट करणे शुद्ध फालतुगिरी आहे. असो, मुद्द्यावर येतो.

गीतकार बऱ्याचदा पडद्याआडच राहून जातात. ऑर्डरनुसार गाणी पाडून देणारा म्हणून पूर्वी कवी मंडळी त्यांच्याशी फटकून असत, पण तेव्हा गण्यासोबत किमान नाव तरी समोर यायचे. माझा एक कलाकार मित्र तो एपिसोड पाहिल्यावर गहिवरून म्हटला, कला माणसाला कुठल्याकुठे नेऊन ठेऊ शकते आणि कुठूनही आणून भिकेला लावू शकते!

काय सुंदर गाणी लिहीली आहेत त्यांनी. 'एक प्यारका नगमा है ...' अत्यंत आवडते आहेच पण 'प्रेमरोग' मधील 'मुहोब्बत है क्या चीज ...' फारच आवडते गाणे आहे.
काय दु:खाचा पहाड कोसळला असेल 'संतोष आनंद' यांच्यावरती. खरच आयुष्य किती बेभरवशाचे, अनिश्चित आणि वेळप्रसंगी क्रूर होउ शकते. मुलगी किती वर्षांची आहे आता? Sad मोठी असेल तर बरे आहे.

मुलगी २०१४ साली जेंव्हा आई वडिलांनी आत्महत्या केली तेंव्हा चार-पांच वर्षाची होती असे उल्लेख आहेत. म्हणजे आता ती दहा-अकरा वर्षांची असेल. त्या घटनेत ती जीवानिशी वाचली खरी पण एक पायाने अधू झाली म्हणे.

आनंद हे आर्थिकदृष्ट्या कंगाल नसले तरी या वयात त्यांच्यावर अशी वेळ येणे हे फार करुण आहे. (काही माध्यमांनी मात्र "भिकेला लागलेला गीतकार" असे विपर्यस्त वर्णन केलेय)

हो गाणी खूप सुंदर आहेत. "मै ना भूलूँगा" हे सुध्दा त्यांचेच. याशिवाय सुद्धा बरीच आहेत.

वाईट वाटले वाचून. बहुतांश मनोज कुमारच्या चित्रपटातील गीतांचे गीतकार म्हणून त्यांचे नाव ऐकले आहे.

इंडियन आयडॉलच्या एल्पी एपिसोडचा हा भाग खूपच पेनफुल होता पहायला !
किती स्वाभिमानी माणुस, कोणाकडून अर्थिक मदत घेत नाही हेच आलं त्यांच्या तोंडातून पट्कन .

मी हा भाग पाहीला नाही पण वरचा व्हीडिओ पाहून रडूच आलं एकदम Sad
त्यांचं उर्वरित आयुष्य तरी चांगले जावो ही सदिच्छा.

जो बित गया है वो अब दौर ना आएगा
इस दिल में सिवा तेरे कोई और ना आएगा
घर फूंक दिया हमने अब राख उठानी है
जिंदगी और कुछ नहीं,तेरी मेरी कहानी है

८१ व्या वर्षांच्या प्रवासांत त्यांनी अनेक खोलवर घाव झेललेले आहेत. त्यांची प्रसन्न मुद्रा आणि स्वाभिमानी बाणा आवडला, भावला.

नेहाच्या आवाजांतले गाणेही आवडले.

फार छान लिहीले आहे... तो एपिसोड खरंच रडवणारा होता... सध्या ही पोस्ट तुमच्या नावाशिवाय व्हायरल झालीये.. मला तीन ग्रुपमध्ये आली.

विसाव्या शतकाचे सगळ्यात आवडते गाणे 'इक प्यार का नगमा...' हे ठरल्याचे आठवते.
शैलेश लोढा बरोबर गजल/कवितांच्या एका कार्यक्रमात याचा उल्लेख झाला होता.
...
संतोष आनंद याना नमन....

>> सध्या ही पोस्ट तुमच्या नावाशिवाय व्हायरल झालीये.. मला तीन ग्रुपमध्ये आली.

हो मी आता फेबु वर पाहिले तर तीन-चार ठिकाणी तरी दिसली.

काल खरेतर चार ओळीत एका धाग्यावर प्रतिसाद लिहायला म्हणून घेतले होते. लिहिता लिहिता त्याचा छोटा लेख झाला.

त्यांचे हे शब्द फार फार प्रेरणादायी वाटतात. किंबहुना तेच त्यांचे मूळ व्यक्तिमत्व आहे म्हणल्यास वावगे ठरू नये. जेंव्हा जेंव्हा आपणास नैराश्य येईल तेंव्हा हे जरूर ऐकावे.

हौसला जीतता है, हत्यार नही... टांग टूटी है मगर मेरा कलेजा टूटा नही

चारच शब्दात किती काही सांगून गेले!

त्यी फेसबुक पेजेस वर मूळ लेखकाचे नाव लेखाखाली लिहा अशी कमेंट देता येईल.
नाव न देता असा दुसर्‍याचा मेहनतीने लिहीलेला लेख परस्पर टाकून संशयाचा फायदा घेऊन आपल्या फेसबुक पेजवर प्रतिसादरुपी पुण्य लाटणे बरे नव्हे.

Pages