"चला आटपा लवकर, किती वेळ झाला मी बाहेर बसलो आहे"
आराम खुर्ची वरून प्रतापरावांनी आवाज दिला. कॅलेंडर मध्ये एप्रिल महिना लागला होता, त्याच बरोबर लग्न आणि रिसेप्शन चा मौसम ही सुरु झाला होता. संध्याकाळ ची सुंदर वेळ होती, तुलशी जवळ दिवा तेवत होता. नुकताच अंगणात शिंपडलेल्या सड्यामुळे एक मंद मृदगंध हवेत पसरला होता. प्रतापराव व्हरांड्यामध्ये आराम खुर्ची वर बसून हलका झोका घेत होते.
इकडे घरामध्ये राकेश आणि त्याची आई तयार होत होते.
"हा कुर्ता का घातला ?" आईनी राकेशला पदर टोचत विचारलं.
"आई आवडतो मला हा, रात्री छान चमकतो.. हो ना?"
"काही नाही, तो बाबांनी नवीन आणलेला लाल कुर्ता घाल" आईनी टिकली डोक्याला चिकटवत सूचना केली.
"कर लवकर, चिडतील नाही तर बाबा, माहित आहे ना तुला, चल पटकन घाल" आईनी राकेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हंटलं.
राकेश लाल कुर्ता घालून बाहेर आला. आईनी कुलूप लावलं आणि सगळी दार बंद केली असं स्वतःलाच सांगितलं.
प्रतापराव कार काढून घराच्या फटका समोर आले होते.
"अरे वाह लाल कुर्ता घातला तर तू, बघ किती छान दिसतो, तू विनाकारणच दुकानात तो हिरवा कुर्ता मागत होता" प्रतापराव AC adjust करत राकेश ला म्हणाले.
"हं" राकेश नी कार च्या खिडकीतून बाहेर बघत उत्तर दिलं.
"चला रे, आठ वाजताच रिसेप्शन आहे आणि घरीच आठ वाजले"
"झालंच हो, तुम्हाला काय कुर्ता घातला की झाली तयारी, आमच नसतं तसं" आई नी कारचं दार बंद करत उत्तर दिलं.
"चला आता चिड चिड नका करू" राकेशनी मध्यस्ती केली आणि गाडी निघाली.
रिसेप्शनला रंग चढत होता, प्रत्येक जण आपापल्या हातातली प्लेट घेऊन जागा शोधत होतं, गप्पा रंगत होत्या, प्रतापराव प्लेट मध्ये मावेल तितकं घेऊन त्यांच्या ऑफिस च्या ग्रुप सोबत जाऊन बसले.
"अहो कसे आहात प्रतापराव"
"अरे मी मजेत, आपलं काय आता, सगळं लक्ष मुलाकडे"
"अरे हो पुढच्या वर्षी १० वी ना त्याची" देशमुख सहेब्बानी पुरी तोडत विचारलं.
"हो मग काय, आणि तुम्हाला सांगतो... " भातावर ताव मारत प्रताप राव सुरु झाले.
गुलाबजामच्या रिकाम्या वाटीने प्रतापरावांची चर्चा थांबवली. मी गुलाबजामून घेऊन येतो म्हणत प्रतापराव उठले. काही वेळात परत येताच, गुलाबजामच्या मोहामुळे आपली जागा गेल्याच त्यांच्या लक्षात आलं - आणि प्रतापराव राकेश ला शोधू लागले.
"कुठे गेला हा? एखादी जागा शोधायला सांगितलं असत"
तितक्यात मागून आवाज आला.
"ओ प्रतापराव, याईकडे बसा"
"धन्यवाद म्हणत प्रतापराव खुर्ची वर बसले"
"माफ करा पण मी ओळखला नाही तुम्हाला" प्रतापराव हलके हसत म्हणाले.
"अहो मी मुलीचा मामा आहे, प्रोफेसर पांडे, तुमच्या ऑफिसला आलो आहे बरेचदा, आणि आपली भेटही झाली आहे"
"अच्छा अच्छा!"
"अरे सुधीर इकडे ये, हा माझा मुलगा - नवव्या वर्गात आहे" प्रोफेसर म्हणाले.
सुधीरला आशीर्वाद देऊन प्रतापराव म्हणाले "अरे वाह छान, माझा मुलगा राकेश पण ९ वी ला आहे आणि तुम्हाला सांगतो- अभ्यासात खूप छान आहे राकेश, मागचे ५ वर्ष पहिला आहे वर्गात, दिवस रात्र अभ्यास करतो, सकाळी नुसता माझ्या आवाजाने उठतो सकाळी ४ ला, खूप मोठा engineer होईल बघा तो.. काहीच कमी नाही होऊ देत त्याला आम्ही, आता नुकताच काय तो नवीन लॅपटॉप घेतला त्याला, त्याच्या रूम मध्ये AC लावला मी, म्हंटलं गर्मी किती आहे, फोकस कमी नको व्हायला ना, आणि असा नाही की नुसता अभ्यास घेतो त्याचा, उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये कराटे क्लास पण जातो तो. तिथेही काय तो येलो की ब्लॅक बेल्ट आहे.. बाकी.. सुधीर काय म्हणतो, कसा आहे अभ्यासात?.. "
"सुधीर .. चांगला आहे.. तसा काही पहिला वगैरे नाही तो पण असतो पहिल्या पाचात.. " प्रोफेसर सांगू लागले.
"माझा सुधीर थोडा वेगळा आहे.. फिरायला खूप आवडत त्याला, आम्ही दोघंच निघतो कधी कधी मस्त.. जातो एखाद्या तलावाच्या किनारी, खूप बोलतो तो माझ्याशी, सगळं सांगतो, ते स्थिर तलावाच पाणी बघायला खूप आवडत त्याला.. मला वाटत त्याला लिखाणाची खूप आवड आहे.. सुंदर निबंध लिहितो, आणि हो स्वतःच्या भाषेत लिहितो, पाठ केलेला नाही, छोट्या पण सुंदर कविता करतो, त्याची एक डायरी पण आहे, त्यात त्या सगळ्या कविता उतरवतो, कोण जाणे कोण होईल, इंजिनिअर, डॉक्टर, किंवा अजून काही, ते वेळ आली की विचारेल त्याला, पण मला अस वाटत त्याच त्यांनी ठरलही असावं काय व्हायचा ते.. असो, माझ काम आहे हे त्याच लहानपण सुंदर करणे, माझी इच्छा आहे, खूप सुंदर आठवणी असाव्यात त्याच्या, माझ्याविषयी - मोठं झाल्यावर.. कारण मी जेव्हा माझं लहानपण आठवतो तेव्हा मला ते ९ आणि १० चे मार्क नाहीत आठवत, पण, माझ्या बाबांसोबत सायकल वर फिरल्याचे आठवते, ते गावाबाहेरच्या जत्रेत कुल्फी खाल्ल्याचे आठवते.. मला पण त्याला अश्या असंख्य आठवणी द्यायच्या आहेत.. बाकी तो काही तरी चांगलं करेलच पोटापाण्यासाठी इतका मला विश्वास आहे त्याच्यावर.. चला तुमची आज्ञा असेल तर निघतो मी, उशीर झाला आहे, सुधीर पण वाट बघतो आहे."
प्रतापराव त्या बाप लेकाच्या मूर्ती कडे बघत राहिले.. बराच वेळ.. निशब्द होऊन..
"बाबा चलायचा का घरी " राकेश च्या आवाजांनी प्रतापरावांची तंद्री तुटली.
"अरे इतक्यात कुठे, चल आपण दोघे मस्त आईस-क्रीम वर ताव मारू.." प्रतापराव खुर्चीवरून उठत म्हणाले.
"हाहा खरंच.. तुम्हाला माहित आहे आज मी पाणी पुरी खायची competition पण जिंकलो मित्रांसोबत... " आईस-क्रीम स्टॉल कडे जात, राकेश च्या गळ्यात हात टाकून, प्रतापराव त्याचे किस्से ऐकू लागले.. राकेश बोलत होता आणि त्याचे बाबा ऐकत होते...
==
रोहण गावंडे
छान?!
छान!
छान आहे!
छान आहे!
Predictable
Predictable
छान..
छान..
धन्यवाद मनिम्याऊ, मृणाली,
धन्यवाद मनिम्याऊ, मृणाली, हर्ष प्रिया, शीतल.
बाकी तो काही तरी चांगलं करेलच
बाकी तो काही तरी चांगलं करेलच पोटापाण्यासाठी इतका मला विश्वास आहे त्याच्यावर......
-----हे वाक्य प्रत्येक पाठ्य पुस्तकात पहिल्या पानावर छापावे, वैधानिक इशारा म्हणुन
खूप छान...
खूप छान...