( तरही..सानी मिसरा गझलकार देवपूरकर यांचा. )
मुग्ध कलिकेला उसासे दाबताना पाहिले
किर्र काळोखात कांही हालताना पाहिले
आरसा दावीत असतो बिंब आनंदी तरी
आत माझ्या मी मला सुस्कारताना पाहिले
प्राक्तनी ना भेट त्याच्या, नित्त्यनेमे पण तरी
पोर्णिमेला सागरा रोमांचताना पाहिले
फक्त सत्ता ध्येय असते, उर्मटांना पण तरी
कौल मागाया प्रजेचा, वाकताना पाहिले
ओंजळी नाही पसरल्या मंदिरी त्याच्यापुढे
भाग्य, देवाला जरी मी, वाटताना पाहिले
माय ती वृध्दाश्रमी अन् लाडका डॉगी घरी
संस्कृतीच्या लक्तरांना लोंबताना पाहिले
का कपातिल वादळांना भ्यायचे असते कधी?
जीवनी ज्याने हजारो संकटाना पाहिले
मी जसा दिसतो तसा स्वीकारला गेलो तरी
चेहर्याखालील "मी'ला दग्धताना पाहिले
मानवा धिक्कारुनी "निशिकांत" गोदा सांगते
नाथ जाता माणसांना थुंकताना पाहिले
निशिकांत देशपांडे,पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---देवप्रिया
लगावली--गालगागा गालगागा गालगागा गालगा
उत्तम !
उत्तम !
एक एक शेर अति उत्तम
एक एक शेर अति उत्तम