असो. एक कान्हातला अनुभव सांगतोच. मोरघार (Changeable Hawk-Eagle) सशावर टपली होती. दोन प्रयत्न वाया गेले. तिस-या प्रयत्नात ती होती. ससा गवताच्या गचपणात. मोरघारीनं उतरुन चोच मारुन पाहिलं पण काही जमलं नाही. आता सशानं थोडंसं डोकं काढायचा अवकाश की घारीनं नख्यांत उचलून नेलाच म्हणून समजा.
मागून गाडी आली. “शेर है क्या?”
“नही. वो देखो इगल शिकार कर रहा है खरगोशका.”
“हूं!!! इसको क्या देखना?”
आम्ही वेडे सोडलो तर कोणीच थांबलं नाही तिथं. सगळ्यांना वाघच पहायचे होते आणि मोजायचे होते. म्हणजे परत गेल्यावर सांगता आलं असतं “तीन दिवसात बारा वाघ” वगैरे स्कोअर.
अशा ‘मोजा-यांचं’ भलतं हसू येतं, कीव येते अन् चीडही येते. “अर्रेर्रे, रानात काय तुम्हाला वाघ मोजायला पाठवलंय? की जा बाबा, मोजून ये आणि आम्हाला पण सांग.”
मग कश्शाला रे? वाघ झालेत मोजून. त्याचे आकडे आहेत. गेले पार दिल्लीपर्यंत. छापून आले पेपरात.
अशा रानात आलो की खरं तर आपण मस्त मजेत फिरायचं, आनंद लुटायचा, वाघ दिसला तर वाघ, हरीण दिसलं तर हरीण. पण ही मंडळी स्कोअरकार्डच घेऊन फिरतात आणि पुढची अनेक वर्षं आपल्याला बेसावध पकडून हे आकडे आपल्या डोक्यात हाणतात.
असू द्या. आपण ताडोबाचं बोलत होतो ना! चला जाऊ द्या. हल्लू हल्लू आगे चले.
आता वैदर्भीय रानात जे काही बघावं, असं ताडोबात बघण्यासारखं बरंच काही आहे. पण खरं तर ‘वाघ दिसण्याची हमी’ हा भाग सोडला तर ताडोबात इतर रानांपेक्षा खास असं काऽऽऽही नाही. पण लोक येतात, जगातून येतात. कारण ताडोबात वाघ बरेच आहेत. त्यामुळं इथं जर चार सफारी घेतल्या, तर आंधळ्यालासुद्धा वाघ दिसतो.
असो.
इतक्या महागाईच्या काळातसुद्धा नमनाला दोन-चार मोठमोठे घडे कच्च्या घाणीचं तेल मी ओतलेलं आहे.
आता पाल्हाळ आवरतं गेतो. आपण रानात जातो आहोत. चार तासांनी परत बाहेर निघू. पाणी घेतलंय का? दुर्बिणी? कॅमेरा?
पाणी, दुर्बिण, कॅमेरा, नाक, डोळे आणि कान घ्या.
पाखरं-जनावरं पहा, झाडं-पानोळा पहा, रानाचे आवाज ऐका. येतायेत ना ऐकायला? हा पाण्यात पडणा-या थेंबांचा असा आवाज ऐकलात? अहो हा शिंगळा आहे; Scop's owl. बसलाय त्या तिकडं थेट त्या लेंडीयाच्या झाडावर. दिसला? नाही ना? मला पण नाही. फक्त अर्धा मिनिट डोळे बंद करा आणि ऐका.
हा शिंगळा, तो सुतार, या बाजूला हा सुभग, तिकडचा तो मोर, वर हा मोहाड्या गरुड गेला, मागच्या सवानातून हा रातवा, तिकडं दरीत तो माजावर आलाय चितळ. एक अद्भुत आवाजाचं विश्व जागं होतं. मग मला काय वाटतं सांगू? देवा! मला नजर दिलीस. पण एखाद्या अंधाला जे नादब्रह्माचं पारलौकिक सुख इथं, या रानात मिळेल, ते मला मिळू नये याचीही पुरेपूर तजवीज केलीस. तसे कान दिले नाहीस. तसं एकाग्र मन दिलं नाहीस.
या आवाजाची दुनिया म्हणजे मोठा भुलभुलैया. याची बाधा होऊ द्यायची नाही. भूल चढू लागली की डोळे उघडून भानावर यायचं.
इथला रानवट वास श्वासांत भरा. या हवेला स्वर्गीय सुवास आहे. इथल्या धुळीला अनवट गंध आहे. रानफुलांचे - जनावराचे वास अनुभवा. भले वाघ दिसणार नाही. पण तो तिथं रस्त्याच्या काठाला बसून गेला असेल, एखाद्या मजबूत सागवानावर तुरतुरला असेल. त्याचा वास तुम्हाला जाणवेल बरं! तिकडं कुठल्या एका त्या कुकुडरांझीच्या बेटामागं त्यानं परवा मारलेला अर्धा-मुर्धा गवा पडलाय. त्याचा जेमतेम वास आला की समजायचं इथं वाघोबा येऊ शकतात. म्हणून डोळे आणि कानाबरोबर नाक जागं ठेवा. पण तोंडं इथंच ठेवा; गेटच्या बाहेर. रानात ती बिनकामाची वस्तू आहे. हे तोंडं घेऊन येणारे लोक ना, चार तासात आपले कान चघळून टाकतात एकदम. वाट लागते मग.
रानात अस्वलाची नजर अधू, वाघाचं नाक अधू, मोरा-कोंबड्याचे पंख अधू. हे सारे दिसतील. पण कान अधू असणारं जनावर शोधून सापडणार नाही. थोडासा आवाज झाला की जनावर सावध. अधू कानाचं जनावर फक्त माणूस. सांगून ऐकत नाही आणि ऐकून समजत नाही.
जाऊ द्या. हल्लू हल्लू आगे.
मोहर्ली गेटनं आत जाल तर हा ताडोबातला एकमेव डांबरी रस्ता दिसेल.
गंमत म्हणजे आधी या रस्त्यानं चंद्रपूर - मोहर्ली - ताडोबा - नवेगाव - चिमुर - अशी एस.टी. जायची. लोक पन्नासेक रुपयांचं तिकिट काढून चंद्रपूर ते चिमूर आणि त्याच परत फेरीच्या गाडीनं पुन्हा चंद्रपूर अशी फेरी करीत. आता जाता-येता वाघ दिसणारच. एस.टी. नं वाघाला दिसू नये असं कुठं काही आहे? किंवा वाघानं एस.टी. ला तरी? अशी स्वस्तात मस्त सफारी अगदी आता-आतापर्यंत होती. २०१७ पर्यंत. पण आता ही एस.टी. मोहर्ली पर्यंतच.
इतक्या गेट्सपैकी मोहर्ली, खुटवंडा, नवेगाव आणि कोलारा यापैकी कोणत्याही गेटनं जाल तर तुम्ही ताडोबा तळ्याला भेट देणारच.
ताडोबा तळ्याशी गेलं की सहसा हा बाबा असतोच. मत्स्यगरुड. ताडोबा आणि नागझिरा इथं हमखास दिसतो. याच्या भुकेच्या वेळी आपण ताडोबाच्या तळ्याशी असलो तर हा तळ्यावर फिरता फिरता एखादा किलोभराचा मासा उचलून नेताना दिसू शकेल बरं. याचा आवाज मात्र नवख्याला धडकी भरवणारा भेसूर. नागझि-यात किती संध्याकाळी तळ्याकाठी बसून घालवल्यात. सोबतीला याचा आवाज. आधी ऐकला तर भीतीच बसली एकदम.
तळ्याकाठी अजून काही दिसतंच. हा पाण्यातला वाघ. लठ्ठू पैलवान.
पण असं तब्येतीवर नका जाऊ एकदम. हिच्यापाशी जर गेलं तर जो काही वेग क्षणात पकडते, त्यानं भीती वाटते. ही मस्त खाऊन पिऊन उन्हाला पडली आहे. बरं या इतक्या भारी आहेत, की कुठल्या कुठं रांगत-सरपटत जातात. कोणी ताडोबा पाहिलं असेल तर सांगतो, मोहर्ली गेटला मगरी येतात. अगदी गेटच्या नाक्यामागं. हेच असेच दिवस. आषाढाच्या आगंमागं. तुम्हाला वाघ + जंबो मगरी पहायच्यात याच्या दुप्पट? पेंचला जा.
मगरी एरवी काठाशी बसतात. आज काठाशी पाणी भरलंय. म्हणून थेट रस्त्यावर आली ही अगडबंब मगर. तिच्या आजूबाजूला ही तीनचार पोरं तिच्या रुपा-गुणाचा उद्धार करत टवाळक्या करत फिरतायेत वाटतं.
कधी कधी तिच्या असण्याचा फायदापण होत असावा. तिच्या किल्ल्यासारख्या मजबूत तटबंदीच्या आश्रयानं या पाणलावा निवांत चरताहेत.
एरवी या पाणलावा जवळ येऊ देणार नाहीत.
सहज एक आठवलं. पूर्वी इंग्रज शिकारी या पाणलावांची शिकार करीत. विदर्भात संत्रा भरपूर. संत्र्याच्या रसात पाणलावा शिजवून खात.
हे तुतारीवाले शराटी. लाल गोंड्याची टोपी आणि काळा झळाळीचा अंगरखा. उन्हात याचा काळा रंगही मोठा गोड दिसतो. खाऊन पिऊन झालंय. थोडी ढगाळ संध्याकाळ झाली. तळ्याकाठच्या या लाकडाच्या पुरातन ओंडक्यावर हे कुटूंब रानाच्या काव्यात रंगलंय.
हा एकटा आगाऊ पोरटा इकडं बसलाय आरामात आई-बापापासून दूर. आता हा शहाणा होईल, मोठा होईल तेंव्हाच हा लाल टोपी घालणार, तोवर अधिकार नाही.
बारा महिने इथं राहणा-या या अडया. बिलकूल जवळ येऊ देत नाहीत. ही आता डुकराची सार पाण्यावरुन आली आणि जांभळीखाली मुस्काटानं नांगरत किडामुंगी, मुळं खाऊ लागली. त्यांच्या आडोशानं या अडया राहिल्या. नाहीतर एव्हाना दुसरा काठ जवळ केलाच असता.
हा तुरेवाला सर्पगरुड. त्यातल्या त्यात सर्वात शांत. माणसाशी मैत्रीभाव याचाच जास्त. तसा फारसा नाही घाबरत माणसाला. निवांत बसून राहतो. हा अस्वलहि-यापाशी बसलेला सापडला. एकदा खाऊनपिऊन बसला सावलीला की सहसा उडून जाणार नाही.
सुभग - Iora
मोहाड्या गरुड - Honey Buzzard
रातवा - Nightjar
पाणलावा - Snipe
शराटी - Ibis
अडया - Lesser whistling ducks
तुरेवाला सर्पगरुड - Crested serpent eagle
क्रमशः
अहाहा, नेहेमीप्रमाणे सुंदर.
अहाहा, नेहेमीप्रमाणे सुंदर. दोन्ही लेख उत्तम
वाह! बहोत खूब.
वाह! बहोत खूब.
खुप छान लिहलंय.... तुमची एक
खुप छान लिहलंय.... तुमची एक वेगळीच शैली जाणवते.
इथं जर चार सफारी घेतल्या, तर आंधळ्यालासुद्धा वाघ दिसतो.... माझे काही मिञ याच भरवशावर गेले होते. त्यांना वाघाच नख पण नाही दिसलं. ताडोबा म्हटलं की त्यांना खुप राग येतो. कारण आम्ही इतका ञास देतोय की वर्ष होउन गेलं पण एकञ आलो की.... वाघ भारी होता ने सुरवात करायची बस
आहाहा! कमाल सुंदर!! सगळे फोटो
आहाहा! कमाल सुंदर!! सगळे फोटो एकसे एक सुंदर!! मगरीच्या पहिल्या फोटोत तिचे दात कसले दिसतायत.. बापरे! मगर शराटींना खात नाही का? की तेव्हा तिचं पोट भरलेलं होतं म्हणून शराटी बिनधास्त आहेत?
अप्रतिम लेख अणि फोटो. तुमची
अप्रतिम लेख अणि फोटो. तुमची लिहायची शैली मस्त आहे.
हाही भाग आवडला. आमच्या कान्हा
हाही भाग आवडला. आमच्या कान्हा भेटी च्या आठवणी ताज्या झाल्या.
आम्ही कान्ह्याला गेलो असताना आमच्या गाईडना ऐकीव माहितीवर आधारित फक्त इतकेच सांगीतले की सुरुवातीलाच एका झाडाच्या ढोलीत पिंगळे दिसतात ना; ते नक्की दाखवा आणि इतर प्राणी पक्षी देखिल दाखवा फक्त वाघामागे नेऊ नका. तर त्यांना इतका आनंद झाला होता. आम्ही काही झाडांचे फोटो काढायला म्हणून थांबल्यावर तर त्याच्या डोळ्यात पाणीच यायचे बाकी होते.
ड्रायव्हर आणि गाईड त्या दोघांनी त्या सफारीत पिंगळे आणि बरेच काही दाखवलं आणि दस्तुरखुद्द वाघानेही दर्शन दिले.
मस्त लेख !! भाषाशैली मस्त
मस्त लेख !!
भाषाशैली मस्त
मस्त!
मस्त!
काय छान चित्रदर्शी लेख झाला
काय छान चित्रदर्शी लेख झाला आहे! अशाच गप्पा सुरू राहू देत!
मस्त नेहमीप्रमाणे. तुमचे फोटो
मस्त नेहमीप्रमाणे. तुमचे फोटो इतके सुंदर अस्तात की त्यांना कुठल्याही फ्रेम/बॉर्डरची आवश्यकताच नसते हेमावैम. नुसतेच शोभून दिसतात लेखात.
काय जबरदस्त वर्णन केलं आहे
काय जबरदस्त वर्णन केलं आहे तुम्ही ! घरात बसून चक्क जंगलात फिरतोय , आवाज ऐकतोय , सावध चालतोय , शिकार होताना डोळ्यासमोर बघतोय असं अगदी चित्रदर्शी आणि ओघवतं वर्णन .. तुमचा जंगल वाचनाचा अनुभव हि दांडगा आहे हे अगदी पुरेपूर कळतंय !! अतिशय सुरेख अनुभव वर्णन !
आणखी खूप वाचायला नक्की आवडेल ! शुभेच्छा !!
हा ही भाग मस्त झालाय. फोटोही
हा ही भाग मस्त झालाय. फोटोही सुंदर. लिखाणाची शैली छान, ओघवती आहे.
तुमच्या लिखाणावरून असं जाणवतंय की तुमची बरीच जंगलं फिरून झाली असावीत. त्यांचेही अनुभव येऊ द्या, लिहीत रहा.
वरच्या फोटोत इंग्लिश नावं पण देता येतील कां?
जबरदस्त!
जबरदस्त!
जंगलातील ती शांतता आणि आवाज. आहाहा. वाघ दिसो न दिसो खुप काही असते जंगलात.
कसलं भारी लिहिलंय .फोटो
कसलं भारी लिहिलंय .फोटो अप्रतिम
मस्त लेख आणि सुंदर फोटो.
मस्त लेख आणि सुंदर फोटो.
पहिले दोन्ही भाग मस्त आणि
पहिले दोन्ही भाग मस्त आणि फोटोही मस्त.
धन्यवाद टवणे सर, सामो,
धन्यवाद टवणे सर, सामो, pravintherider, वावे, चैत्रगंधा, हर्पेन, विनिता.झक्कास , उमा_ , जिज्ञासा, वर्षा, anjali_kool, आऊटडोअर्स, मानव पृथ्वीकर, ए_श्रद्धा, सुमुक्ता, सायो

@pravintherider - अरेरे. कधीची गोष्ट ही?
@वावे - खरं तर मगर काही सोडत नाही. पण हे पक्षी सुरक्षित अंतर ठेवायला विसरत नाहीत.
@हर्पेन - छान अनुभव खरंच.
@वर्षा - धन्यवाद. ते फ्रेम म्हणजे अशाच करुन बघितल्या होत्या म्हणून इथं चिकटवून दिल्या.
@आऊटडोअर्स - इंग्लिश नावं टाकतो आताच.
झ्याक फोटो!!
झ्याक फोटो!!
अप्रतिम लेखन आणि अप्रतिम
अप्रतिम लेखन आणि अप्रतिम प्रचि. फार मस्त शैलीत लिहिता तुम्ही.
त्या मोहाड्या गरुडाचा आवाज ऐकला. खरंच भयानक आहे.
मामी, लिंकसाठी धन्यवाद!
मामी, लिंकसाठी धन्यवाद!
मस्त आवाज आहे गरुडाचा!!
तुमच्या सोबत आमची ही जंगल सफर
तुमच्या सोबत आमची ही जंगल सफर होत आहे...
अप्रतिम, खिळवून ठेवणारे लिहिता तुम्ही...
तुमचे लेखन अवर्णनीय असते फोटो
तुमचे लेखन अवर्णनीय असते फोटो अद्भुतरम्य असतात.
लिहीत रहा व आम्हाला जंगल सफारीचा आनंद द्या.
तुम्हाला National Geographic Magazine च्या फोटोच्या स्पर्धांविषयी माहिती आहे काय , मी एका Natural History museum (Houston) मध्ये पाहिले होते सगळ्या विजेत्यांचे फोटो , तुमचे अगदी त्याच तोडीचे आहेत. जमले तर खरच भाग घ्यावा. Online आहे . भारतातली लहान मुलं पण दिसली विजेत्यांमध्ये.
धन्यवाद अरिष्टनेमि...