डॉन

Submitted by अरिष्टनेमि on 4 June, 2020 - 22:45

अनेक गुन्ह्यांत अडकल्यावर शेवटी एका मर्डर केसमध्ये जित्या आतमध्ये गेलाच. तेंव्हापासून गॅंग हबकलीच होती. हळू हळू तुकडे पडून ज्यानं त्यानं आपापले चिल्लर धंदे चालू केले होते. राक्या, चिक्की आणि डाक्टर मात्र जित्याचे कट्टर भक्त.

राक्या शार्प शूटर होता. नेम म्हणजे नेम. आजवर राक्याला एकच्या वर दुसरी गोळी कधीच लागली नाही, हे त्याचं रेकॉर्ड. तो आडदांड शरीराचा होता; दोन माणसं सहज कडेवर घेऊन फिरेल असा. पण थंड डोक्यानं विचार करणारा माणूस. चेह-यावरची एकही रेष कधीच हलणार नाही. त्याच्या मनात काय चाललं आहे हे कधीच कोणाला समजणार नाही. चेह-यावर सतत शांत, प्रसन्न भाव. पण त्याला पैसा कधी कमावता आला नाही. जो कमावला तो त्याच्या हातात कधी टिकला नाही. म्हणून त्याच्या हातात सतत मागेल तसा पैसा खेळता ठेवणा-या जित्यासारख्या उदार आणि हुशार डोक्याच्या माणसाच्या आश्रयाशिवाय त्याचा निभाव लागणं कठीण होतं. जित्यासाठीसुद्धा तो कामाचा माणूस होता. त्याला धरून ठेवणंच होतं. पण राक्याच्या खुनशी आणि आतल्या गाठीच्या स्वभावामुळं जित्यालासुद्धा त्याची कधी कधी उगीचच भीती वाटे.

चिक्की देखणा. हुशार, मेहनती. एखाद्याच्या पोटात शिरून माहिती काढणं कोणी त्याच्याकडून शिकावं. जित्याचा तो एक्का होता. पण मारहाण, हत्यारं याच्यात तो कमजोरच होता. म्हणून स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी जित्याला धरून राहणं त्याला आवश्यक होतं. महत्वाचं म्हणजे तो जित्याच्याही कामाचा माणूस होता. जर जित्याला सोडून गेला असता, तर जित्यानं त्याला पाताळातून शोधून काढलं असतं आणि उडवलं असतं हे नक्की. जित्या होताच तसा डेंजर. डॉनचा डॉन. त्याचं नाव घ्यायला बाकी दादा लोक कचरत.

डाक्टर या सा-यांचा हरकाम्या. त्याचं खरं नाव त्यालाही आता विचारलं तर आठवावं लागतं. दहावी-बारावी असं काहीतरी झालेला. सव्वा पाच फुटाच्यावर एखादा मिलीमीटर उंची, ४२ किलोच्या पुढं एखादा ग्रॅम वजन. दुबईत अरबाकडं पाच वर्षं वेठबिगारी करुन तो रिकाम्या हातानं परत आला होता. असंच कायम कोणा ना कोणाच्या उपकाराच्या ओझ्यानं वाकलेले खांदे घेऊन ‘हांजी हांजी’ करून तो जगत होता. अशा माणसाला एरवीदेखील जगात आत्मविश्वासानं राहणं कठीण. त्यामुळं तो बांडगुळासारखा यांना चिकटून राहिला होता. मागं एकदा जित्याला संपवण्यासाठी हल्ला झाला होता. तेंव्हा जबर जखमी जित्या दीड महिना हॉस्पिटलमध्ये होता. तिथं वॉर्डबॉय असणा-या डाक्टरचा त्याच्याबरोबर एवढा दोस्ताना झाला की तो हॉस्पिटलमधलं काम सोडून जित्याच्या गॅंगमध्ये सामिल झाला.

जित्या सुटून आला त्या दिवशी त्याला घ्यायला राक्या आणि चिक्की बिनदिक्कत गेले. महिनाभर त्याची सेवा केली. काही कमी पडू दिलं नाही. रोज संध्याकाळी २ दारुचे खंबे आणि मांस-मच्छी आणून बनवून खाऊ घालणे यात डाक्तरला आनंद वाटू लागला. पण हे असं किती दिवस? एका बाजूला पोलिस, दुस-या बाजूला बाकीचे गॅंगस्टर्स. एकतर त्याचा एनकाऊंटर होईल किंवा गेम, अशी खात्रीशीर टीप होती. ‘हा कुत्र्या-मांजराचा खेळ आता बस,’ असं जित्याला नेहमी वाटू लागलं होतं आताशा. पण मग काय करायचं याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण एक दिवस केबलवर पिक्चर पाहता-पाहता चिक्कीच्या डोक्यात एक भन्नाट योजना आकार घेऊ लागली; स्वत:ची ओळख पुसून टाकणं आणि नवीन आयुष्य सुरू करणं.

‘जेम्स’, फक्त हि-यांचं मोठं दुकान. किमती हिरे तिथं चढ्ढा न्यायचा. चढ्ढा म्हणजे मालकाचा उजवा हात. मालकाची खास माणसं होती, पण विश्वास ‘चढ्ढा’ सोडून कोणावरच नव्हता. अनेक वर्षात त्यानं तो सिद्ध केला होता. पण त्याच्या पोटात घुसणार नाही तर तो चिक्की कसा? चलाख चिक्कीनं पाच-सहा महिन्यात जवळीक वाढवत हर मेहनतीनं त्याला वश केलं. कामाच्या बदल्यात ३० टक्के हिरे चढ्ढाचे. त्यानं फक्त किडनॅपिंगच्या नाटकात सहभागी व्हायचं होतं.

प्लॅन ठरला. पुढच्या डिलिव्हरीची माहिती चढ्ढानं दिली होती. निघतानाच चढ्ढा स्वतःचे ३० टक्के हिरे काढून घेऊन ७० टक्केच माल घेऊन निघणार. जित्या चढ्ढाला हि-यासकट पार्किंगमधून उचलणार. हे पार्किंगच्या सी.सी.टी.व्ही. कॅमे-यात येणार. जित्या हिरे स्वत:च्या कमरेच्या पाऊचमध्ये ठेवणार. गाजरी नदीच्या पुलावर नवीनच टोलनाका झाला होता. दुपारच्या ३-४ तासात तिथून क्वचितच वाहनं जात. नाक्यावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे होते. त्या रस्त्यानं जित्या चढ्ढाला घेऊन जाणार. तोंडाला रुमाल बांधलेला राक्या जित्याला नेमका कॅमे-यासमोर अडवणार आणि गाडीबाहेर काढून गोळी घालणार. यावेळी राक्याची पाठ आणि जित्याचा चेहरा कॅमे-याकडं स्पष्ट दिसेल असा. राक्या शार्प शूटर. नेम म्हणजे नेम. गोळी अचूक लागेल, पण जित्या मरणार नाही. राक्याच्या पिस्तुलात रबर बुलेट असेल. जित्याच्या छातीला शर्टच्या आत त्याच्याच रक्ताची पिशवी रक्त गोठू नये म्हणून थोडंसं अॅंटीकोअॅग्युलंट टाकून बांधलेली असेल. त्या पिशवीला छिद्र पडून रक्ताची धार लागेल. रस्त्यावर पडलेल्या जित्याला उचलून राक्या नदीत फेकून देणार आणि कमीतकमी ६० सेकंद पुलावर माहोल करुन मग पळ काढणार.

चिक्की खाली पाण्यात पिलरच्या आडोशानं थांबलेला असेल. वर गोळीचा फाडकन आवाज झाला की तो स्वत: स्कूबा मास्क लावून पाण्याखाली जाणार. जित्या पाण्यात पडला की त्याला एक स्कूबा मास्क देऊन त्याच्या खांद्यांवर पट्टे अडकवून पाठीवर ऑक्सीजन सिलींडर चिक्की अडकवणार होता. यासाठी ते ६० सेकंद हवे आहेत. पुलावरून राक्या निघून गेल्यावर टोलनाक्याचे लोक भानावर येतील आणि आधी पुलावरून खाली वाकून पाहतील. तोपर्यंत जित्या आणि चिक्की पाण्याखाली गेलेले असतील. सारा दोन ते तीन मिनिटाचा खेळ.

नदीत पाण्याखाली गेल्यावर जित्या आणि चिक्की साधारण पाऊण किलोमीटरवर डाव्या हाताला जे आंब्याचं झाड आहे, त्याच्यापाशी बाहेर निघतील. जित्या दाढी-मिशी सफाचट करणार. तिथं चिक्कीनं एक चोरीची मोटरसायकल आधीच ठेवलेली असेल. हिरे लपवण्यासाठी खास तयार केलेल्या काळ्या चामडी बुटांचा जोड डिकीत असेल. ते बूट घालून, कपडे बदलून दोघं रेल्वे स्टेशन गाठणार. राक्या आलेला असेल. रेल्वेस्टेशनला ते एकमेकांना भेटणार नाहीत, बोलणार नाहीत, फोनही करणार नाहीत. कोणताही पुरावा मागं सोडणार नाहीत. ते गोरखपूरसाठी रेल्वे पकडतील तीन वेगवेगळ्या डब्यात बसून. यानंतर पहिली भेट घेतील सकाळी रतलाम स्टेशनला एस-५ डब्यासमोर. पुढं गोरखपूरला उतरून नेपाळमार्गे बाहेर निघून जायचं. नंतर गुपचूप प्लॅस्टिक सर्जरी करून वेगळ्या नावानं आयुष्य जगायचं. हि-याचा अमाप पैसा असणारच होता. डाक्टर कच्चा लिंबू होता. सगळ्यांबरोबर त्याला घेऊन जाण्यात मजा नव्हती. नोटांच्या गड्ड्या फेकल्या की तो खूष होणार होता.

अर्थातच ही पुढची योजना चढ्ढाला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं.

जित्याचा खून का केला हा प्रश्न कोणालाच पडायचं कारण नव्हतं कारण त्याचं कर्तृत्वच असं होतं की त्याला उडवायच्या मागं अनेक लोक होते. केवळ तो इतके दिवस तुरुंगात होता म्हणून जिवंत होता.

त्याच्या खुनाचे साक्षीदार; टोलनाक्याची २-३ माणसं, स्वत: चढ्ढा आणि नाक्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे. कॅमेरे त्याचा खून लाईव्ह रेकॉर्ड करणार होते. मग जित्या मेला हे सगळीकडं होईल. पुलावर सांडलेलं ते रक्त जित्याचंच आहे हेही प्रयोगशाळेत सिद्ध होणारच होतं. पोलिसांकडं आधीचे नमुने होतेच. तो 'हि-यांसह' नदीत गेला हे स्वत: चढ्ढाच सांगणार होता. त्याचा मृतदेह कधीच सापडणार नाही. नदी पुढं तीन किलोमीटरवर समुद्राला मिळते. म्हणून 'जित्या आणि ते हिरे' हे दोन्ही शोध कधीही न उघडण्यासाठी भविष्यात कायमस्वरूपी दप्तरदाखल होणारच होते.

किरकोळ अडचणी सोडल्या तर आयडिया फुलप्रुफ होती.

तारीख ठरली. तयारीला अजून दोन महिने होते. डाक्टरला भविष्यातली तरतूद म्हणून ५ लाख रुपये दिले. त्यानं जन्मल्यापासून स्वतःच्या हातात इतका पैसा एकरकमी पाहिला नसेल.

जित्यानं चढ्ढाला उचललं. पुलावर टोलनाक्याला गाडी अडवून रबरी गोळी भरलेल्या पिस्तूलनं राक्यानं जित्याला चढ्ढासमोरच गोळी घातली. ठरल्याप्रमाणं जित्या पडला. छातीशी बांधलेली पिशवी फुटून रक्ताची धार लागली. गोळीचा आवाज होताच खाली मास्क हातात घेऊन पिलरच्या आधारानं तरंगणा-या चिक्कीनं मास्क लावून पाण्याखाली सूर मारला. राक्यानं जित्याला उचलून चढ्ढाच्या डोळ्यांसमोर कमरेच्या हि-यांच्या पाऊचसह नदीत टाकलं. वर पुलावर पिस्तूल नाचवत राक्या माहोल करत होता. अंदाजे एक-दीड मिनिटांनी तो सटकला.

पाच तासांनी एमिरेट्सचं विमान टेकऑफ घेत होतं तेंव्हा पायातल्या सैल बुटांच्या गोड गुदगुल्या करणा-या स्पर्शानं सुखावत तो खिडकीतून खाली बघत विचार करत होता, ‘चिक्कीच्या ऑक्सीजन सिलींडरमध्ये बिनवासाचं गुंगीचं औषध टाकणं त्याला अवघड नव्हतं, पण आज पिस्तुलातली रबरी बुलेट बदलायला नशिबानं साथ दिली म्हणून बरं, नाहीतर........... नाहीतर अख्खं आयुष्य त्याला असंच कायम कोणा ना कोणाच्या उपकाराच्या ओझ्यानं वाकलेले खांदे घेऊन ‘हांजी हांजी’ करून जगावं लागलं असतं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिमी म्हणजे डाॅक्टर..
तो ही पाण्यातच होता.
चिक्की सिलिंडरमधल्या गुंगीच्या औषधाने मेला.
राक्याच्या पिस्तुलातील खऱ्या गोळीमुळे जित्या मेला आणि राक्याला अटक झाली.
डाॅक्टर/जिमीने पाण्यातून पाऊच काढला आणि प्लॅननुसार ठेवलेल्या बाइकवरून शूज घालून पळ काढला.
त्याची शरीरयष्टी किरकोळ असल्यामुळे त्याला बूट सैल होत होते.. असं असावं..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पहिल्यांदाच असं काही लिहिलं आहे.

@ वावे - Happy चूक झाली होती. चिक्की हवं होतं. ते दुरुस्त केलं. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद निरु. माफ करा. चुकून चिक्कीऐवजी जिमी झालं होतं.
चिक्की सिलिंडरमधल्या गुंगीच्या औषधाने मेला.
राक्याच्या पिस्तुलातील खऱ्या गोळीमुळे जित्या मेला आणि राक्याला अटक झाली.
डाक्टरला सारा प्लॅन माहीत होता. तो तिथं आधीच येऊन थांबला होता. त्यानं जित्याच्या कमरेचा पाऊच काढला आणि प्लॅननुसार ठेवलेल्या बाइकवरून शूज घालून पळ काढला.
त्याची शरीरयष्टी किरकोळ असल्यामुळे त्याला बूट सैल होत होते.

म्हणजे कथा समजण्यासारखी आहे म्हणायचं. अगदीच गंडली नाही. Happy

झकास

गोष्ट लिहिण्याची पद्धत मांडणी वगैरे छान आहे.
पण (ऑरिजिनल किंवा बदललेल्या प्लॅन नुसार) राक्याला जित्याला (खरं खोटं) मारण्याबद्दल असं काय मिळणार होते की ज्यामुळे तो ह्या सगळ्यात सामील झाला हे काही कळलं नाही.

छान!

पण (ऑरिजिनल किंवा बदललेल्या प्लॅन नुसार) राक्याला जित्याला (खरं खोटं) मारण्याबद्दल असं काय मिळणार होते की ज्यामुळे तो ह्या सगळ्यात सामील झाला हे काही कळलं नाही.

>> असं काय करता हर्पेन.. गोरखपूर एक्सप्रेस मधून तिघे उतरणार आणि नेपाळला जाणार म्हणजे हिऱ्यांच्या पैश्याचे ३ वाटे करून जित्या, राक्या आणि चिक्की घेणार होते. डाक्टर ला सेंडॉफ म्हणून ५ लाख देऊन टाटा बायबाय केलं होतं (एकप्रकारे त्याने पुढे जाऊन यातलं काही उघड करू नये म्हणून त्याला त्याने कधी पाहिले नव्हते इतके पैसे देऊन शेवटचं उपकाराच्या ओझ्याखाली दाबलं होतं).

मला चिक्की मेला असं गोष्टीवरून वाटलं नाही. फक्त जित्या मेला असं वाटतंय. पण बहुमताने वर सगळ्यांना वाटतंय की चिक्की मेला.. तर समजा जित्या आणि चिक्की दोघेही मेले असतील तर उरलेले पैसे डाक्टर आणि राक्याचे. बाकी प्लॅन ठरल्याप्रमाणे..

यातही.. समजा राक्या डाक्टर ला सामील नसेल तर एवढ्या वेळा cctv पुढे नाचल्याने तो ओळखला / पकडला जाऊन कैदेत जाईल किंवा गोरखपूर एक्सप्रेस मध्ये बसला तरी पैष्याअभावी पुढे नेपाळला जाऊन काय करणार? त्यामुळे चेकमेट होऊन हात चोळत तिकडेच राहील.