Welcome To India

Submitted by Tushar Damgude on 7 May, 2020 - 02:43

आज माझा या परदेशतील शेवटचा दिवस होता. विमानात बसल्या बसल्या इथे घालवलेला काळ एखाद्या चित्रपटा प्रमाणे माझ्या नजरेपुढून सरकू लागला.

भारता पासून हजारो मैल लांब असलेल्या या परदेशात गेली कित्येक वर्षे मी इथे कामानिमित्त काढली. सुरवाती सुरवातीला हा अनोळखी देश, इथली अनोळखी लोकं आणि अनोळखी संस्कृती बघून दचकायला होत होतं. त्यामुळे मी थोडासा बुजूनच वावरत असे. पण ती अवस्था जास्त काळ टिकली नाही कारण सुदैवाने काही दिवसांनीच एका मॉल मध्ये गरजेच्या वस्तू खरेदी करायला गेलो असताना मुळचा पाटना येथील असलेला एक बिहारी व्यक्ती मला भेटला.

कितीतरी दिवसांनी आम्हा दोघांनाही कोणीतरी भारतीय व्यक्ती भेटला होता. अत्यंत जिव्हाळ्याने हिंदी इंग्रजी मध्ये पोटभरून गप्पा झाल्या. तो रहायला माझ्यापासुन साधारणपणे दोन तास अंतरावर होता, त्यामुळे आमचे एकमेकांना नेहमी भेटणे शक्य न्हवते परंतु वेळातवेळ काढून आम्ही सुट्टीच्या दिवशी भेटत असु आणि गप्पा, भारतीय जेवण आदी करत वेळ घालवत असू.

नंतर आमच्या या दुकलीला तिसरा भिडू भेटला. तो तिसरा भिडू म्हणजे एक मल्याळम मुलगी होती. भाषेच्या अडचणीमुळे सुरवातीला आम्ही दोघं हिंदी मध्ये काय गप्पा मारतोय ते तिला कळत नसे आणि मग आम्हाला खिजवण्यासाठी म्हणून ती मल्याळम मध्ये काय बोलतेय ते आम्हाला कळत नसे पण आम्ही देखील आम्हाला तिचे समजलेय असा अविर्भाव करून तशीच वेळ मारून नेत असु.

तसं बघायला गेलं तर आम्हा तिघांच अशा पद्धतीने एकमेकांना धरुन राहणं नैसर्गिक होतं कारण आपापल्या देशाच्या,वंशाच्या,भाषेच्या व्यक्तींचं कोंडाळ बनवून त्यातच जगणाऱ्या लोकांच्या घोळक्यात हजारो मैल दूर असलेल्या देशात 'फक्त भारतीय' म्हणुन आम्ही देखील आमचं कोंडाळ बनवणं नैसर्गिक होतं.

त्या सगळ्या काळात आम्हाला काही अडचण आली, गरज भासली , दुखलं खुपलं तर आम्हीच एकमेकांची काळजी घेतली. आमचे वेगवेगळ्या राज्यातील भारतीय अन्नपदार्थांचा वारसा सांगणारे पदार्थ तर वाटून घेतलेच पण आमची सुख दुःख सुद्धा आम्ही वाटून घेतली.............. कुणालाही हेवा वाटावा अशी आमची मैत्री होती !
_____________________

अखेरीस माझं विमान छत्रपती शिवाजी विमानतळावर लँड झालं. सगळ्यांच्या मागोमाग निवांत चालत मी येत होतो, घरी जाण्यासाठी मला घाई गडबड करण्याची आवश्यकता नव्हती. कारण माझी वाट बघणारे विमानतळावर सोडा घरी देखील कोणी नव्हतेच. मी बॅग घेऊन लॉबीतून बाहेर पडलो आणि कॅब शोधू लागलो तेवढ्यात अचानक काही महिला व पुरुषांनी मला गराडा घालून माझ्या गळ्यात फुलांचे हार घालायला सुरवात केली. त्या घोळक्यातील काही लोकांच्या हातात माझे संपूर्ण नाव लिहिलेले स्वागताचे प्लायबोर्ड होते.

हे लोक कोण आणि हा काय प्रकार आहे ते समजावं म्हणून मी त्यांना विचारले "अहो हे काय चाललंय ?"

ते एकसुरात म्हटले " तुम्ही तुषार दामगुडे ना ?"

मी म्हटलं " हो मीच आहे तुषार दामगुडे "

मी उत्तर दिल्याबरोबर ते एकमेकांकडे पाहून सुचक हसू लागले.

मग मी जरा घुश्शातच त्यांना विचारले " अहो पण तुम्ही सगळे कोण आहात ?"

मग त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली

" हे पहा हा तुमचा धर्म आहे , ती तुमची जात आहे , ती तुमची पोटजात आहे ,ती तुमची भाषा आहे , ते तुमचे गाव आहे, ते तुमचे शहर आहे , ते तुमचे राज्य आहे , मी या सगळ्यांची आई 'अस्मिता' आहे आणि हे माझे पती 'अहंकार' ! इथुन पुढे आम्ही कायम तुमच्याबरोबरच राहणार आहोत , Welcome To India "

आणि मला तिथेच भोवळ आली

तुषार दामगुडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा.... मस्त..

तो बिहारी आता इथे भेटला तर तुम्ही त्याला परप्रांतीय म्हणून हाकलून द्याल आणि मल्याळी मुलीला यंडूगुंडू म्हणून खिजवाल...

रच्याकने, 'बिहारी व्यक्ती भेटली' किंवा 'बिहारी माणूस भेटला' असे कृपया लिहा. व्यक्ती हे नाम स्त्रीलिंगी आहे.

शेवटचा परिच्छेद जबरदस्त म्हणजे जबरदस्त जमलाय.>>>>

+१

सुरुवात वााचताना ईतकं काही नाही वाटलं पण शेवट मस्त जमलाय.

जबरदस्त.
हो . बाहेरून भारतात येताना आधीची ओळख पुसून बारीक बारीक तपशीलवार अशी नवी ओळख स्वीकारावी लागते. कथेच्या शेवटाचं हे वळण अगदीच अनपेक्षित आणि थोडं उपरोधी, थोडं विषण्ण करणारं.

छान

शेवट आवडला अस म्हणवत नाही... शेवट अंगावर आला.......
तुम्हांला कोणीतरी छान भेटत असा शेवट असेल असं मला वाटत होतं!

छान लिहिले आहे.

भारतातच कशाला, बाहेर पण आता इतके भारतीय आहेत की हे अस इथे आणि तिथे सगळी कडे थोडया फार फरकाने घडत असत.

मस्त लिहिलं आहे. आवडलं. थोडक्यात लिहिलं त्यामुळे पटकन वाचून पण झालं आणि भावार्थ पोचला Happy

मस्त आहे !

पण मला वाटते हे जातीभेदवर्ण उच्च नीच भेद जगभरात असतील. ईंडियात बोले तो भारतात सतरापगड जाती जास्तच असल्याने ज्यादा बदनाम है ईतकेच.

मनुष्याचा मूळ स्वभावच आहे की स्वत:ला जन्माने मिळालेल्या कुठल्यातरी जातपात प्रांतप्रदेशाची जोडायचे आणि अभिमान मिरवायचा.

मला माझ्या जात धर्माचा अभिमान आहे पण मी ईतर जातधर्मीयांना हलके लेखत नाही
हे वाक्य तितकेच पोकळ आहे की.
मी रोज दारू पितो पण मी काही बेवडा नाहीये.

असो,
वेलकम टू मायबोली मेघपुष्प..
आपले ऑर्कूटचे दिवस आठवले

>>मनुष्याचा मूळ स्वभावच आहे की स्वत:ला जन्माने मिळालेल्या कुठल्यातरी जातपात प्रांतप्रदेशाची जोडायचे आणि अभिमान मिरवायचा.<< +१
जवळपास अशीच परिस्थिती सगळीकडे असल्याने विशेष काहि वाटलं नाहि. वर ऋन्म्या म्हणतोय तसं हा नॅचरल इंस्टिंक्टचा एक भाग आहे, आणि त्यात चूक/वावगं काहिच नाहि. परदेशांत असताना एखादा रेडनेक, लटिनो किंवा आफ्रिकन अमेरिकन सोडुन द्या पण एखादा पाकिस्तानी, किंवा बांग्लादेशी सद्ग्रहस्था ऐवजी तुम्हाला बिहारी, मल्याळी जवळचा वाटला, यातंच सगळं गम्य दडलेलं आहे...

रदेशांत असताना एखादा रेडनेक, लटिनो किंवा आफ्रिकन अमेरिकन सोडुन द्या पण एखादा पाकिस्तानी, किंवा बांग्लादेशी सद्ग्रहस्था ऐवजी तुम्हाला बिहारी, मल्याळी जवळचा वाटला, यातंच सगळं गम्य दडलेलं आहे... >> यावरून एक जुनी माबो कथा/ललित आठवली .
माणसाचे जाती धर्माचे परिघ कसे बदलत जाते ते . नक्की काय ते आठवत नाहिये . लिन्क मिळाली तर डकवेन

परदेशांत असताना एखादा रेडनेक, लटिनो किंवा आफ्रिकन अमेरिकन सोडुन द्या पण एखादा पाकिस्तानी, किंवा बांग्लादेशी सद्ग्रहस्था ऐवजी तुम्हाला बिहारी, मल्याळी जवळचा वाटला, यातंच सगळं गम्य दडलेलं आहे...
>>>>>

+७८६
तिथे ते भारतीय म्हणून जवळचे वाटले.
फंडा सेम हाय
वेलकम टू वसुंधरा..

बाकी परदेशात जिथे भारतीय खोरयाने असतील तिथे मग गुज्जू मराठी पंजाबी असे छोटे छोटे ग्रूप पडत असतील? प्रश्नचिन्ह आहे. कारण मला कल्पना नाही. जिथे आपण अल्पसंख्यांक आहोत तोपर्यंत हे असे एका समान धाग्याच्या लोकांना पकडून राहणे सोयीचेही पडते.

>>गुज्जू मराठी पंजाबी असे छोटे छोटे ग्रूप पडत असतील?<<
हो. पण तो स्वतंत्र विषय आहे, या धाग्याच्या बाब्तीत आउट ऑफ स्कोप... Proud

या धाग्याच्या बाब्तीत आउट ऑफ स्कोप...
>>>
यावर तुमच्याकडे काही लिहिण्यासारखे असेल तर थोडसं अवांतर असं नमूद करा आणि लिहा बिनधास्त अन्यथा माझ्यासारख्यांना शाहरूख, करण जोहर, यश चोप्रा वगैरे मंडळी दाखवतात तेवढेच परदेशातील भारतीयांबद्दल कळते. ईथली चर्चाच तर ज्ञानाचा झरा आणि माहितीचा खरा स्त्रोत आहे.

राज प्लीज इस "राज" को "राज"ही रहने दो. किसी के भी हात में कोलीत मत दो.
चांगलं लिहिलंय. तेवढ्यावर समाधानी राहूया का? Happy

छान लेख.
ऋन्मेषसाठी अवांतरः
बाकी परदेशात जिथे भारतीय खोरयाने असतील तिथे मग गुज्जू मराठी पंजाबी असे छोटे छोटे ग्रूप पडत असतील? >> हो. सगळ्यांची आपापली मंडळं असतात व त्यांचे कार्यक्रम ते आपापल्या भाषेतच सादर करतात. भरपुर लोक असतात प्रत्येकांचे.
त्याशिवाय गावात 'इंडिया असोसिएशन' संस्था आहे जी सर्व भारतीयांकरता आहे. ते वर्षातुन ४-५ कार्यक्रम करतात जसे की होळी, सांस्कृतीक कार्यक्रम वगैरे जिथे सगळ्या भाषेचे लोक जातात. अनेक देवळात उत्सव साजरे करतात तिथेही सगळ्या भाषेचे लोक जातात. काही दाक्षिणात्य देवळे त्यांचे सण करतात पण तिथेही सगळे जातात.

https://www.pri.org/stories/2019-03-08/us-isn-t-safe-trauma-caste-bias

That said, the survey stands as a preliminary, impressionistic picture of casteism operating in the United States. A recurrent theme in the findings is the shunning of a people once called “untouchables” at workplaces, schools, romantic relationships and houses of worship.

https://theprint.in/opinion/a-black-journo-on-why-us-civil-rights-laws-m...
Two-thirds of the Dalit respondents, for example, said they had experienced “caste discrimination” where they had worked —perpetrated by other people of south Asian descent. Not surprisingly, just over half the Dalits reported they were doing what African-Americans would call “passing”, hiding their caste identity.

सुनिधी धन्यवाद

सण उत्सव साजरे करणे हाच या जातधर्म प्रकारातील बेस्ट पार्ट आहे.

नेमके, कमी शब्दात !

... इथुन पुढे आम्ही कायम तुमच्याबरोबरच राहणार आहोत....
हे बदलावे अशा शुभेच्छा.

छान लिहिलयं! मात्र हे भारतातच नाही तर परदेशातही बघायला मिळेल. काहीतरी समान धागा म्हणून जवळीक वाटणे समजू शकते पण ज्या गोष्टी केवळ जन्माचा अपघात म्हणून आपल्यासोबत आहेत त्याबद्दल अहंकार, अस्मिता बाळगणे झेपत नाही. स्वार्थी नेतेमंडळी (धार्मिक आणि राजकीय) मात्र याचा पुरेपुर फायदा उठवतात.

Pages