२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ४

Submitted by वेदांग on 24 April, 2020 - 08:47

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.maayboli.com/node/58713

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १
http://www.maayboli.com/node/58938

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २
http://www.maayboli.com/node/59092

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग ३
https://www.maayboli.com/node/59199

=========================================

नर्मदे हर!

जवळपास ४ वर्ष!! विश्वास नाही बसत. सर्वप्रथम सर्वांची मनापासून माफी मागतो. शेवटचा लेख लिहून जवळपास ४ वर्षं होऊन गेली. बाकी कोणतीही कारणे सांगणे योग्य नाही. निव्वळ आळस हेच कारण. यामुळेच मला पुढचे भाग वेळेत लिहायला जमले नाहीत. बाकी वेळ नव्हता, कामं होती वगैरे वगैरे, ही कारणे पटण्यासारखी नाहीत. मुळात माझं असं वैयक्तिक मत आहे. वेळ हा कधीच मिळत नसतो, तो काढावा लागतो.

तुमच्या सर्वांच्या कंमेंट्स वाचल्या त्याशिवाय मित्र आणि नातेवाईकांचे पुढचे भाग लिहिण्यासाठी सुद्धा फोन आले पण........

असो... म्हणतात ना, देर आये पर दुरुस्त आये .... तसंच समजू आपण.

दरम्यान डिसेंबर २०१६ मध्ये पायी नर्मदा परिक्रमा करण्याचा योग आला. जवळपास ५ महिने त्यातच गेले. पायी परिक्रमेचे भाग संक्षिप्त स्वरूपात लिहायचा विचार होता पण पुढचे पाठ आणि मागचे सपाट असे नको व्हायला म्हणून नवीन काही सुरु करण्याआधी ही लेखमाला पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

तर, नर्मदा मैयाचे स्मरण करून आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. त्याआधी परत एकदा सर्वांची मनापासून माफी मागतो.

नर्मदे हर !

३१ जानेवारी २०१४, सकाळी ६ वाजता उठलो आणि सर्व आवरून केदारेश्वराचे दर्शन घेतले. केदारेश्वरला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. श्री गणेश पाटील चहा घेऊन येणार असल्याने त्यांची वाट बघत बसलो. (काल त्यांनी चहा घेऊन येण्याचे कबुल केले होते त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता). ७ वाजेपर्यंत ते चहा घेऊन आलेच. गप्पा मारत चहा घेतला आणि चहा झाल्यावर श्री. पाटील यांनी निरोप घेतला. आम्ही केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि सामान सायकल वर चढवले. काल नंदू काकांच्या सायकलचा एक स्पोक तुटल्यामुळे त्यांची सायकल दुरुस्त करत होतो, तेवढ्यात श्री. पाटलांचा फोन आला “नाश्ता घेऊन येतोय ५ मिनिटात. थांबा.” सायकल तात्पुरता दुरुस्त करेपर्यंत तेवढा वेळ लागणारच होता. थोड्याच वेळात श्री. पाटील गरमा-गरम कांद्याची गोल भजी आणि लाडू घेऊन आले. खरंतर परिक्रमा करत असताना कांदा-लसूण वर्ज्य असतो पण तेव्हा पुरेशा माहिती अभावी आम्ही भजी खाल्ली. कांदा- लसूण वर्ज्य असतो हे आम्हाला काही दिवसांनी कळले.

नंदू काकांची सायकल तात्पुरता दुरुस्त झाली आणि “नर्मदे हर!” करून आम्ही निघालो. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे काल आम्ही महाराष्ट्र (नंदुरबार जिल्हा) राज्यात प्रवेश केला होता. खूप दिवसांनी मराठी भाषा ऐकून बरे वाटले.

जेमतेम ५ किमी पुढे गेल्यानंतर नंदू काकांच्या सायकल मधून "कट" असा आवाज आला आणि चाक फ्रेमला घासायला लागले. थांबून बघितल्यावर लक्षात आले ३ स्पोक तुटले आहेत. सायकल चालवणे जवळपास अशक्य झाले होते. एका धाब्याच्या आडोशाला थांबून अनिकेतने (आमचा सायकल डॉक्टर) नवीन स्पोक बसवण्याचा प्रयत्न केला पण आमच्याकडे असलेल्या ज्यादा स्पोकची लांबी नंदू काकांच्या सायकलशी मॅच होत नसल्याने आणि चाकाची पूर्ण अलाइनमेंट बिघडल्यामुळे सायकल दुकानात नेऊन दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नव्हता. जवळपास चौकशी केली असता कळले कि मागच्याच गावात, साधारण १-२ किलोमीटरवर सायकलचे दुकान आहे. मग नंदू काका परत मागे फिरून सायकल घेऊन दुकानात गेले.

त्यांना परत यायला साधारण अर्धा तास लागेल या हिशोबाने आम्ही (इटी काका, बाबा, अनिकेत आणि मी) चहा घेतला. हवेत अजून गारवा असल्याने गरम गरम चहा घेतल्यावर तरतरी आली. पाऊण तास होऊन गेला नंदू काकांचा पत्ता नव्हता. फोन करूंन विचारल्यावर कळले कि सायकलवाल्यासाठी या प्रकारची सायकल नवीन असल्याने त्याला वेळ लागत आहे. पुढे १५ किमीवर तळोदा नावाचे गाव होते. आम्ही चौघांनी पुढे जाऊन तळोदाला थांबायचे व नंदू काकांनी सायकल घेऊन जमेल त्या वाहनाने तळोदाला यायचे असे ठरले.

ठरल्याप्रमाणे आम्ही तळोदाला जायला निघालो. साधारण ३-४ किमीवर तळोदा असताना नंदू काकांचा फोन आला. सायकल दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला स्पॅनर (पाना) त्यांना हवा होता. सायकलच्या दुकानात स्पॅनर उपलब्ध नसल्याने आमच्यापैकी कोणालातरी मागे जाऊन तो देणे गरजेचे होते. त्यातल्या त्यात अनिकेत लवकर पोहोचू शकेल आणि त्याची मदतसुद्धा होईल म्हणून अनिकेत स्पॅनर घेऊन नंदू काकांकडे गेला.

आम्ही थांबलो होतो तिकडे जवळच खांडसरी साखर कारखाना होता. तिकडे आडोसा बघून सायकली लावल्या आणि सावलीत बसलो. आम्ही परिक्रमा करतोय हे बहुदा लक्षात आल्याने एका टपरीवाल्याने चहा आणून दिला. थोड्या वेळाने सायकल दुरुस्त झाली असल्याचे सांगायला नंदू काकांचा फोन आला. लगेचच आम्ही टांग मारून तळोदाकडे निघालो. अनिकेत आणि नंदू काकांना टेम्पो मिळाल्याचे कळले आणि तळोदामध्ये आमची परत भेट झाली.

तळोदा ओलांडल्यावर पुढे एके ठिकाणी भोजन केले आणि लगेचच निघालो. सायकल दुरुस्तीमध्ये बराच वेळ गेल्याने अधिक वेळ न दवडता पुढे जायचे ठरवले. अक्कलकुवा हे महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळचे महाराष्ट्रातले शेवटचे गाव. अक्कलकुवा पार करून आम्ही गुजरातमध्ये प्रवेश केला आणि डेडियापाडाकडे जायला निघालो. अक्कलकुवा ते डेडियापाडा हा सुमारे ५५-६० किमीचा रस्ता बराच खराब होता. शूलपाणी जंगलातून रस्त्याअभावी जाता येत नसल्याने मैय्या दर्शन २-३ दिवसात घडले नव्हते. याच दरम्यान सायकल चालवत असताना एका गावापाशी २ जण मोटारसायकलवरून आले आणि आम्हाला थांबवले. एकाने आम्हाला कुठून आला? कुठे जात आहेत? असे प्रश्न विचारले. खात्री पटल्यावर प्रश्न विचारणाऱ्याने सांगितले कि "मैं पत्रकार हू और यहा एक पेपर के लिये काम करता हूं. (पेपरचे नाव लक्षात नाही.) पिछले गाव मी मुझे किसीने बताया ५ आदमी सायकिल से परकम्मा (मध्य प्रदेशमधला बोली भाषेतला शब्द) कर रहे है. इसीलिये मै आपके पीछे आया." आमची माहिती आणि फोटो घेऊन तो निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर आमची बातमी त्या पेपरमध्ये छापून आली होती. "पुने से निकले भक्त कर रहे है सायकिल से परिक्रमा. " आपले नाव पेपर मध्ये वाचून गम्मत वाटली. डेडियापाडामध्ये एका चहाच्या टपरीवर एकानी सांगितले कि इथून १५ किमीवर मेडियासाग नावाच्या गावात नर्मदा कुटी आहेत तिकडे तुम्हाला मुक्काम करता येईल. तोपर्यंत अंधार पडायला लागला होता. चहा घेऊन लगेच निघालो. रस्ता कमी वर्दळीचा आणि जंगलातला होता. दिवसभर झालेल्या प्रवासाने आणि ५५ किमीच्या खराब रस्त्याच्या टॉर्चरमुळे थकवा आला होता.

परिक्रमेत एक नियम पक्का लक्षात ठेवण्यासारखा आहे. जे अंतर आपल्याला लोकल माणसांकडून कळते त्यामध्ये + ५ करावे. आम्हाला जे टपरीवर १५ किमी अंतर सांगण्यात आले ते खरेतर २० किमी होते. असे प्रसंग खूप वेळा आले. अगदी रोज. सुरुवातीला चिडचिड व्हायची पण नंतर मानसिक तयारी झाली. तर साधारण १०-१२ किमी झाल्यावर सायकलला लाईट लावले. आश्रम दिसायला तयार होईना. आता व्यवस्थित अंधार झाला होता. सायकलच्या दिव्यांशिवाय काही दिसत नव्हते. शेवटी ७.३० च्या सुमारास दिवे दिसायला लागले आणि "श्री मेकलसुता धाम" अशी पाटी दिसली. जीवात जीव आला. सायकली लावून सामान काढले आणि स्वच्छ हात पाय धुवून घेतले.

आमचे सर्व आवरेपर्यंत बाकी परिक्रमावासींचे भोजन सुरु झाले होते. आश्रमातले बाबाजी म्हणाले 'थोडी देर रुक जावो, इनका भोजन होने के बाद आप बैठिये'. तोपर्यंत मैयाची आरती केली आणि नर्मदाष्टक म्हणले. लगेचच बाबाजींनी प्रसादाला बोलावले. सुंदर गुजराती पद्धतीची मुगाच्या डाळीची खिचडी, आमटी आणि पोळी असा मस्त बेत होता. जेवण करून लगेचच झोपायच्या तयारीला लागलो.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही सायकलने केलेली परिक्रमा झाल्यावर तुम्ही 16 साली पायी पण परिक्रमा केलीत,धन्य आहात तुम्ही.त्याचेही वर्णन वाचायला आवडेल.त्यामुळे ह्या परिक्रमेची सांगता केल्यावर पायी केलेल्या परिक्रमेच्या वर्णनाची वाट पाहूच.