चणा डाळ - अर्धा किलो
रवा अन मैदा - पाव किलो प्रत्येकी
सुंठ - अंदाजे एक इंच
५-६ वेलची
गूळ - अर्धा किलो
तूप
मीठ
खायचा सोडा
पाणी
आणि
हळद
परातीत थोडे पाणी घेऊन त्यात साफ केलेला रवा अन मैदा घ्यायचा. त्यात चिमूटभर मीठ अन सोडा घालायचा. अर्धा चमचा हळद घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. दुसऱ्या एका भांड्यात त्यांब्याभर पाणी घालून त्यात पिठाचा मळलेला घट्ट गोळा भिजवून झाकून ठेवा. हे पीठ किमान तास दिडतास तरी भिजवायचे(हा वेळ वर धरला नाहीये).
आता जोवर पीठ भिजतेय, पुरणाची तयारी करायची.
जितका कट हवा त्याच्या सव्वापट पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात चणाडाळ घालून शिजवायची. फक्त काळजी घ्या की डाळ जास्त शिजायला नको. डाळ एक कण कच्ची असताना त्यातले पाणी काढून घ्या. अन हो आच मंद ठेवा, नाहीतर डाळ करपेल. आता त्या डाळीत चिरलेला गूळ, सुंठ अन वेलची पावडर घालुन नीट मिक्स करून घ्या. गूळ जसा गरम होईल तसे त्याला पाणी सुटते. सो जास्तीचे पाणी आटवून घ्यावे. पाणी आटले की गॅस बंद करून पुरण थोडे गार होऊ द्या. आता गार झालेले पुरण पाटा, पुरण यंत्र वा मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे. आम्ही पुरण चाळणीत वाटून घेतो मस्त बारीक होते. अन मग बारीक वाटलेल्या पुरणाचे गोळे करायचे. आमच्याकडे पुरण भरपूर भरतात त्यामुळे अर्धा किलो डाळीच्या फक्त ११ पुपो होतात.
पुरणाचे गोळे झाल्यावर भिजत घातलेल्या पिठाकडे वळूयात.
पिठाचा गोळा जास्तीचे पाणी काढून परातीत घेऊन नीट मळून घ्यायचा. मळताना हाताला तूप किंवा तेल लावायचे कारण हे पीठ चिकट असते अन मळायला त्रासदायक देखिल ☺️
पुरणाचे गोळे झाले, पीठ मळून झाले की तवा गरम करा. ही पोळी शेकायला खूप नाजूक असते सो आच खूप जास्त ठेवायची नाही अन खूप कमी पण नाही.
पिठाचा बारीक गोळा करायचा अगद लहान पुरीला लागतो तेवढा. तो मैद्यात लोळवून त्याची छोटी पारी करायची, त्यात पुरणाचा गोळा भरून पारीचे तोंड बंद करायचे. अन परत थोडासा मैदा लावून हलक्या हाताने पोळी लाटून भरपूर तूप लावून शेकायची.
गरमागरम पुपो तयार. तुम्हाला हवी तशी खा, दुध, आमरस, गुळवणी सोबत वा नुसती.
आम्ही पुपो गुळवणीत कालवून खातो, सोबत तोंडलावणी ला बटाट्याची भाजी ,पापड अन कटाच्या आमटीचे भुरके☺️
अन हा पूर्ण भरलेल्या ताटाचा फोटो
१-सुंठ, वेलची ची पावडर करताना त्यात थोडी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची.
२-रवा मैद्याची पारी लाटायला अन शेकायला खूप कठीण असते, सो दोन्ही खूप हलक्या हाताने करायचे नाहीतर पोळी फुटते.
३-पुरण वाटताना खूप जास्त कोरडे झाले तर कटासाठी काढलेले थोडेसे पाणी घाला
मी_वैदेही☺️
मी_वैदेही☺️
होळीला केल्या होत्या पण फोटो काढले नाही. आताही सध्याची परिस्थिती पाहता पोळ्या करणार नव्हतोच आम्ही, पण वर्षाचा पहिला सण असल्याने फक्त नैवेद्यासाठी ५ पोळ्या केल्या. एरव्ही पाडव्याच्या नैवेद्याचे ताट भरलेले असते, पण यावेळी सगळे अगदी थोड्या प्रमाणात केले. तसेही नुसते घरात बसून रहायचे असल्याने आम्ही सगळे भरपूर किंवा पचायला जड असे अन्न टाळतोच आहे.
Pages