दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे हा धागा. फॉलो करणार आहे. तुमची रोजनिशीची कल्पना आवडली आहे. ती पण सुरू करायचा विचार आहे.
सध्या इथे थंडी सुरू झाली असल्याने dark-eyed junco दिसायला लागले आहेत.

छान धागा. फोटोही मस्त. रमड, तू इ-बर्डवर पण लिस्ट बनवून सबमिट करू शकतेस. त्याचा वेगळा फायदा असेल. भारतात अशी ॲप वगैरे असल्यास कल्पना नाही.

ई-बर्ड सही आहे. थँक्यू वेका आणि आडो. माझे पक्ष्यांचे फोटो जरा जरा बंडल येतात कधीकधी Proud पण प्रयत्न करते. माझ्याकडे एक जंकोचा आणि एक हमिंगबर्डचा व्हिडिओ आहे. त्याची लिंक देते इथे लवकरच.

पक्षी निरीक्षण डायरीची कल्पना आवडली.
सगळे फोटो मस्त आहेत.
धागा वाचत राहणार.

सुचवणी -
इतर कोणाला 'नियमीत' निरीक्षणाची सवय असेल तर त्यांनी आपापली नवीन डायरी बनवावी असे वाटते. तुम्हाला स्वतः ला ट्रॅक ठेवायला सोपं पडेल.
अधेमधे कधीतरी दिसला पक्षी, काढला फोटो, शेअर केला असे असेल तर हा/ निसर्गाच्या गप्पा धागा वापरला तर चालेल, वेगळा धागा काढायची गरज नाही.

अजूनेक सुचवणी -
मूळ लेखामध्ये फोटो देऊ नका, फक्त प्रतिसादात द्या. म्हणजे धागा हेवी होणार नाही.

सगळ्यांचे धन्यवाद!

वर्षा तुमचे फुलपाखरांचे व पक्ष्यांचे फोटो सुंदर असतात.

वावे तुमचे पाणपक्षी माहितीसह येथे दिले तर आवडेल.

rmd हा धागा फोटोग्राफीचा नाहीए, पक्षीनिरीक्षण या साठी आहे. त्यामुळे फोटो कसेही आले तरी येथे टाका. कधी, कुठे, कसा हेही लिहिले तर उत्तम. कारण धाग्याचा उद्देशच तो आहे.

ॲमी या लेखातले फोटो कमी करु म्हणताय का? हा अधेमधे दिसलेला पक्षीही महितीसह येथे द्यायला हरकत नाही. तेवढीच माझ्या नोंदीमधे भर पडेल. अर्थात हा धागा मी डायरीसारखा वापरतोय त्यामुळे एका पक्षाचे जर जास्त फोटो काढले तर मी ते निसर्गाच्या गप्पा या धाग्यावर टाकतो.

काल पुन्हा निलपंख (Indian Roller) दिसला. मला वाटले होते याचे दर्शन दुर्मीळ असेल पण काल घरी येताना १५ किमी मधे किमान १० निलपंख दिसले. सर्व विजेच्या तारांवर बसलेले होते. उडाले तरी दुरवरच्या तारेवरच जाऊन बसत होते. कारण समजले नाही.
याचा आकार साधारण ३५ सेंटीमिटर आहे. मला वाटला त्यापेक्षा निलपंख प्रत्यक्षात मोठा आहे. याचा विणिचा हंगाम फेब्रूवारी ते मे दरम्यान असतो.
हा कर्नाटक राज्याचा राज्यपक्षी आहे. हरियाल किंवा हिरवा होला (yellow-footed green pigeon) हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हे माहित आहे का?

Indian Roller (Coracias benghalensis)
21 Nov (2:30 pm)
निलपंख

एकाच पक्षाचे फोटो येथे पुन्हा पुन्हा द्यायचे नाही असे ठरवले होते पण परवा दिलेल्या शेकाट्याच्या फोटोत त्याचे वैशिष्ट असलेले लांब पाय दिसत नव्हते. तसेच त्यात पिल्लाचा (juvenile) फोटो नव्हता. त्यामुळे पुन्हा त्याचे फोटो देतो आहे.
शेकाट्या आपल्या पिल्लांची बरीच काळजी घेताना दिसतो. तसेच पिल्ले कुठेही भटकतात व आई बाबांना त्रास देतात. सर्वच पाणपक्षी आनंदाने एकत्र वावरताना दिसतात. मात्र पाणकावळ्याला मी कधी इतर पक्ष्यांमधे बसलेले पाहिले नाहीए.

Black-winged Stilt (शेकाट्या)
Koregaon Bhima
21 Nov 2019 (2:30 pm)

.

यांचे पाय प्रमाणापेक्षा खुपच मोठे व गुलाबी असतात. ते मागच्या बाजूने मुडपतात.

पुढे पिल्लू आणि मागून त्याच्यावर लक्ष ठेवणारे आई-बाबा.

.

या बगळ्याबरोबर शेकाट्या एकत्र फिरत होता. बगळा त्यांच्यातलाच एक वाटत होता.

तिरचिमणी हा shrub area मधे वावरणारा पक्षी आहे. काल मला याच्यासोबत indian robin दिसला.

Long-billed Pipit (Anthus similis)
Pune
21 Nov (2:30 pm)

स्वप्ना_राज, एवढे वेगळे पक्षी मुंबईत दिसणार नाहीत हा तुझा गैरसमज आहे. >>> गैर नाही बरोबर समज आहे. Wink हा बाफ सुरू झाल्यापासून मी जाणीवपूर्वक पक्षी बघायचा प्रयत्न करतो पण दिसतात फक्त कबुतरे, कावळे, चिमण्या आणि साळुंक्या. नाही म्हणायला कधी कधी बुलबुल आणि शिंजीर (घरी जास्वंद फुलली की हमखास येतो) दिसतात. आणि हे पण माझ्या घराच्या आसपास एक भले थोरले रेन ट्री, १०-१२ आसूपालव आणि इतरही काही मोठी झाडे असतानाही.

या आठवड्यात पुण्याला गेलो होतो - शालींच्या फोटोत असते तसेच पुणे आउट्स्कर्ट्स. रहायच्या जागेसमोर एक बुचाचे झाड होते त्यावर १० मिनीटात वेडे राघू, काही काळे चकचकीत पक्षी, शिंजीर, वटवट्या इतके पक्षी दिसले.

म्हणजे जागेचा खूप फरक पडतो.

माधव,
परिसराचा, वातावरणाचा आणि तेथिल वनराजीचा नक्कीच फरक पडतो. काही पक्षी मानवी वस्तीला सरावले असले तरी त्यांचे अन्न उपलब्ध जागा जवळ असतील तरच ते मानवी वस्तीत वावरतात. तसेच काही पक्षी अजुनही वस्तीपासुन दुर रहाणे पसंत करतात.
मी या धाग्यावरचे आणि माबोवर इतरत्र टाकलेले फोटो पाहिले तर लक्षात येईल की हे सर्व पक्षी लहान टेकड्या आणि खुरटी झुडपे (shrub area) असलेल्या भागात आढळणारे पक्षी आहेत. कारण आमचा भाग गवताळ प्रदेशासारखा आहे. तसेच पावसाळ्यात दिसलेले पक्षी आता कमी झालेत व परिट, घार, गरुड यासारखे पक्षी आता दिसायला लागले आहेत. शेकाट्या किंवा बगळा सोडला तर माझ्या या धाग्यात पाणथळीचे पक्षी फार नाहीत याला कारणही तेच. आहे.
पक्षी निरीक्षण सुरु ठेवा. हिवाळा सुरु झाल्यामुळे आता वेगवेगळे पक्षी दिसायला सुरवात होईल.

मी पक्षीनिरीक्षण करायला सुरवात केली तेंव्हा नेमकी पावसाळा सुरु झाला होता. आणि तो नेमकी यावेळी लांबला. त्यामुळे खाली दिलेली ठिकाणे जरी मी पाहिली असली तरी पक्षी काही फारसे मिळाले नाहीत. यातले पाणजे काही मी अजून पाहिले नाही. आता जागूताई पाणजे गटग कधी ठरवते ते पहायचे.

पाषाण लेक
वेताळ टेकडी
कवडी पट (हडपसर)
डॉ. सलिम अली बायोडाव्हर्सिटी पार्क (येरवडा)
सासवड परिसर
भिगवन पक्षी अभयारण्य
नांदूर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्य
पाणजे

माधव, वर शाली म्हणाले तसं परिसराचा खूप फरक पडतो. पार्ल्यात आमच्या आजूबाजूला आंबा, जांभूळ, नारळ, सोनमोहोर, अशोक, कडुलिंब अशी झाडे आहेत. सनबर्ड्स, बार्बेट, टेलरबर्ड, कोकिळ, पोपट, रॉबिन ही रोज दिसणारी मंडळी. एकदा धनेश दिसला होता. वेडा राघूही दिसला होता. इंडियन पॅराडाईस फ्लायकॅचरची मादी ४-५ वेळेस दिसली होती.

माझी एक मैत्रिण माझ्या घरापासून ५ मिनीटांवर राहते. तिच्या बिल्डिंगपाशी पिंपळाचं झाड आहे. इतके पक्षी दिसतात तिला. लोकांनी तोंडात बोट घातलीयेत तिची लिस्ट वाचून.

ऋतुराज हा Adult Black Drongo आहे. फोटो द्यायला विसरलो.
हा अतिशय धाडशी आणि भांडखोर पक्षी आहे. वेळ आली तर गरुडालाही भिडतो. याच्या या स्वभावामुळे अनेक लहान पक्षी याच्या घरट्याजवळ आपले घरटे बांधतात. त्यामुळे त्यांना शिकारी पक्ष्यांपासून आपसुक संरक्षण मिळते. कारण कोतवाल कोणत्याही पक्षाला घरट्याकडे फिरकू देत नाही. याला मी वटवट्याच्या मागे लागलेले पाहिले आहे.

काळा गोविंद
Black Drongo (Dicrurus macrocercus)
Pune outskirts
21 Nov (2:30 pm)

आऊटडोअर्स तुम्ही जी झाडांची नावे दिलीत तेथे हे सर्व पक्षी आवर्जून दिसतात. गोल्डन ओरीअल (हळद्या), कोकीळ, सुभग हेही पक्षी आंबा जांभूळ असेल तर दिसतात.
पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वर्गीय नर्तक, बाणपाखरू) मी अजून पाहिला नाहीए. Sad सिंहगड व्हॅलीमधे हमखास दिसतो.

हो, गोल्डन ओरिओल पण दिसतो. मी लिहायला विसरले. घरापासून ५-७ मिनीटांवर एका ठिकाणी पॅराडाईस फ्लायकॅचरचा नरही दिसलाय हल्लीच दोन वेळा.

हो, सिंहगड व्हॅलीत बागडताना बघितलाय मी.

Dark eyed Junco चा हा व्हिडिओ - https://youtu.be/IAZpY5jjTDc
हे पक्षी दर फॉल मध्ये दिसायला लागतात ते पार थंडी जाईपर्यंत. यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून दिसायला लागले आहेत.

स्थळ : Tulsa, Oklahoma
तारीख : 14 नोव्हेंबर 2019
वेळ : सकाळी 10:48

तुतवार किंवा तुतारी.
ही शक्यतो पाणथळ जागा सोडून बसत नाही. पण ही तुतारी देवराईतील विहिरीवर बराच वेळ बसली होती. सोबत पिवळा परीट (Yellow Wagtail) व गप्पीदास (Pied Bushchat) बसले होते. टिटव्यांचा (Red-wattled Lapwing) घोळका होता. पंधरा दिवसांपासून परीट, शिक्रा व तुतवार यांचा वावर वाढला आहे. परीट तर पिवळा, पांढरा, करडा व थोरला असे सर्वच दिसायला लागले आहेत.

(देवराई)

शिक्रा
Shikra (Accipiter badius)
Pune outskirts
23 Nov (7:00 am)

(देवराई)

Red-wattled lapwing (Vanellus indicus)
Pune outskirts
23 Nov (7:00 am)

(देवराई)

> ॲमी या लेखातले फोटो कमी करु म्हणताय का? >

मूळ धाग्यात अनेक फोटो टाकले तर प्रत्येक पान लोड होताना ते सेम फोटो परतपरत दिसणार. डुगुडुगु चालणारं 2g नेटवर्कवालं कोणी असेल (उदा मी Lol ) तर त्याला काही पानावरचे शेवटच्या प्रतिसादांमधे आलेले फोटो दिसणार नाहीत. या धाग्यात ऑलरेडी फोटो टाकले आहेत, आता ते कमी करा म्हणणार नाही. पण वावेसाख्या कोणी जर नवीन पक्षीनिरीक्षण डायरी धागा काढला तर त्यांनी मूळ धाग्यात एखाददोन फोटो द्यावे. बाकी प्रतिसादात द्यावेत. असं सुचवलं.

आज संध्याकाळी सोसायटीत फिरताना निळाभोर ड्रोंगो पाहिला. हा शिकारी पक्षी आहे एवढेच माहित होते पण हा मिश्र आहारी आहे माहित नव्हते. कदाचित नसेलही. कारण मिश्र आहारी असेल तर तो फुले, फळे खाईल. पण मी त्याला वाळलेली फुले खाताना पाहिले. वाळलेले गवत, फुले हे फारतर सस्तन प्राणी खाऊ शकतील. पक्ष्यांना त्यातून काय पोषण मिळणार आहे? याचे उत्तर सापडले की येथे देईनच.
याला काळा गोविंद म्हणत असले तरी हा बऱ्यापैकी निळा असतो.
Black Drongo
23 Nov (5:30 pm)

निळसर झाक जवळून दिसते पण दुरून हा काळा दिसतो.

देवराई

जांभळा शिंजिर जेंव्हा जेंव्हा दिसतो तेंव्हा त्याचा फोटो काढायचा मोह आवरत नाही. हा शिंजिर आता plumage मधून बाहेर येऊन पुर्ण जांभळा झाला आहे. तसेच तो पुर्वीपेक्षा जास्त चमकदार व चपळही झाला आहे.
Purple Sunbird
Pune outskirts
23 Nov (5:30 pm)

आज टिटव्यांचे जरा बारकाईने निरिक्षण केले तेंव्हा लक्षात आले की त्यांचे पंख हिरवट किरमिजी झाले आहेत. तसेच त्यांची संख्या अचानक खुप वाढली आहे. त्यांचे चेहरे व्यवस्थित पाहिले तेंव्हा समजले की ती सर्व पिल्ले आहेत. त्यांच्या वाढलेल्या लोकसंख्येचे कारण समजले. Wink

हे पिल्लू नुकतेच राखी रंग टाकून टिटवीसारखे दिसायला लागले आहे. नाकावर लाल पट्टी यायला लागली आहे.

हे त्याच्यापेक्षा जरा मोठे झाले आहे. काही दिवसांनी याचा लाल पट्टा गडद होईल.

इ बर्ड सगळीकडे वापरलं जातं ही नवी माहिती कळली. धन्यवाद.
तुमची लिस्ट तिथे टाकलीत तर इतर डेटा अनॅलिसीससाठी फायदा होईल म्हणून तो उल्लेख केला होता. इथेही अपडेट द्या
आता बाजारात जाऊन हमिंगबर्ड फीड आणलं पाहिजे याची आठवण झाली.

Pages