माऊली - मैलाची वीट

Submitted by किरणुद्दीन on 17 February, 2019 - 09:45

माऊली चित्रपट पाहिला. त्यात एक रहस्य आहे. दोन रितेश देशमुख असतात. एक बुळ्या असतो आणि एक रजनीकांत.
दोघांचं नाव आईने माऊली ठेवलेलं असतं. त्या आईचा नेमका प्रॉब्लेम काय हे मराठी सिनेमाच्या बजेटमधे समजत नाही. पण एकच नाव ठेऊन ती गळ घालती की ,
"बाबांनो , एक दिवस तू साळंत जायचं अन एक दिवस यानं. माझ्यासाठी तुम्ही दोघं असाल पर जगासाठी एकच बनून रहायचं. आपल्याला साळा परवडणार न्हाई दोघाची "
आता झेडपीची, रयतची, म्युनिसिपालिटीची शाळा फुकटच असतीय की. पर ती बी न्हाई परवडत म्हनल्यावर दिग्दर्शकाला केव्हढी भयानक गरीबी दाखवायची होती याची कल्पना येते. इथेच आपण दिग्दर्शक अजय सरपोतदार जे की म्युझिक कॉपिटिशन मधे येऊन लहान मुलांशी प्रेमळ बोलायचा प्रयत्न करताना सपशेल उताणे पडत असतात ते, यांना मनातल्या मनात वंदन करत असतो. एक गजानन की विश्वास सरपोतदार नावाचे निर्माते होते त्यांनी सपट महाचर्चेत बाणेदारपणे विचारले होते की " प्रेक्षक येणार नसतील तर आम्ही सिनेमे का बनवाय़चे ? पैसे वर आलेत का ?"

हा असा बाणेदारपणा केवळ मराठी निर्मात्यातच बघायला मिळतो. सिनेमा बनवायच्या आधीच प्रेक्षकाला बांधून घ्यायचं की "ब्वॉ, तू तिकीट काढून येणार असशीला तरच म्या शिणमा बनिवतु. न्हाईतर म्या हितं गुटखा खात बस्तुय बग "

प्रेक्षक पण त्या मोहेंजोदरोला जात नाही म्हणतोय. चांगला सिनेमा काढणार असाल तरच येतो असं हिंदी आणि इंग्रजी वाल्यांना खणखणीत सुनावतंय. पण मराठी निर्मात्यापुढं शेपूट घालतंय.

तर या करारान्वये मराठी सिनेमा बनत असताना सत्तरच्या दशकातला हिंदी मालमसाला घेऊन आमचे मित्र जे की राजाभाऊ आहेत त्यांचा चुलत मावस पुतण्य़ा जो कि रितेश देशमुख या नावाने फेमस आहे आणि ज्याच्या वडिलांना राज्य मुख्यमंत्री म्हणून ओळखते त्याच्याकडे पैसे असून शिवाय हिंदीत कामे करत असल्याने आणि हिंदीतून मराठीत आलेला असल्याने मराठी प्रेक्षकांना ठाऊक नसलेली ष्टोरी मराठी सिनेमात आणत असतोय. जसा सचिन हिंदीतून मराठीत आला, महेश कोठारे आला आणि त्यांनी जे काही दाखवलं ते प्रेक्षकांनी भक्तीभावाने बघितलं तसंच.

तर ही आई अचानक अस्वस्थ होते आणि मारधाड वाला रजनीकांत माउली असतोय त्याला सांगते की बाबा आपला विनोद मेहरावाला माऊली काही करणार नाही मोठेपणी. तर हाणामारी करायला तू जात जा. रजनीकांत विनोद मेहराचा हात हातात घेऊन वचन देतो आणि आई टपकते. गिरीजा ओक नावाची नटी आईच्या रोल मधे आणून रीतेश भाऊंनी मराठीतल्या इन मिन नट्यांमधली एक कमी केली. आता ती पण खात्या पित्या घरची असल्याने आई तर आई म्हणून उभी राहिली सिनेमात. पण त्यामुळे भयानक गरीबीतली धष्टपुष्ट आई या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला बहाल केली. अमिताभची आई जशी सुजेल निरुपाय होती तसंच आता मराठी रागीट तरूण माणसाची आई धष्टपुष्ट असणार आहे.

मग काय मोठे पणी विनोद मेहरा पोलीस इन्स्पेक्टर होतो आणि रजनीकांत बापाचा पोलिसाचा बेल्ट कमरेला लावून वर जाळीचं बनियन आणि फुलाफुलांचा शर्ट घालून टपोरी होतो. तो निघाला की वादळ सुटतं, पाय आपटला की धरणीकंप. दोघातला फरक म्हणजे एकाच्या मिशा अक्क्डबाज तर विनोद मेहराच्या रणजीत सारख्या खाली वळालेल्या.

तर अशा पद्धतीने रजनीकांत मार खाऊन आलेल्या इन्स्पेक्टर भावाचा बदला घ्यायला घटनास्थळी जाऊन गुंडांना धू धू धुवत असतो. आणि ते पण हातात वीट घेऊन. या वीटेचा संबंध डायरेक्ट विठ्ठलाशी. रजनीकांत तर फक्त सुपरह्युमन आहे. पण आपला हिरो थेटच दैवी अंश आहे. त्यामुळे विनोद मेहराची इमेज एकदम डॅशिंग होऊन त्याला पोरगी पण पटत असतेय.

आता इथून पुढं आम्हाला पडद्यावर विनोद मेहराच्या जागेवर आपले शेठ दिसू लागले आणि रजनीकांतच्या जागी स्पॉटनाना. स्पॉटनाना ही शेठची सावलीच की. जे जे शेठला नडले त्यांना स्पॉटनानांनी धू धू धुतले.

मग मरेन बंड्या म्हणू नका, कोहराउद्दीन म्हणू नका, त्याची बायकु म्हणू नका, संत आसुमल चे शत्रू म्हणू नका कुणा कुणा दुष्टाला त्याने सोडले नाही. आणि हाथ की सफाई इतकी की नाव घ्यायची पण चोरी.

आमचे देशमुख साहेब जरा कमीच पडले. आणि ही तुलना दिसू लागली आणि मग सिनेमा काय पटंना. सिनेमात कसं भव्य , वास्तवापेक्षा पुढचं दाखवाय लागतंय. पण हितं शेट आणि नानाची जोडी लैच सरस दिसू लागली. असंल म्हणा. सरपोतदार पडले मराठी आणि शेट आणि नाना गुजराती. गुजराती माणूस जात्याच कल्पक. मराठी माणूस धंद्यात लैच दळभद्री. हितं पण सरपोतदार गुजराती माणसाच्या हातून मात खाऊन गेले.

म्हणूनच सिनेमा संपता संपता मराठी माणूस मागे का, मराठी सिनेमा मागे का याचे उत्तर मिळाल्यासारखे झाले.
हेच यश आहे माऊलीचे. मराठीतला मैलाची वीट आहे हा सिनेमा.

सर्व जटील प्रश्नांची उत्तरे देणारा !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users