ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

' कारण मिळेल ' असं एका मटणाच्या दुकानावर वाचलं होतं.
' कारण ' म्हणजे बोकडाचे की मेंढ्याचे ( बोलाई) मटण ?

वळवट- शेवया
मुकं- मकेच्या पिठाचा उपमा
काटवट- भाकरीसाठीची लाकडी परात
व्हटकण- कालवण व चपाती वेगवेगळ्या बाजूला रहावे म्हणून ताटाच्या चपातीकडच्या भागाखाली ठेवलेला आधार
पत्ती- चहापुड
वशाट- मांस

वरकड जमीन - कसदार नसलेली जमीन
भांगलणे - कोळपणे
बी टोपणे - बीज लावणे

हा धागा माझा निवडक १० त , ग्रामीण साहित्य लिहिताना/वाचताना उपयोगी....

इथे अनेक शब्द वाचले जे पुर्वी शहरात सुध्दा सर्रास वापरात होते. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात म्हणून अनेक नविन शब्द सुध्दा वाचायला मिळाले.
भुतारी - झाडू.
हातीधरन - चुलीवरील गरम भांडे उतरवण्यासाठी वापरतात तो कपडा.
ढव - (डोह) नदीतील खोलगट जागा.

हे आणखी काही मालवणी शब्द
सामारा/ निस्त्याक- आमटी
सोजी - रव्याची दाट खीर
तोर- कच्ची कैरी
भिरंड- कोकमाचे फळ/ झाड
नाल- नारळ
कुवलो- कच्चा फणस( गरे तयार न झालेला)
तवसे- काकडी
घो - नवरा
बायल- बायको
हडगी- टोपली
कोंबो- कोंबडा

आमो,आंबो= आंबा
सोलं= कोकम
नेवर्‍या= करंज्या
वेळणी=चाळणी

' कारण मिळेल ' असं एका मटणाच्या दुकानावर वाचलं होतं.
<<
माझ्या अंदाजाप्रमाणे, "कारणाचे मटण" असेल ते. अन शिजलेल्या मटणाच्या दुकानावर उर्फ हॉटेलवर असेल.

(तिखटाचा) गोंधळ, किंवा काही कारणाने उदा. लग्न, शेंडी, इ. साठीचे जेवण घातले जाते, त्यात बोकड बळी देऊन संपूर्ण शिजवून भाजी केली जाते. अर्थात, सर्व कट्स एकत्र असतात, इन्क्लुडिंग लिव्हर(कलेजी), ओफ्फाल(वजडी), भेजा, स्वीट्ब्रेड (थायमस अन पॅन्क्रिआज), पाया उर्फ खूर, हे अन ते. याची चव नॉर्मली घरी शिजवलेल्या भाजीला येत नाही. (जशी लग्नातली कांद्याबटाट्याची भाजी / उसळ त्या चवीची घरी करता येत नाही, तसेच.)

कंपलसरी नसते पण आपल्या शेतात फक्त मदत करण्याच्या भावनेने आलेल्या व्यक्तींना न जेवता कुणी जाऊ देत नाही. आपापल्या ऐपतीप्रमाणे जेऊ घालतातच.

चांगलाय धागा Happy कोल्हापूर भागातील काही शब्द (आधी प्रतिसादांत आले असतील तर माहित नाही)

पेचकाटणे: मुरगळणे/पिळणे अशा अर्थाने
गणका: उसाची/पिकाची छोटी कांडी. पिक कापल्यानंतर जमिनीत राहणारा भाग (चालताना पायाला लागू शकतो).
येलबाडणे: गोंधळून जाणे
सरवाट: पावसाची थोडा वेळ येऊन गेलेली सर

ईरलं- कोकणात पावसात भातशेतीचं काम करतांना दोन्ही हात मोकळे ठेवून पावसापासून संरक्षणासाठी नारळ व इतर झाडांच्या पानांचं बनवलेलं साघन. ( यालाच 'खोप' ही म्हणतात ?).20190204_183259.jpg

भाऊ , घराबाहेर लाकडे तत्सम जळण किंवा इतर सटरफटर शेतसामान ठेवण्यासाठी नारळाच्या झावळ्यानी शाकारलेली झोपडीसदृश्य जागा तिला खोप म्हणतात.
पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टीकची जी डोक्यापासून पायापर्यंत येणारी पिशवीसारखी घेतात तिला खोळ म्हणतात.

वांगडा - सोबत
कोकणात हा शब्द वापरला जातो...माझी आई म्हणते सारखी..

* डोक्यापासून पायापर्यंत येणारी पिशवीसारखी घेतात तिला खोळ म्हणतात.* - धन्यवाद. 'खोप' व 'खोळ' मधे घोळ झाला माझा.

इरली हे इरलं शब्दाचं अनेकवचनी रूप आहे.
लहानपणी बाराखडीच्या सचित्र तक्त्यांत इ पुढे हमखास इरलं अन इडलिंबू असे दोन(च) शब्द असत.
इरलं हे नॉर्मली, अर्थात परंपरागतरित्या बांबू/काड्यांचा सुपासारखा ढाचा विणून त्यात मोठी पाने गुंफून बनवलेली डोक्यावरून पांघरायची वस्तू हे बरोबर आहे.
इकडे पोतं/कंतान्/गनी-सॅक इत्यादि अर्धी/उलटी घडी करून डोक्यावर पांघरतात, तेही इरल्याचेच काम करते.

भाऊंनी काढलेलं चित्रं पर्फेक्ट आहे. याचं ओरिजिनल डोक्युमेंटेशन करायलाच हवं. कारण गूगलला इरलं अद्याप ठाऊक नाही! :अरेबाप्रे!:

*कारण गूगलला इरलं अद्याप ठाऊक नाही! * - आतां इरलं बनवणं , वापरणं याऐवजीं प्लास्टीकचा सोपा पर्याय रूढ झालाय, त्यामुळे असावं.

भाऊ सगळे पर्याय ट्राय करून झाले. अग्दी थॅच्ड अम्ब्रेला वगैरे. पण नाही. ते सापडत नाही.

मी कल्हई डॉक्युमेंट केली, तसे नेक्स्ट पावसाळ्यात इरले डॉक्युमेंट करा तुम्ही. महत्वाचे आहे.

*कारण गूगलला इरलं अद्याप ठाऊक नाही! * - 'paddy field umbrela' असा सर्च दिल्यावर इरलं घेवून भातशेतात काम करणारया बाईचा नेमका फोटो व त्याखालीं हे कॅपशन मिळालं -
' woman working in rice paddy crop field wearing hand made jute umbrella rain coat maharashtra india ' !

*इरलं दिसतं घाटाखाली गेलं की. अजुनही दिसते. नाहीसे वगैरे नाही झालं.* - घाटाखाली जें दिसतंय त्यावरूनच सांगतोय , इरलं कमी कमी आणि प्लासटीक अधिकाधीक दिसतं .

Pages