ग्रामीण बोली भाषांतील शब्द.

Submitted by कोदंडपाणी on 30 January, 2019 - 06:04

शालींच्या मैत्रचे भाग वाचताना त्यातील पात्रांच्या तोंडात अनेक ग्रामीण शब्द वाचले. काही मजेशीर वाटले. प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही. तर असेच वेगवेगळ्या प्रांतातील ग्रामीण भाषेतील मजेदार, वेगळे शब्द वाचायला मजा येईल. सांगली, कोल्हापुर, नागपुर, नगर, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळे शब्द वापरले जातात ते येथे लिहिले तर सर्वांना ते वाचण्यातला आनंद मिळेल तसेच त्यांचे अर्थही कळतील. उदा. आमच्या जुन्नर भागात वापरले जाणारे काही शब्द:

यळोमाळ: येथे तेथे किंवा दिवसभर
कव्हर: किती वेळ
उलसक किंवा उलीशीक: अत्यंत थोडे.
फिंद्री: खोडकर मुलगी
पाठ: शेळी

तुमच्याकडेही असे काही शब्द असतील तर अर्थासहीत व जमल्यास वाक्यासहीत येथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/node/50944?page=5 दक्षिणाच्या या धाग्यावर टाकले होते.
इथे पुन्हा देते.

वडगण- ताटात आमटी पसरु नये म्हणुन ताटाच्या एका बाजुला खाली लावतात तो लाकडी चौकोनी तूकडा
बोघन- पातेल
झब- नरसाळ
गोण्ट- गोणपाट
अस्तुरी- बायको
आन्डेर- मुलगी
आन्डोर- मुलगा
धडला/ धल्ला- म्हातारा
धडली/ धल्ली- म्हातारी
झोर्या- सतरंजी
व्हउ- सून
फुई- आत्या
देवपळ्हः देवकपाशी
उखल्ला- उकीरडा
कान्जील- विहीर
कबाडी- भन्गारवाला
याही/ याहीण- व्याही/ विहीण
जवाई- जावई
आठे- इथे
इबाक- इकडे
तिबाक- तिकडे
आथाईन- इकडुन
तथाईन- तिकडुन
येरोनेरले- एकमेकांना
तठे- तिथे
बठ्ठाजण- सगळेजण
उना- आला
जोयजे- पाहिजे
जुवान- तरणाताठा
परनाले- लग्नाला जाणे
कव्हळमव्हळ- कधी मधी
माती ग्या का?- मातला का?
हाड्या- कावळा. पितृपक्षाला 'हाडपक्ष' म्हणुनच म्हणत असावेत
वडांग- कुम्पण
दांगडो- दंगा
घरोटा/ घट्या- जाते
चावळने- उगीच काहीतरी बोलणे. उदा. "काय चावळी राह्यनात रामभाऊ! आम्ही दखेल शे ना ते खेत! "
बाट्टोड- वात्रट
उप्पाद- कटकट
कुटाणा- त्रास/ कटकट
बोखल- कोनाडा
वाळन्यानी पंगत- नवरदेवकडच्या लोकान्नी लग्नानन्तर आपल्या गावाला देण्याच जेवण
महावस्त्र- नवरीचा शालु
तेलन चिडली- नवरीच्या बस्त्यातली एक प्र्कारची साडी.
पोटझाकण- नवरदेव/ नवरीचा बस्ता होतो तेव्हाच नवरदेव, नवरीच्या आईला, फुईला लग्नासाठी साड्या घेण्यात येतात. त्याचा खर्च हुन्ड्याच्या पैशातुनच होतो.
मान्डवाची साडी- ही पण नवरीची साडीच.
एकन्दरीत नवरीच्या बस्त्यात, हळदीची साडी, महावस्त्र, तेलन चिडली, मान्डवाची साडी या ४ साड्या येतातच.
बेळमाथनी- लग्न जवळ आल्यावर नवरदेवच्या/ नवरीच्या घरी 'कळस भरल्यासारख, एका कोपर्‍यात मातीचा माठ आणि त्यावर मातीचच छोट भान्ड अस पाण्याने भरुन त्याला हळद माखलेला दोरा बान्धतात. त्याची आधी पुजा करुन मगच हळद फोडणे वै. कार्यक्र्म होतात.
भानशी- चुलीच्या बाजुलाच त्याच आकाराची आतुन कनेक्टेड असते ती. चुलीतले एक लाकुड तिरपे करुन ठेवले की जाळ तिकडे पोचतो. फक्त शिजायला/ भाजी उकळायला ठेवायची असेल तर भानशीवर ठेवतात. (इकडे तिला 'चुल-उल' म्हणतात बहुतेक)
सतेल- गोल बुडाचे पातेले
सांडशी- किचनमधे वापरायची पकड
गडंगनेर- केळवण

इकडे तिला 'चुल-उल' म्हणतात बहुतेक>>> वैल म्हणतात..
वैलावर ठेवतात भाकर्‍या वैगेरे चुलीवर सुरु असताना सुरु असताना कालवणं दुध इत्यादी गरम करायला....

(ता.क. तुमचे बाकीचे बरेच शब्द वेगळे आहेत, त्यामुळे कृपया पर्सनली घेऊ नये; ह. घ्या.)
Submitted by शंतनू on 31 January, 2019 - 12:11
एखादा उच्चार बदललेला इंग्रजी शब्द देखील एखाद्या भागात दीर्घकाळ रुजला तर तो तिथल्या बोलीभाषेचा भाग होतो.
कोट हा इंग्रजी शब्द ग्रामीण नाही का?
आधार आणि काही मराठी शब्द Oxford Dictionary त आहेत तर ते Oxford चे झाले नाहीत का?
रेल्वे सिग्नलला - ग्रामस्थ देखील सिग्नलच म्हणतात ते मग असे का नाही म्हणत " अग्निरथ पथ मार्गदर्शक गमनागमन लोहपट्टीका"
हल्ली काही इंग्रजी शब्द ज्यांना इंग्रजीचे बिलकुल शिक्षण नाही असे लोक वापरतात उदाहरणार्थ माझ्या गावात किचन टेबललला स्वयंपाकाचे मेज म्हणत नाहीत किचन वटा म्हणतात.
मला वाटते हे शब्दांचे विविध भाषेतील आदानप्रदान त्या त्या भाषांना समृद्ध करते.
( ता.क. हे माझे वैयक्तिक मत आहे. कृपया हलके घ्या.)

बांडगा- तरुण
बांडगी-तरुणी
झाज-खूप जास्त
खड्या-वाघ
बा-वडील
डोसा-म्हातारा
डोशी- म्हातारी

@ जिददु , मी मालवणी चेडू.
@ शालीजी चेडू हा शब्द तुम्हाला भयंकर का वाटला कोण जाणे?. गोवन कोकणीत पण मुलीला चेडू आणि मुलाला चेडो म्हणतात.
बाकी साधनातै, भाऊ नमसकर आणि जाई तुमी पण आमच्या थयले काय वो??

अजागळ - बावळट
(अज - बोकड. बोकडाच्या किंवा शेळीच्या गळ्याला दोन गळ असतात, ते फार विचित्र दिसतात म्हणुन गबाळ्या व्यक्तिला अजागळ म्हणतात.)

किट्टू आमच्याकडे चेडा हा शब्द काळ्या जादूमधे वापरतात म्हणुन गमतीने म्हणालो तसे.>>> ओह! हा पण एक नवा शब्द कळला.

मला वाटते हे शब्दांचे विविध भाषेतील आदानप्रदान त्या त्या भाषांना समृद्ध करते >> हो बरोबर आहे. ज्या शब्दांना आपल्या भाषेत पर्यायी शब्द नाहीत, ते उसने घेणे ह्यात काही वावगे वाटत नाही. फक्त ते काही 'ग्रामीण बोली भाषांतील शब्द' नव्हेत, उसने शब्द आहेत. इंग्रजीत कर्मा, गुरू, योगा वगैरे शब्द वापरत असले, तरी त्यांना इंग्रजी बोली भाषेतील शब्द म्हणणे बरोबर नाही; ते उसनेच आहेत.

@ शंतनू
एखादा शब्द दंतकथे सारखा 50, शंभर वर्ष रुजला तर तो त्याच भाषेचा होईल.

किट्टू आमच्याकडे चेडा हा शब्द काळ्या जादूमधे वापरतात म्हणुन गमतीने म्हणालो तसे >>> मलाबी हेच वाटलं पण परत म्हणलं बोकलत गॅंग यायची कोकलत काही लिहल्यावर

मांडवपरतण्या - थोरल्या लेकीचं लग्न झाल्यावर नंतरच्या भावंडांच्या लग्नात जो मानपान तिला करतात त्याला हा शब्द आहे. यावरून मुलींना बराच सासुरवास होत असे/होतो.
चुंबळ - काही जड सामान वाहताना डोक्यावर कपड्याची चुंबळ करून ठेवतात/ हाताची ओंजळ
गरा - रव्याचा शिरा
सोजी - शेवया (मॅगी)
धुरला - बैल/जनावर / माणूस अंगावर चालून आल्यावर हा शब्द वापरतात
मोक्कार - उगाचच
एखाद्याला चांगला बडवून काढल्यावर म्हणतात "निबार चोपला त्याला "
तुऱ्हाट्या - तूर झोडून शेंगा बाजूला काढल्यावर उरलेल्या तुऱ्हाट्याचा झाडू बनवतात
ईर्जिक - पिके काढणीला जी पुरुषमंडळी जमतात त्यांना दारू/मटणाची पार्टी द्यावी लागते एखादी तिला ईर्जिक म्हणतात.
माडी - इमारत
माळे - मजले उदा. आमची शहरात चार माळ्याची माडी आहे

ब्लॉक - हा जुना शहरी शब्द आहे. मी जरा नवीन पिढीचा असल्याने लहानपणी जुनी लोक म्हणायचे "त्यानं पुण्यात/मुंबईत/दिल्लीत ब्लॉक घेतला /ब्लॉक काढले(बांधले) " तेव्हा वाटायचं हे काय आहे नक्की पण नंतर आपोआप उमजायला लागलं.

कोप - शेतातले पालापाचोळ्याचे खोपट
घोंगता - पाऊस लागू नये म्हणून गोणते किंवा घोंगडीची केलेली खोळ ,
कुची - लहान बाळाला बाळा ऊन लागू नये म्हणून घातलेली नक्षीदार कापडी खोळ.

१००+
अभिनन्दन पहिल्या वहिल्या शतकासाठी Happy

१००+
अभिनन्दन पहिल्या वहिल्या शतकासाठी

>>>> पदार्पणात शतक Happy

पडकई - यात मिळून एकमेकांची शेतातली कामे करून देतात

@कोदंडपाणी धाग्याच्या नावांमधला ग्रामिण चा ग्रामीण असं बदलता येते का ?

नगर

पूर्वी लोक कमी होते अन क्षेत्र बरच असायचे मग शेजारच्या गावातील पाहुण्याच्या घरातील लोक इकडं यायचे काढणीला आणि इकडचे तिकडं. आमच्याकडं आधी देशमुखी होती नंतरच्या काळात सर्वांची देशमुखी डब्यात गेल्यानं आमच्या-आमच्यात अशा सावडी असायच्या कारण एवढी क्षेत्रे घरातील सालगड्याना उरकत नसायची. बहुतेक यात जातीचा पण काही अँगल असावा कारण आधी बरेच चित्रविचित्र नियम पाहिलेत घरात गावी.

बोटंव- शेवया
द्वाड - आगाऊ, डांबरत
प्वार- पोर(मुलगा मुलगी)
यदुला- केव्हाचा, कधीचा
औंदा - यावर्षी, यंदा
पडवी- ओसरी
डालग- कोंबड्या ठेवतात ते खुराडा
व्हव का - हवं का
हावला(ळ)- ज्याप्रमाणे ज्वारी चा हुरडा असतो तसेच हरभऱ्याचा हावळअ
वाईच- थोडंसं
मंगशाक -नंतरहुन
लुगडं- नववारी साडी
चरवी - पाण्याच्या रांजणातुन पाणी काढण्यासाठी असलेली छोटी कळशी
गरवार- गरोदर
सूंबाड, हुबलक - बावळट
पडसं होणे - सर्दी होणे
जोंधळे - ज्वारी
मिरचा- ठेचा खरडा

गोडतेल - खायचे तेल
घासतेल्/घास्लेट - रॉकेल
गुत्त - एक सकट दिलेलं/ सुट न करता.
चिगोर - चिंचेचा मोहोर.
कडची - गरम भांडं उचलताना वापरतात ती पकड.
चिपटं - धान्य मोजण्याचे जुने माप. ४ चिपटे = १ शेर, ४ शेर - १ पाईली
गंघाळ - आंघोळीचे भाडे.
खुराक - डोस , आहार
जनावर - साप्/नाग
आबंड/आबन - वस्तूचे वजन करताना, आधी भांड्याचे केलेले वजन.
दाभण/दाबण - पोते शिवायला वापरली जाणारी मोठी सुई.
चोंबाळं - पोत्यांची उभी - आडवी रचलेली रास.
गिरमीट - शार्पनर

एखादा शब्द दंतकथे सारखा 50, शंभर वर्ष रुजला तर तो त्याच भाषेचा होईल. >> अच्छा! तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मराठीतही फारसी शब्द आहेत की, हा विचार नव्हता केला.

अरे किती विविध शब्द आहेत हे! कितीतरी नवीन शब्द समजले. काही वस्तू व चालीरिती आता नाहीशा झाल्याने शब्दही नाहीसे होत चालले आहेत.
छान प्रतिसाद दिलात! धन्यवाद!

Pages