टॉमेटो(खाणारी माणसे गुणिले 2)
कांदे(लहान 2)
कोथिंबीर आवडीनुसार
आले आवडीनुसार
लसूण आवडीनुसार
मीठ आवडीनुसार
तेल आवडीनुसार
शिजवायचे भांडे आवडीनुसार
कापायची सूरी आवडीनुसार
गॅस,स्वयंपाकघर,खिडक्या,पडदे,ताट, वाट्या,चमचे आवडीनुसार
अपॉकॅलिप्स आला तर उपाशी न मरता वाचता यावे म्हणून प्रत्येक घरात कांदा टोमॅटो बटाटा यांचा अखंड स्त्रोत हवाच हवा.कांदा डाळ,टॉमेटो बटाटा,कांदा बटाटा,बटाटा बटाटा, टॉमेटो कांदा बटाटा असे अनेक दिवस निघू शकतात.(अपॉकॅलिप्स मध्ये गॅस,घर वगैरे कसे शाबुत असेल वगैरे प्रश्न विचारू नका. अपॉकॅलिप्स आला की खात्री करून घ्या.)
टॉमेटो चे देठाकडचे झाकण उडवून ते सुरीने अलगद कोरून रिकामे करायचे.
रिकामे करताना निघालेला ऐवज मिक्सर च्या छोट्या भांड्यात गोळा करायचा.मग त्यात कोथिंबीर घालून मिक्सर घुर्र करायचे.
मग घुर्र झाल्यावर अर्धा ऐवज एका बाउल मध्ये काढुन घ्यायचा.मिक्सरमध्ये उरलेल्या अर्ध्या मध्ये 2 कांदे सोलून,आले असल्यास,लसूण असल्यास घालुन परत एक मोठे घुर्र करावे.
आता आधीच्या घुर्र केलेल्या मधून बाजूला काढलेला ऐवज भांड्यात काढून भांडे हातात घ्यावे.त्यात जितके टॉमेटो तितके चमचे दाण्याचा कूट घालावा,के एल एम किंवा तुमचे नेहमीचे तिखट मसाला घालावे,मीठ घालावे(साधारण 1 टीस्पून)आणि मिसळून घ्यावे.
आता मिक्सर मधले दुसरे घुर्र केलेले मिश्रण काढून भांडे हातात घ्यावे.भांड्यात तेल तापवून त्यात हळद हिंग घालून हे मिश्रण आणि के एल एम मीठ घालून हलवावे आणि झाकण ठेवावे.
आता हे शिजेपर्यंत डबे भरायला घ्यावे.दाण्याचा कूट वाला मसाला प्रत्येक डब्यात दाबून भरावा.पेशन्स असल्यास टॉमेटो ची झाकणे घुर्र मधून वाचवून ठेवून ती टूथ पीक ने वर चिकटवून डबे बंद करावे.
आता भांड्यातला ऐवज शिजला असेल.डबे त्यात सुलटे अलगद ठेवावे आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा ची पूजा करताना ज्या नाजूकपणे मुर्तीवर पळीने पाणी घालतो त्या नाजूकपणाने त्या प्रत्येक टॉमेटो च्या टाळक्यावर भांड्यातला मसाला पसरवावा.आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.या भाजीत शिजायला वरून पाणी घातल्यास पाप लागते.टोमॅटो च्या अंगच्या पाण्यातच ही शिजायला हवी.(वाफ आल्याने फोटो स्पष्ट आला नाही.)
आता गरम गरम खायला घ्यावी.आता तुम्ही विचाराल की इतके कमी टोमॅटो का.तर धागा लेखकांनी ही भाजी करता करता परवा लग्नात मिळालेली चिवड्याची पुडी फस्त केलीय त्यामुळे एक माणूस टोमॅटो मधून वजा.
ग्रेव्ही पातळ झाल्यास ग्रेव्ही शिजत आल्यावर थोडा दाणे कूट घालून ढवळावे.आधी घातल्यास भाजी करपेल.
लेखन आवडले. सुरवातीला
लेखन आवडले.
मस्त रेसिपी. छान लिहिलंय : )
मस्त रेसिपी.
छान लिहिलंय : )
मस्त पाकृ!! ते घुर्र प्रकरण
मस्त पाकृ!! ते घुर्र प्रकरण जाम आवडले.
Pages