गझल - खिजवत आहे शेतकऱ्याला
==========
खरीप गेले, रब्बी गेले, फक्त ढेकळे उरलेली
खिजवत आहे शेतकऱ्याला एक बिसलरी भरलेली
गुंठे मोजत असताना मी, एक अडाणी पुटपुटला
जनावरे तर विकली गेली ह्या माळावर चरलेली
म्हातारी हासून बोलली मुलगा परदेशात तिचा
वृद्धाश्रम बस पुसत राहिला इतर लोचने झरलेली
एक दिशा देणारा होता तोच उतरला त्राग्याने
ती गाडी मग घेत राहिली तिची स्थानके ठरलेली
पुतळ्यांची पूजा झाल्यावर नेत्यांची वा वा होते
शेतमजूरी टाळायाला शाळा असते भरलेली
कोणालाही कुणाचसाठी काही करायचे नसते
अश्या जगी मी सजीवतेची सतरंजी अंथरलेली
पोतराजचे वीर्य भिकेला लावत नसते पोरांना
तुमची माणुसकी असते ती, नसते जी अवतरलेली
पाहत बसतो एकांती मी वाट तशी दोघांचीही
काही वर्षे येणारी अन काही वर्षे सरलेली
त्यागा त्याला, 'बेफिकीर' तो एका कामाचा नाही
हेही विसरा होती काही युगे युगे मंतरलेली
-'बेफिकीर'!
वाह! निव्वळ अप्रतिम!!!
वाह! निव्वळ अप्रतिम!!!
प्रत्येक शेर भारी! मस्तच!