दर शुक्रवारी- मराठी चित्रपट

Submitted by सुजा on 2 July, 2016 - 03:58

नागराजचा सिनेमा रिलीज झाला आणि मायबोलीवरचे सगळे सैराट झालेत. नागराजच्या सिनेमाला एवढी प्रसिद्धी मिळाली /तो अगदी धो धो चालला त्यात नागराजच्या दिग्दर्शनाच जितकं कौशल्य आहे ते आणि तितकंच त्या सिनेमाची जी काही प्रसिद्धी झाली ( झी मराठी ने केलेली) त्याच बरोबर अजय- अतुलने जे काही सैराट संगीत दिलंय /जी काही सैराट गाणी दिलेली आहेत त्याचा पण जबरदस्त वाटा आहे. गाण्याचे बोल पण अजय -अतुल यांचेच आहेत आणि सिनेमॅटोग्राफर रेडडी यांना कसं विसरून चालेल ?

सैराटचा इतका बोलबाला झाल्यावर "यु ट्यूब" वर या चित्रपटासंबंधी ज्या काही क्लिप्स बघितल्या./ चित्रपटाचा जो काही ट्रेलर बघितला त्यावरून लक्षात येतंय की चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी पण तितकीच जब्राट झाली होती . त्याच बरोबर असं ही लक्षात येतंय नागराजच्या सिनेमाच्या वाट्याला जे काही कौतुक आलं त्यातलं १% कौतुक तर सोडाच पण जे काही मराठी सिनेमा दर शुक्रवारी रिलीज होतात त्यांची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही . मग प्रश्न असा पडतो इतके ते सिनेमे वाईट होते का ? किव्वा वाईट होते का चांगले होते हे समजण्यासाठी ते कधी रिलीज झाले तेही आपल्याला समजलं नाही का ?.

सध्याच्या काळात " चला हवा येऊ द्या " या कार्यक्रमामध्ये जरी मराठी सिनेमांना ( आणि आत्ता हिंदी सुद्धा ) प्रसिद्धी मिळत असली तरी सुद्धा काही काही सिनेमे असेही असतात जे चांगले असूनही व्यवस्थित प्रसिद्धी न झाल्याने कधी येतात ( रिलीज होतात ) आणि कधी जातात ते समजत देखील नाही . मराठी वाचक वर्ग /प्रेक्षक वर्ग या नात्याने आपण प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमासंबंधी या धाग्यावर बोलूयात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजच टीवी वर बघितलं मंगेश देसाई आणि विद्या बालनचा एक अलबेला नावाचा सिनेमा कुठे तरी बंद ठेवलाय. खूप वाईट दिवस आले आहेत मराठी चित्रपटांना!!> >> 'एक अलबेला' सिनेमा जर्मनीत हॅनोव्हरला गणेशोत्सवानिमित्त इथल्या इंडियन असोसिएशनतसर्फे दाखवण्यात आला.. त्याच्याविषयी माबोवर काही आहे का? हे शोधतांना ह्या धाग्याच्या पहिल्या पानावर , ह्या प्रतिसादावर येऊन पोहोचले. इतका सुंदर सिनेमा भारतात बंद केला गेला, हे वाचून खूप वाईट वाटलं.. तरीच मला इकडे दाखवेपर्यंत ह्या सिनेमाबद्दल काहीच माहिती नव्हती.. आला कधी आणि गेला कधी...

भगवान दादा ह्या मराठी माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर मुंबईत हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान टिकवून ठेवलं, त्यांच्या वाटेत अनेक अडथळे आले/आणले गेले, पण ते डगमगले नाहीत आणि शेवटी नशिबाने पण त्यांना कशी साथ दिली, ह्या आशयाचा हा चित्रपट आहे. मूळ अलबेला ह्या जुन्या हिंदी सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास ह्यातून दाखवत भगवान दादांचे उमदे व्यक्तिमत्त्व त्यातून उलगडत जाते..

अतिशय कमर्शियल पट, सुमधुर, प्रेक्षणीय गाणी, संगीत, मूळ अलबेला चित्रपटातली प्रसिद्ध गाण्यांचं पुनर्सादरीकरण, विशेषतः शोला जो भडके, खूपच मस्त जमलंय. (नशीब, हे संपूर्ण गाणं युट्यूब वर आहे, जे मी परत परत बघितलं. जुनं आणि नव्याची तुलना करायला जुनंही सापडलं, युट्यूबवर.. ) मंगेश देसाई, विद्या बालन यांचा सहजसुंदर अभिनय, जुना काळ दाखवतांना लक्षात घेतलेले बारकावे, जुनं चित्रपट तंत्रज्ञान दाखवतांना गाडी चालवतांना ती चालवत आहेत हे आभास निर्माण करण्यासाठी गाडी हलवणारे लोक दाखवणे, मंगेश देसाईंनी एक प्रसंगात करून दाखवलेला गंमतीशीर टंग ट्विस्ट, त्यात त्यांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा संदेश (जेव्हा मुस्लिम मित्र बहिणीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला येतो आणि भगवान दादांचे मित्र त्यादिवशी गणेशोत्सवाची मिरवणूक आहे, तेंव्हा नको सांगायला लावतात आणि ते लग्नच त्या दिवशी रद्द करायला लावून त्या निमंत्रक मित्राचा अपमान करतात त्यावर भगवान दादा सांगतात, हेच तर हवंय ब्रिटिशांना, फोडा आणि राज्य करा.. आपण त्यांचा हेतू कदापि साध्य होऊ देता काम नये. मी गणपतीत पण नाचेन आणि त्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्येही..)
असे एक ना अनेक छान मनोरंजक प्रसंग आहेत ह्या चित्रपटात.
इकडच्या ऑर्गनायझर्सचे अनेक आभार, हा चित्रपट आम्हाला दाखवल्याबद्दल..

भारतात, महाराष्ट्रात हा सिनेमा नाही चालला, मुख्य म्हणजे मराठी माणसाला नाही पहावासा वाटला, त्याची जाहिरात कमी पडली, हे सगळं खूप दुर्दैवी आहे. वाईट वाटलं हे वाचून खूपच...

बरेचसे मराठी चित्रपट मुद्दामून थिएटरला जाऊन पहावेत असे नसतात. टीव्हीवर आला तर आणि वेळ असेल तर पाहू अशा कॅटेगरीतले. हिंदीतही सेमच. चावट कॉमेडी तर गेली कित्येक वर्षे बघत नाही. असल्या फालतू हिंदी सिनेमांचे रिमेकही मराठीत बनलेत.
सैराट चालल्यानंतर झी ने भाऊ कदम आणि आनंद इंगळेंना घेऊन एक सिनेमा बनवला होता. कोल्हापूर पुणे असं काहीसं. तो थेटरात आठवडा भर तरी पूर्ण होता कि नाही कुणास ठाऊक. टीव्हीवर पाहताना झी वाल्यांचा इतका राग आलेला. कसला बावळट हिरो पकडून आणलेला. हिरो हिरविण एकमेकांच्या शरीरात प्रवेश काय करतात, मधेच जंगलात काय जातात,... कसलीही स्क्रीप्ट नाही. सुचेल तसे प्रसंग.

ज्याने कुणी थेटरात पाहिला असेल तो पुन्हा कधीही मराठी सिनेमांच्या वाटेला जाणार नाही. थेटरला गेले की हजार दोन हजार सहजच जातात. फुकट येतात का हे पैसे ? त्याबरोबर आमचे तीन तास देखील. महिन्यातून चार सिनेमे पाहणारे विरळाच असतील. महिन्यातून फार फार तर एक.
कुणी सहा महिन्यातून एकदा.

सिनेमे जर आठवड्याला सहा -सात रिलीज व्हायला लागले तर कर्ज काढून पहायचे का ? बरं तेच तेच चेहरे. टीव्हीवरही तेच आणि पडद्यावरही तेच, कथानक आणि वातावरण सुद्धा अनेकदा शहरी , ते ही उच्चभ्रू, किंवा मध्यमवर्गियाला आपलेसे वाटेल असेच असते. बालक पालक किंवा रवी जाधवच्या सिनेमात चाळ दिसली बुवा.

टीव्हीवर पर्यायच नसतो. जे दिसेल तेच पहायचे (किंवा फटकून रहायचे). तर थेटरात आपल्या चॉईसचे नकोत का पहायला ? कि तुम्ही तुम्हाला आवडेल तसेच काढणार आणि आम्हाला सक्ती आहे का ?
एकेकाळी ग्रामीण सिनेमांचे जसे झाले (अती तेथे माती) तसेच अतीशहरी सिनेमांचेही होत आहे कि काय असे वाटते.

सैराट ने समाजातल्या अशा गोष्टीला हात घातला कि ... पोपट मेला आहे !

ख्वाडा (Khwada) हा अजुन एक दुर्लिक्षित चित्रपट. २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. झी वर बघायला मिळाला.
असे वाचले होते की निर्माता कम दिग्दर्शक कम कलाकाराने खूप मेहनत आणी बरेच कर्जे , property विकुन चित्रपट काढला, परन्तु marketing बजेट नसल्याने उत्तम कथा, अभिनय बॉक्स ऑफीस ला कलेक्शन करु शकला नाही.

@किरणुद्दीन, मी पण पहिला झीचा भाऊ कदम आणि आनंद इंगळेंचा सिनेमा आणी वेळ वाया घालवला (जसे त्या दोघाना वाया घालवले ).

मराठी पिक्चर थोडी वेगळी कथा असली तर थिएटर ला जाऊन बघता येतात.पण टिपिकल शहरी मित्र मैत्रिणी गँग, यो पणा हे हिंदीत पण तिकीट काढून नाही बघत, मराठीत बघणे दूरची गोष्ट.
शिवाय ट्रेलर वरून पिक्चर बघायचा की नाही हा निर्णय घेतला जातो.पण गुलाबजाम चा ट्रेलर काय होता?पिक्चर थोडा वेगळा आहे असं कुठेतरी जाणवतं का?
सध्या सविता दामोदर परांजपे, चिचिसौका,गुलाबजाम हे पिक्चर थिएटर ला पाहिले आणि पैसे वसूल वाटले.
तुंबड ची सर्व पार्श्वभूमी मराठी आहे.त्यामुळे तो मराठी डब आला तर हिंदी ऐवजी मराठीच पाहणार.
खूप खिन्न, सामाजिक समस्याच मांडणारे पिक्चर बघण्याची हिंमत नाही राहिली.स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम बरेच आहेत.आपण ज्यावर काही करू शकत नाही, नुसतं डोकं सुन्न करून बाहेर येतो असे चित्रपट कोणत्याच भाषेत पहायची हिंमत नाही राहिली.(याला शहामृगनीती म्हणता येईल.)

<<<<<माहीत नाही किती जणांना ही गोष्ट लक्ष्यात आली आहे, पण झी टॉकीज तर्फे निर्मित केलेले चित्रपट आतापर्यंत तुफान चालले आहेत.
Submitted by किरु on 10 July, 2016 - 13:20>>>>>
अतिशय अचूक निरिक्षण ....
झी वाहिनी घराघरात अखंड पाहिली जाते. त्यावर सतत Promotion चा भडिमार असतो त्यांच्या निर्मितीच्या चित्रपटांचा. नकळत सर्व घरात या चित्रपटाचे नाव पसरते... आणि हाईप वाढत जाते.. त्यमुळे या चित्रपटाचे ढोल ताशे गाजत रहातात .. आपोआपच चित्रपट पाहण्याचे बेत घरा घरात होतात ... आणि चित्रपट हातोहात प्रसिद्धी पावतो.
या उलट इतर मराठी चित्रपट बनलेले , रिलीज झालेले बहुसंख्य प्रेक्षक वर्गाला कळतही नाहीत.
इतर मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी या प्रसिद्धी माध्यमाचा उपयोग करून घेतला तर ते चित्रपट चालण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढेल !

खूप खिन्न, सामाजिक समस्याच मांडणारे पिक्चर बघण्याची हिंमत नाही राहिली.स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम बरेच आहेत.आपण ज्यावर काही करू शकत नाही, नुसतं डोकं सुन्न करून बाहेर येतो असे चित्रपट कोणत्याच भाषेत पहायची हिंमत नाही राहिली.(याला शहामृगनीती म्हणता येईल.)>> अनुमोदन, अग्दीच पटलय हे.. मीही अशाच मताची आहे, मारामारी किवा समस्या वाले चित्रपट त्यामुळेच पाहत नाही.. पैसे देऊन डोक का दुखवुन घ्या अशी सरळ साधी विचारसरणी..

लहान्पणी 'चिमणी पाखर 'थेटरात पाहिला होता, का आणलत मला इथे अस आई बाबाना विचारवस वाटलेल, इतका रडका होता..

मराठीत समस्या प्रधान नाटके धुव्वाधार चालली. सिनेमात समस्याच असाव्या असे नाही. सैराट मधे समस्येचे अस्तित्त्व मान्य करून करमणूक प्रधान सिनेमा दिला होता. तो ही चाललाच की. जे आहे ते मान्य न करता किंवा वर्षानुवर्षे त्याबाबत आपल्या सिनेमात काहीच दिसत नसेल आणि विशिष्ट जीवनशैलीलाच प्रमोट केले जात असेल तर इतरांनाही उबग येणारच की..

तुंबाडचा दिग्दर्शक राही बर्वे फुलवा खामकरचा सख्खा भाऊ आहे. कोल्हापूर-पुणेवाला चित्रपट टीव्हीसाठीच बनवला होता. अतिशय फालतू आहे .ख्वाडा थोडा बघितला टीव्हीवर पण संवाद काहीच समजत नव्हते. शेवटी नाद सोडून दिला.

मराठी नसावा पण मराठी भाषेत पण येणार आहे असं ऐकलं होतं.
विषय: हॉरर
"विरासत मे मिली सभी चीजो पर दावा नही करना चाहीये"

सविता दामोदर आणि तुंबाड कसा आहे ? सविता दामोदर मध्ये तोरडमलांची मुलगी होती आणि राकेश बापट . जॉन इब्राहिम ची निर्मिती. काही काही वेळा नावावरूनच चित्रपट बघू नये असं वाटत . मागे तो पुष्कर क्षोत्रींचा कुठला तो मराठी चित्रपट आला होता तो . आठवत नाहीये त्याच नाव . खर तर असं होऊ नये पण नाव पण चित्रविचित्र असतात राव .
आधीच मराठी चित्रपटांना गर्दी नसते. माधुरी दीक्षितचा आलेला पिक्चर बरा होता पण खूप लोकांना आवडलाच नाही . त्यानंतर कुठलातरी आत्ताच ( महिन्याभरापूर्वी ) एक बघितला . सचिन खेडेकर आणि इरावती हर्षेचा . विषय चांगला होता पण प्रिंट कमी दर्जाची होती . पाठच्या लोकांना धूसर दिसत होत. आधीच प्रेक्षक नाहीत आणि अशा कमी पैशातल्या प्रिंट्स . पण पिक्चर छान होता Happy

काल झी मराठीवर " गुलाबजाम" सिनेमा बघितला. खूपच छान होता . पण त्यांचाच वजनदार सिनेमा इतका फालतू होता . आणि तोच नेमका थियेटर मध्ये बघितला . इतकं पस्तावायला झालं . प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर दोन्ही कलाकार आणि सोनाली कुलकर्णी ( जुनी ) पण त्यांचे आवडते कलाकार दिसताहेत

गुलाबजाम थिएटर मध्ये पहिला होता, आवडला होता . सविता दामोदर परांजपे ही पहिला, तो ही खूप आवडला. ३-४ दिवस मनात रेंगाळत राहिला . त्यातली गाणी खूप इम्पॅक्ट ठेवून गेली . I am still hooked up with "जादुगरी" song.

@ चिनुक्स काय झाल ? एवढं जोरजोरात हसायला येतंय . माझं काही बोलण्यात चुकल का ? . मी तो सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला . चित्रपट सुरु झाल्या झाल्या पहिल्या वीस मिनिटातच पाठच्या ( बऱ्यापैकी पाठच्या मागच्या ३ एक रांगेतल्या ) लोकांनी आरडा ओरडा करून चित्रपट बंद करायला लावला . त्यांच असं म्हणणं होत कि चित्रपट पूर्ण पणे धूसर दिसत होता. . कुठलच कॅरेक्टर पडद्यावर दिसतच नव्हतं . बोलण्यावरून अंदाज लावत होते इतकं धूसर . पहिले पंधरा ते वीस मिनिट साधारणपणे सगळ्यांनीच वाट बघितली "आता नीट दिसेल नंतर दिसेल " पण नाहीच शेवटी नाईलाजाने मॉबच्या मॉब आरडा ओरडा करत खाली उतरला आणि चालू चित्रपट बंद करायला लावला त्यातले काही जण हॉलच्या बाहेर जाऊन मॅनेजर कडे जाऊन तक्रार करून आले . आम्हाला चांगल्या प्रिंट्स चा सिनेमा दाखवा नाहीतरी पैसे परत द्या अशी त्यांची मागणी होती .

पाचेक मिनिटांनी चित्रपटगृहाच्या कुठल्यातरी जबाबदार व्यक्तीने हॉल मध्ये येऊन सगळ्यांची माफी मागितली आणि आम्ही काही सुधारणा होते कि नाही ते बघतो असं सांगितलं . त्याने हे पण सांगितलं कि आधीच्या हिंदी चित्रपटांमध्ये असा प्रॉब्लेम आम्हाला कधीच आला नाही याच वेळेला या चित्रपटाच्या वेळीच हा असा प्रॉब्लेम येतोय . जी प्रिंट आम्हाला मिळाली आहे ती दाखवतो आहे तरी काही सुधारणा करता येते का ते बघतो . चित्रपट १५ मिनिट थांबवला परत सुरु केला तरी तोच प्रॉब्लेम परत दहा मिनिट बंद केला परत सुरु केला तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम सुधारला नव्हताच पण थोडा फार फरक होता. काही प्रेक्षक पैसे घेऊन परत गेले काही जण तसेच दामटून बसून राहिले

मग सगळे जण म्हणायला लागले कि हिंदी चित्रपटाच्या वेळी कसा प्रॉब्लेम येत नाही ?. बरोबर मराठी सिनेमालाच कसा काय प्रॉब्लेम ? कमी पैशातल्या प्रिंट्स असणार बहुतेक. मराठी पिक्चरचा बजेट चा प्रॉब्लेम तसा सगळ्यांनाच माहिती असतो त्यामुळे त्यांचं बोलणं बऱ्यापैकी पटल्यामुळे तस लिहिलं पण मला माहिती नाही एका आयडीला इतकं खो खो हसायला का आल ?

चिनुकस आणि नीधप च्या बाबतीत मी एक निरीक्षण केलाय त्यांना माझ्या वक्तव्यावर काही तरी खवचट प्रतिक्रिया द्यायला खूप आवडत . मागे चिनुकस ने कुठल्यातरी धाग्यावर मी काशिनाथ घाणेकरांच्या पत्नीने ( कांचन घाणेकर ) लिहिलेल्या " नाथ हा माझा " पुस्तकाबद्दल काही तरी लिहिलं होत तेव्हा खवचटपणे विचारल होतच " ते पुस्तक खरंच तुम्हीं वाचलं आहे का ?" अरेच्या पुस्तक न वाचताच पुस्तकांच्या कन्टेन्ट बदल कशी काय कॉमेंट करेन ? नीधप ने तर याच धाग्यात एक प्रश्न विचारला आहे . हे असं का? याच प्रयोजन काय ? इत्यादी इत्यादी . त्या दोघांना माझ्या बद्दल काय प्रॉब्लेम आहे समजत नाही पण काहीतरी माझ्या कॉमेंट च्या बाबतीत खवचटपणे बोलायला त्यांना आवडत एवढं मात्र नक्की . राहू दे घेऊ दे त्यांना त्यांचा आनंद . दुसर्यांना खवचटपणे बोलण्यात त्यांना आनंद मिळतोय तर आम्ही पामर काय करणार ? घेऊ दे त्यांना आनंद आणि टाळ्या पण घेउदेत Happy

Pages