लॉटरी

Submitted by मोहना on 8 January, 2018 - 08:22

अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स! लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. दूरदर्शनवर या बातम्या पाहताना तिकिट न घेताही, लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. दरवेळेला आम्हा बहिणींपैकी कुणाला तरी ते तिकिट घ्यायला सांगायचे. दुकानात ते एक तिकिट निवडताना आयुष्यातला कोणतातरी महत्वाचा निर्णय घेतल्यासारखं आम्ही डोळे मिटून हे घेऊ का ते घेऊ या चिंतेत पडायचो. घरी आलो की विसरुनही जायचो ते पुन्हा तिकिट घेईपर्यंत. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट वर्षानुवर्ष घरी यायचं. ’मला लॉटरी लागली तर...’ हा एक निबंधाचा विषय शाळेतही हमखास असायचा. त्या वेळी खरंच लॉटरी लागली तर म्हणून केलेले बेत आठवले. मग वाटलं डॉलर्समध्ये लॉटरी लागली तर आनंद गगनात मावेनासा होईल. आणावंच एखादं तिकिट. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नेअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी भरभक्कम रक्कम आहे लॉटरीची. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची. अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. सर्व ठिकाणची तिकिटं एकाच व्यक्तीने घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात या कंपन्या एकत्रितपणे २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेऊ शकली. अशा अनेक क्लुप्त्या लढवल्या लॉटरीकरता लढवल्या. अशीच एक घटना २००५ सालची. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि जवळजवळ २० मिलियन डॉलर्स या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

लॉटरी लागण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण ते उपभोगता येणं वाटतं तितकं सोपं नाही. खर्‍याअर्थी फार कमी लोकांनी हे सुख उपभोगलं. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रुग्णांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्या असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रिणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईस आणि किथने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी कोरीकरीत गाडी आली. किथने बेकरीतली नोकरी सोडली पण हळूहळू निरुद्योगीपण त्याच्या अंगावर यायला लागलं. मन रमविण्यासाठी किथ दारुकडे वळला. लवकरच व्यसनाधीन झाला. काही काळाने दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेरही पडला. तितक्यात जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नी, लुईस कंटाळून वेगळी झाली. बेकरीत काम करणार्‍या एका सर्वसामान्य माणसाचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे आणि सुंदरतेच्या हव्यासापायी हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला. इतकं सारं झाल्यावर आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली आहे त्यात आनंद मानायला शिकण्याच्या प्रयत्नात आहे.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या. त्यातच दोघींनी आपला जीव गमावला. सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्यूक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनाल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा दोघांचा निश्चय काही काळापुरता टिकला. काही दिवसांनी मुलाबरोबर वेळ घालवण्याला प्राधान्य देत दोघांनी नोकरीचा राजीनामाही दिला. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने दोघांना चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला. बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं. थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

दरवेळेला लॉटरीच्या बातम्या झळकायला लागल्या की नेहमीचाच प्रश्न पुन्हा एकदा मनात येतो, ’खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का’? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही याचाच शोध पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

(हा लेख गेल्यावर्षी लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झाला होता. सध्या पुन्हा लॉटरीचे वारे वाहू लागल्यामुळे आठवण झाली.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मी लॉटरीकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो. कारण मला एक खूप मोठी लॉटरी लागली ज्यामुळे माझे जग बदलून गेले कायमचे.
ती लॉटरी म्हणजे माझा जन्म. त्या लॉटरीमुळेच चांगले आईवडील, शिक्षण मिळाले. नाहीतर मी कुठेतरी जंगलात किंवा जिथे सारखी युद्धे चालू आहेत अशा भागात जन्माला आलो असतो तर आज जिवंतही नसतो किंवा न जाणो कुठल्या अवस्थेत असतो.

अजय, अगदी १००% माझे विचार. खरच आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्मायला यायच केवढं मोठ्ठ
भाग्य आपल्याला मिळालं आहे ह्याबद्दल मी नेहेमीच कॄतज्ञ असते.

चांगलं लिहिलं आहे. पैसा गरजेचा आहे आणि मिळाल्यावर तो योग्य रीतीने वापरणं गरजेचं असतं.

मोहना, मधे लुईसच्या पॅरामधे नवरा-बायको, त्यांची नावं ह्यात जरा गफलत झालीये.

चांगला लेख
हर्षवर्धन नवाथे ची आठवण आली
अर्थात आता काही एरियात अगदी साध्या साध्या घरांची किंमत 2 कोटी पर्यंत गेल्याने कोण्याही करोडपती ला 'पैशाचे काय करावे' वगैरे प्रश्न पडायला पैसा उरणार नाही.

सस्मित धन्यवाद. केला बदल.
अजय - आता घेणार आहात की लेख वाचून विचार बदलला?
गेल्यावर्षी भारतातून लेख वाचल्यावर खूप इ मेल आली होती. सगळी आमच्यासाठी तिकिट घ्याल का आणि लागली लॉटरी तर मला किती देतील ते पण सांगणारी :-).

छाना आहे लेख.
लायकीपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त पैसा अचानक नशीबाने मिळाला की वरील सर्व होणारच. हुमायुन नेचर आहे हे.
एखादाच असेल जो याला अपवाद असेल. पण अश्या विचारांचा माणूस लॉटरी काढतही नसेल.

लेख आवडला.

अजयचा प्रतिसाद चांगला आहे; खासकरून 'नाहीतर मी कुठेतरी जंगलात किंवा जिथे सारखी युद्धे चालू आहेत अशा भागात जन्माला आलो असतो तर आज जिवंतही नसतो किंवा न जाणो कुठल्या अवस्थेत असतो.' हा भाग.

https://www.youtube.com/watch?v=aedrtWXLJpA

Police inspector is a man of his word. His wife Manthara is obsessed with money and neglects her family in pursuit of getting rich quick. She forces Ram to buy a lottery ticket and he obliges. When he goes into a restaurant for a snack, he finds that he has no money to tip the waitress Piya. He promises her half the money if he ever wins the lottery. And to his surprise, he does!! But Manthara is not about to give up half of this windfall so easily and as Ram and Piya come closer to each other, they discover a growing attraction.

Movie:- Bade Dilwala (1999)
Starcast:- Sunil Shetty, Priya Gill, Archana Puran Singh, Paresh Rawal, Satish Kaushik, Ranjeet, Raju Shrivastava
Directed & Produced by:- Shakeel Noorani
Music by:- Aadesh Shrivastava