आज रविवार! मस्त सुट्टीचा दिवस. श्रीयुत दिलीप, सकाळचा नाष्टा वगैरे आटपून आरामखुर्चीमध्ये पेपर वाचत बसलेले आहेत. त्यांचे रिटायरमेंटहि जवळ आलेले असल्याकारणाने पेपरमध्ये त्यासंबंधित लेख वाचण्यावर आजकाल त्यांचा भर असतो. त्यांच्या सौभाग्यवती अनिताची स्वैंपाकघरात आवराआवर चाललीय. मुलगी जाई, स्टडीरुममध्ये कॉलेजचे प्रोजेक्ट पूर्ण करत बसलीय. तिचे हे कॉलेजचे शेवटचे वर्ष. पुढील दोनएक वर्षात तिला उजवायचा त्यांचा विचार आहे. तिला आतापासूनच लग्नाच्या मागण्या येण्यास सुरुवात झाली आहे.
एवढ्यात दारावरची बेल वाजते. 'डिंग! डाँग!' दिलीप उठून दरवाजा उघडतात. दरवाजात त्यांचा परममित्र आणि स्नेही शरद, रेखावहिनी आणि त्यांचा मुलगा अमित उभे. शरद नुकतेच रिटायर झालेत. अमितने इंजिनियरिंगची डिग्री घेतलीय आणि तो सध्या एका एमएनसीत काम करतो.
त्यांना पहाताच दिलीप अत्यानंदाने ओरडले. "या! या! नमस्कार! नमस्कार!!" त्यांनी सौ.ना हाक मारली. "अगं, पाहिलंस का, कोण आलंय ते!"
सौ.अनिता आणि जाई लगबगीने बाहेर आल्या. अनिता "अरे वा! या! या! नमस्कार!" जाईसुद्धा त्यांना पाहून आंनदली. "नमस्कार काका आणि काकी! हाय अमित! ये! ये!"
शरद, वहिनी आणि अमित सोफ्यावर येऊन बसले. दिलीप, अनिता आणि जाई, त्यांच्या समोरच खुर्चीवर बसले.
दिलीपने सहज विचारले "आज कसे येणं केलंत?"
शरदने बोलण्यास सुरवात केली. "अरे, आज आम्ही एका खास कारणाने तुम्हां सर्वांशी चर्चा करायला आलो आहोत. तुम्हाला माहीतच आहे, की अमित आता नोकरीत स्थिरावलाय. आणि आता आम्ही त्याच्या लग्नाचं बघतोय. त्याला तीन चार मुलीही सांगून आल्यात. काही मुली वयाने त्याच्या बरोबरीच्या आहेत, काही त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान तर काही सहा-सात वर्षांनी लहान आहेत. आता आम्हाला प्रश्न पडलाय कि आम्ही सुनबाई कोणती करावी. अमितच्या वयाच्या बरोबरीची असणारी करावी? त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षे लहान असणारी करावी? कि त्याच्यापेक्षा सहा सात वर्षांनी लहान असलेलीसुद्धा चालेल? आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही आहोत. पती पत्नीच्या वयात असणाऱ्या फरकाचा त्यांच्या संसारवर कितपत प्रभाव पडू शकतो? ह्याबद्दल आपलंहीे काय मत आहे हे विचारावं. तसंच तुमच्याशी चर्चा केल्याने आम्हाला काही नवीन माहिती मिळेल. म्हणून तीही जाणून घ्यायला आम्ही आलो आहोत"
त्यावर अमित लगेच उसळून म्हणाला "अहो काका, सोपं आहे. मी लग्न करणार म्हणजे माझी होणारी बायको माझ्याच वयाची असायला हवी नको का? त्यात चर्चा कसली करायची?
दिलीप उत्तरले "हे बघ अमित, हे सर्वमान्य आहे की स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत बौद्धिकदृष्ट्या लवकर परिपक्व होत असतात. त्यामुळे पतीपत्नी जर एकाच वयाचे असले तरी त्यांच्या बौद्धिक पातळीत बराच फरक असू शकतो. ज्याचा परिणाम त्यांच्या संसारवर होऊ शकतो. आणि कदाचित त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वसाधारणपणे लग्न करताना मुलगा आपली होणारी पत्नी आपल्यापेक्षा दोन तीन वर्षे लहान असणारीच बघत असतो.
त्यावर जाईने विचारले "मग पती हा पत्नीपेक्षा दोन तीन वर्षांनी वयाने मोठा असावा का? याचे अजून काय परिणाम होऊ शकतात?"
दिलीप "पती पत्नीपेक्षा दोन तीन वर्षांनी वरिष्ठ असल्यामुळेे त्याला सतत आपल्या पत्नीप्रति असलेल्या जबाबदारीची जाणीव होत रहाते, काळजी रहाते. ज्यामुळे पत्नीला आपोआप पतीसोबत सुरक्षिततेची आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि त्यांचे एकमेकांसंबंधीचे आकर्षण कायम राहते. पती वयाने पत्नीपेक्षा मोठा असल्याने त्याच्या आयुष्यात स्थैर्य अगोदरच आलेले असते. तो आर्थिक दृष्ट्या सबल झालेला असतो. ज्यायोगे त्यांच्या संसाराची सुरवात सुरळीत होऊ शकते. साधारणतः वयापरत्वे स्त्रिया ह्या विविध कारणांमुळे त्यांच्या वयाच्या पुरुषांपेक्षा लवकर प्रौढ दिसायला लागतात. त्यामुळे जरका पती हा पत्नीपेक्षा वयाने दोन तीन वर्षे मोठा असल्यास, त्यांच्या मध्यमवयीन काळात त्यांची जोडी विजोड दिसण्याची शक्यता कमी होते.
जाईने परत विचारले "आणि पती हा पत्नीपेक्षा सहा सात वर्षांनी वयाने मोठा असला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?"
याचे शरदने उत्तर दिले "पतीपत्नीमध्ये सहासात वर्षांचे अंतर असल्यास त्यांच्यामध्ये पूर्ण एका पिढीचे अंतर पडते. त्यांच्या आवडीची गाणी, टीव्हीचे कार्यक्रम, पिक्चर यांची आवड आणि निवड पुष्कळ वेगळी असू शकते. एकाला दुसऱ्याच्या प्रौढपणाचा, तर दुसऱ्याला पहिल्याच्या बालिशपणाचा बऱ्याचदा सामना करावा लागू शकतो. सुरवातीला एकमेकांमध्ये पाहिलेला सारखेपणा मागे पडून त्यांच्यामध्ये असलेला वेगळेपणाच जास्त उठून दिसायला लागतो. कुठेतरी असे वाचले होते की पतिपत्नीमधील वयाचा फरक जितका जास्त तितका त्यांच्यात बेबनाव होण्याचा संभव जास्त असतो, पण असेही आहे की पतीपत्नीचा जितकी जास्त वर्षे सहवास राहील तितके त्यांच्यात वादाचे प्रमाण कमी राहील.
रेखावहिनी "कधी कधी लग्न करताना दोघांची मानसिक आणि शारीरिक बरोबरी आहे का? हे पाहिलेच जाते असे काही नाही. काही व्यक्तींना आपला जोडीदार निवडताना त्याचे समाजातील स्थान, त्याची आर्थिक सुबत्ता आणि त्यामुळे आपोआप स्वतःला भोगायला मिळणारे विलासी जीवन, आर्थिक सुरक्षितता जास्त आकर्षित करू शकते. उदाहरणार्थ, आपण पाहतोच कि कित्येकदा किर्तीमान आणि ख्यातनाम व्यक्तींच्या जोडीदारांमध्ये तब्बल वीस-वीस वर्षांचेसुद्धा अंतर असते. हो! मग वयाचे जास्त अंतर असलेल्या जोडप्यांमध्ये पुन्हा दुसरे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशावेळी त्यांच्यात भरपूर सामंजस्य असावे लागते. आपल्यात आणि आपल्या जोडीदारात सर्वच बाबतीत असलेला फरक पूर्णपणे स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या संसारचा मार्ग आखावा लागतो. पती पत्नीपेक्षा जरका वयाने बराच मोठा असेल तर त्याचे आपल्या पत्नीबरोबरीचे वागणे हे एखाद्या पित्याप्रमाणे असू शकते. किंवा पत्नी पतीपेक्षा वयाने फारच मोठी असेल तर तिचे आपल्या पतीबरोबरीचे वागणे एखाद्या आईप्रमाणेसुद्धा असू शकते. वयातील असलेल्या जास्त फरकामुळे कोणा एकाचा फार लवकर मृत्यू होणे संभवते. तसेच मूल होऊ देण्यावरूनसुद्धा त्यांच्यात वाद होऊ शकतो. कदाचित त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीपत्नीपासून एखाददुसरे मूलही असू शकते, ज्याचाही त्यांच्या संसारवर प्रभाव पडू शकतो. दोघांच्या पिढीमध्ये एक दोन पिढ्यांचे अंतर असल्याने पुष्कळ बाबतीत त्यांच्यात मतभिन्नता असू शकते.
सौ.अनिता "खरं तर वयाच्या मुद्द्याकडे आपण खास लक्ष दिले पाहिजे. त्याऐवजी आपल्याकडे मुलामुलींची लग्ने करताना इतर गोष्टी तपासण्यावरच भर दिला जातो. जसे की त्यांचे घर कसे आहे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर कसा आहे, त्यांचा जात आणि धर्म कोणता आहे. मुलाच्या बाबतीत असेल तर त्याची मिळकत किती आहे, वगैरे वगैरे. त्याऐवजी हे पाहिलं पाहिजे, की होणाऱ्या पतीपत्नीमध्ये वयाचा किती फरक आहे? ते एकमेकांना अनुरूप आहेत का? त्यांचा बौद्धिक स्तर, आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या आणि वागण्याच्या सवयी जुळतात का?
यावर जाई म्हणाली "मला वाटते लग्न करताना होणाऱ्या पतीपत्नीमध्ये वयातील फरकाचा मुद्दा तेव्हा एवढा महत्वाचा ठरू नये, जेव्हा त्यांच्यात एकमेकांबद्दल नितांत आदर, प्रेम, सहकार्य, योग्य सुसंवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असेल. जोडीदाराबद्दल कमीत कमी आणि तार्किक दृष्टया पूर्ण होणाऱ्या अपेक्षा ठेवल्या, तसेच त्याची एकूण कुवत ओळखली तर त्यांच्यात बेबनाव होण्याची शक्यता कमी होईल. दोघेही मानसिकदृष्ट्या परिपक्व असणे, स्वार्थीपणाचा अभाव असणे आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे हे शेवटी महत्वाचे ठरते, नाही का?
दिलीप शरदला म्हणाले "आपण सर्वांनी आपापली मते मांडली. चर्चा बाकी छान झाली. पण तुझ्या प्रश्नाचे नेमके उत्तर काही मिळत नाहीए."
शरद "हो ना!! आता काय करावे?"
रेखा वहिनी "अहो भावोजी! तुमचे एक मित्र 'मायबोलीवर' सभासद आहेत ना!!? त्यांनाच त्या व्यासपीठावर इतर सभासदांची मते विचारायला सांगा ना!! आपल्याला अजून काही नवी माहिती मिळेल."
दिलीप " हो! हो! चांगली युक्ती सांगितलीत. मी त्यांना नक्की विचारायला सांगतो. बघूया अजून कोणती नवीन माहिती मिळते ती!!"
तर, मायबोलीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो! माझा मित्र दिलीपच्या आग्रहावरून मी तुमचे मत विचारतोय. सांगा बरं तुम्हाला काय वाटते? पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे? आणि का?
(निवेदन : वरील लेखातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. (मात्र मी विचारलेला प्रश्न खरा आहे))
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
@ रेव्यु, सत्यनारायण पूजा
@ रेव्यु, सत्यनारायण पूजा वाचन स्टाईलचे असले लिखाण बर्याच दिवसात वाचले नाही.....>>> नक्की काय ते कळले नाही. कृपया सविस्तर सांगितलेत तर माझ्या लिखाणात काही दोष असल्यास मी ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
बापरे कित्ती लिहिलंय.
बापरे कित्ती लिहिलंय.
आपल्याकडे वयाबरोबर शहाणपण वाढते असा एक पूर्वापार गैरसमज आहे. बायको अकलेने नवऱ्यापेक्षा कमी असेल तर ती त्याच्या कह्यात राहते हा हि एक पूर्वापार चालत आलेला गैरसमज.
या दोन्ही गैरसमजाचे प्रतिबिंब नवरा वयाने मोठा हवाच हा रुढीत दिसते.
स्त्रिया पुरुषाप्रमाणे किंवा इतक्या सक्षम असतात/असू शकतात हे वास्तव समाज स्वीकारायला लागेल तशी हि रूढी मागे पडेल.
21 साव्या शतकातही हि रूढी
21 साव्या शतकातही हि रूढी टिकण्यामागे बायको कायम नवऱ्याच्या कह्यात राहिली पाहिजे हा अट्टाहास किंवा अपेक्षा आणि ती तशी राहावी यासाठी आधाराला घेतलेले पूर्वापार चालत आलेले गैर समज हे वर लिहायचे राहून गेले.
मैत्रेयी - चांगली माहीती.
मैत्रेयी - चांगली माहीती.
मी मानीनी, तो म्हातारा नवरा मरून गेल्यावर मागे राहिलेल्या बायकोची तिच्या म्हातारपणी काळजी कोणी घ्यायची? मुले घेत असतील तर मुलांनी दोघांची घ्यावी, यासाठी मुद्दाम जास्त वयाचा नवरा कशाला करावा?
उपलब्ध्तेवर अवलंबुन आहे .
उपलब्ध्तेवर अवलंबुन आहे .
मुलाला किंवा मुलीला सर्वार्थाने पसंत पडेल असा जोदीदार त्या वयाच्च्या टप्प्यातच (+-२) मिळेल अश्से कसे शक्य आहे.
>>>>> आपल्या गौरवशाली परंपरेत
>>>>> आपल्या गौरवशाली परंपरेत तर मुली ७-८ वर्षाच्या आणि त्यांचे नवरे तीस-चाळीस वर्षाचे असंही असायचं. किती तो निरागस काळ. लाल्या, कम्युनिष्टांनी मिळून आपल्या सगळ्या गौरवशाली परंपरांचा सत्यानाश केला. म्हणून आता हे असे २-३ वर्षं अंतर वगैरे ठेवण्याची फॅडं आली आहेत. सगळे नुसते पाश्चात्यीकरण करुन ठेवलेय. स्त्रीमुक्ती, मॅकोले, कम्युनिष्ट वगैरे सगळ्यांनी मिळून पारंपारिक भारतीय कुटुंबसंंस्थेला आणि संस्कृतीला रसातळाला नेऊन ठेवलेय. Lol <<<<<
तपशील बराच चुकलाय (परंपरेबाबत अन लाल्यां/ स्त्रीमुक्ती,/ मॅकोले// कम्युनिष्ट बाबत), पण दिशा बरोबर आहे.
एक तर आपली गौरवशाली परंपरा बघायची तर "पुराणातली वानगी (उदाहरणे)" बघावी लागतील, ज्यात सीऽते पासुन द्रौपदी पर्यंत वाढलेल्या "घोडनवर्यांचे" स्वयंवर म्हणजे त्यांचे स्वतःचे पसंतीने वर निवडणे व्हायचे.
पुढे काळ बदलला, अन दोन हजार वर्षे पूर्वीपासुन शक/हूणकुशाण यांचे जोडीनेच नंतर मोंगली आक्रमणे झाली, अन इकडे स्त्रीयांना त्यांचे नजरेत पडू नये म्हणुन बुरख्यात /पडद्यात/पडदानशीन ठेवायची "गरज निर्माण" झाली, इतकेच नव्हे, तर स्त्री वयात यायचे आधीच तिचे लग्न उरकुन देणे भाग पडू लागले, असे माझे मत.
आता परिस्थिती बदलली तर परत पूर्वीचा तो गौरवशाली कालखंड सुरु झालाय... अच्छे दिन येऊ लागलेत.
अर्थात काळ इतकाही बदलला नाही की तो माणसाच्या मनातील षडरिपुंवर मात करेल, अन त्यामुळेच, पुराणातल्या सीऽतेला धोब्याच्या "गॉसिपची" शिक्षा भोगावी लागली, तर द्रौपदीला दुर्योधन/दु:शासन इत्यादिकांच्या वासनायुक्त नजरेस बळी पडावे लागले. आजही स्त्रीयांची स्थिती यापेक्षा काही वेगळी आहे, असे मी मानित नाही.
साधना बरोबरेय तुमचं.... तसही
साधना बरोबरेय तुमचं.... तसही अजुनही बर्याच भागात / स्तरात स्त्रियंचा ईतका विचार कोण करतो
मी जे वर लिहीलेय ते जर खरे असेल तर त्यात पुरुषांची स्वार्थी व्रुत्तीच दिसते आणी ती पोसायला बर्याचदा कळत - नकळत स्त्रियांच हातभार लावतात
>>>>>>
>>>>>>
बायको वयाने लहान असेल तर कह्यात राहील.....
गोपिका बाई, विरुबाई, आनंदीबाई मराठे इतिहासातील इतर बायकांवर नजर टाकली तर असे वाटत नाही,
रादर ,या बायकाच were calling shots. चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने
पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती
पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे? आणि का? >>> हे ज्याचे त्यानी ठरवावे. उगीचच लोकांचे वैयक्तिक प्रश्न आणि प्राथमिकता कोणत्याही नियमात बांधायचा प्रयत्न करू नये.
दोन हजार वर्षे पूर्वीपासुन शक
दोन हजार वर्षे पूर्वीपासुन शक/हूणकुशाण यांचे जोडीनेच नंतर मोंगली आक्रमणे झाली, अन इकडे स्त्रीयांना त्यांचे नजरेत पडू नये म्हणुन बुरख्यात /पडद्यात/पडदानशीन ठेवायची "गरज निर्माण" झाली,
अग्गोबै !!! मग ८५% व्याप्ती असलेल्या हिंदू धर्मातील वीरपुरूष कुठे गायब झाले होते म्हणे ? १५% मुसलमानाना घाबरुन ८५% हिंदू स्त्रीया बुरख्यात / पडद्यात गेल्या ?
आणि सीतेचे लग्न झाले तेंव्हा तिचे वय ८ वर्षे होते ना? ८ म्हणजे घोडनवरी?
हे पहा लिंबूजी .. तुमचे संस्कृतीरक्षक काय म्हणतात ....... देशातील सैनिकांच्या पत्नींविषयी अत्यंत गलिच्छ वक्तव्य केल्यानं वादात सापडलेलेले भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांना आज अखेर विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले. चौकशी समिती नेमून परिचारक यांचं वक्तव्य तपासलं जाणार असून त्याचा अहवाल येईपर्यंत ते निलंबितच राहतील,' अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mlc-prash...
>>>> मग ८५% व्याप्ती असलेल्या
>>>> मग ८५% व्याप्ती असलेल्या हिंदू धर्मातील वीरपुरूष कुठे गायब झाले होते म्हणे ? १५% मुसलमानाना घाबरुन ८५% हिंदू स्त्रीया बुरख्यात / पडद्यात गेल्या ? <<<<
अहो आजही भायखळा, भिवंडी, मालेगाव, वगैरे ठिकाणी "जरा आतल्या गल्ल्यात" जायचे धाडस करुन बघाल का? सोबत कुणा नात्यातील स्त्रीला नेऊन बघा ! अनुभव घ्या, उगा हातच्या कंकणाला आरसा कशाला? अन मग कळेल की हिंदू धर्मातील वीरपुरुष कुठे गायब होतात ते....
रेडिओवरची श्रुतिकेचे
रेडिओवरची श्रुतिकेचे स्क्रिप्ट वाचतोय असं वाटलं..
@टण्या, साधुवाणी रॉक्स
बायको वयाने लहान असेल तर
बायको वयाने लहान असेल तर कह्यात राहील.....
गोपिका बाई, विरुबाई, आनंदीबाई मराठे इतिहासातील इतर बायकांवर नजर टाकली तर असे वाटत नाही,
रादर ,या बायकाच were calling shots. चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने">>>>>>>
ह्या बाया सोडून इतर बायकाही आहेत हो लग्नाच्या बाजारात.
आणि हा नियम लावायचा तर रामदास स्वामी बोहोल्यावरून पळाले यावरून आजचे बहुसंख्य तरुणही पळत असावेत असे म्हणायला वाव आहे.
कायच्या काय ... भायखळा ! कधी
कायच्या काय ... भायखळा ! कधी स्वप्नात तरी गेला आहेस का रे लिंब्या ?
त्या ट्रंप कुटुंबियांच बर
त्या ट्रंप कुटुंबियांच बर चाललय की.
@टण्या, साधुवाणी रॉक्स >>> +१
@टण्या, साधुवाणी रॉक्स >>> +१
काहीही चाललंय. गंभीर चर्चा
काहीही चाललंय. गंभीर चर्चा अपेक्षित होती इथे.
वयाचा फरक हा कदाचित कायद्याला पण अपेक्षित आहे. म्हणूनंच मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ असावे असा आपला भारतीय कायदा सांगतो. म्हणजे मुली लवकर समजूतदार होतात मुलांपेक्षा (हा हा हा).
जोक्स अपार्ट. वय वाढलं कि समजूतदारपणा वाढतोच असं काही नाही. मला असं वाटत की एकेमेकांना समजून घेणे जास्त महत्त्वाचं आहे. आपण compatible आहोत कि नाही हे मुलामुलींनी तपासून बघावं. वय हा एक मुद्दा असू शकतो पण तोच लग्नाचा sole criteria असू नये.
पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती
पती-पत्नीमधील वयाचे अंतर किती असावे?
सहा वर्षे
आणि का?
महिलांना साठीनंतर आणि पुरुषांना ६६ नंतर एस्टीत सिनीअर सिटीझन डिस्काऊंट आहे. सहा वर्षे अंतर असले म्हणाजे सोबतच डिस्काऊंटला पात्र होतील आणि एकत्र मजेत फिरतील.
(खरी परिस्थिती अशी की महाराष्ट्रात बहुतांश जोडप्यांमध्ये ६ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे सरसकट साठीत सवलत जाहीर केली तर नवरा एकटाच प्रवास करतो आणि बायकोला सवलतीची वाट पाहत ६ वर्षे थांबावे लागते. यावर तोडगा म्हणजे एसटी प्रशासनाने काढलेला हा नियम. आता नवरा बायको एकाच वयाचे असले म्हणजे म्हातारपणी बायको एकटी फिरत बसेला. हे घडू नये याकारिता ही ६ वर्षे फरकाची परंपरा पाळणे आले.)
हो का? मला वाटलेलं की सरसकट
हो का? मला वाटलेलं की सरसकट ६० आहे. आभार हा मुद्दा सांगितल्याबद्दल. आता शोधते एखादा ६ वर्षांनी मोठा.
मुलींना मुलांच्या आधी
मुलींना मुलांच्या आधी प्रगल्भता, मॅच्युरीटी येते याला काही शास्त्रीय आधार आहे का? मुलींना लहानपणीच स्वयंपाक शिकवला जातो, नवर्याचे घर कसे सांभाळायचे याचे ट्रेनिंग दिले जाते म्हणून त्या मॅच्युअर होतात का? खरेच मॅच्युअर होतात तर मतदानाचा हक्क का नाही मिळत मुलींना सोळाव्याच वर्षी? उगाच आपले स्त्रियांना दाबायला म्हणून काहीही जोडलेले तर्कट आहेत हे.
एकाच वयाच्या मुलांची किंवा मुलींची प्रगल्भता समान असते हे गृहीतकही अचाट आहे. एकंदरीतच वैचारीक प्रगल्भता हा मुद्दा बाद आहे.
पुरुषप्रधान संस्कृती आहे बाबांनो. पुरुषाला आपला जोडीदार तरुण असावा असे वाटले ते त्याने तसे नियम बनवले. एकेकाळचे पंधरावीस वर्षांचे अंतर आता काही वर्षांवर आले आहे. येत्या काळात वयाचा मुद्दा निकालात निघणार आहे.
आवडनिवड, आचारविचार, हिस्ट्री-केमिस्ट्री जुळवा आणि मगच लग्नाच्या गाठी जोडा. आधीच जातीधर्मात विभागलेला मनुष्यसमाज आपला तिथे आणखी एका या वयाच्या निकषावर अनुरूप जोडीदार हातचा जाऊ देऊ नका.
Pages