बोट - वादळवारा

Submitted by स्वीट टॉकर on 13 November, 2015 - 00:49

नोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते?
लाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.

यात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).

तसं ‘बोट’ म्हटलं की भूवासियांच्या मनात लगेच ‘वादळ’ हे येतंच. आणि त्यात चूक काहीच नाही. वादळाबद्दल उत्सुकता आणि भीती सगळ्यांना असतेच. आपल्या वाचण्यात येतं की आन्ध्र प्रदेशला किंवा बांगलादेशला चक्री वादळाचा तडाखा बसला. समुद्रकिनार्‍यापासून दीडशे कि.मी. पर्यंत हानी झाली. दीडशेच्या पुढे का नाही? कारण वादळाचा जोर ओसरला. प्रत्येक चक्री वादळ हे समुद्रावरच सुरू होतं. त्याची उर्जा समुद्राच्या पाण्यातूनच त्याला मिळते. एकदा जमिनीवर आलं की त्याची ऊर्जा विनाशात ओतली जाते आणि विरून जाते. ते जोपर्यंत जमिनीवर येण्याचा धोका नसतो तोपर्यंत ते कोणाच्या खिजगणतीतही नसतं. कोणाच्याही नसतं असं नाही म्हणता येणार. बोटींच्या असतं.

बोट बंदरात असली की महाकाय दिसते. खासकरून गोदीमध्ये बोटीच्या जवळ उभं राहिलं की ही पोलादाची उंचच्या उंच भिंत अजस्त्रच दिसते. त्यातला माल उतरवण्याचं काम जर चालू असेल तर ती दिवसेन् दिवस पाण्यातून बाहेर येत असते आणि एखाद्या किल्ल्याचं बांधकाम चालू असल्यासारखा हा लोखंडी बुरूज वाढतंच जातो. मात्र समुद्रात ही बोट एखाद्या खेळण्यासारखीच असते. जे पाणी अशा अजस्त्र बोटीला सहजगत्या उचलून धरू शकतं ते राग आल्यावर तिला झोडूनही काढू शकतं. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हातात सापडावा आणि माहिती काढून घ्यायला पोलिसांनी त्याला सहजगत्या डाव्या उजव्या कानशिलात सणसणीत थपडा माराव्या तशी वादळामध्ये बोटीची अवस्था असते. “कशाला आलीस इथे?” फटॅक! “मागच्या वेळेस सांगितलं होतं ना तुला?” फटॅक! “हिवाळ्यात कॅनडाला येशील पुन्हा? येशील?” फटॅक! मात्र एकाच कानशिलात. ज्या बाजूनी वारा आणि लाटा येत असतात त्या!

प्रत्येक लाटेनी बोट वर हळु उचलली जाते आणि भसकन खाली येते. त्यामुळे पुढची लाट आली की डेकचा काही भाग पाण्याखाली जातो! दोन सेकंदांनी हीच लाट बोटीला वर उचलते आणि डेकवरचं सगळं पाणी धबधब्यासारखं दोन्ही बाजूंनी सांडून जातं. सुरवातीला मला प्रत्येक लाटेला पोटात गोळा यायचा आणि वाटायचं 'आता खलास!' पण तसं कधीच झालं नाही. तू नळीवर 'Storms at sea' टाकलं की तुम्हालाही घरच्या सुरक्षिततेत ही वादळं बघायला मिळतील.

वादळ अर्थात कुठेही कधीही निर्माण होऊ शकतं पण जागा, काळ आणि वार्‍याचा वेग याचं एक गणित आहे. हिवाळ्यात उत्तर अटलान्टिक आणि उत्तर पॅसिफिक, जुलै ऑगस्ट मध्ये साउथ चायना समुद्र, जून ते सप्टेंबर भारतीय महासागर वगैरे. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला वर्षभरंच. त्या काळात आपल्या बोटीला तिकडचं भाडं मिळालंय असं ऐकलं की कपाळावर आठी येते.

हवामान हा प्रचंड गुंतागुंतीचा विषय आहे. सुपर कॉम्प्यूटर बनवायची जरूर पहिल्यांदा जी वाटली ती या हवामानाचं पृथक्करण करण्यासाठीच. पूर्वी सरसकटीकरण साधणार्‍या ओळी असायच्या.
Red sky in the morning, sailor’s warning.
Red sky at night, sailor’s delight वगैरे.
त्या आता कालबाह्य झाल्या आहेत. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून बांधलेले आणि अवकाशात फिरणारे उपग्रह म्हणजे अल्टिमेट सी सी टी व्ही कॅमेरे. ते आता पृथ्वीच्या प्रत्येक चौरस मैलावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे प्रत्येक तयार झालेलं वादळ आता काय करीत आहे याची उत्तम माहिती आपल्याला आहे. मात्र ते उद्या काय करणार आहे हे मात्र अजून आपण सांगू शकंत नाही.

दोनशे वर्षांपूर्वी बोटी लहान होत्या, लाकडाच्या होत्या. शिडामुळे पूर्णपणे वार्याच्या आधीन होत्या. शीतकरणाची सोय नसल्यामुळे खाण्यापिण्यावर प्रचंड निर्बंध. वादळ कधी येईल सांगता येत नाही. किती दिवस राहील सांगता येत नाही. अफाट वारा आपल्याला मार्गापासून किती दूर घेऊन जाईल ते सांगता येत नाही. कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता नाही. ढगाळ वातावरण असलं तर तारे न दिसल्यामुळे आपण कुठे आहोत ते शोधून काढणं ही अशक्य! संपूर्ण जगाची नीट माहिती ही नाही. अशा काळातले दर्यावर्दी हे खरे दर्यावर्दी ! त्यांच्या समोर आम्ही किस पेड की पत्ती !

या वादळांमध्ये वार्‍याचा वेग किती असेल, लाटांची उंची किती असेल याचा अंदाजही वर्तवलेला असतो. या माहितीत सारखी भर पडंत असते कारण ज्या बोटी त्या भागातून जातात त्या प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे याचे रिपोर्ट पाठवतात. त्या अनुसार बाकीच्या बोटी आपापला मार्ग निश्चित करतात. हे वाचून असं वाटायची शक्यता आहे की वादळ आलं रे आलं की बोटी सैरावैरा पळतात. कोणी डावीकडे सटकली तर कोणी उजवीकडे. “मी नाही बाई!” असं म्हणंत कोणी बंदरातच परत गेली! असं नसतं. मग ‘मार्ग निश्चित करतात’ म्हणजे काय? याला वेगवेगळे आयाम आहेत.

सगळ्यात महत्वाची सुरक्षितता. त्यामुळे वादळाच्या डोळ्यातून (eye of the storm) कोणीही जाऊ इच्छित नाही. मात्र वादळ पूर्णपणे टाळण्याचाही प्रयत्न केला जात नाही. बोट बांधण्याचं आणि चालवण्याचं तंत्रज्ञान अशा ठिकाणी पोहोचलं आहे की जोपर्यंत त्यातला माल व्यवस्थितपणे भरला आहे आणि घट्ट बांधला आहे, त्यातली मशिनरी व्यवस्थित चालू आहे आणि चालवणारे काही चूक करीत नाहीत तोपर्यंत वाईटात वाईट वादळ बोटीला बुडवू शकंत नाही. मात्र जर का मुख्य इंजिन वादळात बंद पडलं तर मात्र परिस्थिती ढासळतेच. बोट असहाय्य होते आणि लाटा तिला सहज फिरवतात. एकदा बोट लाटांना समांतर झाली की खैर नाही. प्रचंड वजनाची प्रत्येक लाट आपटायला बोटीची उजवी किंवा डावी भलीमोठी एरिया उपलब्ध असते. बोट उलटू शकते. उलटली नाही तरी डेकवरून धबधब्यासारख्या वाहाणार्‍या हजारो टन पाण्याच्या आघातानी पाईप्स, मशिनरी वगैरेचं अपरिमित नुकसान होतं. एक महिन्यापूर्वी (५ ऑक्टोबरला) ‘एल् फॅरो’ नावाची एक अमेरिकन बोट फ्लॉरिडाजवळच ‘जोकिम’ नावाच्या चक्री वादळात शिरली ती कायमचीच. तेहेतीस जण होत्याचे नव्हते झाले. ती कशामुळे बुडली हे कळेल की नाही हे सांगणं अवघड आहे कारण जिथे ती बुडली तिथे समुद्र पंधरा हजार फूट खोल आहे. बाकीच्या बोटी तेव्हां त्या परिसरात होत्याच. मग त्या धोक्यात का सापडल्या नाहीत? त्यांनी जे वादळ चुकवलं ते ‘एल फॅरो’ने का चुकवलं नाही? याला बहुदा पुढील दोन कारणांपैकी एक कारण असतं. फाजील आत्मविश्वास, किंवा आर्थिक दबाव.

एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. बोटी काही मला नोकरी मिळावी किंवा तुम्हाला माबोवर गोष्टी वाचायला मिळाव्या यासाठी बनवल्या गेल्या नाहीत. हा पूर्णपणे व्यापारी क्रियाकलाप आहे (commercial activity). आपण साधारण नव्वद हजार ते एक लाख टन माल नेणार्‍या बोटीचं उदाहरण घेऊ. बोटीच्या वाटेत वादळ आहे असं लक्षात आलं, (आम्ही ‘वादळ’ हा शब्द सहसा वापरंत नाही. खराब हवामान ‘Bad weather’ असं म्हणतो) की वेगवेगळी गणितं मांडली जातात. जर वादळाची पर्वा न करता सरळ आपल्या मार्गानं गेलं तर बोटीचा वेग खूपच कमी होतो. अंतर वाढलं नाही तरी सफरीचा वेळ वाढतो. या बोटीला एक दिवसासाठी चाळीस टन इंधन लागतं. (साधारण एक्केचाळीस हजार लिटर!) जास्त वेळ म्हणजे जास्त इंधन. आज बोटीच्या खर्चात सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे इंधन! बाकीचे खर्च आहेतच. शिवाय थपडा खाऊन खाऊन बोटीच्या सांगाड्यात (ज्याला आम्ही ‘hull’ म्हणतो), बारीक बारीक क्रॅक जातात ज्यांनी बोट काही बुडत नाही पण खर्चिक दुरुस्तीची जरूर पडते. त्यात इंजिन बंद पडलं तर धडगत नाही. त्यामुळे कोणीही हा पर्याय पसंत करीत नाही. बरं, आता वळसा घालून जायचं तर किती मोठा वळसा घालावा? वादळाचा परिणाम म्हणून आसपासचा समुद्रदेखील खवळतो. वादळाच्या ताकदीनुसार शंभर मैलापर्यंत तर कधी कधी सातशे मैलांपर्यंतचा सुद्धा! आपल्या बोटीवर कुठल्या प्रकारचा माल आहे, किती उंचीपर्यंत रचलेला आहे, इंजिनची ताकत आणि कंडिशन काय आहे, बोट किती जुनी आहे, माल पोहोचवणं किती तातडीचं आहे यावर किती मोठा वळसा घालायचा ते ठरतं. दर वेळेला अति सावधपणा दाखवला तर कंपनी घाट्यात जाऊन बंद पडेल. अति शौर्य दाखवणार्‍याला निसर्ग शिक्षा करतो. ९९.९९ टक्के निर्णय बरोबर ठरतो. मात्र या निर्णयप्रक्रियेत बोटीवरच्या लोकांच्या आरामाला काहीही महत्व नसतं.

वादळात लोकांचं काय होतं? वादळात बोट मुख्यतः वर खाली होत असते (ह्याला pitching पिचिंग असं म्हणतात. भसकन खाली जाऊन वर यायला बोटीला साधारण सहा सेकंद लागतात) व उलट्या लंबकाप्रमाणे डावीउजवीकडे हेलकावंत असते (ह्याला rolling रोलिंग असं म्हणतात. एक झोका पूर्ण व्हायला आठ ते दहा सेकंद). या दोनही हालचाली एकत्र होतात म्हणजे कॉर्क स्क्रू मोशन (cork screw motion). हा कॉर्क स्क्रू कधी क्लॉकवाइज् फिरतो तर कधी उलटा. तेव्हां लक्षांत येतं की आपल्या छातीच्या खालच्या पोकळीत असलेली संपूर्ण पचनसंस्था - जठर, छोटं अन् मोठं आतडं,लिव्हर आणि जे काय असतील ते सर्व अवयव एकमेकापासून स्वतंत्र हालचाली करू शकतात. पण पोकळीतच राहातात हे नशीब.

मी इंजिनिअरिंगला असताना माझ्या एका के. ई. एम्. मध्ये MBBS करणार्‍या मित्रामुळे मला ऑपरेशन बघायला मिळालं होतं. पॅन्क्रियाची सर्जरी. विद्यार्थ्यांची रेलचेल. तोंडाला मास्क आणि त्यांचे झगे घातले की डॉक्टर कोणाही विद्यार्थ्याला ओळखू शकत नाही. बेशुद्ध पेशंटभोवती विद्यार्थ्यांची ही गर्दी. पॅन्क्रियाच्या ऑपरेशनसाठी पोटातलं सगळं सामान बाहेर काढायला लागतं का शिकवण्यासाठी त्यांनी काढलं होतं ते मला माहीत नाही. पण त्यांनी काढलं होतं. बाकीचे विद्यार्थी प्रश्न विचारत होते. ऑपरेशन करून मुख्य डॉक्टर निघून गेले. त्यांच्या असिस्टंटनी एखादी बॅग भरावी तसं परत सगळं आत भरलं आणि पोट शिवून टाकलं. माझ्या शालेय पुस्तकातल्या चित्रावरून मला वाटायचं की प्रत्येक अवयवाला स्वतःची अशी जागा असते आणि आकार असतो म्हणून. पण तसं काही नसतं हे बघून मला आश्चर्य आणि काळजी देखील वाटली होती.

या कॉर्क स्क्रू मोशनचा आपल्याला प्रचंड त्रास होत असेल असं वाचून वाटेल कदाचित. पण तसं नसतं. कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची शरीराची अफलातून क्षमता असते. फक्त मनानी तसं ठरवायला लागतं.

सुरवातीला बहुतेकांना मोशन सिकनेसचा त्रास होतो. काहींना कमी, काहींना जास्त. पोटात काही रहात नाही. सारखी ढवळाढवळ. जेवणाची कल्पनादेखील सहन होत नाही. फिरतंय असं वाटंत राहातं. याच्या बद्दल एक विनोद आहे.
There are two stages of sea sickness. The first is when you think you will die. The second is when you hope you will die!

अशा वेळेला जर त्या मनुष्याला आराम करायला परवानगी दिली की संपलंच. मग त्याचा सी सिकनेस जात नाही. सारखं कामात ठेवायचं. काही दिवसात तो सरावतो. सरावल्याची उत्तम खूण म्हणजे वाइट हवामानात नेहमीपेक्षा जास्त भूक लागायला लागते.

बिछान्यावर पडलं की रोलिंगमुळे उशीवरची मान एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे असं हळुहळु ‘नको नको नको’ चालतं. उशा लावून जमेल तितकं स्थैर्य आणायचं. रोलिंग वाढलं की नुसत्या मानेवर न भागता पूर्ण शरीरंच आपल्या मनाविरुद्ध लोळतं. आमच्या कॅबिनमध्ये जो सोफा असतो तो नेहमी बिछान्याला काटकोनात असतो. अति रोलिंगमुळे बिछान्यात झोपणं अशक्य झालं तर सोफावर लेटायचं. आता डावं उजवं काही नाही. सगळं रक्त डोक्यात, पाच सेकंदानी पायात. पाच सेकंदानी डोक्यात! असं रात्रभर.

पिचिंगला मात्र काहीच करता येत नाही. पण ‘आलिया भोगासी असावे सादर’ असा विचार करण्याऐवजी जर ‘अम्यूजमेंट पार्कसारखी मजा येतिये’ असा विचार केला तर खरोखरंच त्रास होत नाही. I am not joking.

सगळीकडे चालताना आधारासाठी रेलिंग लावलेली असतात. त्यांना धरून प्रत्येक जण चालत असतो. झोकांड्या जात असतात. तेव्हां फक्त अशी कल्पना करायची की वादळ बिदळ काही नाहिये. सगळे जण पिऊन तर्र झाले आहेत आणि बारकडून लडबडंत घरी चालले आहेत. जाम करमणूक होते!

आमची टेबलं तर जमिनीत रोवलेली असतातच, पण खुर्च्यांना देखील सीटखाली एक साखळी लावलेली असते. जमिनीला एक हुक असतो. वादळ आलं की खुर्च्या जमिनीला फिक्स करायच्या. नाहीतर आपल्याच पायांनी भटकायला सुरू करतात. तेव्ह्यां आपण त्यांवर बसलेलो असलो तर आपलं दुर्दैव. जेवणाच्या टेबलावरचा टेबल क्लॉथ एका चौकोनी फ्रेमनी टेबलाला फिक्स केलेला असतो. टेबल क्लॉथला ओलं केलं की त्यावर चिनी मातीची प्लेट अजिबात घसरंत नाही. आपली खुर्ची जमिनीला फिक्स केलेली आहेच. आपली तशरीफ खुर्चीला चिकटून ठेवण्याची जबाबदारी आपली.

ही थोडी अतिशयोक्ती झाली.

खरं सांगायचं तर तोल सांभाळण्याचा इतका प्रॉब्लेम नसतो. आपल्याला माहीतच आहे की जर गाडीचा वा बसचा ड्राइव्हर चांगला नसेल तर प्रवास संपेपर्यंत आपण नाहकच दमून जातो. त्याचं कारण असं की सारखे जे डावे उजवे झटके आणि ब्रेकचे हिसके लागतात तेव्हां आपलं शरीर correction करण्यासाठी सारखी ताकद लावंत असतं. तसंच बोटीवर होतं. फरक इतकाच की ड्राइव्हर असतो आकाशात आणि प्रवास संपता संपत नाही. दमून जायला होतं.

या काळात सगळ्यांची काम करण्याची गती कमी होतेच, शिवाय कामही वाढतं. असं व्यस्त प्रमाण फार दिवस चालणं बोटीच्या दृष्टीनी ठीक नसतं. बोटीच्या डेकवर किती लाटा येणार हे बोटीचा आकार, उंची, वेग, दिशा, वादळाचा वेग, दिशा यावर ठरतं. या लाटांमुळे डेकवरच्या मशिनरी आणि साधनसामुग्रीला अपाय होतो. या दिवसात डेकवर जिवाला धोका असल्यामुळे बाहेर जायला बंदी असते. मात्र कित्येक वेळा जाण्याशिवाय गत्यंतरच नसतं. अशा वेळेला बोटीचा वेग आणि दिशा बदलून, डेकवर लाट येणार नाही अशी व्यवस्था करूनच लोकांना डेकवर कामासाठी तात्पुरतंच जाऊ दिलं जातं. जिवाच्या सुरक्षिततेला कायमच प्राथमिकता.

आमच्या बोटीच्या इंजिनला जरी डीझेल इंजिन म्हणत असलो तरी प्रत्यक्षांत डीझेल वापरणं परवडण्यासारखं नसतं. कच्च्या तेलातून त्यातले वेगवेगळे घटक काढल्यानंतर शेवटी खाली जो गाळ राहातो तो काळ्याकुट्ट मधासारखा चिकट असतो. डीझेलहून खूप स्वस्त. हेच आमचं इंधन. त्याला ‘हेवी ऑइल’ असं म्हणतात. त्याला १४० डि. सेंटिग्रेडपर्यंत तापवूनच वापरायला लागतं. त्यात घाणही खूप असते. या हेवी ऑइलला गरम आणि साफ करण्याची यंत्रणा आमच्याकडे असते. बरीचशी घाण ज्या टाक्यांत हेवी ऑइल साठवलेलं असतं त्याच्या तळाशी जाऊन बसते. जेव्हां वादळामुळे बोट फार हिंदकळायला लागते तेव्हां ही तळाशी बसलेली घाण पुन्हा वर येते, सिस्टिममध्ये खेचली जाते आणि ती साफ करण्याची सिस्टिम ओव्हरलोड होते. शिवाय काही घाण इंजिनपर्यंत पोहोचून तिथे त्रास द्यायला लागू शकते.

एकंदर काय, तर वादळ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.

बोट जर बुडायला लागली तर जीव वाचवण्याचा उपाय म्हणजे बोटीच्या दोन्ही बाजूंना असतात लाइफ बोट्स् आणि लाइफ राफ्ट. मात्र एक लक्षात ठेवायला हवं की आग लागल्यामुळे किंवा टायटॅनिकप्रमाणे हिमनगावर किंवा एकमेकावर आपटून बोट बुडण्याची शक्यता निर्माण झाली तर खरा या लाइफ बोट्स् चा उपयोग असतो. जे वादळ बोटीला बुडवू शकतं त्या वादळात लाइफ बोट्स् उतरवून सुखरूप जाणं केवळ दुरापास्त! या बोटी (सरावासाठी) उतरवतानाच कित्येक अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे. जगभरच्या नाविक जगताला एकसंधपणा यावा म्हणून जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिचं नाव ‘इंटरनॅशनल मॅरिटाइम ऑर्गनाइझेशन’ असं आहे. तिथे असा वाद चालू आहे की ‘वादळांचा विचार केला तर आजपर्यंत या लाइफ बोट्स् नी जास्त जीव वाचवले आहेत का घेतले आहेत?’

त्यामुळे हल्लीच्या नवीन पद्धतीप्रमाणे बोटीच्या मागच्या बाजूला लोखंडी घसरगुंडीवर एकच लाइफ बोट ठेवलेली असते. त्यात सगळ्यांनी बसायचं आणि कळ दाबली की घसरंत खाली येऊन ती धपकन् पाण्यात पडते. आधीच्या लाइफ बोट्स् पेक्षा जास्त सुरक्षित, पण याच्या स्वतःच्या वेगळ्याच समस्या आहेत.

बोटीवर कधी कधी नुकते लग्न झालेले भारतीय तरुण ऑफिसर्स पत्नीसह असायचे. स्वीटर टॉकर अनुभवी. वादळात त्या हिच्याकडे यायच्या. रडवेल्या स्वरात म्हणायच्या, “अब सहन नही हो रहा है. अगले पोर्टसे मैं वापस घर जा रही हूं.” तेव्हां स्वीटर टॉकर सांगायची, “ये तूफान आज है, कल नही. मगर ये सोच लो, अगर तुम घर गयी तो तुम्हे अकेले तुम्हारी सांस के साथ रहना पडेगा!

एकही गेली नाही!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आधीच्या लेखाची लिंक

http://www.maayboli.com/node/56300

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वजण,
पुन्हा एकदा धन्यवाद.
'ठहरने को बोला है|' या लेखाच्या निमित्तानी हा पण परत वर ओढला गेलेला दिसतोय.

मस्तच

लै भारीये. किती छान माहिती अगदी ओघवत्या शब्दांत सांगितली आहे.

तुमचं हे लिखाण वाचून डॉ. शिंदे यांचे लेख आठवतात. असंच सहज सोप्या शैलीत कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगतात ते.

तुम्ही जबरदस्त लिहीता.
ज्या वादळाबद्दल इथे बसून वाचून पण घाबरल्यासारखं होतं त्यात तुम्ही बराच काळ असता हे कल्पून भीती वाटली.
पंधरा हजार फूट पाणी वगैरे वाचून अजून घाबरल्यासारखं झालं. स्विमींग, फ्लोटिंग, डेड मॅन फ्लोट या कल्पना स्विमींग पूल मध्ये महान वातत असल्या तरी पंधरा हजार फूट पाण्यापुढे हास्यास्पद ठरतील.
तुमच्या शेवटच्या वाक्याबद्दलः
ज्या नवर्‍यासाठी पदरी पाडून सासरची अनेक माणसं स्वीकारली जातात आणि त्यांच्यासाठी आपली जुनी ओळख गाडून टाकली जाते तो नवराच वर्षानुवर्षं बायकोला या सगळ्यांत सोडून बाहेरगावी असावा हे नव्या लग्न झालेल्या बायांसाठी "खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आना" ठरते. बाईला स्वतःला विचारले तर ती नक्कीच थोडी संकटं सहन करुन जिथे नवरा तिथे असणं पसंत करेल.
(नवरा मुस्लीम देशात किंवा महाराष्ट्राबाहेर नोकरीवर आणि बायको म्हातारी होईपर्यंत घरी राहून सासू सासरे नणंद मुलं सांभाळते अशा एक दोन केसेस पाहिल्या आहेत आणि या बायकांनी ही लग्नं करायला नको होती असं वाटून गेलं आहे.)

अ दा - माझे सगळे लेख वाचायला बराच पेशन्स लागला असेल. कौतुक आणि धन्यवाद.

मामी - डॉ. शिंदेंचे लेख आता वाचणार आहे. खूपच ऐकलं आहे मायबोलीकरांकडून.

मी अनु - आपल्याकडे बायकांच्या बाबतीत इतकी अन्फेअर सिस्टिम राजरोसपणे पिढ्यान पिढ्या चालंत आली आहे हे पाहून माझ्यासारख्याची सुद्धा चिडचिड होते. तुम्हा बायकांना त्याचा किती त्रास होत असेल याची मला कल्पनाही करता येत नाही.

समुद्र हा त्यातल्या त्यात माझा जिव्हाळ्याचा विषय, मजा येतेय वाचुन आणि जानुण घ्यायला. येऊ द्यात अजुन. Happy

तुमची लेखनशैली इतकी सुंदर आहे की वाचताना जराही कंटाळा येत नाही आणि लेख पूर्ण वाचल्याशिवाय थांबायची इच्छा होत नाही. लिहीत रहा.>>>> +१००००

Pages