रविवार, ८ ऑक्टोबर २००६ ची संध्याकाळ. उद्या पासून आय.टी. कंपनी मध्ये करिअर ची सुरुवात होणार म्हणून शहरातील नामांकित दुकानांतून रूममेट मकरंद सोबत उत्साहात केलेली कपडे खरेदी. उद्यापासून आपण 'कमावते' होणार या कल्पनेने सुखावत आज ५-७ हजारांची खरेदी झाली होती. रिटर्न मान्सून आपले रंग दाखवायला तयार झाला होता आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते. अशात मेन रोड वरचे एक बरे हॉटेल दिसले. आज इथेच जेवण करू असे म्हणत मकरंदने बाइक पार्क केली आणि आम्ही दोघे हातातील पिशव्या सांभाळत हॉटेल मध्ये शिरलो.
हॉटेलचे मेन्यु कार्ड समोर येताच एक एक डिश ऑर्डर केली. सपाटून भूक लागल्यामुळे भरपूर खाणे झाले. जेवण संपत आलेच होते तेवढ्यात धडाड धूम असा आवाज करत वीज कडाडली. लागलीच टपोऱ्या थेंबानिशी पाउस सुरु झाला. रात्रीचे ९.३० - १० झाले असतील. बाहेर मुसळधार पाउस सुरु होता पण आता हॉटेल मध्ये बसणे शक्य नव्हते. ताटकळलेले भुकेले जीव टेबल कधी रिकमे होतेय याची वाट बघत दाराशी थांबलेले असल्यने बाहेर पाउस असून देखील निघावेच लागले.
हॉटेलच्या बाहेर आलो आणि पावसाचा अंदाज घेतला. अशा पावसात बाइकने रूमवर जाणे शक्य नसल्याने आम्ही दोघेही हॉटेलच्या शेजारीच इतर दुकानांसमोर असलेल्या शेडवजा जागेत थांबलो. तिथे पाउस पोचत नसल्याने आम्ही भिजत नव्हतो. रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे दुकाने बंद झाली होती. स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात जेवढे दिसू शकते तेवढेच अंधुक-अंधुकसे दिसत होते. पावसाच्या सरी त्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात चमकत होत्या. आम्ही दोघे जिथे उभे होतो तिथून ८-१० फुट अलीकडे पुरेशा प्रकाशात दिसतील अशा रीतीने ३ मध्यम वयीन स्त्रिया पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून थांबलेल्या.
१०-१५ मिनिटे झाली तरी पाउस कमी होत नव्हता उलट वाढलाच होता. किती उशीर असे हातात पिशव्या घेऊन उभे राहणार? भरपेट जेवण झाल्यामुळे उभा राहवत नव्हते. कधी एकदा रूमवर जाउन झोपेन असे झाले होते. मकरंद आणि मी दोघेही अक्षरशः कंटाळलो होतो. आमचे बोलणे सुद्धा थांबले होते. पावसाच्या जोरदार सरींचा आवाज येत होता आणि आमच्या बाजूला थांबलेल्या ग्रुपच्या गप्पा कानावर पडत होत्या. काहीतरी टाईमपास व्हावा असे वाटून आम्ही दोघेही गप्पा ऐकू लागलो. हा ग्रुप पक्का शहरी आणि सोफिस्टीकेटेड वाटत होता. टिपिकल शहरी 'अशणार-नशणार-बशणार-घाशणार-पुशणार' असल्या सानुनासिक शब्दांनी आमची चांगलीच करमणूक होत होती. गप्पांच्या ओघात त्यांच्या घरगुती समस्या सुद्धा आम्हाला ऐकू येत होत्या. अशा गप्पा ऐकून हसावे-कि-रडावे हे सुद्धा समजेनासे झाले होते. भर पावसात आमचे मनोरंजन चालू होते.
सासू-सुना, पालकत्व, नोकरी, व्यवसाय, भिशी, स्वयंपाक अशा भरमसाठ विषयांवर गप्पा मारणाऱ्या त्या शहरी स्त्रिया नक्की कशा दिसतायत हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे शेवटी न राहवून मी पाठीमागे वळून बघितले. बघतो तर काय त्यातील एक स्त्री खूपच ओळखीची वाटली. एकदम साध्याशा महाराष्ट्रीय पद्धतीने शिवलेल्या पंजाबी सूट मधील ती स्त्री अगदी आमच्या घरी आलेली होती असे वाटण्या इतपत ओळखीची वाटली. मी मकरंदला विचारले सुद्धा कि तू यांना कुठेतरी पहिले आहेस का म्हणून. पण त्याने सपशेल नकार दिला. अचानक मला काहीतरी आठवले आणि तोंडून उद्गार बाहेर पडले,
"अरे.. हीच ती.. गोट्याची आई...!!"
"कोण गोट्याची आई...? काय पागल झालायंस का..?"
"अरे ती रे ती.. 'गोट्या' सिरियल ... त्याची ती आई.. म्हणजेच 'माई'.. आठवतेय का...?"
"काय ते स्पष्ट सांग बरं... कुठला गोट्या.. कुठली माई..?"
"अरे ती मराठी सिरियल 'गोट्या'.. आपण लहान असताना दूरदर्शन वर पाहायचो... तुला सांगतो ती १००% गोट्याची माईच आहे...!!"
त्यावर मकरंदने त्या स्त्रीला पुन्हा एकदा न्याहाळून बघितले आणि उत्तरला,"काहीही बोलतोस लेका... ती कशाला येईल इथे पावसात रस्त्याकडेला उभा राहायला..! तिला काय कामधंदे नसतील काय..?"
"अरे तीच आहे गोट्याची आई.. थांब विचारतोच त्यांना..!"
"अरे काय वेडा-बिडा झालायंस का..? भर रस्त्यात कुणालाही काहीही विचारून फुक्कट पाणउतारा करुन घ्यायचाय का..?"
आमचे आपसातील बोलणे आणि मधून-मधून त्यांच्याकडे बघणे एव्हाना ग्रुप मेम्बर्सच्या लक्षात आले. बहुतेक या पोरांनी आपणाला ओळखलेले आहे हे 'गोट्याच्या आई'च्या लक्षात आले असावे. त्या सावध झाल्या. त्यांच्या गप्पांचा ओघ पण कमी झाला. तेवढ्यात मी मकरंदच्या बोलाण्याकडे दुर्लक्ष करून थेट त्या ग्रुप जवळ गेलो. माझी पक्की खात्री पटली कि हीच ती गोट्याची आई आहे.
मी सरळ त्या स्त्रीला प्रश्न केला, "तुम्ही गोट्याच्या माई ना..? म्हणजे.. मला असं म्हणायचंय कि तुम्ही फार वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या मराठी सिरियल मध्ये गोट्याच्या आईचा रोल केला होता ना..?"
त्या स्त्रीच्या आजू-बाजूला उभ्या असलेल्या दोन स्त्रिया आश्चर्यमिश्रित हावभावात एकदा तिच्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहू लागल्या. माझ्या अशा वागण्याने इकडे मकरंदचे धाबे दणाणले होते. त्याची चलबिचल सुरु झाली.
तेवढ्यात ती स्त्री म्हणाली, "हो... मीच ती भूमिका केली होती. खूप वर्षं झाली ती सिरियल करून. अजून आठवते का ती सिरियल..?"
"हो तर... किती छान होती ती सिरियल. आठवड्यातून एकच एपिसोड असलेल्या त्या सिरियलची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. पण आम्हाला तुमचे खरे नाव काय आहे ते माहित नाही."
माझ्या उत्तराने त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू आले आणि त्यांनी त्यांचे नाव सांगितले - मानसी मांगीकर.
माझे हे असे अनोळखी व्यक्तीसोबत संभाषण करण्याने हवालदिल झालेल्या मकरंदला पण त्यांनी जवळ बोलावले. त्याचीही विचारपूस केली. आमचे गाव कोणते इथे काय करता याची विचारणा केली. माझा उद्या नोकरीचा पहिला दिवस आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. मला शुभेच्छा दिल्या. तोवर पाउसही कमी झाला आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो.
९ वर्षांनंतर हा प्रसंग आठवायचे कारण असे कि आजही संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून घरी येतो तेव्हा घरात टि.वी. वर 'का रे दुरावा' सिरियल सुरु असते आणि 'गोट्या' मधील सोज्ज्वळ, मायाळू, प्रसन्न व्यक्तिमत्वाची 'गोट्याची आई' मानसी मांगीकर आता 'का रे दुरावा' मध्ये केतकर काकूंची भूमिका त्याच ताकदीने वठवत असतात..!
छान. गोट्या आठवतो पण आई
छान.
गोट्या आठवतो पण आई नाही.
जरा गुगलायला पाहिजे.
गोट्याच्या आईची भुमिका मानसी
गोट्याच्या आईची भुमिका मानसी मागीकर ह्यांनी केली ते बरोबर आहे पण त्याचा पडघवलीशी काही संबंध नाही.
गोट्या (ना धो ताम्हनकर) आणि पडघवली (गो नी दांडेकर) ही दोन स्वतंत्र पुस्तके आहेत.
@ नताशा : अहो, चु.भु
@ नताशा : अहो, चु.भु द्यावि-घ्यावि... अचानक समोर 'गोट्याची आई' आल्यामुळे माझी धान्दल उडाली म्हणुन असा गोंधळ झाला... तरिही तुम्ही हा गोंधळ वाचकांपर्यंत पोहोचु दिला नाहित याबद्दल आभार..! (मी सदर चुक दुरुस्त केली आहे...!!)
.
.
खुसखुशीत लिहिलाय लेख धनंजय
खुसखुशीत लिहिलाय लेख धनंजय तुम्ही !
का रे दुरावा मधे त्या पहिल्यांदा स्क्रीन वर आल्यावर माझी पण हीच रीअॅक्शन होती..ह्या तर गोट्याच्या माई !! काही काही सीरीयल्स नी आपल्या मनावर कसले गारुड केले आहे नाही, मुळात आपण तेव्हा लहान, संस्कारक्षम वयात ही होतो आणि ह्या सगळ्या मालिका खरचं खुप सुंदर ही होत्या.
तरूणपणी पुढचे पाऊल असे काहीसे
तरूणपणी पुढचे पाऊल असे काहीसे नाव असलेल्या चित्रपटात सुनेची भुमिका करणारी नटी (तिला जाळले जाते - एकाच ह्या जन्मामधी फिरूनी नवी जन्मेन मी हे गाणे होते) ती हीच का?
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मन:पुर्वक आभार..!!
@ अनघा : मला नाही सांगता येणार
तरूणपणी पुढचे पाऊल असे काहीसे
तरूणपणी पुढचे पाऊल असे काहीसे नाव असलेल्या चित्रपटात सुनेची भुमिका करणारी नटी (तिला जाळले जाते - एकाच ह्या जन्मामधी फिरूनी नवी जन्मेन मी हे गाणे होते) ती हीच का? >>>> हो अनघा..
छान लेख, आवडला. मला पण गोट्या
छान लेख, आवडला.
मला पण गोट्या सिरियल खूप आवडायची. गोट्याचं काम जॉय घाणेकर ने केलं होतं आणि त्याच्या बहिणीचं नाव बहुतेक प्राची साठे नॉट शुअर.
छान लिहिले आहे आवडल.
छान लिहिले आहे आवडल.
प्रतिक्रियांबदल सर्वांचे
प्रतिक्रियांबदल सर्वांचे आभार...!
अनघा, हो. सिरियल चं नाव ते
अनघा, हो. सिरियल चं नाव ते नाहिये पण. उदय टिकेकर नवरा असतो
@ aashu29 : तुम्ही म्हणताय ती
@ aashu29 : तुम्ही म्हणताय ती सिरिअल 'आव्हान' त्यात उदय टिकेकर नवरा, दया डोंगरे सासु असते... ज्यात मानसी मांगीकर नाहित... @ अनघा म्ह्णतात तो मराठी सिनेमा आहे ज्याचं नाव - पुढचं पाउल...!