ॐ नमोजी आद्या
कैलासावर शिव पार्वतीसह हास्य विनोदात रमले होते. तितक्यात, देवर्षी नारदांची स्वारी तिथे प्रवेश करती झाली.
"नारायण...नारायण"
"काय नारदा? कसं काय येणं केलंत?"
"आलो असाच समाचारासाठी. देवाधिदेवा, हे एक फळ आणलंय. पण आता कार्तिकेयाला द्यावे की गणेशाला, असा संभ्रम निर्माण झालाय.."
"हं.. आहे खरा संभ्रम! आपण असे करुया, त्या दोघांतील जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करुन प्रथम येईल त्याला हे फळ देऊयात.."
"कार्तिकेयाss, गणेशाss" पार्वती देवींनी साद दिली.
"हे बघा, दोघांपैकी जो आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला हे फळ देणार आहेत नारद ऋषी!"
"अरे वा ! मी आत्ता मयुरावरुन जाऊन येतो पटकन!!" कार्तिकेय मयुरावर आरुढ होऊन गेला.
गणेशास त्या मूषक वाहनाबरोबर बघुन पार्वतीमातेला मनातून वाटले, आता हा कधी करेल पृथ्वी प्रदक्षिणा ? तितक्यात बाल गणेशाने महादेव आणि देवींभोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हणाला, "झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा"
"काय..? झाली..?"
"हो. माझे माता पिता म्हणजेच माझे विश्व आहे. माझी पृथ्वी आहे. मी तुम्हा दोघांना घातली प्रदक्षिणा!"
ही कथा वाचली की अजूनही मला बाल गणेशाच्या बुध्दी सामर्थ्याचा अचंबा वाटतो. खरोखर सिध्दी, बुध्दी व शक्तीची देवता श्रीगणेश. गणपती सर्वश्रेष्ठ ईश्वर आहे. तोच या विश्वाचा निर्माता आणि नियंता आहे. गणपती म्हणजे ऐश्वर्याची, समृध्दीची देवता. सुखकर्ता-दुखःहर्ता, असा हा भक्तांच्या श्रध्देला फळ देणारा, बळ देणारा वरदविनायक आहे.
समर्थ म्हणतातच, "ऐसा जो परम समर्थ I पूर्ण करी मनोरथ II"
बाल गणेशाचे ते लोभस तुंदिलतनू रुपडे, चालताना पायातील पैंजणाचा गुंजारव, चेहर्यावरचे ते सात्विक भाव, सतत आशीर्वादासाठी उंचावलेला कर...हे सगळे सगळे लोभस. हा गजानन म्हणजे आदिदेव. प्रत्येक देवतेकडे बघून खरंतर एक भाव जागृत होत असतो. गजाननाकडे बघून माझ्या मनी एक आश्वस्थ लोभसवाणा, गोजिरवाणा भाव जागृत होतो. सुमुखाचे ते बुध्दी वैभव, सतत भक्तांपाठी उभी राहणारी शुभंकर मूर्ती.. कुठल्याही कार्याचा शुभारंभ होतो केवळ या मंगलमूर्तीच्या आशीर्वादाने. कार्यारंभी श्रीगणेशपूजनाची परंपरा वैदिक काळापासूनच आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायु, जल म्हणजे श्रीविनायक आहे. भूत, वर्तमान, भविष्य या तीनही कालांचा स्वामी म्हणजे श्रीगणेश. म्हणूनच सर्व विश्वाचा मूलाधार, मूळारंभ तो आहे.
त्वं गुणत्रयातीत: I त्वं देहत्रयातीत: I त्वं कालत्रयातीत I
त्वं मूलाधारस्थितोsसि नित्यं I त्वंशक्तित्रयात्मक: I
अगदी लहानपणी पहिल्यांदा शिक्षणाचा प्रारंभ होतो तो श्रीगणेशाने, ग म भ न ने. असा हा गणपती म्हणजे कोट्यावधी लोकांचे श्रध्दास्थान असलेली देवता. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूप्रमाणेच भारताबाहेरही अनेक ठिकाणी पूजली जाणारी देवता. सर्व गणांचे ईश्वर, गणनायक, विघ्नविनाशी अशी ही गणपती देवता फक्त गाणपत्य संप्रदायाचेच नाही तर कोट्यावधी भविकांचे श्रध्दास्थान. या बुध्दिच्या, विद्येच्या देवतेचा जन्मदिवस म्हणजे गणेश चतुर्थी.
गणेश जन्म दोन तिथींना झाला असे मानण्यात येते, माघी शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी. त्यामुळेच गजाननाला द्वैमातुर म्हणूनही ओळखले जाते. या द्वैमातुर नामाच्या दोन उत्पत्ती आहेत, एक म्हणजे वर निर्देशीत केलेली आणि दुसरी गणेश जन्माची. अशी कथा प्रचलित आहे की पार्वतीने चिखलापासून गणपती तयार केला व गंगा नदीच्या तीरावर गंगेच्या जलवर्षावामुळे किंवा ते जल त्या चिखलाच्या मूर्तीवर पडल्यामुळे त्या मूर्तीत प्राण निर्माण झाले. म्हणजेच गणपतीचा जन्म दोन मातांपासून झाला. द्वैमातुर म्हणजे दोन माता असलेला. गणेश जन्माच्या बर्याच आख्यायिका प्रसिध्द आहेत.
गणेशाचा उल्लेख अगदी प्राचीन ग्रंथापासून आढळतो. गणपतीचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात आढळतो. हा वैदिक गणपती आणि नंतरचा पौराणिक गणपती जरी एक नसले तरी त्या ऋग्वेदातील गणपतीपासुनच पौराणिक गणपतीचे रुप उद्भवले आहे. शिव पुराण, स्कंद पुराण, बृहध्दर्म पुराण, ब्रम्हवैवर्त पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, देवी पुराण, मत्स्य पुराण, वामन पुराणात गणपतीचे उल्लेख सापडतात. ॐकार स्वरुप म्हणजे समस्त ओम. ॐ म्हणजे स्वराची प्राथमिक निर्मिती. असे हे शुभारंभाचे रुप म्हणजे ॐकारस्वरुप गणेश.
ॐकार स्वरुपा, सदगुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुज नमो !
पुराणात व साहित्यात सापडणारे प्रमुख उल्लेख मुदगल पुराण, गणेश पुराण, गणेश भागवतात आहेत. गणेश उपासना करणार्यांचा गाणपत्य संप्रदाय आहे. उपपुराण मानल्या गेलेल्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुदगल पुराणात गणपतीच्या अवतारांचे उल्लेख आहेत. गणेश पुराणातही एकुण चार अवतार सांगितले आहेत.
सत्य, त्रेता, द्वापार आणि कलीयुगाचे मिळुन चार अवतार येथे उल्लेखले आहेत:
महोत्कट विनायक: हा सत्ययुगातील अवतार. कश्यप आणि अदितीचा पुत्र. दशभुजधारी, वाहन सिंह असलेला.
मयुरेश्वर: हा त्रेतायुगातील शिवपार्वती पुत्र. षडभूजधारी असून वाहन मोर आहे.
गजानन: हा द्वापारयुगातला हा अवतार असून शिवपार्वतीचा पुत्र म्हणूनच हा अवतार घेतला आहे. चतुर्भुज असून वाहन उंदीर आहे.
धुम्रकेतू: हा कलियुगातील अवतार असुन वाहन घोडा आणि द्विभुज असे वर्णन केले गेलेले आहे.
इथे युग म्हणजे त्या त्या युगाचा गुणविशेष असा अर्थ घेतला आहे. जसा सात्त्विक, राजस भाव असणारे सत्य युग, राजस भावाबरोबर तमाचे अधिपत्य असलेले त्रेता युग आणि तामस भाव वाढीस लागलेले कलियुग. अश्या समस्त भावांमधे श्रीगणेशाची उपस्थिती आहेच. सत्व, तामस आणि राजस या सर्व गुणांचा स्वामी श्री. गणराज आहे.
गणेशाची आठ रुपे मुदगल पुराणात बघावयास मिळतात. मनुष्याचे षड् रीपू म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि माया. त्या एकेक शत्रूचा बिमोड करणारा एक एक अवतार या पार्वतीनंदनाचा आहे असे मानण्यात येते. मुदगल पुराणात खालील एकुण आठ अवतारांचे वर्णन बघावयास मिळते. अवतार आणि त्या अवतारातील असुर शक्ती खालील प्रमाणे:
वक्रतुंड (मत्सर)
एकदंत (मदासुर)
महोदर (मोहसुर)
गजवक्त्र (लोभासुर)
लंबोदर (क्रोधासुर )
विकट (कामासुर )
विघ्नराज (ममतासुर)
धुम्रवर्ण (अभिमानासुर)
साधारण तीन प्रकारच्या गणेशमूर्ती बघावयास मिळतात- आसनस्थ, नृत्यरत आणि उभी. मुर्ती चतुर्भुज असते एका हातात पाश, एका हातात अंकुश, एका हातात मोदक तर एक हात सदैव आशीर्वादासाठी. पोटावर सर्प आणि बर्याचदा वाहन मूषक. गणेशरूपाचे वर्णन जसे अनेक प्रकारे वाचावयास मिळते तशाच अनेक कथाही पुराणात सापडतात जसे कुबेर कथा, सिंदूर राक्षस, गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा, चिंतामणीची कथा, चंद्राला मिळालेला शाप अशा अनेक. गणेशाच्या प्रत्येक नव्या मागे रुपामागे एक आख्यायिका आहेच.
अकार चरणयुगुल I उकार उदर विशाल I मकार महामंडल मस्तकारे I
हे तिन्ही एकवटले I तेथ शब्दब्रम्हं कवळले I ते मियां श्री गुरुकृपे नमिले I आदिबीज II
असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात म्हणतात. त्याच्या रुपाचे वर्णन करताना एकदंत, लंबोदर, शुर्पकर्ण अश्या प्रत्येक नावात आणि वैशिष्ट्यात एक गुण लपलेला आढळतो. प्रत्येक पुराणात गणपतीच्या जन्म कथा वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्या चारही युगातील अवतारांचे वर्णन पण वेगवेगळे आहे. तो सगळा अभ्यासाचा भाग झाला. संशोधनाचा भाग झाला. परंतु त्याच्या प्रत्येक नामाचा अर्थ, त्यामागची भूमिका मला फार मोहात पाडते. चारही युगातल्या गणेश अवतारां बरोबर विनायकाची तुंदिलतनू बर्याच नावाने ओळखली जाते. सुमुख, एकदंत, कपिल, लंबोदर, विघ्नराज, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन, वक्रतुंड, शूर्पकर्ण, हेरंब, स्कन्दपूर्वज, सिद्धिविनायक, विघ्नेश्वर, महागणपती. प्रत्येक नावामागचा आणि रुपामागचा, आयुधांमागचा, वाहनांमागचा प्रतिकार्थ बघवयास गेले तर बरेच नामगुणधर्म दिसतात जसे:
सुमुख सुंदर मुखमंडल असलेला तो सुमुख. ज्याचे मुख चंद्राप्रमाणे सुंदर आहे. छोटेसे नेत्र जे गांभिर्य दाखवतात, लांब सोंडेचे नाक आणि मोठे कान त्याची बुध्दीमत्ता दाखवतात. असा हा आल्हाददायक मुखमंडल असणारा सुमुख.
एकदंत या नामामागे सुध्दा एक कथा आहे. काही पुराणांप्रमाणे असे येते, जेव्हा माता पार्वती स्नानकरत होती तेव्हा द्वाराजवळ परशुरामाला गजाननाने अडवले. परशुरामाने क्रोधीत होउन या कृष्णपिंगाक्षावर वार केला आणि त्याच्या एका दातावर प्रहार करुन तो तोडला. हे एकदंत रुप म्हणजे अद्वैताचे द्योतक आहे. जेव्हा कुठलाही मनुष्यप्राणी दोलायमान अवस्थेत असतो, मनाची अवस्था जेव्हा दोलायमान असते तेव्हा त्याला यश प्राप्ती होत नाही. एकच धेय निश्चिती असलेला मनुष्यच त्या ध्येयाची निश्चित प्राप्ती करु शकतो. तिथे जर अनेक विकल्प उभे असतील तर आपण म्हणतो त्या बोलीभाषेतील म्हणी प्रमाणे "एक ना धड भाराभार चिंध्या" अशी अवस्था होते.
कपिल शूर्पकर्णाचे हे नाव गोधनाशी जवळीक साधणारे आहे. ज्याप्रमाणे गोरस म्हणजेच दुग्ध, घृत, दही मनुष्याला आरोग्य प्रदान करुन सामर्थ्यशाली बनवतात तद्वतच गणेश विद्येचे घृत, विचारांचे दुग्ध आपल्याला प्रदान करत असतो. त्यामुळे त्याचे कपिल हे नाम अश्या प्रकारे प्रतिमात्मक वाटते.
शूर्पकर्ण म्हणजे सुपा सारखे कान असणारा. यातील गर्भित अर्थ असा की श्रवणाने ज्ञानात भरच पडते. वाचाळते पेक्षा श्रवणभक्ती अती उत्तम आणि ती तुम्ही आचरणात आणावी असाच सुचितार्थ भक्तांना मिळतो.
लंबोदर लंब उदर म्हणजे मोठे पोट असलेला. हे मोठे पोट असेच दर्शवते की जे काही भक्षिता त्याचे पचन करुन ते सुयोग्य पध्दतीने म्हणजेच बलरुपाने साठवा. जे जे काही चांगले असेल ते स्वत मधे उतरवा आणि पचनी पाडून त्याची जपणूक करा.
विकट गजाननाने मार्गात येणार्या सर्व असुरांचा जसा वध केला तसेच विकटपण प्रत्येक दुष्ट गोष्टीविरुध्द प्रत्येकाने धारण केला पाहिजे. परशुरामांपूढे सुध्दा गजमुखाने माघार घेतली नव्हती.
विघ्ननाशक देवाधीदेव गजाननाने सर्व विघ्नांचा नाश केला. मार्गात येणारी सर्व विघ्ने हरण केली म्हणुन तो विघ्नेश्वर. गणेश भक्तांच्या मनातील भय दूर करतो म्हणजेच विघ्न जे असते त्याचे हरण करतो.
विनायक इथेही परत तोच अर्थ निघतो विघ्नांचा नाश करणारा. त्या विघ्नांना, शत्रूला काबुत आणणार तो विनायक, यामधे वि म्हणजे विघ्न या अर्थी आणि नायक म्हणजे त्यांना काबुत आणणारा त्याच्यावर वर्चस्व गाजवणारा असा अर्थ अभिप्रेत आहे.
धुम्रकेतू म्हणजे अग्नी. अग्नी प्रमाणे हा शिवसुत सगळ्या दुष्ट शक्तींचे, राक्षसी प्रवृतीचे दहन करतो आणि मनुष्याला प्रगतीचे बळ देतो.
गणाधीश म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे नर, आसूर, नाग, चारही वेद, चार पुरुषार्थ असा अर्थ घेतल्यास या समस्त जनांचा स्वामी तो गणाधीश असा विचार मिळतो. संपुर्ण ब्रम्ह म्हणजे विश्वाचा अधिपती तो गणाधिपती, गणांचा अधिपति.
भालचंद्र भाळी चंद्र ल्यायलेला तो भालचंद्र असा याचा वाच्यार्थ होतो. विचारांनी येणारा शांतपणा ज्याच्या भाळात आहे म्हणजे शांत विचारांनी वृतीत येणारी शीतलता. ही शीतलता म्हणजे चंद्रच असा गर्भितार्थ त्यातुन निघू शकतो. तसेच चंद्राला जे ब्रम्ह जाणतात, त्यांचा राजा म्हटलेले आहे. संपुर्ण ब्रम्हाचे ज्ञान एकदंताकडे आहे, असाही दूसरा अर्थ काढता येईल.
गजमुख गणेशाचे गजमुख बुध्दीचा संदर्भ दर्शवते. हत्तीमुखाचा विचार करता, हत्ती म्हणजे बुध्दीवान प्राणी मानला जातो. गणेशाचे शिर हत्तीचे आहे, म्हणजे अतिशय बुध्दिमान असा श्रीगणेशाचा गुण आहे.
गजानन या नामा मध्ये ग म्हणजे गती आणि ज दर्शवतो जन्म. गज म्हणजे ज्याच्या पासून जन्म घेतला त्या ईश्वरातच परत विलीन व्हायचे. जन्मजन्मांची जी गती असते, ती गती म्हणजे गज. दूसरे असे की, गज म्हणजे ब्रम्हद आणि हत्तीच्या मानाने मनुष्य देह म्हणजे सूक्ष्मद, तर मनुष्य देहावर हत्तीचे मुख म्हणजे सुक्ष्मद आणि ब्रम्हद यांचे झालेले एकजिवीत्व.
या नामांबरोबर गणपती म्हणजे पाश, अंकुश ही आयुधेही येतात. तसेच गणेशाची ती प्रसन्न हसणारी अभय मुद्रा, एक पाय हवेमधे उचलुन आसनस्थ झालेली ती हेरंबाची मूर्ती. विनायकाच्या या रुपामधे आणि आयुधांमधे बराच अर्थ आपणास मिळतो. ही प्रतिकात्मक रुपे म्हणून योजिली आहेत असेच वाटायला लागते. जसा एक पाय हवेमधे आणि एक जमिनीवर अशी आसन स्थिती असते. म्हणजे हवेमधे एक पाऊल असले तरी दूसरे पाऊल कायम जमिनीवर असलेच पाहिजे. कुठल्याही गोष्टीचे टोक न गाठता सुवर्ण मध्य गाठला पाहिजे.
या चतुर्भुजाचे चार हात मन, बुध्दी, अहंकार आणि चित्त दर्शवितात व ही चारही तत्वे प्रत्येक मनुष्यात असतात. पण त्यांच्यावर अंकुश आत्म्याचा असतो. हाती असलेला पाश आणि अंकुश देखील अशीच प्रतिके आहेत. पाश म्हणजे इंद्रिय काबुत ठेवण्यासाठी व अंकुश म्हणजे संयमन.
गणपतीचे वाहन मूषक. त्यावरुन पण बरेच संदर्भ अभ्यासूंनी लावले आहेत. उंदीर म्हणजे अहंकार, तो अगदी सूक्ष्म रुपात आणि आपल्या अधिपत्याखाली असावा. तसेच उंदीर म्हणजे अगदी लहान प्राणी, हत्ती म्हणजे अगदी विशालकाय. गणपतीचे मस्तक हत्तीचे, देह मनुष्याचा आणि वाहन अगदी छोट्या प्राण्याचे हे दर्शवतात. समस्त सजीव सृष्टीचा निर्माता किंवा स्वामी गणेश आहे. म्हणूनच गणेशाला आदिदेव असे पण संबोधण्यात येते. माउलींनी पण म्हटले आहे,
ॐ नमोजी आद्या I वेद प्रतिपाद्या I जय जय स्वसंदेद्या आत्मरुपा II
गणपतीच्या एकंदर देहाचा आकृतीबंध बघितल्यास त्याचा आकार ॐ या बीजमंत्रासारखा दिसतो. असा संपूर्णपणे गणेश रुपाचा अभ्यास, त्याचे पूर्ण वर्णन बघितल्यावर वाटायला लागते गजाननाच्या प्रत्येक रुपात, प्रत्येक नामात, प्रत्येक आभूषणात, प्रत्येक मुद्रेत किती खोलवर अर्थ दडलेला आहे. सत्य व ब्रम्ह म्हणजेच श्रीगणेश. तो वक्ता आहे, श्रोता आहे, सर्वश्रेष्ठ दाता आहे, तोच आदि आहे आणि अंतिमही तोच आहे. दशदिशा व्यापून सर्व विश्वात केवळ गजाननच आहे.
अश्या या विघ्नहर्त्या, आद्य देवा पुढे नतमस्तक व्हायला होते. अपार श्रध्देने मस्तक जेव्हा त्याच्या चरणांवर झुकते तेव्हा मिश्किल हसत आणि वात्सल्याने तो आपल्याला जवळ घेतो. त्या समयी तो आपला जवळचा वाटतो. मनापासून तो "My Friend Ganesha" असाच वाटतो . नजरेसमोर त्याच ते साजिरं, गोजिरं, लोभस रुपडं येतं व तुकोबारायांच्या शब्दात म्हणावेसे वाटते,
गणराया लवकरी येई I भेटि सकलासी देई II
अंगी सिंदुराची उटी I केशर कस्तुरी लल्लाटी II
पायी घागर्या वाजती I नाचत आला गणपती II
तुका म्हणे पाही I विठ्ठल गणपती दुजा नाही II
सुरेख, खुप अभ्यासपुर्ण लेख.
सुरेख, खुप अभ्यासपुर्ण लेख. बर्याच नविन गोष्टी कळल्या
सुरेख लेख. मस्त लिहीलाय.
सुरेख लेख. मस्त लिहीलाय. सोबत फोटो पण हवे होते किंवा स्केच.
बासुरी, अगं अप्रतिमरित्या
बासुरी, अगं अप्रतिमरित्या गणेशाचं ध्यान व दर्शन घडवलंस या लेखातून
अप्रतिम लेख बासुरी!
अप्रतिम लेख बासुरी!
बासुरी, सुंदर लेख. खरच
बासुरी, सुंदर लेख. खरच अभ्यासपूर्णं.
<<बाल गणेशाचे ते लोभस तुंदिलतनू रुपडे, चालताना पायातील पैंजणाचा गुंजारव, चेहर्यावरचे ते सात्विक भाव, सतत आशीर्वादासाठी उंचावलेला कर...हे सगळे सगळे लोभस. हा गजानन म्हणजे आदिदेव. प्रत्येक देवतेकडे बघून खरंतर एक भाव जागृत होत असतो. गजाननाकडे बघून माझ्या मनी एक आश्वस्थ लोभसवाणा, गोजिरवाणा भाव जागृत होतो>>
हे मात्रं माझ्या मनातलं!
बासरीजी, उत्तम लेख || जय
बासरीजी, उत्तम लेख
|| जय गणेश ||
छान लिहीलं आहेस. अन हो,
छान लिहीलं आहेस. अन हो, कांदेला अनुमोदन.. फोटो / स्केच गजाननाचे असते तर आनंद द्विगुणित झाला असता.
गणाधीश जो ईश सर्वा
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
नमू शारदा मुळ चत्वार्वाचा
बासुरी, अप्रतीम!
गणेशाचे अगदी सर्वांगसुंदर वर्णन!
विनायकाने सुचविल्या प्रमाणे तुझ्या कुंचल्यातील रेखाटनांनी लेखाची शोभा चतुर्गुणीत झाली असती!
आभार!!! ॐ नमोजी आद्या करुन
आभार!!! ॐ नमोजी आद्या करुन गणेशचरणी वाहिलेली हि सेवा आपणास आवडल्या बद्दल...:)
धन्यवाद, अश्विनी, केपी, अनघा, प्रकाश, किशोर, शलाका, माणिक, कविता..
बासुरी खूप अभ्यासपूर्ण
बासुरी खूप अभ्यासपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.
अभ्यासपुर्ण लेख. नविन माहिती
अभ्यासपुर्ण लेख. नविन माहिती मिळाली. छान
बासुरी, अप्रतिम झालाय लेख.
बासुरी,
अप्रतिम झालाय लेख. अगदी संग्राह्य.
बासुरी (छान आहे ID
बासुरी (छान आहे ID तुझा).
बाकी लेख उत्तमच.
>> म्हणजेच गणपतीचा जन्म दोन मातांपासून झाला. द्वैमातुर म्हणजे दोन माता असलेला
हे नव्यानेच कळले.
आराध्यदैवताबद्दल अजुनही वाचायला आवडेल.
निव्वळ अप्रतिम! काय छान
निव्वळ अप्रतिम! काय छान माहिती वाचायला मिळाली बासुरी.
अजुन वाचायला आवडेल.
बासुरी, छानच गं.
बासुरी, छानच गं.
सुंदर लेख. सुरेख माहिती.
सुंदर लेख. सुरेख माहिती.
वाह !
वाह !
मस्त. बरीच नवीन माहिती
मस्त. बरीच नवीन माहिती मिळाली. लेख आवडला.
उत्तम माहिती बासुरी.
उत्तम माहिती बासुरी.
फार सुंदर लेख बासुरी..
फार सुंदर लेख बासुरी..
सुरेख, खुप अभ्यासपुर्ण लेख.
सुरेख, खुप अभ्यासपुर्ण लेख. बर्याच नविन गोष्टी कळल्या
बासुरी नेहमी प्रमाणे अप्रतीम
बासुरी नेहमी प्रमाणे अप्रतीम लेखन!
खूप चांगली माहिती मिळाली
खूप चांगली माहिती मिळाली लेखातून. धन्यवाद बासुरी.
धन्यवाद स्वाती ,सरसेनापती,
धन्यवाद स्वाती ,सरसेनापती, किरु, राधा, गौरी, चिनु, अश्विनी ,पराग ,सचिन, सुनिधी, मनस्मि, चेतना, अक्षरी आणि क्रांती..:)