भीष्मप्रतिज्ञेची फलश्रुती - भाग २

Submitted by अतुल ठाकुर on 28 May, 2014 - 00:03

Krishna_bhishma-wheel.jpg

गुरुवर्य नरहर कुरुंदकरांचे भीष्माबद्दलचे चिंतन अतुलनीय आहे. त्यात त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला आहे. भीष्म हा महाज्ञानी, महापराक्रमी, महातपस्वी असुनदेखिल तो महा अपयशी देखिल आहे यावर कुरुंदकरांनी नेमके बोट ठेवले आहे. निर्णय घेण्याची वेळ येताच महाज्ञानी भीष्म चुकीचे निर्णय घेऊ लागतो हे कुरुंदकरांनी घटनांचे पुरावे देऊन सिद्ध केलं आहे. पुढे या भीष्माविषयक चिंतनाच्या आधारे त्यांनी आजच्या काळातल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले आहे. समाजात चांगला कार्यक्रम आणि चांगली माणसे, वाईट कार्यक्रम आणि वाईट माणसे असा स्पष्ट भेद नसतोच. चांगल्या बाजुला असलेली सर्व माणसे चांगली नसतात आणि वाईटाच्या बाजुला उभी असलेली सर्व माणसे वाईट नसतात. महाभारत युद्धप्रसंगी हेच चित्र उभे राहिले होते. जिवनात पेचप्रसंग अशाच वेळी उभा राहतो जेव्हा यातुन निवड करण्याचा प्रश्न येतो. कुरुंदकरांनी इरावती कर्व्यांच्या युगान्तमधील भीष्मविषयक लिखाणाचादेखिल परामर्ष आपल्या चिंतनात घेतला आहे. भीष्म युद्ध आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत होता आणि दोन्ही बाजुंसाठी अडचणीचा झाला होता हे इरावतीबाईंचे प्रतिपादन महाभारताचा आधार नसणारे झाले आहे असे मत कुरुंदकरांनी व्यक्त केले आहे. कुरुंदकरांचे हे सारे चिंतन मुळातुनच वाचण्यासारखे आहे. प्रकांडपाडित्याचा आणि अफाट बुद्धीमत्तेचा तेजाळ लखल़खाट त्यात आहे. या दोन्ही विद्वानांना दंडवत घालुनच माझी मांडणी मी आता करतो. ज्ञानदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटले आहेच. राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

आपल्या परंपरेत स्तोत्रांमध्ये शेवटी फलश्रुती दिली जाते. या स्तोत्र पठणाने काय फल मिळेल याचे त्यात वर्णन असते. भीष्माच्या आयुष्याचा कणा असलेल्या भीष्मप्रतिज्ञेची फलश्रुती काय झाली या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न एका समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याचा आहे. पहिला मुद्दा, भीष्माचे सारे निर्णय ही त्याची वैयक्तिक बाब आहे असं म्हणता येईल का? मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. विशेषतः जेव्हा एखादी लायक व्यक्ती जी राजपुत्र आहे अशा व्यक्तीने पित्यासाठी निर्णय घेताना राज्याचा विचार केला होता कि नाही? जनतेचा विचार केला होता कि नाही? राजपुत्राने निर्णय घेताना कुठलाही निर्णय ही त्याची खाजगी बाब असु शकत नाही असे माझे मत आहे. हे मत आजच्या काळाला किंवा लोकशाहीला समोर ठेऊन बनवलेले नाही. ज्याच्यावर राज्याची जबाबदारी आहे किंवा येणार आहे त्याने निर्णय घेताना ती जबाबदारी दृष्टीआड करण्याची मुभा त्याला नसते असे मला वाटते. यावर कदाचित असेही बोलले जाईल कि सत्यवतीची मुले मोठी होईपर्यंत जबाबदारी भीष्मावरच राहणार होती त्यामुळे त्याने कितीही टाळलं तरी राज्यकारभार त्यालाच करावा लागणार होता. याबद्दल अधिक विवेचन पुढे येईलच.

दुसरा मुद्दा, भीष्माला इच्छामरणाचा वर शंतनुने दिला होता त्याबद्दलचा आहे. यावरामुळे भीष्म हा इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा महाभारतात अगदी वेगळा झाला आहे. कर्ण कवचकुंडलांमुळे अवध्य झाला होता, ती काढुन घेतली आणि त्याचे ते सामर्थ्य नाहिसे झाले. कृप आणि अश्वत्थामा हे चिरंजीव होते. मात्र मृत्युला इच्छेप्रमाणे थांबवण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त भीष्माकडेच होते. हे सामर्थ्य जर श्रीकृष्णाला क्षणभर देव मानलं नाही तर त्याच्याकडेही नव्हते असे म्ह्णावे लागते. आपल्याकडे शेवटचा दिस गोड व्हावा यासाठीच सारा अट्टाहास चाललेला असतो. मात्र भीष्माच्या आयुष्यातील शेवटचा दिस गोड होण्यासाठीचा वर त्याला अगदी तारुण्यातच मिळाला आहे. त्याच्या प्रदीर्घ आयुष्यातील सत्कर्माचा तो परिपाक नव्हे. त्यामुळे भीष्माने आयुष्यात जी काही कर्मे केली त्याबद्दल कर्मवाद्यांचे मत काय असणार आहे? ते सारे वर्तन योग्य होते कि अयोग्य? कर्म सिद्धांताप्रमाणे भीष्माने घेतलेले सारे निर्णय योग्य आहेत असेच म्हणावे लागणार किंवा त्याच्या निर्णयाची फळं त्याला त्याच आयुष्यात मिळाली असे तरी म्ह्णावे लागणार. कारण भीष्म हा द्यु नावाचा अष्टवसुंपैकी एक वसु आहे. तो शापामुळे पृथ्वीवर अडकलेला आहे. बाकीचे सारे गंगेने जन्मतःक्षणीच बुडवुन मारलेले आहेत आणि त्यांची सुटका केली आहे. मात्र गाय चोरण्याचा कट ज्याने रचला तो वसु भीष्माच्यारुपाने आपली शिक्षा भोगतो आहे. शिक्षा संपल्यावर त्याला दुसरा जन्म नाही. त्यामुळे त्याच्या निर्णयाचा, वर्तनाचा मागोवा घेणे शक्य आहे अशी माझी समजुत आहे.

तिसरा मुद्दा, भीष्माचा पराक्रम, त्याचा अनुभव, त्याचं ज्ञान आणि त्याचा ज्येष्ठपणा याची कौरव आणि पांडवांनी कितपत बुज राखलेली आहे? त्याला राजसुय यज्ञ्याच्या अग्रपुजेचा मान देण्याचा मोठेपणा पांडवांनी दाखवला हे एकमेव ठळक उदाहरण. अर्थात तो भीष्मानेच नाकारला. त्यानंतर एकदम युद्धाच्या शेवटी बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहात भीष्म पडला असताना शांती पर्वात युधिष्ठीर त्याच्याकडे उपदेश घेण्यासाठी गेला. त्या अगोदर यासाठी युधिष्ठीराला वेळ मिळालेला दिसत नाही. नैतिकतेचा धागा त्यातल्या त्यात पीळदार फक्त युधिष्ठीरातच होता असे दाखवण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही उपदेश परंपरा; बाकी पांडवांना कधीही कुणाच्या उपदेशाची गरज भासलेली दिसत नाही. श्रीकृष्णाने सल्ला वेळोवेळी दिला. उपदेश फक्त गीतेतच आणि तो देखिल अर्जुनाला संभ्रम झाला म्ह्णुन. कौरवांच्या बाजुने विदुराने नीतीचे धडे दिले त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचं दिसतं. उपदेशच म्ह्णायचं झालं तर कणिक नावाच्या कुटील नीतीज्ञाचा उपदेश कौरवांनी ऐकला आणि बहुधा अंमलात देखिल आणला. मात्र महाज्ञानी भीष्माला काही विचारण्याची तसदी कुणीच घेतलेली दिसत नाही.

चौथा मुद्दा, भीष्माच्या पराक्रमाचा, ज्ञानाचा, ज्येष्ठतेचा, त्याने आजन्म केलेल्या कुरुराज्याच्या सेवेचा प्रभाव एकुणच राजकारणावर आणि राज्यकर्त्यांवर कितपत होता? येथे मला अनिवारपणे भीष्माची तुलना गांधींशी करावीशी वाटते आहे. गांधीची मते, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे निर्णय कुणाला पटोत न पटोत मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत काँग्रेसला आपल्यामागुन फरफटत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते हे मान्य करावे लागेल. जनतेवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. ते जातील तेथिल दंगली ओसरत असत. ते उपोषण करायला बसल्यावर काँग्रेसला चरफडत का होईना पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याचा निर्णय घ्यावा लागत असे. याला कुणी भावनिक अडवणुकही म्हणु शकेल. पण ते सामर्थ्य गांधीमध्ये होते आणि ते भीष्माप्रमाणे त्यांना घराण्याच्या वारसाहक्काने मिळाले नव्हते. गांधींचे सामर्थ्य त्यांच्या राजकारणातुन,त्यांच्या देशसेवेतुन निर्माण झाले होते. याउलट भीष्माचे सामर्थ्य उत्तरोत्तर ओसरतच गेलेले दिसते. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भीष्माचा सहभाग नाही. त्याच्याकडे कुणीही सल्ला मागायला जात नाही. निर्णय भीष्माच्या मताविरुद्ध गेला तर तो बदलुन घेण्याचे सामर्थ्य भीष्मात नाही. याउलट दुर्योधन म्हणेल त्याप्रमाणेच घटना घडत गेलेल्या दिसताहेत.

मुद्दे अनेक आहेत. त्यांचा परामर्ष पुढील विवेचनात घेतला जाईलच. मात्र राजकारणात काय किंवा समाजकारणात काय निव्वळ पराक्रम, ज्ञान, अनुभव, याव्यतिरिक्त देखिल आणखि काहीतरी माणसाकडे असायला हवं असं भीष्माकडे पाहताना वाटत राहतं. हे आणखि काहीतरी म्हणजे काय याचादेखिल शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण ज्ञान, पराक्रम, अनुभव या सार्‍या गोष्टी भीष्मामध्ये एकवटुनसुद्धा तो एकटा पडला असेच चित्र महाभारतात दिसुन येते. (क्रमशः)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख
काही ठिकाणी पटत नाही.. पण बर्याच जागी योग्य विचार वाटतात
आक्षेप आपले लेख पुर्ण झाल्यावरच लिहीले जातील कारण बहूतेक पुढच्या लेखांमधे माझी उत्तरे सापडतील.
मी महाभारताचे प्रत्येक घटना आणि व्यक्ति देवत्व न लावता बघत आहे म्हणून काही भाग पटत नसतील

अतुल ठाकूर,

भीष्माने लहानपणापासूनच संसारात रस दाखवला नव्हता. शंतनूसाठी संसार सोडला असं वाटंत नाही. कृपया इथला लेख पाहणे : http://mymahabharat.blogspot.co.uk/2010/10/blog-post_28.html

त्या अनुदिनीवरील महाभारतातील भीष्मचित्रण ही पूर्ण लेखमालाच वाचावीत असं सुचवेन.

कुरुंदकर वा इतर लेखकांनी व्यक्त केलेली मते वाचायला हरकत नाही. मात्र स्वत:चे मत बनवण्यापूर्वी मूळ महाभारत (वा अनुवाद) वाचलेले बरे पडेल.

आ.न.,
-गा.पै.

उदयन,
महाभारतावरील व्यक्तीरेखांबाबत एकमत झाले तर त्यातली मजाच निघुन जाईल. त्यामुळे माझी मते पटत नाहीत हा आनंदाचाच भाग आहे.

मात्र स्वत:चे मत बनवण्यापूर्वी मूळ महाभारत (वा अनुवाद) वाचलेले बरे पडेल.

गापै
माझ्याकडे मुळ महाभारत आहे. संदर्भासाठी त्याचा मी वापर करीत असतो. इतर वाचनही संदर्भासाठीच आहे. मत बनवण्यासाठी नाही. तरीही सल्ल्यासाठी आभार. मला वेगळी वाट चोखाळायची आहे. मग माझे विवेचन सुमार दर्जाचे असले तरी चालेल.

आपण दिलेली लिंक वाचली. कामी आणि त्यासाठी वडिल मुलाचा हक्क डावलणार्‍या शंतनुला दोषमुक्त करण्याची गरज नव्हती असे माझे मत आहे. भीष्माला मुळातच संसारात रस नव्हता असे म्हणुन लेखकाने त्याच्या प्रतिज्ञेतील हवाच काढुन टाकली आहे.

अतुल ठाकूर,

>> भीष्माला मुळातच संसारात रस नव्हता असे म्हणुन लेखकाने त्याच्या प्रतिज्ञेतील हवाच काढुन टाकली आहे.

शंतनूला आपल्या मुलाकडून म्हणजे देवव्रताकडून वंश पुढे चालवला जाईल याची खात्री नव्हती. म्हणून शंतनूला दुसरा विवाह करणं भाग पडलं. भीष्माने प्रतिज्ञा केली त्यावेळच्या लोकांना हा इतिहास माहीत असण्याची शक्यता कमी आहे. म्हणून ते देवव्रताची प्रतिज्ञा ऐकून त्यास भीष्म म्हणू लागले असावेत.

आ.न.,
-गा.पै.

गापैजी, आर यु सिरियस? शंतनु तुमचा फेवरीट हिरो असल्यास माझी हरकत नाही. मात्र या मुद्द्यावर हा शेवटचा प्रतिसाद.

शंतनूला आपल्या मुलाकडून म्हणजे देवव्रताकडून वंश पुढे चालवला जाईल याची खात्री नव्हती. म्हणून शंतनूला दुसरा विवाह करणं भाग पडलं. भीष्माने प्रतिज्ञा केली त्यावेळच्या लोकांना हा इतिहास माहीत असण्याची शक्यता कमी आहे. म्हणून ते देवव्रताची प्रतिज्ञा ऐकून त्यास भीष्म म्हणू लागले असावेत.

मग शंतनुला वंशच वाढवायचा होता तर राजघराण्यातल्या इतर मुली मिळल्या नसत्या काय? धीवर कन्या आणि तीही अशी कि जिच्या वडिलांनी तिच्याप्राप्तिसाठी कडकडीत अटी ठेवल्या होत्या तीच त्याला कशाला हवी होती? कामातुराणां न भयं न लज्जा! "शंतनूला दुसरा विवाह करणं भाग पडलं." या सारखं विनोदी विधान दुसरं नसेल.

भीष्माला मुळातच संसारात रस नव्हता असे म्हणुन लेखकाने त्याच्या प्रतिज्ञेतील हवाच काढुन टाकली आहे.>>> बरोबर बोल्लात ठाकूरसर.. जर भीष्माला संसारात रस नव्हता तर त्याला मुळात प्रतिज्ञा घ्यायचीच गरज नव्हती. आपल्या आवडीचा दुसर्यासाठी त्याग करणे हा त्या व्यक्तीचा मोठेपणा दाखवून देतो. संसार करणे,राज्य करणे ही भीष्माचीही सुप्त ईच्छा असु शकते. आणि त्याचमुळे कुमार वयात प्रतिज्ञा घेवून संसाराचा त्याबरोबर मिळणार्या राजगादीचा त्याग करण्यामुळे देवव्रत भीष्म ठरला....

महाभारतावरील व्यक्तीरेखांबाबत एकमत झाले तर त्यातली मजाच निघुन जाईल.>>> अगदी अगदी ठाकूरसर’

सर्वच कथा पुनः पुनः वाचण्याजोगी, पहाण्याजोगी आहे.वर्षानुवर्षे (हजाराहून जास्त वर्षे!) लोक त्यावर चर्चा करतात, नवनवीन मते पुढे येतात. एकदा कर्ण वाईट तर एकदा चांगला. एकमत होणे शक्य नाही. व्यक्ति तितक्या प्रकृति नि या सगळ्या प्रकृतींना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे या कथेत!! धन्य धन्य.>>> +११११
भारतीताईंनी सुद्धा अतिशय सुंदर प्रतिसाद दिला आहे.

अतुल ठाकूर,

एक नियम पाळलेला बरा पडतो : Always judge the people by the problems they face.

हा नियम ऐतिहासिक व्यक्तिरेखांना विशेषकरून लागू आहे. कारण त्यांच्याबद्दल बरीच माहीती उपलब्ध असते. (रोजच्या आयुष्यातही पाळायला हरकत नाही. :-))

शंतनूसमोर अनेक समस्या होत्या. त्याची ७ मुलं गंगेने ठार मारली. एक देवव्रत तो कसाबसा वाचला तर त्याला संसारात रस नव्हता. तसेच शंतनूला त्याच्या जिवाची शाश्वती वाटत नव्हती. गंगा सोडून गेली ते वेगळंच. उतारवयात राज्याला वारस कुठून पैदा करायचा? सत्यवती ही या समस्येवरील उकल (सोल्युशन) आहे. देवव्रतालाही संसार नकोच होता. तर त्याच्याही दृष्टीने सत्यवती ही उकल आहे. पण सत्यवतीचा बाप काळजीत पडलाय. त्याला आश्वस्त करण्यासाठी देवव्रताने पहिली प्रतिज्ञा केली की मी लग्न करणार नाही.

मात्र शंतनू वयस्कर असल्याने सत्यवतीचा मुलगा राजेपदारूढ होईपर्यंत शंतनू अगदी वृद्ध होणार. मधल्या काळात राज्याचं रक्षण कोण करणार? हाही प्रश्न होताच. म्हणून देवव्रताने दुसरी प्रतिज्ञा केली की हस्तिनापूरच्या सिंहासनावर जो कोणी आरूढ असेल त्याला पित्यासमान मानून त्याच्या सेवेत निरंतर गर्क राहीन. या दोन्ही प्रतिज्ञा परस्परपूरक आहेत. कोणतीही एक मोडली की दुसरीला अर्थ उरत नाही. कामकंडूशमन ही शंतनूसमोरील समस्या नव्हे. जरी सत्यवतीला पाहून कामविव्हळ झाला असला तरीही तो स्वैराचारी नव्हता.

आता या पार्श्वभूमीवर तुमची विधाने पाहूया.

१.
>> धीवर कन्या आणि तीही अशी कि जिच्या वडिलांनी तिच्याप्राप्तिसाठी कडकडीत अटी ठेवल्या होत्या तीच त्याला
>> कशाला हवी होती?

सत्यवती ही उपरिचर गंधर्वास मच्छीपासून झालेली मुलगी होती. गांधर्वविवाहाच्या रीतीनुसार ती पित्याकडे धीवरकुळात वाढली. तिचा पिताही कुळाचा नायक होता.

२.
>> मग शंतनुला वंशच वाढवायचा होता तर राजघराण्यातल्या इतर मुली मिळल्या नसत्या काय?

उतारवयात कोण मुलगी देणार? सत्यवती ही सर्वात उजवी असणार. सत्यवतीचं एकंदरीत व्यक्तिमत्व पाहता तिच्यापेक्षा अधिक चांगली कन्या सापडणं अवघड दिसत असावं. तिच्या अंगच्या दैवी सुवासावरून ही कोणी उच्च कोटीची स्त्री असावी असाही तर्क शंतनूने बांधला असावा.

३.
>> कामी आणि त्यासाठी वडिल मुलाचा हक्क डावलणार्‍या शंतनुला दोषमुक्त करण्याची गरज नव्हती असे माझे
>> मत आहे.

या प्रतिज्ञा भीष्माने स्वत:हून केल्या आहेत. शंतनूने वा सत्यवतीच्या बापाने कसलेही दडपण आणले नव्हते.

४.
>> भीष्माला मुळातच संसारात रस नव्हता असे म्हणुन लेखकाने त्याच्या प्रतिज्ञेतील हवाच काढुन टाकली आहे.

प्रतिज्ञेतली हवा काढली जायला ती काय सायकलीचा टायर आहे? Rofl Light 1

आ.न.,
-गा.पै.

गामा काइ कळ्ळ न्हाइ.

सात्यवतीचा पिता कोण? धीवर की गन्धर्व ?

या बिन बा च्या पोराटोरान्नीच सगळं म्हाभारत घडवलं आहे. Happy

प्रतिज्ञेतली हवा काढली जायला ती काय सायकलीचा टायर आहे?

सर्वसाधारणपणे धागा इथुनच भरकटायला सुरुवात होते. समोरचा कितपत चिडतोय हे पाहायला बरेच जण मोळी घेऊन टपलेले असतात. त्यामुळे यावर प्रतिक्रिया नाही.

बाकी गोष्टींबाबत लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री.

अतुल ठाकूर,

१.
>> सर्वसाधारणपणे धागा इथुनच भरकटायला सुरुवात होते.

खरं असण्याची शक्यता आहे. तसंही पाहता भीष्माच्या प्रतिज्ञेतली हवा काढणारा गाम्या कोण लागून गेलाय!

२.
>> बाकी गोष्टींबाबत लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री.

येस्सर! Happy

आ.न.,
-गा.पै.

अतुल,

आजच्या युगातील मूल्ये आणि मापदंड लावले तर भीष्म नक्कीच अपयशी ठरेल. पण त्या काळातली मूल्ये बघितली तर भीष्माचे जीवन नक्कीच यशस्वी ठरते. 'दिलेला शब्द पाळणे' हे खूप म्हत्वाचे साध्य त्याने साधलेले आहे.

व्यासांनी महाभारतातली प्रत्येक व्यक्तीरेखा ही ग्रे रंगातच चितारली आहे. कुठलीच व्यक्तीरेखा संपूर्ण शुभ्र नाही की संपूर्ण काळी नाही. माझ्यामते तरी भीष्माचे पराक्रम, ज्ञान, अनुभव यामुळे त्याचा दरारा शेवटपर्यंत होता तो नसता तर कर्णाला लढू न देण्याची अट दुर्योधनाने मान्यच केली नसती.पांडवांच्या बाजूला अनेक रथी महारथी असले तरी त्यांची मुख्य मदार अर्जुनावर होती. अर्जुनाला जिंकू शकतील असे तीन योद्धे कौरवांकडे होते - भीष्म, द्रोण आणि कर्ण. पैकी पहिले दोन कौरवांच्या बाजूने लढत असले तरी मनाने ते पांडवधार्जीणे आहेत हे दुर्योधन पूर्णपणे जाणून होता. असे असूनही त्याने भीष्मालाच सेनापती नेमले ते त्याच्या पराक्रम, अनुभव यांच्याकरताच. इतरवेळीही भीष्माचा दरारा जाणवतोच पण त्याने आपणहून आपले हात दगडाखाली ठेवले आहेत हे सगळे जाणून होते.

त्याने सत्यवतीच्या पित्याला दिलेली वचने जगावेगळी होती. पण त्याची खरी ससेहोलपट झाली ती शंतनूला दिलेल्या तिसर्‍या वचनाने - हस्तिनापूरचे राज्य सुरक्षीत ठेवण्याचे वचन. त्या वचनाचा त्याने चुकीचा अर्थ लावला तो म्हणजे हस्तिनापुरचे राज्य = हस्तिनापुरचा राजा. आणि त्यामुळेच दोनदा त्याचे निर्णय चुकले आणि त्याची फळे त्याने भोगली.

अतुलजी :

लेख अतिशय सुंदर आणी विषया बद्दलचा अभ्यास खुपच सखोल आहे. तुम्ही नक्कीच ईतिहासात पी.एच.डी. केलेली दिसते. भीष्माची कथा थोडीच माहीती होती ते ही महाभारताची जुनी सीरीयल पाहुन, वसुने गाय चोरल्याची कथा माहिती नाहीये.
मला चिरंजीव अश्वत्थामाबद्द्लची माहीती वाचायला आवडेल आता त्याचं काय झालं असेल ह्याची उत्सुकता आहे. नर्मदेहर.. हर मध्ये जगन्नाथ कुंटेंनी त्यांच्या नर्मदा परीक्रमेत (१९९९ नंतर) एकदा शुलपाणीच्या जंगलात अश्वत्थाम्याची भेट झाल्याचा उल्लेख केलाय तसेच श्री टेंबे महाराज यांचीही अश्वत्थाम्याशी भेट झाल्याची त्यांच्या चरीत्रात वाचले आहे.

या बिन बा च्या पोराटोरान्नीच सगळं म्हाभारत घडवलं आहे.
त्यांना हाताशी धरून शकुनि नि कृष्ण या दोन लबाडांनी महाभारत घडवले. आधी लबाडी शकुनिने केली.

भीष्म, युधिष्ठिर यांच्याकडून काही घडेल, धर्म सांभाळला जाईल याची अजिबात खात्री नव्हती!! जे काय शकुनि करेल त्यापुढे मुकाट्याने मान तुकवायचे!! भीष्माचे एक ठीक आहे, प्रतिज्ञा वगैरे केली होती. पण युधिष्ठिराला एव्हढा बावळटपणा करायची काय गरज होती? शकुनीच्या अक्कलेपुढे त्याचे काही चालले नाही.

शकुनी लबाड नव्हता भीश्माने बळजबरीने गान्धारेचे लग्न ध्र्तराश्ट्राबरोबर लावले. म्हनुन त्यने सुड घेतला

Pages