इतनीसी बात – ३

Submitted by vaiju.jd on 14 December, 2013 - 13:10

||श्री||

इतनीसी बात – २: http://www.maayboli.com/node/46713

नऊवारी नेसलेल्या, सुपारीएवढा अंबाडा झालेल्या पण तेजस्वी गोऱ्या रंगाच्या सुमतीबाई, तिन्हीसांज उलटून रात्र झाली तरी अजून कुणीच कसं भेटायला आलं नाही म्हणून स्वतःच बघावं अश्या विचाराने खोलीच्या बाहेर आल्या.

त्यांना रागारागाने गच्चीवर चाललेल्या वसुंधराबाई दिसल्या. त्यांना तसं पाहून सुमतीबाई पुढे न जाता किंचीत आडोशाला जिन्याजवळच थांबल्या. वसुंधराबाई धुमसत बडबडत होत्या,""काहीही बोलयचं! म्हणे मी चरणोकी दासी आहे म्हण! निदान आपल्या वयाचा तरी काही विचार!"
धोरणी, प्रसंगावधानी सुमतीबाईना लगेच काय झालं असावं ते ध्यानात आलं. त्यांना हसू आवरेना.

त्या तोंडावर पदर धरून हसत हसत खोलीत आल्या. विश्वंभरपंत जुनं बाड काढून काहीतरी वाचत होते. त्यांच्याजवळ जात त्या म्हणाल्या.," अहो, ऐकलंत का?" त्यांना परत एक हास्याची उबळ आली. नाकावार उतरलेल्या चष्म्यातून नजर तिरकी वर करत पंत म्हणाले, "ठसका लागेल, आधी हसून घ्या, मग बोला!"

"अहो, आज किनई कोर्टाचे आणि वकिलिणबाईंचे भांडण झालेय हो!" त्या 'खाजगीत' बोलताना मुलाला कोर्ट आणि सुनेला वकिलीणबाई म्हणत.

" देवा देवा, अहो आपले वय काय आणि अजून लेकाच्या आणि सुनेच्या संसारात लक्ष घालता आहात, कठीण आहे!"

"अहो, मी कशाला लक्ष घालतेय, पण आत्ता वकिलीणबाई रागारागाने गेल्यात टेरेसवर. जाताना बडबडत होत्या, तेव्हा कानावर पडलं हो!"

परत त्यांना हसू फुटलं.

"अहो, ऐकलात का? कोर्ट म्हणे वकिलीणबाईना म्हणाले मी आपल्या चरणांची दासी आहे म्हणा. मग काय वाजलेच असणार!"

"काय सांगतेस, असे म्हणाला राजेश्वर?"

"सांगतेय काय मग! एवढी कोर्टात केसेस लढवून लोकांना न्याय मिळवून देणारी बायको, ती काय चरणांची दासी आहे असे म्हणेल? काहीही अपेक्षा करायच्या!"

" त्यात काय झाले, नवरबायकोच्यामध्ये चालतात अश्या गमतीजमती. एकदा म्हटले तर त्याने काय होते? सुनबाईंस कळायला हवे होते. इतक्या हुशारीने कोर्टात कुणाकुणाच्या बाजू मांडतात, आर्ग्युमेंट करतात. घरातील गोष्ट वेगळी असते. वकिली पेशामुळे आपलेच म्हणणे खरे करायचे असा त्यांचा स्वभाव झाला आहे कां काय? जरा वागले पतीच्या मनासारखे तर काय होते? त्यात वाद घालण्यासारखे काय आहे? हे त्यांना तू समजवायला हवेस. म्हणजे हेच बघ ना, मी तुला म्हटले की तू मला म्हणावेस, ' मी आपल्या चरणांची दासी आहे' तर तू लगेच म्हाणशील."

"एक मिनीट प्रोफेसरसाहेब, मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात पडायचे नाही असे ठरले नां? मग सूनबाईला काही सांगायचा प्रश्न उरतोच कुठे? आणि या वयात तुम्ही मला कशाला सांगाल असे काही म्हणायला? तेव्हा हे जाऊ दे!"

" जाऊ दे नाही, एक साधीशी गोष्ट आहे नां, तू मला बरे वाटावे म्हणून म्हणशील की ..."

" नाही, प्रोफेसरसाहेब मी असे काहीही म्हणणार नाही. तुम्हांस बरे वाटावे अश्या इतर सार्‍या गोष्टी करतेच की मी! परंतू हे असे काहीही म्हणणे मला होणार नाही!"

"मग बरोबरच आहे. तू म्हणणार नाहीस तर तुझी सून कशास म्हणेल? तुझी हौस होती म्हणून साऱ्यांचा विरोध पत्करून तुझे शिक्षण केले. शिक्षिकेची नौकरी केलीस.तुस बरोबरीने वागवले. पण एक एवढी गोष्ट माझ्या मनाजोगती करावी तर तुझा अहंकार मध्ये येतो. तेवढेही नुसते म्हणताना सुद्धा ' मी आपल्या चरणांची दासी आहे! एवढे म्हणणे होत नाही. काय तुझ्या शिक्षणाचा उपयोग?"

"एक मिनीट प्रोफेसरसाहेब, तुम्ही मला शिकवलेत, स्वातंत्र्य दिलेत, मानाने, बरोबरीने वागवलेत, अगदी मान्यच आहे मला.

त्याकाळी पत्नीस प्रोत्साहन दिल्याबद्दल सत्कारही झाला तुमचा. पण आज मला कळते आहे हे सगळे सुधारकपण हा फक्त वरवरचा चेहरा होता तुमचा. पण तुमच्या मनामधे माझे स्थान नेहेमी पायची दासी हेच होते."

एवढं बोलून सुमतीबाई उठल्या आणि देवघराशी जाऊन डोळे मिटून माळ ओढू लागल्या.

थोड्या वेळाने रखमा पंताना रात्री खायला काय करू म्हणून विचारायला आली. रागारागाने पंतांनी,' मला काही नको आहे' असे सांगितले. पंत रात्री जेवत नसत. काहीतरी पचायला हलका फराळ त्यांना लागे. ऐकलं तशा सुमतीबाई गुडघ्यावर हात देत उठल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन रखमाला लापशी करायला सांगून आल्या.

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल आहे, पण थोडे तेच तेच होतेय असे वाटतेय. पात्र बदलुन पुन्हा सेम रिपिट. शेवट मात्र वेगळा करायचा प्रयत्न कर,