सर्व छोट्यांच्या पत्रांना - बाप्पांकडून एक खास उत्तर -

Submitted by पुरंदरे शशांक on 13 September, 2013 - 01:44

बाप्पांकडून एक खास पत्र -

त्याच्या सार्‍या लाडक्या छोट्या दोस्तांना -

बाप्पांना सगळ्या छोट्यांनी लिहिलेली पत्रे फार फार आवडली. मग ते उंदीरमामाला काय म्हणाले -

गोड गोड ही पिल्ले सगळी
लिहिती झाली कशी पहा
गोड गोड पत्रातील गोष्टी
ऐक जरा उंदीरमामा

चला उठा हो मामा तुम्ही
झटकन व्हा तय्यार कसे
जाऊ घराघरामधुनि अन्
पत्र वाचुया सुंदरसे

जगामधील प्रश्नांची सार्‍या
उकल हवी रे "अवनीश"ला
एक गोडुली हाका मारे
किती मस्त वाटे "गणुल्या"

"ऋचा" विचारी कसा असशी रे
भातुकली ती देऊ तिला
आवडते का चिज मूषका
"श्रिया" विचारी खास तुला

"प्रांजल"कडचा सिक्रेट खजिना
कधी कधी कळणार मला ??
टेंपल पाशी पोहचवू रे
एकच काय रे साव्वेळा

"मिहिका" म्हणते सोडव बाबा
समस्याच सगळ्या सगळ्या
शाणी मुल्गी व्हायचे आहे
मदत करु रे चला चला

"आयाम" शाणा आवडतो रे
चॉकलेट घे ते एक जरा
सांगू आईला त्याच्या पण रे
गोड गोडसे डांट जरा

"चैतन्याची" पाटी भारी
डोंगर सायकल कस्ली रे
दादापेक्षा मोठे व्हावे
लहानपण मज आठवे रे

नकोय काही "नचिकेत"ला
झाडांचे किती प्रेम असे
कार्तिकेयची आठवण काढी
गुणी लेकरु गोड दिसे

नको होऊ गं सॅड "सानिका"
दोस्त असे मी कायमचा
जेव्हा दंगा, मज्जा करता
देव्हार्‍यातूनी हसायचा

थेऊरला तू आली होती
"श्रिया" गोडुली आठवते
स्पर्धा गोष्टींची बघण्याला
चला मामा निघू कसे

बुगाटीतुनी चक्कर मारु
सांगतसे "जय" पहा कसा
सीट कव्हर तू फाडू नको रे
सोड मूषका द्वाडपणा

शेअर करुया म्हणते "छोटी"
मला विचारी काय हवे
आवडतो मी किती तुला ते
पत्रातून मज जाणवते

उंदरावरती स्वार तुम्ही का
"तन्मया"स ते प्रश्न किती
रथातूनी का घरी जातसे
वाट पहाते मम्मीच ती

त्रास नाही ना झाला काही
गुणी किती हा अदूदादा (अद्वैत)
कार, बुद्धी नि शक्ति पाहिजे
ग्रेट आयुष्याचा वादा

चॉकलेटचे झाड हवे अन्
आईस्क्रीमचे "श्रावणी"ला
अडचण येता कुणालाही का
दूर करा म्हणते मजला

मुलेच झाली शाणी सगळी
छान छान लिहितात पहा
मोदक - आरती नकोच काही
खूप आवडे पत्र अहा ....

तुम्हा सर्व छोट्या दोस्तांचा,
गणुल्या .....

गणपति बाप्पा मोरया | धमाल पत्रे वाचूया ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन बरीच पत्रं येतील >>>> त्यांनाही यथायोग्य (व वेळीच) उत्तरे पाठवण्यास श्री समर्थ आहेत, तस्मात काळजी नसावी ..... Wink Happy

अरेव्वा! बाप्पातर्फे उत्तरही आलं का? मस्त झालीये कविता.

संयोजक, ही कविता गणेशोत्सवाच्या गृपमध्ये हलवा, प्लीज.

बाप्पांनी पत्रांचं उत्तर पाठवलं तुमच्याकरवी हे फार बरं झालं>> अगदी अगदी.. Happy किती गोड उत्तर दिलंय.. Happy

Pages