रिटर्न तिकीट

Submitted by तनवीर सिद्दीकी on 3 September, 2013 - 03:05

''तो जरा 'हटके' असावा''
''मला समजून घेणारा असावा''
''दिसण्यातही नाकीडोळी मस्त असावा''
''मुख्य म्हणजे माझ्याहून जास्त शिकलेला असावा......MBA वगैरे....''

''बघूया पदरात काय येतंय ते..........''

तिच्या ओठांतून भावी साथीदाराच्या स्वत:च्या ठासून भरलेल्या स्वप्नांच्या इंधनाने समुद्रकाठच्या संधीप्रकाशात एक अस्पष्ट चेहरा हळू हळू प्रकाशमय होत होता..स्वत:च्या कोमल मनात साठवलेली...कुठेतरी रोजच्या धावपळीत मनाच्या एका अबोल पण ओळखीच्या अडगळीत लपवून ठेवलेली आपल्या नाजूक स्वप्नांची डायरी ती त्याला वाचून दाखवत होती..तिकडचा नेहमीचाच पण त्या दोघांसाठी 'परका' असणारा वारा फुकटच तिच्या सायंकाळच्या ओसरत्या प्रकाशात सोनेरी भासणाऱ्या केसांना छळत होता..आणि ती आपल्या नक्षीदार बोटांनी वारंवार बाजूला सारून तिच्या डोळ्यासमोर दिसणारा अथांग समुद्र मात्र तिच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्दांची साक्ष टिपत होता....अर्थातच 'त्याच्या' बरोबर......!!!!!

तो शांतच होता. तसा निर्विकार म्हणता येणार नाही पण शांतच.तिच्या अपेक्षेच्या 'दैवाची- मागणीची' सूची तालिका स्वत:च्या झिजलेल्या हाताच्या रेघांशी मनातल्या मनात जोडून पाहत होता.तिने मागितलेल्या गुणधर्मापेक्षा जे आपल्याकडे जास्त आहे त्याची अक्कलखात्यात 'कवडीमोल' अशी नोंद त्याने करून तर घेतलीच पण ज्या बाबी 'कमी' होत्या त्याची चेहऱ्यावर खंत न आणता एक अखंड बनावटी स्मित हास्य कायम ठेवत तो तिच्याकडे बघत होता.तिच्या डोळ्यातून प्रतिबिंबित होणाऱ्या समोरच्या किनारयात स्वत:ची प्रतिमा शोधण्याचा जणू एक धडपडीचा प्रयत्न करत होता.'जोड्या स्वर्गातच बनतात','आपल्याला हवाहवासा जोडीदार नाही भेटला तर?'.....अश्या तिच्या मनातल्या सर्व संभ्रमाचीही अलगद पणे मेंदूत आखणी घालत होता.सध्या मौनच पाळणे बरे हे आता त्याने पक्के केले होते.तेच भाव कायम ठेवत तोही आता समुद्र पाहू लागला होता.वेळ देव मात्र आपला हिशोब चोखपणे करत होते.चुकून आलेल्या आणि मोठ्या चलाखीने अडवलेला तो कट्टा - ती वेळ - ते वातावरण - आणि तो मात्र एक पूर्वनियोजित ठरवून आलेल्या त्याच्या प्रेमकबुलीच्या नजराण्याला मुकले होते.........!!!!!!

x x x x x x x x x x x

तसे बघितले तर ते दोघे मित्र...कमी कालावधीत हृदयाच्या घनिष्ट तारा जुळलेल्या आणि चारचौघात उदाहरण देण्यासारखी मैत्री !! गजराजाच्या दिखाऊ दंतासारखी 'खोटी भांडणे', नारळाच्या करवंटी प्रमाणे कधी लहानसा कडक 'अबोला' तरी कधी आतल्या गोड पाण्यासारखे अचानक आत्मसुख देणारा एखादा हसरा क्षण.दोघेही मैत्रीत विरघळलेले!! प्रत्येक पाऊल विचारून टाकण्याची सवय पडलेली....जात-धर्म-राहणे-सहाने कधीच आड ना आलेली अशी ती सुवासित मैत्री......

ती मुंबईच्या मोठ्या धावपळीत वाढलेली. तो कुठल्यातरी दूरवरच्या लहानश्या गावातला एक सुशिक्षित आणि म्हणण्याजोगा 'स्थायिक'!! मुंबईमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत असताना आपली साहित्य क्षेत्रातली रुची रुजवून ठेवण्यासठी ती एक इ-साप्ताहिक चालवायची.राज्यभरातून आवेदने मागवायची.मग त्यातून ठराविक चांगले लिखाण चौकस नजरेने निवडणे,प्रकाशित करणे, निगडीत कवी/लेखकांशी संवाद साधणे, अधेमध्ये महिन्या-दोन महिन्याने एखादा परिसंवाद किंवा संमेलन आयोजित करून सर्व निवडक लोकांना बोलावणे...तिच बर चालल होत.अभियांत्रिकी क्षेत्रातली तिच पदवीच शिक्षणही संपत आले होते आणि त्यानंतर नोकरी शोधून पुढे आपलं अभियांत्रिकी आणि साहित्यीकी असा दुहेरी प्रवास करायचा तिचा पक्का निर्धार होता.

...तो तसा मध्यम शिकलेला, कुठेतरी ठीकठाक कामावर होता..कवितेचा जाम शौकीन !! अधूनमधून लिहिणे खूप आवडे त्याला. रद्दीच्या कागदावर काहीतरी रेघाटने आणि मग ते मित्रांना डबा खाताना वाचून दाखवणे हाच त्याचा नित्यक्रम...!!! अश्याच एका त्याच्या 'रसिकाने' त्याची एखादी कविता त्याच्या नकळत मुंबईच्या 'कुठल्याश्या' इ-साप्ताहिकात पाठवून दिली. ती 'सुदैवाने' निवडली गेली..प्रकाशितही झाली आणि योग म्हणावं तर एका कवी संमेलनाचे याला आमंत्रण ही आले. आणि अस म्हणता म्हणता तिच्या जीवनात याचा म्हणा की याच्या जीवनात तिचा म्हणा पण शिरकाव झाला....!!!!!!

संमेलनात गाठीभेठी झाल्या..पुढे लिखाण होत गेले..समीक्षा म्हणा..प्रोत्साहन म्हणा...सल्ला म्हणा...की वाढणारी आपुलकी म्हणा...रुजलेली मैत्री म्हणा...की जन्माला आलेले प्रेम म्हणा...- संवाद होत गेले. मन मिसळू लागले. अलगद एक मैत्रीचा आणि त्यातून नुकत्याच जन्माला आलेल्या अजाण प्रेमाचा सुगंध मुंबईच्या गल्लीपासून गावाच्या पल्ल्यापर्यंत दरवळायला लागला होता. लिखाण आता 'कारण' बनू लागले होते..आणि एका रेशीमधाग्याला पालवी फुटत होती...!!

x x x x x x x x x x x x x

''मी सध्या जॉब शोधेन रे आणि मग एका मस्त मोठ्या माणसाबरोबर लग्न'' - तो भानावर आला.

''मला मस्त जॉब लागला ना तर तुला पार्टी..किंबहुना तुला मस्त रिटर्न तिकीट च पाठवते...आमंत्रणंसकट .. काय?'' - तो अजूनही निशब्द..!!!!
''अरे ऐकतोय ना?''

''आं ?....हो...हो''.....-तो

समुद्रकिनाऱ्या काठी घेतलेली चवदार भेळ आता संपत आली होती. रिक्षावाल्याला सुटे पैसे देवून दोघे तसेच स्टेशनवर थोडावेळ घुटमळत राहिले.तिच्या रोजच्या वेळापत्रकातल्या ट्रेनची वेळ झाली.थोडासा हात वर करून तिने स्मित हास्य देत टा टा केला अन ती निघून गेली. 'पुन्हा नक्की भेटू' म्हणत तिला जाईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे निरखत तो तसाच थोडावेळ उभा राहिला.आजपर्यंतची सुट्टी होती संमेलनाच्या नावाने...उद्या परत गावी निघायचे होते...आणि खरतर आता नियतीच्या मागण्या 'स्पष्ट' होत्या......

...एका अनिश्चित नियतीच्या तारखेची शपथ.....

x x x x x x x x x x x x x

ती आज फार खुश होती.पटकन धावत धावत तिने बाजूच्या हलवायाकडून पाच शेर मिठाई पैक केली आणि घराकडे सुसाट निघाली होती.'मला जॉब लागला ' हा विषय तिला लवकरात लवकर घरात पसरवायचा होता..घरी दिवाळी साजरी होणार होती.आठवतील तेवढे नंबर फिरवून ती लोकांना सांगत होती.मध्यंतरीच्या एका वर्षात तिने त्यागलेल्या सर्वच गोष्टींचे चीज झाले होते.आनंदाने मनात एक वीज संचारली होती.घराचा एक छोटासा प्रवास तिला आता मोठा वाटत होता.लगबगीने तिने रिक्षा केली आणि घर गाठले.

सर्वीकडे आनंदाचे वातावरण जमले.पटापट सर्व तयारीला लागले.एक पार्टी घोषित करण्यात आली.सर्व नातेवाईक.मित्र मंडळीना फोन फिरू लागले.तिला अचानक इ-साप्तहीकाचीही आठवण झाली.इ-साप्ताहिकात 'एक पार्टी आहे -आवर्जून या' असही प्रकाशित झाले. मग त्याची आठवण आली.त्याला फोन लावला. लागतच नव्हता.

''जावू दे सरप्राइज देते''

ठरल्याप्रमाणे एक 'रिटर्न तिकीट' त्याच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय झाली.दिनांक निश्चित झाली आणि सर्व आनंदी वातावरणात त्या तारखेची वाट पाहत जग झोपी गेले.

x x x x x x x x x x x x x

अखेर तो दिवस उगवला.पळापळ चालू होती.पाहुणे यायला सुरवात झाली.ती दारावरच उभी होती.सर्वांचे स्वागत करत होती.आत पाठवत होती.'जेवून जा हो' आग्रह करत होती..नजर मात्र त्याला शोधत होती. 'कुठे राहिला हा? म्हणत अस्पष्ट शिव्या घालत होती.या एका वर्षात त्याला भेटता आले नव्हते. फोनवरही क्वचितच बोलणे. इ- साप्ताहिकात वर्षभर न डोकावल्याने त्याने काय लिहिले, नाही लिहिले याचीही कल्पना नव्हती.आज तिला त्याच्याशी खूप खूप बोलायचे होते. ती यशस्वी झाली हे सांगायचे होते.उशीर होत होता.वाट पाहून 'तो येईल' या आशेने ती आत आली.

पार्टी सुरू झाली होती.तिचे आईबाबा ''हा जोश्यांचा अरुण..डॉक्टर आहे ..., तो कुलकर्ण्यांचा अरविंद.....M.Tech आहे..'' अशी ओळख करून देत होते.तिची नजर मात्र त्यालाच शोधत होती.एक निरागस साठ्वनितल कोवळ प्रेम एका हृदयाच्या बहाणे दुसरया हृदयाला आर्त हाक मारत होते!!

तितक्यात एक मध्यम वयाचे गृहस्थ आत आले. ते बिचकत होते, कोणालातरी शोधत होते.अधून मधून चौकशी करत होते.दोघा तिघांनी हात खुणांनी दाखवल्यावर ते पुढे सरसावले आणि त्यांना हव्या असलेल्या व्यक्तीला त्यांनी पाठून खांद्याला स्पर्श केला.

''हम्म..?''

''आपण 'तिच' का?''

''हो..आपण?''

''मी 'त्याचा' वडील'''

''ओह्ह..या ना काका...तो?'' - तिची नजर आता जास्तच कासावीस होत होती.

''तो.......'' ते गप्प झाले.

''हे तुझ पाकीट'' - ते

''ह्यात काय आहे?''- ती

''तुझ पाठवलेल तिकीट''.......- ते

''का? तो का आला नाही?''' - ती रडवेली झाली..

''तो आठ दिवसापूर्वीच वारला..'' - ते

''काआआआआअय?.....कसं?..'' - ती किंचाळलीच..मटकन खाली बसली..

एव्हांना चालू असलेल्या संगीताचा आवाज थांबवण्यात आला होता.टाचणीचा ही आवाज येईल अशी शांतता होती...

'ही कल्पना नाही ग, पण तो खूप दिवस गप्प होता, त्रासिक होता...म्हणजे मागच्या मुंबईच्या संमेलनाच्या परतीनंतर पासूनच. काहीतरी एकट्यातच बडबड करायचा..अस्पष्ट...चांगला B.Sc. झालेला.स्थायी नोकरी असूनही ''शिक्षण कमी आहे बाबा'' म्हणत अजून शिकण्यासाठी MBA त अडमिशन घेतलं.दिवसभर काम करून रात्रभर अभ्यास करायचा.कविता लिहिणे,,हसणे, बोलणे..सर्व कधीचेच बंद झाले होते. काय सिध्द करायचं होत?, तो नक्की का त्रयस्थ होता?....कधी कळलंच नाही. १५ दिवसांपूर्वी MBA चा निकाल होता. तो फेल झाला होता. त्याला राहवले गेले नाही. तो घरी आला. रडत होता...चिडचिड करत होता...माझ्या खांद्याशी येवून रडला...काहीतरी अस्पष्ट बडबडला...स्वत:च्या रूम मध्ये गेला...आणि.....''

''आणि काय?''

''त्याने स्वत:ला फाशी लावून घेतली..''

त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते.पार्टीच्या आनंदावर विरझन आल्याने सर्वच नाराज होते. ती गप्प मूर्तीसारखी बसून होती...हताश...!!

''मी जातो बेटा...माफ करा मी खोळंबा केला'' - त्याचे वडील..

तिने एकवेळ वर बघितले..रडतच चेहऱ्याने संमती दर्शवली.

तिचे बाबा चालते झाले. क्षणभर पुढे जावून ते थांबले..वळले..आणि म्हणाले...

''बेटा. एका विचारायचं होत.....''

''काय?''....- ती

''तो वर्षभर म्हणायचा...मरतानाही बडबडत होता...''

''बाबा, मला MBA व्हायचंय'' ..

''मला 'हटके' व्हायचंय..''

''मला नाही होता आल बाबा..''

''बाबा.........''

''एवढा खंबीर माझा लेक...त्याने एवढ्याश्या कारणासाठी का मरावं बेटा?''

''काय संबंध असेल ग?''

''त्याच्या मरणाचा ..आणि त्या या शब्दाचा...'हटके?....'''

तिच्या हुंदक्याचा आवाज आता आसमंतात भिडत होता.आणि तिचे वडील निरुत्तर मनाने जड पावले टाकत डोळे पुसत माघारी वळले होते.

फरशीवर पडलेले 'रिटर्न तिकीट' मात्र निर्विकारपणे सर्व तमाशा पाहत होते....स्मित हास्य देत....त्याच्या समुद्रकाठच्या चेहऱ्याप्रमाणे.....!!!!!!!!

तनवीर सिद्दिकी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान! मनापासून आवडली कथा. खरंतर कथेच्या पहिल्या १०/२० ओळी वाचतानाच पुढील कथेचा अंदाज आला होता, पण तुमचं लिखाण आणि मांडणी इतकी प्रभावी वाटली की पुढे वाचतच गेलो.

तुमच्या पुढिल लेखणाच्या प्रतिक्षेत.

छान आहे हीसुद्धा. शेवट वाचून वाईट वाटले . तिच्या मागण्या अन व्यवहारीपणा पहिल्यापासून स्पष्ट असताना त्याने असं एकतर्फी प्रेम करून स्वतःचं आयुष्य कवडीमोल करून घेणं. पण घडतात या गोष्टी एका वेड्या वयात.

ही पण कथा आवडली. >> +१

वाक्यं थोडी छोटी आणि सुटसुटीत असती तर आणखी आवडली असती.

माधव जी, खरय तुमच. खरतर हे साधारण तीन वर्ष जुण लिखाण आहे. जस्सच्या तस्स टाकलं. ही खंत माझ्या आईनेही पहिल्यांदा वाचल्यावर बोलून दाखविली होती पण एकदा लिहून झाल्यावर खर सांगायचं तर एडीट करावेसे वाटले नाही, का कोण जाणे

बहुधा (कथेच्या) वातावरणाचा हलकासा परिणाम असावा माझ्यावर Happy ( गंमत केली)
दिल बोला रहने दे, रहने दिया. का कोण जाणे

पण तुमच्या मार्गदर्शनाचे स्वागत आहे. पुढच्या लिखाणात नक्कीच यावर जोर टाकेन.
अभिप्रायासाठी धन्यवाद

*********
कवठीचाफाजी धन्यवाद

कदाचित मी चुकीचा शब्द वापरला.. भारतीं नी लिहील्याप्रमाणे "त्याने असं एकतर्फी प्रेम करून स्वतःचं आयुष्य कवडीमोल करून घेणं "

हम्म….

कथेतील नकारात्मकता म्हणजे नक्की काय नाही आवडले? >>>>> इथेच यश आहे कथेचं
>> येस्स क.चाफा ! तुमची पोस्ट वाचल्यावर कळाल कि मला बहुतेक हेच म्हणायच होत Proud धन्स Happy

तनवीर ..................तुझा नायक कम से कम आत्महत्या करून का होईना ...सुटला.....असे कितीतरी अभागे आहेत्.....जे जन्मभर रोज मरतात्....MBA झाले तरी.....जाऊदे...ते गौण आहे....सुंदर जमलीये कथा...

Pages