अन्नं वै प्राणा: (८) - (३)
अपने रंग रंगाले लालना
रंगबों देवकी के चुनरी
अपने रंग रंगाले होय
सराफांच्या वाड्याला काळोखानं पुरतं गिळलं आहे. देवघरातली समई तेवढी तेवते आहे. वाडा आता तसा रिकामाच आहे. भाड्यानं राहण्यासाठी नवी बिर्हाडं येतील एकदोन दिवसांत. मोहना तिच्या खोलीत आहे. पलंगावर तिचं सामान आहे, पेट्यांमध्ये भरलेलं. थोड्या वेळात दादावहिनी तिला मुंबईला होस्टेलात नेऊन सोडतील. ती उठून कंदिल लावते आणि माधवचं पत्र वाचते. तिनं माधवला 'प्राईड अॅण्ड प्रेज्युडिस' वाचल्यावर तिला मि. डॅर्सी कसे आवडले, ते कळवलं होतं. माधवचं त्यावर उत्तर आलं आहे. पण पत्र अर्धवट टाकून ती उठते. खिडकी उघडते. खाली अजून वर्दळ सुरू व्हायची आहे. दुरून प्रभातफेरीचे आवाज येत आहेत. तिच्या डोक्यात आता असंख्य विचार आहेत. नवं होस्टेल, तिथल्या ख्रिस्ती मेट्रनबाई, नव्या मैत्रिणी, गांधीजींचा सत्याग्रह, रामचंद्रासारख्या अनेकांचं स्वराज्यासाठी हाती शस्त्र घेणं, तिच्या मैत्रिणींनी स्वातंत्र्यसंग्रामात घेतलेली उडी. तिनं घेतलेले अणि तिच्यासाठी घेतले गेलेले निर्णय. रिकामा झालेला वाडा. आणि माधव.
आत आणि बाहेर सुस्तावून पडलेला काळोख आहे. पण कंदिलाच्या प्रकाशात मोहनेचा चेहरा उजळून निघाला आहे. अंधारातही आपला मार्ग शोधण्याची तिला सवय आहे.
मोहना म्हणजे वेणूताईच का? असाव्यातच. वेणूताई चितळ्यांबद्दल, त्यांच्या अफाट कामाबद्दल फारसं कोणी कधी लिहिलेलं नाही. त्यामुळे वेणूताई नक्की कशा होत्या, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेकदा जिगसॉच्या तुकड्यांसारखे संदर्भ, घटना जुळवत बसावे लागतात. तरीही वेणूताईंच्या आयुष्याबाबतचे कित्येक प्रश्न अनुत्तरित राहतात, हेही खरं. त्यांचे काही फोटो उपलब्ध आहेत. त्यांच्याबद्दलचे दोनेक लहानसे लेख प्रकाशित झाले आहेत. शिवाय त्यांच्या सुहृदांनी सांगितलेल्या काही आठवणी आहेत. वेणूताईंच्या आवाजावर आशियातल्या, ब्रिटनमधल्या हजारोंनी प्रेम केलं. भारतीय उपखंडाचा आणि युरोपचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत असणार्या अनेक दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. पण वेणूताई नक्की कशा होत्या, याचं नीटसं उत्तर मात्र देता येतच नाही.
प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी, आपल्यासाठीच्या तिच्या ओळखी आपल्या आपण तयार करतो. वेणूताईंबद्दल ऐकताना, वाचताना, लिहिताना, त्यांनी लिहिलेलं वाचताना मला नेहमी खिडकीतून उजेडाची वाट बघणारी मोहना आठवते. विलक्षण बुद्धिमान, संवेदनशील, शांत, निग्रही. प्रेमळ. अंधारातही कायम मार्ग शोधणारी.
सातआठ वर्षांपूर्वी एमा लार्किनचं 'फाइंडिंग जॉर्ज ऑरवेल इन बर्मा' हे पुस्तक वाचनात आलं. एरिक ब्लेअरच्या, म्हणजे जॉर्ज ऑरवेलाच्या आईचा जन्म म्यानमारातला. ऑरवेलानंही एटनमधलं शिक्षण संपल्यानंतर पाच वर्षं तिथल्या पोलिसखात्यात नोकरी केली. अतिशय समृद्ध असा देश होता तो तेव्हा आणि म्हणूनच ब्रिटिशांचा आवडता. ब्रिटिशांनी आपल्या पद्धतीनं त्या देशावर राज्य केलं. स्थानिक संस्कृती हळूहळू नष्ट केली. आपली संस्कृती म्यानमार्यांवर लादली. स्थानिक भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला. पुराणप्रिय, दैववादी समाजाला आपण आधुनिक, बुद्धिप्रामाण्यवादी बनवत आहोत, या सबबीखाली भारतातून उच्चशिक्षित अधिकारी आयात केले आणि म्यानमारात अधिकार गाजवणारं नेतृत्व निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. परंपरागत सिद्धांतांचा स्वीकार करून पारंपरिक जीवनशैली अंगीकारणार्यांचा हा पापभिरू, कष्टाळू देश ऐदी होईल, आपला कार्यभाग साधल्यानंतर त्या देशाचा पोत पुन्हा कधीही पूर्ववत होणार नाही, याची पूर्ण सोय ब्रिटिशांनी करून ठेवली. त्या सुरेख, संपन्न देशाची होणारी लूट ऑरवेल बघत होता. त्यात त्याचाही अप्रत्यक्ष सहभाग होताच. म्यानमारविषयी त्याच्या मनात प्रेम होतं. तिथे आल्यानंतर त्यानं स्थानिकांसारखी मिशी राखली होती. अंगावर गोंदवून घेतलं होतं. ब्रिटिश साम्राज्याबद्दल ऑरवेलाला हळूहळू तिरस्कार वाटायला लागला आणि एक दिवस तो ब्रिटनला निघून गेला. म्यानमारमध्ये त्यानं नंतर एकदाही पाऊल ठेवलं नाही. त्या देशाशी त्याचा असलेला ऋणानुबंध मात्र कायम राहिला. 'शूटिंग अॅन एलिफंट' या निबंधातून त्याची घालमेल जगासमोर आली. 'बर्मीज डेज्', 'अॅनिमल फार्म' आणि 'नाइंटीन एटीफोर' या त्याच्या तिन्ही कादंबर्यांमध्ये म्यानमार आहे. तिथलं जीवन आहे. तिथले लोक आहेत. मोठ्या साम्राज्यांनी केलेली पिळवणूक आहे. सांस्कृतिक सपाटीकरण आहे. बड्या देशांनी लहान देशांवर लादलेली त्यांची जीवनशैली, संस्कृतीही आहे. एमा लार्किन या तीनही कादंबर्यांमधलं म्यानमारी जीवन, राजकारण यांच्या शोधात म्यानमारमध्ये फिरली. ऑरवेलनं अनेक दशकांपूर्वी लिहिलेल्या कादंबर्यांमधली पात्रं, त्यांनी केलेला आणि सहन केलेला अन्याय तिला म्यानमारमध्ये जागोजाग सापडले.
'फाइंडिंग जॉर्ज ऑरवेल इन बर्मा' वाचल्यानंतर ऑरवेलची पुस्तकं पुन्हा मला एकदा वाचून काढावीशी वाटली. त्यानं आपल्या लेखनातून अनेकदा साम्राज्यशाहीला विरोध केला. रवींद्रनाथांप्रमाणे त्यालाही साम्राज्यशाहीमुळे होणारं सांस्कृतिक सपाटीकरण नामंजूर होतं. त्याच्या भाषणांमध्ये, त्यानं लिहिलेल्या पत्रांमध्ये साम्राज्यशाहीला केलेला हा विरोध सहज दिसतो. पण मजा म्हणजे त्याला नक्की काय म्हणायचं आहे, हे नीटसं न कळल्यामुळे अनेक ब्रिटिश विचारवंत त्याला साम्राज्यवादाचा खंदा पुरस्कर्ता समजत असत. ऑरवेलाच्या या परस्परविरोधी प्रतिमा बळकट झाल्या त्या दुसर्या महायुद्धाच्या काळात. ऑरवेल तेव्हा बीबीसीत नोकरीला होता. जेमतेम तीन वर्षं त्यानं तिथे नोकरी केली. युद्धकाळात ब्रिटिशांची पाठराखण करणारे, त्यांच्या धोरणांचा गवगवा करणारे कार्यक्रम ब्रिटिशांच्या दक्षिण आशियाई प्रजेसाठी बीबीसीवर सादर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. या काळात त्यानं सादर केलेले कार्यक्रम, केलेली भाषणं, लिहिलेली पत्रं मध्यंतरीच्या काळात बीबीसीच्या आर्काइव्हात सापडली आणि ती नंतर पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. अतिशय रोचक असा हा दस्तऐवज आहे. ऑरवेलाची बड्या देशांच्या वसाहतवादाविरुद्धची मतं या पुस्तकांतून नीट समजून घेता येतात. या सार्या लेखांमध्ये, कागदपत्रांमध्ये वेणू चितळे हे नाव वारंवार वाचायला मिळतं. वेणूताई चितळे या बीबीसीत ऑरवेलाच्या साहाय्यक होत्या. ऑरवेलानं अनेक ठिकाणी आपल्या या साहायिकेचे कौतुकानं उल्लेख केले आहेत. ऑरवेल बीबीसीत येण्यापूर्वी त्या तिथे वृत्तनिवेदिका होत्या. मग नंतर त्या स्वतंत्रपणे कार्यक्रम सादर करू लागल्या. ऑरवेलाबरोबर त्यांनी प्रचंड काम केलं. जगभरात नावाजले गेलेले कार्यक्रम सादर केले. नंतर बीबीसीच्या मराठी वाहिनीची पूर्ण जबाबदारीही सांभाळली. हे सारं भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी.
वेणूताई चितळ्यांबद्दलचे ऑरवेलाच्या संदर्भातले आणि त्यानं केलेले उल्लेख वगळता इतर काही माहिती त्या वेळी हाती लागली नाही. नंतर वर्षादोनवर्षांनी अरविंद व्यं. गोखले आणि प्रतिभा गोपुजकर यांनी लिहिलेले दोन लेख वाचनात आले. वेणूताईंच्या आयुष्याबद्दल, त्यांनी बीबीसीत केलेल्या अफाट कामाबद्दल त्यांतून थोडंफार कळलं. डॉ. सदानंद मोर्यांनी 'लोकमान्य ते महात्मा'त वेणूताईंच्या एका कादंबरीबद्दल लिहिलं होतं. पण त्यात वेणूताईंच्या आयुष्याबद्दल त्यांचं लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं नाव, एवढे दोन तपशील होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ब्रिटिश काउन्सिलीतर्फे भारतात एक फिरतं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांना उजाळा देणारं हे प्रदर्शन होतं. या प्रदर्शनात वेणूताई चितळे पुन्हा एकदा भेटल्या. जॉर्ज ऑरवेल, झियाउद्दीन बुखारी, बलराज साहनी, मुल्क राज आनंद या आपल्या सहकार्यांसमवेत कार्यक्रम सादर करतानाच्या एका फोटोत. या फोटोबरोबर वेणूताईंची थोडी माहिती होती. त्या १९३७ साली ब्रिटनला आल्या, बीबीसीतली नोकरी, साहित्यक्षेत्रातल्या, राजकारणातल्या असंख्य दिग्गजांबरोबर सादर केलेले कार्यक्रम, त्यांच्या आवाजावर, अस्खलित इंग्रजीवर प्रेम करणारे ब्रिटिश, त्यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी कादंबर्या असं पूर्वी वाचलेलं सगळं त्या माहितीत होतं. एक उल्लेख मात्र माझ्यासाठी नवीन आणि महत्त्वाचा होता. वेणूताईंनी त्या काळात भारतीय पाककृतींचे काही कार्यक्रम बीबीसी वर सादर केले होते.
श्रीमती ज्योत्स्ना दामले या वेणूताईंच्या कन्या पुण्यात राहतात. 'प्रभात' स्टुडिओच्या विष्णुपंत दामल्यांच्या या स्नुषा. त्यांना जाऊन भेटलो. मात्र वेणूताईंनी भारतीय पाककृतींचे कार्यक्रम रेडिओवर नियमितपणे सादर केले होते, ही माहिती त्यांनाही नवी होती. मग बीबीसीशी संपर्क साधला. १९२९ सालापासूनचे अनेक कार्यक्रम लिखित आणि श्राव्य स्वरूपात बीबीसीनं जतन करून ठेवले आहेत. वेणूताईंनी सादर केलेल्या कार्यक्रमांची मला ठाऊक असलेली नावं मी त्यांना कळवली. ते कार्यक्रम साधारण कधी प्रक्षेपित केले गेले असतील, ती वर्षं कळवली. लंडनच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या आयोजनात सगळी यंत्रणा गुंतल्यामुळे अनेक महिने काहीच घडलं नाही. मग नंतर एके दिवशी एक इमेल आला. वेणूताईंच्या कार्यक्रमांच्या काही संहिता सापडल्या होत्या. प्रताधिकाराचं उल्लंघन करणार नाही, असं शपथपत्र त्यांना पाठवल्यावर वेणूताईंनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या कार्यक्रमांचे कागद बीबीसीच्या श्रीमती ट्रीश हेज यांच्या मदतीमुळे मला मिळाले. १९४० ते १९४४ या पाच वर्षांत लिहिलेले हे कार्यक्रम. विविध विषयांवरचे. उत्तमोत्तम कवितांचं रसग्रहण, स्त्रियांचं आरोग्य आणि कौटुंबिक समस्या यांच्या चर्चा, संस्कृत आणि हिंदी नाटकांची भाषांतरं, श्रुतिका, जागतिक राजकारण, समाजकारण यांचा घेतलेला आढावा, आशियाई आणि युरोपीय देशांतल्या युद्धकाळातल्या घडामोडी आणि भारतीय पाककृती. युद्धकाळातल्या टंचाई ब्रिटिश आणि आशियाई जनतेला सकस खायला मिळावं, या हेतूनं लिहिलेल्या या पाककृती. साध्या, पण पौष्टिक. कमी खर्चात घरी करता येण्याजोग्या. आपलं अस्सल भारतीय रूप जपणार्या.
फलटणच्या प्रसिद्ध गूळवाल्या चितळ्यांच्या घरात वेणूताईंचा जन्म झाला. आई लहानपणीच वारली, म्हणून वेणूताई शिक्षणासाठी आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी पुण्याला राहायला आल्या. हुजूरपागेत त्यांचं शिक्षण झालं. पुढे लवकरच त्यांचे मोठे बंधू मुंबईला नोकरीला लागले. त्यांनी पार्ल्यात घर भाड्यानं घेतलं आणि वेणूताई भावाकडे मुंबईला आल्या. सेंट कोलंबा स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. ही शाळा होती ग्रँट रोडला. पार्ले ते शाळा हा रोजचा प्रवास त्या काळात बराच लांबचा. वेणूताई मग शाळेच्या वसतिगृहात राहायला गेल्या. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा संपली तसं घरी वेणूताईंच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवली, तर त्यानं सांगितलं की, वेणूताईंच्या लग्नानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीच्या पदरी वैधव्य येणार, हे नक्की. घरचे सगळे घाबरले. वेणूताईंचं लग्नाचं वय झालं होतं. लग्न लांबणीवर टाकलं, तर शेजारी-नातेवाईक चौकश्या करणार. या पेचातून मार्ग काढला वेणूताईंवर निरतिशय प्रेम करणार्या त्यांच्या शिक्षिका लेडी विनी द्युप्ले यांनी. द्युप्लेबाई लंडनला कायमच्या परत निघाल्या होत्या. जाताना त्यांनी आपल्याबरोबर वेणूताईंना नेण्याची तयारी दाखवली. तिथं माँटेसरी पद्धतीनं शिक्षिका तयार करण्यासाठी अभ्यासक्रम सुरू झाले होते. वेणूताईंना हा अभ्यासक्रम पुरा केला तर त्यांना भारतात परतून स्वतःची शाळा सुरू करता येणार होती. शिक्षिकांनी अविवाहित असणं शिष्टसंमत होतं. द्युप्लेबाईंनी लंडनमध्ये वेणूताईंना पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली. बाकीचा सारा खर्च, अगदी बोटीच्या तिकिटासाह, त्या करणार होत्या. वेणूताईंच्या लग्नाचे बेत बारगळले आणि १ जानेवरी, १९३७ रोजी त्या लंडनला पोहोचल्या.
द्युप्लेबाईंच्या घरी राहून वेणूताईंनी माँटेसरीशिक्षिकेचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात हे वर्ग होत असत. खुद्द मादाम मारिया माँटेसरींनी काही काळ वेणूताईंना शिकवलं होतं. दोन वर्षांचा अभ्यासक्रम वेणूताईंनी पूर्ण केला आणि भारतात परतण्याची तयारी सुरू केली. माँटेसरीपद्धतीचं शिक्षण घेणार्या त्या पहिल्या भारतीय होत्या. पुण्यात राहून शिक्षिकेची नोकरी करायची, असं त्यांनी ठरवलं होतं. त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणार होत्या. 'तुमचं लग्न का झालं नाही?', असं कोणी आता त्यांना विचारणार नव्हतं. लंडनमध्ये द्युप्लेबाईंच्या कुटुंबाबरोबर नाताळ साजरा करायचा आणि मुंबईला जाणारी बोट पकडायची, असं त्यांनी ठरवलं होतं. पण १ सप्टेंबर १९३९ला जर्मनी आणि स्लोव्हाकियानं पोलंडवर आक्रमण केलं. दोन दिवसांनी ब्रिटन आपल्या वसाहतींसह जर्मनीवर धावून गेलं. मग १७ तारखेला सोव्हियत रशियानं जपानशी शस्त्रसंधी करून पोलंडवर आक्रमण केलं. एकुणात काय, तर दुसर्या महायुद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. शस्त्रसामर्थ्य असलेला प्रत्येक देश या युद्धात उतरला. आकाशात विमानं घोंघावू लागली, जहाजं बुडू लागली, रात्रीअपरात्री धोक्याचे भोंगे वाजू लागले. आपण एवढ्यात भारतात परतू शकत नाही, हे वेणूताईंनी ताडलं.
पण लंडनला राहून करायचं काय? ब्रिटनमधले तमाम पुरुष युद्धात सामील झाल्यानं स्त्रिया घराबाहेर पडल्या होत्या. स्त्रियांनी घराबाहेर पडून, युद्धावर गेलेल्या पुरुषांच्या जागी काम करून देशसेवा करावी आणि उरलेल्या स्त्रियांनी घरकाम करून देशसेवा करावी, असा संदेश सतत दिला जात होता. वेणूताईही नोकरीच्या शोधात होत्याच, कारण आता त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली होती. त्या काळी माँटेसरीबाई दरवर्षी स्पेनहून ब्रिटनला येत असत. आल्या की काही कॉलेजांमध्ये शिकवत आणि बीबीसीवर व्याख्यानं देत. १९४०च्या जानेवारी महिन्यात त्या बीबीसीच्या स्टुडिओत एका व्याख्यानाच्या ध्वनिमुद्रणासाठी गेल्या असताना त्यांना एक जाहिरात दिसली. बीबीसीवर नोकरभरती सुरू होती आणि अर्थातच स्त्रियांना प्राधान्य दिलं जाणार होतं. वेणूताई नोकरीच्या शोधात आहेत, हे माँटेसरीबाईंना ठाऊक होतं. उगाच कुठल्यातरी कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करण्यापेक्षा बीबीसीत काम करणं उत्तम, असा विचार त्यांनी केला आणि वेणूताईंना तिथे अर्ज करायला लावला. एक शिफारसपत्रही दिलं. उत्तम इंग्रजीच्या, सुरेख लेखनशैलीच्या आणि मुख्य म्हणजे अतिशय मधुर आवाजाच्या जोरावर वेणूताईंना बीबीसीत नोकरी मिळाली. त्यांना ताबडतोब तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी बीबीसीच्या स्टाफ कॉलेजात रवाना करण्यात आलं. ही १९४० सालच्या फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट.
दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि बीबीसी अडचणीत आलं. निष्पक्ष असल्याचा टेंभा मिरवणार्या, पब्लिक लिमिटेड कंपनी असलेल्या स्वायत्त बीबीसीला मिनिस्ट्री ऑफ इन्फर्मेशनच्या ताब्यात देण्यात आलं. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजातल्या सिनेट हाउसात नवं कार्यालय स्थापन करण्यात आलं. माहिती मंत्रालयाला आता बीबीसीचं प्यादं पुढे करून गोबेल्सच्या प्रचाराला उत्तर द्यायचं होतं. गोबेल्सनं ब्रिटनची मोठी अडचण करून ठेवली होती. बर्लिन रेडिओवरून सतत ब्रिटनविरोधी, बराचसा खोटा, प्रचार केला जात होता. मात्र हा प्रचार फक्त युरोपापुरता मर्यादित नव्हता. जर्मनीचं महत्त्वाचं लक्ष्य होतं भारत. ब्रिटनच्या वतीनं वीस लाख भारतीय सैनिक युद्धभूमीवर लढत होते. त्यांची राजनिष्ठा ब्रिटनसाठी महत्त्वाची होती. भारतात जर एखादा उठाव घडून आला आणि या सैनिकांनी असहकार पुकारला, तर ब्रिटनची परिस्थिती मोठी नाजूक झाली असती. युद्धकाळातही अनेक भारतीय नेत्यांनी ब्रिटनच्या सत्तेला असलेला विरोध कायम ठेवला होता. त्यांपैकी एक होते नेताजी सुभाषचंद्र बसू. बर्लिन रेडिओवर मायक्रोफोन हातात घेऊन त्यांनी जोरकस भाषणं द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या या भाषणांना भारतात पाठिंबा मिळत होता. जोडीला ब्रिटनच्या वसाहतवादाला विरोध करणार्या ई. एम. फॉर्स्टरसारख्या लेखकांच्या पुस्तकांची वाचनं होत होती.
भारतात बर्लिन रेडिओचा प्रभाव गहिरा होत असल्याची जाणीव होताच ब्रिटिश सरकार खडबडून जागं झालं. गोबेल्सच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिस विभागात खास भारतासाठी इंग्रजीत आणि हिन्दुस्तानीत कार्यक्रम सादर करण्याची तयारी करण्यात आली. ही जबाबदारी सोपवली गेली ती सर माल्कम डार्लिंग यांच्यावर. सर डार्लिंग हे पंजाब विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरु होते. त्यांनी सुरुवातीची जमवाजमव करून झियाउद्दीन बुखारी यांच्याकडे सूत्रं सोपवली. बुखारींनी कार्यक्रमांसाठी जमवाजमव सुरू केली, पण पैशाची कमतरता होती. त्यामुळे आठवड्यातून दोनदा प्रत्येकी दहा मिनिटं इंग्रजीतून आणि हिंदुस्तानीतून बातम्या, आठवड्यातून एकदा पंधरा मिनिटांचं वार्तापत्र आणि तीनदा सांस्कृतिक कार्यक्रम अशी योजना झाली. रेडिओवरचा उरलेला वेळ होम सर्व्हिशीचे कार्यक्रम प्रक्षेपित करून भरून काढला जायचा. बुधवारी इंग्रजीतून बातम्या द्यायला होत्या वेणूताई चितळे आणि शुक्रवारच्या बातम्या द्यायच्या दमयंती साहनी. त्यांचे पती, बलराज साहनी हिंदुस्तानीतून बातम्या देत. साहनी दांपत्य ब्रिटनमध्ये रॉयल शेक्सपीअर कंपनीबरोबर नाटक करायला आलं होतं. युद्ध सुरू झाल्यावर परतीचे मार्ग बंद झाले आणि तेही बीबीसीत रुजू झाले.
१९४० सालच्या अखेरीस जॉर्ज ऑरवेल बीबीसीत व्याख्यानं देण्यासाठी येऊ लागला. ब्रिटनच्या बाजूनं युद्धात मदत करण्याची त्याची इच्छा होती. ब्रिटिश साम्राज्यवादाला त्याचा विरोध होता खरा, पण जर्मनीला हरवणं हे अधिक महत्त्वाचं होतं. हिटलरच्या वंशभेदाचा जय होणं सर्वस्वी अयोग्य होतं. त्यामुळे ब्रिटनला मदत करायचीच, हे ऑरवेलानं ठरवलं होतं. पण स्पॅनिश युद्धात लढताना त्याची फुफ्फुसं दुखावली होती आणि त्यामुळे त्याला कोणीही सैन्यात प्रवेश देईना. वैतागून त्यानं होमगार्डसेवेत नाव नोंदवलं. पण होमगार्डांना युद्धात फारसं काही करण्यासारखं नव्हतं. अशावेळी बीबीसीनं भारतीय विभागासाठी व्याख्यानांसाठी दिलेल्या आमंत्रणाचा त्यानं लगेच स्वीकार केला. पुढचे काही महिने ऑरवेल नियमितपणे बीबीसीत व्याख्यानांसाठी जात राहिला. 'प्रोलेटरिअन लिटरेचर', 'व्हॉट्स् राँग विथ द मॉडर्न शॉर्ट स्टोरी?', 'द फ्रंटिअर्स ऑफ आर्ट अॅण्ड प्रॉपगँडा' असे व्याख्यानांचे विषय होते. 'लिसनर' या बीबीसीच्या नियतकालिकातही ही व्याख्यानं छापून आली. या व्याख्यानांमुळे ऑरवेलची सांपत्तिक स्थिती काहीशी सुधारली. लंडनमधल्या साहित्यिकांच्या, प्रकाशकांच्या तो संपर्कात होताच. काही नवी पुस्तकं प्रकाशित होतील, अशीही शक्यता निर्माण झाली.
२२ जून, १९४१ रोजी जर्मनीनं रशियावर हल्ला केला आणि रशियानं मित्रराष्ट्रांच्या बाजूनं युद्धात प्रवेश केला. ब्रिटनमधल्या कम्युनिस्टांनी आता मित्रराष्ट्रांना पाठिंबा दिला. डावी वृत्तपत्रंही आता जर्मनीच्या विरोधात गेली. या वृत्तपत्रांनी बीबीसीवर आणि माहिती मंत्रालयावर हल्ला चढवला. 'भारतातले नागरिक पियानो, व्हायोला ऐकून, किंवा ऑस्ट्रेलियन फूटबॉल संघामधल्या घडामोडी ऐकून ब्रिटनला युद्धात पाठिंबा देणार नाहीत. जर्मनीच्या प्रचाराला तोंड द्यायचं असेल, तर त्या तोडीच्या बातम्या आणि इतर कार्यक्रम तयार करा', असा दबाव यायला सुरुवात झाली. मग चक्रं वेगानं फिरली. कार्यक्रमांची जुळवाजुळव सुरू झाली. नव्या नेमणुका करायचं ठरलं. यात ऑरवेलाचं नावही होतं. ब्रिटिश साम्राज्यशाहीला त्याचा असलेला विरोध बघून भारतातले कम्युनिस्टही ऑरवेलाचं म्हणणं ऐकतील आणि प्रचारासाठी याचा फायदा होऊ शकेल, असा बुखारींचा अंदाज होता. शिवाय बीबीसीत काम करणं म्हणजे भारताशी प्रतारणा, असं मानून बीबीसीत यायला नकार देणारे मुल्क राज आनंदही ऑरवेल यांच्या मैत्रीमुळे इस्टर्न सर्व्हिशीत येण्याची शक्यता होती. याला दुजोरा दिला वेणूताईंनी. ऑरवेलानं बीबीसीत यावं, अशी त्यांचीही इच्छा होती. त्यांनी एक श्रुतिका लिहिली होती. ब्रिटिश संसदेनं नुकतीच गुलामगिरी कायद्यानं रद्द केली होती. हाच या श्रुतिकेचा विषय होता. बलराज साहनी, वेस्ट इंडियन लेखिका उमा मार्सन आणि वेणूताई यांचे मुख्य आवाज होते. गुलामांच्या मालकाची लहानशी भूमिका करण्यासाठी वेणूताई योग्य आवाज शोधत होत्या. शेजारच्या स्टुडिओत ऑरवेल काही कामानिमित्त आला होता. वेणूताईंनी त्यांना विनंती केली आणि मालकाचे संवाद म्हणायला ऑरवेल तयार झाला. 'अरे क्षुद्र प्राण्या, गप्प बस! काय वेळ आली आहे! आज तू तोंड वर करून बोलतोयेस, उद्या इथल्या गाईसुद्धा उलट उत्तरं देतील', असा एक संवाद त्यांच्या तोंडी होता. या श्रुतिकेनंतर बुखारींनी जॉर्ज ऑरवेलाला बीबीसीत येण्याबद्दल विचारलं. त्यानं होकार दिला आणि महिना ६४० पौंड पगारावर टॉक्स असिस्टंट या पदावर ऑरवेलची नेमणूक झाली.
प्रशिक्षण संपवून आल्याआल्या बुखारींनी ऑरवेलाच्या हातात बॉम्बे, मद्रास, पंजाब आणि कलकत्ता विद्यापीठांचे अभ्यासक्रम सोपवले. या विद्यापीठांमध्ये शिकणार्या तरुणांसाठी कार्यक्रम करायचे होते. वरपांगी हे कार्यक्रम अभ्यासक्रमाशी संबंधित असले, तरी ब्रिटिश संस्कृती किती उदात्त आणि म्हणून युद्धात ब्रिटिश जिंकणं किती महत्त्वाचं, हे त्या तरुणांच्या मनावर ठसवायचं होतं. शिवाय अशा कार्यक्रमांमुळे उदात्त ब्रिटिशांच्या सेवेत रुजू व्हायला हे तरुण नक्की तयार होती, असा अंदाज होता. ऑरवेल कामाला लागला. त्यानं अगोदर वेणूताईंच्या मदतीनं साप्ताहिक वार्तापत्रं सुरू केली. मग लगेच पुढच्या वर्षी, म्हणजे १९४२ साली व्हॉइस ही साहित्यपत्रिका बीबीसीवरून प्रसारित होऊ लागली. एखादं साहित्याला वाहिलेलं नियतकालिक असावं, तसं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. उमा मार्सन, विल्यम एम्प्सन, मुल्क राज आनंद, वेणूताई आणि ऑरवेल या कार्यक्रमात कविता वाचत आणि समीक्षा करत. युरोपातले दिग्गज साहित्यिक या कार्यक्रमात सामील होत. पुढची दोन वर्षं ऑरवेल आणि वेणूताई या दोघांनी मिळून साहित्य, राजकारण, संस्कृती, विज्ञान या विषयांना वाहिलेले अक्षरशः हजारो कार्यक्रम लिहिले आणि सादर केले. त्यांपैकी थ्रू इस्टर्न आइज् आणि ओपन लेटर्स हे कार्यक्रम विशेष गाजले. वेणूताईंच्या मदतीनं कुमारसंभव, मृच्छकटिक, स्वप्नवासवदत्त, मालतीमाधव, शाकुंतल अशी नाटकं इंग्रजीत भाषांतरित करून बलराज साहनी, दमयंती साहनी, कपूरथळ्याच्या राजकुमारी इंदिरादेवी आणि वेणूताई यांच्या आवाजात प्रसारित केली गेली. संपूर्ण प्रेमचंदही ऑरवेल आणि वेणूताई यांनी बीबीसीसाठी वाचले. या कार्यक्रमांची नुसती यादी बघितली तरी भोंवंडायला होतं. दोनतीन वर्षांच्या या कार्यक्रमांची फक्त नावंच अनेक पानं व्यापतात. ऑरवेल आणि वेणूताई अशा दोन व्यक्ती युद्धकाळात इतकं प्रचंड काम करू शकल्या, हे अविश्वसनीय आहे. बरं हे कार्यक्रम नुसते लिहून, सादर करून भागत नव्हतं. बीबीसीत सेन्सॉरशिप लागू असल्यानं कार्यक्रमातली प्रत्येक ओळ माहिती मंत्रालयाला आधी दाखवावी लागे. एक शब्दही ऐनवेळी घुसडता यायचा नाही. नेमणुकीनंतर दोन महिन्यांतच ऑरवेल बीबीसीवर निर्माता झाला होता आणि वेणूताई त्याचा साहाय्यक होत्या. या कार्यक्रमांसाठी संदर्भ शोधणं, ऑरवेलाला लिखाणात मदत करणं, युरोपातल्या आणि भारतातल्या लेखकांशी, राजकारण्यांशी पत्रव्यवहार करणं, सगळ्या संहिता सेन्सॉरसंमत करून घेणं आणि या संहिता मराठीत भाषांतर करून सादर करणं, ही वेणूताईंची जबाबदारी होती. १९४२ साली बीबीसीवर मराठी कार्यक्रम सादर केले जाऊ लागले होते. वेणूताई या विभागाच्या प्रमुख होत्या. इस्टर्न सेक्शनमध्ये सादर होणारे कार्यक्रम त्या मराठीतून सादर करायच्या.
हे नेहमीचे कार्यक्रम कमी होते म्हणून की काय, ऑरवेलाच्या मनात भारतीय विद्यापीठांत शिकणार्या विद्यार्थ्यांबद्दल वाटणार्या आपुलकीतून एकापेक्षा एक वरचढ शैक्षणिक कार्यक्रम सादर झाले. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचं समग्र, अर्थपूर्ण आणि मानवी अस्तित्वाची जाणीव समृद्ध करणारं चित्रण फक्त साहित्यकलेत होऊ शकतं, असं त्याला त्या काळात वाटत असल्यानं साहित्यविषयक कार्यक्रमांची, त्यातही कवितांविषयीच्या कार्यक्रमांची संख्या अधिक असली तरी विज्ञान, समाजकारण, राजकारण हे विषयही हाताळले गेले. साहित्य आणि युद्ध, साहित्य व विज्ञान, आधुनिक विज्ञानकथा, अमेरिकेचे साहित्यवैभव या विषयांवर त्यानं चर्चा घडवून आणल्या. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या मदतीनं त्यानं विद्यार्थ्यांसाठी या विषयावरच्या पुस्तिका छापून त्या भारतात उपलब्ध होतील, याची व्यवस्था केली. पुढे बीबीसीवर युद्धकाळात सादर झालेल्या कार्यक्रमांचं निवडक पुस्तक त्यानं वेणूताईंच्या मदतीनं टॉकिंग टू इण्डिया या नावानं प्रकाशित केलं. प्राणिसंग्रहालयात घालवलेल्या एका दिवसाबद्दलचं वेणूताईंचंही एक सुरेख भाषण या पुस्तकात आहे.
वेणूताईंनी बहुसंख्य कार्यक्रम ऑरवेलबरोबर सादर केले किंवा लिहिले असले, तरी बीबीसीच्या मुख्य होम सर्व्हिशीवर सादर होणार्या इतर निर्मात्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्येही वेणूताईंमी भाग घेतला होता. हे कार्यक्रम इस्टर्न सर्व्हिशीचा भाग नसल्यानं फक्त युरोपात प्रसारित केले जायचे. द हॅण्ड दॅट रॉक्स द क्रेडल आणि किचन फ्रंट ही त्यांपैकी दोन नावं. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश स्त्रिया जरा स्वावलंबी, स्वतंत्र व्हायचा प्रयत्न करत होत्या. उपकार केल्यासारखे काही हक्क त्यांना दिले गेले, पण तरीही स्त्रीचं खरं कार्यक्षेत्र हे तिचं घर, हा विचार काही मागे पडला नव्हता. दुसर्या महायुद्धाच्या काळात मात्र ब्रिटिश स्त्री घराबाहेर पडली आणि परंपरेचा अभिमान जोपासणारे हात चोळत राहिले. मात्र स्त्रीचं घराबाहेर पडणं, ही केवळ देशाची गरज असल्यानं घडलं असून स्त्रीचं खरं कार्यक्षेत्र हे तिचं घरच आहे, असं स्त्रीस्वातंत्र्याची बाजू घेणार्या काहींनाही वाटत होतं. स्त्रियांमध्ये केवळ आपल्या नवर्याला आणि मुलांनाच वळण लावण्याची शक्ती नव्हती, तर संपूर्ण देशाचं भवितव्य त्यांच्या नीतिमत्तेवर अवलंबून होतं, त्यामुळे प्रत्येक ब्रिटिश स्त्रीनं आपल्या शीलाची जपणूक करणं, ब्रिटिश मूल्यांचा आदर करणं आणि मुख्य म्हणजे घर सांभाळून देशाचा विकास घडवून आणणं अपेक्षित होतं, असंच बहुमत होतं. आंत्वानेत बर्टनसारख्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी ’जर स्त्रीनं नैतिक वागणुकीच्या आधारे देश घडवणं अपेक्षित असेल, तर तिला ब्रिटिश राजकारणात आणि साम्राज्यविस्ताराच्या कामात व्यापक भूमिका मिळालीच पाहिजे’, अशी मागणी केली होती आणि अनेक सुधारणावादीही या मागणीला हसले होते. द हॅण्ड दॅट रॉक्स द क्रेडल हा कार्यक्रम घराबाहेर पडलेल्या ब्रिटिश स्त्रीला गृहव्यवस्थापनाचे धडे देण्याच्या उद्देशानं सुरू झाला होता. या कार्यक्रमात वेणूताईंचा तीनदा सहभाग असल्याची नोंद आहे. हल्ली कशी टिव्हीवरच्या एका मालिकेतली पात्रं दुसर्या मालिकेत जातात, तसाच काहीसा हा प्रकार होता. थ्रू ईस्टर्न आइज आणि द हॅण्ड देट रॉक्स द क्रेडल यांचा हा एकत्रित कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाच्या वेणूताईंच्या संहिता मला मिळाल्या नाहीत. या संहितांचा पाककृतींशी संबंध नसल्यानं त्या लगेच शोधण्याची निकडही नाही.
किचन फ्रंट या मालिकेसाठी वेणूताईंनी लिहिलेल्या काही संहिता माझ्यासमोर आहेत. किचन इन वॉरटाइम हा विशेष कार्यक्रम या मालिकेअंतर्गत वेणूताईंनी सादर केला. या कार्यक्रमाच्या त्यांनी लिहिलेल्या सहा संहिता मला मिळाल्या. त्यांचा सहभाग असलेला पहिला कार्यक्रम सादर झाला मंगळवार, २१ जानेवारी, १९४१ रोजी. सकाळी पावणेअकरा ते अकरा या वेळेत. २७ मार्चनंतरच्या संहिता सापडत नाहीत. कदाचित या शीर्षकाचे तेवढेच कार्यक्रम त्यांनी केले असावेत. त्यानंतर याच किचन फ्रंट मालिकेत वेणूताईंनी अॅपटायझिंग करीज् या शीर्षकाचे काही कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांचीही नक्की संख्या कळत नाही. पहिला कार्यक्रम दोन भागांत ४-५ नोव्हेंबर, १९४१ला सादर झाला. त्यानंतर ऑगस्ट १९४२पर्यंतच्या सहा संहिता सापडल्या आहेत. त्यांपैकी तीन संहिता अगदीच फाटलेल्या अवस्थेत असल्यानं मला तीनच कार्यक्रमांच्या संहिता मिळाल्या. पहिल्या व शेवटच्या संहितेवर फक्त सादरीकरणाची तारीख आहे. या तारखा आणि संहितांची संख्या बघता मधल्या काही संहिता गहाळ झाल्या असाव्यात, असं वाटतं, किंवा वेणूताईंचा सहभाग या अधल्यामधल्या कार्यक्रमांमध्येच असावा.
संहितांचे टंकलिखित कागद बरेच जीर्ण झाले आहेत. अक्षरंही खूप पुसट आहेत. सुरुवातीला कार्यक्रमाचं शीर्षक, जाँ राउनट्री हे निर्मात्रीचं नाव आणि तारीखवारवेळ हे तपशील आहेत. कार्यक्रमाचं उपशीर्षक सम सजेशन्स फॉर डुइंग विदाऊट मीट हे आहे. 'तुम्ही सॉसेजेस अॅण्ड मॅश असा एक पदार्थ करता, हे मला ठाऊक आहे. मीही असाच एक पदार्थ करते, पण त्याचं नाव आहे बीन्स सॉसेजेस अॅण्ड मॅश. मला मिळतील ते बीन्स मी घेते आणि हे बीन्स छान शिजवते. काटेचमच्यानं त्यांना मॅश करते. उकडलेल्या बटाट्याचा थोडा लगदा, काळी मिरी, मीठ, पार्स्ले घालून त्यांना सॉसेजचा आकार देते. मग ब्रेडक्रंबांमध्ये घोळवून हे सॉसेज तळते. तळलेले सॉसेज मी मॅश्ड बटाट्यांवर ठेवते आणि वरून ग्रेव्ही घेते. या ग्रेव्हीतही मीट अजिबात नसतं. ही ग्रेव्ही कशी करायची, ते सांगते’, असं म्हणून पुढे त्या आपल्या मराठी पद्धतीचा टोमॅटो-कांदा-फूलकोबीचा रस्सा कसा करायचा, हे सांगतात. या रश्श्यात त्या धणेजिर्याची पूड, मिरपूड, तिखट, मीठ घालतात. ग्रेव्हीला चव आणण्यासाठी इतकंच पुरेसं आहे, बाजारात मिळणार्या करी पावडरी वापरण्याची गरज नाही, असंही वेणूताई आपल्या श्रोत्यांना सांगतात. या बीन्स सॉसेजेस अॅण्ड ग्रेव्हीबरोबर तुम्ही परतलेली एखादी हिरवी भाजी घेतल्यास उत्तम, असं सांगून त्या कार्यक्रमाचा हा भाग संपवतात.
या मालिकेतली पुढचा भाग ५ फेब्रुवारीला सादर झाला. या भागाचं उपशीर्षकही पहिल्या भागासारखंच आहे. मात्र या संहितेच्या पहिल्या दोनतीन ओळी वाचता येणार नाहीत इतक्या पुसट आहेत. त्यामुळे पदार्थाचं नाव कळत नाही. कृती मात्र व्यवस्थित वाचता येते. अगोदर उकडलेल्या बटाट्याचे चौकोनी तुकडे करा. मोड आलेली, शिजवलेली कडधान्यं, वाफवलेल्या फूलकोबीचे चौकोनी तुकडे आणि भात एकत्र करा. थोडं दूध आणि किसलेलं चीज घालून नीट मिसळा. या मिश्रणाचा लगदा होणार नाही, याची काळजी घ्या. मग वरून थोडं मीठ, मीरपूड, पार्स्ले घालून लोणी लावलेल्या कॅसेरोलात घालून हे मिश्रण झाकण न ठेवता पंधरा मिनिटं अवनात बेक करा. हा पोटभरीचा पदार्थ आहे. हा पदार्थ रात्री जेवणात असेल, तर दुसरं काही जोडीला असण्याची गरज नाही. २१ फेब्रुवारीला सादर प्रसारित झालेल्या पुढच्या भागात वेणूताई बटाटे, फूलकोबी, टोमॅटो, कांदा घालून फोडणी दिलेल्या वरणाची कृती सांगतात. तेलमोहरीहिंगहळद अशी फोडणी करायची, त्यात चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ आणायची, मग शिजवलेलं तुरीचं वरण घालून त्यात तिखट, मीठ, किंचित साखर आणि अर्धा चमचा हवी ती करी पावडर घालायची. ही दालकरी भाताबरोबर खायची. वरणाऐवजी मोड आलेली आणि शिजवलेली कडधान्यंही चालतील, असं कार्यक्रमाच्या शेवटी त्या सांगतात. पुढच्या कार्यक्रमात त्या रताळ्याचा तिखट कीस कसा करायचा, हे शिकवतात. नंतरच्या कार्यक्रमात मोड आलेली कडधान्यं वाटून, त्यात तिखटमीठहळधिंग घालून वडे तळले आहेत. शेवटच्या कार्यक्रमात पत्ताकोबी, बटाटा, टोमॅटो अशी मिश्र भाजी आणि फोडणीचा भात आहे. हे सगळे पदार्थ आपण घरी करतो, त्याच कृतीनं केले आहेत.
अतिशय साधे असणारे, कुठलंही महागडं साहित्य न लागणारे भारतीय पदार्थ वेणूताईंनी रेडिओवरून शिकवावेत, या मागे एक फार मोठं आणि महत्त्वाचं कारण होतं. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा ब्रिटनमध्ये ६०% अन्नधान्य आयात केलं जात होतं. युद्ध सुरू होताच वाहतूकव्यवस्था कोलमडली आणि उपासमारीची भीती निर्माण झाली. लगोलग मिनिस्ट्री ऑफ फूड स्थापन करण्यात आली आणि रेशनिंगला सुरुवात झाली. बेकन, साखर, लोणी, मार्गरिन, चहा, चीज, अंडी, सुकामेवा, वाटाणे, मिठाया, चॉकलेट, बिस्किटं, मैदा, जॅम हे पदार्थ रेशनवर मिळत होते. पंधरा वर्षांपुढल्या प्रत्येक व्यक्तीला दर आठवड्याला दोन औंस लोणी, चहा आणि चीज, दोन औंस खायचं तेल, तीन पाइंट दूध, आठ औंस साखर, एक अंडं एवढं मिळे. एक पाउंड जॅम दर दोन महिन्यांनी मिळत असे. बाजारात आता फळं आणि भाज्या मिळेनाशी झाली. केळी, वांगी, मिरच्या, वाइन, ऑलिव्ह ऑइल तर दृष्टीसही पडेनासे झाले. घरात शिजवायचं काय, हा मोठाच प्रश्न आता निर्माण झाला. तशातच विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ब्रिटिश स्त्री डबाबंद पदार्थांवर अवलंबून राहू लागली होती. कोपर्यावरच्या दुकानात जाऊन भाजी, मासे, चिकन, बीफ आणणं आता खूप कमी झालं होतं. या सगळ्या वस्तू सुपरमार्केटातून डबाबंद स्वरूपात आणल्या जात. जगभरातले पदार्थ आता असे सुपरमार्केटात मिळू लागले होते. अगदी करीड रॅबिटसुद्धा. त्यामुळे गृहिणींची आणि एक्स्ट्रा स्त्रियांची, म्हणजे अविवाहित स्त्रियांची सोय झाली, तरी स्वयंपाकातलं वैविध्य नाहीसं झालं. सगळ्यां घरांत सारखेच पदार्थ खाल्ले जाऊ लागले. बटाटे, वाटाणे, सामन, अंडी, लोणी, चीज आणि पालक यांखेरीज इतर काही आपण खाऊ शकतो, ही जाणीवच नष्ट झाली. द रोड टू विगन पिअर या निबंधात ऑरवेलानं हे वैविध्य नाहीसं झालं आणि त्यामुळे टार्टस्, डेव्हनशायर क्रीम, यॉर्कशायर पुडिंग आता घरी कोणी करेनासं झालं, याबद्दल संतापानं लिहिलं आहे.
रेशनिंग लागू झालं, डबाबंद पदार्थ मिळेनासे झाले आणि 'आता जेवायचं काय?' हा प्रश्न निर्माण झाला. घरात मोजकंच साहित्य आणि त्यातूनच काहीतरी करायला हवं. द असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ डोमेस्टिक सब्जेक्ट्स् पुढे सरसावली आणि युद्ध सुरू झाल्यावर काही महिन्यांतच हार्ड टाइम कुकरी हे पुस्तक बाजारात आलं. यात चमचमीत पदार्थांपेक्षा कमीत कमी जिन्नस वापरून स्वयंपाक करण्याला आणि केलेल्या पदार्थातल्या प्रथिनं, व्हिटॅमिनं यांच्या प्रमाणाला महत्त्व दिलं होतं. वर्तमानपत्रांतून, नियतकालिकांतून रेशनवर मिळणार्या जिनसांतून करता येणार्या पाककृती छापून येऊ लागल्या. सरकारनं माहितीपुस्तिका छापल्या. गॅस आणि इलेक्ट्रिकल कंपन्यांसाठी काम करणार्या होम इकॉनमिस्टांनी रविवारच्या प्रार्थनांमध्ये प्रात्यक्षिकं द्यायला सुरुवात केली. बीबीसीवरची द किचन फ्रंट ही मालिका याच हेतूनं सुरू झाली होती. अँब्रोज हीथ आणि मार्गरेट पॅटन यांच्यासारख्या प्रसिद्ध पाककृतीलेखिका या मालिकेत सामील झाल्या होत्या. शाकाहारी पाककृतींबरोबरच ’अन्न वाया घालवू नका’ हे रेडिओवरून सतत सांगणं या सादरकर्त्यांचं काम होतं. वेणूताईंचे कार्यक्रम याच उद्देशानं सादर केले गेले होते. याच मालिकेत वेणूताईंचा दुसरा कार्यक्रम होता - अॅपटायझिंग करीज्.
या शीर्षकाचा पहिला कार्यक्रम दोन भागांत ४-५ नोव्हेंबर, १९४१ला सादर झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेणूताई भारतीय कर्यांबद्दल सांगतात - 'इथे ब्रिटनमध्ये करी हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. तुम्ही सर्वांनी हा पदार्थ कधीतरी नक्की खाल्ला असणार, यात शंका नाही. मी ज्या देशातून आले आहे, तिथला हा पदार्थ आहे. माझ्या देशातही अनेक प्रकारच्या कर्या केल्या जातात. पण त्या चवीला इथल्या कर्यांपेक्षा वेगळ्या असतात. इथल्या आणि तिथल्या स्वयंपाकाच्या पद्धतींत, जिनसांच्या उपलब्धतेत आणि वापरात फरक असल्यामुळे चवीतही फरक पडतो. माझ्या देशात, म्हणजे भारतात, घरगुती करीमध्ये इथल्यासारखं क्रीम, लोणी, चीज आणि भरपूर करी पावडर घालत नाहीत. भारतातल्या स्वयंपाकात फक्त करी पावडरीनं कधीच चव आणत नाहीत. तिथे वेगवेगळे मसाले वापरतात आणि कुठले मसाले वापरायचे, हे आवडीवर आणि घरच्या पद्धतीवर ठरतं. मी तुम्हांला आज जी पाककृती सांगणार आहे, ती भारतीय आणि ब्रिटिश पद्धतींच्या संगमातून तयार झाली आहे. यासाठी तुम्हांला काही जिन्नस वाण्याकडून किंवा केमिस्टाकडून विकत आणावे लागतील. हे जिन्नस म्हणजे धणे, लाल तिखट आणि हळद', असं म्हणून त्या या जिनसांचं इंग्रजी स्पेलिंग दोनदा सांगतात. हे सांगून झाल्यावर त्या भारतीय करीचं फाउंडेशन कसं तयार करायचं, हे सांगतात. कढई किंवा खोलगट भांडं तापत ठेवा, तेल गरम करा, एक चमचा मोहरी घाला, ती तडतडली की हळद घाला, मग कांदा गुलाबीसर परता. हे झालं फाउंडेशन तयार. आता तुम्ही तुम्हांला हव्या त्या भाज्या, कडधान्यं यात घालू शकता. कार्यक्रमाचा पहिला भाग इथे संपतो. दुसर्या भागात त्या हे फाउंडेशन वापरून फ्लॉवर-बटाटा-टोमॅटो रस्सा कसा करायचा, हे सांगतात. फाउंडेशनात भाज्या, पाणी घालून शिजवा आणि चवीसाठी यात धणेपूड, तिखट, मीठ आणि अर्धा चमचा करी पावडर घाला, असं त्या सांगतात. पुढच्या कार्यक्रमांमध्ये त्या मिश्र कडधान्यांची बटाटा घालून उसळ, पालकाची पातळ भाजी (स्पिनेच अॅण्ड पीनट करी) आणि मिश्र भाज्यांची खिचडी (मिक्स्ड व्हेजिटेबल केजरी) हे पदार्थ शिकवतात. या सगळ्या पदार्थांची कृती अगदी अस्सल महाराष्ट्रीय आहे. चवीला वरून अगदी थोडी करी पावडर वापरली आहे.
वेणूताईंनी या कर्यांच्या कृती रेडिओवर सांगितल्या, तेव्हा करी हा शब्द ब्रिटनमध्ये रुजून निदान दोन शतकंतरी उलटली होती. डबाबंद कर्या उपलब्ध होत्याच. अनेक पुस्तकांमध्ये करीच्या कृती होत्या. रेस्तराँमधून, कॉफी हाउसांतून करी मिळत होती. करी हे नाव रुजलं ते अठराव्या शतकात. करी म्हणजे काय? भाज्या, अंडी, चिकन, मासे, मटण इत्यादी मसाल्यांसकट शिजवून पोळी किंवा भात यांच्याबरोबर खाण्याचा पदार्थ म्हणजे करी, अशी ढोबळ व्याख्या करता येते. बहुतेक शब्दकोश करीची अशीच व्याख्या करतात. करी हे ब्रिटनच्या भारतावर असलेल्या वर्चस्वाचं प्रतीक. एखाद्या संस्कृतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, वर्चस्व दाखवण्यासाठी त्या संस्कृतीच्या महत्त्वाच्या प्रतीकांना आपल्यात सामावून घ्यायचं किंवा त्यांची मोडतोड करायची, हे जगभरातल्या संस्कृतींनी कायमच केलं. ही प्रतीकं मुळात आमचीच आहेत, असं दाखवलं की आपोआप दुसर्या संस्कृतीवर हक्क प्रस्थापित होतो. देवाणघेवाण वेगळी. संकर वेगळा. दोन व्यक्ती, दोन समूह, दोन संस्कृती देवाणघेवाण करतात. घेतलेल्याला आपल्या संस्कृतीचा मुलामा देतात. ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून उचलेगिरी केली, ती त्यांच्यासारखे सुसंस्कृत म्हणून आपण ओळखलं जावं म्हणून. भारतीय खाद्यसंस्कृतीतून केलेली उचलेगिरी ही वर्चस्व दाखवण्यासाठी होती. खरं म्हणजे गेल्या हजार वर्षांचा इतिहास पाहिला, तर फ्रेंच आणि आशियाई प्रभावाखालीच ब्रिटिश खाद्यसंस्कृती वाढलेली दिसते. अठराव्या शतकापासून मात्र ब्रिटिशांनी भारतीय खाद्यसंस्कृती आपल्या देशात रुजवताना आपलं वर्चस्व आपल्या भारतीय व ब्रिटिश प्रजेला कायम जाणवत राहील, याची काळजी घेतली. भारतीय आणि ब्रिटिश खाद्यपरंपरेतली साम्यस्थळं विसरून ब्रिटिशांनी भारतीय पाककला आपल्या देशात नेली आणि आपल्या साम्राज्यशाहीचं प्रतीक म्हणून करी आणि करी पावडर या दोन गोष्टी, भारतीय पाककलेतलं वैविध्य पूर्णपणे नेस्तनाबूत करत, भारतीयांच्या पुन्हा हवाली केल्या. भारतीयांनाही ही करी पावडर गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला या नावानं आपलीशी केली. 'ही आमची हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे', असंही मग भारतीय अभिमानानं सांगू लागले.
भारतावर पोर्तुगिजांनी राज्य केलं. फ्रेंचांनी आणि डचांनीही केलं. मग करी हा शब्द भारतात आणि ब्रिटनमध्येही रुजवण्याचं आणि इथली पाककला तिकडे आणि तिकडची इकडे आणण्याचं पुण्यकर्म फक्त ब्रिटिशांकडूनच का घडलं? डच, पोर्तुगीज भारतात मसाल्यांसाठी आले. मात्र खुद्द हॉलंडमध्ये, पोर्तुगालात आणि ब्रिटनमध्ये होई तितका मसाल्यांचा वापर नव्हता. मसालेदार पदार्थ करण्यात ब्रिटिश पूर्वापार तरबेज होते. इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, भारतात ब्रिटिश आले, त्याच्या कितीतरी आधीपासून ब्रिटिशांना मसाले अतिप्रिय होते. बाराव्या शतकापासून ब्रिटनमध्ये मसाल्यांना हिर्यांचा भाव आला. मसाल्याचा व्यापार मुख्यतः अरबांच्या ताब्यात होता. भारतातून, श्रीलंकेतून, जावा-सुमात्रेतून हे मसाले आणले जात. पण बहुसंख्य युरोपीयांना मात्र हे मसाले नक्की येतात कुठून, हे ठाऊक नव्हतं. स्वर्गातल्या बगिच्यांमध्ये मसाल्यांची लागवड होते, किंवा नाईल नदीत असलेल्या सोनेरी माशांच्या पोटांत हे मसाले असतात, असं लोकांना वाटायचं. त्यामुळे या मसाल्यांमुळे अमरत्व प्राप्त होतं, काळ्या मिरीचा वेल शिश्नाभोवती महिनाभर गुंडाळल्यास आकार वाढतो, पांढर्या मिरीची आणि दालचिनीचा मधातला लेप अंडकोषाला चोळल्यास बराच काळ टिकता येतं, असे भन्नाट समज लोकांमध्ये होते. मसाले विकणार्या व्यापार्यांनी आणि तत्कालीन फॅमिली डॉक्टरांनी हे गैरसमज दूर करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता, कारण त्यामुळे एकतर मसाल्यांच्या किमती नेहमी वर चढत राहायच्या, शिवाय औषध म्हणून मसाले विकताना अशा विद्वान डॉक्टरांना कायच्या काय थापा मारून पैसे उकळता यायचे. हे मसाले बाळगून असणं श्रीमंतीचं लक्षण होतं. आपली श्रीमंती दिसावी म्हणून दिवाणखान्यात मसाले मांडून ठेवलेले असत. बाराव्या शतकात लंडनमध्ये एक पाउंड काळ्या मिरीची किंमत एका शेतमजुराच्या दोन महिन्यांच्या उत्पन्नाइतकी होती. त्यामुळे श्रीमंतांच्याच स्वयंपाकघरांत त्यांच्या वापर होत असे.
मसाल्यांचं भरपूर वापर ब्रिटिश स्वयंपाकात होत असे, याचा पुरावा सापडतो ब्रिटनमधल्या सर्वांत जुन्या पाककृतींच्या पुस्तकात. द फॉर्म ऑफ क्युरी (The Forme of Cury) हे ब्रिटिश पाककृतींचं सर्वांत जुनं पुस्तक. दुसर्या रिचर्ड राजाच्या कारकिर्दीत हे पुस्तक लिहिलं गेलं. या राजाला खाण्यापिण्याचा भारी षौक. त्याच्या दरबारात रोज दहा हजार लोक जेवत. त्यांच्यासाठी स्वयंपाकाला तीनशे स्वयंपाकी होते. तीन डझन बैल आणि तीनशे मेंढ्या रोज कापल्या जात. या राजानं आपल्या महागड्या झग्याच्या बाह्या जेवताना खराब होऊ नयेत, म्हणून आपण हल्ली वापरतो तशा रुमालाचा शोध लावला, असं म्हटलं जातं. दुष्काळ, प्लेग अशा अनेक समस्या समोर असतानाही त्यानं आपली खाद्यभक्ती काही कमी होऊ दिली नाही. तर या दुसर्या रिचर्डच्या आचार्यांनी आणि डॉक्टरांनी त्यांच्या खास पाककृती द फॉर्म ऑफ क्युरीत लिहून ठेवल्या. वासराच्या कातडीवर लिहिलेल्या या एकशे शहाण्णव पाककृती आहेत. रोमन, नॉर्मन, डॅनिश, सॅक्सन आणि आशियाई अशा अनेक संस्कृतींची छाप असलेल्या या पाककृती आहेत. बर्याच किचकट आणि अनेक अवघड तंत्रं आणि प्रक्रिया सामावलेल्या.
अकराव्या शतकानंतर पहिल्या रिचर्ड राजाच्या काळात राजघराण्यानं आणि धनिकांनी पूर्वेची पाककला आपलीशी केली. त्यामुळे स्वयंपाकाची अनेक आशियाई तंत्रं तत्कालीन ब्रिटनमध्ये वापरली जाऊ लागली. बहुतांश घरी मोठाल्या मातीच्या भांड्यांतून उघड्या विस्तवावर स्वयंपाक केला जाई. खोलीभर आकाराचे अवन फक्त गर्भश्रीमंतांकडेच असत. छोट्या, उचलून नेता येण्याजोग्या चुली मात्र अनेकजण वापरत असत. या चुलीही आशियातून आल्या होत्या. या चुलींवर लहान पक्षी आणि मासे भाजले जात. जोडीला रोज निरनिराळे स्ट्यू आणि पोताज असत (आता इथे स्ट्यू हा शब्द वापरला असला, तरी हा शब्द रूढ झाला अठराव्या शतकात. तोपर्यंत हा शब्द अन्न शिजवण्यासाठी वापरायचं भांडं, या अर्थी वापरला जाई). श्रीमंतांघरी स्ट्यूत आणि पोताजात भरपूर मसाले घालत. मांस, भाज्या, धान्यं एकत्र करून, भरपूर पाणी आणि मसाले घालून गच्च शिजवत. हे पोताज. पोताजचे काही प्रकार खास प्रसंगी केले जात. उदाहरणार्थ, दलिया, बदाम आणि दालचिनीचं पोताज. किंवा कोंबडी, सामन मासा आणि केशराचं पोताज. सोळाव्या शतकापर्यंत ब्रिटनमध्ये गहू बाहेरून आणावा लागे. त्यामुळे स्ट्यू आणि पोताज हेच रोजच्या जेवणातले मुख्य पदार्थ होते. मात्र हे पदार्थ करताना, किंवा वाढताना अनेकदा गमती केल्या जात. मोर सोलून, मसाले लावून शिजवत आणि वाढताना पुन्हा त्या मांसावर त्या मोराची सुंदर कातडी आणि पिसं लावून ठेवत. जणू काही जिवंत मोर समोर आणून ठेवला आहे, असं खाणार्याला वाटे. भाजलेले मासे बदामाच्या रांगोळीनं झाकत. कॉकेन्ट्रिस नावाच्या पदार्थात कोंबड्याच्या पोटापर्यंतच्या भागाला डुकराच्या पिलाच्या पोटाखालचा भाग शिवलेला असे. पदार्थांना सुंदर रंग यावा, म्हणून आटवलेलं रक्त, पालक, चंदन, केशर, गुलाबजल, बीट यांचा वापर तर नित्याचाच होता. मेजवानी असेल तर सेज अॅण्ड अनियन रावियोली, मीट जेली पोच्ड इन स्पाइस्ड व्हाइट वाईन, हरणाचं स्ट्यू, केशर आणि बदाम घालून केलेले टार्ट असे पदार्थ केले जात. अशा बर्याच पदार्थांच्या कृती द फॉर्म ऑफ क्युरीत आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे या पुस्तकातल्या अनेक पाककृतींवर आशियाची छाप आहे. स्ट्यू करण्याची पद्धत तर पूर्णपणे आशियाई आहे. मांसाचे तुकडे करून उकळत्या पाण्यात शिजवायचे ही जुनी अँग्लो-सॅक्सन पद्धत. द फॉर्म ऑफ क्युरीमध्ये मात्र मांसाचे लहान तुकडे करून मसाले, वाइन घालून शिजवावेत आणि मांसातून सुटणार्या चरबीत हे तुकडे व्यवस्थित मुरू द्यावेत, असं लिहिलं आहे.
मसाल्यांचा भरपूर वापर, ही द फॉर्म ऑफ क्युरीची खासियत. बुक्केनाद, मॉमेनी, चीकन्स इन कॉडेल आणि लेक लम्बार्ड हे पदार्थ तर भारतीय म्हणून सहज खपतील. या चारही पदार्थांमध्ये आलं, धणे, वेलदोडा, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जायफळ आणि केशर यांचा वापर केला आहे. हे पदार्थ करण्याची पद्धतही आपल्याला बर्यापैकी ओळखीची आहे. उदाहरणार्थ, बुक्केनाद करायचा असेल, तर अगोदर कांदा, लसूण, लवंगा, वेलदोडे आणि दालचिनी लोण्यात परता. कांदा गुलाबी झाला की त्यात धणे, हळद, आलं, जिरं आणि काळी मिरी घाला. हे मिश्रण थोडा वेळ शिजू द्या. मग यात सशाचं कोवळं मांस घालून परता. थोडं पाणी घालून शिजवा.
वर उल्लेखलेल्या इतर पदार्थांच्या कृतीही या पद्धतीला बर्यापैकी जवळ जाणार्या आहेत. मसाले थोडेफार कमीजास्त आणि सशाऐवजी चिकन, पोर्क, हरणाचं मांस एवढाच काय तो फरक. या पुस्तकातल्या अजून दोन पाककृतीही भारतीय पद्धतीचा वापर करतात. त्यांपैकी पहिली - र्युफ ऑफ फ्लेश. म्हणजे मांस घालून शिजवलेला भात. एका मातीच्या भांड्यात धुतलेले तांदूळ घ्यायचे. त्यात कोंबडीचा सौम्य रस्सा घालायचा. वरून भरपूर केशर घातलेलं बदामाचं दूध ओतायचं. खमंग वास येईपर्यंत हा भात शिजवायचा. अजून एक गंमतशीर पदार्थ म्हणजे व्हेर्द सॉस. पुदिना, लसूण, थाइम, सेज, आलं, व्हिनेगर आणि मीठ हे जिन्नस एकत्र वाटायचे. वरून केशर घालायचं. एकप्रकारची हिरवी चटणीच ही. ब्रिटिश जेवण म्हणजे बटाटा, बीफ आणि पुडिंग हा समज या चौदाव्या शतकातल्या पाककृती सपशेल खोटा ठरवतात.
या पुस्तकाच्या शीर्षकातला क्युरी हा शब्द आला होता क्युइर या फ्रेंच क्रियापदावरून. क्युइरचा अर्थ शिजवणे. क्युइरवरून जुन्या इंग्रजीत क्युरेर हे क्रियापद आलं. याचाही अर्थ तोच - शिजवणे. आणि म्हणून शिजवलेला पदार्थ म्हणजे क्युरी. द फॉर्म ऑफ क्युरीनं लिखित साहित्यात हा शब्द (आणि पदार्थही) रूढ केला. या पुस्तकातल्या अनेक पाककृती मसाले वापरून केलेल्या असल्यानं पंधराव्या शतकात क्युरी हा शब्द मसाले घालून शिजवलेल्या भाज्या किंवा मांस या अर्थी वापरला जाऊ लागला. हा शब्द रूढ होण्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण होतं. अन्नाचा संबंध प्रकृतीशी जोडला गेला होता. उत्तम अन्नसेवनामुळे प्रकृती उत्तम राहते, हे लोकांना माहीत होतं. मसाले घातलेले पदार्थ म्हणूनच औषध म्हणून खाल्ले जात होते. हे क्युरेर केलेले मसालेदार क्युरी आजारांना पळवून लावतात, म्हणजे क्युअर करतात, म्हणून मसाले घातलेल्या पदार्थांना आता क्युरी असं संबोधू जाऊ लागलं. क्युअर हे नवं क्रियापद इंग्रजीला मिळालं ते वेगळंच.
१५९७ साली जॉन जेरार्डचं हर्बल हे पुस्तक प्रकाशित झालं. संपूर्ण ब्रिटनला कह्यात घेणार्या हळद, आलं, लसूण, कोथिंबीर-धणे, मिरी, दालचिनी, वेलदोडा, जिरं, मोहरी अशा मसाल्याच्या जिनसांचे गुणधर्म या पुस्तकात सांगितले होते. निकलस कल्पेपर या स्वत:ला हर्बलिस्ट म्हणवणार्या लेखकानंही नंतर १६५३ साली स्वत: एक पुस्तक लिहिलं. या दोन्ही पुस्तकांमध्ये पाककृती नव्हत्या. पण हे मसाले वापरून विविध खाद्यपदार्थ कसे करता येतात आणि पदार्थ खाऊन तुमचं आरोग्य उत्तम कसं राहतं, तुम्ही शंभर वर्षं कसे जगू शकता, हे पानोपानी लिहिलं होतं. कल्पेपरच्या पुस्तकात मसाल्याच्या जिनसांच्या पुडी करून त्या मधाबरोबर घेण्याबद्दल लिहिलं होतं. मसाल्याच्या जिनसांना थोडं ऊन दाखवायचं आणि अगदी गरज असेल तेव्हाच त्यांची पूड करून मधाबरोबर खायची. मेथीदाण्यांमुळे शरीरावरची सूज उतरते, व्हिनेगरमध्ये मेथीदाणे भिजवून अनशापोटी घेतले, तर यकृत उत्तम राहतं, पाण्यात भिजवून घेतले तर पोट साफ राहतं, जिरं खाल्ल्यानं ग्यासेस होत नाहीत, वेलदोड्यामुळे जंत मरतात, लघवीला साफ होते, मोहरीमुळे आळस नाहीसा होतो, असं बरंच काही या दोन्ही पुस्तकांमध्ये होतं. अगोदर पूड करून ठेवली, तर मसाल्यांचे गुणधर्म नाहीसे होतात, कारण हवेशी त्यांतल्या रसायनांचा संयोग होतो, हे या दोन्ही लेखकांनी बजावलं होतं. दोन्ही पुस्तकांना मागणीही अर्थातच प्रचंड होती. मसाल्याचे जिन्नस तब्येत उत्तम ठेवतात, हे आता बहुतेक सर्वांना अगदी नीटच कळल्यानं मसालेदार स्ट्यू असंख्य घरांमध्ये रोज रांधले जात होते. भारतीय आणि अरबी स्वयंपाकपद्धतीशी हे स्ट्यू बर्यापैकी साम्य राखून होते. १६८५ साली प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट मेच्या द अकम्प्लिश्ड कुक या पुस्तकात अगोदर लोणी, मग हळद, बारीक चिरलेले कांदे, लसूण, आलं, दालचिनी, जायफळ, तमालपत्र आणि मग मटण घालून केलेल्या स्ट्यूची पाककृती होती. ही पद्धत भारतीय पद्धतीच्या अगदी जवळ जाणारी होती आणि या पुस्तकांमध्ये अशा पदार्थांना क्युरी, क्युरीज् असं म्हटलं होतं. मॅनर्स अॅण्ड मील्स इन ओल्डन टाइम्स या १८६८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात एफ. जे. फर्नेल यांनी पंधराव्या शतकातल्या एका हस्तलिखितातल्या उतार्याचा उल्लेख केला आहे. या उतार्यात क्युरिज हा शब्द सापडतो.
choppynge, stampynge and gryndynge
Many new curies alle day pey ar contryvynge and fyndynge
pat provotethe pe peple to perelles of passage prouz peyne soore pyndynge
and prouz nice excesse of such receytes of pe life to make a endynge.
त्यामुळे सतराव्या शतकातल्या ब्रिटिश व्यापार्यांना भारतीय पदार्थ मुळीच अनोळखी वाटले नाहीत. सुरतेला त्यांनी खाल्ले ते पदार्थ त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी ब्रिटनमध्येही खाल्ले होतेच. पाद्रे ओव्हिंग्टनानं सुरतेहून लिहिलं होतं, की इथले ब्रिटिश व्यापारी कबॉब, दमपोक, दोपेज, पिलाओ, चटनी खातात. त्या आधी एडवर्ड टेरीनं केलेल्या वर्णनात मांगीरील या पदार्थाचा उल्लेख होता. भात, बदाम, चिकन, वांगी, साखर, गुलाबपाणी, दालचिनी, लवंगा घालून केलेला हा पदार्थ द फॉर्म ऑफ क्युरीतल्या किंवा द इंग्लिस हसवाइफ या पुस्तकातल्या पाककृतींना फारच जवळचा होता. ओव्हिंग्टन आणि टेरी या दोघांनीही त्यांच्या वर्णनांत भारतीय पदार्थांची मूळ नावं लिहिली. त्यांच्यासाठी करी हा शब्द त्यांनी वापरला नाही.
करी हा शब्द नक्की कसा रूढ झाला, हे सांगता येत नाही. कढीपत्त्यासाठी असणार्या करीलीफ या इंग्रजी शब्दावरून तो आला, असं काहींचं म्हणणं आहे, पण ते योग्य नाही. प्रत्येक करीत काही कढीपत्ता नसतो. कढाई या हिंदी शब्दावरून तो आला, असं इतर काही सांगतात. करी हा शब्द सर जॉर्ज करी नावाच्या अख्खं आयुष्य इस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत घालवणार्या शूर सैनिकाच्या गौरवाप्रीत्यर्थ रूढ झाला, असाही काहींचा समज आहे. या करीसाहेबांचा जन्म १८२६चा, आणि मृत्यू १८९०मधला. साधे सैनिक म्हणून ते कंपनीत रुजू झाले आणि नंतर जनरल हा हुद्दा त्यांनी मिळवला. करीसाहेबांना अर्थातच करी अतिप्रिय होती. त्यांचा स्वयंपाकी त्यांच्यासाठी रोज भारतीय भाज्या आणि चिकन / बीफ करी बनवी. या जेवणात कोणी वाटेकरी नको, म्हणून करीसाहेब एकट्यानं जेवत. मग पुढे कधीतरी त्यांना वाटलं, की भारतीय जेवणाचा हा आनंद आपण एकट्यानं उपभोगतो आहोत, हे पाप आहे. आपण या करीची चव आपल्या पलटणीतल्या सैनिकांनाही सवयीची करावी. त्यांनी मग ’रोज मटण विंदालू, चिकन करी आणि चपाती असा स्वयंपाकच केला गेला पाहिजे’, असं फर्मान काढलं. महिन्याभरातच सैनिकांनी बंड पुकारलं. करीसाहेबांचं आणि त्यांच्या सैनिकांचं भांडण पुढे कसं आणि कधी मिटलं, ते काही ठाऊक नाही, पण करी आणि करीसाहेब यांचा ’करीसाहेब रोज करी खात’ यापलीकडे काही संबंध नाही, हे अगदी उघड आहे.
ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांना परिचित असलेले चमचमीत पदार्थ भारतात होते आणि अशा पदार्थांना ब्रिटनमध्ये क्युरी असं म्हटलं जायचं, हे आपण पाहिलंच. या क्युरीवरून करी हा शब्द रूढ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सोळाव्या - सतराव्या शतकात पोर्तुगिजांनीही भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्यांनी भारतीय हवामानाशी, संस्कृतीशी लगेच जुळवून घेतलं. त्यांनी इथल्या जनतेवर धर्मांतरासाठी अनन्वित अत्याचार केले, हे खरं, पण तरी इथल्या चालीरीतीही स्वीकारल्या. पोर्तुगीज आले तेव्हा दक्षिण भारतात शिजवलेल्या भाज्यांच्या आणि मांसाच्या पदार्थांना करि हा प्रत्यय जोडला जायचा. प्राचीन तमीळ भाषेत करि म्हणजे भाज्या. शिजवलेल्या किंवा कच्च्या. अगोदर या शब्दाचा अर्थ होता चावून खाता येण्याजोगे पदार्थ. नंतर हा अर्थ मागे पडला आणि भाज्या हा अर्थ या शब्दानं धारण केला. नंतर करिचा अर्थ अधिक व्यापक होऊन त्यात मांस हा अर्थही समाविष्ट झाला. त्यामुळे अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची नावं करियुक्त असत. उदाहरणार्थ, मिरपूड आणि चिंचेचा कोळ फासून तेलात परतलेल्या कोंबडीला थालितकरि असं नाव होतं. भाज्यांची पोरिकरि केली जाई. चिंच आणि काळी मिरी घालून वाफेवर शिजवलेल्या मांसाला पुलिंकरि असं नाव होतं.
हॉब्सन-जॉब्सन या अँग्लो-इंडियन शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ सांगणार्या शब्दकोशाची पहिली आवृती १८८६ साली प्रसिद्ध झाली. या आवृत्तीत करी हा शब्द आहे. ’भाज्या, फळं, मांस, मासे बारीक वाटलेल्या मसाल्यांबरोबर आणि हळदीबरोबर शिजवून केलेला पदार्थ’ अशी कोशकर्त्यांची करीची व्याख्या आहे. 'करी हा शब्द मूळचा तमीळ असून त्याचा अर्थ सॉस असा आहे आणि पोर्तुगिजांनी तो सुरुवातीला वापरला', असं कोशकर्ते सांगतात. पोर्तुगिजांनी कारील (caril) हा शब्द वापरला असून तो तमीळ करिवरून आणि कन्नड करिलवरून आला आहे आणि ब्रिटिशांनी पोर्तुगिजांच्या कारिलवरून करी हा शब्द तयार केला, असंही ते पुढे सांगतात. तमीळ करि आणि इंग्रजी करी यांचा हा संबंध मान्य केला तरी ब्रिटनमध्ये अनेक शतकं प्रचलित असलेल्या क्युरी या शब्दाकडे दुर्लक्ष करता येत नाही. ’आज ब्रिटिश आणि भारतीय जो करी हा पदार्थ करतात, तो पूर्णपणे भारतीय नसून मध्ययुगीन ब्रिटिश पदार्थांना अधिक जवळ आहे’, असं विधान कोशकर्ते शेवटी करतात आणि त्यामुळे क्युरीशी असलेला संबंध दुर्लक्षित करणं अशक्य बनतं. त्यामुळे करी या शब्दाची व्युत्पत्ती सिद्ध करताना क्युरी आणि करि असे दोन्ही शब्द लक्षात घ्यावे लागतात आणि निश्चित निर्णय देता येत नाही. एक मात्र निश्चित की या दोन शब्दांव्यतिरिक्त करीच्या व्युत्पत्तीशी इतर दुसर्या शब्दाचा संबंध नाही. मसाले घातलेल्या भाज्या किंवा मांस, यासाठी वापरण्यास सोपा असा एकच शब्द हवा, ही अट क्युरी आणि करि हे दोनच शब्द पूर्ण करतात.
करि या तमीळ शब्दाचा मूळ अर्थ कसा बदलला, हे आपण पाहिलं. असंच काहीसं मीट या इंग्रजी शब्दाचंही झालं. मीटचा प्राचीन इंग्रजीतला अर्थ चावून खाता येण्याजोगा पदार्थ. बाराव्या शतकानंतर अचानक या शब्दाचा वापर बदलला आणि मांस या अर्थी हा शब्द वापरला जाऊ लागला. हा वापर काही अचानक झाला नव्हता. फ्रांसमध्ये व्हियाँद हा शब्द प्रचलित होता. अर्थ - खाण्याजोगे पदार्थ. बाराव्या शतकात व्हियाँदचा वापर मांस या अर्थी केला जाऊ लागला आणि ब्रिटिशांनी लग्गेच फ्रेंचांची नक्कल केली. असो.
भारतात ब्रिटिश आले तेव्हा इथलं खाद्यवैविध्य त्यांना दिसलंच असावं. या वैविध्याचं संवर्धन मात्र त्यांनी केलं नाही. बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या प्रेसिडेन्स्यांचा विकास त्यांनी त्यांच्या व्यापारासाठी केला होता. सुरुवातीच्या काळात या प्रेसिडेन्स्यांमध्येच प्रामुख्यानं त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी तिथे खाल्लेल्या पदार्थांना सरसकट करी असं संबोधलं. ही नावंही प्रांतवार दिली. बेंगाल करी, मद्रास करी, बॉम्बे करी, सिलोन करी. भारतीय पाककलेतले सूक्ष्म भेद अँग्लो-इंडियनांना ठाऊक नव्हते. भारतातल्या खाद्यपरंपरेत जातिव्यवस्था होती आणि ही जातिव्यवस्था सर्वांनाच मान्य होती. प्रांत, धर्म, जात यांनुसार घरातल्या स्वयंपाकाची पद्धत ठरत असे. रामपूरची बिर्याणी वेगळी, दिल्लीची वेगळी आणि चेट्टिनादची अजूनच वेगळी. कारवारी स्वयंपाक वेगळा आणि खानदेशी वेगळा. पाटलांचा वेगळा आणि ब्राह्मणांचा वेगळा. अय्यरांचा वेगळा आणि नायडूंचा वेगळा. पण ब्रिटिशांनी इथले सामाजिक ताणेबाणे पूर्णपणे दुर्लक्षिले. त्या त्या भागात कधीतरी खाल्लेल्या कुठल्यातरी रश्श्याची चव ध्यानात ठेवून तीच कृती त्या भागातल्या सर्व पदार्थांसाठी वापरायची, अशी त्यांची स्वयंपाकाची पद्धत. त्यामुळे प्रत्येक सिलोन करीत नारळाचं दूध आणि सिलोन करी पावडर असे आणि प्रत्येक मद्रास करीत दही. गुजरातेतल्या, किंवा वैदर्भी, खानदेशी, केरळी, गढवाली चवी अँग्लो-इंडियनांना जणू ठाऊकच नव्हत्या. अँग्लो-इंडियन सतत फिरतीवर असायचे, त्यांच्या ठरावीक काळानंतर बदल्या व्हायच्या. आधीच्या प्रदेशातल्या चवी जिभेवर रुळल्या असायच्या. नव्या प्रदेशात मिळणारे जिन्नस वापरून त्याच चवी तयार करण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यामुळे बहुसंख्य पदार्थांचं स्वत:चं रूपच हरवलं. उत्तर भारतीय पदार्थांमध्ये सिलोन करी पावडर आणि नारळाचं दूध घालणं वगैरे प्रकार सुरू झाले. बंगाली रश्श्यांमध्ये कैरी घातली गेली, लखनवी मटणात खोबरं आलं. कोंबडीच्या कुठल्याही रश्श्यावर पर्शियन पद्धतीची उकडलेली अंडी ठेवली जाऊ लागली. जोडीला पंजाबी लोणची, दक्षिण भारतीय पापड्या आणि चिरलेला कांदा आला. सगळ्या पदार्थांवर बेंगाल, मद्रास आणि बॉम्बे प्रातांची लेबलं लावली गेली. ब्रिटिश वापरत असलेले करी हा शब्द अर्थातच भारतीयांच्या वापरात नव्हता. कोर्मा, रोगनजोश, मोली, दो पियाझा, हुसैनी, कालिया, पसंदा, सालन, रस्सा, कुळंबु, कुट्टु असे शब्द प्रचलित होते. त्यामुळे करी हा ब्रिटननं भारतावर लादलेला एक पदार्थ, असं म्हणायला हरकत नाही. शिवाय अपरिचित अशा भारतीय पदार्थांना करी हे नाव देऊन ब्रिटिश थांबले नाहीत, तर भारतीय करी या नावाखाली त्यांनी नवीनच पदार्थ जन्माला घातले.
१८५७च्या उठावापूर्वी थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले आणि जेम्स मिल यांच्यासारखे उपयुक्ततावादी ब्रिटिश भारताला ब्रिटनमध्ये सामावण्यासाठी इथली शिक्षणपद्धती, न्यायव्यवस्था यांच्यात बदल करण्याच्या प्रयत्नांत होते. याचवेळी अँग्लो-इंडियन स्त्रियांनी आणि नबॉबांनी पश्मिना शाली, हस्तिदंती वस्तू, सोन्याचांदीचे दागिने यांच्या बरोबर भारतीय करीही ब्रिटनमध्ये नेली. भारताला ब्रिटनमध्ये सामावून घेण्याचा हा एक प्रयत्न होता. पण भारतीय स्वयंपाक म्हणजे करी असा समज दुर्दैवानं ब्रिटनमध्ये रूढ झाला आणि ब्रिटिशांनी मसाले घातलेल्या सगळ्याच भारतीय पदार्थांना करी असं संबोधायला सुरुवात केली. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटनमध्ये करी अनेक ठिकाणी मिळू लागली होती. कुठली करी सर्वोत्तम, कुठली करी भारतातल्या करीसारखी अशा चर्चाही आता रंगू लागल्या होत्या.
अठराव्या शतकाच्या मध्यात ब्रिटन हे युरोपातलं सर्वांत साक्षर राष्ट्र होतं. ब्रिटनमधल्या ४०% स्त्रिया लिहूवाचू शकत होत्या. त्यामुळे नवनवी वर्तमानपत्रं प्रसिद्ध होऊ लागली, आणि पुस्तकांचा धंदाही तेजीत आला. आपली पुस्तकं छापली जात आहेत, आपल्या पुस्तकांना वाचकही आहेत, या आनंदात लेखकही एका मागोमाग एक पुस्तकं लिहू लागले. मात्र ही पुस्तकं स्वस्त नव्हती. सर्वसामान्यांना परवडण्यासारखी तर अजिबात नव्हती. त्यामुळे पुस्तकांची पायरसी सुरू झाली. जुन्या पुस्तकांचे वेगळे बाजार बसू लागले. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तक येऊ लागली ती स्वयंपाकाची. अर्थात पाककृतींची नवीकोरी पुस्तकं येत होतीच. इतर कुठल्याही विषयापेक्षा स्वयंपाकाला वाहिलेल्या पुस्तकांची संख्या अनेकपटींनी जास्त होती. पाककृतीच्या या पुस्तकांनी करीचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हॅना ग्लासनं लिहिलेल्या द आर्ट ऑफ कुकरी मेड प्लेन अॅण्ड इझी या पुस्तकात भारतीय करी पहिल्यांदा झळकली. १७४६ साली या पुस्तकाची पहिली आवृती प्रसिद्ध झाली आणि १८०० सालापर्यंत या पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या होत्या. हॅनाचं बालपण अतिशय दु:खात गेलं होतं. ती अनौरस होती, तिच्या सावत्र आईनं तिचा छळ केला, वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं पळून जाऊन तिच्यापेक्षा वयानं बर्याच मोठ्या असलेल्या एका आयरिश सैनिकाशी लग्न केलं. तिला अकरा मुलं झाली, त्यांपैकी फक्त पाच जगली. हॅनानं आपल्या मुलींसाठी त्यांच्या लग्नानंतर उपयोगी येतील, म्हणून इकडूनतिकडून पाककृती गोळा केल्या होत्या. त्या पाककृतींचंच हे पुस्तक. ब्रिटिश कुकबुकांमध्ये भारतीय करी पहिल्यांदा या पुस्तकात अवतरली. टू मेक अ करी द इंडियन वे या शीर्षकाखाली ही पाककृती दिली होती. करीचं या पुस्तकातलं इंग्रजी स्पेलिंग currey असं होतं. पाककृती लिहिताना आपण 'टू मेक अॅन इडली द साउथ इंडियन वे', किंवा 'टू मेक रिसोतो द इटालियन वे' असं म्हणत नाही. या पदार्थांचं राष्ट्रीयत्व आपण गृहीत धरलेलं असतं. इथे मात्र हॅनानं इंडियन असा वेगळा उल्लेख केला होता. त्यामुळे या पाककृतीचा क्युरीशी असलेला संबंध अधोरेखित होतो. ही पाककृती तशी सोपी होती. दोन कोंबड्या किंवा ससे घ्या. त्यांचे लहान तुकडे करा. तीनचार लहान कांदे बारीक चिरा. काळ्या मिरीचे तीस दाणे आणि चमचाभर धणे भाजा आणि त्यांची बारीक पूड करा. मांसाला ही पूड आणि चमचाभर मीठ लावून ठेवा. मग एका पॅनमध्ये मोठ्या अक्रोडाच्या आकाराचा लोण्याचा गोळा घाला. लोणी वितळलं की त्यात मसाल्यांमध्ये मुरवलेलं मांस आणि पाणी घालून शिजवा. या करीचा रस्सा जरा दाटसरच असतो. या करीशिवाय हॅनाच्या पुस्तकात तीन प्रकारचे पुलाव होते. भाज्यांच्या पुलावात मिरपूड आणि दालचिनी होती. चिकनपुलावात धणे, दालचिनी, तमालपत्र आणि मिरपूड होती. लँबपुलावातही हेच मसाले वापरले होते. हॅनाच्या करीच्या पाककृतीत ससा आणि लोणी आहेत आणि हळद, मोहरी नाहीत. त्यामुळे ही करी पूर्णपणे भारतीय आहे, असं म्हणता येणार नाही.
हॅनाच्या भारतीय करीच्या पाककृतीनंतर काही पुस्तकांमध्ये करीच्या पाककृती लगेचच प्रसिद्ध झाल्या. त्या हॅनाच्या पाककृतीसारख्याच होत्या.एखादा जिन्नस कमीजास्त असेल, इतकंच. मात्र १७७३ साली शार्लट मेसननं एका साप्ताहिकात करी ऑफ चिकन्स (curree of chicken) ही पाककृती लिहिली. या पाककृतीत धणे, हळद, तिखट यांच्या जोडीला ’करी पावडर वापरावी’, असं लिहिलं होतं. एखाद्या पाककृतीत करी पावडर वापरल्याचा हा पहिलाच उल्लेख. मात्र ही करी पावडर कशी तयार करावी, हे त्यात लिहिलं नव्हतं. याच सुमारास मार्था लॉइडच्या पाककृतींचं पुस्तक प्रकाशित झालं. मार्था ही जेन ऑस्टेनची मावसबहीण आणि दोघी एकत्रच राहायच्या. हिनं आपल्या पुस्तकात करी पावडरीची कृती दिली. ब्रिटिश पुस्तकांमध्ये छापली गेलेली करी पावडरीची ही बहुतेक पहिलीच कृती. वीस कर्या करण्यासाठी पुरेशी होईल, एवढी पावडर या कृतीनं करता येते, असं मार्थानं लिहिलं होतं. १३ औंस धणे, ३ औंस जिरं, २ औंस काळी मिरी, ४ औसं हळकुंड, अर्धा औंस लाल तिखट, प्रत्येकी पाव औंस दालचिनी, लवंगा, वेलदोडे आणि सुंठ हे या पावडरीसाठीचं साहित्य. या जिनसा भाजून त्यांची पूड करायची आणि कोरड्या डब्यात भरून ठेवायची. १७९६ साली हॅनाच्या पुस्तकाची कितवीतरी आवृत्ती प्रसिद्ध झाली, तेव्हा त्यातल्या करीच्या कृतीत करी पावडर आणि लाल तिखट यांचाही जिम्मा झाला होता. नावही बदललं होतं. इंडियन करी नावाची ही पाककृती 'करायला सोपी आणि लोकांनी नावाजली आहे’ असंही आता शीर्षकातच सांगितलं होतं. १७८५नंतर बहुतेक सर्व ब्रिटिश कुकबुकांमध्ये ’करीमध्ये एक मोठा चमचा करी पावडर घाला’ असं लिहिलेलं असे. करी पेस्ट करायची असेल, तर हीच पावडर व्हिनेगरमध्ये किंवा व्हाइट वाइनीत दहा दिवस ठेवा आणि वापरा, असंही सांगितलेलं असे. बर्याच पुस्तकांमध्ये करी पावडर घरी करण्याची पद्धतही असे. किंवा लंडनमध्ये उत्तम करी पावडर कुठे मिळते, हेतरी सांगितलेलं असे.
करी पावडरी जन्माला घालण्याचं काम केलं ब्रिटिशांनी. भारतातल्या स्वयंपाकाला चटावलेले नबॉब जेव्हा ब्रिटनमध्ये परतले, तेव्हा त्यांच्या दिमतीला भारतातले मसाले असले, तरी ते मसाले वापरायचे कसे, त्यांचं प्रमाण काय असावं, हे ज्ञान त्यांना नव्हतं. भारतातल्या फिरतीमुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतांमधल्या चवींमधला ढोबळ फरक फक्त माहीत होता. या फरकानुसार त्यांनी बेंगाल, मद्रास आणि बॉम्बे करी अशी नावंही तयार केली होती. पण बेंगाल करीत नक्की कुठले मसाले घालायचे आणि बॉम्बे करीत कुठले, हे कसं कळणार? शिवाय प्रत्येक स्वयंपाक्याच्या हाताची चव वेगळी. ती चव ब्रिटनमध्ये कशी आणावी? अठराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतातून आणलेल्या पाककृतींनुसार धणे, जिरे, वेलदोडा, दालचिनी, काळी मिरी असं सगळं केमिस्टाकडून स्वतंत्र विकत घेऊन रोजच्या रोज ताजी पूड वापरण्याची पद्धत काही घरांमध्ये होती. पण अशी पूड रोज तयार करणं कटकटीचं होतं. भारतात मसालची होते. ब्रिटनमध्ये मसालची आणि खलबत्ते, पाटेवरवंटे नव्हते. या समस्यांवर मात करण्यासाठी भारताततल्या स्वयंपाक्यांकडून मसाल्याच्या जिनसांचं प्रमाण लिहून आणायचं आणि त्यांची पूड करून ठेवायची शक्कल कोणीतरी वापरली आणि या बाटलीबंद पावडरीला नाव दिलं करी पावडर. करी पावडरींचा वापर अनेकांना सोयीचा वाटला. ब्रिटनमध्ये अगदी चौदाव्या शतकापासून मसाल्याच्या तयार पावडरी वापरण्याची पद्धत होती. मसाले महाग असल्यानं सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. म्हणून मसाल्यांच्या पावडरी करून त्या लहान चामडी पिशव्यांतून विकल्या जात. तीन प्रकारच्या पावडरी चौदाव्या शतकात प्रचलित होत्या. पावडर दूस, पावडर फोर्ट आणि पावडर ब्लाँश. पावडर दूस ही गोड पदार्थांमध्ये वापरली जाई. पावडर फोर्ट तिखट पदार्थांमध्ये वापरत. पावडर ब्लाँशमुळे अगदी सौम्य तिखट चव येई. या पावडरी तयार करण्यासाठी लागणारे मसाले आणि त्यांचं प्रमाण स्वयंपाक्यानुसार आणि वाण्यानुसार बदले. त्यामुळे अर्थातच त्यांच्या चवीही बदलत. या पावडरी वापरून केलेल्या अनेक पदार्थांच्या कृती द फॉर्म ऑफ क्युरीतही आहेत. पुढे सोळाव्या शतकात किचन पेपरचा वापर सुरू झाला. या मिश्रणात काळी मिरी, सुंठ आणि दालचिनी असे. तिखट पदार्थांमध्ये ही पूड घातली जाई.
मसाल्यांच्या या तयार पावडरींची दमदार ब्रिटिश परंपरा भारतातल्या मसालेदार रश्श्यांच्या आठवणीनं हळहळणार्या नबॉबांच्या मदतीला धावून आली आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये करी पावडर विकत मिळू लागली. दुकानातून सर्व मसाले घेऊन घरी कुटण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या पावडरी विकत घेऊन घरी एकत्र मिसळण्यापेक्षा एकच पावडर विकत घेतलेली स्वस्त पडत असे. त्यामुळे ही करी पावडर लोकप्रियही लगेच झाली. १७८४ साली लंडनमधल्या वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात झळकली. पिकॅडली भागातल्या सॉर्लीज पर्फ्युमरी हाउसात करीसाठी लागणारी सामुग्री आणि करी पावडर आता मिळू लागली होती. ’करीमुळे पचन सुधारतं, मेंदूला रक्तपुरवठा उत्तम होतो’, असे करीचे फायदे या जाहिरातीत लिहिले होते. ही अशी जाहिरात करणं कदाचित आवश्यक झालं असावं, कारण मसाल्यांचा संबंध लैंगिक शक्तीशी पूर्वापार जोडला गेला होता. व्हिक्टोरिअन ब्रिटनमध्ये त्यामुळे मसालेदार करी खाणं, किंवा आपल्या बायकोला ती खायला घालणं अनेकांना गैरसोयीचं वाटत असावं. पचनसंस्था सुधारते, अशी जाहिरात त्यामुळे करणं आवश्यक झालं होतं.
कर्या आणि करी पावडरी अठराव्या शतकात अतिशय लोकप्रिय झाल्या कारण सतत इतरांची नक्कल करणार्या ब्रिटिश स्वयंपाक्यांना अचानक सतराव्या रोमन आणि ग्रीक पाककलेनं भुरळ घातली. खरं म्हणजे रोमनांच्या स्वयंपाकात काळी मिरी आणि लवंग हे दोन जिन्नस भरपूर वापरले जात, पण ब्रिटिश स्वयंपाक्यांच्या नजरेत भरले ते ऑलिव्ह, केपर आणि अँचोव्हीज. रोमन स्वयंपाकपद्धती लोकप्रिय होण्याचं दुसरं कारण म्हणजे पचनसंस्थेचं मूळ हे किण्वन या प्रक्रियेत आहे, असा प्रचार काही डॉक्टरांनी चालवला होता. म्हणून ज्यांचं किण्वन लवकर होतं, त्या स्वयंपाकघरातून पूर्वी हद्दपार केलेल्या मश्रूम, ऑयस्टर यांना चांगले दिवस आले. मसाल्यांमुळे पोटात अग्नी प्रज्ज्वलित होते आणि पचन उत्तम होतं, हा समज आता मागे पडला. याच सुमारास फ्रांसमध्ये आणि इटलीतही नुव्हेल क्विझिननं, म्हणजे नवपाककलेनं जोर धरला. या नवपाककलेत लोणी आणि तेल यांचा भरघोस वापर होता. हे दोन पदार्थ किण्वनानंतर मीठ आणि इतर रसायनांना बांधून ठेवतात, असा समज होता. परिणामी मसाल्यांचा वापर अतिशय कमी झाला. ब्रिटिशांनी फ्रेंचांचा कित्ता गिरवत जायफळ, लवंगा, दालचिनी यांचा वापर केक आणि पुडिंग करण्यापुरता मर्यादित ठेवला. मसालेदार खाण्यामुळे अपचन तर होतंच, पण कामेच्छा बळावते, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं ते वाईट, असं तत्कालीन विद्वान सांगू लागले. हा समज मग भाज्यांबद्दलही पसरला. कांदा आणि लसूण खाल्ले की तोंडाला वास येतो, ते पचायला जड, शिवाय कामेच्छा बळावते, ते वेगळंच. म्हणून कांदालसूण स्वयंपाकातून बाद झाले. अठरावं शतक उजाडलं तेव्हा फक्त बटाटे, फूलकोबी, ब्रोकोली, फ्रेंच बीन्स आणि अॅस्परेगस याच भाज्या ब्रिटनमध्ये शिजवल्या जात होत्या. फ्रेंच स्वयंपाकपद्धतीचं ब्रिटिशांनी वाटोळं करून ठेवलं होतं. त्यामुळे करीचं सर्वांनी झडझडून स्वागत केलं, यात नवल वाटण्यासारखं काही नव्हतं.
या करीप्रेमाचा आर्थिक फायदाही मिळावा म्हणून बंगालमध्ये पूर्वी सैनिक असणार्या कॅप्टन विल्यम व्हाईटनं सलीम्स करी प्रॉडक्ट्स् बाजारात आणले. त्याच्या करी पावडरीमुळे आरोग्य सुधारतं, हा त्याचा दावा होता. व्हिक्टोरियन काळातल्या पद्धतीप्रमाणे त्यानं आपल्या उत्पादनांची जाहिरात करणारी एक छोटी पुस्तिकाही छापली होती. नाव होतं - करीज् : देअर हेल्थफुल अॅण्ड मेडिसिनल क्वालिटिज; देअर इम्पॉर्टन्स इन अ डोमेस्टिक, कमर्शिअल, अॅण्ड नेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू. सलीम्स ट्रू इंडियन करी पेस्ट घालून तयार केलेल्या फिश करीमुळे पचन सुधारतं, रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे मेंदू ताजातवाना राहतो, असं त्यानं पुस्तिकेत लिहिलं होतं. सलीम्स ट्रू इण्डिया करी पेस्ट गिल्डहॉलातल्या मेयरच्या बँक्वेत एकदा वापरली गेली. त्या बँक्वेचं केटरिंग ज्यानं केलं, त्या कंत्राटदारानं या करी पेस्टीचं कौतुक करणारं पत्र लिहिलं. विल्यमभाऊंनी लगेच त्या पत्राचा जाहिरातीसाठी उपयोग केला. अशी अनेक पत्रं त्यानं जाहिरात म्हणून वापरली. स्पेन्सर्स या भारतातल्या सर्वांत मोठ्या हॉटेलात पन्नास बायका दिवसरात्र सलीम्स ट्रू करी पेस्टीसाठी मसाले कुटत असतात, असंही त्याच्या जाहिरातींत सांगितलेलं असे. पुढे १८४५ साली एलिझाबेथ अॅक्टननं सलीम्स करीज् असा वेगळा विभागच आपल्या मॉडर्न कुकरी फॉर प्रायव्हेट फॅमिलीज् या पुस्तकात केला. या विभागातल्या सगळ्या कर्या विल्यमभाऊंच्या करी पावडरी वापरून केल्या होत्या. येरुसलेम कॉफी हाउसाचे मालक श्री. हार्पर अनेक दिवस आजारी होते. कुठल्याही औषधाचा गुण येत नव्हता, पण सलीम्स करी पावडर घालून तयार केलेल्या कर्या खाल्ल्यानं त्यांची तब्येत झटकन सुधारली. विल्यमभाऊंचे हे दावे वाचून त्यांच्या उत्पादनांचा खप वाढला, पण भारताला नाकं मुरडणारी मंडळी खवळली. त्या वेळी आयर्लंडमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. भूकबळींच्या बातम्या रोजच येत होत्या. ’या करी पावडरी इतक्या असरदार असतील, तर त्या आयर्लंडमधल्या शेतकर्यांना द्या, ते जिवंत राहतील’ असे उद्गार ड्यूक ऑफ नॉरफोकनं काढले होते. अनेकांनी या विधानाचा समाचार घेतला आणि करी खरोखर आरोग्यदायी आहे, या समजाला बळकटी मिळाली. करीची चव तर आवडली होतीच. महिलांच्या मासिकांमधून ’माझ्या वृद्ध आत्येनं रोज करी खाल्ली, आत्ता वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी पाय घसरून पडली म्हणून गेली, नाहीतर अगदी ठणठणीत होती’, अशी पत्रं छापून येऊ लागली. १८६० सालापर्यंत करी पेस्ट, करी पावडर, मलिगटॉनी पावडर, चटनी पेस्ट लंडनमधल्या फोर्टनम अॅण्ड मेसन्स, हॉल ऑफ लंडन आणि सोहो भागातल्या क्रॉस अॅण्ड ब्लॅकवेल यांसारख्या बड्या दुकानांमध्ये मिळू लागल्या होत्या. १८२० ते १८४० या काळात ब्रिटनची हळदीची आर्यात चौपटीनं वाढली.
आधी तेलात / तुपात फोडणी, मग अख्खे मसाले, कांदा, लसूण आणि मग मांस किंवा भाज्या घालून शिजवायचं, ही भारतातल्या ब्रिटिशांची, म्हणजे अँग्लो-इंडियनांची करी करण्याची पद्धत. विल्यम थॅकरेच्या कवितेत सांगितलेली, भारतीय पद्धतीला समांतर असणारी पद्धत ब्रिटनमध्ये वापरली जाऊ लागली. अगोदर कांदे आणि मांस लोण्यात परतायचं, मग करी पावडर टाकायची आणि स्टॉक किंवा दूध घालून शिजवायचं. चवीत फरक हवा असेल तर फार थोडे बदल करायचे. म्हणजे बेंगाल चिकन करी हवी असेल तर बेंगाल करी पावडर घालायची, किंवा बेंगाल चटनी, किंवा लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं घालायचं. भारतीय आणि ब्रिटिश पद्धतीत फरक होता तो इथे. ब्रिटनमध्ये चवीसाठी इतर काहीही न घालता फक्त करी पावडर वापरण्याची पद्धत सुरू झाली. त्या काळातल्या कुठल्याही भारतीय गृहिणीनं किंवा स्वयंपाक्यानं अशी करी पावडर कधीच वापरली नसती. भारतातल्या स्वयंपाकघरांमध्ये खलबत्ते, पाटेवरवंटे होते आणि मुख्य म्हणजे दळणकांडण करायला भरपूर नोकर होते. भारतातले अँग्लो-इंडियन दुकानातून अख्खे मसाले विकत आणत आणि त्यांचे मसालची ताजा मसाला कुटून, वाटणं करून स्वयंपाक्यांच्या हवाली करत. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या तिन्ही प्रेसिडेन्स्यांमध्ये अँग्लो-इंडियनांच्या घरी हीच पद्धत रूढ होती.
मुळात भारतात अगदी पूर्वीपासून ताज्या मसाल्यांचं महत्त्व होतं. ताज्या अन्नाशी धार्मिक भावना निगडित होत्या. शिवाय मसाल्यांमध्ये लगेच संप्लवन होणारी द्रव्यं असतात, हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं. हवेशी त्यांचा संयोग न होणं उत्तम, हेही त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे गरम / काळा / गोडा / मालवणी असे एकत्र केलेले, डब्याबाटल्यांमध्ये भरून ठेवलेले मसाले इथे नसत. प्रत्येक मसाल्याचा पदार्थ स्वतंत्रपणे वापरला जाई. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी मसाल्यांची पूड केली जाई. अशा ताज्या मसाल्यांमुळे स्वाद खुलतो, शिवाय ते आरोग्यपूर्णही असतात, असा समज होता. रोजच्या स्वयंपाकात किंवा औषध म्हणून वापरली जाणार्या गंधद्रव्यांची पूड ताजी असावी, असं सुश्रुत, चरक, वाग्भट यांनी लिहून ठेवलं होतं. अर्थशास्त्र, मानसोल्लास या ग्रंथांमध्येही हेच सांगितलं आहे. ऐन-इ-अकबरी किंवा निमतनामा यांसारख्या ग्रंथांमध्येही अगोदर पूड करून ठेवलेले मसाले दिसत नाहीत.
मसाले कसे वापरायचे, त्यांची साठवणूक कशी करायची याचे काही संकेत होते. प्रत्येक पाककृतीसाठी कुठले मसाले वापरायचे, त्यांचा पदार्थात घालण्याचा क्रम काय असावा, हे ठरलेलं होतं. ऐन-इ-अकबरीत कुठल्या पदार्थासाठी कुठले मसाले वापरायचे, हे व्यवस्थित सांगितलं आहे. शाकाहारी पदार्थांपैकी झर्द बिरंजमध्ये आलं, केशर आणि दालचिनी, थुलीत काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे, पालकाच्या भाजीत काळी मिरी, लवंग आणि वेलदोडा, चिकतीत केशर, वेलदोडा, लवंग, दालचिनी, काळी मिरी, धणे आणि आलं. खिमा पुलावात आलं, काळी मिरी, वेलदोडा, दालचिनी आणि लवंग, काबुलीत आलं, दालचिनी, काळी मिरी, जिरं, लवंग आणि वेलदोडा, मटणाच्या समोश्यात आलं, काळी मिरी, धणे, वेलदोडा, दालचिनी आणि जिरं. मटण कबाबात आलं, जिरं, धणे, काळी मिरी, लवंग, दोप्याझात काळी मिरी, जिरं, धणे, वेलदोडा, लवंग, मुस्सम्मममध्ये धणे, आलं, काळी मिरी आणि केशर. पदार्थांमध्ये एकाच वेळी सगळे मसाले न वापरल्यानं, किंवा तेच ते मसाले न वापरल्यानं चवींमधलं वैविध्य शाबूत राही. भारतीयांना हे ठाऊक असलं, तरी ब्रिटिशांनी मसाल्यांच्या चवींमधलं वेगळेपण जोखलं नाही. मसाल्याचे वेगवेगळे जिन्नस वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र करून वेगवेगळ्या चवी कशा तयार होतात, याचं त्यांना ज्ञान नव्हतं आणि सगळ्या पदार्थांसाठी एकाच चवीच्या करी पावडरींचा वापर केला गेला.
कर्नल आर्थर रॉबर्ट किने-हर्बर्ट भारतात आले १८५९ साली. ते एकोणीस वर्षांचे असताना. त्यांच्या एका वरिष्ठांनी त्यांना करीच्या चवीशी ओळख करून दिली. या वरिष्ठांकडे दुपारच्या जेवणावेळी पार्ट्या असत. आठनऊ प्रकारच्या कर्या, चटण्या, हॅम, गाभोळी असा मेन्यू असे. पार्टीला आलेल्या प्रत्येकाला पार्टीतल्या पदार्थांच्या चवीविषयी बोलणं, चव अधिक चांगली करण्यासाठी काय करावं, कुठला मसाला वापरावा अथवा वापरू नये, याची चर्चा करणं सक्तीचं असे. केनी-हर्बर्ट हे फ्रेंच खाद्यपरंपरेचे चाहते असले, तरी त्यांना करीविषयीही तितकंच ममत्व होतं. फ्रेंच पाककृती जितक्या नजाकतीनं तयार कराव्या लागतात, तितकीच नजाकत भारतीय कर्या रांधतानाही लागते, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी करीविषयी आपल्या कलिनरी जॉटिंग्ज ऑफ मद्रास या पुस्तकात भरपूर लिहून ठेवलं आहे. त्यांच्या मते करी उत्तम होण्यासाठी करी पावडर उत्तम दर्जाची असणं अत्यावश्यक आहे. मसाल्यांना ऊन व्यवस्थित दाखवलं की करी पावडरीची चव खुलते. ही पावडर घट्ट झाकणाच्या बरणीत नीट भरून ठेवावी. काही आळशी अँग्लो-इंडियन त्यांच्या आळशी नोकरांना रोज वापरायची पावडर त्या दिवशी स्वयंपाकाच्या वेळीच करायची परवानगी देतात. अतिशय वाईट अशी ही पद्धत आहे. करी पावडरीचा किमान महिनाभराचा साठा तुमच्याकडे हवा. तुम्ही अतिआळशी असाल, तर करी पावडर विकत आणा. बॅरीची मद्रास करी पावडर अॅण्ड पेस्ट उत्तम आहे. पावडर कायम भारतातूनच विकत घ्या. लंडनमध्ये तयार केलेल्या पावडरीत भयंकर भेसळ असते. डॉ. किनी-हर्बर्ट यांनी करी पावडरीची कृतीही दिली आहे. ४ पाउंड हळद, ८ पाउंड धणे, २ पाउंड जिरं, २ पाउंड मेथीदाणे, १ पाउंड प्रत्येकी खसखस, सुंठ, लाल मिरच्या, काळी मिरी हे साहित्य त्यांनी वापरलं आहे. हे प्रमाण वापरून भरपूर करी पावडर तयार होते आणि करी पावडर जितकी जुनी तितकी चांगली. पावडरीची चव खुलवण्यासाठी पावडर लोण्यात मिसळून पुन्हा कडक उन्हात ठेवा आणि मग चांगली वाळली की डब्यात भरा. या पावडरीत तुम्हांला आवडत असेल तर लवंग, दालचिनी, जायफळ, वेलदोडा घालू शकता. बडीशेपेनंही छान चव येते.
डब्ल्यू. एच. डेव्हच्या द वाइफ्स हेल्प टू इंडियन कुकरी या पुस्तकात मद्रास, बेंगाल आणि मलय करींतला फरक चटकन कळतो. मद्रास करी ही सर्वांत सोपी. तीत फक्त मटण, कांदे आणि मद्रास करी पावडर आहे. या मद्रास करी पावडरीत हळद, सुंठ, धणे, तिखट, काळी मिरी, जिरं आणि वेलदोडे आहेत. बेंगाल करीसाठी डझनभर लहान कांदे, चमचाभर तिखट आणि एक औंस धणे यांची पेस्ट करून ओला नारळ, हळद, मटण यांच्या मिश्रणासह ही पेस्ट वापरायची. थोडी बेंगाल करी पावडर घालायची. या करी पावडरीत मद्रास करी पावडरीच्या जिनसांशिवाय दालचिनी आणि तमालपत्र हे जिन्नस आहेत. मलय करीत ओला नारळ आणि गवती चहा यांचा वापर केला आहे. डेव्हच्या पुस्तकात तो वेगवेगळ्या प्रांतांमधल्या पदार्थांबद्दल, मसाले पदार्थांत घालण्याच्या क्रमाबद्दलही लिहितो. बाटलीतल्या करी पावडर वापरण्याची पद्धत सोयीची असताना भारतीय मात्र उगाच ताजे मसाले कुटत बसतात, हेही तो लिहितो.
काही पुस्तकांमध्ये मात्र करी पावडरींचा वापर अजिबात दिसत नाही. डॉ. रॉबर्ट फ्लॉवर रिडल हे हैद्राबादच्या निझामाचे सल्लागार होते. त्यांचं इंडियन डोमेस्टिक इकॉनमी अॅण्ड रिसीट बुक १८४९ साली प्रसिद्ध झालं. या पुस्तकात एक विभाग कर्यांच्या पाककृतींना वाहिलेला होता. यात कुठेही करी पावडर वापरलेली नाही. ’भारतात ताजा मसाला वाटण्याची परंपरा आहे. त्यासाठी प्रत्येक घरात पाटावरवंटा असतो. ब्रिटिशांनी भारतात राहायला सुरुवात केल्यानंतर मात्र त्यांच्या टूमस्टोनांचा वापर आता पाट्यासारखा व्हायला लागला आहे. रातोरात दफनभूमींमधून अशा संगमरवरी शिळा गायब होत असतात’, अशी टीप या पुस्तकात आहे. मेथी का भाजी अॅण्ड फेनेल करी विथ मीट अशी एक मस्त पाककृती डॉ. रिडल यांनी दिली आहे. यात आलं, लसूण, हळद, धणे, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर एवढेच मसाल्याचे जिन्नस वापरले आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या पाककृतींत वापरल्या नसल्या, तरी ब्रिटनमधल्या वाचकांसाठी पुस्तकात चार प्रकारच्या करी पावडरींची कृती दिली आहे. भाजलेले धणे, हळद, भाजलेलं जिरं, मेथीदाणे, सुंठ, काळी मिरी, सुक्या लाल मिरच्या, खसखस, लसूण, वेलदोडा आणि दालचिनी हे जिन्नस वापरून या पावडरी तयार केल्या आहेत. प्रत्येक पदार्थात या पावडरीचा एक चमचा, लसणीच्या पाचसहा कळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालाव्यात, असं लिहिलं आहे.
१८६०-६५च्या अगोदर करी पावडर ही मुख्यतः ब्रिटनमध्येच तयार होत असे. भारतातून ब्रिटनमध्ये त्या आधी करी पावडर विक्रीसाठी गेल्याची नोंद नाही. तिथे तयार होणार्या करी पावडरींच्या कृती मात्र भारतातले स्वयंपाकी लिहून देत. या करी पावडरींना मग आकर्षक नावं दिली जात. टिपू साब्स करी पावडर हा एक प्रसिद्ध ब्रॅण्ड होता. यातला टिपू साब म्हणजे टिपू सुलतान. त्याच्या खानसाम्यानं म्हणे या करी पावडरीची कृती सांगितली होती. अनेक करी पावडरींच्या बाटल्यांवर असे चित्तचक्षूचमत्कारिक दावे लिहिलेले असत. 'हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या हिंदू धर्मग्रंथात आमच्या करी पावडरीची कृती दिली आहे', 'नेटिव शतकानुशतकं करत आले आहेत ती हीच करी पावडर', असं बिनदिक्कत सांगितलं जाई. शिवाय ही करी पावडर अस्सल ब्रिटिश आहे आणि ब्रिटनचं राज्य असलेल्या एका देशातून तिची कृती आलेली आहे, हेही व्यवस्थित ठसवलं जाई. अनेक बाटल्यांवर, पुडक्यांवर 'ज्या साम्राज्यात कधी सूर्य मावळत नाही, त्या साम्राज्यातली ही करी पावडर' वगैरे लिहिलेलं असे. शिवाय अस्सलतेचे दावेही असत. 'भारतातली अस्सल आणि सर्वोत्तम', 'भारतानं खास आपल्या राणीसाठी तयार केलेली पावडर', 'ब्रिटनच्या करीप्रेमाची खरी निशाणी' असं बाटल्यांवर छापलेलं असे. कालांतरानं बेंगाल, मद्रास, बॉम्बे, सिलोन, मलय असे करी पावडरींमधले भेद नाहीसे होऊन लाल, पिवळी, ब्राऊन या रंगांच्या करी पावडरी लोक मागू लागले. फक्त भाज्यांमध्ये आणि मासांहारी पदार्थांमध्येच नव्हे, तर सूप, पुडिंग यांतही करी पावडर घातली जाऊ लागली.
काही वर्षांतच करी पावडर अमेरिकेतही पोहोचली. मारिआ एलिझा रंडेलच्या १८०६ साली प्रकाशित झालेल्या अ न्यू सिस्टम ऑफ डोमेस्टिक कुकरीमध्ये करीच्या काही कृती आहेत आणि या सर्व पाककृतींमध्ये फक्त करी पावडर वापरली आहे. इतर अख्खे मसाले या कर्यांमध्ये नाहीत. ही करी पावडर कशी तयार करायची, किंवा कुठून विकत आणायची, याचा काही उल्लेख नाही. १८८९ साली पॅरिसमध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनात बर्याच चर्चांनंतर उत्तम भारतीय करीसाठी घटकपदार्थांचं प्रमाण निश्चित करण्यात आलं. ३४ ग्रॅम चिंच, ४४ ग्रॅम कांदे, २० ग्रॅम धणे, ५ ग्रॅम लाल मिरच्या, ३ ग्रॅम हळद, २ ग्रॅम जिरं, २ ग्रॅम मेथीदाणे, २ ग्रॅम काळी मिरी आणि २ ग्रॅम मोहरी असे घटक करीमध्ये असावेत, असं ठरलं. करी पावडरीतल्या घटकांचं प्रमाणही ठरवण्यात आलं. हे प्रमाण असलेल्या करी पावडरीच विकत घ्याव्यात, असं आवाहन करण्यात आलं. तूप / तेल / लोणी, त्यात भाज्या / मांस आणि ही प्रमाणबद्ध करी पावडर, ग्रेव्ही घट्ट करायला मैदा अशी भारतीय करी ब्रिटनमध्ये घरोघरी केली जाऊ लागली. एकच प्रमाण, एकच चव. भारतीय खाद्यवैविध्य नष्ट होण्याची प्रक्रिया बळकट झली.
करी पावडरीप्रमाणे करी सॉसही एकोणिसाव्या शतकात लोकप्रिय झाले. अनेक करी सॉस त्या काळी बॉम्बे, कलकत्ता, मद्रास इथल्या दुकानांमध्ये उपलब्ध होते. कर्नल केनी-हर्बर्टच्या मते रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम सॉस हा हार्वेचा; सटनचा एम्प्रेस ऑफ इंडिया हा सॉसही तसा जालीम, आणि म्हणून उत्तम; ’रीडिंग सॉसची चवही कायम उत्तम असते आणि या सॉसचं भाज्यांमधलं प्रमाण कमीजास्त करून तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूश करू शकता; पण वूस्टर सॉस आणि टॅप्स सॉस मात्र मला अजिबात नापसंत आहेत; हे दोन्ही सॉस अतिजहाल आणि देशी स्वयंपाक्याच्या हाती या बाटल्या दिल्या तर जेवणाच्या टेबलावर बोंबाबोंब होणार हे नक्की', असं त्यांनी लिहिलं होतं.
टॅप्स सॉसमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या मिरच्या आणि लसूण यांमुळे हा सॉस भीतभीतच वापरला जाई. डॉ. रिडल यांच्या इंडियन डोमेस्टिक इकनॉमी अॅण्ड रिसीट बुकमध्ये या सॉसची कृती दिली आहे. चिरलेल्या कैर्या, मीठ, साखर आणि मनुका आठ औंस प्रत्येकी, लाल मिरच्या आणि लसूण चार औंस प्रत्येकी, तीन बाटल्या व्हिनेगर, सहा औंस आलं, एक पाइंट लिंबाचा रस असं साहित्य एकत्र करून बारीक वाटायचं आणि महिनाभर उन्हात ठेवायचं. रोज हे मिश्रण ढवळायला विसरायचं नाही. महिन्याभरानंतर हे मिश्रण नीट गाळून बरणीत भरून ठेवायचं. हा सॉस भाजीत वापरता येतोच, शिवाय चटणी म्हणूनही नुसता खाता येतो.
वूस्टर सॉसचं नावच फक्त ब्रिटिश होतं, बाकी याची चव आणि करण्याची पद्धत बर्यापैकी भारतीय होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लॉर्ड मार्कस सॅण्डी बंगाल प्रांताचे गव्हर्नर होते. बंगाली स्वयंपाक्यांच्या हातचं जेवण त्यांना आवडत नसल्यामुळे एका मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी कारवारहून एक स्वयंपाकी बोलावला होता. हा स्वयंपाकी काही वर्षं मद्रासला आणि मुंबईत युरोपीय कुटुंबात स्वयंपाकाला राहिल्यानं त्याला त्या प्रांतांत केले जाणारे पदार्थ चांगलेच अवगत होते. या स्वयंपाक्याच्या हाताला उत्तम चव होती. वाणीही मिठ्ठास. लॉर्डसाहेबांना त्यानं तिखट खायची सवय लावली. लाल मिरची, थोडासा ताजा कुटलेला मसाला, चिंच आणि गूळ घालून तो फर्मास आमटी करत असे. लॉर्डसाहेब वाट्या भरभरून ही आमटी पीत.
१८३५ साली लॉर्डसाहेब मायदेशी ब्रिटनला परतले. पण त्यांचं मन काही तिथे रमेना. त्यांच्या परमप्रिय आमटीची आठवण त्यांना फार म्हणजे फारच अस्वस्थ करत होती. त्यांना त्यांच्या स्वयंपाक्यानं तो आमटीत घालत असे तो मसाला कुटून बरोबर दिला होता. लॉर्डसाहेब हा मसाला पुरवूनपुरवून वापरत होते. पण कधीतरी तो मसाला संपणार. मग पुढे काय? एक दिवस असंच ब्रॉड स्ट्रीटवर फिरत असताना त्यांना पाटी दिसली - ली अॅण्ड पेरिन्स. जॉन ली आणि विल्यम पेरिन्स या केमिस्टांचं ते दुकान होतं. लॉर्डसाहेब मग दुसर्या दिवशी आपल्याकडचा कुटलेला मसाला तिथं घेऊन गेले. म्हणाले, ’माझा स्वयंपाकी हा मसाला, चिंच, गूळ, मिरच्या घालून आमटी करायचा. मला या चारही घटकांची एक पेस्ट करून द्या, जी मी सगळ्या पदार्थांत वापरू शकेन.’ ली आणि पेरिन्स यांनी तो मसाला ठेवून घेतला, लॉर्डसाहेबांकडून आमटीची चव साधारण कशी होती, हे समजवून घेतलं आणि प्रयोग सुरू केले. चिंचेऐवजी त्यांनी वापरलं व्हिनेगर. महिन्याभराच्या प्रयोगांनंतर त्यांनी दोनतीन ग्यालन रसायन तयार केलं. हे रसायन लॉर्डसाहेबांनी वर्णन केलेल्या चवीबरहुकुम असणं अपेक्षित होतं. लॉर्डसाहेब आले, त्यांना त्या रसायनाची चव भलतीच आवडली आणि ते ग्यालनभर रसायन घेऊन गेले. उरलेल्याची चव बघावी म्हणून ली आणि पेरिन्स यांनी एक चमचाभर पेस्ट तोंडात टाकली आणि त्यांना ब्रह्मांड आठवलं. भयानक तिखट आणि आंबट असं ते भीषण रसायन होतं. त्यांनी निमूटपणे ते छोटं पिंप माळ्यावर टाकलं. पुढे पाचसहा महिन्यांनी माळा स्वच्छ करायला म्हणून त्यांनी ते पिंप खाली काढलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या सॉसची चव आता भलतीच चांगली झाली होती. त्यांनी मग हा सॉस बाटलीबंद करून विकायला सुरुवात केली. हा वूस्टर / वूस्टरशायर सॉस १८३७ साली भारतात आणि १८३९ साली अमेरिकेत पोहोचला होता. भारतात अनेक कर्यांमध्ये हा सॉस करी पावडरीऐवजी वापरला जाऊ लागला. हा सॉस अँग्लो-इंडियनांना इतका आवडला की हा सॉस केसांना लावल्यास काले, घने, लंबे बालांचा लाभ होतो, असाही एक समज होता. १९२१ साली पॅरिसमधल्या हॅरि'ज न्यू यॉर्क बारमध्ये बारटेंडरानं व्होदका आणि टोमॅटोच्या रसात वूस्टर सॉस टाकला आणि ब्लडी मेरी या पेयाचा जन्म झाला.
एकोणिसाव्या शतकात मसाल्यांच्या तयार पावडरी भारतीयही अगदी थोड्या प्रमाणात का होईना, पण वापरू लागले होते. १८६५ साली मुंबईत लोणची आणि चटण्या बनवण्याचा पहिला कारखाना सुरू झाला. या कारखान्यात करी पावडरही बनत असे. या कंपनीचं नाव एम. एम. पूंजियाजी अॅण्ड कंपनी. एम. एम, म्हणजे मंचरजी मानेकजी पूंजियाजी मुंबईच्या गोदीत हिशेबतपासनिसाच्या कार्यालयात नोकरीला होते. मंचरजी मानेकजी मनमिळाऊ. त्यामुळे त्यांच्या साहेबांपासून ते त्यांच्या हाताखालचे कारकून त्यांचे उत्तम मित्र होते. या मित्रमंडळींमध्ये अर्थातच काही ब्रिटिशही होते. मंचरजी मानेकजींच्या पत्नी सुगरण. रोज चारखणी डबा घेतल्याशिवाय मंचरजी घराबाहेर पडत नसत. या डब्यातल्या भाज्या, चिकन, मासे आणि मुख्य म्हणजे लोणची आणि चटण्या सर्वांना अतिशय आवडत. रोज दुपारी गोदीवरच्या कार्यालयाच्या पायर्यांवर मंचरजी आपला डबा उघडून बसत आणि त्यांचा डबा चाखण्यासाठी त्यांच्याभोवती भलंमोठं कोंडाळं असे. एकदा त्यांचे साहेब मंचरजींना म्हणाले, ’तुझी बायको इतका मस्त स्वयंपाक करते, तू हे पदार्थ विकत का नाहीस? इथल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मिळवशील’. मंचरजींनी घरी हा विषय काढला. पूंजियाजींचं तीन भावांचं एकत्र कुटुंब होतं. हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही, असं सर्वांनाच वाटलं आणि घरातल्या स्त्रिया कामाला लागल्या. कैरीच्या आणि आंबोशीच्या लोणच्यापासून सुरुवात करावी, असं ठरलं. करी पावडर या संकल्पनेलाच एकतर पूंजियाजी कुटुंबाचा विरोध होता, शिवाय मुंबईतल्या करी पावडरीपेक्षा ब्रिटिशांचा आवडती होती मद्रासमध्ये तयार झालेली मसाल्याची पूड. त्यामुळे करी पावडर या पर्यायाचा नंतर विचार करावा, असा निर्णय मंचरजींनी घेतला. १८६३ सालच्या मे महिन्यात एका सकाळी दोन मोठाल्या बरण्यांमध्ये कैरीची आणि आंबोशीची लोणची घेऊन मंचरजी गोदीवरच्या पायर्यांवर बसले. तासाभरात दोन्ही बरण्या रिकाम्या झाल्या होत्या. पुढे अनेक महिने एका दिवसाआड मंचरजींचं हे पायर्यांवरचं दुकान भरत राहिलं. लिंबाचं, कोळंबीचं लोणचं, कैरी, आवळा, चिंबोर्या, बोंबील यांच्या चटण्या हातोहात खपू लागल्या. मायदेशी परतणारे ब्रिटिश खास ऑर्डरी देऊन आपल्या आवडीची लोणची, चटण्या बरण्यांमधून नेऊ लागले. ’लोणच्यांचं पायर्यांवरचं दुकान’ अशीच मंचरजींच्या दुकानाची ओळख बनली. वर्षभरात मंचरजींनी नोकरी सोडली आणि पूंजियाजींच्या घरात दुप्पट जोमानं लोणची, चटण्या आणि खास पारशी पद्धतीचा भाजीचा मसाला बनू लागला. हळूहळू मागणी वाढली तशी घरातली जागा पुरेना. शेजारच्या भाड्यानं घेतलेल्या दोन खोल्याही अपुर्या होत्या. मग गोदीजवळच एका लहानसा कारखाना सुरू झाला. बाटलीबंद मसाले, लोणची आणि चटण्या बनवणारा हा पहिला भारतीय कारखाना.
त्याच वर्षी पूंजियाजी अॅण्ड कंपनीनं लोणची आणि चटण्या बरण्यांमध्ये भरून लंडन आणि लिव्हरपूलला पाठवल्या. भारतातून लोणची आणि चटण्या यांची युरोपात (विक्रीसाठी) झालेली ही पहिली निर्यात. व्यवसाय जोमानं वाढला, तसं फ्रांस, अमेरिका आणि अर्थातच इंग्लंडमधल्या औद्योगिक प्रदर्शनांमध्ये पूंजियाजींच्या चटण्या आणि लोणची झळकू लागली. या प्रदर्शनांमध्ये त्यांना असंख्य बक्षिसं मिळाली. बॉम्बेत उद्योजकांच्या चढाओढी आयोजित केल्या जात. त्यातही पूंजियाजी अॅण्ड कंपनीनं पदकं मिळवली. मुंबईच्या गव्हर्नरांना लोणची, चटण्या आणि मसाले पुरवणारे ते अधिकृत सप्लायर होतेच, शिवाय युरोपातल्या अमीरउमरावांच्या ऑर्डरी भलत्याच वेगात येत होत्या. पुढच्या पाच वर्षांत मग मंचरजींनी बॉम्बे करी पावडर विकायला सुरुवात केली. १८९६ साली मुंबईच्या गव्हर्नरांनी पूंजियाजींच्या करी पावडरीच्या अस्सलतेवर शिक्कामोर्तब केलं. ’हीच खरी आणि उत्तम बॉम्बे करी पावडर, सर्वांनी हीच करी पावडर वापरावी’, असं प्रशस्तीपत्र त्यांनी पूंजियाजींना दिलं. ऑन्रीएता हार्वे यांनी अँग्लो-इंडियन कुकरी अॅट होम या पुस्तकात या पावडरीची कृती दिली. तीन पाउंड धणे, अर्धा पाउंड जिरं, दीड पाउंड हळद, चार औंस मेथीदाणे, अर्धा पाउंड मोहरी, एक पाउंड काळी मिरी, सव्वा पाउंड सुक्या लाल मिरच्या असं साहित्य उन्हात वाळवायचं, कढईत एकत्र भाजायचं आणि बारीक पूड करून बाटलीत हा मसाला भरायचा. ही पावडर भारतीय बाजारात तितकीशी लोकप्रिय झाली नसली, तरी इंग्लंडमधल्या दुकानदारांनी अगदी उत्साहानं अनेक महिने खास जाहिराती करून ही बॉम्बे करी पावडर विकली. वर्तमानपत्रांमध्ये 'पूंजियाजींची पावडरच उत्तम' वगैरे पत्रं यायची. तरी भारत स्वतंत्र होईपर्यंत पूंजियाजींची ओळख युरोपात कायम राहिली ती उत्तम लोणची आणि चटणी पुरवणारे निर्यातदार म्हणूनच.
पूंजियाजी लोणची, चटण्या परदेशात विकणारे पहिले भारतीय ठरले, तसे करी पावडरी युरोपात सर्वप्रथम विकण्याचा मान मिळवला पी. वेंकटचलम् यांनी. तमीळनाडूतल्या कुठल्याशा गावात दंगली झाल्या आणि वेंकटचलम् आपल्या कुटुंबासह मद्रासला आले. नव्या शहरात नोकरी शोधणं एक दिव्यच होतं. अनेक लहानसहान नोकर्या केल्यावर वेंकटचलमांना जरा चांगली नोकरी मिळाली. मैलापोर भागातल्या चर्चमधल्या एका बिशपाकडे स्वयंपाकी म्हणून ते रुजू झाले. खरं म्हणजे वेंकटचलमांना युरोपीय पद्धतीचा स्वयंपाक काही अवगत नव्हता. बिशपकाकांना रसम् किंवा दाक्षिणात्य पद्धतीच्या भाज्या आवडत असल्या तरी सूप, स्ट्यू आठवड्यातून एक दिवस तरी लागतच. वेंकटचलम् मग हे पदार्थ करायला हळूहळू शिकले, पण तोपर्यंत बिशपकाका वेंकटचलमांच्या खास दाक्षिणात्य स्वयंपाकाच्या चांगलेच प्रेमात पडले होते. ’आमच्या वेंकटचलमाच्या हातचं जेवायला या’, म्हणून ते आपल्या मित्रांना आग्रहानं बोलावत. त्यांच्या हातच्या चटण्या, लोणची पाहुणे डब्यात भरून नेत. वेंकटचलमांचं कुटुंब मोठं. आई, बायको, दोन मुलं, भाऊ, भावाचंही लग्न झालं होतं. राहायला घर फुकट असलं तरी पगार तसा पुरत नव्हता. बिशपकाकांनाही आपल्या स्वयंपाक्याच्या अद्भुत गुणांची कदर होती. त्यांनी एकदा वेंकटचलमांना बोलावून सांगितलं, ’तुझ्या हाताला चव आहे, चर्चमध्ये नोकरी केलीस, तर तुला कधीही मोठं होता येणार नाही, तू इथून बाहेर पड, स्वत:चा उद्योग सुरू कर, लोणची, चटण्या, मसाले वीक, मी तुला आर्थिक मदत करतो’. बिशपकाकांनी वेंकटचलमांना पाचशे पागोडा दिले. एक पागोडा म्हणजे साधारण आठ शिलिंग. ही रक्कम त्या काळी तशी थोडकी नव्हती. या भांडवलावर मैलापोरातच वेंकटचलम् यांनी दुकान थाटलं. या दुकानात ते रसम्, काही भाज्या, लोणची, चटण्या विकत. सुरुवातीला धंदा हवा तसा चालत नव्हता. जी काही वर्दळ असे, ती ब्रिटिशांचीच. दुकानात जाऊन चटण्या, लोणची आणि तयार भाज्या ब्रिटिशांखेरिज कोण कशाला विकत घेईल? आणि फक्त ब्रिटिशांच्या गिर्हाइकीवर दुकान चालवावं म्हटलं, तर मद्रासमध्ये ब्रिटिशांची संख्याही तितकी पुरेशी नव्हती. ही १८६० सालची गोष्ट.
एकदा कोणा एका नेहमीच्या ब्रिटिश ग्राहकाच्या विनंतीनुसार वेंकटचलमांनी ते कुळंबुत आणि भाज्यांमध्ये घालत, त्या मसाल्यांची पूड करून दिली. लंडनला न्यायला. भाज्यांमध्ये घालण्यासाठी एका भारतीयानं तयार केलेली अस्सल करी पावडर मैलापोरात मिळते, हे कळल्यावर ब्रिटनला परत जाणार्यांच्या ऑर्डरी यायला लागल्या. मजा म्हणजे ही करी पावडर विकत घेणार्यांमध्ये आता काही भारतीय तरुणही होते. मद्रास प्रेसिडेन्सीत राहणार्या या तरुणांना ब्रिटिश सरकार कलकत्ता आणि बॉम्बे प्रेसिडन्स्यांमध्ये नोकरीसाठी पाठवत असे. हे तरुण ब्रिटिशांकडे नोकरीला असले तरी त्यांचं सोवळंओवळं कडक असे. खालच्या जातीतल्या आचार्याच्या हातचं ते खात नसत. बॉम्बे आणि कलकत्त्यात त्यामुळे स्वत: रांधून खावं लागे. अशावेळी रोज वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांचं प्रमाण लक्षात ठेवणं, ते आधी विकत आणणं यापेक्षा ब्रिटिश वापरतात तशी तयार करी पावडर वापरणं सोपं, असा साक्षात्कार या तरुणांना झाला आणि ते वेंकटचलमांकडून करी पावडर विकत घेऊ लागले.
१८६५ साली मद्रास करी पावडरीची पहिली बाटली विक्रीसाठी ऑस्ट्रेलियाला गेली. बाटलीवर ’पीकॉक ब्रॅण्ड मद्रास करी पावडर’ असं लिहिलं होतं. वेंकटचलमांनी व्यवसायाची सुरुवात केली मैलापोरात. मैलापोरचा अर्थ मोरांच्या केकारवाचा प्रदेश, म्हणून त्यांनी मसाल्यांनाही तेच नाव दिलं. हे पीकॉक ब्रॅण्डाचे मसाले ऑस्ट्रेलियात नेले ते डब्ल्यू. एम. बर्ट या घोड्यांच्या व्यापार्यानं. तिथे हे मसाले तसे बरे खपले, पण फारसा नफा न मिळाल्यामुळे वर्षांतून एकदाच हे मसाले तिकडे जात राहिले. असं असलं तरी मसाल्यांच्या तयार पावडरीची, करी पावडरीची भारतातून झालेली आणि एका भारतीय उद्योजकानं केलेली ही पहिली निर्यात. हळूहळू मग अशा तयार मसाल्यांचा खप भलताच वाढू लागला. ब्रिटिश वापरतात म्हणून श्रीमंत भारतीयही अशा करी पावडरी वापरू लागले होते. नोकरीनिमित्त मद्रास प्रांत सोडून जाणारे तरुण तर वेंकटचलमांचे नेहमीचे ग्राहक होतेच. व्यवसाय वाढल्यावर मैलापोरातली जागा अपुरी पडू लागली आणि नं. १, पॉपहॅम्स स्ट्रीट या पत्त्यावर वेंकटचलमांची नवी फ्याक्टरी १८७० साली सुरू झाली. याच वर्षी सतरा वर्षांचे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र, सुब्रमण्य़म पिल्लई वेंकटचलम् वडलांना व्यवसायात मदतीसाठी सामील झाले. भारतापेक्षा परदेशात आपल्या व्यवसायाला जास्त वाव आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. लंडनस्थित व्यापार्यांशी मग त्यांनी संपर्क साधायला सुरुवात केली. गॉर्डन वूड्रॉफ या कंपनीनं होकार कळवला आणि काही बाटल्या नित्यनेमानं लंडनला जात राहिल्या. मालाला अजूनही तिकडे प्रचंड असा उठाव वगैरे नव्हता, पण दर वर्षी दोनतीनशे बाटल्या आरामात खपत होत्या. इतर ब्रिटिश कॉलन्यांमध्येही आता माल जाऊ लागला होता. भारतात मात्र मसाल्याच्या पावडरींना आता मागणी वाढत होती. शेजारचे दोन मोठाले भूखंड विकत घेऊन फ्याक्टरीचा विस्तार करण्यात आला. सुब्रमण्यम पिल्लईंनी कंपनीचं नाव, लोगो यांची ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये नोंदणी करून घेतली. १८९३ साली लंडनच्या जे. ए. शॅरवुड अॅण्ड कंपनीनं ब्रिटनमध्ये वेंकटचलमांची उत्पादनं विकायला सुरुवात केली.
गुणवत्तेच्या जोरावर वेंकटचलमांची उत्पादनं लोकांच्या पसंतीस उतरली. सरकारतर्फे अनेक वर्षं त्यांना उत्तम उत्पादनांसाठीची पदकं मिळत राहिली. ब्रिटनच्या राजघराण्यातही ही उत्पादनं वापरली जात होती. राजवाड्यात खाद्यपदार्थ फक्त रॉयल वॉरंट असलेल्या उत्पादकांकडून विकत घेतले जात. अशी रॉयल वॉरंटं मिळवणार्या पहिल्या दोन भारतीय कंपन्या या पूंजियाजी आणि वेंकटचलम् कुटुंबांच्या होत्या. पुढे स्वित्झर्लॅण्ड, अमेरिका, न्यूझीलंड या देशांमध्ये लोणची, चटण्या, जॅम, जेल्या, करी पावडरी जाऊ लागल्या. व्यवसायाला बरकत आली तशी सुब्रमण्यम पिल्लईंनी मद्रासमध्ये बंगले, जागा विकत घ्यायला सुरुवात केली. ब्रिटिश अधिकारी, कॉलेजांमधले प्राध्यापक या बंगल्यांमध्ये भाड्यानं राहायचे. त्यांच्यासाठी खास तयार केलेल पदार्थ, करी पावडरी नंतर सुब्रमण्यम पिल्लईंनी बाजारात विक्रीस आणले. उदाहरणार्थ, कर्नल स्कीनर यांच्या आवडीची चटणी स्कीनर्स चटनी या नावानं बाजारात मिळू लागली. जनरल टॅप यांच्या आवडीचा करी सॉस टॅप्स सॉस या नावानं उपलब्ध झाला. याच टॅप सॉसाबद्दल कर्नल केनी-हर्बर्ट आणि डॉ. रिडल यांनी लिहिलं होतं. वेंकटचलमांनी अशी अनेक उत्पादनं बाजारात आणली. १८६० साली सुरू झालेला व्यवसाय आजही तितक्याच दिमाखात सुरू आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी कधीतरी वेंकटचलमांनी सांबार पावडर विकायला सुरुवात केली. सांबार हे नाव धारण करणारे काही पदार्थ मद्रास प्रेसिडेन्सीत केले जात होते. मात्र वेंकटचलमांनी ज्या सांबार्यासाठी पावडर तयार केली, ते सांबारं आता भात, इडली, दोसे यांच्याबरोबर खाल्लं जाऊ लागलं होतं. तुरीची डाळ, चिंच, गूळ, शेवग्याच्या शेंगा आणि मसाले घालून हा पदार्थ केला जाई. कुळंबु या पारंपरिक पदार्थाशी फारच साम्य असणारा हा पदार्थ मद्रास प्रेसिडेन्सीत लोकप्रिय होत होता. या सांबार पावडरीचा खपही उत्तम होता.
सांबार पावडर विकायला वेंकटचलमांनी फार उशिरा सुरुवात केली. नक्की कधी, याचे दस्तऐवज आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा पदार्थ कधी प्रचलित झाला, हे वेंकटचलमांच्या व्यवसायाच्या आधारे ठरवता येत नाही. हल्ली मेदूवडेइडलीदोशांभाताबरोबर वाढलं जाणारं सांबारं शोधलं कोणी, या पदार्थाला हे नाव कसं मिळालं, या बाबत एक दंतकथा प्रचलित आहे. डॉ. पद्मिनी नटराजन यांनी काही वर्षांपूर्वी ’सांबार या पदार्थाचा इतिहास’ या नावानं ’द हिंदू’ या प्रतिष्ठेच्या वर्तमानपत्रात (अर्थातच इंग्रजीत) एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी अर्थातच सांबार्याचा शोध कसा लागला, हे लिहिलं होतं. डॉ. नटराजन यांच्या म्हणण्यानुसार हा शोध लागला तंजावरमध्ये. भोसल्यांच्या राजवाड्यात. एकोजीचा मोठा मुलगा पहिला शहाजी तेव्हा सत्तेत होता. हा शहाजी तंजावरच्या इतर राजांप्रमाणे प्रतिभावान लेखक, कवी, चित्रकार आणि उत्तम स्वयंपाकी होता. बरेचदा तो स्वयंपाकघरात जाऊन नवनवीन पदार्थ रांधत असे. त्याला मराठी पद्धतीची तुरीच्या डाळीची आंबटी अतिप्रिय. त्याचं जेवण आंबटीशिवाय होत नसे. त्याला रोज लागणार्या आंबटीसाठी खास कोकणातून आमसुलं आणली जात. तर एकदा या शहाजीला भेटायला संभाजीमहाराज आले. आपला चुलतभाऊ घरी आला, म्हणून त्या दिवशी शहाजी मुदपाकखान्यात गेला, स्वत:च्या हातानं लाडक्या भावासाठी आंबटी करायला. पण हाय रे दुर्दैवा! आमसुलं तर नेमकी संपली होती. आता काय करायचं? सगळे स्वयंपाकी घाबरले. थरथर कापू लागले. आता राजा चिडणार, आणि शिक्षा देणार. तेवढ्यात एका हुशार विदुषकाला युक्ती सुचली. तो धीर एकवटून म्हणाला, ’महाराज, आमसुलं नाहीत म्हणून काय झालं? चिंच तर आहे ना..आपल्या राज्यात सर्वसामान्यांना आमसुलं कुठे परवडायची? ते चिंचच वापरतात. तुम्हीही एक दिवस कोकमांऐवजी चिंच वापरून बघा’. शहाजीला ही युक्ती अगदीच पटली आणि त्यानं त्या दिवशी आंबटीत चिंच घातली. चिंच घातल्यामुळे आंबटीची चव अर्थातच वेगळी लागली. या नव्या पदार्थाला नाव काय द्यायचं? त्या दिवशी संभाजीमहाराज राजवाड्यात आले होते, म्हणून शहाजीनं त्यांच्या सन्मानार्थ चिंच घातलेल्या आंबटीला नाव दिलं सांभार. हा पदार्थ मग संपूर्ण दक्षिण भारतात कसा लोकप्रिय झाला, तो आधी केरळात आणि शेवटी आंध्र प्रदेशात कसा पोहोचला, हेही लेखात पुढे लिहिलं आहे.
डॉ. पद्मिनी नटराजन यांनी लिहिलेला सांबार्याचा हा इतिहास अनेक संकेतस्थळांनी, आंतरजालावरील चर्चांच्या अनेक व्यासपीठांनी, मोठाल्या वृत्तपत्रांनी जसाच्या तसा उचलला आहे. भारतीय पाककृतींच्या एकदोन पुस्तकांमध्येही मी ही कथा / आख्यायिका वाचली आहे. मात्र सांबार्याची, शहाजीची आणि संभाजीराजांची ही कथा लिहिताना डॉ. नटराजन यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही. मागे मी त्यांना इमेल करून या लेखाविषयी आणि पुराव्यांविषयी विचारलं होतं. ’मी लेखात दिलेली कथा ही आख्यायिका असून संपूर्ण तमीळनाडूत ऐकायला मिळते, इतर कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही’, असं त्यांचं उत्तर आलं.
सांबार्याच्या या शहाजी-संभाजी-आख्यायिकेत शंका घेण्याजोग्या काही जागा आहेत. पहिली शंका ऐतिहासिक. पहिला शहाजीराजा गादीवर आला ते १६८४ साली, त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी. संभाजीराजे त्यावेळी होते सत्तावीस वर्षांचे. त्यांचा मृत्यू १६८९ सालचा. १६८४ ते १६८९ ही पाच वर्षं संभाजीराजे देशीपरदेशी शत्रूंशी लढण्यात मग्न होते. शिवाय शहाजीचे वडील एकोजी आणि संभाजीचे वडील शिवाजी एकमेकांचे सावत्रभाऊ आणि त्यांचं नातं काही फार प्रेमाचं नव्हतं. शिवाजीनं तंजावरचं साम्राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे उपरोल्लेखित प्रसंग नक्की कधी घडला असावा, हे सांगणं कठीण. ही कथा सांबारं म्हणजे तुरीची डाळ, चिंच, गुळ आणि मसाले यांचा पदार्थ, असं गृहित धरून चालते. पण सांबार्याचे अनेक प्रकार आहेत. चाकवताचं, अननसाचं सांबारंही पूर्वापार घरोघरी केलं जातं. महत्त्वाचं म्हणजे, सांभार / सांबार हा शब्द संभाजीराजांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आला असला, तर या शब्दातले सां आणि र आले कुठून? भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता संभाजी आणि सांभार / सांबार यांचा संबंध अजिबात जुळत नाही. मग सांबार / सांबारे हे शब्द आणि हा पदार्थ रूढ नक्की कधी झाले? या शब्दामागचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर आपल्याला भारतात रूढ असलेल्या मसाल्यांशी संबंधित काही शब्दांबाबत आधी जाणून घ्यावं लागेल.
भारतात हजारो वर्षांपासून अन्नाची चव, रंग खुलवणार्या हळद, सुंठ, मिरी, लवंग, वेलदोडा, जायफळ अशा अनेक जिनसांचा वापर सुरू आहे. अगदी यजुर्वेदात आणि अथर्ववेदातही हळदीच्या वापराचे उल्लेख सापडतात. हे पदार्थ नक्की कुठले आणि त्यांचा वापर कुठल्या काळात कशाप्रकारे झाला, हे आपण नंतरच्या लेखात पाहू. सध्या आपला संबंध या जिनसांना एकत्रितरीत्या संबोधणार्या समूहवाचक शब्दांपुरताच आहे. पदार्थ चवीला बरे लागावेत, म्हणून वापरल्या जाणार्या जिनसांना पाणिनीनं नाव दिलं व्यञ्जन आणि उपसेचन [२]. पाणिनी सांगतो की, पदार्थांची रूची वाढवायची असेल तर व्यञ्जनांचा वापर हा अनिवार्य आहे. व्यञ्जन आणि उपसेचन हे समानार्थी शब्द. दोहोंचाही ढोबळ अर्थ पदार्थांची चव वाढवणारे जिन्नस हाच आहे. उपसेचन आणि उपसिक्त हे शब्द ’पदार्थांची चव वाढवायला वरून भुरभुरवायचे जिन्नस’ या अर्थी अधिक वापरले जात. पाणिनीच्या काळात वापरली जाणारी व्यंजनं आणि उपसेचनं कुठली? तर दही, तूप, हळद, हिंग, मिरी, सुंठ आणि मीठ. व्यंजन आणि उपसेचन हे शब्द जातककथांमध्येही अनेकदा वापरले गेले आहेत [३]. महा-उम्मगजातकात भात वेगवेगळी व्यंजनं घालून शिजवला होता, असा उल्लेख येतो [४]. उपसेचन हा शब्द पुढे कथासरित्सागर, कात्यायनश्रौतसूत्र अशा ग्रंथांमध्ये आढळतो. या दोन ग्रंथांमध्ये उपदंश हा अजून एक मजेदार शब्द सापडतो. ’जेवणाची अथवा एखाद्या पदार्थाची चव वाढणारे जिन्नस’ हा उपदंश या शब्दाचा सुश्रुतानं सांगितलेला अर्थ. कथासरित्सागरात मात्र उपदंश या शब्दाचा एक वेगळाच अर्थ समोर येतो. जेवताना एकाच चवीचे पदार्थ मागोमाग खाल्ले गेले की, नंतर येणारी वेगळी चव सौम्य होते. असं होऊ नये, प्रत्येक पदार्थाची मूळ चव नीट कळावी, म्हणून नव्या चवीचा पदार्थ चाखताना मुळ्याचा एक तुकडा चावायचा. हा मुळ्याचा तुकडा म्हणजे उपदंश. असो. तर, व्यंजन आणि उपसेचन हे शब्द संस्कृतप्रमाणे पालीतही वापरले जाऊ लागले. नंतरच्या काळात व्यंजन या शब्दाचा अर्थ बदलला. चव वाढवणारे जिन्नस हा अर्थ जाऊन जेवणात चव वाढवणारे पदार्थ, म्हणजे तोंडीलावणी, असा अर्थ व्यंजन या शब्दाला मिळाला. अंबठ्ठसूत्तात व्यंजन हा शब्द मीठ आणि मीरपूड घालून शिजवलेल्या भाज्या या अर्थी येतो.
याच काळात मसाल्यांसाठी कटुक हा समूहवाचक शब्द तयार झाला. या शब्दाचा अर्थ - कटू चव देणारा जिन्नस. पिप्पली, मिरी, सुंठ, जिरं, पांढरी मोहरी, धणे, लवंगा, हळद या जिनसांचा कौटिल्य कटुकवर्गात अंतर्भाव करतो [५]. या कटुकवर्गात मसाल्याचे तमाम पदार्थ अंतर्भूत होते. पण काही विवक्षित जिनसांचा समूह दर्शवण्यासाठीही शब्दांची योजना होती. कटुचतुर्जातक / कटुचातुर्जातक म्हणजे वेलदोडा, दालचिनी, तमालपत्र आणि काळी मिरी. पुढे यातला कटु गळून पडला आणि हे चार जिन्नस एकत्र आले की चातुर्जातक या नावानं ओळखले जाऊ लागले. नलराजाच्या पाकदर्पणात हा चातुर्जातक अनेकदा भेटतो [६]. कटुत्रय किंवा त्रिकटुक म्हणजे सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली. कटुकंद म्हणजे आलं आणि लसूण. त्रिकटुक या शब्दावरून पालीत तिकटुलं असा शब्द आला. सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली घालून केलेली भाताची पेज, असा या शब्दाचा अर्थ. बुद्धाची एक कथा आहे. बुद्ध एकदा राजगीरला गेला आणि वेळुवनात राहिला. रात्री त्याचं पोट लागलं गुरगुरायला. आनंद या त्याच्या शिष्यानं मग सुंठ, मिरी, पिप्पली, तीळ, तांदूळ यांचं तिकटुलं केलं. बुद्ध आनंदाला रागावला. एकतर त्यानं बुद्धासाठी, बुद्धाची परवानगी न घेता पदार्थ शिजवला होता. शिवाय त्यानं ते तिकटुलं यजमानाच्या घरात शिजवलं होतं. दोन्ही गोष्टी संघाच्या नियमांविरुद्धच. असो. कटुकभण्ड असा मसाल्याच्या जिनसांसाठी असलेला पाली शब्द न्यग्रोधजातकात सापडतो. तूप, मीठ आणि मसाले घालून मांस शिजवलं होतं, असा उल्लेख या कथेत आहे [७]. संस्कृत भाषेनं हा शब्द उसना घेतला, पण कटुकभाण्ड असा बदल करून. वात्स्यायनाच्या कामसूत्रात हा शब्द सापडतो [८]. गंधद्रव्य आणि आहारयोगी असे दोन शब्द सुश्रुत आणि चरक मसाल्याच्या जिनसांसाठी वापरतात. गंधद्रव्यात मसाल्याच्या सर्व जिनसांचा समावेश मात्र नाही. लवंग, वेलदोडा, दालचिनी, जायफळ, तमालपत्र सुगंधी जिनसांसाठीच गंधद्रव्य वापरला गेला आहे. आहारयोगी हा शब्द मात्र अधिक समावेशक आहे. आहारयोगी या शब्दात मसाल्याचे जिन्नस, वेगवेगळ्या प्रकारची मिठं, गूळ यांचाही समावेश आहे.
चव वाढवणारे जिन्नस या अर्थी नवा समूहवाचक शब्दही रूढ होता - सम्भार. सम्भारति हे क्रियापद सर्वप्रथम यजुर्वेदात आढळतं. मूळ अर्थ - हवनासाठी लागणारी सामग्री गोळा करणे / तयार करणे / मिळवणे. मैतरेयसंहितेत या क्रियापदाचे जपणे आणि बक्षीस देणे हे अर्थही सापडतात. सम्भारतिचं प्रयोजक-क्रियापद सम्भारयति आणि या सम्भारयतिपासून तयार झाला सम्भार हा शब्द. अर्थ - एखाद्या कार्यासाठी केलेली तयारी, लागणारी सामुग्री, आवश्यक वस्तू, किंवा एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समूह, किंवा आधार, किंवा पुढे नेणारी, अधार देणारी वस्तू. यजुर्वेदात हा शब्द कार्य पुढे नेणार्या वस्तूंचा समूह या अर्थी आढळतो. महाभारतात हा शब्द संपत्ती या अर्थी येतो. अन्नाची, जेवणाची चव वाढवणारे, चव पुढे नेणारे जिन्नस या अर्थी सम्भार हा शब्द सर्वप्रथम वापरलेला दिसतो तो जातककथांमध्ये. गोधाचं, म्हणजे घोरपडीचं मांस व्हिनेगर आणि मसाले वापरून चवदार केलं, असा उल्लेख एका जातककथेत येतो [९]. संस्कृतात मसाल्याचे जिन्नस या अर्थी सम्भार हा शब्द सर्वप्रथम वापरलेला दिसतो कौटिल्याच्या अर्थशास्त्रात. मेदक आणि प्रसन्ना अशी दोन मादक पेयं तांदळापासून कशी बनवायची, हे कौटिल्यानं सांगितलं आहे. या दोन्ही दारवा बनवण्यासाठी तांदूळ, किण्व (यीस्ट), मध, हळद, दुर्वा, वेलदोडा, काळी मिरी इत्यादी वापरायला सांगितलं आहे. यातल्या मसाल्याच्या जिनसांना कौटिल्य सम्भारवर्गात घालतो [१०]. मेषशृंगीच्या खोडाचं साल, पिप्पली, काळी मिरी आणि त्रिफळा यांपासून तयार केलेलं मैरेय हे श्रीमंतांचं आवडतं पेय होतं. मैरेय तयार करण्याची कृती सांगताना कौटिल्य सम्भार हा शब्द तर वापरतोच, पण मेदक, प्रसन्ना, मैरेय अशा मसाल्यांची खास चव बाळगून असलेल्या मादक पेयांना तो नाव देतो साम्भारिकी [११]. सम्भारामुळे जिला चव ती साम्भारिकी. सम्भार या शब्दाचा मसाल्याचे जिन्नस या अर्थी वापर पुढे कश्यपसंहिता (इ.पू दुसरं शतक - इसवी सनाचं चौथं शतक), कामसूत्र (इसवी सनाचं पाचवं शतक), लंकावतारसूत्र (इसवी सनाचं पाचवं शतक), अष्टांगहृदयसूत्र (इसवी सनाचं नववं शतक), पाकदर्पणम् (इसवी सनाचं दहावं शतक), मानसोल्लास (इसवी सनाचं बारावं शतक) या ग्रंथांमध्ये आढळतो. सतराव्या शतकात रघुनाथ नवहस्तांनी लिहिलेल्या भोजनकुतूहलातही सम्भारवर्गावर एक पूर्ण प्रकरण आहे. मसाल्याच्या एक जिन्नसासाठी सम्भार आणि अनेक जिनसांसाठी सम्भारा: असा वापर रघुनाथपंडितांनी केला आहे.
सम्भार या संस्कृत शब्दाला नंतर इतर भाषांनीही आपलंसं केलं. संभारेई हा सम्भारवरून आलेला शब्द पालीत रुळला. अर्थ - चव आणणारे जिन्नस. मिलिन्दपञ्हो, विनयपिटक, जातककथा अशा बौद्धवाङ्मयात हा शब्द सापडतो. पलायीजातकात संभारेई हा शब्द मसाले या अर्थी येतो, तर महाउम्मग्गजातकात हाच शब्द तोंडीलावणं या अर्थी येतो. हे तोंडीलावणं कसं तयार केलं, त्यात कुठले जिन्नस घातले होते, हे मात्र कथेतून कळत नाही. एक मात्र खरं की, सम्भार या शब्दानं आपण आजही वापरत असलेल्या काही शब्दांना जन्म दिला, हे या कथांमधून नक्की करता येतं. सम्भार या शब्दापासून तयार झालेले शब्द बहुतेक सर्व प्राचीन भारतीय भाषांमध्ये आहेत. या शब्दांमागचा इतिहासही फार रोचक आहे.
सांबारे / सांबार हा पदार्थ तसा पुरातन. हा शब्दही सम्भार या शब्दाचाच अपभ्रंश. अर्थ - तोंडीलावणं. म्हणजे जेवणाची चव वाढवनारे, पुढे नेणारे पदार्थ. मराठीपुरतं बोलायचं तर या पदार्थाचा पहिला उल्लेख सापडतो तो लीळाचरित्रात. श्राचक्रधरस्वामींचं चरित्र असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ मूळ स्वरूपात ज्ञानेश्वरीच्याही आधी लिहिला गेला. मराठीतला हा पहिला गद्य चरित्रग्रंथ. हा ग्रंथ लिहिला गेला श्रीचक्रधरस्वामींच्या मृत्यूनंतर. त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य आणि इतर भक्तमंडळ रिद्धपूरला गोविंदप्रभूंच्या सेवेसाठी येऊन राहिले होते. स्वामींच्या प्रयाणाचं दु:ख अजून ताजं होतं. नागदेवाचार्य स्वामींच्या लिळांचं स्मरण करत एकांतात बसून राहत. म्हाइंभटांच्या हे लक्षात आलं, आणि सर्वज्ञांच्या, म्हणजे श्रीचक्रधरस्वामींच्या आठवणी (लीळा) लिहून काढण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे नागदेवाचार्यांनी आठवणी सांगितल्या आणि म्हाइंभटांनी त्या लिहून काढल्या. लिळांचं संकलन झाल्यावर पुढचं काम होतं, त्या पडताळून पाहण्याचं. सर्वज्ञांच्या लिळांमध्ये कुठलीही चूक राहायला नको, म्हणून म्हाइंभट पैठणला, बळ्हेग्रामाला, रावसगावाला, बीडला असे गावोगावी गेले आणि सर्वज्ञांच्या शिष्यांशी, त्यांच्याशी संबंधित इतर अधिकारी पुरुषांशी बोलून काही लीळा गोळ्या केल्या, लिहून काढलेल्या लीळा त्यांना वाचून दाखवल्या. मग परत रिद्धपुरी परतून, नागदेवाचार्यांशी चर्चा करून मजकुराची खात्री करून घेतली. जे शब्द सर्वज्ञांच्या तोंडी असू शकत नाहीत, असं वाटलं, ते शब्द वगळण्यात आले. प्रत्येक वाक्याची, शब्दाची छाननी केली गेली. मग या लीळा कालानुक्रमे सुसंबद्ध लावून त्यांचे दोन भाग करण्यात आले - पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. अशाप्रकारे सिद्ध झालेलं लीळाचरित्र मग महानुभवांच्या सांकेतिक लिपीत लिहिलं गेलं. या ग्रंथाची एकच प्रत होती आणि तिचा ताबा होता नागदेवाचार्यांकडे. त्यांच्या मृत्यूनंतर ती बाईदेवबासाकडे आणि नंतर भास्करभट्ट बोरीकरांकडे आली. भास्करभट्टांच्या आचार्यकालात मलीक काफूराची धाड पडली आणि ही एकुलती प्रत नष्ट झाली. मात्र सुदैवानं अनेकांना लीळाचरित्र मुखोद्गत होतं. त्यावरून हिराइसा या शिष्येनं चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस लीळाचरित्राचं पुनर्लेखन केलं.
कालौघात लीळाचरित्राचे अनेक पाठ तयार झाले. बिनीचे महानुभावववाङ्मयसंशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी लीळाचरित्राचे अनेक पाठ अभ्यासून, प्रक्षिप्त लीळा वगळून मूळ पाठाबरहुकूम लीळाचरित्राची आवृत्ती सिद्ध केली. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनीही एक संशोधित प्रत प्रसिद्ध केली आहे. लीळाचरित्र लिहिलं गेलं त्याला आता काही शतकं उलटली असली, तरी आजही ते अतिशय वाचनीय आहे. चरित्रग्रंथ असला तरी मराठी कथावाङ्मयाची बीजंही लीळाचरित्रात सापडतात. ’काउळेयाचे घर सेणाचे : साळैचे घर मेणाचे’ या बालकथेपासून प्रौढांच्या असंख्य कथा या ग्रंथात आहेत. त्या काळात प्रचलित असलेल्या लोककथाही त्यात आहेत. हा ग्रंथ ज्यांचं चरित्र, त्या महानुभावपंथाच्या संस्थापक असलेल्या चक्रधरस्वामींचं परिभ्रमण महाराष्ट्रभर होतं. त्यामुळे वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वेगवेगळी गावं, नद्या, डोंगर, देवळं, देवता, खेळ, व्यवसाय, शेती, शेतीची औजारं, फळंभाज्या, पक्वान्नं, घरं, त्यांची मांडणी यांच्या माहितीबरोबरच तत्कालीन धार्मिक, राजकीय आणि सामाजिक स्थितीचं दर्शनही या ग्रंथात घडतं. खाद्यपदार्थांचं प्रचंड वैविध्य लीळाचरित्रात बघायला मिळतं. पाणिभात, वरणभात, दहीभात, आंबीलभात, धानाचा भात, पत्रशाक, आंबटी, राळ्याची धापटी, पोळी, पुर्या, लाडू, खांडवी, चण्याच्या आणि गव्हाच्या घुगर्या, चण्याची धीडरी आणि आहिता (धिरडी), भाकर, थापडा, रोटी, चण्याचे ढाकाणे, बुड्डी (भजी), ठोंबरा, जोंधळ्याचा घाटा, डाळिंब्या, वांग्याचा डफळा, पातिया, दिवे, मुठिया, वळिवट, वडे, पापड, कुरवड्या, अमृतफळे, मांडे, तांदुळाची खीर, सेवलाडू, शेवया, लोणसणे (लोणची), सरवळ्या अशा पदार्थांचे आणि आंबा, बोर, द्राक्ष, नारळ, पोफळ, लिंबू, आवळा या फळांचे उल्लेख लीळाचरित्रात सापडतात. आंब्याच्या तीन जाती लीळाचरित्रात आहेत. बदरिखा, गुढरू, म्हणजे झाडावरच कापडात गुंडाळून ठेवलेला आणि संसारमोचक, म्हणजे प्राणहरण करणारा. हा संसारमोचक आंबा खाल्ल्यानं ताप येत असे, म्हणून पक्षीही तो खात नसत. हा आंबा मीठमोहरीत घालून पुढच्या वर्षी खाल्ला जाई. तत्कालीन महाराष्ट्रात जेवण्यासाठी ठाय, म्हणजे केळीचं पान, वडाच्या पानांची सातरी, म्हणजे पत्रावळ आणि तांब्याचं ताट वापरत. ताटात सगळे पदार्थ वाढले की यजमानीणबाई स्वत:च्या हातानं पहीत, म्हणजे वरण वाढीत आणि मग जेवणाला सुरुवात होई. तूप वाढण्यासाठी नळे असत. तुपाच्या घागरी भरून ठेवल्या जात. जेवताना सर्वसामान्यांसाठी पत्रावळी आणि श्रीमंतांना ताट असा भेदभावही क्वचित केला जाई. श्रीमंतांच्या पंगतीत ताट, वाट्या, ठणवैय्या (समया), तूपभात असा थाट असे. जेवणानंतर सुपारीच्या फोडी आणि तांबुळ खायची पद्धत होती. तांबुळात अनेक सुगंधी द्रव्यं घालीत, म्हणून त्याला सतांबोळी विडा म्हणत. विडी म्हणजे विड्याच्या पानाची केलेली गुंडाळी. काही थोर मंडळी भोजनोत्तर भांगेचा आस्वाद घेत. भांगेसाठी लीळाचरित्रात ब्रह्मार्थप्रकाशिका असा फारफार यथार्थ शब्द वापरला आहे.
तेराव्या शतकातल्या महाराष्ट्रात केल्या जाणार्या लीळाचरित्रातल्या या पदार्थांमध्ये सांबारिव या पदार्थाचा उल्लेखही दोनदा येतो. कोलत्यांनी संपादन केलेल्या लीळाचरित्राच्या प्रतीमध्ये सांबारू आणि सांबारिव हे शब्द सापडतात, तर तुळपुळ्यांच्या प्रतीमध्ये सांबारु, साबारु आणि सांबारिव असे तीन शब्द आहेत. या तीनही शब्दांचं जनकत्व अर्थातच सम्भारकडे जातं. लीळाचरित्राच्या पूर्वार्धात दोनशे आठाव्या लिळेत सांबारू हा शब्द येतो. बाइसा (नागांबिका ऊर्फ नागूबाई) सर्वज्ञांच्या शिष्यांना, जानोपाध्यांना, सांगतात, ’बटीका, जाए, पत्रसाख (पालेभाजी) घेउनि ए’. ते जातात, पत्रसाख घेऊन येतात. मग बाइसा सांगतात., ’जा, तेल घेउनि ए’. ते जातात, आणतात. ’मुला, जा, सांबारू घेउनि ए हो’. तिथे बसलेले सर्वज्ञ म्हणतात, ’काइ जालें ए म्हंतारीएसि? एक वेळ न पुरे : दोनि वेळ न पुरे : ऐसी वीसुगी लावा : मां उभाचि असैल :’ जानोपाध्ये गप्प राहतात. सर्वज्ञ त्यांना विचारतात, ’कां बटिका : जाल?’ जानोपाध्ये उत्तरतात, ’तरि काइ जी : बाइसांचें म्हणीएं तें गोसावीयांचेंचि कीं :’ बाईंची आज्ञा काय आणि तुमची आज्ञा काय, एकच. सर्वज्ञ त्यावर म्हणतात, ’ जा जा : बाइसें कोपती :’॥ या लिळेत आलेल्या सांबारू या शब्दाचा अर्थ आहे भाजीत घालायचा मसाला. कोलते मात्र या शब्दाचा कोथिंबीर असा अर्थ लावतात. लीळाचरित्राचा आणि श्रीचक्रधरस्वामींचाही विदर्भाशी निकटचा संबंध. कोलतेही विदर्भातले. त्यामुळे हा अर्थ सहजच लावला गेला असावा. पण हे सयुक्तिक वाटत नाही. पालेभाजी, तेल आणल्यावर उरलं काय? तर, मसाला. त्यामुळे या लिळेत सांबारू या शब्दाचा अर्थ भाजीत घालायचा मसाला हाच होतो.
पूर्वार्धातल्या दोनशे चव्वेचाळिसाव्या (बाइसांकरवि काळबोटा दवडवणें या शीर्षकाच्या) लिळेत काळबोटे नावाच्या बाइसांकडे राहणार्या गृहस्थांचा उल्लेख येतो. हे काळबोटे महालबाड. बाइसांची फसवणूक करणारे. बाइसांलागि साबारु आणिती : कांही हाटवेचु आणिति : बाइसें कवडे देति : आधेयाचा वेचु आणिति : आधें ठेवीति. या लिळेत साबारु म्हणजे कोथिंबीर. कुस्तुम्बरी / कुस्तुम्बरु या कोथिंबिरीसाठीच्या संस्कृत शब्दाचं हे मराठी रूप.
पूर्वार्धातल्याच तीनशे अठ्ठावनाव्या लिळेत सांबारिव हा शब्द येतो. तथा चणा आरोगण हे या लिळेचं शीर्षक. भाइदेव गावात जातात आणि तिथे त्यांना चण्याची पेवें दिसतात. त्यांतले उत्तम चणे ते गोसाव्यांसाठी, म्हणजे चक्रधरस्वामींसाठी घेतात आणि उरलेले स्वत: खातात. दोन्ही बाहीया भरुनि ते गोसाव्यांकडे ते चणे घेऊन येतात. ’मुनिदेव हो : मीयां तुम्हांलागि चणे आणिले : चणे गोड आहाति : खा :’ सर्वज्ञ म्हणतात, ’बाई, हे चणे घे, इथेच संपवून टाक.’ मग बाई त्यांतल्या अर्ध्या चण्यांचे ढांकाणें (ढोकळ्यासारखा पदार्थ) करतात आणि उरलेल्यांचं सांबारिव. या लिळेतलं सांबारिव म्हणजे सांबारं. तोंडीलावण्याचा एक पदार्थ.
हाच शब्द नाथोबा हृदयसुन्यता या उत्तरार्धातल्या लिळेतही येतो. सर्वज्ञांच्या निरुपणातला हा दृष्टांत आहे. जारसैलेया, भवरैलेया आणि देहलुतैलेया वाळुकाचे हे दृष्तांत रामदेवाप्रति निरुपिलेले आहेत. सर्वज्ञ सांगतात - सर्वाधिकारी कोण? जैसें कोवळें वाळुक असे : ते नीर्दोष : सर्व उपयोगा जाए : तयाचे तळींव होए : सांबारींव होए : कुसंबीर होए : लोणीचे होए : हीरवे खावों ये : तैसा वयसा कोमळ पुरुषू सर्वाधिकार्या : ॥ वाळुक म्हणजे काकडी. सर्वाधिकारी व्यक्ती कशी असावी? कोवळ्या काकडीसारखी. कोवळ्या काकडीची कोशिंबीर करता येते, तिचं सांबारं होतं, लोणचं करता येतं, ती तळता येते आणि नुसतीही खाता येते. तसा कोवळा पुरुष, म्हणजे जो भक्तिजड नाही, हृदयशून्य नाही, कर्मजड नाही, तो सर्वाधिकारी.
लीळाचरित्रातल्या या उल्लेखांवरून स्पष्ट होतं की, सांबारू (म्हणजे भाजीत घालायचा मसाला) आणि सांबारिव (तोंडीलावणं) हे दोन्ही शब्द तेराव्या शतकात महाराष्ट्रात प्रचलित होते. मुक्तेश्वराच्या महाभारतातही सांबार्याचे उल्लेख सापडतात. मुक्तेश्वर हा सतराव्या शतकातला मराठी कवी. एकनाथमहाराजांचा नातू. एकनाथांच्या गोदुबाई या मुलीचा मुलगा. मुक्तेश्वराचे वडील चिंतामणि मुद्गल. राहणारे पैठणचे. मुक्तेश्वराचा जन्म इ. स. १५७३-७४मध्ये, आणि मृत्यू इ. स. १६४५-४६च्या सुमारास झाला असावा. आपल्या आजोबांच्या देखरेखीखाली त्यानं सुरुवातीचं शिक्षण घेतलं, असं मानायला वाव आहे. नंतर मात्र तो भारतभर फिरला. सामाजिक स्थितीचं अवलोकन केलं आणि हे सारे संदर्भ आपल्या काव्यात वापरले. मुक्तेश्वरानं गीतेचं मराठीत भाषांतर केलं. शतमुखरावणवध, शुकरंभासंवाद, एकनाथांच्या भावार्थ रामायणावर आधारित संक्षेप रामायण, गजेंद्रमोक्ष, हनुमंताख्यान, विश्वामित्रभोजन, हरिश्चंद्राख्यान, महाभारतातली आदि, सभा, वन आणि विराट ही चार पर्वं आणि अडीच हजार स्फुटकाव्यं असं प्रचंड लेखन मुक्तश्वरानं केलं. ज्ञानेश्वरीनंतर इतकी सुंदर आणि अर्थवाही ओवी फक्त मुक्तेश्वराचीच आढळते.
मुक्तेश्वरापूर्वी जी काव्यरचना झाली, तिचा हेतू हा मुख्यत: पारमार्थिक होता. मुक्तेश्वरानं मात्र कवितेचा आनंद घेण्यासाठी काव्यरचना केली. त्याच्या काव्यात माधुर्य, मार्दव ओतप्रोत दिसून येतं. उपमा, दृष्टांत, उत्प्रेक्षा हे अलंकार तो खुबीनं वापरतो. त्याची अप्रतिम देखणी वर्णनशैली त्यानं वर्णन केलेल्या प्रत्येक प्रसंगाला उठाव देते. मुक्तेश्वर इंग्रजांबद्दल, डचांबद्दल, मुघलांबद्दल, हबशांबद्दल लिहितो. त्यांनी चालवलेल्या लुटीबद्दल लिहितो. मराठेही आता संघटित होत आहेत, असं सुतोवाच करतो. मुक्तेश्वराच्या महाभारतात कुस्तीची, कपड्यांच्या, भोजनाची, निसर्गाची, मनुष्यस्वभावाची असंख्य वर्णनं आहेत. ही वर्णनं इतकी उत्कट आहेत, की मुक्तेश्वर हा एक अत्युत्कृष्ट कवीतर होताच, पण एक बिनीचा समाजशास्त्रज्ञही होता, याची खात्री पटते. त्यानं केलेल्या भोजनांच्या वर्णनावरून तीन शतकांपूर्वी महाराष्ट्रात बर्यापैकी श्रीमंत घरांमध्ये कोणते पदार्थ केले जात, याचा अंदाज बांधता येतो. मूळ महाभारतात ही वर्णनं आणि हे पदार्थ अर्थातच नाहीत. मुक्तेश्वरांचे आजोबा, एकनाथमहाराज गर्भश्रीमंत होते. त्यांचा मुक्काम पैठणला. हे गाव सुसंपन्न होतंच, पण त्या काळी विद्येचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जाई. त्यामुळे मुक्तेश्वर काही भोजनावळींना नवखे नक्की नव्हते. त्यांनी भारतभ्रमणही केलं होतं. त्यामुळे प्रांतोप्रांतीच्या खाद्यसंस्कृतीशी त्यांचा नक्की परिचय होता. मात्र मुक्तेश्वरांच्या भारतात उल्लेख झालेले बहुतेक सर्व पदार्थ हे महाराष्ट्रीय आहेत. उदाहरण म्हणून आपण मुक्तेश्वरानं केलेलं राजसूययज्ञाच्या वेळी झालेल्या पंगतीचं वर्णन पाहू.
द्रौपदी वाढील उदारहस्ते । अन्नपूर्णा भगवती ॥
या यज्ञाच्या वेळच्या पंगतीत उदारहस्त द्रौपदीवर वाढण्याची जबाबदारी सोपवली होती. तिची फारच धांदल उडाली होती, कारण ’कोणी भक्ष्य कोणी भोज्य । कोणी दुग्ध कोणी आज्य ।’ असं सारखं मागत होते. जेवणात पदार्थही भरपूर होते. स्वयंपाक इतका अप्रतिम झाला होता, की स्वर्गातल्या देवांच्याही तोंडाला पाणी सुटावं! दधिमधूंचं सरोवर झालं होतं. ओदन (भात), वरान्न (वरण), शाक (भाज्या) यांचे पर्वत उभे होते. प्रत्यक्ष इंद्राला मोहात पाडतील अशा घारी जेवणात होत्या. ’कथिका वटक अतिसोज्ज्वळ’ म्हणजे कढी आणि वडे होते. दहीवडे, मधुवडे होते. तिळाचे, खोबर्याचे, शेवेचे लाडू होते. बत्तासे होते. निगुतीने केलेले घारगे, सांडगे होते. मांडे इतके शुभ्र, की जणू पौर्णिमेचा चंद्रप्रकाश. खसखस भरून केलेले कानवले होते. घृतपुर्या (तुपातल्या पुर्या) आणि ’वेळा (वेलदोडे) मिरी घमघमित’ घालून केलेल्या ’अरुवार’ (नाजूक) पूर्णपोळ्या (पुरणपोळ्या) होत्या. उडीद, तांदूळ, हरभरे, मूग अशा आठ धान्यांपासून केलेले अष्टवटक होते. शिवाय पाच प्रकारची वरान्नं (वरणं), आठ प्रकारच्या शिखरिणी (शिकरणी) होत्या आणि तोंडी लावायला होत्या कोशिंबिरी, कुटें, सांबारीं, रायतीं, पापड, कुरडया, मिरगुंडी.
कुटें आणि सांबारीं । रायती तेथें विचित्रें ॥
पापड सांडगे सांडया । तिळवडे कडकणें कुरवडिया ।
मिरगुंडी मुगवडिया । काचरीया सुतळीवा ॥
अभिमन्यूच्या लग्नाचं वर्णन तर फारच बहारदार आहे. देवक बसवण्यापासून ते झेंडा नाचवण्यापर्यंतचे आज अस्तित्वात असलेले अनेक विधी तीनशे वर्षांपूर्वीच्या या काव्यात सापडतात. विराटपर्वातल्या आठव्या अध्यायात आलेल्या या लग्नसमारंभात अभिमन्यूच्या लग्नातल्या मेजवानीचं साग्रसंगीत वर्णन करणार्या चाळिसेक ओव्या आहेत. लग्नानंतरच्या पंगतीत ताटात पांढर्याशुभ्र तांदळाचा भात होता आणि शेजारी पाच प्रकारची वरणं होती. शेवया, गव्हले यांच्या जोडीला अरुवार कोरवडे, कथिकावडे, दधीवडे, चिंचवडे, निंबवडे, रायवडे होते. तुपात तळलेले घारगे, गुरोळ्या, साखरमांडे, पुर्या, क्षीरसारोळ्या, तसंच शेवयांचे, चारोळ्यांचे, खसखसखोबर्याचे, अक्रोडबदामाचे, कमळाच्या कंदाचे, फणसाच्या गर्यांचे लाडू होते. खाजे, करंज्या, अनारसे, फेण्या होत्या. मुगवड्या होत्या, कडबोळी होती. मुगाची धिरडी होती. कर्दळीगर्भासारख्या नाजूक आणि शुभ्र अशा गव्हाच्या पोळ्या होत्या. भाज्या किती प्रकारच्या? वांगी, तोंडली, पडवळ, दोडकी, कारली, भोपळे, कोहळे, काकडी, चाकवत, अळू, मेथी, कमळाची देठं (या देठांच्या काचर्या तुपात तळलेल्या) एवढ्या भाज्या. बेलफळ, आवळे, करवंद, भोकरे, माईनमूळ, सुरण यांची लोणची. लोणच्यांमध्ये ’सुवासे’ करण्यासाठी मिरी, पिप्पली, हळद, कचोरा आणि खरसिंगे. जेवणात उत्तम तूप हवंच, म्हणून ’नवनीत साजूक सद्यस्तप्तें’ अशी सुगंधित केलेली तुपं होती. शिवाय तूप पातळ की घट्ट, हा चॉइसही होता. वाढपी ही तुपं अगदी सढळ हातानं वाढत होती. आटीव दुधाच्या आणि तवकिलाच्या वाट्या पानाशेजारी होत्या. अमृतापेक्षाही सरस अशी कढी होती. गाईच्या दुधाची ही कढी इतकी चविष्ट होती, की तिची चव घेण्यासाठी इंद्रसुद्धा भूतलावर येऊन कायमचा राहायला तयार झाला असता! हे एवढं कमी म्हणून की काय, सांडगे, कुरडया, पापड, अळण (चण्याच्या डाळीच्या पिठाचा मसाले घालून शिजवलेला पिठल्यासारखा तोंडीलावण्याचा पदार्थ), सांबारी, कोशिंबिरी, रायती, मिरगुंडे, मेतकुटं ही तोंडीलावणी होतीच. वाळेकर्पूरसुवाशीं असं सोन्याच्या कळशीतलं पाणी पंगतीत वाढलं जात होतं आणि जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून बोरकुट, कवठाचं चूर्ण, आमसुलाचं चूर्ण इत्यादी होते. एवढा सगळा थाट असल्यावर ’परम भाग्याचे जेवणारें । जे जेविती तये पंक्ती ।’ हे ओघानं आलंच. या अशा पंगती विराट राजाच्या घरी महिनाभर सुरू होत्या. त्यामुळे ’विराटभार्येची कुशलता’ सर्वांनी वाखाणली.
मुक्तेश्वरानं केलेलं हे वर्णन वाचून असं वाटतं, की सवाई माधवरावांच्या लग्नात जेवणाचा बेत ठरवताना नाना फडणविसांनी मुक्तेश्वरकृत महाभारत समोर ठेवलं असावं. १० फेब्रुवारी, १७८२ रोजी पुण्यात कृष्णाजी नाईक थत्ते यांच्या वाड्यात सवाई माधवरावांचं लग्न झालं. लग्नासाठी आठवडाभर पुण्याबाहेरून पन्नासेक हजार माणसं आली होती. शिवाय पुण्यातले आमंत्रित होतेच. पुण्यात त्या आठवड्यात चूल पेटली नाही. इतक्या पाहुण्यांची व्यवस्था ठेवायची, म्हणजे तयारीही तशी हवी. नाना फडणवीसांनी अगदी बारीकशीही चूक होऊ नये, याची काळजी घेतली होती. पुण्यातल्या कुठल्या पेठेत आमंत्रणं करायला कोणी जायचं, हे त्यांनी ठरवलं होतं. नीळकंठराव गोविंद खासगीवाले आणि महिपतराव साठे यांच्याकडे सोमवार, मंगळवार या पेठांची जबाबदारी होती. रविवार, वेताळ, भवानी आणि गंज पेठांत पांडुरंगराव बाबूराव बारामतीकर आणि गणपतराव कोलटकर, बुधवार, शुक्रवार, नारायण आणि सदाशिव पेठांत रास्ते, शनवार पेठ, मेहुणपुरा आणि हाशमपुरा या भागांत अमृतराव पेठे आणि बाळाजीनाईक भिडे यांनी आमंत्रणं करायची होती. कापड कोणाकडून, भाज्या कुठून, भांडी कुठली आणि कशी आणायची याच्या याद्या तयार होत्या. खाशांच्या पंगतीत उदबत्त्या लावाव्यात, उदबत्तीची घरं आणि झाडं चांदीची असावीत, फराळास मातबर गृहस्थ बसल्यासही उदबत्त्या लावाव्यात, भोजन झाल्यावर सोंगटी धुऊन ठेवावी, असं सांगितलं होतं. ही जबाबदारी कारकून राम बर्वे आणि कारकून अंजनवेलकर यांच्यावर सोपवली होती. जेवणाचा बेत जंगी होता. रोज भात साधा दोन प्रकारचा - खांसा आणि मध्यम. साखरभात आणि वांगीभात वगैरे कमीत कमी दोन भाताचे वेगळे प्रकार, तुरीचं वरण, सांबारीं दोन प्रकारची, आमटी दोन प्रकारची, कढी, सार दोन प्रकारचं, भाज्या कमीत कमी दहाबारा प्रकारच्या असाव्यात. त्यांत एकदोन प्रकार तोंडली, परवर, वांगी अशा उष्ण भाज्यांचे असावेत. खिरी दररोज दोन प्रकारच्या निरनिराळ्या, पुरणपोळ्या सपीठाच्या, खिचडी रोज वेगळी, घीवर, फेण्या वगैरे पक्वान्नं रोज तीनचार प्रकारची, वडे साधे आणि वाटल्या डाळीचे कढीवडे, मठ्ठा, चक्का, श्रीखंड, पापड, सांडगे, तिळवडे, चिकवड्या, मिरगुंडं, फळभाज्यांच्या तळलेल्या काचर्या. लोणची दहा प्रकारची. तूप उत्तम दर्जाचं. पिण्यासाठी वाळा, कापूर यांनी सिद्ध केलेलं गार पाणी. हात धुवायला गरम पाणी आणि दात कोरायला लवंगा. समारंभाचा स्वयंपाक उत्तम आचारी लावून सकाळसंध्याकाळ करवून घ्यावा. कोणती भाजी कशा पद्धतीनं करायची, हे अगोदर ठरवून घ्यावं. पानं वाढताना नीट काळजी घ्यावी. भाज्यांचा रस एकमेकींत जाऊ नये. आमटी, सांबारे, वरण, खीर वगैरेंचे थेंब पानात किंवा खाली सांडू नयेत. मोठ्या भांड्यांमधून लहान भांड्यांमध्ये वाढण्यासाठी पदार्थ काढतानाही हे काम चतुराईनं करावं. अगोदर हात धुऊन मगच दुसरा पदार्थ वाढावा. वाढण्याची सर्व जबाबदारी चिंतो विश्वनाथ आणि मोरो विश्वनाथ भावे व वाकनीस यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या हाताखाली दफ्तरातले कारकून, वाड्यांतली मंडळी आणि काही नव्यानं कामावर नेमलेले वाढपी होते. वाढप्यांच्या मागे त्यांचा घाम पुसण्यासाठी धोतराचा ओला पिळा घेऊन दुसरा माणूस होता. तूप वाढण्याचं काम (चांदीच्या तोटीच्या कासंड्यानं) पांडुरंग बाबूराव यांच्यावर सोपवलं होतं. पेशव्यांकडे तूप वाढण्याचं काम सराफ मंडळी करत. ब्राह्मणभोजनात भात, वरण, दोनतीन भाज्या, सांबारें, आवळेगाजराचं लोणचं, कढी, पुरणपोळ्या, तूप असा बेत होता. सामान्य जनतेसाठी भात, वरण, तीन भाज्या, कढी, सांबारे असा स्वयंपाक करण्याचं सांगितलं होतं. या पंगतींमध्ये तूप पोतदार यांनी वाढायचं होतं, गंध देशपांड्यांनी लावायचं होतं, पत्रावळी देशमुखांनी मांडायच्या होत्या. फराळासाठी लोणची पाच प्रकारची आणि पापड, सांडगे. कोशिंबिरी दहा प्रकारच्या. पक्वान्नं व लाडू, पोहे आंबेमोहोर बारीक आणि खानदेशातून आणलेले नवे पोहे, मातबरांसाठी लाह्या, खारीक, खोबरे, खजूर, बदाम, पिस्ते, नारळ, मेवा वगैरे. मेवामिठाई, दही, दूध, साजूक तूप आणि मध्यम मुरंबे.
१० डिसेंबर १७६८ रोजी पेशव्यांनी नाना फडणवीसांना एक पत्र लिहिलं. सिद्धटेकास अनुष्ठान करण्याच्या योजनेबद्दल हे पत्र होतं. दीड महिना संततधारेचा अभिषेक करायचा होता आणि एकवीस हजार प्रदक्षिणा ब्राह्मणांनी घालायच्या होत्या. शंभर ब्राह्मण त्यासाठी पुणे, नाशिक, वाई इथून बोलावले होते. त्यांच्यासाठी जेवणात रोज दोनचार शाका (भाज्या), कढी, सांबारें, पांढर्या पोळ्या, साखर, तूप अशी व्यवस्था करायची होती. जेवताना प्रत्येकाला एक पैसा दक्षिणा द्यायची होती.
मुक्तेश्वराच्या महाभारतातल्या वर्णनांमध्ये सांबार्याचा तोंडीलावण्यांमध्ये रायत्याकोशिंबिरींबरोबर समावेश केला आहे. वरणाचा, किंवा आमटीचा प्रकार म्हणून इथे सांबार्याचा उल्लेख येत नाही. सवाई माधवरावांच्या लग्नाच्या मेन्यूतही सांबार्याचा उल्लेख तोंडीलावणे म्हणूनच येतो, पण तो भाजी, मसाले घातलेला पातळ पदार्थ या अर्थी येतो, कारण जोडीला वरण, आमटी हे पदार्थही आहेत. सांबारे, सांबार हे शब्द शेकडो वर्षांपासून तोंडीलावणी, किंवा चव वाढवणारे पदार्थ या अर्थी वापरले जात आहेत. हे झालं मराठीबद्दल. सम्भार हा शब्द चव वाढवणारे जिन्नस (म्हणजे मसाले) / पदार्थ या अर्थी तेलुगु, कन्नड आणि तमीळ या भाषांमध्येही निदान काही शतकांपासून तळ ठोकून आहेत. संबारम् हा शब्द निदान पाच शतकांपूर्वी तमीळभाषेत भाजीत घालायचे मसाले या अर्थी वापरला जात होता, याचा पुरावा उपलब्ध आहे.
तिरुचिरपल्लीहून तीन किलोमीटर अंतरावर कावेरी आणि कोलरून या जुळ्या नद्यांतल्या एका बेटावर रंगनाथस्वामी मंदिर आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या मंदिरांपैकी हे एक. भारतातल्या एकशे आठ दिव्यदेशमांपैकी एक आणि एकशे छपन्न एकरांवर पसरलेलं. वैष्णवांसाठी अत्यंत महत्त्वाचं. रंगनाथ हे विष्णूचंच एक रूप. मंदिरपरिसरात सात प्राकार आणि एकवीस उत्तुंग गोपुरं आहेत. दक्षिण भारतावर राज्य करणार्या चोल, पंड्या, होयसाळ, नायक या सर्व राजवंशांनी या मंदिराच्या उभारणीस हातभार लावला. या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे अक्षरश: शेकडो शिलालेख मंदिरपरिसरात आहेत. इसवी सनाच्या नवव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतच्या काळात कोरलेले हे शिलालेख तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांची इत्थंभूत माहिती देतात.
रंगनाथस्वामी मंदिरातल्या शिलालेखांचे सन १८९१च्या एपिग्राफिकल कलेक्शनात ४५-४६ आणि १८९२च्या कलेक्शनात ५१-७४ असे क्रमांक आहेत. मंदिराच्या दुसर्या प्राकाराच्या उत्तरेकडच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या शिलालेखाचा १८९२च्या कलेक्शनात क्रमांक ५६ आहे. चेन्नय्या-बलयदेव या चोलवंशीय राजानं हा शिलालेख कोरला आहे. या राजाला उरैयुर-पुरवरधिश्वर (उरैयुर ही चोल राजांची राजधानी होती), चोलकुलतिलक अणि कावेरीवल्लभ अशी अभिधानं मिळाली होती. या चेन्नय्या-बलयदेव राजानं उरैयुर-नच्चियार हिचा मंदिरात उत्सव सुरू करण्यासाठी तिची एक मूर्ती भेट म्हणून दिली. उरैयुर-नच्चियार ही चोलराजा धर्मवर्मन याची मुलगी आणि तिचा विवाह रंगनाथाशी झाला होता. या उत्सवासाठी आणि मूर्तीच्या उपासनेसाठी चेन्नय्या-बलयदेवानं कायमस्वरूपी व्यवस्था केली. तिचा उल्लेख या शिलालेखात आहे.
शिलालेखानुसार राजानं ८१२ पोण दिले. या देणगीवर १८% दरानं व्याज मिळेल १४६ पोण. या रकमेतून उरैयुर-नच्चियारला आणि पेरुमलाला रोज दोन पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. कृष्णरायमहाराजांनी आयोजिलेल्या मार्गशीर्षातल्या उत्सवाच्या आठव्या दिवशी उरैयुर-नच्चियारला विश्रांती घेण्यासाठी एक सुंदर बाग उभारावी. या बागेच्या खर्चासाठी वेगळे ६० पोण राजानं दिले. या उत्सवकाळात किंवा एरवीही पेरुमलाला बागेत यावंसं वाटलं, तर त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी ६० पोण दिले. या नैवेद्यात कुठले पदार्थ असावेत? रसम्-भात, अनेक प्रकारचे मसाले घातलेले भात (पलसंबार) आणि तूपभात. बागेतली फुलं, फळं आणि भाज्या मंदिराच्या खजिन्यात रोजच्या रोज जमा कराव्यात. देणगीदाराच्या हिश्श्याचा नैवेद्याचा प्रसाद (मंदिरातला आणि बागेतलाही) अलगिय-मनवल-जिय्यार आणि कोविल वट्टमणि अय्यंगार यांना आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांना द्यावा.
हा शिलालेख लिहिला गेला शके १४५२मध्ये, म्हणजे ३ मार्च, १५३१ रोजी. या शिलालेखात आलेला संबार हा शब्द आपण हल्ली वापरतो, त्या मसाले या अर्थी आला आहे. तोंडीलावणं हा अर्थ या शब्दात नाही. आपण हल्ली खातो त्या सांबार्याचा व या शिलालेखातल्या संबार या शब्दाचा काहीएक संबंध नाही. इडली, वडे, रसम, दोसे, कुट्टु, हुळी, सारु अशा दाक्षिणात्य पदार्थांचा उल्लेख असणार्या वद्दराधने, लोकोपकार यांसारख्या प्राचीन तमीळ, कन्नड ग्रंथांमध्ये सांबार्याचा, म्हणजे सांबारं या पदार्थाचा उल्लेख सापडत नाही. पण तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातले काही भयंकर रोचक ग्रंथ या शब्दाबद्दल आणि पदार्थाबद्दल अधिक माहिती देतात.
ई. एम. फॉर्स्टरनं लंडन लायब्ररीबद्दल लिहिलं होतं - माणूस बनण्यासाठी धडपडणार्या प्राण्यांसाठी हा अखेरचा आसरा आहे! तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाला हे वर्णन तंतोतंत लागू पडतं. या प्राचीन संस्थेचा पसारा फार मोठा. ग्रंथालयात आजघडीला ४९,००० हस्तलिखितं आहेत. त्यांपैकी २५,००० भूर्जपत्रांवर आहेत. बाकीची कागदावर. पुस्तकांची संख्या सुमारे ९०,०००. ही हस्तलिखितं आणि पुस्तकं तमीळ, तेलुगु, मराठी, मलयाळम, उडिया, बंगाली, संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, डच या भाषांत आहेत. मोडीतल्या दस्तऐवजांची सात हजारांहून अधिक बंडलं आहेत. तंजावरच्या भोसले साम्राज्याचा संपूर्ण कारभार या कागदपत्रांमध्ये कैद आहे. त्यात फ्रेंचांचा मराठ्यांशी असलेला पत्रव्यवहार आहे, वेगवेगळ्या राजांनी दिलेले इनाम, वतनं आहेत, पुड्डुचेरीच्या गव्हर्नराकडून घेतलेल्या सोळा लाख रुपयांच्या कर्जाची माहिती आहे. तंजावरच्या त्या सुप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराचं वय उणंपुरं हजार वर्षं. त्या मानानं सरस्वती महाल ग्रंथालय बरंच तरुण. अवघ्या चारपाचशे वर्षांचं. पण तंजावरमधल्या या दोन्ही वास्तू तिथल्या राजांच्या गुणग्राहकतेची, विद्वत्तेची आणि प्रजापालनाच्या धर्मापोटी दाखवलेल्या आदराची साक्ष म्हणून आजही उभ्या आहेत. या राजांनी दक्षिण भारतातील ग्रंथव्यवहार आणि शास्त्रीय संगीत ज्या पद्धतीनं समृद्ध केले, त्याला तोड नाही.
तंजावरचा प्रदेश कावेरी नदीच्या कृपेनं अतिशय संपन्न. या भूभागावर राज्य करणार्या चोल साम्राज्याचा अस्त झाला आणि विजयनगर साम्राज्यानं आपलं निशाण तिथे फडकवलं. या साम्राज्याचा व्याप मोठा. विजयनगरच्या सम्राटाला नव्यानं ताब्यात आलेल्या प्रदेशावर लक्ष ठेवणं जमेना. विजयनगर सम्राटांचा उजवा हात होता शिवाप्पा नायक. शिवाप्पाचा राजदरबारात वचक होता. सम्राटांचाही त्याच्यावर इतका विश्वास, की त्यांनी शिवाप्पाला तंजावरला पाठवलं. राजा म्हणून. शिवाप्पानं तंजावरवर राज्य करायचं, दरसाल सम्राटाला एक ठरावीक रक्कम द्यायची आणि गरज पडल्यास विजयनगराच्या मदतीला आपलं सारं सैन्य घेऊन यायचं. शिवाप्पा नायक तंजावरच्या गादीवर बसला १५३२ साली आणि त्यानं पुढची पन्नास वर्षं राज्य केलं. या काळात त्यानं अनेक सुरेख मंदिरं बांधली, पाठशाळा सुरू करण्यासाठी ब्राह्मणांना फुकट जागा दिल्या. त्याच्या दातृत्वाच्या कथा सभोवतली पसरल्यानं अनेक विद्वान त्याच्या आश्रयास आले. खुद्द शिवाप्पाचं शिक्षण फारसं झालं नसलं, तरी त्याला विद्येची चाड होती. दरबारी आलेल्या विद्वानांचा योग्यतेप्रमाणे सन्मान व्हावा, यासाठी त्यानं तंजावरातल्याच गोविंद दीक्षित नामक ब्राह्मणाला बोलावून घेतलं. गोविंद दीक्षित एका मंदिराचा पुजारी. याचा व्यासंग फार मोठा. शिष्यगणही विद्वत्तेला शोभेलसा. शिवाप्पाला गोविंद दीक्षिताच्या विद्वत्तेनं जिंकून घेतलं आणि दोघांनी तंजावूरच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी व प्रगतीसाठी आयुष्य वाहायचं ठरवलं. ते लगेच कामालाही लागले. दरबारात आलेल्या विद्वानांसाठी निवासस्थानं बांधली गेली. त्यांना तिथे राहून विद्यार्थ्यांना शिकवता येईल, अशी व्यवस्था केली गेली. आणि दरबारात सरस्वतीचं अधिष्ठान कायम राहावं, म्हणून एक ग्रंथालय सुरू केलं गेलं.
शिवाप्पानंतर गादीवर आला अच्युताप्पा. त्यानंही वडिलांप्रमाणेच तंजावरावर सरस्वतीचा कायम वरदहस्त राहील याची काळजी घेतली. अच्युताप्पाला राज्यकारभारात मात्र फारसा रस नव्हता. त्यानं लवकरच निवृत्ती पत्करली आणि रघुनाथ या आपल्या मुलाच्या हाती राज्य सोपवलं. रघुनाथाचं संपूर्ण शिक्षण गोविंद दीक्षिताच्या देखरेखीखाली झालं होतं. त्याचं संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व होतं. युद्धविद्येतही तो निपुण होता. एकूण चौतीस वर्षं त्यानं तंजावरावर राज्य केलं. अनेक युद्धं जिंकली. पण रघुनाथराजानं संगीत आणि साहित्य या दोन क्षेत्रांत फार मोठं काम केलं. तो वीणा उत्तम वाजवत असे. वीणेला आजचं स्वरूप रघुनाथामुळे मिळालं. पारिजातपहारणमु, वाल्मिकीचरितम्, संगीतसुधा, भरतसुधा अशा अनेक सांगीतिकांची आणि यक्षगानांची त्यानं रचना केली. ग्रंथालयाच्या संपत्तीत मोठी भर घातली. रघुनाथानंतर गादीवर आलेला विजयराघव नायक हाही वडिलांप्रमाणेच शूर आणि साहित्य-संगीताचा उपासक होता. ग्रंथालयाला सरस्वती भण्डार हे नाव त्यानं दिलं. रघुनाथभ्युदयमु हे तेलुगु काव्य रचलं.
रघुनाथराजाच्या आयुष्यातला एक दिवस रघुनाथभ्युदयमु या काव्यात वर्णन केला आहे. त्याची त्याच्या राज्याप्रती, प्रजेप्रती, कुटुंबाप्रती असलेली कर्तव्यं तो कशी जबाबदारीनं पार पाडतो, आपल्या रयतेची कशी काळजी घेतो, अतिशय व्यग्र असूनही संगीतसेवेसाठी कसा वेळ काढतो, राज्यातल्या विद्वानांशी चर्चा करून सांस्कृतिक भरभराट होईल, हे कसं पाहतो, हे या काव्यात सांगितलं आहे. सोळाव्या-सतराव्या शतकातल्या एका दक्षिण भारतीय राज्याचा कारभार कसा चालत असे, तिथल्या राजाचा पेहराव, त्याचे दागिने, त्याच्या मिरवणुका, त्याच्या दरबारात सादर होणार्या नाटिका यांची अचाट माहिती या काव्यातून मिळते. राजाच्या भोजनाचं वर्णनही अर्थातच या काव्यात आहे. रघुनाथराजा दुपारी जेवायला बसे. तो आणि त्याच्या दरबारातले पुरुष एका बाजूला, स्त्रिया विरुद्ध बाजूला. मात्र राजासमोर आणि राणीसमोर एक रेशमी पडदा असे. त्यामुळे ते काय, किती, कसं खातात हे कोणाला दिसत नसे. केळीची मोठाली, हिरवीकंच पानं, सोन्याच्या थाळ्या आणि वाट्या, चांदीचे द्रोण आणि पाणी प्यायला तांब्याचे पेले समोर ठेवलेले असत. भात तांब्याच्या एका मोठ्या सुपातून वाढला जाई. इतर पदार्थांसाठी चांदीची पातेली होती. जेवणात पदार्थ कुठले असत? पापड, तिळाचं कूट भरलेली कोंबडी, ओला नारळ आणि कढीपत्ता यांचं सारण भरलेली कोंबडी, काळे वाटाणे आणि हरभरे यांचं सारण भरलेली कोंबडी, लोणी आणि साखर भरलेली आणि दुधात शिजवलेली कोंबडी, कांदा आणि लसूण घालून शिजवलेलं बदक, तळलेले मासे, गवारीचं पोडियल, पाच प्रकारच्या भाज्या, संबार घातलेली बीरंजी, म्हणजे बिर्याणी, दहीवडे, कढीवडे, मिश्र कडधान्यांचे वडे, पापड, लिंबाचं रसम् आणि तिखटमिठाचं रसम्, सुतरफेणी, साधे मांडे आणि पुरणाचे मांडे, लाडू, मोदक, शेवयांची खीर, हरभर्याच्या डाळीचं पुरण भरलेले मोदक, गोड मुरुक्कु, थेरट्टिपाल (साखर घातलेला खवा), नारळाचं गूळ घातलेलं दूध, पनीर पायसम्, जिरे पायसम्, रव्याची खीर, साखरभात, बासुंदी, मधात घोळवलेली फळं, मालदिवहून आणलेले खजूर, दहीभात, चिंचभात, संबार घातलेला भात, तुपात तळलेली रोटी, नारळाचं पुरण भरलेली रोटी आणि संबाररोटी. पदार्थांच्या या भल्यामोठ्या यादीत सांबार्याचा अजिबात उल्लेख येत नाही, मात्र संबार हा शब्द वापरला जातो मसाले या अर्थी. मसाले घातलेला भात, मसाले घातलेली बिर्याणी आणि मसाले घातलेली / लावलेली पोळी.
विजयराघव नायकानंतर सिंहासनावर बसलेला अळगिरी नायक हा नायकवंशातला तंजावरवर राज्य करणारा शेवटचा राजा. व्यंकोजी या शहाजीराजे भोसल्यांच्या पुत्रानं १६७५ साली तंजावर ताब्यात घेतलं आणि पुढची दोन शतकं तंजावर भोसल्यांच्या ताब्यात राहिलं. व्यंकोजीच्या काळात संस्कृत आणि तेलुगु भाषा बहरल्या. खुद्द व्यंकोजीनं तेलुगु भाषेत रामायण रचलं. ग्रंथालयाला नवं नाव मिळालं - सरस्वती महाल. दीपांबिका राणीही विदुषी होती. गुणग्राहक होती. तिनं देशभरातून विद्वानांना तंजावरला बोलावून घेतलं, त्यांच्याकडून साहित्यरचना करवून घेतली. हे सारे ग्रंथ राजवाड्यातल्या ग्रंथालयात सामील झाले. दीपांबिका राणीनंच रघुनाथ नवहस्तांकडून भोजनकुतूहल हा अफाट ग्रंथ लिहून घेतला. तांदुळाची खीर, खोबर्याची खीर, भोपळ्याची खीर, वेगवेगळ्या प्रकारची कढणं (कळणं) व सूप, पोळ्या (जवाची रोटी, लिटी, अङ्गारपोळी, उडदाची पोळी, मुगाची पोळी, पुरणपोळी इत्यादी), डांगर, पंधरा प्रकारचे पापड, कुरडया, सांडगे, वडे (मुगाचे वडे, उडदाचे वडे, मिश्र डाळींचे वडे, कोरवडे, कोहलवडे म्हणजे भोपळ्याचे वडे, सूरणवडे, कडूलिंबाच्या फुलांचे वडे, आवळ्याचे वडे, कदलीपुष्पवडे, दहीवडे, काण्डवेलीवडे इत्यादी), कढी (साधी कढी, दह्याची कढी, सुरणाची कढी), आंबटी, शंकरपाळे, करंजी, चिवडा, चकली, वेगवेगळ्या प्रकारच्या फेण्या, पुर्या, घारगे, मोदक, धिरडी, कचोरी, बेचाळीस प्रकारचे लाडू, अनारसे, कोशिंबिरी, चटण्या, समोसा, जिलबी अशा पाककृती भोजनकुतूहलात आहेत. भोजनकुतूहलात मांसाहारी पदार्थही आहेत. सुरुवातीला मांस स्वच्छ कसे करावे, हे सांगितले आहे. नंतर दह्यात शिजवलेले मांस, तळलेले मांस, मांसाचे सूप, पुलाव इत्यादी पाककृती दिल्या आहेत. सांबार हा पदार्थ भोजनकुतूहलात नाही. मात्र आधी लिहिल्याप्रमाणे मसाले या अर्थी सम्भारा: हा शब्द रघुनाथ नवहस्तांनी वापरला आहे.
व्यंकोजीनंतर सत्तेवर आलेला त्याचा मुलगा, पहिला शहाजी हाही अतिशय विद्वान होता. इ.स. १६८४-१७१२ या त्याच्या राज्यकाळात तमीळ, तेलुगु आणि संस्कृत भाषांत असंख्य ग्रंथ रचले गेले. खुद्द शहाजीनं शिवपल्लकीसेवा प्रबंधमु आणि विष्णुपल्लकीसेवा प्रबंधमु या तमीळ आणि तेलुगु भाषेतल्या नृत्यनाटिका लिहिल्या. या नृत्यनाटिका अनेक दशकं देवदासींनी सादर केल्या. गेल्या दोन शतकांत मात्र या दोन्ही नाटिका विस्मरणात गेल्या आहेत. या नृत्यनाटिका लिहून इतकी शतकं लोटूनही आजही त्या ऐकताना भान हरपतं. कर्नाटक संगीतशैलीतल्या या रचना असल्यानं शहाजीनं रचलेल्या चालीच अजूनही गायल्या जातात. विलक्षण मधुर अशा या चाली आहेत.
शिवपल्लकीसेवा प्रबंधमु या नृत्यनाटिकेतली कथा घडते थिरुवरुरमध्ये. पार्वती कमलांबेच्या रूपात आहे. ती त्यागराजासाठी झुरते आहे. ती तिच्या मैत्रिणींना त्यागराजाकडे तिचा निरोप घेऊन पाठवते. मैत्रिणी त्याच्या राजवाड्यात जातात खर्या, पण त्याला पाहून लाजतात. आता त्याला निरोप कोण देणार? चंद्र, साप आणि हरीण हे पर्याय समोर येतात. चंद्र फार चंचल, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. सापाला दोन जिभा. त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? आणि प्रेमाचा निरोप हरणासारख्या उठवळ प्राण्याकरवी कसा पाठवायचा? त्या मग स्वत:च जातात निरोप द्यायला. त्यागराज त्यांचं आमंत्रण स्वीकारतो आणि कमलांबेकडे जायला पालखीत बसतो. कमलांबेकडे गेल्यावर ते दोघं जेवतात, मग नृत्य आणि संगीत यांचा आस्वाद घेतात आणि रात्री शय्यागृहात जातात. या नाटिकेच्या उत्तरार्धात पालखीचं आणि कमलांबा-त्यागराज यांच्या भोजनाचं सुरेख वर्णन आहे. हे भोजनाचं वर्णन नदनमक्रिया रागात आहे. सुरुवातीला हे दोन प्रेमीजीव वाळ्याचं सरबत पितात. मग नंतर पोंगल, मोरकुळंबु (म्हणजे कढी), मिलगकुळंबु, पोरिच्चकुळंबु, वडे, पापड, तुपात तळलेल्या पुर्या, दोसा, इडली, लोणची, अथिरसम् (तांदळाच्या पिठाची तळलेली मिठाई), मधात घोळवलेली फळं, चिंचभात, दहीभात, थिरट्टिपल असे पदार्थ त्यांच्यासमोर ठेवले जातात. कापूर आणि वाळा यांनी सुगंधित केलेलं गंगेचं पाणी आणि विडा हेदेखील असतातच.
ज्यानं सांबार्याचा शोध लावला, असा दावा केला जातो, त्या पहिल्या शहाजीनं ही नृत्यनाटिका लिहिली आहे. त्यानं अगदी तरुणपणी सांबार हा पदार्थ शोधला असता, तर आपल्याच नाटिकेत त्यानं तो शब्द नक्की वापरला असता. तसं न करता शहाजी तुरीची डाळ, भाज्या, आलं, चिंच, कढीपत्ता, हिंग आणि मीरपूड वापरून केलेल्या पोरिच्चकुळंबु या पदार्थाचा उल्लेख करतो. आजच्या सांबार्याशी बर्यापैकी साम्य असणारा हा पदार्थ आहे. याचाच अर्थ शहाजीचा आणि आजच्या सांबार्याचा काही संबंध नव्हता.
शहाजीनंतर तंजावरच्या गादीवर बसलेल्या पहिल्या सरफोजीनंही त्याच्या आधीच्या सत्ताधीशांच्या तोडीची कामगिरी केली. त्याच्या कार्यकाळात अद्वैतकीर्तन, विद्यापरिणय, रतिनमन्मथ, शिवाजीचरित्रम् असे ग्रंथ रचले गेले. त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या तुकोजी या त्याच्या धाकट्या भावानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तंजावरात रुजवण्याचा प्रयत्न केला. संगीतसमांमृत हा ग्रंथ त्यानं लिहिला. दुसरा व्यंकोजी, सुजनबाई, दुसरा शहाजी, प्रतापसिंह, तुळजाजी या नंतरच्या सत्ताधीशांनीही तंजावरच्या ग्रंथप्रेमाचा वारसा समर्थपणे पेलला. ग्रंथालयात भर पडत राहील, याची कायम काळजी घेतली.
सरस्वती महाल ग्रंथालयाला आशियातल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांपैकी एक बनवलं ते दुसर्या सरफोजीराजानं. दुसरा सरफोजीराजा म्हणजे एक विस्मयकारक रसायन होतं. सुधारणावादाचा एक अतिशय प्रगल्भ विचार त्याच्या ठायी होता. समाजाच्या अभ्युदयासाठी, समाजहितासाठी अखंड झटणारा असा तो होता. खरं म्हणजे या राजाची सत्ता फक्त त्याच्या महालापुरती होती. ब्रिटिशांची तनखा आणि राज्यातून गोळा होणार्या सार्याचा एकपंचमांश हिस्सा हीच त्याची मिळकत. पण ही थोडीफार संपत्ती इतर संस्थानिकांसारखी बाईबाटलीवर न उधळता त्यानं अनेक संस्था उभारल्या. शिक्षणाची केंद्रं उघडली. राज्यात विद्वानांना आश्रय दिला. सरस्वती महाल ग्रंथालयाची भरभराट या राजाच्या काळात झाली. पुस्तकं आणण्यासाठी सरफोजी काशी, रामेश्वर, कलकत्ता या शहरी जाऊन आला. तिथल्या विद्वानांना विनंत्या करून त्यांच्याकडून हस्तलिखितं गोळा केली. युरोपात आपले दूत धाडले. तिथून पुस्तकं विकत आणली. पैसे संपल्यावर राजवाड्यातल्या किमती वस्तूंच्या बदल्यात पुस्तकं मिळवली. तमीळ, तेलुगु, मराठी, मलयाळम, संस्कृत, लॅटिन, डच, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा सरफोजीला अवगत होत्या. या भाषांमधली हजारो पुस्तकं त्यानं अक्षरश: वणवण करून मिळवली. विज्ञान, कला, भाषा यांसंबंधीची युरोपीय नियतकालिकं वाचता यावीत म्हणून त्यानं त्या युरोपीय संस्थांचं सभासदत्व स्वीकारलं. तिथली सगळी उत्तम नियतकालिकं, विज्ञानपत्रिका तंजावरच्या ग्रंथालयात येतील, हे जातीनं पाहिलं. तंजावरच्या ग्रंथालयात आजही अनेक पुस्तकांवर त्याच्या सह्या आहेत, ते पुस्तक कुठून आणि कधी विकत घेतलं, याच्या नोंदी आहेत. पुस्तकांमागे रिकाम्या सोडलेल्या पानांवर त्यानं टिपणं काढून ठेवली आहेत. त्यानं स्वत: अनेक पुस्तकं लिहिली. नृत्यनाटिका लिहिल्या. बारा मराठी नाटकं लिहिली. भारतातली देवनागरी लिपीतली पहिली शिळाप्रेस सुरू केली. दवाखाने उभारले. तिथे स्वत: शस्त्रक्रिया केल्या. हस्तिदंताचे मानवी सांगाडे तयार करवून घेतले. शाळा उभारल्या. शेतीच्या औजारांचा, जहाजबांधणीचा कारखाना सुरू केला. पवनचक्क्या उभारल्या. युरोपातून यंत्रं मागवली. भरतनाट्यम् या नृत्यशैलीचा विकास केला. .
आता इतका गुणी राजा हा अर्थातच खवय्या असणं साहजिक होतं. पण सरफोजी केवळ खाण्यातली रसिकता दाखवून थांबला नाही. त्यानं राजवाड्यातल्या पदार्थांच्या कृतींचं दस्तऐवजीकरण केलं. राजाच्या आज्ञेप्रमाणं १८१६ आणि १८२५ साली दोन हस्तलिखितं तयार करण्यात आली. नारायण अय्याम आणि चिमणू अप्पा या त्याच्या मुख्य स्वयंपाक्यांनी आणि बटलर व्यंकटस्वामी या त्याच्या अंग्रिजी कुकनं ते करत असलेल्या पदार्थांच्या कृती सांगितल्या आणि कोणीतरी त्या तमीळ व इंग्रजी भाषांमध्ये लिहून काढल्या. १८१६ सालच्या हस्तलिखितात त्याकाळी प्रचारात असलेल्या व सर्वत्र केल्या जाणार्या पाककृती आहेत. १८२५ सालच्या हस्तलिखितात सरफोजीच्या राजवाड्यात तयार होणारे मराठी आणि अंग्रिजी पद्धतीचे पदार्थ आहेत. सरस्वती महाल ग्रंथालयातली ही दोन हस्तलिखितं १९५०च्या सुमारास हाती लागली आणि १९८८ साली ’शरभेंद्र पाकशास्त्र’ या नावानं मराठी, इंग्रजी आणि तमीळ या तीन भाषांत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं. या पुस्तकातून एकोणिसाव्या शतकात तंजावरात कुठले पदार्थ केले जात होते, स्वयंपाकाची पद्धत काय होती याची मस्त माहिती मिळते.
सरफोजी मुळात रसिक असल्यानं त्यानं देशविदेशातील उत्तमोत्तम पाककृतींचा संग्रह केला होता, जगभरातून सुबक घाटाची भांडी मागवली होती. त्याच्या राजवाड्यात तीन स्वयंपाकघरं होती. पहिल्या स्वयंपाकघरात मराठी पद्धतीचा मांसाहारी स्वयंपाक व्हायचा. दुसर्यात ब्राह्मणी पद्धतीचा शाकाहारी स्वयंपाक होई आणि तिसर्यात अंग्रिजी थाटाचे पदार्थ रांधले जात. मराठी पद्धतीच्या स्वयंपाकघराविषयी थोडंसं. ’मराठी पद्धत’ ही खरं म्हणजे तंजावरी मराठी पद्धत होती. या पद्धतीचा महाराष्ट्राशी फारसा संबंध नव्हता. दक्षिण भारतीय पद्धतीला ती अधिक जवळची होती. तंजावरच्या भोसलेवंशीय राजांनी महाराष्ट्रीय संस्कृती तंजावरावर लादली नाही. महाराष्ट्रातनं काही पदार्थ तंजावरला पोहोचले जरूर, पण त्यांनी दक्षिण भारतीय रुपडं किंवा दक्षिण भारतीय नावं धारण केली. झुणक्यासारखे फार थोडे पदार्थ मूळ स्वरूपात तिथे टिकून राहिले. हे केवळ स्वयंपाकाच्या बाबतीतच घडलं, असं नाही. मराठी अभंगांना कर्नाटक शैलीतल्या रागांच्या चाली लावल्या गेल्या. बरीचशी ग्रंथरचना तमीळ आणि तेलुगु भाषांत केली गेली. त्यांनी दक्षिण भारतातल्या मंदिरांतच उपासना केली, तिथल्याच शैलीत नवी मंदिरं बांधली. इतकंच काय, पण त्यांनी चोलवंशीय भूमीचे अधिपती म्हणून भोसलेवंशाचा उल्लेख न करता चोलसिंहासनाधिपती आणि चोलराजेंद्र अशी बिरुदं अभिमानानं मिरवली. त्यामुळे सरफोजीच्या स्वयंपाकघरात तयार होणारं जेवण हे मुख्यत: दक्षिण भारतीय आणि थोडंफार मुघल व युरोपीय पद्धतीचं आहे. मात्र तंजावरच्या भोसल्यांच्या चाकरीत असलेले स्वयंपाकीही हुशार होते. त्यांनी काही नवे पदार्थ शोधून काढले. अस्तित्वात असलेल्या पदार्थांना वेगळं रूप दिलं.
तर, सरफोजीच्या तीन स्वयंपाकघरांखेरिज राजवाड्यात शरबतखाना, आबदारखाना आणि थत्तीमहालखाना (दूधविभाग) होते. धान्य, तेल आणि मसाले साठवायला मोठाली कोठारं होती. त्यांना कोट्टीयम् असं म्हणत. या कोठारांमध्ये वस्तू ठेवण्याआधी त्यांची कडक तपासणी केली जायची. भेसळ आढळल्यास कडक शिक्षा होत असे. राजवाड्यात कृष्णविलास तलाव होता. अजूनही तीन लहान टाकी होती. त्यांतलं पाणी प्यायला वापरलं जात असल्यामुळे त्यांतल्या पाण्याचीही नियमित तपासणी होत असे. राजाकडे जेवण पाठवण्यापूर्वी पदार्थांची चव व्यवस्थित आहे की नाही, हे बघण्यासाठी एक आणि त्यांत विष नाही, याची खात्री करण्यासाठी एक, असे दोन तपासनीस होते. दोघंही अगोदर सगळे पदार्थ चाखून बघत. राजवाड्यातल्या सर्व नव्या स्वयंपाक्यांना अनुभवी स्वयंपाक्यांच्या हाताखाली किमान वर्षभर काम करावं लागे. त्यांची दर महिन्याला परीक्षा घेतली जाई. गृहपाठही असे. अंग्रिजी स्वयंपाकघरातल्या स्वयंपाक्यांना प्रशिक्षणासाठी सहा महिने फोर्ट सेंट जॉर्जच्या, म्हणजे मद्रासच्या मिलिटरी किचनीत युरोपीय पदार्थ शिकण्यासाठी पाठवण्यात येई. तंजावरला परतल्यावर त्यांची परीक्षा घेतली जाई. या प्रशिक्षणामुळे आणि परीक्षांमुळे सरफोजीचे स्वयंपाकी आपल्या कामात इतके तरबेज होते, की १८०१ साली (तंजावरी) मराठी पद्धतीचा स्वयंपाक करण्यासाठी सरफोजीनं नारायणराव आणि सुब्बाराव या दोन निष्णात स्वयंपाक्यांना मद्रासच्या गव्हर्नराकडे पाठवलं होतं. राजवाड्यात एक तरबेज हलवाईही होता. त्यानं केलेल्या मिठायाही गव्हर्नराकडे पोहोचत्या केल्या जात. सरफोजीला दस्तऐवजीकरणात भारी रस होता. राजवाड्यातल्या त्याच्या कार्यकाळातल्या स्वयंपाक्यांची नावं, त्यांचे पगार, त्यांना जे पदार्थ चांगले करता येत त्यांची नावं, राजवाड्याच्या शेतात तयार होणार्या आणि विकत आणल्या जाणार्या फळांच्या, भाज्यांच्या, वाणसामानाच्या रोजच्या याद्या, बाहेरगावी गेल्यास तिथे खाल्लेल्या पदार्थांच्या कृती, विकत घेतलेले जिन्नस, राजवाड्यातला रोजच्या मेन्यू अशा याद्या असलेली मोडी लिपीतली सुमारे पाचशे बंडलं आजही ग्रंथालयात आहेत. त्यांपैकी फक्त दोन बंडलांचं भाषांतर होऊन पुस्तक प्रकाशित झालं आहे. तेच हे शरभेंद्र पाकशास्त्र.
या पुस्तकात एकूण १३८ पाककृती आहेत. पहिल्या भागात मांसाहारी आणि दुसर्यात शाकाहारी पाककृती आहेत. मांसाहारी विभागात पुलाव (यखनी, साधा, खिचडी, सबजी, मुरगी, अंड्याची,कोंबडिची), बिरंजी, म्हणजे बिर्याणी (साधी, कुष्का, चौरंगी), कबाब (साधा, कोंबडिचा, तीन प्रकारचे माश्याचे, शामि), कलिया (कोंबडिचा आणि मटणाचा), कोर्मा (माश्याचा, कोंबडिचा), पसंदे, कोर्मे, रस्से, मांसाच्या बाकरवड्या, सुंट्या, मांसाच्या पुडाच्या वड्या, मेथिमास, केसरमास, काळिजाची कापण्या, मांस आणि झिंगे भरलेलं पडवळ, मांसाचे रोट, कोंबडिची, झिंग्याची आणि अंड्याची लोणची, अंड्याची भजी, धिरडी, वड्या मटण रोस्ट, दंपो फौल, आमलेट, अशा अनेक पाककृती आहेत. शाकाहारी विभागात भात (साखर, चिंच, उडिदाचा, तिळाचा), खिचड्या, कोशिंबिरी, कुट्टु, मुरंबे, लोणची, चटण्या, भाज्या (केळफुलाची, गर्याची, वांग्याची, सांडग्यांची, कोहळ्याची, अळूची, भेंडीची, खोबर्याची), अनेक प्रकारचे कुळंबु, पोडियल, झुणका असे पदार्थ आहेत. याशिवाय आपिल व मांगो जेल्लि, पेरूची जेल्ली, अनानस जेल्ली, वेफर, आरंज पफ, लेडि महामूद या पदार्थांच्या पाककृती या पुस्तकात आहेत. या सर्व पाककृती राजवाड्यात अनेक माणसांसाठी होत असल्यानं त्यांची प्रमाणं अवाढव्य आहेत. भातासाठी ६० पाउंड तांदूळ, किंवा २० कोंबड्या, १२० अंडी या प्रमाणात पदार्थ सांगितले आहेत. शरभेंद्र पाकशास्त्रात काही रंजक गोष्टी आहेत. पहिली म्हणजे हुरिट या नावाचा साठवणीचा पदार्थ या पुस्तकात आहे. ’दाळ व हिंग व इतर मासाला चे सामान घालून केल्याले व भाज्या, सांबार यांच्या बराबरी घालून फोडणी देणेचे’ हा पदार्थ. हुरिट या शब्दाचा अर्थ मला तंजावरी मराठीच्या व तमीळ शब्दकोशात सापडला नाही. तंजावरी मराठीच्या जाणकारांच्या मते हा शब्द हल्ली वापरला जात नाही. त्यामुळे हुरिटच्या कृतीवरूनच या पदार्थाच्या स्वरूपाचा अंदाज बांधावा लावतो. २५ तोळे तांदूळ, २५ तोळे हरभर्याची डाळ, २५ तोळे तीळ, २ तोळे लाल मिरच्या, १ तोळा काळी मिरी, २ तोळे वाळवलेला कढीपत्ता एकत्र करून वाटायचे. ही पावडर भाज्यांमध्ये, सांबार्यात चव वाढवण्यासाठी, दाटपणा येण्यासाठी घालायची. एकदा करून ठेवली, की काही महिने टिकते, असंही पुस्तकात लिहिलं आहे. हुरिट म्हणजे करी पावडर नव्हे. वेसवारासारखा हा पदार्थ असावा. आज आपण जे वेसवार वापरतो, ते फारतर अठराव्या शतकात वापरलं जाऊ लागलं असावं. त्या आधी या शब्दाचा अर्थ फार वेगळा होता, त्याबद्दल पुढच्या लेखात लिहीनच. हुरिटात मसाल्याचे जिन्नस नाहीत. शरभेंद्र पाकशास्त्रात कुठेही मसाल्याच्या तयार पावडरी वापरलेल्या नाहीत.
दुसरं म्हणजे पुस्तकात सांबार्याची एकच कृती आहे. निबाच्या फुलाचं सांबार. काळी मिरी, मिरशेंगा, हळद, खोबरं, धणे, कांदे, चिंच, मीठ आणि निंबाची फुलं हे साहित्य या सांबार्यासाठी वापरलं आहे. मिरी, मिरशेंगा, हळद, खोबरं, धणे भाजून बारीक वाटायचे, मग पाण्यात मीठ, चिंच, हा वाटलेला मसाला आणि तुपात तळलेली निंबाची फुलं एकत्र करून कढ आणायचा. तुपात बारीक चिरलेले कांदे, उददाची डाळ, जिरं, कढीपत्ता घालून वरून सांबार्याला फोडणी द्यायची. तुरीच्या डाळीचं सांबार पुस्तकात नाही. हल्ली प्रचलित असलेलं तुरीच्या डाळीचं सांबार फार प्राचीन नसलं तरी महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून सांबारं हा पदार्थ केला जाई आणि सांबार हा शब्द महाराष्ट्रातून दक्षिण भारतात गेल्याची शक्यता आहे, मात्र त्याचा पहिल्या शहाजीशी संबंध नाही, असे निष्कर्ष आपण अगोदर आलेल्या पुराव्यांवरून काढू शकतो.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पदार्थांच्या नावांमध्ये कारण नसताना करी हा शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ, कुट्टुकरी आणि कुळंबुकरी. कुट्टु आणि कुळंबु या शब्दांवरून विशिष्ट पदार्थांचा बोध होतो. त्यांना परत करी हा प्रत्यय जोडणं अनावश्यक आहे. हे म्हणजे भाजीकरी, पिठलंकरी म्हणण्यासारखं झालं. करी हा शब्द स्वतंत्रपणे एकदाच येतो - चिकन करी. भारतीयांनी त्यांच्या पदार्थांना करी असं संबोधण्याची सुरुवात झालेली शरभेंद्र पाकशास्त्रात पाहायला मिळते. पदार्थांची नावं देताना ब्रिटिशांचा हा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. शरभेंद्र पाकशास्त्रातली अजून एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मसाला / मासाला हे शब्द मराठी आणि तमीळ भाषेतही वापरले आहेत. काही ठिकाणी मराठीत मसाला हा शब्द वापरला असला तरी तमीळमध्ये संबार हा समानार्थी शब्द वापरला आहे. मराठीत मात्र फक्त मसाला हाच शब्द वापरला आहे.
लीळाचरित्रात मसाल्याच्या जिनसांसाठी सांबारू हा शब्द वापरलेला आपण पाहिला. संस्कृत सम्भारचं हे रूप त्याच अर्थानं गुजरातीत (साम्भार), बंगालीत (संभरा), तेलुगुत (संबारमु), तमीळमध्ये (संबार), कन्नडमध्ये (सम्बार / चम्बार) प्रचलित झालं. यांतले काही शब्द आजही वापरले जातात. मलयाळम भाषेत संबारम् हा शब्द मसाले घातलेलं ताक या अर्थी वापरला जातो. मराठीत आणि हिंदीतही मात्र आपण हल्ली फक्त मसाला किंवा मसाले हेच शब्द वापरतो. काळी मिरी, दालचिनी, केशर, लवंग, वेलदोडा, जिरं, धणे, मोहरी, हिंग, हळद या जिनसांसाठी मसाला हा शब्द कसा रूढ झाला?
मिरी, दालचिनी, केशर, लवंग, वेलदोडा, जिरं, धणे, मोहरी, हिंग, हळद या जिनसांसाठी ऐन-इ-अकबरीत बहारात हा शब्द वापरला आहे. बहार आणणारे ते बहारात. निमतनाम्यात शब्द सापडतो अदवियेह. हा फार्सी शब्द आहे. हा शब्दही निमतनाम्यात एकदोनदाच दिसतो. इतर वेळी मिरी, दालचिनी, केशर असे स्वतंत्र आणि वेगळे उल्लेख केले जातात. मसाला हा शब्द मिरी, हिंग, दालचिनी इत्यादींसाठी बाराव्या शतकानंतरच्या फार्सी / अरबी / तुर्की भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या वाङ्मयात सापडत नाही.
यादवकाळात मराठीत फार्सीनं प्रवेश केला. ज्ञानेश्वरीतही असे फार्सी शब्द आढळतात. शिवकाळात आणि पेशवेकाळात मात्र मराठी भाषेत असंख्य फार्सी शब्दांनी घुसखोरी केली. हुद्दे किंवा व्यवसायदर्शक (ठाणेदार, डबीर, दप्तरदार, पागनीस, सराफ, शिलेदार, मोकाशी, महाले, मुजुमदार, चितणीस, जकाते, रास्ते, सबनीस), आर्थिक व्यवहारदर्शक (खर्च, मदत, चीजवस्त, खरेदी, जामीन, तनखा, मिळकत, रक्कम, रोजगारी, हप्ता, हमी, मजुरी), कालवाचक (दररोज, सन, सहामाही, हमेशा, महिना, यंदा, हल्लीगुदस्त, साल, सुमारे), प्रपंचोपयोगी (किल्ली, कुलूप, पडदा, बिछाना, मशाल, संदूक, खुर्ची, तावदान), खाद्यपदार्थदर्शक (अनार, खरबूज, मेवा, बदाम, हलवा) यांसह शेकडो भाववाचक, युद्धदर्शक शब्द, शिव्या फार्सीतून मराठीत आले. पत्रव्यवहार फार्सीमिश्रित मराठीतून होऊ लागला. फार्सी लिहूवाचू शकणारे फरसीनवीस, म्हणजे पारसनीस आणि फार्सीत बातम्या लिहिणारे वाकनीस यांच्याविना कामकाज अडू लागलं. या प्रक्रियेत मराठीनं अनेक फार्सी शब्दांची रूपंही बदलली. उदाहरणार्थ, निकाह् हा फार्सी शब्द मराठीत झाला निका. अन्त्य ह्चा लोप होऊन पाय्गाह् झाला पागा, अल्लाह् झाला अल्ला, सलाह् झाला सल्ला, जाय्गाह् झाला जागा आणि मसालेह् झाला मसाले.
मसालेह् हा फार्सी शब्द अनेकवचनी वापरला जातो. अर्थ - अनेक वस्तू किंवा वस्तूंचं मिश्रण किंवा भेटवस्तू किंवा बक्षिसी. सम्भार या संस्कृत शब्दाशी मसालेह्ची अर्थाच्या दृष्टीनं जवळीक आहे. आता मसालेह् हा अनेकवचनात वापरला जाणारा शब्द. त्यामुळे मसालेचं एकवचनी रूप मराठीनं तयार केलं मसाला. एकारान्त अनेकवचनी रूपांचं आकारान्त एकवचनी रूप मराठीला परिचयाचं होतं. उदाहरणार्थ, घोडे - घोडा. तसंच, मसाले - मसाला. तर अशाप्रकारे मसाला हा शब्द मराठीत प्रचारात आला. मसाला हा शब्द फार्सी नाही.
मसाला हा शब्द साधारण पंधराव्या शतकापासून प्रचारात दिसतो. महिकावतीच्या बखरीत हा शब्द आढळतो ’दंड’ या अर्थी. राजपुत्र महिबिंब तो ठाण्यासि राहिला॥ त्याणे पांच पाखाड्या मसाल्यासि घेतल्या॥ मसाला महीबिंबासि द्यावा॥ हजार ४ सजगाणि खत घेवोन पांचपाखाडि माहाल बांधोन राहिला॥ असा उल्लेख महिकावतीच्या बखरीत सापडतो. इथे मसाला हा शब्द दंड या अर्थी येतो. शिवकाळात मसाला जरा वेगळ्या अर्थानं अनेकदा वापरलेला दिसतो. शिवाजीमहाराजांनी कुडाळच्या आनंदराऊ सरसुभेदारांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या शेवटी लिहिलं आहे - ह्या कामाबद्दल पाठविले असती त्यांसी मसाला होनु नी॥४. रामाजी बांदे हरकारा होनु नी॥३, संताजी शिरोजी अपातप होनु नी॥१. म्हणजे हे पत्र घेऊन येण्याचं काम केल्याबद्दल रामाजी बांदे हरकारा यांनी ३ निशाणी होन आणि संताजी शिरोजी अपातप यांनी एक निशाणी होन द्यावा. असे उल्लेख शिवकाळातल्या अनेक पत्रांमध्ये सापडतात. पत्र घेऊन येणार्या दूताला पत्र स्वीकारणार्यानं मसाला देण्याची पद्धत होती. एखादा जर अनेकदा बोलवूनही भेटायला येत नसेल, किंवा सांगितलेलं काम करत नसेल, तर त्याला अशी पत्रं वारंवार पाठवली जात. प्रत्येक पत्राबरोबर मसाला द्यावा लागत असल्यानं, तो शेवटी कंटाळून भेटायला येई किंवा सांगितलेलं काम करून टाके.
पेशवेकाळातही मसाला हा शब्द दंड, बक्षीस यां अर्थी वापरलेला दिसतो. १७६४ साली सौभाग्यवती पार्वतीबाई पेणला गेल्या. तिथे राघोजी आंग्रे वजारतमहा यांना मेजवानी दिली गेली. या प्रसंगी रखमाजी परिट यास मसाल्यास, म्हणजे बक्षीस म्हणून एक रुपया देण्यात आला. १७४७ साली लिहिलेल्या एका पत्रात मसाला हा शब्द दंड या अर्थी येतो. विसापूरच्या किल्ल्यावर जत्रा भरवण्याचा अधिकार लोहवाडीच्या पाटलाकडे होता. त्या वर्षी मात्र नारो भगवंताच्या चिथावणीवरून ही जत्रा पाटणच्या पाटलानं भरवली. यामुळे किल्लेदारानं पाटणच्या पाटलाकडून दहा रुपये मसाला घेतला. १७६२ साली मोगलांना सामील होऊन लूटपाट केल्याची शिक्षा म्हणून कर्डे रांजणगावच्या जमीनदाराला पाचशे रुपये मसाला पेशव्यांना द्यावा लागला. दंड आणि बक्षीस या अर्थी असे असंख्य दाखले शिवकाळात आणि पेशवाईत सापडतात. पेशवेकाळात मसाला हा शब्द मिश्रण या अर्थीही वापरलेला दिसतो. सदाशिव नाईक पेशव्यांच्या वतीनं काशीला घाटांचं बांधकाम करत होते. या बांधकामाची प्रगती सांगण्यासाठी पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात ते लिहितात की, जरासंध घाटाचं काम मसाला नसल्यामुळे बंद पडलं. इथे मसाला म्हणजे बांधकामासाठी आवश्यक असणारं चुना, रेती इत्यादी साहित्य. चिमाजी आप्पांना नवीन नगारे हवे होते. त्यांच्या इच्छेनुसार उत्तम मसाला लावलेले दोन नगारे बनवून घेण्यात आले. इथे मसाला म्हणजे नगार्याला लावायच्या शाईचं मिश्रण.
तेराव्या शतकानंतरच्या साहित्याच्या अभ्यास केला तर लक्षात येतं, की हिंग, जिरे, धणे, मिरे, लवंग, वेलदोडा यांचाच जास्त वापर महाराष्ट्रासह दक्षिण भारतात होत होता. पेशवेकाळात हिंग, जिरे, मिरे, हळद यांना असंख्य पत्रांमध्ये, याद्यांमध्ये हिंगजिरेमिरे किंवा हिंगजिरेमिरेहळद असंच संबोधलं आहे. हेच चार जिन्नस त्या काळात बहुतकरून वापरलेले दिसतात. जिन्नस हा शब्दही अनेक पत्रांमध्ये सापडतो. लष्कर भागात राहणार्या हरशेट आणि सोमशेट वीरकर यांच्यात भांडण झाल्यामुळे त्यांची वतनदारी काढून घेण्यात आली होती. मग दोघांमध्ये समेट झाला आणि त्यांची वतनं त्यांना परत मिळाली. त्यांच्याकडून दस्तुरी वसूल केली गेली आणि त्यांनी दरवर्षी प्रत्येकी पाच शेर वेलदोडे, लवंगा, जायफळ आणि जायपत्री महादजी अंबाजी द्यावे, असं ठरलं. या पत्रात वेलदोडे, लवंगा, जायफळ इत्यादींना जिन्नस असं म्हटलं आहे. १७५५ साली कोपरगावच्या परमहंसांचे शिष्य कृष्णाजी गोपाळ आणि गोविंद त्रिंबक महंत यांना १ श्रीकचेश्वर, १ श्रीगंगेसनैवेद्य, ५ ब्राह्मण आणि ७ असामीचा शिधा कणीक, तांदूळ, डाळ, तूप, तेल, मीठ, हिंगजिरेमिरेहळद, लाकडे, सुपारी, पानं द्यावयाची व्यवस्था करावी, अशी पेशव्यांनी आज्ञा केली. १८१७ साली पंढरपूरला पेशव्यांचा पंधरा दिवस मुक्काम पडणार होता. त्या साठी न्यावयाच्या शिधयाची यादी - दाळ तुरीची, कणीक, मीठ, गूळ, साखर, हरभरियाचे पीठ, जोरीचे पीठ, तांदूळ बारीक आणि मोठे, हिंगजिरेमिरेहळदधने, साखर, सुपारी. ३ फेब्रुवारी, १७६९ रोजी गंगापूरच्या रामचंद्र नारायण यांच्याकडे लवंगा, वेलदोडे, दालचिनी, कस्तुरी हा जिन्नस धाडण्यात आला. दुसर्या बाजीरावास पक्षी पाळण्याचा नाद होता. त्यानं अगदी पार इराणहून पक्षी विकत आणले होते. त्याच्याकडे एक बंगाली मैना आणि एक घार होती. या मैनेला खाऊ घालण्यासाठी उंची कस्तुरी आणि घारीसाठी लवंगा, वेलदोडे, पत्री, जाइफळ, केशर, कस्तुरी उंच हे जिन्नस शिकारखान्यात धाडण्यात आले. ही १७९६ सालची यादी आहे.
पेशवेदप्तरातली १७७१ सालची एक नोंद खूप महत्त्वाची आहे. येसू नावाची पेशव्यांची एक चाकर होती. चाकणजवळच्या करंदी गावच्या सुलतानजी दरेकर पाटील याच्या मुलीशी बाबूसिंग या तिच्या मुलाचं लग्न झालं. लग्नखर्च ३,७४८ रुपये तीन आणे इतका झाला. त्यापैकी नवर्याकडे ३,१३७ रुपये तीन आणे आणि नवरीकडे ६११ रुपये इतका खर्च केला गेला. या लग्नावेळी झालेल्या खर्चाच्या याद्या उपलब्ध आहेत. या याद्यांमधले तपशील रंजक आहेत. याद्यांमध्ये पत्रिकापूजनाची वेळी, हळद लावताना, देवक बसवताना, बायकांचे पाय धुताना द्यायच्या दक्षिणा, रुखवताचा, बस्त्याचा, वाजंत्रीचा, आतषबाजीच्या, गोंधळाचा, दागिन्यांचा, प्रवासाचा, जेवणावळींचा खर्च आहे. बायकांच्या ओट्या भरण्यासाठी मोगरेल तेल, चमेली तेल, कुंकू, शेंदूर, वाळा, नागरमोथा, कचोरा, गहुले, खोएबरे, खारिका, आंबेहळद, गुलाल, ऊद, हळद, नारळ हे साहित्य ३४ रुपयांना विकत आणलं होतं. नवर्यामुलीसाठी तिच्या माहेरून सात सरी, दोन वाक्या, एक माजपट्टा, दोन दोरे, दोन पाटल्या, दोन झुबीपंखे, दोन वेणीचे गोंडे, एक मंगळसूत्र, चार गोठ, मण्याचे हातभर सर, कंठा, नथ, मुहूर्तमणी, एक पुतळीमाळ असे सोन्याचे आणि दोन साखळ्या, दोन जोडवी, दोन सर असे चांदीचे दागिने करण्यात आले. चांदीचे दोन करंडे आणि दोन फण्याही देण्यात आल्या. मोत्याच्या दोन माळा आणि कानातले मुलीच्या काकाने दिले. यादीत कोणाला काय आहेर द्यायचे, कधी द्यायचा याच्या तपशीलवार नोंदी आहेत. जेवणावळींचेही तपशील आहेत. वाणसामानाच्या याद्या आहेत. जिरे, मिरे, हिंग, पापडखार, हळद, तूप, गुळ, साखर, चिंच, खसखस, दाळहरभरे, कणीक, लसूण, खोबरे, तेल, गरम मसाला, कांदे, दूध, शाकभाजी हे साहित्य लग्नाच्या आदल्या दिवशीच्या जेवणासाठी विकत आणण्यात आलं. या यादीतली गरम मसाला ही नोंद महत्त्वाची आहे. पेशवे दप्तरात किंवा समकालीन साहित्यात कुठेही गरम मसाल्याचा उल्लेख सापडत नाही. या मसाल्याचे घटकपदार्थ कुठले, हे मात्र कळत नाही. लग्नाच्या मेजवानीसाठी मात्र गरम मसाला विकत आणला गेला नाही. हिंगजिरेमिरेहळददालचिनी एवढेच जिन्नस लग्नाच्या स्वयंपाकात वापरले गेले.
बाबूसिंगच्या लग्नात वापरलेल्या गरम मसाल्याचा अर्थ - मसाल्याच्या जिनसांचं मिश्रण. अठराव्या शतकाच्या शेवटी हा शब्द आणि हा मसाला प्रचलित झाला असावा. हे असं मिश्रण सुरुवातीला कदाचित श्रीमंतांघरी वापरलं जात नसावं. कारण पेशवेदप्तरात यानंतरच्या काळातही कुठे गरम मसाला सापडत नाही. मसाल्याच्या जिनसा या अर्थीही हा शब्द नंतर दप्तरात कुठे येत नाही. १८८० साली लिहिल्या गेलेल्या पाकविलास या हिंदी पुस्तकात मात्र हिंगधणेजिरेमिरेहळदलवंगवेलदोडेदालचिनीतमालपत्र या जिनसा या अर्थी मसाला हा शब्द वापरलेला सापडतो. हा शब्द आपण आजही वापरतो. मिश्रण किंवा एकच जिन्नस या दोहोंसाठी आपण मसाला हाच शब्द वापरतो. गरम / काळा / गोडा / मालवणी / सांबार मसाले म्हणजे अनेक जिनसांचं मिश्रण. हिंगजिरेमिरेहळद किंवा वेलदोडा, लवंग, दालचिनी हेही मसालेच. या अख्ख्या जिनसांनाही आता आपण मसाला / मसाले असंच संबोधतो. त्यांचं मिश्रण नसलं तरी.
मसाल्यांचं मिश्रण वापरण्याची आणि ते मिश्रण तयार करून ठेवण्याची पद्धत आपण अठराव्या शतकात ब्रिटिशांकडून उचलली असावी. कारण अगोदर लिहिल्याप्रमाणे अशा मिश्रणांचे उल्लेख लिखित साहित्यात सापडत नाहीत. अठराव्या शतकात ब्रिटिश भारतात स्थिरावले होते. ते वापरत असलेल्या वस्तू श्रीमंतांघरी वापरल्या जाऊ लागल्या होत्या. पेशव्यांना खूश करायला उंची आरसे, झुंबरं, प्राणीपक्षी शनिवारवाड्यात पाठवले जायचे. वाड्यातूनही मुंबईकर इंग्रजाकडे सुर्या, तंबाखू, आरसे, मेणबत्त्या, लॅम्पशेडी यांच्या मागण्या केल्या जायच्या. अठराव्या शतकात ब्रिटनमध्ये करी पावडर मिळू लागली होती. त्या आधी काही वर्षंतरी अशा पूड केलेल्या मसाल्यांचा वापर भारतात नक्कीच सुरू झाला असावा. अशा पुडी अख्ख्या मसाल्यांपेक्षा स्वस्त असतात, त्या वापरणं सोयीचं असतं, असं कदाचित आता भारतीयांना जाणवलं असावं. एकोणिसाव्या शतकात मात्र अशा पुडी वापरणं बरंच प्रचलित झालं. नवनवे मसाले तयार केले गेले. हे मसाले बनवणार्या कंपन्या सुरू झाल्या. पूर्वी चौकात कुटलेलं हळदतिखट घेऊन बसणार्यांनी मसाला कुटायला गिरण्या सुरू केल्या, त्यातून मोठाले उद्योग निर्माण झाले. पावभाजी, दाबेली अशा अगदी तरुण पदार्थांच्या मसाल्यांनीही अगदी अल्पावधीतच आपला जम बसवला. सारख्या चवींचे पदार्थ घरोघरी बनू लागले. ’मसाल्यांच्या या तयार पावडरी आम्ही हजारो वर्षांपासून वापरत आहोत’, 'गरम मसाला मुघलांच्या काळात तयार केला गेला', असं आपण अभिमानानं सांगू लागलो. या खोट्या परंपरा निर्माण करण्याच्या नादात आपण आपल्या चवींमधलं वैविध्य गमावून बसलो, हे मात्र आपल्या लक्षात आलं नाही.
काळाच्या ओघात आधीच्या काळातलं वैविध्य नष्ट झालं तरी नवं काही तर जन्म घेतंच, असाही एक विचार आहे. पण या नव्याचं लुप्त झालेल्या जुन्याशी नातंच नसलं तर? लुप्त झालेलं जुनं, हे आमचं नव्हतंच, असं आपण म्हटलं तर? अनेक शतकांमधल्या सामाजिक आणि सांस्कृतिक हालचालींतून आणि घुसळणीतून नवं काही जन्माला येतं. अनेक पिढ्या या जन्मलेल्या नव्यामुळे निर्माण झालेल्या वैविध्यावर पोसल्या जातात. या वैविध्यामुळेच समाज आणि संस्कृती बहरते आणि जुन्याशी न तुटणारी नाळ वागवत नवं काहीतरी पुन्हा जन्माला येतं. हे वैविध्यच समूहांना एकत्र बांधणारं सूत्र असतं. पण हे वैविध्य नाकारलं, जुन्याला जाणून न घेता त्याच्याकडे पाठ फिरवली, तर आधीच्या काळातल्या समाजाशी नातं सांगण्याची गरज अधिकच तीव्र होऊन बसते. मग आपण नव्यालाच जुनं समजायला लागतो. नव्यात नसलेलं वैविध्य जुन्यातही नव्हतं, असा समज करून घेतो. नसलेल्या परंपरा तयार करतो. आजच्या संस्कृतीचा आरसा म्हणून ज्या गोष्टी सोयीस्कर वाटतात त्यांचीच मग सतत जोपासना होत राहते. किंवा मग मूळ वारसदारांकडून त्या हिसकावून घेऊन नव्यानं त्यांची जोपासना केली जाते.
वसाहतवादी कालखंडानं अनेक भल्याबुर्या गोष्टी दिल्या. त्यांचा अन्वयार्थ लावणंही किचकट आहे. एक मात्र खरं, अनुभवांमधून, शिक्षणातून भारतीयांना स्वतःची ओळख पटवून घेण्याची जी संधी होती, ती ब्रिटिशांनी हिसकावून घेतली. अनेक लोकपरंपरा भारतीयांच्या जीवनातून हद्दपार केल्या. ब्रिटिश संस्कृतीतल्या नवपरंपरा याच त्यांना वारशानं मिळालेल्या परंपरा, हे नवशिक्षितांच्या मनावर त्यांनी ठसवलं. हे फक्त ब्रिटिशांनीच केलं असं नाही. फ्रेंच, पोर्तुगीज, जपानीसुद्धा हेच करत होते. सांस्कृतिक सपाटीकरणामुळे माणूस कमकुवत होतो, ही अक्कल कम्युनिस्टांच्या आधी वसाहतवाद्यांना आली होती. ऑरवेल या सपाटीकरणाविरुद्ध होता. त्यानं भारतीय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम केले जरूर, पण यामुळे ते त्यांच्या परंपरांकडे प्रदुषित नजरेनं बघतील, याची त्याला जाणीव होती. हातात बंदूक घेतलेले, वाघाच्या छाताडावर पाय रोवून उभे असलेले ब्रिटिश तो नेहमी फोटोंत बघायचा. आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा अजून एक मार्ग होता तो. हा वाघ कधीतरी गुरुगुरत उठून उभा राहिलेला मला बघायचा आहे, असं त्यानं लिहून ठेवलं होतं. म्हणूनच नंतर त्याचा बर्लिन रेडिओवरून भाषणं देणार्या भारतीयांवरचा राग निवळला. आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं म्हणून धडपडण्याचा हक्क त्यांनाही आहे, हे त्यानं मान्य केलं. युद्ध संपतासंपता ऑरवेल बीबीसीतून बाहेर पडला. कारणं बरीच होती. काही महिन्यांतच त्यानं अॅनिमल फार्म पूर्ण केलं आणि नंतर आलं नाइन्टीन एटीफोर. या दोन्ही कादंबर्यांमध्ये त्यानं बीबीसीत अनुभवलेल्या वसाहतवादी मनोवृत्ती, सपाटीकरण, सेन्सॉरशिप आहेत.
बीबीसीतून ऑरवेल बाहेर पडल्यावर मुल्क राज आनंदही भारतात परतले. त्यांनी लेखक आणि समीक्षक म्हणून जगभरात नाव कमावलं. साहनी दांपत्य अगोदरच भारतात परतलं होतं. दमयंती साहनी अकाली वारल्या, पण बलराज साहनी आजही भारतातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. झियाउद्दीन बुखारीही भारतात परतले आणि फाळणीनंतर पाकिस्तान रेडिओचे प्रमुख बनले. युद्ध संपल्यानंतर वेणूताईंनीही मग नोकरी सोडली. विजयालक्ष्मी पंडितांशी त्यांची लंडनमध्ये मैत्री झाली होती. त्यांच्याबरोबर त्या कृष्ण मेनन यांच्या इंडिया लीगमध्ये सामील झाल्या. त्यांच्याबरोबर निवडणूक दौर्यांमध्ये फिरल्या. तीन वर्षं त्यांनी पुन्हा जीव झोकून काम केलं आणि १९४९ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर त्या भारतात परतल्या.
भारतात परतण्यापूर्वी वेणूताईंनी एक कादंबरी लिहायला घेतली होती. 'इन ट्रान्झिट' हे या कादंबरीचं नाव. एकोणिसाव्या शतकाची सुरुवात ही भारताच्या दृष्टीनं फार महत्त्वाची होती. भारतासाठी संक्रमणाचा काळ होता तो. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची योग्य ती सांगड घालणं, हे एक मोठं आव्हान निर्माण झालं होतं. घटना फार वेगानं घडत होत्या. टिळकांचं नेतृत्व गांधींच्या हाती आलं होतं. देशातल्या या बदलांचे पडसाद अनेक कुटुंबांतही अर्थातच उमटले. पुण्यातल्या अशाच एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबाची कहाणी म्हणजे ’इन ट्रान्झिट’. १९१५ - १९३० हा या कादंबरीतल्या कथानकाचा काळ. पुण्यातल्या त्या वाड्यात तीन पिढ्या एकत्र नांदत आहेत. कुटुंब एकजिनसी अर्थातच नाही. प्रतिगामित्व विरुद्ध पुरोगामित्व हा लढा या कुटुंबातही आहे. पण या कुटुंबाचं पुरोगामित्व मात्र लखलखीत आहे. वहिनीच्या लग्नातल्या पंगतीत तिच्या विधवा आत्याबाई तिच्या शेजारी बसतात. या लग्नाला पंडिता रमाबाई हजेरी लावणार असतात. खरं म्हणजे रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणवर्ग त्यांच्यावर खवळून आहे. पण आबांनी त्यांना आदरपूर्वक लग्नाला बोलावलेलं असतं. देशाच्या राजकारणाशी समांतर असा या कुटुंबाचा प्रवास आहे. हे अविभक्त कुटुंब फुटण्यावेळी टिळकांची होमरूल चळवळ जोरात असते आणि त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी लखनऊ करार केला असतो. रौलट अॅक्ट, जालियनवाला बाग हत्याकांड, टिळकांचा मृत्यू, नागपूर काँग्रेस, गांधींच्या हाती आलेलं देशाचं नेतृत्व, मिठाचा सत्याग्रह, गांधींची उपोषणं, मंदिरांमधला हरिजनप्रवेश आणि शेवटी फैजपूर काँग्रेस असे टप्पे या कादंबरीत येतात. कुटुंबाची वाटचालही वादळीच ठरते. वाटणी होते. आबांच्या हातातली सत्ता त्यांच्या प्रतिगामी भावाकडे जाते. घरातले तरुण स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतात. मवाळपक्षाची बाजू घ्यावी की जहाल होऊन शस्त्र हाती घ्यावं, हा प्रश्न समोर ठाकतो. आबा, जहागीरदार, चंदुआत्या, दादा, वहिनी, रामकृष्ण, बालबबन, माधव आणि मोहना आपापल्या कुवतीनुसार देशासमोरच्या आणि कुटुंबासमोरच्या समस्यांतून मार्ग काढतात. माधव, मोहना, दादा आणि वहिनी ही पात्रं आपल्या आणि देशाच्या भूतकाळाकडे स्वच्छ नजरेनं बघतात. त्यामुळे त्यांना भविष्याकडे अधिक स्पष्टपणे बघता येतं. मोहनाचे विचर तर फार स्पष्ट आहेत. एका बहुसांस्कृतिक वातावरणात ती पटकन रुळते. युरोपीय संस्कृतीशी ती कुठलेही ग्रह न बाळगता परिचय करून घेते. जात, धर्म, वंश, वर्ण यांतले भेद तिला कळले तरी ती ते मानत नाही. तिला माणूसपण महत्त्वाचं वाटतं. देशाच्या राजकारणाविषयी, नेत्यांविषयी मतं बनवताना क्वचित ती गोंधळते, पण सारासार विचार करून तिच्यापुरते योग्य असलेले निष्कर्षही ती काढते. ही मतं चुकली तरी ती तसं मान्य करते. सभोवतालच्या संत्रस्त वातावरणात म्हणूनच ती तग धरून उभी राहते.
वेणूताईंची जबरदस्त समज, त्यांच्या बुद्धिमत्तेचा अफाट आवाका आणि त्यांचं सुरेख इंग्रजी यांमुळे इन ट्रान्झिट वाचणं हा एक विलक्षण अनुभव ठरतो. कमालीच्या पुरोगामी विचारानं ही कादंबरी कागदावर उतरलेली दिसते. पात्रांची, प्रसंगांची वर्णनं ओघवती आहेतच, पण वेणूताईंचं राजकीय आणि सामाजिक भान, घटनांचा त्यांनी लावलेला अन्वयार्थ चकित करून जातात. या कादंबरीला बॅरिस्टर जयकरांची प्रस्तावना लाभली. मुल्क राज आनंद यांनीही आपल्या मैत्रिणीच्या पहिल्या कादंबरीसाठी आवर्जून लिहिलं. १९५० साली ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा वेणू चितळे लीला खरे झाल्या होत्या.
एका मोठ्या कंपनीत अधिकारी असलेल्या श्री. गणेश खरे यांच्याशी वेणूताईंचा विवाह झाला. एक मुलगी आणि एक मुलगा यांना जन्म देऊन श्री. खरे यांची पहिली पत्नी निवर्तली होती. वेणूताईंनी या दोन्ही मुलांना आपलंसं केलं. त्यांच्यावर स्वतःच्या मुलीइतकंच प्रेम केलं. आपल्या सुखी संसारात त्या रमल्या असल्या, तरी लीला खर्यांमध्ये वेणू चितळे मात्र लुप्त झाल्या. सार्वजनिक जीवनातून जणू त्या अदृश्यच झाल्या. एकेकाळी त्यांच्या आवाजानं जग गाजवलं होतं. सरोजिनी नायडू त्यांना कोकिळकंठी म्हणाल्या होत्या. आता मात्र त्यांचा हा आवाज कुठे ऐकू येईनासा झाला. नाही म्हणायला मुंबई आकाशवाणीनं आयोजित केलेल्या एका श्रुतिकास्पर्धेत त्यांनी दादरच्या वनिता समाजासाठी एक श्रुतिका बसवली. या स्पर्धेत त्यांच्या श्रुतिकेला पहिलं बक्षीस मिळालं. परीक्षक होते आचार्य अत्रे. त्यांना वेणूताईंचं कर्तृत्व ठाऊक होतं. 'तुम्ही नवयुगसाठी स्तंभलेखन करा', असा अत्र्यांनी आग्रह धरला आणि वेणूताईंनी काही लेख लिहिले. स्वैराचार करू नका, पाश्चात्त्य संस्कृती वाईट, घरसंसार महत्त्वाचा, अशा आशयाचे हे लेख आहेत.
आपल्या पतींच्या आणि मुल्क राज आनंद यांच्या आग्रहावरून पुढे त्यांनी दुसरी कादंबरी लिहिली - 'इन्कॉग्निटो'. ही कादंबरी त्यांनी मुल्क राज आनंद आणि त्यांच्या पत्नी सरीन आनंद यांना अर्पण केली आहे. या अर्पणपत्रिकेचा मजकूर आपल्याला आपल्या दिवंगत पतीनं सुचवला, असंही तीत लिहिलं आहे. कादंबरीलेखिकेचं नाव वीनू असं छापलं आहे. मुल्क राज आनंद वेणूताईंनी वीनू या नावानं हाक मारत. ही कादंबरी प्रकाशकाकरवी छापायची नाही आणि ती बाजारात विकायची नाही, अशी वेणूताईंची अट होती. त्यानुसार ही कादंबरी बाजारात उपलब्ध नाही. शेषा ही या कादंबरीची नायिका. आपल्या मिशनरी शिक्षिकेबरोबर ती ब्रिटनला माँटेसरीशिक्षिकेचं प्रशिक्षण घ्यायला निघते. फ्रान्स, इटली या देशांमध्ये फिरते. तिथली संस्कृती अभ्यासते. ब्रिटनमध्ये शिकताना आणि युरोपच्या सफरीत ती नवनवे मित्रमैत्रिणी तयार करते. प्रेमात पडते, लग्न करते. बीबीसीचे कार्यक्रम ऐकते, रेडिओवरच्या दमयंती साहनी, मुल्क रा्ज आनंद यांच्याबद्दल, रेडिओवर काम करत असताना ब्रिटिशांना आपण मदत करत आहोत, या त्यांच्या अपराधीभावनेचा ती उल्लेख करते. आपण उत्तम वकील होऊ शकलो असतो, त्या ऐवजी योग्यता असूनही शिक्षिका व्हावं लागलं, ही खंत ती मनात बाळगते. लग्न न करता एकत्र फिरणार्या स्त्रीपुरुषांना बघून ती अस्वस्थ होते. भारतीय संस्कृती आणि युरोपीय संस्कृती यांची ती सतत तुलना करते. युरोपातली चौकसबुद्धी, इतिहास जतन करण्याची आस, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रांतली धर्मनिरपेक्षता यांमुळे ती प्रभावित होते. पण तरीही या सगळ्यांपेक्षा भारतीय संस्कार तिला वरचढ वाटत राहतात. कादंबरीच्या शेवटी शशांक हा तिचा पती तिला ’तू भारतीय आहेस, आणि भारतीयच राहिलीस, हे किती छान’ असं तिला ऐकवतो, तेव्हा ती सुखावते.
आपले भारतीय संस्कार, गृहिणीपण वेणूताईंना इतके महत्त्वाचे का वाटले असावेत? एकेकाळी अनेक दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. सर्वत्र बॉम्बस्फोट होत असताना लंडनच्या रस्त्यांवरून रुग्णवाहिका चालवणार्या कपुरथळ्याच्या इंदिरादेवी, युरोपभर भारतीय स्वातंत्र्यासाठी फिरणार्या विजयालक्ष्मी पंडित त्यांच्या मैत्रिणी होत्या. तरीही भारतीय स्त्रीनं अगोदर संसार उत्तम करावा, हे त्यांना सतत सांगावंस का वाटलं असावं? समुद्रपर्यटनासाठी प्रायश्चित घेणं अजूनही शिष्टसंमत असण्याच्या काळात वेणूताई इंग्लंडला गेल्या. युरोपात एकट्या फिरल्या, तरी भारतीय स्त्रीची खरी जागा घरातच आहे, हे त्यांना मनापासून वाटलं, ते का? विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल असताना वेणूताईंनी त्यांना अनेक भाषणं लिहून दिली. पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीबद्दल सकारात्मक भाष्य करणारी ही भाषणं होती. मग या भाषणांचा अर्थ काय? की अगोदरचे सारे निर्णय निर्णय त्यांना नाइलाजानं घ्यावे लागले होते? त्यांचा खरा जीव संसारातच असावा का? आणि वेणूताईंच्या लेखी भारतीयत्व म्हणजे काय? मोहनाचं भारतीयत्व आणि शेषाचं भारतीयत्व वेगळं कसं? की मुळात ते वेगळं नव्हतंच? जगाकडे खुल्या नजरेनं बघणार्या मोहनाचं घरच्या चौकटीत रमणार्या शेषात रूपांतर नक्की कधी झालं?
या प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. शक्यतांचा विचार करणंही अशावेळी शक्य नसतं. वारुळातून बाहेर येणार्या एका मुंगीपाठोपाठ जशी मुंग्यांची रांग लागते, तशा अनेक शक्यता मग जाणवू लागतात. जिच्या आयुष्यातल्या शक्यता आपण पडताळून पाहत आहोत, त्या व्यक्तीवर हा अन्याय असतो.
अशावेळी प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी, आपल्यासाठीच्या तिच्या ओळखी आपल्या आपण तयार करतो. आपल्यापुरत्या. वेणूताईंबद्दल ऐकताना, वाचताना, लिहिताना, त्यांनी लिहिलेलं वाचताना मला नेहमी खिडकीतून उजेडाची वाट बघणारी मोहना आठवते. विलक्षण बुद्धिमान, संवेदनशील, शांत, निग्रही. प्रेमळ. अंधारातही कायम मार्ग शोधणारी.
[१]. हरदी कहाये रंगाले - मैथिली भाषेतलं पारंपरिक लोकगीत.
[२] - व्यञ्जनैरूपसिक्ते - अष्टाध्यायी
शाकं व्यञ्जनमन्वाहार्यम् - गोभिल गृह्यसूत्र
[३] - सो तेसम् सूप व्यंजन त्थाय - जातककथा
भत्तम् सुचिम् मांसुपसेचनम् - जातककथा
[४] - नानाग्गं रसेहि सूप व्यंजनेहि भत्तपातिम् सज्जेत्वा । - जातककथा
[५] - पिप्पलीमरीचशृङ्गिराजाजिकिराततिक्तगौरसषर्पकुस्तुम्बुरूचोरकदमनकमरुवक शिग्रुकाण्डादि: कटुकवर्ग:। - अर्थशास्त्र
[६] - अन्यस्मिन् प्रवणीभाण्डे भर्जयेद्रामठेन त्वत्|
चातुर्जातकचूर्णं च चूर्णं च मरिचस्यच || - पाकदर्पणम्
[७] - सप्पिदधिकटुकभण्डादीनि। - जातककथा
[८] - तथालवणस्नेहयोश्च गन्धकटुकभाण्डौषधानां च दुर्लभानां भवनेषु प्रच्छन्नं निधानम्। - कामसूत्र
[९] - सिनिद्ध सम्भारयुतं अम्बिलालम्बलम् गोधामांसम् । - जातककथा
[१०] - पाठालोध्रतेजोवत्येलावालुकमधुमधुरसाप्रियङ्गुदारुहरिद्रामरिचपिप्पलीनां च पञ्चकर्षिक: सम्भारयोगो मेदकस्य प्रसन्नायाश्च। - अर्थशास्त्र
द्वादशाढकं पिष्टस्य पञ्चप्रस्था: किण्वस्य पुत्रकत्वक् फलयुक्तो वा जाति सम्भार: प्रसन्नायोग: । - अर्थशास्त्र
[११] - मेषशृङ्गित्वक् क्वाथाभिषुतो गुड प्रतीवाप: पिप्पलीमरिचसम्भारस्त्रिफलायुक्तो वा मैरेय:। - अर्थशास्त्र
[१२] - लेखात दिलेले लीळाचरित्रातले लीळांक हे डॉ. वि. भि. कोलते यांनी संपादन केलेल्या आवृतीतले आहेत. डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या आवृत्तीत हे लीळांक क्वचित वेगळे आहेत.
[१३] - बॉम्बे, मद्रास, कलकत्ता, सिलोन ही तत्कालीन नावं वापरली आहेत.
[१४] - Poem to Curry - William Thackeray - प्रताधिकारमुक्त.
१. चित्र क्र. १ - या चित्रात वापरलेल्या सर्व प्रतिमा प्रताधिकारमुक्त, © चिन्मय दामले.
२. चित्र क्र. २ - वेणू चितळे - छायाचित्रकार अज्ञात, © द ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, लंडन.
३. चित्र क्र. ३ - जॉर्ज ऑरवेल - छायाचित्रकार अज्ञात, © द ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, लंडन.
४. चित्र क्र. ४. - (डावीकडून उजवीकडे, बसलेले) - वेणू चितळे, जे. एम. तंबीमट्टू, टी. एस. इलियट, उना मार्सन, मुल्क राज आनंद, क्रिस्तोफर पेंबर्टन, नारायण मेनन (डावीकडून उजवीकडे, उभे) जॉर्ज ऑरवेल, नॅन्सी बॅरट, विल्यम एम्प्सन, छायाचित्रकार अज्ञात, © द ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, लंडन.
५. चित्र क्र. ५ - © cjatlanta
६. चित्र. क्र. ६ - (डावीकडून) झियाउद्दीन बुखारी आणि वेणू चितळे, (बसलेल्या) कपूरथळ्याच्या राजकुमारी इंदिरादेवी, © द ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, लंडन.
७. चित्र क्र. ७ - द फॉर्म ऑफ क्युरी या हस्तलिखिततालं एक पान, © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
८. चित्र क्र. ८ - © hans.s
९. चित्र क्र. ९ - द फॉर्म ऑफ क्युरी या हस्तलिखिततालं एक पान, © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
१०. चित्र क्र. १० - © Soma.R
११. चित्र क्र. ११ - या चित्रात वापरलेल्या सर्व प्रतिमा प्रताधिकारमुक्त, © चिन्मय दामले.
१२. चित्र क्र. १२ - © Daniel Novoa
१३. चित्र क्र. १३ - © हॅना ग्लासच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ , © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
१४. चित्र क्र. १४ - या चित्रात वापरलेल्या सर्व प्रतिमा प्रताधिकारमुक्त, © चिन्मय दामले.
१५. चित्र क्र. १५ - १७८४ साली ब्रिटनमध्ये वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेली पहिली जाहिरात, © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
१६. चित्र क्र. १६ - सलीम्स् करी पावडरीची एक जाहिरात, © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
१७. चित्र क्र. १७ - या चित्रात वापरलेल्या सर्व प्रतिमा प्रताधिकारमुक्त, © चिन्मय दामले.
१८. चित्र क्र. १८ - © Javier Rodríguez González (minuano12)
१९. चित्र क्र. १९ - छायाचित्रकार अज्ञात, प्रताधिकारमुक्त
२०. चित्र क्र. २० - © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
२१. चित्र क्र. २१ - © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
२२. चित्र क्र. २२ - छायाचित्रकार अज्ञात, प्रताधिकारमुक्त
२३. चित्र क्र. २३ - मद्रास करी पावडरीचा डबा, © Mataura & Districts Historical Society, New Zealand
२४. चित्र क्र. २४ - वेंकतचलम् कुटुंबाच्या खाजगी संग्रहातून, प्रताधिकारमुक्त
२५. चित्र क्र. २५ - या चित्रात वापरलेल्या सर्व प्रतिमा प्रताधिकारमुक्त, © चिन्मय दामले.
२६. चित्र क्र. २६ - © madlyinlovewithlife
२७. चित्र क्र. २७ - छायाचित्रकार अज्ञात, प्रताधिकारमुक्त
२८. चित्र क्र. २८ - © संतोष कुमार
२९. चित्र क्र. २९ - © नदीम (कराची)
३०. चित्र क्र. ३० - © संतोष कुमार
३१. चित्र क्र. ३१ - रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम् - छायाचित्रकार - निकलस अॅण्ड कंपनी, १८८४, © द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन.
३२. चित्र क्र. ३२ - सरस्वती महाल ग्रंथालय, © महाराज सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर
३३. चित्र क्र. ३३ - © jultchik
३४. चित्र क्र. ३४ - पहिला शहाजी, तैलचित्र, © महाराज सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर
३५. चित्र क्र. ३५ - दुसरे सरफोजी महाराज, तैलचित्र, © महाराज सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर
३६. चित्र क्र. ३६ - © flipr.uno (oliver)
३७. चित्र क्र. ३७ - © kokuhen
३८. चित्र क्र. ३८ - © madlyinlovewithlife
३९. चित्र क्र. ३९ - © Elena Alioshina
४०. चित्र क्र. ४० - © Rebecca Snodgrass
१. A Comparative Dictionary of the Indo-Aryan Languages - R. L. Turner, Oxford University press, London, 1962.
२. Kittel's Kannaḍa-English Dictionary (in 4 volumes) - (Revised and enlarged) by Prof. M. Mariappa Bhat, University of Madras, 1977.
३. A Dravidian Etymological Dictionary - T. Burrow & M. B. Emeneau, Oxford at the Claredon Press, 1961.
४. The Pali text Society's Pali-English Dictionary - Ed. by T. W. Rhys Davids & William Stede, The Pali Text Society, Chipstead, Surrey, 1921.
५. Molesworth's Marathi-English Dictionary (Corrected Reprint), Shubhada-Saraswat, Pune, 1991.
६. A Dictionary of Old Marathi - S. G. Tulpule & Anne Feldhaus, Popular Prakashan, Mumbai, 1991.
७. A Sanskrit- English Dictionary (Etymologically and Philologically Arranged with special reference to Cognate Indo-European Languages) - Sir Monier Monier-Williams with the collaboration of Prof. E. Leumann, Prof. C. Cappeller and other scholars, Oxford at the Claredon Press, 1956.
८. A Comprehensive Persian-English Dictionary including the Arabic words and phrases to be met with in Persian Literature - F. Steingass, Sampson Low, Marston & Company Ltd., London, 1921.
९. New Persian-English dictionary, complete and modern, designed to give the English meanings of over 50,000 words, terms, idioms, and proverbs in the Persian language, as well as the transliteration of the words in English characters; Together with a sufficient treatment of all the grammatical features of the Persian Language - Hayyim, Sulayman, Teheran, Librairie-imprimerie Beroukhim, 1934 -1936.
१०. Prin. Vaman Shivaram Apte's The Practical Sanskrit-English Dictionary (Parts 1-3), Edited by P. K. Gode & C. G. Karve, Prasad Prakashan, Poona, 1959.
११. A Telugu-English dictionary. New ed., thoroughly rev. and brought up to date - Charles Philip Brown, Promoting Christian Knowledge, Madras, 1903.
१२. Tamil Lexicon (Volumes 1-4, in several parts), Published under the authority of the University of Madras, Madras, 1928.
१३. नेपाली शब्द-कोश - सम्पादक - बाल चन्द्र शर्मा, रायल नेपाल एकेडेमी, काटमाण्डू, विक्रमाब्द २०१९.
१४. प्राकृत - हिन्दी शब्दकोश - डॉ. उदयचन्द्र जैन, न्यू भारतीय बुक कॉर्पोरेशन, नई दिल्ली, २००५.
१५. फार्शी - मराठी कोश - प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन, भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-स्वीय-ग्रंथमाला-क्रमांक २९, पुणे, १९२५.
१६. शब्दकल्पद्रुमः - स्यार-राजा-राधाकान्तदेव-बाहादुरेण-विरचितः, मोतीलाल बनारसीदास, वाराणसी, १९११.
१७. आयुर्वेदिय महाकोश अर्थात् आयुर्वेदिय शब्दकोश (संस्कृत-संस्कृत-मराठी) - संपादक व भाषांतरकार - आयुर्वेदाचार्य वेणीमाधवशास्त्री जोशी व आयुर्वेदविशारद नारायण हरी जोशी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, १९६८.
१८. यजुर्वेद-पदार्थ-कोष - प्रो. ज्ञान प्रकाश शास्त्री, परिमल पब्लिकेशन्स, दिल्ली, २००९.
१९. गुजराती-मराठी शब्दकोश - संपादक - श्री. स. ज. धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, १९६७.
२०. कन्नड - मराठी शब्दकोश - संपा. श्री. पुंडलीकजी कातगडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, १९६९.
२१. मराठी भाषेचा तंजावरी कोश - संपा. शं. गो. तुळपुळे, व्हीनस प्रकाशन, पुणे, १९७३.
२२. राज्यव्यवहारकोश - हा मूळकोश रघुनाथाध्वरी पंडित यानें केला. तो काशीनाथ गंगाधरजी क्षत्री यांणीं लोकोपयोगार्थ शुद्ध करवून प्रसिद्ध केला, मुंबई, १८६०.
२३. तमीळ - मराठी शब्दकोश - संपा. सौ. रमाबाई जोशी व श्री. पु. दि. जोशी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, १९७६.
१. Raghunatha Nayakabhyudayamu and Raghunathabhyudayamu - Vijaya Raghava Nayaka, T.S.M.Series No.32, T.M.S.S.M.L, Thanjavur, 1951.
२. म्हाईंभट-संकलित श्रीगोविंदप्रभुचरित्र - संपा. विष्णु भिकाजी कोलते, द्वितीय आवृत्ती, अरुण प्रकाशन, १९६०.
३. श्रीसर्वज्ञ चक्रधरनिरुपित दृष्टांत-पथ - संपा. नीळकंठ बळवंत भवाळकर आणि हरी नारायण नेने, नागपूर, १९३७.
४. लीळाचरित्र (पूर्वार्ध भाग १ व २, उत्तरार्ध भाग १ व २) - संपा. शं. गो. तुळपुळे, सुविचार प्रकाशन मंडळ, नागपूर, १९६६.
५. लीळाचरित्र - संपा. डॉ. वि. भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, १९७८.
६. चक्रपाणि (आद्य मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी) - डॉ. रा. चिं. ढेरे, विश्वकर्मा साहित्यालय, १९७७.
७. Sacred Books of the Buddhists (Vols. 1, 2 & 3) - Translated by various oriental scholars and edited by F. Max Müller, Luzac & Company Ltd., London, 1969.
८. Dialogue of the Buddha - Translated from The Pali of the Dîgha Nikâya by T. W. & C. A. F. Rhys Davids, Published for the Pali Text Society by Luzac & Company Ltd., London, 1966.
९. Vinaya Texts, Translated from Pali by T. W. Rhys Davids & Hermann Oldenberg, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1982.
१०. Nancy Lake, Menus Made Easy, or, How to Order Dinner and Give the Dishes
Their French Names, Melbourne: E.W. Cole. 1939
११. [काव्येतिहास - संग्रह] [३१] ऐतिहासिक पत्रं यादी वगैरे - हे [५०१] लेख अर्थद्योतक व इतर माहितीच्या टीपांसह काशिनाथ नारायण साने यांनीं प्रकाशित केले.
१२. पाकदर्पणम् - महाराजनलविरचितम्, वाराणसीस्थराजकीयसंस्कृतपाठशालीयन्यायशास्त्राध्यपकेनन्यायाचार्यपण्डितश्रीवामाचरणभट्टाचार्येणसंशोधितम्, The KÂŜÎ Sanskrit Series, Messrs. Hari Das Gupta & Sons, Benares, 1915.
१३. The Jâtaka or stories of the Buddha's Former Births, Translated from Pâli by various hands under the editorship of Professor E. B. Covell (Vol 1-3), Munshiram Manoharlal Pub. Pvt. Ltd, 1990.
१४. The Recipe Reader - Narratvies, Contexts, Traditions - Edited by Janet Floyd and Laurel Forster, Ashgate Publishing Limited, Hants, 2003.
१५. Dislocating Cultures - Identities, Traditions and Third-World Feminism - Uma Narayan, Routledge, New York, 1997.
१६. कविवर्य मुक्तेश्वर : चरित्र आणि काव्यविवेचन - लेखक व प्रकाशक - लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, पुणे, १९२२.
१७. महाराष्ट्रकविवर्यमुक्तेश्वरकृत महाभारत : सभापर्व - संपा. वामन दाजी ओक, प्रकाशक - पांडुरंग जावजी (निर्णयसागर प्रेस), मुंबई, १८९०.
१८. महाराष्ट्रकविवर्यमुक्तेश्वरकृत महाभारत : विराटपर्व - संपा. तुकाराम जावजी, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १८९९.
१९. मराठ्यांच्या इतिहासाची साधने (शिवकाल) - खंड पहिला (मूळ खंड आठवा) - संशोधक - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, संपा. डॉ. प्र. न. देशपांडे, इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे, २००२.
२०. मिलिन्दपञ्हपालि (मिलिन्द-भिक्षुनागसेनसंवाद) - सम्पादक - स्वामी द्वारिकादासशास्त्री, बौद्धभारती, वाराणसी, १९७९.
२१. मिलिन्दपञ्हो - संपा. आर. डी. वाडेकर, मुंबई विद्यापीठ, मुंबई, १९४०.
२२. केशवाचार्यादिकृत महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर - संपादन व प्रस्तावना - वि. का. राजवाडे, प्रकाशक - शंकर नरहर जोशी, चित्रशाळा प्रेस, पुणे, १९१५.
२३. मराठी बखरींतील फार्सीचे स्वरूप - डॉ. यू. म. पठाण, मराठवाडा विद्यापीठ प्रकाशन, औरंगाबाद, १९७३.
२४. सातारकर महाराज व त्यांचे पेशवे ह्यांच्या रोजनिशींतील उतारे - माधवराव बल्लाळ ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (भाग १ व २) - संपादन कै. रावबहादूर गणेश चिमणाजी वाड, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन् सोसायटी, पुणे, १९११.
२५. सातारकर महाराज व त्यांचे पेशवे ह्यांच्या रोजनिशींतील उतारे - बाळाजी बाजीराव पेशवा (भाग १ व २) - संपादन कै. रावबहादूर गणेश चिमणाजी वाड, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन् सोसायटी, पुणे, १९०६.
२६. पेशवे दप्तरांतून निवडलेले कागद - खंड ४३ - पेशवे : सामाजिक व धार्मिक - संपादन गो. स. सरदेसाई, गव्हर्नमेण्ट सेंट्रल प्रेस, मुंबई, १९३४.
२७. पेशवे दप्तरांतून निवडलेले कागद - खंड ३२ - उत्तरकालीन पेशवे - संपादन गो. स. सरदेसाई, गव्हर्नमेण्ट सेंट्रल प्रेस, मुंबई, १९३०.
२८. पेशवे दप्तरांतून निवडलेले कागद - खंड ९ - बाजीराव (कौटुंबिक) - संपादन गो. स. सरदेसाई, गव्हर्नमेण्ट सेंट्रल प्रेस, मुंबई, १९२४.
२९. A Topographical List of Inscriptions in Tamil Nadu and Kerala States (Volumes I & II) - T. V. Mahalingam, Indian Council of Historical Research, New Delhi and S. Chand & Company, New Delhi, 1988.
३०. South Indian Inscriptions (Vol. IV) : Miscellaneous Inscriptions from Tamil, Telugu and Kannada Countries & Ceylon, Edited by Rao Bahadur H. Krishna Sastri, Archaeological Survey of India, 1923.
३१. पाकविलास - नृप जयदेवात्मज श्रीपञ्चमसिंह कृपापात्र श्रीसाहुनिर्मित, खेमराज कृष्णराव, बंबई, शके १८४१.
३२. South Indian Shrines: Illustrated - P. V. Jagadisa Ayyar, Asian Educational Services, 1982.
३३. A New System Of Domestic Cookery Formed Upon Principles Of Economy, And Adapted To The Use Of Private Families – A Lady, Benjamin C. Buzby, Philadelphia, 1808.
३४. 'Shawls, Jewelry, Curry And Rice in Victorian Britain' (Western Women and Imperialism: Complicity and Resistance) - Nupur Chaudhuri and M. Strobel, Bloomington: Indiana University Press, 1992.
३५. Modern Cookery for Private Families - Eliza Acton, Longman, London, 1865.
३६. The Wife's Help to Indian Cookery, W. H. Dawe, Elliot Stock, London, 1888.
३७. A Complete Collection of Cookery Receipts - Susanna Kellet, Newcastle-upon-Tyne: T. Saint, 1780.
३८. The birth of the modern diet - Rachel Lauden, Scientific American, August 2000.
३९. Feeding the Imperial Appetite: Imperial Knowledge and Anglo-Indian
Domesticity - Mary Procida, Journal of Women’s History, 15/2, Summer 2003.
४०. The Nabobs: A Study of the Social Life of the English in Eighteenth Century
India - Percival Spear, Oxford University Press, London, 1963.
४१. European Women and the Second British Empire - Margaret Strobel, Indiana University Press, Bloomington, 1991.
४२. Domesticating Imperialism: Curry and Cookbooks in Victorian England - Susan Zlotnick, Frontiers: A Journal of Women Studies,16/2/3, Gender, Nations, and Nationalisms, 1996.
४३. The Book of Household Management - Isabella Beeton, Ward, Locke, and Tyler, London, circa 1860’s.
४४. Dinners and Diners - Lieut.-Col. Newnham-Davis, London, 1899.
४५. The Art of Cookery made Plain and Easy - Hannah Glasse, Prospect Books, London, 1983.
४६. Antiquitates Culinariæ or Curious Tracts relating to the Culinary affairs of the Old English - Richard Warner, Prospect Books, London,1982.
४७. The British Housewife: Cookery Books, Cooking and Society in Eighteenth-Century Britain - Gilly Lehmann, Prospect Books, London, 2003.
४८. Curye on Inglysch: English Culinary Manuscripts of the Fourteenth Century (Including the Forme of Cury) - Constance B Hieatt and Sharon Butler, Oxford University Press, London, 1985.
४९. Raj: The Making and Unmaking of British India - Lawrence James, St. Martin’s Green, New York, 1997.
५०. Oriental Memoirs: Selected from a Series of Familiar Letters Written During Seventeen Years Residence in India, vol.1 - James Forbes, Gian Publishing House, Delhi, 1988.
५१. अभीलषितार्थचिन्तामणि (राजा मानसोल्लास) - Ed. Shri. G. K. Shrigondekar, Gaekwad's Oriental Series, Oriental Research Institue, Baroda, 1945.
५२. मानसोल्लास - Ed. Vidwan Dr. G. K. D. Sastry, Oriental Research Institute, Mysore, 1935.
५३. Paka Sastra - Kandhi Subhas Rao, University of Mysore (archives), 1890.
५४. Bhojanakutuhala of Raghunath Pandit, Ed. Dr. K. S. Mahadev Sastry, University MSS Library, Trivandrum, 1935.
५५. The Nimatnama Manuscripts of the Sultans of Mandu : The Sultan's book of delights - Trans. Norah Titley, Routledge Curzon, London, 2005.
५६. Annals of the Caliphs' Kitchens: Ibn Sayyar al-Warraq's Tenth-century Baghdadi Cookbook - Trans. Nawal Nasrallah , Brill, 2007.
५७. Â -in- I Akbarî by Abû L - Fazl Âllâmi - Translated from the original Persian by H. Blochmann (Calcutta Madrasa), Royal Asiatic Society of Bengal, Calcutta, 1939.
५८. Curries and How to Prepare Them. Recipes by Some of the Most Eminent
Chefs de Cuisine, Including E. Francatelli and C. H. Senn - Joseph Edmunds, Food and Cookery Publishing Agency, London, 1903.
५९. The Art of Cookery Made Plain and Easy; which far exceeds any thing of the kind
ever yet published - Hannah Glasse, 3rd edn., printed for the author, London, 1748.
६०. Wyvern’s Indian Cookery Book, being a new and revised edition of Culinary Jottings for Madras. A Treatise on Reformed Cookery for Anglo-Indians, both in India and the Colonies, based on Modern English and Continental Principles, with Menus for Little Dinners worked out in Detail - Colonel Arthur Robert Kenny-Herbert, Higginbotham & Co., Madras, 1904.
६१. A Narrative of the Life of Sarah Shade, Born at Stoke Edith, in the County of Hereford. Containing many well authenticated and curious Facts, more particularly during her Voyage to the East Indies, in the Devonshire Indiaman, In the Year 1769; and in traversing that
country in company with The Army at the sieges of Pondicherry, Vellore, Negapatam, &c, &c,
together with some Extraordinary Accounts of the Ferocity of Tigers, Jackals, Piah Dogs,
Vultures &c. Taken down by Some Gentlemen, And published for her Benefit - Sarah Shade, J. Hatchard, London, 1801.
६२. Indian Cookery; or Fish Curries; Their Excellent Qualities, Easy and Speedy Preparation; with Selim’s Curry Paste - Captain W. White, Sherwood, Gilbert, & Piper, London, 1845.
६३. The British at Table 1940–1980 - Christopher Driver, Chatto & Windus, London, 1983.
६४. Spices in the medieval diet: a new approach - Bruno Laurioux, Food and Foodways, 1, 1, 1985, 43–75.
६५. Modern Cookery, in all its branches: reduced to a system of easy practice, for the use
of private families. In a series of practical recipes, which have been strictly tested and are given with the most minute exactness - Eliza Acton, Longman, Brown, Green & Longman, London, 1845.
६६. Anglo-Indian Cookery at Home: A Short Treatise for Returned Exiles - H.A. Hervey, Horace Cox, London, 1895.
६७. An Anglo-Indian and Oriental Cookery - G. Johnson, W.H. Allen & Co. Ltd., London, 1893.
६८. Indian Domestic Economy and Receipt Book - R. Riddell, Gentleman’s Gazette
Press, Bombay, 1849.
६९. The Curry Cook’s Assistant, or Curries, How to Make Them in England in Their Original Style - D. Santiagoe, Kegan Paul, Trench & Co., London, 1889.
७०. Origin and spread of the Tamils - V. R. R. Dikshitar, The Adyar Library, Madras, 1947.
७१. India as known to Pāṇini: a study of the cultural material in the Ashṭādhyāyī - Vasudeva Sharana Agrawala, University of Lucknow, Lucknow,1953.
७२. Kautilya's Arthaśāstra - Translated by R. Shamasastry, University of Mysore, Mysore, 1919.
७३. Talking to India - E. M. Forster, Ritchie Calder, Cedric Dover, Hsiao Ch'ien and Other, A Selection of English language Broadcasts to India, Edited with an Introduction by George Orwell, George Allen & Unwin Ltd., London, 1943.
७४. Orwell : The War Broadcasts - Edited with an Introduction by W. J. West, Duckworth / British Broadcasting Corporation, London, 1985.
भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे, ब्रिटिश लायब्ररी, पुणे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी.
श्रीमती ट्रीश हेज (बीबीसी रिटन आर्काइव्हज् सेंटर, रीडिंग, ग्रेट ब्रिटन), डॉ. शोम्पा लाहिडी (सेंटर फॉर द स्टडी ऑफ मायग्रेशन, क्वीन मेरी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन), सॅण्ड्रा पॉलेट (ब्रिटिश लायब्ररी, लंडन), डॉ. रामालिंगम् (विभागप्रमुख, तमीळभाषा, मद्रास विद्यापीठ, चेन्नई), श्री. व्यंकटेश्वर सबनयागम्, श्री. गजानन मेहेंदळे, डॉ. अरुणा ढेरे, प्रा. एम. आर. जोशी, श्री. श्री. बा. जोशी, डॉ. यू. म. पठाण, श्री. व्ही. सेल्वाकुमार (तमीळ विद्यापीठ, तंजावर), श्रीमती ज्योत्स्ना दामले, श्री. अरविंद व्यं. गोखले, श्री. केकी पूंजियाजी, श्रीमती आवान पल्लोद, श्री. जोवनेश्वर वेंकटचलम्, वरदा खळदकर
या लेखासाठी चित्रं उपलब्ध करून दिल्याबद्दल द ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, लंडन, द ब्रिटिश लायब्ररी बोर्ड, लंडन, महाराज सरफोजी सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर, Mataura & Districts Historical Society, New Zealand, cjatlanta, hans.s, Soma.R, Daniel Novoa, avier Rodríguez González (minuano12), madlyinlovewithlife, संतोष कुमार, नदीम (कराची), jultchik, flipr.uno (oliver), kokuhen, Elena Alioshina आणि Rebecca Snodgrass यांचे मनःपूर्वक आभार.
मस्त. अजुन पुर्ण वाचायचा
मस्त. अजुन पुर्ण वाचायचा आहे..
थक्क झाले वाचून. पदार्थांचा,
थक्क झाले वाचून. पदार्थांचा, संस्कृतींचा हा प्रवास थक्क करणारा आहे आणि त्याबरोबरच तुझा अभ्यास आणि खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देण्याची आवड आणि धडपडही.
सुरेखच! समाजजीवनाच्या पटाची
सुरेखच!
समाजजीवनाच्या पटाची कमालीची गुंतागुंत व उत्क्रांतशीलता खाद्यसंस्कृतीच्या चष्म्यातून पाहताना इतकी बारकाव्यांसकट जाणवते ते केवळ भारावून टाकणारे आहे.
अप्रतिम!!
पुढच्या भागाची आतुरतेने वाट
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहात होते पण अजुन निवांतपणे वाचायला जमलेलं नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देते.
जबरदस्त! शीर्षक आणि लेखकाचं
जबरदस्त! शीर्षक आणि लेखकाचं नाव वाचून उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण करणारं लेखन.
>>> अतिशय साधे असणारे, कुठलंही महागडं साहित्य न लागणारे भारतीय पदार्थ वेणूताईंनी रेडिओवरून शिकवावेत, या मागे एक फार मोठं आणि महत्त्वाचं कारण होतं. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा ब्रिटनमध्ये ६०% अन्नधान्य आयात केलं जात होतं. .... जगभरातले पदार्थ आता असे सुपरमार्केटात मिळू लागले होते. अगदी करीड रॅबिटसुद्धा. त्यामुळे गृहिणींची आणि एक्स्ट्रा स्त्रियांची, म्हणजे अविवाहित स्त्रियांची सोय झाली, तरी स्वयंपाकातलं वैविध नाहीसं झालं. सगळ्यां घरांत सारखेच पदार्थ खाल्ले जाऊ लागले. बटाटे, वाटाणे, सामन, अंडी, लोणी, चीज आणि पालक यांखेरीज इतर काही आपण खाऊ शकतो, ही जाणीवच नष्ट झाली.
नायजेल स्लेटर ह्या प्रसिद्ध ब्रिटिश शेफच्या "टोस्टः द स्टोरी ऑफ अ बॉय'ज् हंगर" ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाची आठवण झाली. उद्धृत केलेल्या परिच्छेदातल्या परिस्थितीची झलक त्या पुस्तकात (किंवा त्यावर बेतलेल्या 'टोस्ट' या चित्रपटात) पहायला मिळते.
>>> मिरी, दालचिनी, केशर, लवंग, वेलदोडा, जिरं, धणे, मोहरी, हिंग, हळद या जिनसांसाठी ऐन-इ-अकबरीत बहारात हा शब्द वापरला आहे. बहार आणणारे ते बहारात.
'बहारात'ची व्युत्पत्ती रोचक आहे. तुर्की भाषेतही मसाल्यांसाठी हा शब्द प्रचलित असल्याचं दिसतं. इस्तंबूलमधल्या मसाले बाजारात घेतलेलं हे छायाचित्रः
>>> या प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. शक्यतांचा विचार करणंही अशावेळी शक्य नसतं. वारुळातून बाहेर येणार्या एका मुंगीपाठोपाठ जशी मुंग्यांची रांग लागते, तशा अनेक शक्यता मग जाणवू लागतात. जिच्या आयुष्यातल्या शक्यता आपण पडताळून पाहत आहोत, त्या व्यक्तीवर हा अन्याय असतो. अशावेळी प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी, आपल्यासाठीच्या तिच्या ओळखी आपल्या आपण तयार करतो. आपल्यापुरत्या.
अगदी नेमकं! बाकी 'इन ट्रान्झिट' मिळवून वाचणे आता भाग आहे. 'इनकॉग्निटो'चं अप्राप्य असणं एका अर्थी कादंबरीच्या नावाला अनुरुप असलं, तरी त्याबद्दल काहीशी हळहळ वाटल्यावाचून राहत नाही.
एक सूचना- यासर्व लेखांचे
एक सूचना- यासर्व लेखांचे इंग्रजीत रुपांतरही तयार ठेवावेस, यांचा वाचकवर्ग खूप मोठा असण्याची फार गरज आहे.>> +१
लेख वाचून झाल्यावर कितीतरी अमराठी नावं आठवली, ज्यांना लेख वाचायला द्यावासा वाटतोय.
तू एवढं लिहुन झाल्यावर, एवढे कष्ट केल्यानंतरही या लेखांचे इंग्रजी भाषांतर नक्की कर सांगावेसे वाटतेय.
फारचं अफाट!
फारचं अफाट!
ब्वा ब्वा!! किती मोठा लेख.
ब्वा ब्वा!!
किती मोठा लेख. माहितीने ओतप्रोत भरलेला. येवढं सगळं तुमास्नी ठावं हाये. बाबा रे.
_/\_
अजून पूर्ण वाचून झालेला
अजून पूर्ण वाचून झालेला नाही.. पण पुस्तकाच्या साठी आणि इंग्रजी भाषांतरासाठी वरच्या सगळ्यांना अनुमोदन..
आगाऊ+१ चिनुक्स, तू महान आहेस,
आगाऊ+१
चिनुक्स, तू महान आहेस, यापलिकडे मी काही बोलू शकत नाही.
तमिळनाडुमध्ये असूनही आणि मराठी राजा असुनही, तंजावुरला तेलगु का बोलली जायची/जाते याबद्दल तुला/इतर कुणाला काही माहीती आहे का? मराठी राजानेही ग्रंथरचना तेलुगुत का केली असेल?
<तमिळनाडुमध्ये असूनही आणि
<तमिळनाडुमध्ये असूनही आणि मराठी राजा असुनही, तंजावुरला तेलगु का बोलली जायची/जाते याबद्दल तुला/इतर कुणाला काही माहीती आहे का? मराठी राजानेही ग्रंथरचना तेलुगुत का केली असेल?>
नायक राजे तेलुगुभाषक होते. म्हणजे हल्लीचे नायडू. भोसल्यांच्या आधी जवळजवळ दोन शतकं तंजावरवर त्यांचं राज्य होतं. त्यांची भाषा तेलुगु म्हणून तंजावरात तेलुगु बोलली जाऊ लागली. भोसल्यांची ग्रंथरचना संस्कृत, तमीळ आणि तेलुगु या तिन्ही भाषांमध्ये आहे. व्यंकोजी आणी दीपांबिका यांच्या काळात तेलुगु आणि संस्कृत यांचं प्राबल्य होतं. मग नंतर तेलुगुचं प्राबल्य कमी होत गेलं. तमीळचा प्रभाव वाढला. दुसर्या सरफोजीनं संस्कृत, तमीळ आणि मराठी या भाषांमध्ये लिखाण केलं. त्यानं बारा मराठी नाटकं लिहिली आहेत. असं असलं तरी भोसल्यांनी स्थानिक संस्कृतीच स्वीकारली.
मसाले-बहारात्-भारत संबंध
मसाले-बहारात्-भारत संबंध पाहून मजा वाटली. तसा तो खरंच आहे का ते माहीत नाही.
नाही. भारताचा काही संबंध
नाही. भारताचा काही संबंध नाही. इंग्रजी स्पेलिंगमुळे तसं वाटतं, इतकंच. बहार हा एकवचनी शब्द आहे. बहारात हा अनेकवचनी. अरबी आणि तुर्की या दोन्ही भाषांत हाच शब्द वापरला जातो. अदवियेह् हासुद्धा अनकेवचनी शब्द आहे.
इतक्या पटकन उत्तर दिल्याबद्दल
इतक्या पटकन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद चिनुक्स.
पूर्ण वाचायचा आहे अजून. पण
पूर्ण वाचायचा आहे अजून.
पण इतके संदर्भ शोधून, पाठपुरावा करून असा अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याबद्दल ___/\___ .
वेणुताई चितळ्यांची माहिती खूपच आवाक करून गेली. संधी मिळाली आणि त्या स्त्रीनं तिचं सोनं केलं.
सर्वप्रथम इतक्या सुंदर,
सर्वप्रथम इतक्या सुंदर, अभ्यासपूर्ण लेखा बद्दल ___/\___
निम्मा वाचलोय. प्रत्येक भागाप्रमाणे हाही जबरदस्तच.
एक सूचना- यासर्व लेखांचे इंग्रजीत रुपांतरही तयार ठेवावेस, यांचा वाचकवर्ग खूप मोठा असण्याची फार गरज आहे.>> +१
चिनुक्स, तू महान आहेस, यापलिकडे मी काही बोलू शकत नाही. >> +१
एवढा अभ्यासपूर्ण लेख वरवर
एवढा अभ्यासपूर्ण लेख वरवर वाचलाय.आधीच्या लेखांप्रमाणेच झकास!
नेहेमीप्रमाणेच थक्क करणारी
नेहेमीप्रमाणेच थक्क करणारी माहीती.. अजुन पूर्ण वाचून नाही झाला. ३ दिवस तरी लागतील! तू कसा काय इतके संदर्भ (७४??) लक्षात ठेऊन लिहीतोस? incredible!!
पुस्तक काढच, मी नक्की घेणार. शिवाय इंग्रजी आवृत्ती पण येऊदे. तीही घेणार.
भले बहाद्दर! सुरेख झालाय
भले बहाद्दर! सुरेख झालाय नेहमीप्रमाणेच!
>>भांगेसाठी लीळाचरित्रात ब्रह्मार्थप्रकाशिका असा फारफार यथार्थ शब्द वापरला आहे.
प्रचंड हसलो
अप्रतिम लेख. घरी गेल्यावर
अप्रतिम लेख. घरी गेल्यावर पूर्ण करीन.
कधी एकदा पूर्ण करतो असा झालय. ओरवेलची पुस्तक शोधून परत वाचण पण must आहे. फाइंडिंग जॉर्ज ऑरवेल इन बर्मा' शोधतो. आता पर्यंतच्या लेखमालेतला सगळ्यात जास्त जमलेला लेख.
अभ्यासपूर्ण लेख.. फार
अभ्यासपूर्ण लेख.. फार आवडला.
संपूर्ण लेख अप्रतिम मराठीत असल्याने फक्त तेवढा मेन्यू शब्द खटकतोय. जमल्यास बदलणार का?
मस्तच!!
मस्तच!!
नुसता स्क्रोल करुन हात दुखले
नुसता स्क्रोल करुन हात दुखले तर लिहिताना आणि माहिती घेताना किती प्रचन्ड श्रम पडले असतील ह्याची कल्पनाच करु शकतो.
निवांतपणे वाचेन.
माहीती "नक्कीच" इंट्रेस्टींग
माहीती "नक्कीच" इंट्रेस्टींग आहे, तरीही खूपच मोठे भाग झालेत(आधी भाग २ वर हिच प्रतिक्रिया द्यायची होती पण दमले म्हणून इथेच एकत्र देतेय).
एखादे पुस्तक असेल तर हळूहळू वाचायला मजा वाटेल.
ह्या भागात मी आपली वेणूताईचे पुढे लग्न झाले की नाही ह्या शोधात वाचला भाग...आता असेल वेणूताईचे लग्न करत करत बघते तर गोष्ट पुढे सांभार चर्चेवर वळली पाहून थांबवले. (नंतर वाचेन उरलेला भाग) पण अजून कुतुहल हेच की वेणुताईंचे लग्न नक्की कधी झाले व कोणाशी?
(त्या काळात पण लोकांना नसेल पडला हा प्रश्ण इतका मला आता सतावतोय....)
झंपी, शेवटचे ५-६ परिच्छेद परत
झंपी, शेवटचे ५-६ परिच्छेद परत एकदा नीट वाचा, त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल
_/\_ महान आहेस !!
_/\_ महान आहेस !!
चिन्मय वाचायला घेतले आहे. खुप
चिन्मय वाचायला घेतले आहे. खुप छान वाटत आहे वाचताना. तुझी लेखनशैली छानच आहे. पूर्ण वाचून झाल्यावर पुन्हा प्रतिक्रिया देते.
आत्ता ओझरता वाचला हा भाग.
आत्ता ओझरता वाचला हा भाग. दमायला झालं.
जबरदस्त चिकाटी आणि अभ्यास दिसतोच आहे.
वेणुताई चितळ्यांबद्दलची माहिती ही विलक्षण वाटली.
चिनुक्स तुम्ही महान आहात . साष्टांग ---^--- .
चिनूक्सा, निव्वळ म हा न!!!
चिनूक्सा, निव्वळ म हा न!!! वर बाकीच्यांनी लिहिले त्याला माझं मम :). हे असे लेख नेटवर टाकू नकोस असं तुला भूषण इनामदारने सांगितले त्यालाही माझं अनुमोदन.
हा लेख लिहिण्यासाठी किती वेळ लागला त्याचबरोबर असा लेख लिहिताना तू नक्की कसा विचार करतोस, विषय निवडल्यावर त्यासंदर्भातील पुस्तके कधी वाचतोस, लेखन करताना कितीदा एडिट करतोस असे प्रश्न मनात आले :). आता " मेकिंग ऑफ अन्नं वै प्राणा: " सुद्धा लिही. नजिकच्या भविष्यकाळात तू लिहिलेली पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जावोत हीच सदिच्छा
नेहमीप्रमाणेच सुरेख!
नेहमीप्रमाणेच सुरेख! माहितीपूर्ण लेख.
Pages