भिन्न' वाचून आम्ही 'सुन्न' झालो असे पुस्तकाच्या नावाशी यमक साधणारे बरेच अभिप्राय मी ऐकलेत. माझ्यापुरते मी म्हणेन की ह्या पुस्तकाने मला संमजस केल. सामाजिक प्रश्नांकडे जाणत्या नजरेनी बघायचं मला भान दिलं. ही प्राप्ती.. ही जाण मला खूप मोठी वाटते. वेश्येकडे पाहताना वाटणारी घृणा आणि भीती, ह्या बायकांना काम करता येत नाही का? त्या कशाला असले काम करतात? इतर लोकांसारखे मजुरी, घरकाम न करता त्या हाच धंदा का पत्करतात? HIV/AIDS बद्दल ह्यांना मुळीच काही माहिती नसते का? हे प्रश्न आता मला पडणार नाहीत. आपण आणि आपली मध्यमवर्गीय सुखदु:ख. छोटया छोटया गैरसोयींवर कुरकुर करायची आपल्याला सवय असते. सगळचं कसं चाकोरीतलं. आपल्या चाकोरी बाहेरही जग आहे आणि आपण त्या जगाचा भाग नाही हे 'भिन्न' वाचताना जाणवलं - तर आहे त्या आयुष्याबद्दल कृतज्ञताही वाटायला लागली आणि ज्यांचं आयुष्य असं नाही त्यांच्याबद्दलची माझी तटस्थताही गळून पडली.
हॉलंडमधील राजधानी शहर जे की कलेसोबत देहविक्रिसाठीही तेवढेच विख्यात आहे तिथे पाहिलेला हा पुतळा..सेक्स वर्कर स्टॅचू!!!
'भिन्न' मधील मुख्य पात्र 'रचिता शिर्के'. कादंबरीमधे, तिला एड्स कसा झाला? तिला ह्या रोगाबद्दल संशय केंव्हा आला? तिने कुठल्या चाचण्या केल्या? आपले रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंअर तिची झालेली मानसिक तडफड. दरम्यान तिच्या आयुष्यातील सुखदु:ख. तिच्या मित्रमैत्रिणीमधील संवाद. एड्समधून जाताना, ह्या रोगाचे निदान करताना तिला आलेले अनुभव ती स्वतःच्या शब्दात सबंध कादंबरीमधे मांडते. नुसते मांडत नाही तर ते प्रभावीपणे मांडून फक्त आपली करुण व्यथा वाचकांना दाखवायची म्हणून नाही तर ह्या रोगाबद्दल आपल्याला एका अभ्यासू नजरेनी बघायला शिकवते. समाजाविषयी एक दुखरी कळ निर्माण करुन आपल्या सामाजिक जाणिवांना चेतवते. रचिता शिर्के हीला एड्स हा गंभीर रोग झाला आणि ती वाचकाना हे सर्व सांगते आहे म्हणून ही कादंबरी महत्त्वाची ठरत नाही. एड्सबद्दल अगदी वरवर माहिती असलेल्यांना एड्सबद्दल आणखी माहिती मिळवून देणे हेही ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणता येणार नाही. ही कादंबरी वाचकाला भिडते ती फक्त रचिता शिर्के कशी जगते ह्याचे यथार्त चित्रण ती करते म्हणून. तिचे खरेखुरे जगणे, तिचे कडूगोड अनुभव वाचताना ती वाचकाला हेलावून सोडते. तिचा स्वभाव, तिचे प्रश्न, तिची होत जाणारी फरफट, तिची घुसमट ह्या सर्वांचे चित्रण करताना वेगाने ही कादंबरी वाचकाच्या मनाचा ताबा घेऊन टप्प्याटप्प्याने पुढे जातो. रचिता शिर्के आणि तिच्या मित्रमैत्रिणी कशा आहेत? तर वरवर त्या शिवराळ आहेत असे वाटेल. पण त्यांच्या आतली सल, त्यांच्या जखमा, त्यांची असहायता त्यांच्या बोलण्यातूनच अधिक स्पष्टपणे आणि ताकदीने त्या आपल्यासमोर पुढे येतात. रचिता शिर्के ही रोज मुंबईच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत लोकल ट्रेननी प्रवास करणारी स्त्रि आहे. व्हीटी ते वसई. वसई ते व्हीटी. असा दोन्हीकडचा -- दगदगीचा -- न झेपणारा -- न पेलवणारा तिचा प्रवास. तो करताना मुंबईच्या लोकलमधील गप्पांचे, मुंबईच्या गतिमान आयुष्याचे चित्रण ती करते. तिचा लोकसंग्रह मध्यमवर्गीय सुशिक्षित असा आहे. नवर्याबद्दल ती अशक्य अशी घृणा बाळगते. तरीही ती त्याच्यासोबत राहून जगते. ती थकते!!! मुंबईच्या वैश्यावस्तीत येऊन आपल्या रोगाची चाचणी करुन घेते. वैश्यावस्तीत येते म्हणून त्या अनुषंगाने तिथले भेदक चित्रणही कांदबरीत येते. आपल्या गप्प ओठावरचे बोट काढून उघडपणे ती सगळे काही बोलत जाते. समाजाची, लोकांची कसलीच तमा ती बाळगत नाही. वैश्यावस्तीत कार्यकर्त्या म्हणून काम करणार्या स्त्रियांची कादंबरीतील पात्र म्हणून ओळख होते. रचिता शिर्के हीचे नष्ट होत जाणारे जग, संपत आलेला आयुष्याचा प्रवास, कुटुंबाची विस्कटलेली घडी, निराशा, हार, जळून खाक करणारी वास्तविकता, नोकरी-व्यवसायाची लागलेली वाट हे सर्व सर्व रचिता शिर्के जगत जगत आपले अनुभव वाचकांपर्यंत मांडते. तिचे हे जगणे 'भिन्न' आहे, डोके 'भिन्न' करणारे आहे!
समाजात देहविक्री करणार्या स्त्रिया आणि एड्स हा वास्तविक विषय अतिशय तरलतेनी पुढे नेत नेत ही कांदबरी पुर्ण होते. विषयच एड्स असल्याने त्यात सेक्सवर आधारीत वर्णने आली. वर्णने आलीत म्हणजे मग त्या विषयाशी निगडीत शब्दही आलेत. "पंढरीच्या वारीच्या दिवसांत कंडोमची मागणी वाढते" - हे असं काही वाचल्यावर कुणाही मराठी वाचकाला धक्कादायक वाटेल. आपल्या अनुभवांच्या कक्षेत एखादी गोष्ट नाही म्हणजे ती नाही असे होत नाही. काही गोष्टी धडधडीतपणे समोर असतात. त्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची आपली हिंमत नसते. काही गोष्टी आपल्या दारा-घरापर्यंत नसल्या तरी त्या समाजात असतात. समाजात एक प्रकारचा विरोधाभास आहे किंवा दुटप्पीपणा आहे. कांदबरी वाचून झाल्यानंतर मला असेही वाटले की 'भिन्न' चा विषय केवळ HIV/AIDS नाही. HIV/AIDS हे तर केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने आमचे नातेसंबंध, प्रेम, लग्न, कुटुंब-व्यवस्था, मुळे अशा गोष्टींकडे वेगवेगळ्या स्तरातील बायका कसे पाहतात, याचे ते दर्शन आहे. कांदबरीच कित्येक भाग वाचताखेपीच आकलन होऊननी परत परत ते उतारे मी वाचलेत. काही काही ठिकाणी पुस्तकाची भाषा शिवराळ होते कारण तो तो भाग यतार्थपणे चितारण्यासाठी त्या त्या शब्दांची निवड करावीच लागते. पण पुस्तकात शिवराळ भाषा आहे आणि सेक्सवर आधारीत वर्णने आहेत म्हणून सजग वाचक होऊन पाहीलं तर ते पुस्तक आक्षेपार्ह वाटत नाही. एखादी बाई जेव्हा पुरूष वापरते तेव्हा तिच्या काय घालमेली असतात, तिच्या काय गरजा असतात, तिची मानसिकता काय असू शकते हे बाईच्या ऍंगलने कधी कुणी लिहिलेले मी अद्याप वाचले नव्हते. कादंबरीतील मुख्य पात्रे रचिता शिर्क, लेनिना, प्रतिक्षा कमल आहेत. जसे जसे आपण पुस्तक वाचत जातो तशी तशी ह्या पात्रांची ओळख होत जाते. पुस्तकाच्या शेवटच्या परिशिष्टात , एड्स् ची भारतासंदर्भातली थोडक्यात माहिती, त्यातल्या समस्यांचे बहुधांगी , जटिल स्वरूप आणि या रोगांनी पीडीत अशा व्यक्तिंकरता काम करणार्या संस्थांची माहितीही दिलेली आहे.
"भिन्न" : मराठी कादंबरी
लेखिका : कविता महाजन
राजहंस प्राकशन
आवृती दुसरी
पृष्ठसंख्या : ४३२
किंमत ३०० रु
ही कादंबरी वाचली तेंव्हा एकदम
ही कादंबरी वाचली तेंव्हा एकदम हादरुन गेले होते.... किती तरी दिवस एकदम अस्वस्थ होते.... कविता महाजन च्या सगळ्याचपुस्तकांंबद्दल हा अनुभव आहे मग भिन्न असो वा "ब्र" नाहीतर "ग्राफिटी वॉल" प्रत्येक पाना गणिक आपण अस्वस्थ व्हायला लागतो.....
चांगलं परिक्षण बी......
मोकिमी, >> कविता महाजन च्या
मोकिमी,
>> कविता महाजन च्या सगळ्याचपुस्तकांंबद्दल हा अनुभव आहे
त्यांचा ब्लॉग देखील अस्वस्थ करणारा आहे. वानगीदाखल हा लेख पहा :
http://bhinn.blogspot.co.uk/2012/07/blog-post_15.html
आ.न.,
-गा.पै.
बी, तुमचं परीक्षण चांगलं जमून
बी, तुमचं परीक्षण चांगलं जमून आलंय!
आ.न.,
-गा.पै.
मी हि कादंबरी वाचली तेव्हा
मी हि कादंबरी वाचली तेव्हा मलापण खूप अस्वस्थता आली होती. मोहन की मीरा यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच हादरले होते मीही. 'ब्र' वाचूनपण असाच अनुभव आला. सर्व जग ढवळून टाकणारा अनुभव होता. हे जग असंही असते हे समजले. 'ग्राफिटी वॉल' अजून वाचले नाही.
खूप उत्तम रीतीने मांडले आहे बी तुम्ही.
बी, छान लिहिलेत. <आपल्या
बी, छान लिहिलेत.
<आपल्या अनुभवांच्या कक्षेत एखादी गोष्ट नाही म्हणजे ती नाही असे होत नाही>
बी, छान लिहिलेत.
बी, छान लिहिलेत.
"....सजग वाचक होऊन पाहीलं तर
"....सजग वाचक होऊन पाहीलं तर ते पुस्तक आक्षेपार्ह वाटत नाही...."
~ वरील लेखातील हे वाक्य खूप काही सांगून जाते 'भिन्न' मधील दाहकतेबद्दल. केवळ सेक्स आणि एडस या दोन विषयांशी ही कादंबरी लिहिण्याचे कविता महाजन यांचे प्रयोजन नसून त्यामुळे त्यानी प्रत्यक्ष जागी जाऊन केलेले सर्व्हेही फार महत्वाचे ठरतात. एका खुल्या मुलाखतीत त्यानी म्हटले होते की "कादंबरीत अनुभवातील केवळ २५% लिखाण मी देऊ शकले आहे, इतकी प्रत्यक्षातील स्थिती वाईट आहे."
"भिन्न" प्रकाशनापूर्वी लेखन पूर्ण झाल्यावर हस्तलिखित त्यानी एका जवळच्या मैत्रिणीस वाचायला दिले होते. वाचून तिने तिची प्रतिक्रिया मोकळेपणानं सांगितली. ती असेही म्हणाली, "एक सांगू का ? हे पुस्तक तू छापायला देऊ नयेस असं मला वाटतं." कविता महाजन तिला म्हणाल्या "का गं ? इतकं वाईट लिहिलं गेलंय का? तसं वाटत असेल तर मी पुनर्लेखन करेन. आपल्याला काही छापायची घाई नाही." यावर मैत्रिण म्हणाली, "त्यामुळे नाही म्हणत मी. ते वाईट आहे असं नाही. पण 'ब्र' मुळे कशी तुझी एक आदर्श इमेज तयार झाली आहे.... ती या 'भिन्न' मुळं बिघडून जाईल याची धास्ती वाटतेय मला." [हा किस्सा "ग्राफिटी वॉल" मध्ये कविता महाजन यानीच वर्णन केला आहे.]
जवळच्या मैत्रिणीचं हे मत तर ते अनोळख्या व्यक्तींकडून कितपत स्वीकारलं जाईल याचीही कल्पना कविता महाजन याना नक्कीच आली असेल, तरीही त्यानी ती जबाबदारी तितक्याच धैर्याने स्वीकारली आणि "बी" यांच्या परिक्षणावरून "भिन्न" चे स्वागत झाल्याचे दिसून येतेच.
अशोक पाटील
Dok bhinn karun sodnar
Dok bhinn karun sodnar vishleshan.... khup yatharth parikshan ... aankhihi pustakanch parikshan tumchyakadun apekshit aahe .. dhanyawad
ही कादंबरी वाचली तेंव्हा एकदम
ही कादंबरी वाचली तेंव्हा एकदम हादरुन गेले होते.... किती तरी दिवस एकदम अस्वस्थ होते.... कविता महाजन च्या सगळ्याचपुस्तकांंबद्दल हा अनुभव आहे मग भिन्न असो वा "ब्र" >>>> मोहन की मीरा, प्रचंड सहमत
'ग्राफिटी वॉल' अजून वाचले नाही अजून काय विषय आहे या पुस्तकाचा ?
बी, अतिशय काळजीपूर्वक आणि
बी, अतिशय काळजीपूर्वक आणि समर्पकच शब्द वापरलेस परीक्षण करताना. फार छान.
बी, >>ही कादंबरी वाचकाला
बी,
>>ही कादंबरी वाचकाला भिडते ती फक्त रचिता शिर्के कशी जगते ह्याचे यथार्थ चित्रण ती करते म्हणून. तिचे खरेखुरे जगणे, तिचे कडूगोड अनुभव वाचताना ती वाचकाला हेलावून सोडते. तिचा स्वभाव, तिचे प्रश्न, तिची होत जाणारी फरफट, तिची घुसमट ह्या सर्वांचे चित्रण करताना वेगाने ही कादंबरी वाचकाच्या मनाचा ताबा घेऊन टप्प्याटप्प्याने पुढे जातो. रचिता शिर्के आणि तिच्या मित्रमैत्रिणी कशा आहेत? तर वरवर त्या शिवराळ आहेत असे वाटेल. पण त्यांच्या आतली सल, त्यांच्या जखमा, त्यांची असहायता त्यांच्या बोलण्यातूनच अधिक स्पष्टपणे आणि ताकदीने त्या आपल्यासमोर पुढे येतात>>>>
अगदी साधे, नेमके अन परिणामकारक लिहिले आहे तुम्ही.कविता महाजनसारख्या लेखिकांनी या प्रांतातला धुक्याचा पडदा हटवला आहे. अशोकजींनी प्रतिसादात दिलेली आठवणही महत्वाची. खरेच नुसते असे लिहिण्याची जोखीम लेखिकांसाठी मोठी आहे.येथे प्रतिमा जोशी यांचा 'जहन्नम' हा कथासंग्रहही आठवला. अत्यंत दाहक कारण कथांच्या माध्यमातून त्या वस्तीतील जीवनाचे वास्तव अलिप्त चित्रण आहे. लेखिकेने हा वसा अगदी निरपेक्षतेने महाविद्यालयीन दिवसांपासून घेतला आहे.
बी, सुंदर परीक्षण. नेमकेपणाने
बी, सुंदर परीक्षण. नेमकेपणाने जाणून समजून लिहिलं आहेस.
भिन्न पहिल्यांदा वाचून संपल्यावर खूप वेगळं आणि विचित्र वाटलं होतं. असं जग अस्तित्त्वात असूच शकत नाही असा एक भाबडा आशावाद होता, नंतर कामानिमित्ताने ते जग बर्याचदा बघितलं. तेव्हा तेव्हा भिन्न मनामधे उलगडत गेली.
लेख आवडलाच. भिन्न वाचली होती,
लेख आवडलाच. भिन्न वाचली होती, संग्रहीही आहे. चिनूक्स यांचा लेख वाचून भिन्न विकत घेऊन आलो होतो. बायकोनेही वाचली. दोघांच्याही मनावर साधारण तसाच परिणाम झाला जसा वर बहुतेकांनी लिहिलेला आहे. बी यांचा हा एक चांगला लेख वाचायला मिळाला.
मात्र - मला भिन्न ही कादंबरी 'आवडली' नाही. प्रभावी आहे, त्या पुस्तकाने करायचा तो प्रभाव केलाच, पण आवडली नाही. का ते खरंच सांगता येत नाही आहे. थोडा अंदाज केला तर असे वाटते की माहितीचे संकलन, कथानक सादरीकरण आणि वातावरण निर्मीती या सर्व बाबी 'सीमलेसली' झालेल्या नसाव्यात, ज्यामुळे वाचताना थोडा रसभंग होतो. चु भु द्या घ्या
तो ब्लॉग मात्र भारी वाटला.
बी, छान लिहिले आहे. >> ही
बी, छान लिहिले आहे.
>> ही कादंबरी वाचली तेंव्हा एकदम हादरुन गेले होते.... किती तरी दिवस एकदम अस्वस्थ होते.... कविता महाजन च्या सगळ्याचपुस्तकांंबद्दल हा अनुभव आहे मग भिन्न असो वा "ब्र" >> मोहन की मीरा यांच्याशी अगदी सहमत. 'ब्र' वाचून अस्वस्थ व्हायला होतंच.
'भिन्न' अजून वाचलेले नाही.
गामा_पैलवान, ब्लॉगची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
सरधोपटपणे जगताना जपलेल्या सगळ्या मध्यमवर्गीय जाणीवांना छेद देणारं कविता महाननांचं लिखाण आहे.
बी चांगले लिहीलेस!! भिन्न
बी चांगले लिहीलेस!!
भिन्न वाचून खरंचच सुन्न झाले होते मी..
बी छान लिहिलं आहेस. भिन्न
बी छान लिहिलं आहेस.
भिन्न ब्लॉग देखील आहे.
आणि लेखिका एका मराठी संकेतस्थळावर बर्यापैकी अॅक्टिव्ह आहेत.
'ग्राफिटी वॉल' अजून वाचले
'ग्राफिटी वॉल' अजून वाचले नाही अजून काय विषय आहे या पुस्तकाचा ?>>>>
ती एक ग्रफिटी वॉल आहे... मनाला जे आले ते लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे... त्यातले काही लेख विसरताच येत नाहीत... मुख्यत्वे पुरुष वेश्यांवर ( जिगोलो) वर लिहिलेला लेख... अंगावर सर्रकन काटा येतो....हे ही जग अस्तित्वात आहे आणि आपल्या भोवतीच आहे..... तुम्ही आम्हीच जन्माला घातलेले आहे....
छान लिहीले आहेस बी.
छान लिहीले आहेस बी.
पुस्तक अजून वाचले नाहीये. पण
पुस्तक अजून वाचले नाहीये. पण तुझे परीक्षण खूप आवडले.
सुंदर लिहिलं आहेस, बी.
सुंदर लिहिलं आहेस, बी.
आता नक्कीच वाचेन. छान परिक्षण
आता नक्कीच वाचेन. छान परिक्षण बी.
वाचलीय .. कविता महाजन यांच
वाचलीय .. कविता महाजन यांच जवळजवळ सर्वच लेखन आवडलय आजपावेतो वाचलेलं ..
ग्राफीटी वॉल सर्वात पहिले हाती आलेली .. सुपर्ब आहे .. जिगोलो बद्दल वाचून मला पन अगदी काटा आला होता अंगावर .. ब्र सुद्धा मस्ताय .. त्यांच जोयानाचे रंग पन वाचायच्या यादीत आहे. लवकरच लागेल नंबर.. फेसबुक वर मी फॉलोवर आहे त्यांची म्हणुन त्यांचा ब्लॉग नियमीत वाचायला मिळतो . खुप मस्त कथा, लहान मुलांच्मुलांच्या, लेख, वृत्तपत्रातली सदर अगदी सगळचं .. जमल तर नक्की वाचा आणि भेट द्या
अरे हा सांगायच राहिलच.. बी
अरे हा सांगायच राहिलच.. बी परिक्षण मस्त लिहिलयं .. आवडल.
गापै bhinn साठी खुपच धन्यवाद
गापै bhinn साठी खुपच धन्यवाद
बीचा रिव्ह्यू चांगलाच आहे पण
बीचा रिव्ह्यू चांगलाच आहे पण भिन्न मला फार वैयक्तिक अनुभव वाटतो, भिन्न बद्दल काही बोलावेच वाटत नाही..
चांगलं लिहलय परीक्षण.. भिन्न
चांगलं लिहलय परीक्षण.. भिन्न विषयी बरंच ऐकून अगदी विकत घेऊन वाचलीय. वाचून खूपच अस्वस्थ व्हायला झालेले.
>>आपल्या अनुभवांच्या कक्षेत एखादी गोष्ट नाही म्हणजे ती नाही असे होत नाही>>> अगदी खरंय.. खूपवेळा आपलं अनुभव विश्व फारच तोकडं असतं.
लेख आणि प्रतिसाद वाचनीय आहेत.
लेख आणि प्रतिसाद वाचनीय आहेत.
कविता महाजनांचा ब्लॉग वाचायची
कविता महाजनांचा ब्लॉग वाचायची तीव्र इच्छा होती, पण ब्लॉग काढून टाकला आहे :sad:
हो ना
हो ना
समीर गायकवाड ना फॉलो करतेस का फेसबुकवर? तेदेखील या विषयावर भरपूर लिहतात.
समीर गायकवाड ना फॉलो करतेस का
समीर गायकवाड ना फॉलो करतेस का फेसबुकवर? तेदेखील या विषयावर भरपूर लिहतात. >>>> फेसबुकवर नाही, पण इथे मायबोलीवर वाचल्या आहेत कथा/लेख. फार अस्वस्थ करणारं त्रासदायक लिखाण असतं. आज फेसबुकवर शोधते.