उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखेर युगाचा अंत झाला... एका बुद्धिमान, तेजस्वी, तडफदार, प्रेमळ आणि लोककल्याणासाठी झटणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा अखेर शेवट झाला.. विरेन आणि त्यांच्या क्रिएटिव्ह टीमने हा अंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असाच अतीव सुंदर आणि उत्कटतेने सादर केला... आज एखादे दर्जेदार नाटक पहात असल्याची अनुभूती मिळाली. टिव्ही मालिकांमधून हल्ली असा काही अनुभव दूर्मिळच झाला आहे. हा भाग इतका परिणामकारक होता की घरातलीच कोणी व्यक्ती गेली असल्यासारखे दु:ख झाले. Sad मन सुन्न झाले आहे...

अखेर युगाचा अंत झाला... एका बुद्धिमान, तेजस्वी, तडफदार, प्रेमळ आणि लोककल्याणासाठी झटणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा अखेर शेवट झाला.. विरेन आणि त्यांच्या क्रिएटिव्ह टीमने हा अंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असाच अतीव सुंदर आणि उत्कटतेने सादर केला... आज एखादे दर्जेदार नाटक पहात असल्याची अनुभूती मिळाली. टिव्ही मालिकांमधून हल्ली असा काही अनुभव दूर्मिळच झाला आहे >> अनुमोदन

काल थोडा वेळ पाहिली. भाषा अचानक बदलली का?
;त्यास जावयास सांगा' ऐवजी 'त्याला जायला सांगा' असे कानी पडले.

भरत, ह्या लोकांना अधून मधून आपण जुन्या काळातली मालिका करतोय, याचा साफ विसर पडतो बहुदा...

कालचा भाग सुरेख झाला. रमाबाईंची चलबिचल स्पृहाने उत्तम दाखवली.>>> +१
तसेच जाण्याच्या दिवशीचे माधवरावांचे (घरातले) भाषण सुरेख झाले होते.. तो विक्रमचा-एका दमात भरपूर संवाद दाखवलेला- भागही फार्फार आवडला. उत्तम अभिनय होता...

कालचा भाग मात्र प्रचंड रिपिटिटिव्ह झाला. एकदा केशवपन न करण्यामागची भूमिका रमाबाईंनी सासूबाईंजवळ स्पष्ट केलेली असतांना पुढच्याच भागात पुन्हा तिची आई खास गावाहून आल्यावरही तेच तेच संवाद दाखवले. रमाबाईंच्या शोकावस्थेत आणि सुभद्रा काकूच्या कारस्थानात जास्त दिवस घालवले, तर कंटाळवाणी होईल मालिका... खरंतर माधवराव आणि रमाबाईंचे सहजीवन, हीच एक त्यातली जमेची बाजू होती. आता तर ती ही संपली...

१५ जुलैला संपणार ना? रमाबाईंचे माधवरावांच्या पश्चातले कार्य चांगले दाखवत आहेत. महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना पायावर उभे करण्यासाठी बरेच चांगले उपक्रम रमाबाईंनी राबवलेत की! नोकरी करणार्‍या, शिकणार्‍या स्त्रियांसाठी हॉस्टेल, नर्सिंग कोर्स, इतर उद्योगांची उभारणी, तुरुंगातील महिलांसाठी पुनर्वसन योजना, त्यांच्या अनाथ झालेल्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी.. असं बरंच काही दाखवलं एवढ्यात.

कालचा भाग पाहिला.......फार सुंदर.....या मालिकेत अश्याप्रकारे रमेच्या सासुच्या आत्माचे आगमन दाखवतील अस वाटलंच नाही...चित्रीकरण फार हृदयभेदक होत.

हो Golden Star... जबरी होता तो भाग. मागेपण ताई सासूबाईंचा आत्मा माधवरावांशी बोलायला आला होता ना? अगदी तसाच..
बाकी मालिकेचे उरलेले भाग म्हणजे अगदीच 'एकेक पान गळावया' असेच चाललेत.

कालचा भाग अप्रतिम...शेवट होऊ नये असे वाटत होते...पण रमाबाईंचा शेवट अटळच होता....छान मालिका.....स्प्रुहा जोशीचे काम वाखाणण्यासारखे.......

Sad माझ्या डोळ्यातलं रडूच थांबत नाहीये.. आत्ताच आपलीमराठी.कॉम वर शेवटचा भाग पाहिला.. आतून काहीतरी तुटल्यासारखं झालं. Sad ही मालिका संपायला नको होती. फार गुंतले होते तिच्यात.. असो...
अप्रतिम शेवट झाला.

शेवटच्या भागाची सुरुवात गंधर्व नाटक मंडळींच्या संगीत मृच्छकटिक नाटकातील नाट्यपदाने झाली. त्यानंतर रमाबाईंच्या सेवासदन मधील वास्तव्य आणि कारकिर्दीचा धावता आढावा घेतला. त्यांची आणि गांधीजी, टिळक यांच्यासोबतची भेट आणि विचारांची देवाणघेवाण दाखवली.

माधवरावांचे स्नेही भांडारकर म्हणजे खुद्द पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युटचे भांडारकर, हे ही आजच्या भागात कळले. ह्याच भांडारकर इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या नासधुशीची बातमी आठवून आपल्या जवळच्याच कोणाचेतरी न भरुन येण्याजोगे नुकसान झाले आहे, असे वाटले एकदम...

माधवराव, रमाबाई, सावित्रीबाई-ज्योतिबा फुले, आगरकर, कर्वे, टिळक, गांधीजी इ. सर्व समाज सुधारकांनी समाजासाठी प्राण वेचले, म्हणजे नक्की काय आणि कसे कार्य केले असेल, त्यांचा जीवनपट कसा असेल, त्यांच्या घरुन त्यांना कशाप्रकारची वागणूक मिळत असेल, त्यातून तरुन ते आपलं कार्य कसं निभावून नेत असतील, या सर्वाची पुसटशी का होईना कल्पना आली. आज देशात दिसत असलेल्या ज्या काही सुधारणा आहेत, आपण ज्या प्रगतीपथावर आहोत, तिथपर्यंत आपण पोहोचावे, म्हणून ह्या सर्व मंडळींनी आपले आयुष्य वेचले, हे ही मालिका पहात असतांना सतत तीव्रतेने जाणवायचे.

मालिकेच्या शेवटी रमाबाईंचा ओरिजनल फोटो, सेवासदनची इमारत-तेंव्हाची आणि आत्ताची, प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांचे मालिकेविषयीचे विचार, मालिकेच्य पटकथा लेखिका अरुणा जोगळेकरांचे मनोगत, विरेन, ऋग्वेदी विरेन, यांचे दोन शब्द हे सर्व दाखवून एक परिपूर्ण शेवट केला.

अशी अप्रतिम मालिका पुन्हा कधी होईल माहिती नाही. आजकालच्या टिपिकल मालिकांच्या गर्दीतून वाट काढून नेटाने आणि धाडसाने हा विषय हाताळल्याबद्दल आणि कुठेही भरकटू न देता शेवटपर्यंत दर्जा टिकवून यथासांग आणि योग्य शेवट केल्याबद्दल विरेन आणि टीमचे तसेच झी मराठीचे अनेक आभार... एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला रोज जवळून भेटण्याची तुम्ही संधी दिलीत. तुमच्याविषयीचा आदर दुणावला आहे. पुन्हा अशाप्रकारच्या मालिकेच्या प्रतिक्षेत आहे. धन्यवाद. Happy

अरेरे माझ्या डोळ्यातलं रडूच थांबत नाहीये.. आत्ताच आपलीमराठी.कॉम वर शेवटचा भाग पाहिला.. आतून काहीतरी तुटल्यासारखं झालं. अरेरे ही मालिका संपायला नको होती. फार गुंतले होते तिच्यात.. असो...
अप्रतिम शेवट झाला.>>>>>>>>सहमत.

मीही फार गुंतले होते या मालिकेत. शेवटचा भाग आज पाहिला. किती अफाट कर्तृत्व! पतीच्या योग्य सपोर्टमुळे एक लहान मुलगी किती पल्ला गाठू शकली आणि इतरांसाठी उपकारक काम केले हे बघायला मिळाले. सर्व कलाकारांनी चांगली कामे केली होती. स्पृहा आणि विक्रम या कलाकारांच्या आयुष्यात किती चांगली घटना घडली आहे. अशा व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या.
आज जरा रडू येत होते. पुन्हा अशी मालिका कधी येणार याची वाट बघते.

माझा शेवटचा भाग बघायचा अजून राहीला आहे. रेकॉर्ड केला आहे पण मला तो भाग धावपळीत न बघता निवांत पहायचा आहे.

अशी अप्रतिम मालिका पुन्हा कधी होईल माहिती नाही. आजकालच्या टिपिकल मालिकांच्या गर्दीतून वाट काढून नेटाने आणि धाडसाने हा विषय हाताळल्याबद्दल आणि कुठेही भरकटू न देता शेवटपर्यंत दर्जा टिकवून यथासांग आणि योग्य शेवट केल्याबद्दल विरेन आणि टीमचे तसेच झी मराठीचे अनेक आभार... एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला रोज जवळून भेटण्याची तुम्ही संधी दिलीत. तुमच्याविषयीचा आदर दुणावला आहे. पुन्हा अशाप्रकारच्या मालिकेच्या प्रतिक्षेत आहे. धन्यवाद.
>>>>>>>>>>>>>>>>१००%

आमच्याकडे नेमका केबलचा काहीतरी प्रॉब्लेम होता. प्रक्षेपण अगदि तुटक- तुटक असं होतं. Uhoh मला नीट बघताच आला नाही. यु-ट्युबवर हा भाग अजून आलाच नाही का? मला तर दिसतच नाही...

शेवटच्या भागातला पोवाडा खुप आवडला.>>>अरे हो, विद्याक!!!धन्यवाद, पोवाड्याची आठवण करुन दिल्याबद्दल. मी पोवाड्याविषयी लिहायचे अनवधानाने विसरले. कित्ती सुंदर पोवाडा होता तो. तो पोवाडा कोणी लिहिला, तसेच यातील सुभद्रा काकूंची सून गुणगुणायची, त्या ओव्या, कोणी लिहिल्या, ते कळायला हवे होते. नंतर मी तो पोवाडा इथे लिहून काढेन म्हणते आणि माधवरावांचे शेवटचे भाषणही.. अरुणा जोगळेकरताई, जियो. तुमच्या रुपाने एक दर्जेदार कथालेखिका मिळालीये आम्हाला. Happy छोट्या आणि मोठ्या रमेचे निरुपण, माधवराव-रमाबाई, माधवराव-भांडारकर, माधवराव-सार्वजनिक काका यांच्यामधील संवाद आणि माधवरावांच्या तोंडचे सगळेच संवाद फार फार छान असायचे. तसेच या मालिकेचे शीर्षकगीत, मालिकेत वाजायचे ते सुमधूर पार्श्वसंगीत, वाद्य न वापरता मानवी स्वरांचा पार्श्वसंगीतातील वापर, हे सगळे सगळे आता मिस करेन, नव्हे कालपासून करतेय... Sad

मालिका दर्जेदार होती यात शंकाच नाही पण या धाग्यावर माबोकरांनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही असे वाटले खरे Sad

माधवराव जातात तो शेवटचा अप्रतिम भाग (१३ जुन २०१३) माधवरावांच्या शेवटच्या भाषणासकट लिहिते आहे. तो भाग कायमचा स्मरणात रहावा अशी इच्छा आहे.

सगळ्या गोतावळ्याला जमवून (नुकतेच मोठ्या आजारातून उठलेले) माधवराव खुर्चीवर बसलेले असतात आणि घरातली सगळी मंडळी समोर सतरंजीवर. बाहेर ढगांच्या गडगडाटात, घोंघावणार्‍या वार्‍याच्या सोबतीने मुसळधार पाऊस पडत असतो. एकाच वेळी गूढ, भयाण आणि प्रसन्न असे सगळे वाटत असते. माधवराव बोलतातः

"आज अगदी प्रसन्न वाटते आहे. त्यात हा मनभावन पाऊस... रमाबाई, आठवते का मीरेचे भजन? मीरा पावसास 'मनभावन सावन' म्हणते. रमाबाई, म्हणता एखादे भजन?"

यावर रमाबाई पहिले भजन सुभद्राकाकूंच्या सूनेला-सगुणा वहिनीला म्हणायला सांगतात.

सगुणावहिनी आपल्या सुमधूर आवाजात भजन गायला सुरुवात करतात:

बरसे बदरिया सावन की

सावन की मनभावन की
बरसे बदरिया सावन की

सावन में उमग्यो मेरो मनवा
भनक सुनी हरी आवन की
बरसे बदरिया सावन की

उमड घुमड चहु दिसिसे आवो
दामण दमके झर लावन की
बरसे बदरिया सावन की

नन्ही नन्ही बुंदन मेघा बरसे
सितल पवन सुहावन की
बरसे बदरिया सावन की

मीरा के प्रभू गिरीधर नागर
आनंद मंगल गावन की
बरसे बदरिया सावन की

यावर माधवराव म्हणतातः
"वा! सुरेख...
सावन में उमग्यो मेरो मनवा
भनक सुनी हरी आवन की... वा! हरी असाच येतो. कधी पावसाच्या धारा होऊन.. कधी कोवळ्या सूर्याची किरणे होऊन.. कधी सागराच्या लाटा होऊन, तरी कधी अश्वत्थाची सळसळ होऊन...येतो.. कवेत घेतो.. हरी.. सगळीकडे भरुन राहिलेला तो निर्गुण, निराकार... सगुणाला कवेत घेतो.. आणि पुन्हा निर्गुण होतो...
रमाबाई, हरी मेरे जीवन प्राण अधारे.. आठवतेय का?"

रमाबाई: हो, आठवते आहे ना!
माधवरावः अहो, मग वाट कसली पाहता? म्हणा की!
रमाबाई: आज मला आपली प्रार्थना समाजाची उपासना चालली आहे, असेच वाटते आहे. इतके रसाळ निरुपण करीत आहात! तेथे जसे सार्‍यांना खिळवून टाकणारे रसाळ विवेचन करता, तसेच वाटते आहे.
माधवरावः अहो, तसेच आहे! पावसाने मनावरील मळभ हटविले, धारा कोसळल्या, सारे काही स्वच्छ झाले..
सावन में उमग्यो मेरो मनवा..
भनक सुनी हरी आवन की.. वा!
आबा, वाजले किती? १०.२५? पाहिलेत? रोज सव्वा दहाला न चुकता येणारी स्पॅझम आज १०.२५ झाले, तरी आलेली नाही! दुखणे नाही, शीरा ताठरणे नाही, कोणतेही लक्षण नाही!! आता सार्‍यांनी निश्चिंत रहा. आमचा आजार पळाला!

माई: हो रे हो! माधवा!! अरे! तो देवच पावला म्हणायचा! खरेच.. भजनात आणि तुझ्या रसाळ निरुपणात आम्ही अगदी गुंग झालो होतो हो! आजारही गुंगच झाला म्हणायचा!! रमे, आता तूही म्हण गो एक भजन. हा आनंद असाच टिकून राहू दे..

आता रमाबाईंचे अत्यंत गोड आणि धीरगंभीर स्वरातले भजन सुरु होते.

'हरी मेरे जीवन प्राण आधार

और आसरो नाही तुमबीन
तीनो लोक मझार

आप बीना मोहे कछु ना सुहावे
आप बीना...
निरख्यो सब संसार
हरी मेरे जीवन प्राण आधार

मीरा कहे मैं दासी रावरी
देजो मती बिसार
हरी मेरे... मती बिसार
हरी मेरे... जीवन प्राण आधार...'

माधवराव भजन सुरु असतांना आलेला आपला स्पाझम आणि त्याच्या वेदना आवरत दाद देतात... "वा!.. आप बीना मोहे कछु ना सुहावे.. निरख्यो सब संसार..वा! मीरा बाईंना हरीखेरीज काहीच दिसत नव्हते आणि आम्हास आमच्या हिंदुस्थानाशिवाय...
आपल्या हिंदुस्थानी लोकांकडे काय नाही? गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कावेरी, यांसारख्या अमृतदायिनी नद्या आहेत, फळाफुलांनी लगडलेल्या, दर्‍याखोर्‍यांनी बहरलेल्या पर्वतराजीच्या रांगा आहेत, विशाल सागरांनी आपल्या हिंदुस्थानाच्या चरणावर फेनफुले वाहिली आहेत आणि हिमालयाने प्राचीनतम ज्ञानाची शुभ्रता माथी धारण केली आहे. किती भाषा, किती रितीभाती, किती रंग, किती नाती, निसर्गाने किती भरभरुन दिले आहे आपल्या हिंदुस्थानाला. पण एखाद्या मधूर, पक्व फळास कीड लागावी, तशी, दुही, अज्ञान, आंधळेपणा, औदासिन्य आणि भेदाभेदांची कीड आपल्या हिंदूस्थानास लागली आहे. ती नाहिशी व्हावयास हवी.. एकोपा, देशप्रेम, बांधवांबद्दलची कळकळ निर्माण होऊन उच्च-नीचतेचा विचार दूर सारण्याचा निश्चय व्हावयास हवा. ज्ञान, दूरदृष्टी आणि मेहनत हवी आहे. सर्वांचे भले व्हावे, अशी आस असावयास हवी. आपल्या हिंदुस्थानातील माणसांच्या नसांमध्ये तीही फार पूर्वीपासून आहे. फक्त जागी व्हावयास हवी. सर्वेत्र सुखिनः संतु. सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्चंतु मा कश्चित दु:खमाप्नुयात. असे व्हावयास हवे. सार्वजनिक काकांचे हेच म्हणणे होते. वासुदेव बळवंत फडक्यांचेही हेच म्हणणे होते आणि सांगू का? आमच्या भाऊसाहेबांचेही हेच म्हणणे होते. सार्‍यांचे भले होवो. सारे निरोगी राहो. कोणाच्याही कपाळी दु:ख नको. म्हणूनच..भाऊसाहेबांनी आपल्या माथी कर्जे घेऊन इतरांची दु:खे निवारली. आमच्या हिंदुस्थानच्या मातीत परदु:ख शीतळ नसते माई. जे का रंजले, गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा. अशी माझ्या तुक्याची शिकवण आहे. आमच्या हिंदुस्थानावर मनापासून प्रेम करा. नानु, कळले का? आम्ही काय सांगितले ते? सार्‍यांनाच कळले का? रमाबाई, आप बीना पासून भजन पुन्हा म्हणा बरे! आमच्यासाठी म्हणा.."

रमाबाई गायला सुरुवात करतात.

"आप बीना मोहे कछु ना सुहावे
हरी मेरे...निरख्यो सब संसार
हरी मेरे.. जीवन प्राण..
हरी मेरे.. जीवन प्राण आधार..
जीवन प्राण आधार.. जीवन... "

रमाबाईंचे भजन सुरु असतांनाच माधवराव आतल्या खोलीत निघून जातात आणि अचानक त्यांची "रमाबाई..." अशी आर्त हाक ऐकू येते. त्यांचे प्राण नश्वर देह सोडून गेलेले असतात..

मागे निवेदकाचा आवाज.. "माधवरावांची हाक विरली. काळ क्षणभर थांबला. रमाबाईंचे उत्कट प्रेम, हिंदुस्थानच्या भल्यासाठी गुंतवलेला जीव आणि अखंड अविरत ध्यास धरुन ठकठक करणारे हृदय.. सारे काही मागे सोडून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचा प्राणपक्षी उडाला. (१६ जानेवारी १९०१, मुंबई) पंचमहाभूतात विलीन झाला. नियतीने हिंदुस्थानच्या इतिहासातले एक ध्येयसक्त पान मिटले आणि मागे उरला तो व्याकुळ शोक....."

थोर विचारांच्या थोर व्यक्तिमत्त्वाला- माधवरावांना ही माझी आदरांजली... माबोकरांनी गोड मानून घ्यावी, अशी नम्र विनंती.

शेवटचा भाग पाहिला तेव्हा.....नकळत डोळे भरून आले. या मालिकेमुळे मला कळले, कि आजची स्त्री सुस्थितीत आहे, तर ती फक्त रमाबाई रानडे आणि माधवराव रानडे यांच्याच मुळे.
रमाबाई रानडे.....काय सांगू आणि किती सांगू त्यांच्या बद्दल, त्यांच्या महतीबद्दल.....

आदरणीय रमाबाई रानडे,
आज तुम्ही प्रत्यक्षात जगात नसलात, तरी माझ्या सारख्या कितीतरी मुलींच्या मनात तुम्ही जिवंत आहात. तुम्ही पेटवलेली स्त्रीमुक्तीची ज्योत आजही घराघरातून प्रत्येकाच्या मनात ज्ञानाचा प्रकाश देत अखंड तेवत आहे आणि निरंतर तेवत राहील. तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन अन्यायी सनातनी विचारांविरुद्ध लढा देण्यात समर्पित केलंत...तुमचे हे उपकार आम्ही कसे फेडणार आहोत?? कदाचित नाहीच फेडू शकणार....तुमचे आभार तरी कसे मानू? शब्द कमी पडतात, अपुरे पडतात....तुम्ही लावलेलं स्त्री-शिक्षणाचं रोपट आज एक डेरदार, बहारदार वृक्ष बनलेला आहे. आणि हा असाच बहरत राहावा, वाढत राहावा आणि त्याच्या छायेत स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, आणि स्वाभिमानाने जगण्याकरता दिलासा आणि आधार मिळत राहावा, यासाठी मी हि नक्की प्रयत्न करीन....प्रयत्न करीन कि, तुमच्या सागराएवढ्या अफाट कार्यातला एक थेंब का होईना पण बनू शकेन.

शेवटच्या (१४ जुलै २०१३) च्या भागातला पोवाडा:

शतकांचा घोर अंधार..
काचा वाटेवर
धर्माला जोर
कर्मकांड भारी होते जोशात
सूत्र सारी पुरुषाच्या हातात
बाईचा जन्म उभा कुंपणात... जी.....जी..जी..जी..जी..जी हां

रिती रिवाजांच्या नावानं
बाई मानसानं
जावया रुढीलाच शरण
करुनी आयुष्याचं सरन
रहावं पुरुष दासी बनून... जी.....जी..जी..जी..जी..जी हां

अशा काळात.. ह्याच मातीत..
जाहला एक.. आगळा-वेगळा नेक
बाई जन्माचा कैवारी

व्यासंगी, बहु-शिक्षित,
सात्विक, नेमस्त, विचारी
त्यांनी शिकवून तयार केली
पत्नी रमाबाई
पत्नीला पती मधव शिकवी
घरीच अ आ ई
रमाबाई रानडे जाहली
विधवांची आई.. जी रं हां जी रं हां हां जी
जी रं हां जी रं हां हां जी
जी..जी..जी..जी..जी हां

निराधार मुलीबाळींसाठी
अर्पिलं जीवन
आणि शिक्षण केले छत हक्काचे सेवा हे सदन
जी रं हां जी रं हां हां जी
जी रं हां जी रं हां हां जी
जी..जी..जी..जी..जी हां

वावरती जर मुली
आजच्या शिकून तडफेने
दिला आहे विश्वास मुलींना
ह्याच रमाईने
काळपुरुषा रमाबाईला
कधी नाई सरनार
जी रं हां जी रं हां हां जी
जी रं हां जी रं हां हां जी
जी..जी..जी..जी..जी हां

पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांची शिकवण लक्षात ठेवून स्त्रियांच्या विकासासाठी जीवन वाहून घेतलेल्या...आणि थोर, कर्तृत्ववान अशा रमाबाईंना ही आदरांजली..

गोल्डन स्टार, तुझे मनोगत खुप सुंदर पद्धतीने व्यक्त केलेस. Happy

रमाबाईंप्रमाणेच सावित्री बाई फुले आणि अजूनही कित्येक समाजसुधारकांच्या कार्याला वाहिलेल्या अशा अनेक मालिका आपल्याला पहावयास मिळो आणि त्यातून प्रेरणा मिळून आपला माणूसपणाचा प्रवास अधिकाधिक सुकर होवो, हीच इच्छा व्यक्त करते.

धन्यवाद सानी. मी खूप भावनिक झाले होते, शेवटचा भाग पाहताना.....त्या वेळची मनाची स्थिती सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटली. Happy

Pages