मनात घर करणारा चित्रपट : 'अनुमती'

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 June, 2013 - 07:55

डोळ्यांना सुखावणारं आल्हाददायी निसर्गचित्रण, श्रवणेंद्रियांना शांत करणारं मधुर पार्श्वसंगीत, मनाची पकड घेणारी व गुंतवून टाकणारी पटकथा आणि आपल्या कसदार, विलक्षण ताकदीच्या अभिनयाने हा सारा पट जिवंत करणारे, मनावर ठसा उमटवून जाणारे अभिनेते.... 'अनुमती' चित्रपटात ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात! एक संपन्न, समृद्ध अनुभव देताना तुमच्या-आमच्या मनात ही 'अनुमती' घर करून जाते हे निश्चितच!

१४ जून रोजी सिटी प्राईड चित्रपटगृहात मायबोलीच्या माध्यमातून अनुमती चित्रपटाच्या शुभ-खेळाला उपस्थित राहण्याचा योग आला. त्या अगोदर वर्तमानपत्रे, टीव्ही इत्यादी माध्यमांतून या चित्रपटाबद्दल बरेच वाचले-ऐकले होते. मायबोलीवरही त्या संदर्भात मुलाखती प्रसिद्ध झाल्यावर उत्सुकता अजूनच ताणली गेली होती, खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. आणि सांगायला आनंद होतो की या चित्रपटाने त्या अपेक्षा पूर्ण तर केल्याच, शिवाय एक उत्तम कलाकृती पाहिल्याचे - अनुभवल्याचे समाधानही पदरात टाकले.

या चित्रपटाचं कथानक इतकं साधं आहे - तुमच्या-माझ्या आयुष्यात घडणारं आहे की सध्याच्या काळात अशा कथानकावर चित्रपट बेतण्याचा निर्णय हा धाडसाचाच म्हटला पाहिजे. पण किंबहुना इतका साधा विषय अतिशय ताकदीने व परिणामकारकपणे मांडणे हेच खूप कौशल्याचे काम असते! आणि त्यात हा चित्रपट शंभर टक्के यशस्वी झाला आहे हे निर्विवादपणे मान्य करावे लागेल!

एक साधासुधा, मध्यमवर्गीय, निवृत्त शिक्षक - आपल्या बायकोवर जीवापाड पेम करणारा - आणि तिच्याविना तीळ तीळ तुटणारा - ती रुग्णशय्येवर असताना तिला जगविण्यासाठी दिवसरात्र एक करून परिस्थितीशी झगडणारा - जंग जंग पछाडणारा... आणि त्याच्या ह्या लढ्याची ही हृदयस्पर्शी कहाणी. विक्रम गोखल्यांनी हे रत्नाकर पाठारेंचं पात्र अतिशय उत्कृष्ठपणे साकारलंय. नीना कुळकर्णीचा सहज सुरेख वावर नेहमीप्रमाणेच वाखाणण्यासारखा! तिच्या हसण्या-बोलण्यातून, प्रत्येक भावमुद्रेतून जीवनावर प्रेम करणारी, आपल्या संसारात एकरूप झालेली आणि आयुष्याचा आनंद भरभरून घेणारी स्त्री दिसते. तिच्या साथीने रत्नाकराचा संसार तोललाय. तिच्या सोबतीशिवायच्या अस्तित्त्वाची तो कल्पनाच करू शकत नाही. आणि तिचं ते अस्तित्त्व ठेवायचं की संपवायचं ह्या निर्णयाची जबाबदारी जेव्हा त्याच्यावर येऊन कोसळते तेव्हा त्याची होणारी तीव्र तगमग, तडफड पार आतवर जाऊन पोहोचते.

या चित्रपटाशी, त्यातील पात्रांशी आपण रिलेट करू शकतो. व्यवहाराने बांधलेल्या, जगण्याच्या शर्यतीत भावनांना बांध घालून कोरडेपणाने वावरण्याचा प्रयत्न करणार्‍या व त्यात कधी यशस्वी वा अयशस्वी ठरणार्‍या आप्त-स्वकीयांच्या पार्श्वभूमीवर रत्नाकराचे वागणे - विचार हे आजकालच्या 'प्रॅक्टिकल' आयुष्याला न साजेसे! पण तेच विचार, तेच आदर्श त्याला जगण्याचे, लढण्याचे बळ देतात. बायकोच्या आयुष्याच्या दोरीसाठी वणवण भटकणारा, याचना करणारा, अहंकार - स्वाभिमान गुंडाळून ठेवून आर्जवं करणारा आणि तिला निरोप देण्याच्या नुसत्या कल्पनेनेच कासावीस होणारा, विवश रत्नाकर... रिमाची भूमिका या चित्रपटात रत्नाकरच्या मैत्रिणीची आहे. आपल्या नेहमीच्याच ऊर्जेने आणि निखळ सुंदर अभिनयाने तिने ही 'अंबू' साकारली आहे. तिचा आश्वासक वावर, आपल्या मित्राविषयीची तिला वाटणारी आस्था - कळकळ आणि एकटी राहतानाही तिने स्वतःचं शोधलेलं स्वतंत्र अस्तित्त्व ती थोड्याच कालावधीत, परंतु अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविते.

सुबोध भावेने रत्नाकरच्या मुलाची, श्रीकांतची भूमिका त्याने नेहमीच्या सफाईने केली आहे. सईने त्याच्या बायकोची भूमिका निभावली आहे. अरुण नलावडे, किशोर कदम व आनंद अभ्यंकर त्यांच्या लहानशा भूमिकांमध्येही भाव खाऊन जातात. कोणतेही पात्र येथे विनाकारण घुसडलेले नाही हे विशेष. प्रत्येकाचे येथे काहीतरी प्रयोजन आहे आणि कथानक पुढे नेण्यात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे.

चित्रपटात दिसतो तो एकीकडे कोंकणातील रम्य हिरवागार निसर्ग आणि दुसरीकडे हॉस्पिटलमधील रुक्ष - झाकोळलेलं वातावरण. हा विरोधाभास उत्तम टिपलाय. प्रवासात भेटणारी आणि रत्नाकराच्या मनात उमटणारी कविता - गाणं व त्यातून व्यक्त होणारी त्याच्या मनाची आंदोलनं, अनिश्चितता... कधी कोसळणारा पाऊस तर कधी उसळणार्‍या समुद्रलाटा... या सर्वांची एक लय आहे. त्यातही एक अस्वस्थपण आहे. 'पालखी निघाली...' गाण्यात ही अस्वस्थता, हुरहूर टिपेला पोहोचते. आणि गाण्याच्या सुरावटी तर काळजाचा थेट भेद घेणार्‍या, डोळ्यांच्या कडा ओलावणार्‍या... चित्रपटातील संवादांची इंग्रजीतील सबटायटल्स व खास करून गाण्यांची सबटायटल्स तरल आणि समर्पक. गजेंद्र अहिरेंचं दिग्दर्शन, या विषयाला त्यांनी ज्या पद्धतीने हाताळलंय ती हातोटी हे आवडलंच!

आजच्या आयुष्यात रॅट रेस, प्रॅक्टिकल लिविंगचा मंत्र जपणार्‍या तरुणांपासून ते आयुष्याची सायंकाळ अनुभवत असणार्‍या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचा शुभ-खेळ विक्रम गोखले, गजेंद्र अहिरे, गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर, नरेन्द्र भिडे व इतर कलाकार, प्रायोजक, तंत्रज्ञ मंडळींसमवेत पाहायला दिल्याच्या संधीबद्दल 'मायबोली' व माध्यम-प्रायोजकांचे अनेक आभार!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही गोष्टी खटकल्या : रत्नाकर पाठारें त्यांच्या मुली कडे येतात तेव्हा ती ऐन पावसाळ्यात झाडांना पाणी घालत असते.

सिनेमातला नायक मैत्रिणीकडे जेवायला येतो, तेव्हा त्याची पांढरी दाढी दाट वाढलेली असते. जेवणापूर्वी तो हात धुतो, तेव्हा त्याचे चक्क गाल दिसू लागतात आणि हात धुवून जेवायला बसताना दाढी पुन्हा दाट.

विक्रम गोखले यांनी बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर चांगली बॅटिंग केली आहे. ती पाहायची असेल तर नक्की जा!