स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा]

Submitted by मी-भास्कर on 16 February, 2013 - 02:10

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा-नाशिक]
abhibhaMandir.jpgAbhinavBharatMandir.jpgswatantrylaxmi.jpgस्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला- भगूर]
हा ११ डिसेंबर २०१२ ला मायबोलीवर प्रकाशित केला होता. त्याची लिंक :-
http://www.maayboli.com/node/39583
आता देतो आहे त्याचा उरलेला दुसरा भाग.
भगूरहून जायचे होते नाशिकला! "अभिनव भारत मंदिरा"च्या दर्शनाला!
या मंदिराविषयीच्या माहितीचा मला मिळालेला एकमेव स्त्रोत होता :-
स्वातंत्र्यवीर
सावरकर दर्शन प्रतिष्ठान प्रकाशित विशेषांक
लेख- नासिकचे अभिनव भारत मंदिर-
लेखक : परिचित
मे १९०४ मध्ये अभिनव भारत ही सावरकरनिर्मित स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याच्या उद्देशाने उभी केलेली गुप्त क्रांतिकारी संघटना कि जी त्यांनी स्वतःच स्वातंत्र्य प्राप्तिनंतर १० मे १९५२ ला विसर्जित केली. स्वातंत्र्यलढ्यातील तिचे ऐतिहासिक कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज जर या नावाने एकादी संघटना असेल तर तिचा सावरकरांच्या मूळच्या संघटनेशी कोणताही संबंध नाही.
अभिनव भारत मंदिराच्या रुपात १८५७ ते १९४७ पर्यंतच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणुन अभिनव भारत मंदिर संस्था स्थापन करण्याची कल्पना सावरकरांनी १९४१मध्ये मांडली. त्यासाठी द्रव्यसहाय्य द्यावे म्हणून त्यांनी लोकांना आवाहन तर केलेच पण व्याख्यानांद्वारे त्यांनी त्यासाठी उल्लेखनीय अर्थसहाय्यदेखील केले. त्यांचे जुने सहकारी चक्रपाणी, तिवारी,महाबळ व वर्तक यांनी त्यासाठी ज्या वाड्यांमध्ये अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांचे गुप्त कार्य चाले आणि जेथे कवी गिविंद राहात तो तिळभांडेश्वर गल्लीतील धोंडभट विश्वामित्र यांचा वाडा विकत घेतला. शिवाय त्याशेजारचा गोरे यांचा वाडादेखील. हे गोरे देखील अभिनव भारतचे कार्यकर्ते. त्या वाड्यातच अभिनव भारत मंदिर उभे केलेले आहे (१०मे १९५३).
भगूरला सावरकरांच्या जन्मस्थानाचे ६ डिसेंबरला दर्शन घेऊन आम्ही नाशिकला विवाहसमारंभात सामील झालो. ७ डिसेंबर १२ ला अक्षता टाकल्या; नि कार्यालयाबाहेरील एका वयस्क रिक्षावाल्याला तिळभांडेश्वर गल्लीतील अभिनव भारत मंदिर माहीत आहे काय? असे विचारले.
तिळभांडेश्वर गल्लीत नेतो. तेथे कोठेतरी नाव वाचल्यासारखे वाटते असे तो म्हणाला. त्याला म्हटले चल तेथे जाऊन शोधू. परत कार्यालयात आणून सोडण्याच्या बोलीवर रिक्षा ठरवून निघालो. जुन्या नाशिक भागातील अतिशय अरुंद गल्ल्यांमधील फूल मार्केट मधून सराफाबाजारातून त्याने रिक्षा शेवटी एका अतिशय अरूंद गल्लीतून जराशा रुंद गल्लीत आणून उभी केली आणि म्हणाला, "ही आहे तिळभांडेश्वर गल्ली. विचारा इथे!"
बाजुने एक तरूण जात होता त्याला विचारले. तो म्हणाला, "ही काय समोरच पाटी दिसतेय!"
त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले. तेथूनच निघणाऱ्या दुसऱ्या अगदी अरुंद गल्लीच्या डेड एन्डला ठळक अक्षरे दिसली : अभिनव भारत मंदीर.
मंदिराशी कसलेही साम्य नसलेली वास्तू! पोचलो तर शेवटी इथे! असे वाटण्याचे कारण म्हणजे माझ्या आसपास राहाणारे कांही जण अनेकदा नाशीकला जातात आणि तेथे कित्येक दिवस नातेवाईकांकडे राहातात देखील. त्यांच्याकडून या अभिनव भारत मंदिराला जाण्याच्या मार्गाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न सफल झाला नाही. त्यांना नाशिक मध्ये अशी माहिती असणारा कोणी भेटला नाही म्हणे. मायबोलीवर नाशिक नामक गप्पाटप्पांचा धागा आहे. त्यावरही मी आवाहन करून पाहिले होते. पण कोणाही नाशिककराचा प्रतिसाद आला नाही. त्यामुळे समोरच्या घरावरील ती अक्षरे पाहून एका बाजूला सुखावलो पण त्याच वेळी त्या गल्लीची नि प्रवेशद्वाराची अवस्था पाहून मन खिन्नही झाले.
माझ्या कल्पनेतील मंदिर आणि प्रत्यक्ष वास्तू यामध्ये कमालीचे अंतर होते. असे असले तरी त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्व आणि पावित्र्य तिळमात्रही कमी होत नाही. आपली अनास्था मात्र अधोरेखित होते हेच खरे.
हा आहे गोरे यांचा वाडा. १६१६, तिळभांडेश्वर गल्ली, सराफ बाजाराजवळ, नाशिक - ४२२००१. या वाड्यात अभिनव भारत मंदीर हे स्मारक स्वातंत्र्योत्तर काळात सावरकरांच्या प्रेरणेने निर्माण झाले. त्याला कारणही तसेच आहे. अभिनव भारत संघटनेचे सदस्य या गोरे वाड्यात नि शेजारच्या धॊंडभट विश्वामित्र यांचे वाड्यात जमून सर्व योजना गुप्तपणे आखायचे आणि पार पाडण्य़ासाठीची तयारी येथुनच करायचे! त्या सर्व घटनांची साक्षीदार अशी ही वास्तू!
समोर अंगण व त्यामागची छोटीशी दुमजली वास्तु या मंदिराचा भाग आहे. अंगणाच्या उजव्या बाजूस एका कोनाड्यात एक लहान पण अतिशय सुबक अशी शंखचक्रगदाखड्गधारी स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती आहे.
तळमजल्यावरील एका खोलीवर हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष असे नाम फलक आहेत. वरच्या मजल्यावर "बाबाराव (गणेश) सावरकर सभागृह" आहे.
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा कान्हेरे यांनी वध केला. त्या योजनेतील सहभागाबद्दल कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना फाशी दिली गेली. त्या शिवाय गणेश व विनायक सावरकरांना अंदमानात जन्मठेप आणि सर्वात धाकटा भाऊ नारायण सावरकर यास सक्तमजुरी अशा शिक्षा दिल्या गेल्या. त्याशिवाय अनेकांना लहानमोठ्या शिक्षा दिल्या गेल्या. या वास्तू आणि सभोवतालचा परिसर , "नाशिक कॉन्स्पिरसी"मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या सर्व त्यागमूर्ती देशभक्तांच्या वावरण्यामुळे पवित्र झालेला! त्याचे दर्शन समाधान देऊन गेले.
सध्या वाड्याच्या डाव्या भागात श्री संजय माधव गोरे राहातात. आम्ही पोचलो तेव्हा श्री गोरे बाहेर जाण्याच्या गडबडीत होते. मी आमचे येण्याचे कारण सांगितल्यावर ते थांबले आणि त्यांनी वेळात वेळ काढून कांही अधिक माहिती दिली, ती येथे देत आहे. माहिती देणारा दुसरा कोणि उपलब्ध नसल्याने आणि मला उपलब्ध वेळ थोडा असल्याने आणखी माहिती मिळ्वता आली नाही.
" सावरकर कुटूंबीय आधी तिळभांडेश्वर गल्ली पलिकडच्या गल्लीतील पेठेवाड्यात राहात. तेथील वास्तव्यात सावरकरांनी घरातील अष्टभुजा देवीसमोर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांची ती सुप्रसिद्ध " देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मी सशस्त्र झुंजेन" ही शपथ घेतली. नंतर ते गोरेवाड्याशेजारील दातारांच्या वाड्यात राहायला आले. सावरकरांच्या क्रांतिकारी उद्योगांचा संशय ब्रिटीश सरकारला आलाच होता त्यामुळे त्यांच्यावर गुप्त हेरांची नजर असेच. दातार वाड्याच्या बाहेरच्या पायरीवर एक म्हातारी तांदूळ निवडित बसलेली असे. वाड्याबाहेर हेरांच्या संशयित हालचाली दिसल्या कि ती सुनेला हाक मारून सांगत असे, "तांदूळ निवडून झाले ग!" हा इशारा मिळाला कि अभिनव भारताचे सदस्य मागच्या भागातून निसटू्न जायचे. हेराच्या हाती काहीच लागायचे नाही.
"रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले " या गाजलेल्या काव्याचे जनक आणि सावरकरांचे बालमित्र "स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद [दरेकर]" यांच्याबद्दल गोरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोरे यांच्याच वाड्यात वरच्या मजल्यावर कवी गोविंद यांना राहाण्यास एक खोली दिलेली होती. आत शिरल्यावर डाव्या बाजूस त्या खोलीत जायला एक लाकडी जिना आहे . ती खोली गोरे यांनी दाखवली.
या मंदिरात जतन केलेल्या सर्व वस्तू, ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके, फोटो इ. सर्व, डागडुजी / रंगरंगोटी साठी तात्पुरती इतरत्र हालवली होती त्यामुळे आम्हाला पाहता आली नाहीत. त्यासाठी पुन्हा कधितरी नीट सवड काढून जायचे आहे. पण जी वास्तू आणि परिसर भारतमातेच्या या सुपुत्रांनी स्वकर्तृत्वाने आणि त्यागाने गाजवला त्याचे दर्शन लाभले हेही समाधान मोठेच होते.
आम्हाला ही गल्ली आणि अभिनव भारत मंदिर तेथेच आसपास असल्याचे माहित असणारा रिक्षावाला भेटला याचे गोरे यांना आश्चर्य वाटले. "तुम्ही फार सुदैवी आहात " असे म्हणून त्यांनी ते व्यक्त केले. या मंदिराच्या व्यवस्थेसाठी एक संस्था आहे असे कळले. पण जनतेची अनास्था, कार्यकर्त्यांचा आणि पैशांचा अभाव यामुळे या मंदिराची एकंदर परिस्थिती पाहून फार वाईट वाटले. तरीही आहे त्या परिस्थितीत कांहीजण जमेल तितकी चांगली व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत हेही आशादायक!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, फारच सुरेख माहिती सांगितलीत. अभिनव भारत मंदिर , नांव ही सार्थक आहे..
रिग्रेट!!!आपल्याकडील अनेक अमूल्य पण उपेक्षित ठेव्यांमधे या मंदिराचा नंबर लागलेला दिसतोय!! Uhoh

मी-भास्कर,

अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. त्याबद्दल आपल्याला सादर प्रणाम. आपल्यासारखे लोक आहेत तोवर जनतेला स्वातंत्र्यवीरांचं विस्मरण होणार नाही. कधी नाशिकास गेलो तर तिळभांडेश्वर गल्लीला जाईनच.

सध्या तिथे राहणार्‍या संजय माधव गोरे यांना त्या जागेच्या ऐतिहासिक मूल्याची जाणीव होती असे दिसते. अशी लोकही विरळीच. त्यांनाही सादर व सकौतुक प्रणाम.

आ.न.,
-गा.पै.

@वर्षू नील | 16 February, 2013 - 11:25
आपल्याकडील अनेक अमूल्य पण उपेक्षित ठेव्यांमधे या मंदिराचा नंबर लागलेला दिसतोय!!
>>
खरे आहे. पण हे ठेवे नव्या पिढीला दाखवून देणे हे आपले काम आहे.
धन्यवाद.

गामा_पैलवान | 16 February, 2013 - 11:34
कधी नाशिकास गेलो तर तिळभांडेश्वर गल्लीला जाईनच.
>>
अवश्य जाऊन या. अशा ऐतिहासिक वास्तू उपेक्षित राहू नयेत म्हणून असे करणे अत्त्यावश्यक आहे.

फार सुरेख.
तूम्ही या शीर्षकात स्वा. सावरकरांचे नाव, नाशिक वगैरे शब्द टाकलेत, तर कुणाही गुगल वापरणार्‍याला ते सापडू शकेल. म्हणजे आता तरी ते अज्ञात राहणार नाही.

स्वा.सावरकरांच्या स्मरणदिवसांतला मौल्यवान अनुभव. अष्टदर्शनांपैकी दोन तर झालीत.
शुभेच्छा मी भास्कर !

@दिनेशदा | 20 February, 2013 - 14:12
तूम्ही या शीर्षकात स्वा. सावरकरांचे नाव, नाशिक वगैरे शब्द टाकलेत, तर कुणाही गुगल वापरणार्‍याला ते सापडू शकेल. म्हणजे आता तरी ते अज्ञात राहणार नाही.
>>
आपल्या या बहुमोल सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! ती अंमलात आणण्याचा जरूर प्रयत्न करीन.

@भारती बिर्जे डि... | 20 February, 2013 - 14:53
अष्टदर्शनांपैकी दोन तर झालीत.
>> थोडी दुरुस्ती.
भगूर्-नाशिक मिळून पहिले विनायक दर्शन [दोन भागात]!
दुसर्‍यासाठी जायचे आहे पुण्याला. तेही यथावकाश मायबोलीवर टाकणार आहे.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

@कंसराज | 20 February, 2013 - 23:15 नवीन
नाशिकला गेल्यावर नक्की भेट देणार.
<<
जरूर भेट द्या आणि मला मिळालेल्या माहितीशिवाय अधिक कांही माहिती मिळाली तर ती वाचण्यास मला आवडेल.

आज स्वातंत्र्यवीरांची पुण्यतिथी!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन!

धागा वर काढण्यासाठी नवीन प्रतिसाद! Happy

@सखी-माउली | 26 February, 2013 - 09:57 नवीन
धन्यवाद!
आज स्वातंत्र्यवीरांची पुण्यतिथी! त्यानिमित्त भारती बिर्जे डि यांनी सावरकरांच्या 'कोठडी' या काव्याचे सुंदर रसग्रह्णण आजच मायबोलीवर लिहिले आहे. ते अवश्य वाचा.

अंदमानात साजरी झालेली सावरकर पुण्यतिथी. भारतातून त्यानिमित्त गेलेले ४०० लोक तेथे उपस्थित होते.
दि.म. ४-३-२०१३: बातमी
स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनी दि २६-२-१३ ला अंदमानातील पोर्टब्लेअर मधील महाराष्ट्र मंडळात आयोजित विशेष समारंभात अंदमानातील निवृत्त मुख्याध्यापक एम अहमद मुज्तबा यांनी लिहिलेल्या
Veer Savarkar- A Revolutionary political prisoner
या इंग्रजीतील चरित्राचे प्रकाशन झाले. मुज्तबा यांच्या पूर्वजांनी सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगली होती. सावरकरांनी तेथे भोगलेल्या यातना आणि तसेच कैद्यांच्या साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे दर्शनही पुस्तकात घडविले आहे असे लेखकाने या प्रसंगी सांगितले.

दि.म.:११-३-१३: वृत्तः
स्वा. सावरकरांच्या नाशिक या कर्मभूमीत दि १५ मार्च ते १७ मार्च १३ पर्यंत नाशिकमधील 'चोपडा लॉन्स' मध्ये २५ वे स्वा. सावरकर साहित्य सम्मेलन होणार आहे.
त्यातील मुख्य कार्यक्रम : अध्यक्षः यशवंत पाठक
१५-३-१३: दुपारी ४: अभिनव भारत मंदीर, वीर सावरकर मार्ग ते 'चोपडा लॉन्स' शोभायात्रा
सायंकाळी ६ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद् घाटन
१६-३-१३: सकाळी १०: सावरकरांवरील जीवनपट दाखवला जाईल.
सकाळी ११.३०: श्याम देशपान्डे व शुभा साठे यांचे 'साहित्यिक सावरकर' यावर भाषण
दुपारी १: 'सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षणसिद्धता' या विषयावर परिसंवाद
सहभागः कमांडर आगाशे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, ब्रिगेडियर हेमंत महाजन
१७-३-१३:रविवारः सकाळी १० : सावरकरांचा राष्ट्रवाद- व्याख्याते- रमेश पतंगे व अविनाश कोल्हे
सकाळी ११.३०: सावरकर हिंदुत्ववादी का बनले?
- वक्ते सुप्रसिद्ध सावरकर अभ्यासक श्री शेषराव मोरे
दुपारी १.१५: विज्ञाननिष्ठ सावरकर- वक्ते अरूण करमरकर
दुपारी ३.१५: तरुणांचे प्रेरणास्थान स्वा. सावरकर- वक्ते वि ह धूमकर आणि वा ना उत्पात
सं ५ : समारोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमोल विचार समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.. तसेच नाशिकजवळच असलेल्या सावरकरांच्या भगूर येथील जन्मभूमीलाही भेट देता येईल.

स्वा. सावरकर साहित्य संमेलन, नाशिक
शुक्रवार, दि १५ मार्च २०१३:
शोभायात्रा :
ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनानिमित्त भर दुपारी अभिनव भारत संस्थेपासून काढण्यात आलेल्या नेत्रदीपक शोभायात्रेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणांनी यात्रामार्ग दुमदूमून गेला. अभिनव भारतपासून निघालेली ही शोभायात्रा मेनरोड, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, गंगापूररोडमार्गे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरीत पोहोचली. संमेलनस्थळी यात्रेचा समारोप झाला. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाठक, अभिनेता शरद पोंक्षे, ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते, सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले, अभिनव भारत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विनायकदादा पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सावरकरांच्या कर्मभूमीत स्वतंत्रता स्तोत्राचे विक्रमी समूहगान:
'जयोस्तुते श्री महन्मंगले' या स्वतंत्रता स्तोत्राचे ३४४ शाळांमधील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी समूहगान करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. केवळ शालेय विद्यार्थीच नव्हे तर, शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅक, लायन्स क्लब अशा विविध ठिकाणी शुक्रवारची सकाळ या कवितेने पूर्णपणे भारल्याचे पहावयास मिळाले. लाखो विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था, लायन्स क्लब व शेकडो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने समूह गायनात सहभागी होऊन सावरकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची शाळांनी जय्यत तयारी केली होती. पाच ते सहा दिवस आधीपासून त्याची रंगीत तालीम घेण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात १९०३ मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे 'स्वातंत्र्याचे अजरामर स्तोत्र' लिहिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे नाशिक येथे उद्‌घाटन:-
लातूर संमेलनाचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. यशवंत पाठक यांच्याकडे सुपूर्द केली.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या गौरवार्थ भगवा डोलाने फडकावत ठेवेन आणि आपले सरकार येताच, नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सावरकरांचे स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे उद्‌घाटन करतांना दिली. ते म्हणाले, " सावरकरांचा मोठेपणा आपल्याला समजलेलाच नाही. सावरकरांचा आदर नसलेल्यांना सावरकरांनी भोगलेले भोग एक दिवस भोगायला लावले पाहिजेत. सावरकरांनी आपणाला मजबूत हिंदुस्थानचे स्वप्न दाखविले आहे, ते विसरून चालणार नाही. वयाच्या आठव्या वर्षापासून प्रशिक्षण घेणाऱ्या अतिरेक्‍यांशी आपला सोळा वर्षांचा पोरगा कसा लढणार? एकीकडे हिंदूंना आतंकवादी म्हणायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानशी हातमिळवणी करायची, याला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही."
संमेलनाध्यक्ष प्रा. पाठक म्हणाले, " सावरकरांनी साहित्याला कार्य साधनेचा भाग मानले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सावरकरांनी सीमा पक्‍क्‍या करायला सांगितल्या होत्या. प्रत्येक मुलाने सैनिकी शिक्षण घेत आत्मविश्‍वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी त्यांची शिकवण होती. "
(आधार : लोकसत्ता, सकाळ वृत्त)

स्वा. सावरकर साहित्य संमेलन रौप्यमहोत्सव, नाशिक
शनिवार १६ मार्च २०१३
[वृत्तपत्रातील वृत्तांत]

परिसंवाद: "सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षणसिद्धता"
सावरकरांची युद्धनीती अमलात आणा असाच संदेश सर्वच वक्त्यांनी दिला.
परिसंवादाची सुरवात करताना कमांडर आगाशे म्हणाले, " राज्य करण्यासाठी शक्ती पाहिजे आणि आक्रमणाला प्रतिआक्रमणानेच उत्तर दिले पाहिजे, हे सावरकरांचे विचार होते. या धोरणांकडे दुर्लक्ष केल्याने दहशतवाद, नक्षलवाद आणि काश्‍मीरसारखे अनेक प्रश्‍न उभे राहिले. देशाच्या सीमा निश्‍चित करा, असे सावरकरांनी सांगितले होते. मात्र आंतरराष्ट्रीय शांतिदूत होण्याच्या नादात भारताने आपल्या सीमाही असुरक्षित करून घेतल्या. त्यामुळे आपण अराजकतेच्या दिशेने चाललो आहोत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या युद्धनीतीचा भारताने स्वीकार केला असता तर देशातील आजची विदारक स्थिती निर्माण झाली नसती, असे परखड मत ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी मांडले. देशाला वाचविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आता सैनिक, गुप्तहेर आणि पोलिसाची भूमिका बजावली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
देशाच्या संरक्षणसिद्धतेवर बोलताना मेजर जनरल शशिकांत पित्रे म्हणाले, " कायम संरक्षणसिद्धता ठेवा, असे सावरकरांचे विचार होते. मात्र आपण नेमके त्याविरोधातील धोरणे राबवून एक मृदू राष्ट्राचा शिक्का मारून घेतला. त्यामुळे आपण आज सर्व बाजूंनी घेरले गेलो. पाकिस्तान प्रॉक्‍सी वॉरवर भर देत आहे, तर चीन अनेक आघाड्यांवर भारताला घेरत आहे. त्यामुळे नौसेना, वायुसेना आणि भूसेना अधिक सामर्थ्यवान करणे गरजेचे आहे. अण्वस्त्रांची प्रतिरोध क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. केवळ संरक्षणसिद्धता म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता नसून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील हिताची जपवणूक म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षितता."
भारतीय संरक्षण धोरणांवर टीका करताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन म्हणाले, "बांगलादेश भारतासाठी सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत चालली आहे. भारताला चहूबांजूनी रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चीनने मोठ्या प्रमाणात देशात आर्थिक घुसखोरी करून देशाला कमकुवत करण्याचे धोरण अवलंबले आहे. आपली शस्त्रास्त्रे जुनी झाली आहेत. तरीही आपण महासत्तेची स्वप्ने पाहत आहोत"

स्वा. सावरकर साहित्य रौप्यमहोत्सवी संमेलन, नाशिक, रविवार १७ मार्च २०१३
[समारोपदिन]
राष्ट्रभक्तीच्या प्रबोधनाबद्दल अनिस सय्यदचा सन्मान:
मोबदल्याची अपेक्षा न करता राष्ट्रभक्तीचे प्रबोधन करणाऱ्या या युवकाचा, ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य संमेलनात सन्मान करण्यात आला. दुष्काळाच्या झळांमध्ये कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिकमध्ये स्थलांतरित झालेला यवतमाळ जिल्ह्यातील हा युवक तिसरी पास असलेला गवंडी आहे. अनिसच्या कामाची ओळख नंदन रहाणे यांनी उपस्थितांना करून दिली. ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे "फटकारे' हे पुस्तक अनिसला भेट देण्यात आले. त्या वेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अनिसचे कौतुक केले. अनिसने सन्मानाला उत्तर देत असताना खरे देशभक्त उपेक्षित राहिल्याची सल आपल्या मनात असल्याचे सांगून सत्याग्रहाला जहाल क्रांतीची जोड मिळाल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे नमूद केले. यापूर्वी लातूरमध्ये झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनासाठी आपण उपस्थित होतो. तेथे सावरकरांचे विचार सामान्यांपर्यंत पोचत असल्याची प्रचिती आपणाला झाली आणि एक प्रेरणा मिळाल्याचेही अनिसने सांगितले.
परिसंवाद: सावरकरांचा राष्ट्रवाद
स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी का झाले -वक्ते प्रा शेषराव मोरे
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मूळ इस्लामच्या धोरणांचा अभ्यास केल्यानंतरच हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. त्यामुळे जोपर्यंत इस्लाम कळत नाही, तोपर्यंत सावरकर समजून घेता येणार नाही. सर्वांच्या न्यायहक्काचे रक्षण व्हावे, असे सावरकरांचे विचार होते. त्यामुळेच आपल्यावरील अन्याय रोखण्यासाठीच सावरकरांनी हिंदूंना एकजूट करण्याचा प्रयत्न केला.
अंदमानला जाण्यापूर्वी सावरकर हिंदू राष्ट्रवादी मुळीच नव्हते. मात्र, कारागृहात असताना त्यांनी कुराण आणि मूळ इस्लामच्या धोरणांचा अभ्यास केला. इस्लाममध्ये केवळ एकाच धर्माला स्थान असून, द्विराष्ट्रवादाची उद्‌घोषणा कुराणात आहे. इस्लामच्या धोरणांच्या आधारावरच पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी केली जात होती. शरीयतच्या आधारावर मुस्लिम नेते स्वतंत्र इस्लामची मागणी करीत होते. त्याला सावरकरांचा विरोध होता. या मुद्यावरच त्यांनी इस्लामचा अभ्यास केला. त्यानंतरच सावरकरांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. हिंदू संघटित केला पाहिजे, हे विचार तेव्हाच त्यांच्या मनामध्ये भरले. भारतीय नेत्यांमध्ये राष्ट्राविषयी अनास्था आहे. मात्र, सावरकर प्रखर राष्ट्रवादी आणि बुद्धिवादी होते. ज्यांनी सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास केला, त्यांचे जीवन प्रकाशमान होते. सावरकरांच्या विचारांची आज भारताला गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर सावरकरांच्या विचारांचा आधार घेतला असता तर देशातील आजची अराजक स्थिती राहिलीच नसती. सर्वांच्या हक्कांचे न्याय संरक्षण झाल पाहिजे, असेच सावरकरांचे मत होते. मात्र, अशी परिस्थिती दिसत नसल्यानेच त्यांनी आपल्यावरील अन्याय रोखण्यासाठी हिंदूंना एकजूट करायला सुरवात केली.
वक्ते : सावरकर अभ्यासक अविनाश कोल्हे
सावरकरांचा राष्ट्रवाद भूगोलनिष्ठित नव्हता तर संस्कृतिनिष्ठित होता. त्यात धर्म, अध्यात्माला स्थान नव्हते तर विश्वची माझे घर याचाच त्याला आधार होता. संपूर्ण हिंदु समाजाची पुनर्बांधणी त्यांना हवी होती. राष्ट्रहिताला प्राधान्य हेच सावरकरांचे प्रमुख वैशिष्ट्य होते. देशातील मुस्लिमांना त्यांचा मुळीच विरोध नव्हता पण महात्माजींनी चालवलेल्या मुस्लीम अनुनयाला मात्र तीव्र विरोध होता. राष्ट्रवादाच्या भक्कम पायावर हिंदू राष्ट्रवादाची उभारणी त्यांना अपेक्षीत होती. पण धर्माधिष्टित राष्ट्रवादी असा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. बलशाली राष्ट्रच जगावर अधिकार गाजवू शकते म्हणून भारताने शक्तिशाली राष्ट्र व्हावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या राष्ट्रवादावर देश चालला असता तर आज उभी ठाकलेली आव्हाने कधीच उभी राहू शकलि नसती.
वक्ते- वि. ह. भूमकर
त्यांचा राष्ट्रवाद जाज्वल्य होता. देशहित सर्वोच्च होते. ज्या मातीत जन्मलो, दफन झालो, तिच्याशी इमान राखणे हाच करा राष्ट्र्वाद असे ते सांगत. त्यांची राष्ट्रवादाची व्याख्या आता सर्वमान्य झाली आहे.
समारोपात सा. बांधकाम मंत्री छगन भुजबळ म्हणाले, " सावरकरांची देशभक्ती वादातीत होती. त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी नव्या पिढीला त्यांची थोरवी सांगण्याची आज गरज आहे. त्यांच्या या जन्मभूमीत त्यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासन पुढाकार घेईल."
अध्यक्ष यशवंत पाठक म्हणाले," सावरकरांचे विचार हा जगण्याचा श्वास झाला पाहिजे. त्यांनी समाजाला विद्न्यान निष्ठेचा अंकूर दिला आहे कि ज्यामुळे समाजाला एक नवसंजीवनी मिळाली आहे."

दि.म. २० मार्च १३:
प्रियंका डहाळे
यांचे नाशिकात झालेल्या सा.सा.संम्मेलनाबद्दलचे मनोगत :
सावरकरांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्यांनी जाणकारांकडून विश्लेषण ऐकण्यासाठी गर्दी केली हे संम्मेलनाचे यश म्हणावे लागेल. पारंपारिक श्रोत्यांपेक्षा तरूण व महिला यांची उपस्थिती लक्षणिय होती. ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते व भगूर जन्मभूमी असलेल्या सावरकरांचे नाशिकात स्मारक व्हावे म्हणून झटणाऱ्या सावरकरसाहित्य आणि इतिहासाचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद होती. अध्यक्ष पाठक यांच्याव्यतिरिक्त साहित्य केवळ नावाला चाखत या द्रष्ट्या नेत्याच्या हिंदुत्वाचाच जागर उद घाटनात झाला. त्यांच्या साहित्याचा पूर्णांशाने वेध घेतला गेला नाही व कालसापेक्ष चर्चा झालीच नाही. जर संयतपणे सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा आणि त्यांचे साहित्य सजगतेने मांडले गेले असते तर राजकारणाचा स्पर्श होऊनही हे संम्मेलन सावरकरांच्या साहित्याचा उत्सव ठरला असता.

माझे मत
सावरकरांचा आयुष्यानुभव आणि कार्य अफाट ! इतिहास, राजकारण, समाजकारण वगैरे जीवनाची सर्वच महत्वाची अंगे त्यांच्या साहित्यात एकजीव झाल्यासारखी असल्याने , संम्मेलन जरी साहित्याबद्दलचे असले तरी ते निव्वळ 'साहित्या'च्या परिघात बंदिस्त करणे निव्वळ अशक्य आहे असे मला वाटते.