काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.
बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?
अन्न रांधणे, बालसंगोपन, घराची व घरातल्या व्यक्तींची देखभाल ही परंपरेने स्त्रीला चिकटलेली कामे नव्या युगातही तशीच चालू राहिली. आणि त्यात आता घराबाहेर पडणार्या स्त्रीला घरातील + बाहेरील जबाबदार्या पार पाडण्याची धडपड करावी लागणे हे सर्वसामान्य चित्र झाले. संपूर्ण दिवस ऑफिस/ कारखाना/व्यवसायाच्या ठिकाणी काम केल्यावर स्त्रिया घरी आल्यावर देखील काम करतात. अगदी पाश्चात्य जगातील अर्थार्जन करणार्या स्त्रियाही एका अमेरिकन सर्वेक्षणानुसार आठवड्यात ३३ तास घरकामाला देतात तर पुरुष सर्वसाधारणपणे आठवड्यातून १६ तास घरकाम करतात. आणि या सर्वातूनच साकार होत गेली ''सुपरवूमन''.
''सुपरवूमन'' मानसिकतेच्या जवळपास जाणारी एक मजेदार गोष्ट सहज आठवली. एका घरात दोन पाली असतात. थंडीचे दिवस संपल्यावर एक पाल दुसरीला म्हणते, ''चल ना, बाहेर किती मस्त कोवळं ऊन पडलंय... जरा बाहेर जाऊन ऊन खाऊ.'' त्यावर दुसरी पाल म्हणते, ''छे गं बाई! मी बाहेर आले तर ही भिंत, हे छत कोण बरे तोलून धरेल? मी आहे म्हणून तर हे छत तोललं जातंय!!'' सुपरवूमनलाही असेच काहीसे वाटत असते.
समाजशास्त्रज्ञांच्या मते एकाच वेळी अनेक भूमिका निभावणारी स्त्री (जसे नोकरदार/व्यावसायिक, माता, पत्नी, मुलगी, सून, गृहिणी, स्वयंसेविका, कार्यकर्ती, विद्यार्थिनी इ. इ.) ही सुपरवूमन या वर्गवारीत येऊ शकते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ती या मानसिकतेत प्रवेश करू शकते. अगदी १३ वर्षाच्या मुलीपासून ते ७३ वर्षांच्या आजींपर्यंत कोणीही!! तसेच तिची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती कोणतीही असू शकते. ती एकाच वेळी सर्व आघाड्यांवर आपली समर्थता, गुणवत्ता दाखवण्याची तीव्र आस धरते व त्यानुसार धडपड करत राहते. ती एक उत्कृष्ट सुगरण असते किंवा बनू इच्छिते, त्याचबरोबर ती उत्कृष्ट गृह व्यवस्थापक असते, ती उत्कृष्ट माता सिद्ध होऊ बघते, आपल्या जोडीदारासाठी ती उत्कृष्ट सहचारिणी होऊ पाहते, ती आपल्या ऑफिसात उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी धडपडते, तिथेही ती ''उत्तम'' कर्मचारी म्हणून गणली जाण्याची इच्छा धरते. त्याच प्रमाणे ती वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेते - आवडीपोटी असेल / नसेल, पण प्रशंसेसाठी नक्कीच! आणि तिथेही आपण उत्कृष्ट सिद्ध व्हावे याकडे तिची ओढ असते.
रोज ठराविक वेळेत ऑफिस गाठायचे म्हणून भल्या पहाटे उठून जीवाचा आटापिटा करत घरचे-दारचे-मुलांचे आवरून धापा टाकत प्रवास करणार्या, मस्टरवर सही करून सलग आठ-दहा तास कामाला जुंपून घेणार्या स्त्रिया, घरी जाताना पुढच्या दिवसाची-सणवाराची- आजारी नातलगांची-मुलाबाळांची-आणखी कशाची तजवीज करता यावी म्हणून धडपडणार्या स्त्रिया, घरी पोचल्यावरही मरगळलेल्या शरीरात उत्साह आणून कंबर कसून पुन्हा एकदा स्वतःला घरात जुंपून घेणार्या स्त्रिया या खरेतर शहरांमध्ये, सर्व स्तरांमध्ये दिसतात. कधी नाईलाज म्हणून तर कधी आवड म्हणून या सर्व भूमिका निभावणार्या.
जरा या भूमिकांच्या खेळातील हलकी बाजू पाहिली तर काही स्त्रियांनी त्याबद्दल अतिशय मार्मिक, खुसखुशीत टिप्पण्या केल्या आहेत!!
A man's got to do what a man's got to do. A woman must do what he can't. - Rhonda Hansome.
Whatever women must do they must do twice as well as men to be thought half as good. Luckily, this is not difficult. - Charlotte Whitton.
I have yet to hear a man ask for advice on how to combine marriage and a career. - Gloria Steinem.
My second favorite household chore is ironing. My first being, hitting my head on the top bunk bed until I faint. - Erma Bombeck.
मजेची बात सोडली तर पाश्चात्यच काय, तर पौर्वात्य देशांमध्येही वेगळी स्थिती नाही! ''नील्सन सर्वे रिपोर्ट'' नामक शहरी स्त्रियांच्या वस्तू खरेदी विषयक अभ्यास अहवालात विकसनशील व अविकसित देशांमधील स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या व त्यानुसार त्यांच्या निदर्शनास आलेले तपशील हे दर्शवितात की सध्याच्या घडीला भारत, मेक्सिको व नायजेरियातील स्त्रिया सर्वाधिक संख्येत तणावाखाली वावरतात. भारतातील ८७% स्त्रियांनी सांगितले की बहुतांशी वेळ त्यांना तणाव, दडपणाचा सामना करावा लागतो. ८२ % भारतीय स्त्रियांनी सांगितले की त्यांच्यापाशी उसंत घ्यायला मोकळा वेळ नाही. भारतात स्त्रियांना ''इतरांची काळजी घेणार्या'', ''इतरांची देखभाल करणार्या'' म्हणून वाढविले जाण्याचा तर हा परिणाम नसेल? एका संशोधनानुसार भारतातील ७० ते ७२ % मध्यमवर्गीय / उच्च-मध्यम वर्गीय स्त्रिया कोणत्या न कोणत्या टप्प्याला नैराश्यभावनेच्या बळी असतात/ ठरतात असा निष्कर्ष काढला गेला आहे.
स्त्री जोवर कुटुंबासाठी व मुलांसाठी त्याग करते आहे तोवरच घराबाहेर त्या स्त्रीला मिळणार्या यशाची किंमत केली जाते हेच आजच्या सामाजिक मानसिकतेचे दारुण वास्तव आहे. बाईकडे घरातील व कामावरील प्रश्न सोडविण्याचे कौशल्य असले पाहिजे, तिला किरकोळ दुरुस्त्या करता आल्या पाहिजेत, तिच्यात वात्सल्य - स्वयंशिस्त - मातृत्व ठासून भरलेले पाहिजे (जणू काही जन्मतःच ते तिच्यात आलेले असते!), स्वयंपाकघरात तिने उत्तमोत्तम पदार्थ बनविले पाहिजेत, सासूचा मूड सांभाळला पाहिजे, दह्याचे विरजण लावता आले पाहिजे, दिसायला ती 'अप-टू-डेट' पाहिजे, ती गृहकृत्यदक्ष हवी, तिला माणसांची आवड हवी, तिच्यात आधुनिकता व पारंपारिकतेचा योग्य मेळ हवा..... अशी एक लांबलचक जंत्रीवजा अपेक्षांची यादी सध्याच्या स्त्रीसमोर असते. आणि त्यातील बर्याचशा अपेक्षांना ती स्त्री बघता-बघता स्वतःच्याच अपेक्षा समजू लागते!! तिचा सुपरवुमनगिरीकडे प्रवास सुरू होतो....
खरे तर कौतुक कोणाला आवडत नाही? प्रशंसेचे दोन शब्द ऐकल्यावर व्यक्तीला जरा जास्त बळ येते. पण सर्व विषयांमध्ये, सर्व आघाड्यांवर आपण ''चांगले'' किंवा ''उत्तम'' ठरावे, आपली इतरांनी स्तुती करावी अशी अपेक्षा या सुपरवूमनला सततच्या ताणाखाली किंवा दडपणाखाली ठेवते. सुपरवूमन ''स्वतःसाठी'' वेळ काढू शकत नाही किंवा त्याचे तिला महत्त्व वाटत नाही. स्वतःला अग्रक्रम देणे तिच्या गावी नसते. ती दुय्यमता स्वीकारते व कित्येकदा ही दुय्यमता तिच्या व इतरांच्या इतकी अंगवळणी पडते की दुय्यम अस्तित्वाचाही एक ''संस्कार'' बनतो. सुपरवूमन आपण घरी व बाहेर, दोन्ही आघाड्यांवर ''उत्कृष्ट'' ठरावे या अपेक्षेने काम करत असते. जे काम ती इतरांबरोबर विभागणी करून वाटून घेऊ शकते ते सगळीकडे धावून धावून स्वतः करणे हेही त्यातच येते. सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, त्यांनी आपले कौतुक करावे, आपण त्यांना (कायमच) सुख द्यावे, कोणाला तक्रारीला कुरकुरीला स्कोप देऊ नये या अपेक्षांचा कधीतरी कडेलोट होतो.
मग त्यातून कधी नैराश्य येते, कधी मनाशी कुढणे सुरू होते. इतरांपायी आपला बळी दिला जातोय किंवा आपल्यालाच त्याग करावा लागतोय असे वाटू लागते. इतरांना आपली किंमत नाही ही भावना प्रकर्षाने जाणवू लागते. त्यांच्या प्रशंसेविना, पोचपावतीविना सारे केलेले काम व्यर्थ / कमी महत्त्वाचे वाटू लागते. किंवा 'मी एवढी खपते पण कुणाला माझी किंमत नाही' यासारखे विचार मनात डोकावू लागतात. कधी मनात कडवटपणा येतो. तर कधी वैताग, निराशा, हताशपणा, कमकुवत झालेला आत्मविश्वास भेडसावत राहतो. याचा परिणाम मुख्यत्वे स्त्रीच्या मनःस्वास्थ्य, शरीरस्वास्थ्य, नातेसंबंध व एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर होत असतो. पर्यायाने त्या कुटुंबाच्या स्वास्थ्यावरही या सर्वाचा परिणाम होतो. अशा घरातील मुलांची वाढ निकोप तरी कशी होणार? त्यांना कामाच्या विभाजनाचे महत्त्व, स्वयंशिस्तीचे महत्त्व, स्वावलंबनाचे महत्त्व तरी कसे कळणार?
सुपरवूमनची ही काही लक्षणे सांगितली आहेत :
१. कामांची विभागणी न करता 'मैं सबकुछ कर सकती हूँ |' असा अट्टहास व भूमिका.
२. इतर स्त्रियांशी व स्वतःशीच प्रत्येक कामाच्या बाबतीत स्पर्धा
३. कोणाला ''नकार'' देणे कठिण वाटणे किंवा क्वचितच नकार देणे.
४. अंगावर जास्तीच्या जबाबदार्या ओढवून घेणे.
५. आपण केलेल्या कामाविषयी क्वचितच समाधान वाटणे.
६. सतत कामाच्या दडपणाखाली वावरणे.
७. आपण पर्फेक्ट माता/पत्नी/मुलगी असावे, आपण पर्फेक्ट एम्प्लॉयी असावे याची प्रबळ इच्छा.
८. सर्वांच्या सर्व मागण्यांना आपण पुरे पडण्याची तीव्र इच्छा.
९. खूप सार्या गोष्टी एकाच वेळी करत असल्याने सततची धावाधाव. मनात त्या आव्हानांना कमी पडण्याची, हरण्याविषयीची धाकधूक - भीती.
ह्या प्रश्नांची उत्तरे जर काही अंशी किंवा पूर्णतः होकारार्थी आली तरी ती 'सुपरवूमन सिंड्रोम' ची लक्षणे मानायला हरकत नाही :
१. तुम्हाला बरेचदा दडपण, दबावाखाली वावरल्यासारखे, कामाच्या ओझ्याने गुदमरल्यासारखे, तणावग्रस्त, इतरांपेक्षा मागे पडल्यासारखे, घायकुतीला आल्यासारखे वाटते का?
२. दिवसभरात तुमची कामे संपतच नाहीत व ''टू डू'' मधील कामांची यादी वाढतच जाते का?
३. तुमची दमणूक, थकलेले असणे, कंटाळलेले असणे हे अगदी सर्वसामान्य चित्र आहे का?
४. दिवसभराच्या रूटीनमध्ये जेवढ्या गोष्टी कोंबता येतील तेवढ्या कोंबणे व करणे याकडे तुमचा कल आहे का?
५. लहानसहान गोष्टींवरून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणे, चिडणे, ज्या गोष्टी व्हायला विलंब लागत आहे त्यांवरून चिडणे हे तुमच्यासाठी कॉमन आहे का?
६. इतर लोक काय करतात त्यावरून तुम्ही स्वतःला दडपण आणता का? त्यांची बरोबरी करता यावी याकडे तुमचे लक्ष असते का?
७. तुम्हाला आयुष्यात आनंद वाटत नाही का?
८. वारंवार स्वतःला इतरांसमोर सिद्ध करण्याची तुम्हाला गरज भासते का? उदा : तुमची आई, सासरचे नातेवाईक, सहकारी, बॉस, मित्रमैत्रिणी, नवरा किंवा तुम्ही स्वतः
९. तुमचे दिवसभराचे वेळापत्रक इतके व्यस्त आहे का, की त्यात व्यत्यय, आकस्मिक परिस्थिती, इमर्जन्सी किंवा एखाद्या मोठ्या संधीला सुद्धा वाव नाही?
वास्तविक पाहता, निम्न दर्जाचे किंवा सर्वसाधारण दर्जाचे काम करणे, सर्वसाधारण दर्जाचे आयुष्य जगणे ही कोणाचीच ''महत्त्वाकांक्षा'' किंवा ''स्वप्न'' नसते. परंतु सतत स्वतःला उत्कृष्ट बनवण्यासाठी ढकलत राहणे, जे जे प्रावीण्य मिळवू त्यात समाधानी नसणे, स्वतःला कमी महत्त्व देणे या सर्व गोष्टींचा सुपरवूमनच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वास्थ्यावर, मानसिकतेवर व नातेसंबंधांवर हळूहळू परिणाम होत जातो असे निरीक्षण आढळून येते. कधी कधी सुपरवूमन सिंड्रोम मानसिकतेची स्त्री तिच्या वाट्याला जर साचेबद्ध, ठराविक भूमिका असेल तर ती भूमिका आपण जास्तीत जास्त उत्कृष्टपणे कशी करू शकतो ह्याबद्दल ग्रस्त झालेली असते. (उदा : जर ती स्त्री गृहिणी असेल तर आपण उत्कृष्ट माता, उत्कृष्ट व्यवस्थापक, सुगरण इ. असावे यासाठीचा अट्टहास)
जिथे ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी करत जाण्यापासून बहुतांशी स्त्रियांची या दिशेने सुरुवात होते. पण त्या आपल्या या प्रवासात कधी ''सुपरवूमन''चा वेष परिधान करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही. बहुतेक सर्व स्त्रिया आपली नोकरी, घर, नातेसंबंध यांत खूप वेळ व शक्ती पणास लावत असतात. त्याचे कारण आहे की या सर्व गोष्टींबद्दल त्यांना वाटणारी प्रचंड आत्मीयता. परंतु ह्या प्रवासात आपल्या शक्ती, क्षमतेपलीकडील गोष्टी करायला जाणे किंवा वास्तवाला न धरून स्वतःला जास्त रेटत राहणे हे कधी सुरू होते ते त्या व्यक्तीलाही उमगत नाही.
बरं, आणि ह्या सर्वातून काही काळ स्वतःची मानसिक सुटका करून घेण्याचा स्त्रीचा मार्गही आभासी जगाचाच असतो कित्येकदा! कधी मग तिला टीव्ही सीरियल्समधील स्त्री-भूमिकांच्यात स्वतःची प्रतिमा दिसते तर कधी सीरियल्समधून दिसणार्या, तिच्यापेक्षाही वाईट स्थितीत असणार्या कितीतरी स्त्रिया या देशात आहेत यावर तिला समाधान मानावे लागते. रिअॅलिटी शोजमधून इतर लोक किती सहनशील असतात याचे पुरावे तिला मिळतात तर काही मालिकांमधील दु:ख-शोक-परंपरांच्या जाळ्यात वेढलेली स्त्री पाहून आपण तिच्यापेक्षा खूप चांगले आयुष्य जगतो अशी ती स्वतःची समजूत घालते. स्वतःच्या आरोग्य, सौंदर्य, प्रतिमा वर्धनासाठी वेगवेगळी प्रसाधने, उत्पादने विकत घेणे व वापरणे यांत ती स्वतःला दिलासा देऊ पाहते.
फार कठोर वाटतंय का हे निरीक्षण? तर ही मानसिकता तुम्हाला आज जगात अनेक ठिकाणी दिसेल. मुळात सुशिक्षित, बुद्धिवान, चांगले कमावणार्या स्त्रियांना जगात, कुटुंबात, समाजात जास्त टीकेला तोंड द्यावे लागते हे उघड वास्तव आहे. आणि मग त्याला बळी पडून स्वतःला पेलणार नाहीत इतकी अवास्तव उद्दिष्टे समोर ठेवून काम करणार्या स्त्रिया जगात कमी नाहीत. त्यातून त्यांचीच हानी होत आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
कुठे आहे स्वतःसाठी वेळ? स्वतःच्या तब्येतीची हेळसांड, दुर्लक्ष हेही त्याचे आणखी काही परिणाम. मग भुकेवर परिणाम होतो, एनर्जी कमी पडते, अतीव दमणूक जाणवते, त्यासाठी वेगळी ताकदीची औषधे, शरीराचे स्वास्थ्य बिघडते त्यासाठी औषधे, रात्री नीट झोप येत नाही म्हणून झोप येण्यासाठी औषधे, नैराश्य येते म्हणून अँटिडिप्रेसंट्स असे दुष्टचक्र सुरू होते. डॉक्टरने लिहून दिलेली औषधे मग स्वतःच्या मनाने घेण्यास सुरुवात होते. त्यांवरचे अवलंबित्व वाढते. भावनिक ताण सहन होत नाहीत. सतत मुलांची काळजी, नोकरी-व्यवसायाची काळजी, घराची काळजी, डेडलाईन्स, कामांचे ओझे, कुटुंबाच्या मागण्या आणि कामात साथ न देणारे - सहकार्य न करणारे गृहसदस्य / जोडीदार यांमुळे हे प्रश्न कैकपटींनी वाढत जातात.
आणखी एक दिसणारा परिणाम म्हणजे स्वतःच्या पर्फेक्शन बरोबरच इतरांकडूनही तेवढ्याच पर्फेक्शनची अपेक्षा करणे व त्याबद्दल अतिशय आग्रही, ठाम असणे. जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर त्याचा पिच्छा पुरविणे. त्यातून आपले नातेसंबंध, सहकारी दुखावले जाण्याची पर्वा नसणे. निर्णयशक्तीवर होणारा परिणाम, अनिश्चितता, कामावरून सारखे लक्ष विचलित होणे, मन एकाग्र होण्यास अडचण अशा इतर गोष्टीही काही केसेसमध्ये दिसून येतात.
मुळात सुपरवूमन हेच एक आभासी व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांच्या अपेक्षा पुर्या करणारी, सर्व भूमिका उत्कृष्टपणे करणारी, सर्व कामांत तरबेज अशी व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकत नाही. सर्वांना आपला वेळ, श्रम, अग्रक्रम देणारी स्त्री मनातून उपाशीच राहते - कारण ती स्वत:लाच वेळ देत नाही. पर्यवसान मनात जाणवणारे असमाधान, पोकळी, नैराश्य यांत होते.
काय उपाय?
- सर्वप्रथम मनातल्या मनात का होईना, स्वतःला हा प्रॉब्लेम आहे याची कबुली देणे ही या मानसिकतेतून बाहेर येण्याची पहिली पायरी आहे.
- सगळ्या गोष्टी 'मॅनेज' केल्याच पाहिजेत, त्या उत्कृष्टच असल्या पाहिजेत हा अट्टहास थांबवावा.
- तुम्ही एखाद्या गोष्टीत वाकबगार नाही म्हणून लाज, शरम, नैराश्य, भीती, कमीपणा वाटायची गरज नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वात इतर कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवावे.
- मल्टि-टास्किंग कमी करावे. आयुष्यातील, दिनक्रमातील गुंतागुंत वाढवण्यापेक्षा ती कमी कशी करता येईल यावर लक्ष द्यावे.
- आपल्या गृहसदस्यांची, सहकार्यांची या कामी जरूर मदत घ्यावी. त्यांनाही सामील करून घ्यावे. विश्वासू व्यक्तींजवळ मन हलके करावे.
- आलेल्या दिवसाचे स्वागत स्वतःबरोबर थोडा गुणात्मक वेळ घालवून करावे. घड्याळावरून सततची नजर हटवावी. आपल्या 'टू डू' लिस्टमधील कामांच्या संख्येवर मर्यादा आणावी. मोकळा श्वास घ्यावा. इतरांची आपल्या कामांमध्ये मदत घ्यावी.
- आज मी चिडचिड न करता, न घाबरता, नैराश्य टाळून आनंदाने माझी कामे करणार आहे हे मनाशी ठरवावे.
- शरीराला व मनाला दिवसातून काही काळ तरी विश्रांती देण्याची सवय लावून घ्यावी. रात्रीची झोप किमान ६ ते ७ तासांची व निर्वेध हवी. रूटीन नॉर्मल हवे. (झोपायच्या व उठायच्या वेळा). सुरुवातीला हे थोडे कठीण वाटेल, पण सवयीने साध्य होईल. तणावमुक्तीसाठी योग्य उपाय करावेत. उदा : मेडिटेशन, योगा इ. तसेच स्पा, मसाज, सहल यांसारखे उपाय करावेत.
- जिथे जिथे तुम्हाला कामाचे दडपण, तणाव जाणवेल तिथे सहकारी, विश्वासू व्यक्तींची त्या कामी मदत अवश्य घ्यावी. किंवा त्यांच्यापाशी मन मोकळे करावे.
- आपल्या कामांचा आवाका ठरवून घ्यावा व त्याखेरीजच्या कामांना स्पष्टपणे किंवा सौम्यपणे पण ठाम ''नकार'' द्यायची कला आत्मसात करावी. किंवा सरळ सरळ ''नाही'' म्हणून सांगावे.
- आयुष्यातील आपले अग्रक्रम ठरवावेत व त्यांनुसार काय महत्त्वाचे आहे ते ठरवावे. त्यात आपल्या साथीदाराचाही पुरेपूर सहयोग घ्यावा.
- तुम्ही एखादे काम करू शकत नसल्यास स्वतःला मनात अपराधी वाटणे, इतरांना त्याबद्दल सॉरी म्हणत राहणे थांबवावे. होईल सवय!
- आपल्या सहचराशी / जोडीदाराशी, गृहसदस्यांशी, मित्र-मैत्रिणी / नातेवाईक यांच्याशी तुमच्या या प्रॉब्लेमबद्दल बोला. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. तुमच्यावर किती ताण येत आहे याची त्यांना कल्पना द्या. एकटीनेच सर्व तोलले पाहिजे असा कोणताही नियम नाही. त्यांची मदत घ्या. कामाचे वाटप करा. आवश्यक तिथे मोलाने / बाहेरून काम करून घ्या. फायदा होईल.
आयुष्यात महत्त्व कशाला आहे?
१. 'आपल्या आयुष्यात महत्त्वाचे काय आहे?' या प्रश्नावर तुम्ही स्वतः स्वतःशी, व तुम्ही व तुमचा जोडीदार मिळून एकमेकांशी बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच तुम्हाला तुमचे अग्रक्रम उलगडतील. मुलं मोठी झाल्यावर ती जेव्हा समाजात स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरतील तेव्हा त्यांनी कसे असावे असे तुम्हाला वाटते? त्या दृष्टीशी तुम्ही आताच्या घडीला मुलांना ज्या ज्या क्लासेस, अॅक्टिव्हिटीज इ. मध्ये गुंतवत आहात ते कितपत महत्त्वाचे आहे हे ताडून बघाल का? तुमच्या वैवाहिक नात्यात तुम्हाला काय हवे आहे? काय अपेक्षित आहे? कशाला महत्त्व आहे? हेही अवश्य पहा.
२. एक स्वाध्याय म्हणून तुमच्या सर्व कमिटमेंट्सची व नेहमीच्या अॅक्टिव्हिटीजची एक यादी करा. तुमच्या दैनिक, साप्ताहिक, मासिक कमिटमेंट्स, जबाबदार्या कोणकोणत्या आहेत? ही यादी डोळ्यांखालून घातलीत की तुम्हालाही कळेल की तुम्ही किती किती ठिकाणी स्वतःला बांधून घेतले आहे!
तुमचे कदाचित ''पर्फेक्ट'' आयुष्य नसेलही! त्यात अनेक गोंधळ, विलंब, व्यत्यय असतील.... पण मिनिटा-मिनिटाचा हिशेब मांडणारे, आकस्मिक परिस्थितीत कोलमडून पडणारे आयुष्यही कोणाला हवे असते? मुलांच्या बरोबर, जोडीदाराबरोबर मनमोकळे क्षण घालविणे, स्वतःबरोबर निवांत क्षण व्यतीत करणे यासारखे दुसरे सुख नाही! सुपरवूमनच्या वेषातून बाहेर येऊन पुन्हा असे निवांत, दिलासा देणारे क्षण अनुभवण्यासाठी एवढे कारण माझ्या मते पुरेसे आहे.
-- अरुंधती कुलकर्णी
-------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ : आंतरजालावरील अनेक संकेतस्थळे व त्या शिवाय,
The Superwoman’s Struggle, Shefalee Vasudev, Jul 24 2011, THE INDIAN EXPRESS.
End the Superwoman Syndrome, MIKELANN VALTERRA, March 19, 2010.
Overcoming the Superwoman Syndrome, Dr. Madeline Ann Lewis.
Working Outline – Fear, Worry and Anxiety, TRYING TO DO IT ALL, Connie Larso.
Superwoman syndrome credited to popping prescription pills, Feb 26, 2010, http://www.dnaindia.com/health/report_superwoman-syndrome-credited-to-po...
Beware of Superwoman Syndrome, Work-life Satisfaction Boosts Productivity for Women Scientists, http://www.elsevierfoundation.org/new-scholars/stories/video-superwoman.asp
(* सार्वजनिक धागा)
छान लेख आहे.
छान लेख आहे.
छान आणि अभ्यासपूर्ण लेख.
छान आणि अभ्यासपूर्ण लेख. बऱ्याच प्रतिक्रियाही खरंच वाचनीय आहेत.
एक शंका: आपल्या आधीच्या
एक शंका: आपल्या आधीच्या पिढीला (जसे कि आई/सासू) यांना ह्या सिंड्रोम मधून बाहेर कसे काढावे? आपले आपण काय करावे हे या लेखात दिले आहे पण आपल्या आसपासच्या बायकांना यातून बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो?
@पियु परी, त्यांना आपण हा लेख
@पियु परी, त्यांना आपण हा लेख तर नक्कीच वाचायला देऊ शकता!
आज लेख वर आल्याने उपाय परत
आज लेख वर आल्याने उपाय परत एकदा रिवाइज केले.
हे पुन्हा पुन्हा करायची गरज निर्माण होतेय.
धन्यवाद अरुंधती.
सुंदर लेख. सुपर-वुमन
सुंदर लेख.
सुपर-वुमन सिन्ड्रोम प्रमाणेच सुपरमॅन सिन्ड्रोम ही (सगळ्या आर्थिक गरजा भागवणारा कर्ता-पुरुष) असतो. हा दुसरा सिन्ड्रोम आपल्याकडे बहुतेक एकत्र कुटुंब पद्धत जास्त काळ टिकल्या-मुळे जास्त काळ दिसत असावा. हे दोन्ही सिन्ड्रोम परस्पर पूरक आहेत आणि त्यातल्या फक्त एकावर स्वतंत्र-रित्या उपाय अथवा त्यात बदल घडवून आणणं अवघड दिसतं, झाला तरी एकतर तो बदलही तणावपूर्ण होईल अथवा व्यक्ती अल्पावधीत पहिल्या स्थितीत जाईल.
यातल्या कुठल्याही सिन्ड्रोमचा विवाहित स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रसंगी त्रास होतो. उदा.बायको साठी आवर्जून क्वालिटी-टाईम काढला तरी त्यावेळी तिच्या डोक्यात बाकीचीच कामे असतात आणि त्यातून अनेकदा रसभंग, चिडचिड आणि वाद होतात. दोन्ही सिन्ड्रोम्सची 'घराची गरज' यातून निरुपद्रवी सुरवात होऊन काही वर्षांतच 'व्यसनात' रुपांतर होतं, त्याला ईगोही आपोआप जोडला जातो आणि मग ते सुटणं महा-कर्मकठीण होऊन बसतं. एकीकडे म्हणायचं की होय मी भरडला/भरडली जातोय/जातेय आणि दुसरीकडे ते सोडण्याची पण इच्छा नसते. अशावेळी बाहेरून मदत मिळत असली तरी ती जाणून-बुजून नाकारली जाते. इतर कुठल्या व्यसना सारखंच याला व्यक्ती-नुरूप हाताळलं पाहिजे (म्हणजे जिथे अतिरेक दिसत असेल तिथे). पण हा अतिरेक होतोय, जोडीदार त्याच्याच 'सुपर' प्रतिमेत अडकून पडलाय हे ओळखून हळुवारपणे त्याला, तिला त्यातून बाहेर काढण्याची संवेदनशीलता दुसऱ्यात / इतर कुटुंबियांमध्ये हवी. असा साथीदार/कुटुंबीय असतील तर ती व्यक्ती भाग्यवान.
परंपरा अथवा निसर्गाने पुरुष किंवा स्त्रीला काही विशिष्ट कामांसाठी कमी किंवा अधिक योग्य बनवले आहे असं जर वाटत असेल तर ती भावना मनातून प्रयत्नपूर्वक दूर सारली पाहिजेत (कुठलेही संशोधन निष्कर्ष न वाचता). दुसऱ्याला 'तडतड' जरा कमी कर म्हणण्याऐवजी जमेल तेंव्हा आणि जमेल तितकं आपण त्याच्या कामात सहभागी होण्याचा विचार केला तर काम 'कुणाचं' आहे हा विचार मागे पडून सगळ्यांवरचाच ताण कमी होऊ शकेल. शेवटी उद्देश तर तोच आहे, नाही का?
मुंगेरीलाल संयुक्तामधे?? माझी
मुंगेरीलाल संयुक्तामधे?? माझी काही चूक तर होत नाहीये ना?
सुमेधाव्ही, हा बाफ सार्वजनिक
सुमेधाव्ही, हा बाफ सार्वजनिक आहे. तसं हेडर पोस्टीतही नमूद केलेलं आहे.
सुमेधाव्ही, संयुक्तामधले काही
सुमेधाव्ही, संयुक्तामधले काही लेख हे सगळ्यांसाठी खुले आहेत, त्यापैकी हा एक असावा. ह्या लेखावर सगळ्यांचे प्रतिसाद आहेत.
अच्छा...हे माहीत नव्हते.
अच्छा...हे माहीत नव्हते.
उत्तम, मुद्देसूद प्रतिसाद,
उत्तम, मुद्देसूद प्रतिसाद, मुंगेरीलाल.
>> सुपरमॅन सिन्ड्रोम
हा मुद्दा अगदी पटला.
मी पण आज पुन्हा वाचला हा लेख.
मी पण आज पुन्हा वाचला हा लेख. पुन्हा पुन्हा वाचायलाच हवा असाच आहे खर तर!
अशच विषयावरचं मी एक चेतन भगतचं आर्टिकल वाचलं होतं. TOI मधे आलं होतं. मेल मधुनही फिरत होतं.
इथे चिकटवलं तर चालेल का?
मी पण परत आज हा लेख वाचला व
मी पण परत आज हा लेख वाचला व बहिणीलाही सांगितला. दोघीही या सिंड्रोम चा बळी आहोत/होतो.
या लेखाची खूपच मदत होतेय. अरुंधती कुलकर्णी , खूप धन्यवाद .
मुंगेरीलाल, चांगला प्रतिसाद!
मुंगेरीलाल, चांगला प्रतिसाद!
छान प्रतिसाद मुंगेरीलाल.
छान प्रतिसाद मुंगेरीलाल.
मुंगेरीलाल, पटले. धन्यवाद.
मुंगेरीलाल, पटले. धन्यवाद.
छान प्रतिसाद मुंगेरीलाल.
छान प्रतिसाद मुंगेरीलाल.
मी या सिंड्रोमबद्दल मासिकात /
मी या सिंड्रोमबद्दल मासिकात / वर्तमानपत्रात लेख वाचलेत. ते वाचून किंवा हा लेख वाचून देखील मला तरी असा सिंड्रोम आहे, असतो हे पटत नाही.
इतर स्त्रिया त्यांचे आयुष्य, कमिटमेंट्स, जबाबदार्या कशा मॅनेज करतात अन त्यात त्यांचं काय चुकतं , अन आपण कसे त्यातले नाहीत, आपल्यालाच कसा सुवर्ण्मध्य जमलाय अशा अॅटिट्यूड असलेल्यांनी या सिंड्रोमचा प्रचार केलाय असं वाटत राहतं. इतरांना मदत व्हावी यापेक्षा इतरांचं कुठे अन कसं चुकतं हे सांगणे अन त्यांना मागे खेचणे हा उद्देश वाटतो या सगळ्या लिखाणात.
मुंगेरीलाल, तुमचे पोस्टही
मुंगेरीलाल, तुमचे पोस्टही पटलेच!
पर्फेक्शनच्या, इतरांपेक्षा स्वतःला सरस सिद्ध करण्याच्या किंवा स्वतःच स्वतःशी स्पर्धा करायच्या नादात जीवघेणी किंवा न झेपणारी धावपळ करत लवकर ''बर्न आऊट'' होणारे अनेक टॅलंटेड, हुशार लोक सध्या आजूबाजूला बघत आहे. ह्यात स्त्रिया व पुरुष दोन्ही आहेत. मग तब्येत अचानक इतकी बिघडतेय, किंवा प्रचंड मानसिक तणाव येतोय म्हणून कंपल्सरी ब्रेक घ्यायला लागतोय. लहान वयात सिव्हियर डायबिटीस, हाय बी.पी., हार्ट प्रॉब्लेम्स, श्वसनाचे प्रॉब्लेम्स चिकटत आहेत. काहीच करायचा उत्साह वाटत नाही, भुकेवर-झोपेवर परिणाम, नैराश्य यांच्या चक्रात आहेत. स्वतःची तब्येत, शरीर-मनाचे गाडे रुळावर आणायला बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. आणि हे करताना पुन्हा आर्थिक व कौटुंबिक जबाबदारीची गणिते जमवायची म्हणून त्याचा ताण आहेच!
मुंगेरीलालचा प्रतिसाद आवडला.
मुंगेरीलालचा प्रतिसाद आवडला. सुपरमॅन सिंड्रोम सुध्दा विचार करायला लावणारा आहे.
संयुक्ता मध्ये पहिल्यांदाच
संयुक्ता मध्ये पहिल्यांदाच पोस्ट केलं, ते आवडल्याचं बघून बरं वाटलं.
आज लेख पुन्हा सावकाश वाचला. प्रॉब्लेम तर आहेच, तो नाकारणं धोकादायक आहे. मला तरी निदान या लेखात कुठेही यात चुकांकडे बोट दाखवण्याचा आविर्भाव दिसला नाही. उलट एक आरसा स्वतः समोर धरण्याची कळकळीची सूचना जाणवते की ज्यात पाहून जिने-तिने ठरवायचंय की उल्लेख केलेली तणावाची लक्षणं सतत जाणवत आहेत किंवा नाही आणि असतील तर काय करता येईल म्हणजे त्यांची तीव्रता कमी करता येईल.
पण गम्मत अशी की ही लक्षणं नोकरी, घर, मुलं, नवरा आणि इतर यांची वास्त-पुस्त करणाऱ्या बाईत दिसत असली तरी त्याचं मूळ इतरांच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षांत आहे, त्यामुळे उपाय केवळ तिला सांगून उपयोग नाही. तिला हे समजत नाही असं वाटतं का? सगळं माहित असतं, पण तिच्या दृष्टीनं ह्याची दिशा बदलणं अवघड आहे, या सगळ्यांना पुरं पडणं यात ती तिचं सेल्फ एस्टीम शोधते, त्याला ती कशी धक्का लागू देईल हे उपाय करून? उलट तू इतकं करून का दमतेस बाई, असं कुणी म्हंटलं की तिच्या अंगावर मुठभर मांसच चढतं.
एक जुनी गोष्ट आठवते. एकदा एक माणूस वाळवंटातून जात असतो. त्याला पाहून वायुदेव म्हणतात ‘पहा याच्या अंगावरची शाल कशी उडवतो ते’. असं म्हणून ते जोरजोरात वाहायला लागतात. पण होतं उलटंच, जितका वारा वाढतो तितका तो माणूस शाल घट्ट लपेटून घेतो. वायुदेव हरतात. सूर्यदेव इतकं वेळ हे हसून पाहत असतात, ते ढगाआडून बाहेर येतात... स्वच्छ उन पडतं आणि तो माणूस हलकेच शाल काढून खांद्यावर घेतो.
उपमा जरा बाळबोध वाटेल, पण मला वाटतं बदल आणि अवेअरनेस सुपरवुमन च्या आजूबाजूच्या लोकांमध्ये (ऑफिस मधले सहकारी, नवरा, मुलं आणि इतर नातेवाईक) यायला हवा. त्यांच्यासाठी कुणीतरी लिहायला हवं, त्यांच्यासाठी पण उपाय सांगायला हवेत. एखाद्यावर काही उपचार करायचे असतील तर औषधं/तपासण्या/पत्थ्य लिहिलेली चिट्ठी बरोबरच्या व्यक्तीला समजावून सांगतात, केवळ रुग्णाला नव्हे. त्यांची साथ नसेल तर ती त्यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही, असं मला वाटतं.
मुंगेरीलाल, पोस्ट पटली आणि
मुंगेरीलाल, पोस्ट पटली आणि आवडली.
सायो +१.
सायो +१.
मुंगेरीलाल >>+१
मुंगेरीलाल >>+१
मुंगेरीलाल यांची शेवटची पोस्ट
मुंगेरीलाल यांची शेवटची पोस्ट - संयुक्तामधल्या धाग्यावर बर्याच दिवसांनी (की महीन्यांनी) कुण्या पुरुष आयडीची इतकी व्यवस्थित आणि विचार केलेली पोस्ट पाहीली.
>>संयुक्तामधल्या धाग्यावर
>>संयुक्तामधल्या धाग्यावर बर्याच दिवसांनी (की महीन्यांनी) कुण्या पुरुष आयडीची इतकी व्यवस्थित आणि विचार केलेली पोस्ट पाहील>>>>>>>+१
मवा +१०००० मुंगेरीलाल सुरेख
मवा +१००००
मुंगेरीलाल सुरेख पोस्ट
अतिशय अतिशय सुंदर लेख,
अतिशय अतिशय सुंदर लेख, अरुंधती. वाचला होताच आधी. आज पुन्हा वाचला. परिस्थिती माणसाला बनवते पण अनेकवेळा आपणही आपली परिस्थिती घडवत रहातो... आणि "बनत" रहातो. हा सिंड्रोम त्यातलाच, बहुतेक.
ह्याची बळी मीही होतेच उमेदीच्या (??) काही काळात. मग त्यातला फोलपणा लक्षात आला. कुणीतरी वर म्हटलय त्याप्रमाणे... कुणालाही (स्वतःलाही), काहीही "दाखवून देण्यासाठी" काही करायचंच नाही.
to prove oneself...
ह्यातला जो अहं आहे तो दूर सारता आला अन प्रयत्नांमधे प्रामाणिकपणा आला की, काहीही केलं तरी छान अन नाही जमलं तरी छानच... अशी एक झकास अवस्था होऊन जाते.
खूप आवडला लेख... आणि त्यावरचं इतरांचं विचारमंथनही.
दाद, तुमच्या अहंबद्दलच्या
दाद,
तुमच्या अहंबद्दलच्या निरीक्षणास जोरदार अनुमोदन. मुंगेरीलाल यांचे प्रतिसाद वाचनीय तर आहेतच, शिवाय मननीयही आहेत. तुमचा वरील प्रतिसाद आणि मुंगेरीलाल यांचे सारे प्रतिसाद एकत्र वाचले तर लेखाची नस अचूकपणे पकडलेली दिसून येते.
आ.न.,
-गा.पै.
अरुंधती कुलकर्णी, आपला इथला
अरुंधती कुलकर्णी,
आपला इथला प्रतिसाद वाचला. अगदी नेमकी अश्शीच केस नुकतीच पाहण्यात आली. तुम्ही सांगितलेले जवळजवळ सगळे मुद्दे लागू पडताहेत. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्न होता! मात्र सुदैवाने पीडीतेने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तिने हे स्वत:च केलं की कुणाच्या सल्ल्यानंतर ते माहीत नाही. मात्र पाउल स्तुत्य आहे. बर्याचश्या बायकांना हे स्वत:हून जमत नाही.
आ.न.,
-गा.पै.
Pages