उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग १ : पूर्वतयारी ... !

Submitted by सेनापती... on 16 June, 2012 - 16:09

होळीच्या दिवशी पुरणपोळ्या खाण्यासाठी आमच्या घरी काही मित्र-मैत्रिणी जमलो होतो. गप्पा मारता-मारता शमिकाने अचानक सिक्कीमचा विषय काढला. सिक्कीमला जायचे हा विषय तसा तिच्या डोक्यात गेली १० वर्षे होता. अनघा, राजीव काका यांनी तो विषय उचलून धरला. दुसर्‍या दिवशी भाग्यश्रीताईने देखील नक्की येणार असे पहिल्या सेकंदाला कळवून टाकले. बघता बघता आम्ही ५ जण तयार झालो आणि मग माझी पुढची तयारी सुरू झाली.

पुढच्या ३-४ दिवसात जालावरून बरीच माहिती मिळवून सिक्कीमला काय-काय बघायचे, सिक्कीमच्या नकाशात ह्या जागा कुठे आहेत त्याप्रमाणे कसे कसे बघायचे याचा एक तक्ता बनवला. एकुण किती दिवस लागतील, प्रवासाचे साधन काय असावे, कुठे राहावे, एकुण खर्च किती येईल ह्यावर संपूर्ण महिन्यात मी, शमी, अनघा, श्री आणि राजीव काका सतत मेल्स मधून माहितीची देवाण-घेवाण करत होतो. तारखा नक्की झाल्यावर पाहिले विमानाची तिकिटे बुक करून घेतली. जालावरुन महिती मिळवताना सिक्किम पर्यटन या संकेतस्थळाचा खुप फायदा झाला.

सर्व हॉटेल ऑन्लाईनच शोधुन बुकिंग्स केली. नरेंद्र गोळे काकांनी नुकतीच सिक्किम सहल केल्यामुळे त्यांच्याकडुनही थोडी माहिती मिळु शकली. माझा मित्र सुहास जोशी याने सिक्किम मधला सर्वात महत्वाचा संपर्क मला दिला. तो म्हणजे श्री. तांबे. श्री तांबे हे सध्या सिक्किम येथे केंद्र सरकारतर्फे विशेष अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सिक्किम स्प्रिंग्स हे संकेतस्थळ नुकतेच विकसीत केले आहे. ह्याच धर्तीवर आता सह्याद्री स्प्रिंग्स हे संकेतस्थळ विकसीत होत आहे. श्री. तांबे यांच्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाची मदत झाली. त्यांनी आम्हाला सोनम भुतिया, ज्यांचा सिक्किम येथे पर्यटनासाठी गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे, यांच्याशी भेट घालुन दिली. ह्या सोनमने आम्हाला संपुर्ण प्रवासात त्याच्याकडचा खास ड्रायव्हर सत्यम गुरुंग आणि त्याची झाय्लो गाडी पुर्ण वेळ दिली होती. हा सत्यम उर्फ सत्या आमचा भलताच चांगला दोस्त बनला. त्याचे किस्से पुढे येतीलच. Happy पुर्व आणि उत्तर सिक्किम येथे जाण्यासाठी लागणारे परमिट देखील सोनम यांनी आम्हाला बनवुन दिले.

एकंदरीत सर्व पूर्वतयारी झाली आणि शेवटच्या काही दिवसात अनघाने कामाच्या कारणाने यायचे रद्द केले. शेवटी आम्हा ४ जणांचा १३ दिवसांचा कार्यक्रम असा ठरला...

१५ मे - मुंबईवरुन विमानाने प्रयाण. दुपारी जमेल तसे आणि तेवढेच कोलकत्ता दर्शन. रात्रीच्या ट्रेनने न्युजलपायगुडी येथे प्रयाण.
१६ मे - न्युजलपायगुडी ते गंगटोक प्रवास.

१७ मे - गंगटोक स्थळदर्शन.
१८ मे - पुर्व सिक्किम स्थळदर्शन. नथु-ला, चांगु लेक आणि, बाबा मंदिर वगैरे.

१९ मे - दक्षिण सिक्किम स्थळदर्शन. नामची, चारधाम वगैरे.

२० मे - उत्तर सिक्किम स्थळदर्शन. गंगटोक वरुन लाचुंग येथे प्रयाण.
२१ मे - झिरो पॉईंट, युमथांग बघुन लाचेन येथे पोचणे.
२२ मे - गुरुडोंग्मार लेक पाहुन गंगटोकमध्ये परत.

२३ मे - पश्चिम सिक्किम स्थळदर्शन. युकसुम वगैरे.
२४ मे - पश्चिम सिक्किम स्थळदर्शन करुन दार्जिलिंग पोचणे.

२५-२६ मे - दार्जिलिंग स्थळदर्शन.
२७ मे - बागडोगरा येथे पोचून कोलकत्तामार्गे परतीचा प्रवास.

सदर सफरनामा १०-१२ भागात येथे सादर करायचा मानस आहे. पुढच्या भागात भरपूर फोटो येतीलच.

दोन्ही फोटो - सिक्किम पर्यटन या संकेतस्थळावरुन.

क्रमशः... उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा, राजीव काका हे माझे आंतरजालिय मित्र आहेत. भाग्यश्री तर माबोवर देखील आहेत. नचिकेतच्या खांदेरी धाग्यात राजीव काकांचा उल्लेख येउन गेलेला आह.

फोटो लिहिल्याप्रमणे पुढच्य भागापासुन सुकाळात. Happy चिंता नसावी. अजुन काही प्रश्न? Proud

उत्सुकतेने प्रवास वर्णनाच्या प्रतिक्षेत आहे
तुझं लिखाण वाचून नीट्पणे कल्पना येते त्या त्या प्रदेशांची. तयारी,गमती,अडचणी सर्व गोष्टींबद्दल छान समजतं.
Happy

झ्झे ब्बात!!! Happy

सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने... !
>>>>> लवकर येऊ देत. लेखाची आणि फोटोंची वाट पाहत आहोत.

छान.

लवकरच पुढचे भाग टाकणार आहे. एका भागात साधारण किती फोटो असावे? खुप जास्त असले तर लोड व्हायला वेळ लागेल ना...

मस्त. असेच भटकुन या आणि इथे सविस्तर लिहा. ज्यांना जायचेय त्यांना मदत होईल.

आता फोटो नी पुढचा वृ. येऊदे लवकरच...

सेना खुप खुप स्वागत ह्या धाग्याचं.... मी ही सहल १७ वर्षांपुर्वी आई बरोबर केली होती. आई, मी, माझ्या ऑफीस मधल्या सीनीयर सहकारी, त्यांचे पती व मुलगा आणि इतर ३ मैत्रिणी. असे गेलो होतो. आम्ही ६ बायका आणि ते दोन पुरुष. ही सहल माझ्या आणि माझ्या आई साठी फार महत्वाची होती कारण नंतर ६-८ महिन्यात माझं लग्न होतं. त्या मुळे तिथल्याआठवणी कायम मनात आहेत.

पुर्व तयारी हे शिर्शक वाचलं आणि पोटात गोळा आला. आम्ही आमची सहल जेंव्हा चालु केली तेंव्हा सुरुवातिलाच इतके अडथळे आले, की विचारता सोय नाही. त्याला कारण झालं भाजप चं देश व्यापी संमेलन!!!! हे सम्मेलन त्या वर्षी मुंबईत होतं. आम्ही निघणार त्यादिवशी त्याची दुपारी सांगता झाली. आणि आमची तिकिटं गीतांजली ची होती. सेकंड ए.सी. कल्याण ला गाडी ५ तास उशीरा आली. आणि आली ती पुर्ण भरुन. मुंगी शीरायला वाव नाही.आम्हाला कळेच ना काय करावे ते. ही गाडी चुकली तर पुढली एन.जे. पी. ची चुकणार!!!! मग मला काय झालं ते कळलच नाही. मी एका दरवाजातुन आत मुसंडी मारली. मी गेले म्हणुन आई चढली. माझे दोन मित्र आम्हाला सोडायला आले होते. त्यांनी भराभर सामान चढवायला घेतले. दारातुन प्रचंड गर्दीत धक्के मारत मी आत गेले. पाठोपाठ इतरही सगळे आले. भयानक धक्का बुक्की करत आम्ही फक्त आत नीट उभे रहाण्या येवढी जागा मिळवली. आणि मग आम्ही ६ जणी विरुध्ध भाजप चे नेते आणि कार्यकर्ते ह्यांची खडाजंगी सुरु झाली. कसर्‍या पर्यंत आम्ही भांडतच होतो. आमच्या रीझर्वेशन च्या डब्यात जाणं म्हणजे दिव्य होतं. आम्ही त्यांच्या नागपुर च्या एका लीडर बरोबर येवढ्या भांडलो की शेवटी तो कंटाळला. आणि आम्ही दोन बाकडी खाली करण्यात यश मिळवले. बसायला जागा मिळाल्यावर जरा हुश्श वाटलं. सगळ्या दमलो होतो. नंतर १३ तासांनी नागपुर आल्या वर तो भाजप चा नेता आम्हाला खाली घेवुन गेला. स्टेशन मास्तर शी हुज्जत घालुन गाडी थांबवुन त्याने आमची रवानगी आमच्या डब्यात आमच्या सीट्स वर केली. आणि आम्हाला कोपरा पासुन नमस्कार केला. उतरताना माझ्या मैत्रिणीचे पती जे एकटेच पुरुष आम्हा बायकांमध्ये होते, त्यांना फुकटचा सल्ला देवुन गेला, " बचीये इन शैतान औरतोंसे" . आम्ही नंतर हसण्याचा जो कल्लोळ केला नंतर !!!!!

तर अशी होती आमची सुरुवात. एकदम वादळी. पण नंतर जे पाहिलं आणि जो निसर्ग अनुभवला त्याला तोड न्हवती. आर्थात आता १७ वर्षांनी सगळं बदललं असेलच. तुझ्या नजरेतुन परत ते सगळं पाहिन...... आईला पण ही लिंक देईन...... ( रच्याकने---- अशी फक्त दोघी असलेली सहल गेल्या १७ वर्षात परत झालेली नाही. त्या मुळे त्या ट्रीप च्या फार हळव्या आठवणी आहेत.)

हा धागा आवडत्या १०त .......

मस्त रे Happy आता फोटो येऊ देत लवकर Happy

असेच भटकुन या आणि इथे सविस्तर लिहा. ज्यांना जायचेय त्यांना मदत होईल.>>>>>+१

मार्च अखेरीस सिक्कीम दार्जिलिंग टूरचा प्लान आहे.
यावेळेस लाचुंगला जाता येते का आणि जाणे योग्य राहिल का? म्हणजे बर्फामुळे रस्ते बंद अशी शक्यता असते का?