मी आणि बाबा सॉल्लिड टीम : वडिलांशी असलेल्या नात्याची जवळून ओळख!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 17 June, 2012 - 01:39

baba.jpg

********************************************************

आपल्या आयुष्यातल्या नात्यांचा पहिला गोफ विणला जातो तो आई, वडिलांसोबत. या सुंदर तिहेरी गोफात गुंफलेल्या असतात असंख्य आठवणी. हीच शिदोरी आपल्याला पुढे हसवते, रडवते, घडवते, सांभाळते आणि आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरते.

आईचं स्थान अबाधित आहेच पण वडिलांशी असलेलं नातंही खास असतं, नाही का? प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हे नातं आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवलेलं असतं.

अगदी आत्ताआत्तापर्यंत बर्‍याचशा घरांमधून बाबांची प्रतिमा कठोर, शिस्तप्रिय, मुलांना धाकात ठेवणारी असायची. वरुन काटेरी पण आतून गर्‍यांसारखे रसाळ अशी उपमा आईपेक्षा बाबांच्याच वाट्याला जास्त आली. बाबांना घाबरुन राहता राहता अवचित कधीतरी एखाद्या प्रसंगातून त्यांचं मृदु मन मुलांना जाणवायचं. सगळ्यांच घरांतून अशी परिस्थिती होती असंही नव्हे. काहींना मुलांत मूल होऊन वावरणारे,मित्रत्वाने वागणारे वडीलही मिळाले. आज पितृदिनाच्या निमित्ताने आपल्या बाबांच्या खास आठवणी इथे सांगूयात. आनंदाच्या, दु:खाच्या, नवीन काही शिकवणार्‍या, जीवनाचा दृष्टिकोन घडवणार्‍या, बाबांचा एक वेगळाच पैलू दाखवणार्‍या - अशा असंख्य क्षणांना उजाळा देऊयात.

गेल्या काही वर्षांत मात्र बाबांची ही प्रतिमा पुष्कळ प्रमाणात बदलली आहे. 'अहो बाबा' च्या जोडीने 'अरे बाबा' ऐकू येण्याचं स्थित्यंतरही ह्याच काही वर्षांतलं. मायबोलीवरही आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारे बरेच 'नवडॅड' आहेत. ह्या बाबांनी त्यांच्या मुलांशी असलेलं त्यांचं नातं कसं आहे त्याबद्दल इथे लिहावे असे आम्हाला वाटते. मुलांशी असलेलं बाँडिंग उलगडणारे किस्से, प्रसंग, संवाद, गंमतीजंमती सगळ्यांबरोबर शेअर करावेत.

आठवणी म्हणजे स्मरणरंजनाचा भाग झाला. परंतु सध्याच्या काळात आपण आपल्या वडिलांशी कशा प्रकारे नाते जपतोय, किंवा ते आपल्याशी कसे नाते जपत आहेत त्याबद्दलही लिहिता येऊ शकते.

पितृदिनाचे औचित्य साधून लिहूयात आपल्या वडिलांविषयी किंवा आपल्या पितृत्वाच्या अनुभवांविषयी.
मी आणि बाबा सॉल्लिड टीम!

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा ! पपांची प्रिंसेस... लिहु शकेन की नाही माहिती नाही पण वाचेन जरुर.
उपक्रमास शुभेच्छा!

बाबा वॉज ऑलवेज माय हीरो....
बाबाबद्दल याआधी लिहिलय मायबोलीवर.
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120137.html?1166066979

पण या पितृदिनी एक निश्चय करतेय-

यापुढे बाबाबद्दलच्या हसर्‍या, प्रसन्न आठवणीच आठवेन. त्याबद्दलच लिहीन. कितीही वाईट वाटत असल बाबाच्या जाण्याच, तरी जस्ट बिकॉज-
'ही वुड हॅव लाइक्ड इट दॅट वे...'

विषय भारी आहे Happy
केवळ पुरुषी पितृदिन म्हणून नव्हे, तर खरोखरच, आयुष्याच्या विशिष्ट वळणावर, प्रत्येकालाच कधीनाकधी आईबापान्ची त्यातल्या त्यात बापाची अचानक प्रसन्गोचित आठवण हळवे करुन सोडते, बाप गेलेला असल्यास एकटे करुन टाकते. यावर कितीक लिहीता येण्यासारखे आहे. Happy

माझ्या बाबांचे व माझे बरेच वैचारिक - तात्विक व व्यावहारिक मतभेद आहेत Wink त्यामुळे आम्ही 'सॉल्लिड टीम' वगैरे असे नसलो तरी काही काही गोष्टींमध्ये त्यांचे माझे सूर परफेक्ट जुळतात! Happy

आयुष्यातील अनेक नव्या नवलाईच्या गोष्टी मी बाबांच्यामुळे अनुभवल्या आहेत. अनेक तर्‍हेचे अनुभव घेणे व त्यांतून समृद्ध होत जाणे त्यांच्या सहवासातच शिकायला मिळाले. खाण्या-पिण्याची, भटकण्याची, गप्पा-टप्पा - कथा-किस्से यांची आवड, लेखनाची आवड, निसर्गाची आवड, इंग्रजी चित्रपट - कादंबर्‍यांची आवड त्यांच्याकडून माझ्यात झिरपली. डिक्शनरी, थिसॉरस घेऊन वाचायला त्यांनीच शिकविले. संस्कृत श्लोक, सुभाषिते, व्याकरण, स्तोत्रे त्यांच्यामुळेच जरा बरे कळाले. (त्याचबरोबर 'हात धुवून मागे लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थही कळाला... अभ्यासाचे पुस्तक बंद केले तरी ते त्यांच्या 'गोड, सुमधुर' (!) आवाजात रेकॉर्ड केलेल्या सुभाषिते, व्याकरण नियम, पाढे इत्यादींच्या टेप्स मला ऐकवत असत! Lol ) 'लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत्। प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्॥' या किंवा 'छडी लागे छमछम' या पठडीतील ते स्वतः असल्यामुळे माझे व त्यांचे एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे पटणे शक्य नव्हते. पण तरी अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये समान आवडी असल्यामुळे आमचा निभाव लागला. Happy उत्तम स्टेशनरी - अभ्याससाहित्य वापरणे, एका जागी बैठक मारून सलग अभ्यास - लिखाण हेही त्यांच्यामुळे आवडू लागले. त्यांच्यासोबत रात्रीच्या शांत वेळी लांबच लांब पायी भटकायला शिकले. त्यांच्याबरोबर गावोगावी हिंडताना प्रवासाची चटक लागली.

मी लहान असताना बाबांनी मला नेहमीच्या लहान मुलांच्या गोष्टी कधी सांगितल्याचे आठवत नाही. त्यांच्यावर गोष्ट सांगायची वेळ आली की ते मला घराजवळच्या बँकेची किंवा पोस्ट ऑफिसची गोष्ट सांगत! Lol रात्री झोपवायचे असेल तर थोपटताना जर्मन अंगाई गीते गात(!!) असत. त्यांचा हात धरून किंवा त्यांच्या पाठीवर कांद्याबटाट्याच्या पोत्यासारखे लोंबकळत न्हाव्याचे सलून, पानाची टपरी, इराण्याचे कॅफे, भंगाराचे दुकान, रद्दी डेपो, उडपी रेस्टॉरंट, साखर कारखाने, दर्गे-चर्च-मंदिरे इत्यादींच्या सफरी घडल्या आहेत. एस.टी.च्या प्रवासाबद्दलचा त्यांचा आग्रह + हट्ट मजेशीर आहे. तसेच जवळपास कोठेही जायचे तर पायी जायचा आग्रहही! त्यात त्यांच्याबरोबर जायचे असेल तर दर पायी प्रवासादरम्यान एखाद-दुसरा चहाचा - इडलीवड्याचा स्टॉप ठरलेला असतो. चहाचे इंधन घातल्याशिवाय त्यांची गाडी वेग घेत नाही. रात्री उशीरापर्यंत मित्रमंडळी जमवून गप्पांचा अड्डा जमविणे, आपल्या सुरस चमत्कारिक कथांनी लोकरंजन करणे हा त्यांचा आवडता उद्योग आहे. त्यांच्याकडे गूढ, रम्य कथा - अनुभवांचा खजिना आहे. चारशे गावांचे पाणी प्यायल्यामुळे तेथील तर्‍हेतर्‍हेचे अनुभव आहेत. प्रचंड वाचन - अभ्यासाचा व्यासंग आहे. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी योग-आयुर्वेदाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका संपूर्ण संस्कृतमध्ये लिहिणारा हा माणूस मटेरिया मेडिका - रेपर्टरी सोबत अथर्ववेदाचा अभ्यासक आहे.

आता वयानुसार ते थकत चाललेत. आमचे काही बाबतीत तीव्र मतभेद असले तरी ते बाजूला ठेवून त्यापलीकडे त्यांचा विचार करता येणे मलाही कालपरत्वे शक्य झाले आहे. दोन पिढ्यांमधील, दोन भिन्न विचारधारांमधील संघर्ष हा अटळ आहे व असतो. परंतु एका कुटुंबात राहताना क्वचित आपल्या विचारांना मुरड घालून पारिवारिक क्षण खेळीमेळीचे व संस्मरणीय करणे हे आपल्याच हातात असते. त्याप्रमाणे आम्ही दोघेही बर्‍याचदा वागू शकतो.

मी त्यांची ''आदर्श'' मुलगी वगैरे बनायचा कधीच प्रयत्न केला नाही. रक्तातच बंडखोरी होती त्याला काय करणार! Wink त्यांनी पूर्व म्हटले की मी पश्चिम म्हणणार हे आमच्याकडे उघड आहे. पण त्याच्या पलीकडे आमचे जे काही नाते आहे ते पाहण्याची, जपण्याची व अनुभवण्याची - आमच्यातील समान दुव्यांना जोपासण्याची संधी दैवकृपेने मला मिळाली आहे. त्यांना उत्तम, सुदृढ व सुखी आयुष्य लाभो आणि त्यांच्या गाढ्या व्यासंगाचा लाभ अनेकांना होत राहो हीच सदिच्छा! Happy

छान लिहीलं आहेस अकु.

मी लहान असतानाचे माझे वडिल आठवले तर एकाच शब्दात वर्णन करता येईल- टेरर. आम्ही त्यांना प्रचंड घाबरून असायचो. खरंतर त्यांनी कधीही आवाज चढवला नाही, की आदळआपट केली नाही, की आम्हाला चोप दिला नाही. पण त्यांच्या बघण्यातच असला दरारा होता, की मी त्यांच्या समोर एकदम गप्प. माझा सगळी ऐट आजी-आईसमोर. ते कोणत्याही कारणाने रागावू नयेत ह्यासाठी आपण गाढवपणा करू नये म्हणून मी कायम दक्ष.

माझे वडिल स्वभावाने अतिशय जिद्दी आणि प्रॅक्टिकल. काही कारणांमुळे मतभेद होऊन त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर केवळ जिद्द आणि कष्ट ह्या जोरावर त्यांनी एमबीएचे प्राध्यापक म्हणून अनेक कॉलेजांमध्ये प्राध्यापकी केली. कुठून कुठून मुलं त्यांना भेटायला येत. पण 'दिव्याखाली अंधार' ह्या म्हणीनुसार मी आणि माझी बहिण दोघीही त्यांच्या हाताखाली शिकलो नाही. ते ज्या एमबीए कोर्सला शिकवायचे त्याच कोर्सची एन्ट्रन्स परिक्षा मी ठरवून, मुद्दाम अभ्यास न करता नापास झाले. त्याबद्दल त्यांना नक्कीच वैषम्य वाटलं असेल, पण त्यांनी कधीच ते एका शब्दानेही व्यक्त केलं नाही.

पुढे पूलाखालून बरंच पाणी वाह्यलं. बघता बघता त्यांच्या वार्‍यालाही न उभी राहणारी मी, आता त्यांच्याशी बिनधास्त गप्पा मारते, माझे मत ठामपणे त्यांच्यासमोर मांडू शकते आणि कधी कधी ते ऐकतातही माझं आताशा! Happy

टेबल्स हॅव टर्न्ड. मी त्यांना कॉम्प्यूटर चालवायला शिकवायचा प्रयत्न केला. पण हाडाचे शिक्षक ते, मी नाही. त्यामुळे जेव्हा त्यावरून आमचे वाद व्हायला लागले, तेव्हा चक्क त्यांनी कॉम्प्यूटरचा क्लास लावला. त्यांना म्हणायला इन्टरनेट वापरायला मी शिकवलं, पण अथक सराव करून आत्मसात त्यांनी करून घेतलं ते. ऑर्कूटवर/ फेसबूकवर त्यांच्या नावाच्या कम्यूनिटीज त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुरू केल्या आहेत Happy पण अजूनही पीसी निगडित काहीही प्रश्न आला की ते मला फोनवरून विचारतात, मग मी त्यांना गृहित धरून हे-ते करा असं सांगते, मग त्यांना समजत नाही, आणि कसा हा माझा विद्यार्थी एक स्लो लर्नर आहे असं मी म्हणलं की ते रुसतात! Happy 'फार शहाणी आहेस' असं म्हणून मला घरी बोलावून समोरासमोर शंकानिरसन करून घेतात.

त्यांना मी आजवर कधीही, काहीही आणि कोणत्याही विषयावरचं विचारलं आहे- एखाद्या शब्दाचा अर्थ, एखाद्या देशाची राजधानी, एखाद्या घटनेचे परिणाम- असं अक्षरशः काहीही आणि त्यांना त्याचं उत्तर आलेलं नाही असं कधीच झालेलंच नाही. आमेन! प्रचंड वाचन आणि एकाग्रता हे त्यामागचं रहस्य असावं. तेच माझे गूगल आहेत आणि राहतील Happy

त्यांना मी आजवर कधीही, काहीही आणि कोणत्याही विषयावरचं विचारलं आहे- एखाद्या शब्दाचा अर्थ, एखाद्या देशाची राजधानी, एखाद्या घटनेचे परिणाम- असं अक्षरशः काहीही आणि त्यांना त्याचं उत्तर आलेलं नाही असं कधीच झालेलंच नाही. आमेन! प्रचंड वाचन आणि एकाग्रता हे त्यामागचं रहस्य असावं. तेच माझे गूगल आहेत आणि राहतील >> +१. कुठलाही प्रश्ण पडला की बाबांना उत्तर माहितीच असतं.

मस्त उपक्रम आहे संयोजक.

माझे बाबा....
मला बाबा म्हंटलं की गळ्यात एक आवंढा येतो. डोळ्यात पाणी तरळतं. ते आज ह्या जगात नाहित. पण त्यांच अस्तित्व सतत माझ्या बरोबर असतं.
मी त्यांची एकुलती एक. जाणीव पुर्वक ठेवलेली एकुलती एक मुलगी. बाबा खुप गमतीशीर होते. अतिषय खट्याळ. खुप गमती जमती करुन हसवायचे. शाळेत सोडताना काहीना काही कॉमेंट करुन मला खिदळत शाळेत पोहोचवायचे. रस्त्याने चालताना सगळी लोकं आमच्या कडे बघायची. नातेवाईकात आणि मित्रात ते खुप आनंदी म्हणुनच फेमस होते. नाव पण "आनंद" होतं.
मला वाचनाची आवड त्यांनी जणीव्पुर्वक लावली. खुप लहान पणा पासुन खुप पुस्तकं आणुन दिली. कोणत्याच गोष्टीला कधीच विरोध केल नाही. त्यांना जास्त अभ्यास केलेला आवडत नसे. स्वत: अतिषय हुशार असुनही, मला मात्र अभ्यासाची कधीच सक्ती त्यांनी केली नाही. मी पहिलच आलं पाहिजे वगैरे कल्पना माझ्यावर कधीच लादल्या नाहीत. उलट शाळा बुडवायला ते कायम तय्यार. "चल सीनेमा पाहु" " चल खरेदीला जाऊ". माझ्यावर प्रचंड विश्वास.
माझे केस लहान पणी बऱ्या पैकी लांब होते. पण त्यांना लांब केस म्हणजे वेळ घालवणे वाटायचे. त्यांनी मला अनेक आमिष दाखवून, केस कापायला भाग पाडलं. पण मी कोणता कोर्स घ्यावा कोणत्या कॉलेज ला जावे हे निर्णय माझ्यावर सोपवले. उगाचच इकडे तिकडे करू नये म्हणून वेळीच आपल्या सी ए कडे उमेदवारीला पाठवून दिले. सी.ए च्या परिक्षेत खूप संयम लागतो. तो माझ्या कडे भरपूर होता. त्यामुळे मी सी.ए करायचं ठरवलं तेंव्हाही त्यांचा पाठींबा होताच. आमच्या घरात ( म्हणजे काका लोकां कडे) कोणीच कधी कॉमर्स ला गेले न्हवते. त्यामुळे सगळ्यांच्या मते ही भिकेची लक्षणे होती. पण बाबांनी मला खूपच धीर आणि आधार दिला.

त्यांनी मला जगात तोंड उघडून वावरायचा सल्ला दिला. "तू जर विचारलं नाहीस तर कोणालाही तुझी पडलेली नाही. तू जर हात पाय मारले नाहीस तर कोणी येणार नाही. आपला मार्ग आपण निवडायचा. तुझे रस्ते तू शोध. तोंड उघडून विचार, तरच नवा रस्ता कळेल. " मला जर्मन शिकायला, वेग वेगळे कोर्सेस करायला त्यांनी नेहेमीच प्रोत्साहन दिलं. घरी माझे मित्र नेहेमी यायचे. घरातल्या कपाटाच्या चाव्या माझ्याच कडे होत्या. सुट्टी मध्ये मी मजा म्हणून आकाशकंदिल, फटाके, रांगोळीची पुस्तके विकत असे. उगीचच. त्यालाही त्यांनी कधी विरोध केला नाही. उलट मला पैश्याच महत्व कळावं ह्यासाठी ते प्रयत्नशील असायचे.

फर्स्ट इयर ला असताना मी जरा हाता बाहेर जायच्या रस्त्यावर होते. एका मुलात उगाचच गुंतते आहे का असे वाटत होते. त्यांनी त्या वेळेला जे मला लेक्चर दिले, तो तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्या मुळे वेळीच मी सावरले. त्या निर्णयाचा मला खूप फायदा झाला.

वेळे अभावी ते माझ्या आणि आई बरोबर फिरायला येऊ शकत नसत पण आम्हाला ,मात्र कधीच आडकाठी केली नाही. त्यांचे दोन कारखाने होते. तरीही आईने नोकरी करण्यावर त्यांनी कधीच बंधन आणले नाही. तिला तिचे स्वतंत्र नेहेमीच दिले.आई बाबांचा प्रेम विवाह होता. ती शेवट पर्यंत त्यांची मैत्रीणच राहिली.
माझं लग्न झाल्या वर अनेकदा घरातली कामे मला करायला लागतात म्हणून त्यांचा जळफळाट व्हायचा. पण त्यांनी कधीच माझ्या सासरच्या घरात ढवळा ढवळ केली नाही.

आता, ते सर्वास्वीच चांगले होते का ? नाही. ते बाबा होते, माणूस होते, देव न्हवते. कधी कधी ते खूप आक्रस्ताळे व्हायचे. मनाविरुध्ध गोष्टी झाल्या की खूप बडबड करायचे. कधी कधी फार आगावू पणा करायचे. त्यांच्या पडत्या काळात, ते खूप खचून गेले. हा माणूस तोच का? असा प्रश्न पडावा एवढे ते बदलले होते. थोड्याश्या अपयशाने खचून गेले होते. प्रकृतीची आबाळ तर खूप केली त्या काळात. एवढे गप्प राहायचे की आहो तुमचा आक्रस्ताळेपाणा परवडला, पण गप्प बसू नका , असे सांगावेसे वाटायचे. त्या वेळी माझा अगदी कस लागला होता.

तो ही काळ गेला. मग मात्र मनस्थिती सुधारल्या वर त्यांनी अनेक निर्णय पटापट घेतले. त्या पडत्या काळात मी निभावून नेलेले प्रसंग आणि जावयाने केलेली मदत ते शेवट पर्यंत विसरले नाहीत.

जावयाशी मुला सारखेच वागायचे. त्यांचा वाढदिवस म्हणजे सोहोळा असायचा ( ३१ डिसेंबर). घरात नुसती मजा. त्यांचे मित्र, माझे मित्र-मैत्रिणी, केक्स, खाणं. खूप धमाल. त्यांना खाण्याची अतोनात हौस होती. त्यांच्या अनेक खुणा हॉटेलच्याच असत. कुठल्याही शहरात जा, ते सकाळी उठून त्यांच्या भाषेत " मुआइना" करून यायचे. कुठे काय मिळते, काय चांगले खायला आणता येईल. ह्याचा त्यांचा अभ्यास वाखाणण्या सारखा होता. ( "मुंबई , दिल्ली आणि पुण्यातली खादाडी " हे माय बोली वरचे बाफ त्यांनी एकट्याच्या माहिती वर चालवले असते.) माझा नवरा तर त्यांना "मोटुराम" म्हणत असे. त्यांच्या तोंडावर. आणि नात म्हणजे तर..... जाउ दे ... माझ्या मुलीचे तर नुसतं "आनंदा आजोबा" म्हंटलं की आजुनही डोळे भरुन येतात.

त्यान्च्या गुणांचं पारडं त्यान्च्या अवगुणां पेक्षा भारी होतं. आता ते गेले त्याला ३ वर्ष झाली. जाताना पण पटकन गेले. पण आजही एकही दिवस जात नाही की त्यान्ची आठवण होत नाही. मुख्यत्वे एखादं त्यांचं लाड्कं हॉटेल दिसलं की, किंवा एखादा दिवस पिठलं केलं की. त्यान्च्या आठवणीनेच त्याच्या आवडीचे पदार्थ खाल्ले जातात.

असे माझे वडील पुराण. जरा जास्तच लांबलं का? पण विषयच असा आहे की भरभरून लिहिले तरी कमीच. मायबोली चे धन्यवाद त्यांनी असा बाफ काढला.

प्राची ...

इथे लिहिल्याने मोकळं वाटत आहे. कोणी तरी आहे आपलं म्हणणं ऐकणारं असच वाटतय.

तुला सान्गु , हा प्रतिसाद लिहिताना मी इतक्या वेळा डोळे पुसले, नशीब त्या वेळात केबीन मध्ये कोणी आलं नाही. खरच लिही खुप मोकळं वाटेल.

आपल्या आवडत्या माणसा बद्दल लिहायला मिळतं आहे ह्या सारखा आनंद नाही.

मधुरीमा, मोकीमी ... खूप सुरेख आठवणी लिहिल्यात तुम्ही. भावना अगदी थेट पोहोचल्या.

अकु, पौर्णिमा ... मस्त लिहिलंय.

कित्ती छान लिहीलय सगळ्यान्नी Happy मला पण लिहायचय, वेळच मिळत नाहीये Sad
>>>> पण 'दिव्याखाली अंधार' ह्या म्हणीनुसार मी आणि माझी बहिण दोघीही त्यांच्या हाताखाली शिकलो नाही. <<<< हे आमच्या बाबतीत देखिल अक्षरशः सत्य. तपशीलात सान्गेन नन्तर.

[एक निरि़क्षणात्मक स्वगत:
पोरीन्चेच बापावर जास्त प्रेम अस्ते, पोरे नुस्ती ठोम्बी अस्तात किन्वा आईची बाळे अस्तात (तमाम सूना आपापले नवरे नावाची पोरे आईची "बाळेच" अस्तात याबद्दल खात्री देऊ शकतील, नै? Wink )
बघाना, बापाबद्दल भरभरुन जिव्हाळ्याचे बोलायला सोट्या पुरुषान्ना काय धाड भरते का? Proud एकपण एन्ट्री जेण्ट्स्ची नाही! ]

आर्च ला अनुमोदन. फार छान लिहिताय.
मोहन की मीरा... भावना पोचल्या.
मधुरीमा चे वाचले होते पुर्वी, फार आवडले होते.

मुलांनो लिहा की.

अरुंधती,मोकिमी,पौर्णिमा खुप छान लिहल आहे तुम्हि सर्वांनी... लेख वाचता वाचता डोळे अलगद पानवले आणी समोर माझ्या बाबांचा चेहरा दिसु लागला...

सगळ्यांनी छान लिहिलंय.

मोहन की मीरा,
<< आता, ते सर्वास्वीच चांगले होते का ? नाही. ते बाबा होते, माणूस होते, देव न्हवते. कधी कधी ते खूप आक्रस्ताळे व्हायचे. मनाविरुध्ध गोष्टी झाल्या की खूप बडबड करायचे. कधी कधी फार आगावू पणा करायचे.>>

Happy
आईपेक्षा मी बाबांसोबत जास्त अटॅच्ड आहे.
त्यांचा समंजस स्वभाव, वाचनाची आवड, जमेल तशी आणि जमेल तितक्यांना मदत करण्याचा स्वभाव, तत्वज्ञान ह्या विषयावर अतिशय प्रेम.....हे सगळं पाहतच मोठी झाले.
एका स्टेजला अशी वेळ आली की मी त्यांना देवत्व देऊन टाकल्याने त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहणंच थांबवलं होतं.
मग कालांतराने (कदाचित वयाप्रमाणे आणि परिस्थितीचे काही धक्के पचवल्याने) तुम्ही वर उल्लेख केला तसे माझे बाबाही आक्रस्ताळे व्हायचे. मी गोंधळून आणि दुखावून जायचे की अरे, बाबा असं कसं काय वागताहेत ?
पण आता लक्षात येतंय की तेही माणूसच आहेत. इतर सर्वांसारखेच ग्रे शेडचे. पण फरक इतकाच की त्यांच्यामध्ये शुभ्र रंगाची मात्रा जास्त आहे....जी कायमच मला प्रेरणा देत राहील !

Pages