समजा तुम्ही बहिरे झालात.....

Submitted by धुंद रवी on 15 June, 2012 - 00:12

तळटीप :
१. हा विनोदाच्या अंगानी जाणारा ललितलेख आहे.
२. हा ललिताच्या अंगानी जाणारा विनोदीलेख नाही.
३. तळटीप वर कशी अशा तांत्रिक चूका काढु नयेत. ती शेवटी आली तर उपयोग नाही, म्हनुन इथेच. शेवटी ‘टीप’ महत्वाची, मग कुठे का असेना. (पटत नसेल तर कुठल्याही वेटर ला विचारा.)
४. असो.
___________

बाहेर काहीही पाहिलं तर ते घरी येऊन लगेच (आणि कधीच) मागायचं नाही, अशी सक्त ताकीद दिलीये मी मुलीला....
........आणि बायकोलाही.

अर्थात त्या दोघीही माझ्या आरडा-ओरडीला भीक घालत नाहीत हि गोष्ट वेगळी. मुलीचं ठीक आहे हो. मागुन मागुन काय मागेल? छोटासा खेळ नाहीतर थोडासा वेळ... देता येतो. किंवा जमणार नाही असं सांगुन विषय संपवुन टाकता येतो. पण बायको असं काही मागते की खिशाला परवडत असतं, पण मनाला नाही त्यामुळे घेता येत नाही...
आणि अवघड हे की न घेण्यासाठी काही कारण देता येत नाही.

परवा कुठुन तरी हळदी-कुंकवावरुन आली आणि म्हणाली की आपण संक्रांतीला गंगावन किंवा कच-याची टोपली लुटुयात. इथं महागाईत मी इतका लुटलो गेलोय की डोक्यावर एकही केस उरला नाहीये आणि बायकोला गंगावनं लुटायची आहेत. आणि कच-याच्या टोपल्या घेऊन मी पैसे असे कच-यात नक्कीच टाकणार नव्हतो म्हणुन मी तिच्या कल्पनांनाच कच-याची टोपली दाखवली. तर म्हणाली की आपण शॉवर बसवुयात. मी बेशुद्ध पडलो. मीच काय कोणीही नवरा पडेल जर संक्रांतीला लुटण्यासाठी शॉवर आणुन चाळीतल्या प्रत्येक घरी जाऊन ते बसवायला लागले.

जरा भानावर आल्यावर बायको म्हणाली की "देव अक्कल वाटत होता तेंव्हा काय चाळणी घेऊन गेला होतात का? नळाची प्लॅस्टीकची तोटी लुटायची ऐपत नाही आपली, शॉवर कसले लुटताय? आपल्या बाथरुमसाठीच हवाय शॉवर मला."
"बाथरुम ???????????????????"
(हि इतकी प्रश्नचिन्ह यासाठी की आमच्या खोलीलाही जिथं रुम म्हणणं म्हणजे लोकरीच्या गुंड्याला आख्खा मेंढा म्हणण्यासारखं होतं, तिथं मोरीला बाथ-रुम म्हणणं म्हणजे हडाडलेल्या कुत्र्याला गेंडा म्हणण्यासारखं होतं.... असो.)
पहिल्या दोन गोष्टींना मी ह्याआधिच कच-याची टोपली दाखवली असल्यामुळे आता ते शक्य नव्हतं म्हणुन मी शॉवरच्या मागणीला चाळणी दाखवली. चाळणी दाखवली म्हणजे शॉवरच्या ऐवजी मोरीत चाळणी बांधली आणि त्यात पाईप सोडला.

मला मान्य आहे की माझी ही शॉवरची कल्पना जरा जास्तच पावटी होती पण म्हणुन बायकोनी ती चाळणी माझ्या डोक्यावर धरणं चुक होतं. पण एकदा तुम्ही लग्न करण्याची चुक केलीत की मग पुढे आयुष्यभर चुक आणि बरोबर ह्या शब्दांना फारसा अर्थ नसतोच. सबब मी बायकोची चुक मुकपणे डोक्यावर घेतली आणि माझ्या देशी-शॉवरच्या शोधाला देश मुकला.

डोकं पुसत बाहेर आलो तर बायकोला बहुतेक फेफरं का काय ते येत होतं. म्हणजे ती तशी धडधाकट उभी होती पण तिचा भयानक चेह-याचा आकार कसाही बदलत होता.... भुवया वर-खाली, उभ्या आडव्या, वाकड्या तिकड्या होत होत्या.... गाल फुगत होते, फुटत होते, फुसफुसत होते..... ओठ आणि नाक जागवर न राहता वेगवेगळ्या रेषेत प्रवास करत होते.... डोळे बटाट्यात्यातुन आग ओकत होते, कचाट्यातुन राग ओकत होते..... निःशब्द राग !!

....आणि इथंच काहितरी चुकतय असं मला जाणवलं, कारण ‘बायको आणि निःशब्द’ हे गणित काही जुळेना. आणि मग माझ्या लक्षात आलं की मगाशी आपल्या डोक्यावर पडलेलं पाणी कानातही गेलय आणि आपल्याला काहीच ऐकु येत नाहीये.
तुम्हाला सांगतो, मी बहिरा झालोय याचा काय आनंद झाला मला ! बायको एक हात कमरेवर ठेऊन आणि दुस-या हातातलं लाटणं हवेत फिरवुन शब्दांचे भाले मला फेकुन मारत होती. पण माझ्या कर्णबधिर कवच-कुंडलांमुळे मी अपराजीत योद्धा असल्यासारखं तिच्यासमोर उभा राहिलो. तिनी लाटणं फेकुन मारलं. मी स्मितहास्य केलं. संतापातिरेकानी अंगात आल्यासारखं तिचं सगळं अंग थरथरायला लागलं... कुठली तरी आदिवासी बाई त्यांचं पारंपारीक झुलु लोकनृत्य करतीये असंच मला वाटायला लागलं आणि त्यात हा नाच ‘मुकपट’ असल्यामुळे अजुनच मजा यायला लागली. आता मी स्मितहास्याऐवजी दात बाहेर काढले. तिनी मला घराबाहेर काढलं.

घराबाहेर आलो तर चाळीच्या व्हरांड्यात हिऽऽऽऽ गर्दी. माझ्यासाठी जरी हा सगळा मुकपट असला तरी चाळक-यांसाठी एक अद्भूत दृकश्राव्य नाट्यानुभव होता. बहुतेक कोणीतरी पाचकळ टिप्पणी पण केली असावी कारण सगळेच हसत होते. मी पण त्यांच्यात मिसळुन खो खो हसलो, तसे ते हिरमुसुनच गेले. आज एक गोष्ट हसत हसत शिकलो की आपल्या चेह-यावर अपमानाचं दुःख दिसलं नाही तर समोरच्यालाही दुखवण्याचं समाधान मिळत नाही. आपल्या इच्छेशिवाय आपल्याला कोणी दुखावु शकत नाही.

पुढे गेलो तर चाळीचे मालक भेटले. भेटले म्हणजे काय त्यांनी पाठलाग करुन पकडलं. आता मारल्या असतील त्यांनी खुप हाका मला. पण मला बहि-याला, काय ऐकु जाणार. ते अचानक हातवारे करुन काहितरी बोलायला लागले. त्यांचा आवेश पाहुन मला वाटलं की पुन्हा पारतंत्र्याचे दिवस आलेत आणि ते मला स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायला सांगताहेत. थोड्यावेळानी ते मला लोकमान्य टिळकांसारखे दिसायला लागले. वाटलं ते म्हणताहेत की "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे... स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच." त्यांचं बोलणं झालं आणि ते माझ्या उत्तराची वाट बघत थांबले.
मग मी पण म्हणालो की, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफलं उचलणार नाही." मालक निरुत्तर झाले. माझ्या कपाळाला हात लावुन ताप वगैरे आलाय का हे बघुन निघुन गेले.
(बहुतेक, मगाशी तावातावात ते सत्याग्रहाविषयी नाही तर थकलेल्या घरभाड्याविषयी बोलत होते. असो.)

ऑफिसला जायला बसस्टॉपवर रांगेत उभं न राहता सगळ्यांच्या पुढे उभं राहिलो. का कोणास ठाऊक पण कोणीही काहिही बोललं नाही. बसमध्ये कंडक्टरला १००ची नोट दिली. त्यानी तोंडातल्या तोंडात श्लोक म्हणायला सुरवात केली म्हणुन मी सुद्धा हात जोडुन बसलो. गोंधळुन त्यानी तिकीट आणि चक्कचक्क शंभराचे सुट्टे दिले.
बसमधुन उतरताना दोन-तीन लोकांच्या पायावर पाय पडला, तिघांना माझ्या हातातली पिशवी लागली, माझ्या धक्क्यानी एकजण दुस-याच बाईच्या अंगावर पडला आणि त्यांची चांगलीच जुंपली... पण का कोणास ठाऊक ह्याही वेळेस मला कोणीही काहिही बोललं नाही.

ऑफिसमध्ये साहेब नेहमीसारखाच पिसाळला होता. मला केबीन मध्ये बोलवुन घेतलं आणि.... आणि बहुतेक ‘ख्याल’ किंवा ‘दादरा’ असा कुठला तरी राग आळवायला लागला. म्हणजे निदान त्याचा चेहरा तरी तसाच वाकडा वाकडा होत होता. मी त्या सुरांची मजा घेत मान डोलवत बसलो. मध्येच त्यानी मुठींनी टेबल वाजवायला सुरवात केली. मग स्वतःच्याच डोक्यावरचे केस ओढायला लागला. मी कौतुकाने पाहायला लागलो तसा खुर्चीवर उभा राहिला आणि तिथल्या तिथे दोन-तीन उड्या मारल्या. तो आवाज ऐकुन ऑफिसातले दोन सहकारी आले आणि मला उचलुन बाहेर घेऊन गेले. "अरे, किती मजा येत होती" असं म्हणालो तर दारुड्याला दंडाला धरतात तसं धरुन घरी सोडुन आले. साहेबांची ती मैफ़ल अधुरीच राहिली.

संपुर्ण दिवसात कशी शांतता, समाधान आणि आनंद भरुन राहिला होता. एका अलौकीक तृप्ततेचा अनुभव येत होता. पण संध्याकाळी माझी चिमुकली तिच्या शाळेत काय काय गंमत झाली ते खुप हसुन हसुन सांगत होती. काहिच समजेना तसं अस्वस्थ झालो. रात्री ‘बेला के फुल’ शिवाय झोपच येईना आणि मग हि शांतता खुप टोचायला लागली. बायकोशी गेल्या कित्येक जन्मात गप्पा मारल्या नाहीत असं वाटायला लागलं.

आपण खरेच बहिरे झालो तर कसं जगु याची भिती वाटायला लागली. सकाळी बायकोच्या बडबडीनी उठलो आणि काय आनंद झाला म्हणुन सांगु?

तुम्ही बहि-या झालात तर काय ऐकु येत नाहीये याचं बरं वाटेल? काय चुकल्यासाचुकल्या सारखं वाटेल... आणि जगणं कसं असेल?" असं ढमढेरे वहिनींनी विचारलं तर म्हणाल्या की,
"अशक्य आहे असं जगणं! यासाठी नाही की बाहेरचा आवाज येणार नाही, तर ह्यासाठी की आतला आवाज दाबता येणार नाही. बाहेरच्या आवाजात, गोंधळात ब-याचदा मनातला कोलाहल विरुन जातो. जर बाहेर स्मशान-शांतता असेल तर आतलं सगळं ऐकायला लागेल आणि मग आयुष्यात कधी शांतताच राहणार नाही. वेड लागेल मला...."

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?

फुल वॉल्युमनी ढणाणणारं जग अचानक शांत झालं तर झेपेल का हो तुम्हाला ? कुठल्याही सबटायटलशिवायचा म्युट पिक्चर आवडेल का तुम्हाला ? काही ऐकुच आलं नाही तर आयुष्यात चांगला फरक पडेल का वाईट ? समजा एका दिवसासाठी तुम्ही खरेच बहिरे झालात तर काय होईल हो.... ?

तृप्त, शांत, मस्त जगाल...?
का बेचैन, बेभान, अस्वस्थ व्हाल?
कर्कश्य आवाजांनी भरलेली, ती रोजची सकाळ मोकळी असेल,
का सुरांशिवाय संध्याकाळ म्हणजे केविलवाणी पोकळी असेल ?
वाटेल जगत रहावं असंच, स्वतःच्याच नादामध्ये
का मजा असेल त्या आरडाओरडीत... भांडणतंटा वादामध्ये ?

काय असेल? काय नसेल? काय कराल? कसं जगाल?
विचार करा... बघा.... काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच....!

धुंद रवी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

'शोर' आठवला. Happy नेहमी प्रमाणेच छान लिहिलय..
<<बाहेरच्या आवाजात, गोंधळात ब-याचदा मनातला कोलाहल विरुन जातो. जर बाहेर स्मशान-शांतता असेल तर आतलं सगळं ऐकायला लागेल आणि मग आयुष्यात कधी शांतताच राहणार ना >> टाळ्यांच वाक्य..
पण नको ते बहिर्जीच जीणं.. ऑफिसात एकीचा भाचा आहे बहिरा त्यामुळे मुकाहि.. किती कठिणाई त्यांच्या आयुष्यात.

Pages