अरुणाचलप्रदेश ४ :-"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत."

Submitted by Prasad Chikshe on 24 May, 2012 - 10:08

आपल्याला विनंती आहे की ह्या लेखाच्या आधीचे अरुणाचलप्रदेश वरील तीन लेख वाचा ..सोबतच्या लिंकवर क्लिक करून ते आपल्याला वाचता येतील

http://prasadchikshe.blogspot.in/2012/05/blog-post_24.html

कर्नल संभाजी पाटील आपल्या निवृत्ती नंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला.

“जय हिंद सर, दोरजी खांडू बोल रहा हूँ सर.”

कर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला सकाळच्या सूर्याच्या किरणांनी हिमालय सोनेरी होतो तो अरुणाचलप्रदेश.

२२ मराठाचे कमांडर म्हणून कर्नल संभाजी पाटील यांनी तवांग ते बुम्ला हा रस्ता १९८३-८४ मध्ये तयार केला होता. हा रस्ता भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा होता. संरक्षण दृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुपच महत्वाचे होते. सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात येणार होता.समुद्र सपाटी पासून १२४००फुट उंचीवर असणारा हा भाग अस्तिशय दुर्गम. अशा भागात काम करणे खुपच अवगड. स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. यातूनच, दोरजी खांडू, तवांग भागाती एक उत्साही युवा नेतृत्व व कर्नल संभाजी पाटीलांची चांगलीच मैत्री झाली. खांडू ते नित्य नेमाने मराठा रेजिमेंटच्या(MLI) युनिटला भेट देत असत व काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इनफंट्रीचे मुख्यालय बेळगाव येथे खास प्रशिक्षणासाठी पण पाठवण्यात आले होते. एक मस्त नाते दोरजी खांडू व मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांचे झाले होते.

२२ किलोमीटरचा हा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव, २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांचे देशासाठीचे खूप मोठे योगदान होते. कर्नल संभाजी पाटील व श्री दोरजी खांडू यांच्या मैत्रीचेच फक्त हा रस्ता प्रतिक नाही तर पश्चिमेकडील मराठी लोकांच्या व अति पूर्वेकडील अरुणाचली बंधूंच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे.

श्री दोरजी खांडू यांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर स्थानिक अरुणाचली बंधूंच्यावतीने २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांसाठी एका पार्टीचे आयोजन पण करण्यात आले. सर्वं जवानांचा गौरव त्यात करण्यात आला. काही रोख रक्कम त्यांनी बक्षीस म्हणून २२ मराठा लाईट इनफंट्रीसाठी त्यांनी देऊ केली. सर्वांनी ते बक्षीस साभार परत केले व अरुणाचली बंधूना त्यांनी विनंती केली की या रस्त्याला मराठी माणसांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे व या रस्त्यावर महाराजांचे दोन पुतळे उभे करावेत. एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरा रस्त्यात एखाद्या महत्वाच्या ठिकाणी.

श्री. दोरजी खांडू व स्थानिक अरुणाचली बांधवानी ही रास्त मागणी लगेच मान्य केली. त्या रस्त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी मार्ग असे करण्यात आले व केवळ दोन महिन्याच्या अवधीतच महाराजांचा अर्धाकृती पुतळा रस्त्याच्या एका महत्वाच्यासाठी उभा केला. छत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात सर्व २२मराठा लाईट इनफंट्रीच्या जवानांच्या सोबत मराठा लाईट इनफंट्रीचे मराठा स्फूर्ती गीत खड्या आवाजात श्री दोरजी खांडू यांना गाताना बघून अनेक जणांना आश्चर्य वाटले.

मर्द आम्ही मराठे खरे , शत्रूला भरे कापरे |
देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे || धृ ||

वादळापरी आम्ही पुढेच चालतो , जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो |
मराठा कधी न संगरातुनी हटे , मारुनी दहास एक मराठा कटे |
सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे || १ ||

व्हा पुढे अम्हा धनाजी , बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती |
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी , पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी |
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी , मृत्यू अम्हा पुढे घाबरे || २ ||

भारता आम्ही तुलाच देव मानतो , हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो |
राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा |
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी , अमुची वीर गाथा उरे || ३ ||

बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या विजयाच्या घोषणांनी तवांग बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमून गेला.
“सर दिल्ली आया हूँ,आपसे मिलना चाहता हूँ” दोरजी खांडूच्या आवाजानेकर्नल संभाजी पाटील भानावर आले.

दोरजी खांडू बरोबर चहा पीत असताना कर्नल संभाजी पाटीलने महाराजांच्या दुसऱ्या पुतळ्या बद्दल विचारले. आता दोरजी खांडू अरुणाचलप्रदेशचे मुख्यमत्री झाले होते. मग या कामाला उशीर कसा होणार त्यांनी याची कल्पना अरुणाचलचे राज्यपाल जनरल जे. जे सिंग यांना दिली.

फाळणीदरम्यान जनरल सिंग यांच्या कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले नीत्यांनी थेट पुणे गाठले. तेव्हापासून ते बनले पुणेकर! त्यांच्या पत्नी अनुपमा वाडिया महाविद्यालयात कला शाखेला शिकत होत्या. जनरल सिंग यांच्याशी त्यांनी पुण्यातच लग्नगाठ बांधली. ते स्वतःला महाराष्ट्रीयनच मानतात ! म्हणूनच, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यात त्यांची पत्नी स्वत: पुरणपोळीची मेजवानी देऊ शकल्या !!

त्यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्याशी निगडीत आहेत. त्यांचे आजोबा सरदार आत्मा सिंग यांनीपहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. आपला मुलगा कर्नल व्हावा आणि नातू जनरल बनावा असं त्यांचं स्वप्न. ते त्यावेळी मराठा रेजिमेंटबरोबर काम करत होते. त्यामुळेत्याच्या तिन्ही पिढ्यांचा मराठा रेजिमेंटशी संबंध आहे. हा ऋणानुबंध ४३ वर्षांचा.

लष्करात मराठा लाईट इन्फंट्रीची ( एमएलआय ) शान काही अनोखीच. 18 व्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या मराठा लाइट इन्फन्ट्रीतल्या जवानांना गणपत नावाने ओळखलं जातं. एमएलआयमध्ये 1964 साली जनरल जे. जे. सिंगांचे कमिशनिंग झाले .त्यांना लष्करात टायगर म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या हट्ट्याखट्ट्या शरीरयष्टीकडे पाहिल्यावर हे नाव सार्थ वाटतं. ब्रिगेड कमांडर असतानाकश्मीर खोऱ्यात 1991 साली दहशतवाद्यांशी दोन हात करताना जखमी झालेले लेफ्टनन्ट जनरल जे. जे. सिंग पुढेभारताचे पहिले शीख लष्करप्रमुख झाले.

राज्यपाल झाल्यानंतर एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, “छत्रपती शिवाजीमहाराजांचे बुद्धिचातुर्य आणि सुराज्याची हिंमत लाभलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीतील मराठा जवान तगडा,चिवट आणि धाडसी आहे. त्यांच्यासोबत आपण ४३ वर्षे सैन्यदलात कर्तव्य बजावले. यावेळी त्यांच्याकडून मिळालेले सहकार्य आणि ताकदीमुळेच भारताच्या पायदलाचा मी लष्करप्रमुख होऊ शकलो. मराठा जवानांबरोबरची एकजूट आपल्या जीवनाचा एक भाग बनली.या एकजुटीने आम्ही लढत राहिलो. त्यामुळे अनेक कामगिरी फत्ते झाल्याने या एकजुटीचा आनंद मिळत गेल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मराठा जवान सच्चा लढवय्या व बहादूर असून, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची देण लाभल्याने सैन्यदलात त्यांना मोठा मान आहे. त्यांच्यासोबत कर्तव्य बजावताना एकजुटीने झालेल्या कर्तृत्वामुळेच सैन्य दलातील आपली उंची उत्तरोत्तर वाढतच गेली. लष्करप्रमुख झालो. लोकांचा राज्यपाल म्हणून गौरविला गेलो. राष्ट्राचे,सैन्य दलाचे, जनतेचे प्रेम मिळाले. परमेश्वराचा कृपाशीर्वाद लाभल्याने आयुष्यात समाधानी असून, भाग्यवान असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. या सर्वातून उतराई होण्यासाठी सैन्यदलातून मी निवृत्त झालो असलो तरी ती मला मान्य नाही. जनतेच्या हिताचे आणि राष्ट्राच्या विकासाचे काम करण्याची माझी दुसरी इनिंग सुरू झाली.”

त्यात राज्यपाल स्वतः १९८२ -८४ च्या काळात अरुणाचल मध्ये ९ मराठा बटालियनचे कमांडर होते. महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या संकल्पनेला त्यांचा पूर्ण पाठीबा मिळाला.ब्रिगेडिअर अशोक आंब्रे आणि राज्यपालांचे सचिव प्रशांत लोखंडे यांच्यावर या स्मारकाची जबाबदारी देण्यात आली.

२ जुन २००९ बुधवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ती भूमी नाही पण तरीही तिथल्या जनतेला महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आस्था आहे. त्या आस्थेचे मूतिर्मंत रुप साकारले. मराठा रेजिमेंटने अरुणाचल प्रदेशात गाजवलेल्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी तवांग येथे राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. चारशे वर्षं जुन्या असलेल्या बौद्ध विहारांच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा उभारला आहे.

अनावरण समारंभास छत्रपती शाहू महाराज, कर्नल (निवृत्त) एस डी के पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी विनायक निपुण आदी उपस्थित होते. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनीपोवाडाही सादर केला.

डिसेंबर मध्ये कोल्हापूर मध्ये राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, “भारत-चीन यांच्यातील अरुणाचलमध्ये येणाऱ्या सीमाप्रश्नी चिंतेची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरुणाचल प्रदेशमध्ये उभारण्यात आला आहे. हा पुतळा कोल्हापुरातच तयार केला आहे. या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.”

१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? आज या युद्धाला ५० वर्षे होत असताना चीन आणि भारत ही दोन राष्ट्रे जागतिक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहेत. ६२ च्या युद्धानंतर चीनने थेट जरी आपली कुरापत काढली नसली तरी अरुणाचल प्रदेशावर अद्यापि चीन दावा करीत आहे. भारताचे वाढते सामथ्र्य हेही चीनसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच चीनकडून प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला सर्वाधिक धोका संभवतो. ६२ च्या युद्धाचे वास्तव व त्याचे दूरगामी परिणाम, आजचा त्याचा संदर्भ आणि भविष्यात घ्यावयाची खबरदारी या साऱ्याचाबाबत नि. लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी खूप चांगले विवेचन केले आहे.

१९५८ ते २००१ या कालावधीत लेफ्ट. जनरल शेकटकर ईशान्य भारतात जनरल ऑफिसर कमांडिंग ४ कोअर या पदावर ले. जनरलच्या रॅंकमध्ये काम केले. या कोअरची जबाबदारी संपूर्ण अरुणाचल प्रदेश (८४ हजार स्क्वे. कि. मी. भूप्रदेश- ज्याची मागणी आजही चीन करीत आहे.), भारत-ब्रह्मदेश सीमा, भारत-भूतान सीमा, आसाम व मेघालय इतकी विस्तृत होती. अरुणाचल प्रदेशात अंतर्गत सुरक्षेच्या जबाबदारीचे नेतृत्वही त्यांनी केले. या काळात अनेकदात्यांची चीनच्या सैन्याधिकारी आणि कूटनीतिज्ञांबरोबर भेट आणि चर्चा झाली. त्यांचे अनुभवखुपच मार्गदर्शक आहेत.

चीनमध्ये सत्ता-परिवर्तनकरिता क्रांतिसंघर्ष सुरू असताना आणि त्यानंतर १९४९ मध्ये चीनच्या उत्तर-पश्चिम सिकिआंग भागात (जिथे आता चिनी शासनाविरुद्ध अंतर्गत संघर्ष सुरू आहे.) आणि १९५० मध्ये तिबेटला सैन्यबळाच्या आधारे चीनने गिळंकृत केले. मात्र, या सर्व घटनाक्रमाकडे भारताने तेव्हा पूर्णपणे दुर्लक्ष केले.

१९१४ मध्ये ब्रिटिश शासनाने तिब्बतचे शासक व चीनबरोबर एक करार केला. त्याप्रमाणे दोन्ही देशांमध्ये सीमेच्या निर्धारणकरिता एक सीमारेषा (ज्याला मॅकमोहोन रेषा म्हणतात.) निर्धारित केली गेली. त्यावेळी चीनने त्याला विरोध केला नाही. परंतु ६० वर्षांनंतर चीनने घोषणा केली की, ही सीमारेषा चीनला मान्य नाही. आजही चीन तिला मान्यता देत नाही. नेफामधील युद्धाचे हे प्रमुख कारण होते. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये या रेषेबद्दलच भारत व चीनमध्ये विवाद आहे. पूर्ण लडाखवर चीनने दावा सांगितला आहे. तिथेही चीनला निर्धारित सीमारेषा मान्य नाही.

१९४७ पर्यंत ब्रिटिश शासन असताना भारत-तिब्बत सीमाक्षेत्राचा ३००० कि. मी. लांबीची सीमा अनिर्धारित होती. हा सीमावाद हेच १९६२ च्या युद्धाचे प्रमुख कारण झाले.१९५९ मध्ये चीनने अचानक मागणी केली की, संपूर्ण अरुणाचल प्रदेश (अगोदरचा ‘नेफा’ प्रदेश- ९८,००० स्क्वे. कि.मी. क्षेत्र) चीनचा आहे आणि भारताने त्यावर बेकायदेशीर अधिपत्य स्थापित केले आहे! चीनच्या या मागणीनंतरही तत्कालीन भारतीय शासनाचे डोळे उघडले नाहीत. १९५९ मध्ये त्यावरून कांगजू क्षेत्रात सैनिकी चकमकही झाली. आज हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. कितीजणांना माहीत आहे की, १९५९ पर्यंत नेफा म्हणजे सध्याच्या अरुणाचल प्रदेशची संपूर्ण व्यवस्था (सुरक्षा व्यवस्थेसह) संरक्षण खात्याकडे नसून परराष्ट्र मंत्रालयाकडे होती! नेहमीप्रमाणे परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष पाश्चात्य जगत व अमेरिकेकडे जास्त होते. त्यामुळेच या क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं. अरुणाचल प्रदेशमध्ये १९५९ पर्यंत भारतीय सैन्य नव्हतेच. आसामातही भारतीय सेना नव्हती. या संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय आणि ‘आसाम रायफल’ (ज्याची व्यवस्था आता गृहमंत्रालयाकडे आहे.) कडे होती.

१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच भारतीय सैन्य नोव्हेंबर १९५९ मध्ये आसाममध्ये पाठवलं गेलं. ही व्यवस्था लखनौस्थित सेना मुख्यालय पाहत असे. पूर्व कमांड- ज्याचे मुख्यालय आता कलकत्त्याला आहे, तेव्हा नव्हते. अंबालास्थित चार डिव्हिजनचे सैनिक आसाममध्ये पाठविले गेले. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण, युद्धसामग्री, संचारसाधने दिली गेली नव्हती.

पूर्व सैन्य कमांडचे मुख्यालय लखनौला होते. त्याचे प्रमुख ले. जनरल एस. पी. पी. थोरात होते. (थोरात घराणं मूळचं कोल्हापूरचं.) त्यांना भरपूर लष्करी अनुभव होता. त्यांचे युद्धकौशल्य व दूरगामी लष्करी दृष्टिकोन सर्वविदित होता. त्यांनी चीनची युद्धतयारी आणि त्याच्या धोरणाबद्दल भारतीय शासनाला अनेकदा सावध केले होते. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. उलट, तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी त्यांची खिल्लीच उडविली. त्यात पंतप्रधानही सहभागी होते.

“नेफामध्ये लष्करी व्यवस्था कशाला हवी ?सैन्य कुणाविरुद्ध हवे? चीन आपला मित्र आहे. तो कधीच आक्रमण करणार नाही, याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे,” असे उत्तर त्यांना देण्यात आले.

संरक्षणमंत्र्यांनी तर असंही म्हटलं की,“चीनविरुद्ध आम्ही कूटनीतिक आघाडीवर युद्ध लढू.” (we will fight a diplomatic war!! there is no possibility of war from china. We will fight on diplomatic front!!)

दुर्दैवाने आजही तीच वृत्ती दिसते आहे. (We will fight Pakistan and china on diplomatic front..) काही लोकांचा आक्षेप आहे की, कृष्ण मेनन यांचा चीनवर फार विश्वास होता आणि त्यांचे चीनबद्दलचे धोरण सहानुभूतीचे होते. कृष्ण मेनन यांच्या प्रभावाखाली येऊन तत्कालीन पंतप्रधानांनीही चीनच्या आक्रमक तयारीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर दोनच वर्षांने चीनने भारतवर आक्रमण केलं आणि त्याचे दुरगामी परिणाम आपण आजपर्यंत भोगतो आहोत. आजही आपण चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीकडे, महत्त्वाकांक्षा आणि सर्वागीण क्षमतावाढीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील.

उर्दूत एक शेर आहे..
‘वक्त ऐसा भी देखा है तारीख की घडियों में;
लम्हों ने खता की पर सदियों ने सजा पाई..’

याचा अर्थ असा की, क्षणिक केलेल्या चुकीचे परिणाम पिढी दर पिढीला भोगावे लागतात. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये केलेल्या चुकीचे परिणाम आजही भारत भोगत आहे आणि भविष्यातही भोगावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे चीनच्या बाबतीतही १९५० ते १९६२ यादरम्यान केलेल्या चुकांचे आणि दुर्लक्षाचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. त्या चुका आपण आताही सुधारल्या नाहीत तर आपल्या येत्या पिढय़ांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. १९४७ ते १९६२ या काळात संरक्षण व्यवस्थेत झालेल्या संचयित दुर्लक्षामुळेच (accumulated neglect in defence preparedness) १९६२ च्या युद्धात भारतचा पराभव झाला.

यावरून आपल्या लक्षात येईल की, युद्ध किंवा युद्धात्मकबाबी या अचानक उद्भवत नाहीत. त्याला इतिहास असतो. ऐतिहासिक कारणं असतात. पाश्र्वभूमी असते. त्यातून आगामी युद्धजन्य परिस्थितीबद्दल सूचनाही मिळतात. युद्धाच्या वादळांचा अभ्यास मान्सूनसारखा सतत करावा लागतो. त्यात जर चूक झाली वा दुर्लक्ष झालं तर कटु पराभव चाखण्याची पाळी येते.

ऑक्टोबर १९६२ दरम्यान चिनी सैन्याने तवांग क्षेत्रात घागला, खिजेमाने, सोमदरांगचू, तवांग-बूमला क्षेत्रात आक्रमण केले. त्याचप्रमाणे पूर्व अरुणाचल प्रदेशमध्ये डीचू-किबितू, वॉलॉंग क्षेत्रातही त्यांनी आक्रमण केले.

२९ ऑक्टोबरला भारत सरकारने मान्य केलं की, चीनने भारतावर आक्रमण केलेलं आहे. बूमला, तवांग, जसवंतगढ आदी क्षेत्रांत भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा सामना केला. त्यांचे स्मारक आजही तिथे आहे. नोव्हेंबरमध्ये बोमदिलापर्यंत (जे आता जिल्हा मुख्यालय आहे.) चीन सैन्य पोहोचले. वॉलॉंगवरही चीनने कब्जा केला. भारतीय सैन्याप्रमाणेच चीनचेही बरेच सैनिक या युद्धात मारले गेले. वॉलॉंग क्षेत्रात चिनी सैनिकांचे मृतदेह चीनपर्यंत नेण्यासाठी जवळजवळ आठ दिवस लागले. पुरेशी युद्धसामग्री नसतानाही भारतीय सैन्याने आपल्या युद्धकौशल्याचे प्रदर्शन केले. १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चिनी लष्कर नेफा क्षेत्रात बोमदिला-तवांग-वलांगपर्यंत तसेच लडाखमध्ये चुशूक, देमचोग,डी.बी.ओ. पर्यंत पोहोचले.

आणि २० नोव्हेंबर १९६२ रोजी बीजिंगमध्ये चीनचे तत्कालीन प्रधानमंत्री चाऊ एन लाई यांनी भारतीय राजदूतावासाचे चार्ज दी अफेअर यांना बोलावून चीन युद्धक्षेत्रात एकतर्फी युद्धविराम करीत असल्याचे त्यांना सांगितले.

नोव्हेंबरमध्ये लडाख व नेफा क्षेत्रात बर्फ पडायला सुरुवात होते. तत्पूर्वी चिनी सैन्याला माघारी जाणे गरजेचे होते. कारण ते नंतर हिमवर्षांवात अडकले असते आणि त्यांचे परत जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले असते. जर चिनी सैन्य या क्षेत्रात थांबले असते तर त्यांना जिवंत राहण्याकरिता रसद पोचली नसती. या प्रदेशात हवाई मार्गाने रेशन आदी पोहोचवणं फारच कठीण होतं. याचाच अर्थ माघार घेऊन चिनी सैन्याने भारतावर मेहेरबानी केलेली नव्हती. त्यांना मागे जाणं आवश्यकच होतं. चीनकडे हवाई मार्गाने युद्धसामग्रीचा पुरवठा करण्याचे साधन त्यावेळी नव्हते. परंतु शत्रूच्या या कमतरेची जाणीव भारताला कुठे होती? युद्धकाळात शत्रूच्या शक्ती-सामर्थ्यांची व्याख्या आणि वर्णन करतो, परंतु शत्रूची कमतरता जाणणं व त्याचा फायदा घेणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.

या युद्धात चीनचे ८०,००० च्या आसपास सैन्य सहभागी झालं होतं. तर भारतीय सैनिक अवघे १०,००० होते. या युद्धात भारताच्या ३१२८ सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. १०४७ सौनिक जखमी झाले, तर ३१२३ युद्धकैदी झाले. चीनचे ७२२ सैनिक मारले गेले, १,६९७ जखमी झाले आणि दोन युद्धकैदी झाले.

लडाख क्षेत्रात चीनच्या ताब्यात आजघडीला सुमारे ३८,००० वर्ग कि.मी. भारतीय प्रदेश आहे. पाकिस्तानने काश्मीर क्षेत्रातून जवळजवळ ५००० वर्ग कि. मी. भूभाग १९६३ मध्ये चीनच्या ताब्यात दिला आहे. हे क्षेत्र काश्मीरचा भाग आहे व ते भारताचे होते. आता अरुणाचल प्रदेशवर चीन दावा करत आहे. या क्षेत्रातला घागला, सोमद्रांगचू, असाफिला, लांगजू सोडून अन्य भूभाग भारताच्या ताब्यात आहे. त्याची सुरक्षा व संरक्षण व्यवस्था सध्या संरक्षण मंत्रालय पाहत आहे.

ईशान्य भारतातील फुटीरवादी गट आणि नक्षलवादी संघटनांना चीन सर्व प्रकारचे प्रोत्साहन व मदत करीत आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धासंबंधात पाकिस्तान आणि अमेरिकेत असलेल्या मतभेदांचा फायदा चीन घेत आहे. आपण हे विसरता कामा नये की, कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे सेनाप्रमुख व आय.एस.आय. प्रमुख चीनमध्येच होते! कारगिल युद्धाच्या वेळी चीनने अरुणाचल प्रदेशात कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. याचे सविस्तर वर्णन तत्कालीन भारतीय सेनाप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी त्यांच्या पुस्तकात ‘Surprise into Victory’ मध्ये केल आहे.

सीमावाद कसा निर्माण झाला

चीन-भारत यांच्यातील सीमावाद कसा निर्माण झाला, कसा वाढत गेला नि त्याचा स्फोट कसा झाला ?. चीनने तिबेटचा कब्जा घेतला तेव्हापासून सीमेचा प्रश्न पुढे आला, मॅकमेहान या ब्रिटीश अधिकार्यासने आखलेली सीमारेषा ही तिबेट भारत सीमारेषा आहे. नेहरूंनी फॉरवर्ड पॉलिसीचे धोरण आखले नि ते कृतीत आणण्याचा आदेश दिला. कमांडचे सेनापती जनरल दौलत सिंग यांनी फॉरवर्ड पॉलिसीबद्दल इशारा दिला होता. सन 1962 च्या ऑगस्टमध्ये आर्मी हेडक्वार्टर्सला एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सैन्याच्या अडचणींची यादी दिली. ते म्हणाले की, वेस्टर्न सेक्टरमध्ये चिनी सैन्याच्या चौक्या कमकुवत आहेत. त्यांचे सैनिकीदृष्ट्या रक्षण करणे अशक्य आहे. अशावेळी चीनशी संघर्ष करण्याचे टाळले पाहिजे. त्यासाठी "फॉरवर्ड पॉलिसी' थांबवली पाहिजे. गलवान खोऱ्यात कोंडली गेलेली चौकी सुरक्षितपणे बाहेर काढली पाहिजे. याला चीन अडथळा करणार नाही. उटल त्या कारवाईचे स्वागत करील. हे चीनने स्पष्ट केले आहे. शेवटी राजकारण्यांसाठी त्यांनी पुढील सैनिक सिद्धांत सांगितला,

"तेव्हा हे आवश्यक आहे की राजकीय दिशा सैनिक शक्तीवर आधारलेली असली पाहिजे.”

या पत्राला उत्तर आले की,
"झालेल्या घटनांनी फॉरवर्ड पॉलिसी बरोबर आहे हे दर्शविले आहे. आपले स्वामित्व दाखविण्यासाठी हे धोरण चालू ठेवणे आवश्यक आहे. कारण भूमीवर पोकळी दिसली की तेथे घुसायचे हे चीनी रणतंत्र आहे.”

दुर्दैवाने नेत्यांना युद्धाचा अनुभव नव्हता. युद्धाचे इतिहास वाचले नव्हते. मोठ्या सेनापतींची चरित्रे वाचली नाहीत. सिझर, हॅनिबॉल, अलेक्झांडर, शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव यांच्या चरित्रापासून खूप शिकण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले की त्यांनी वेळोवेळी कशा युक्त्या केल्या, जयसिंगाशी कसे नमतेने वागले. त्याच्या मागणीप्रमाणे गड सोडले. औरंगजेबाला भेटायला गेले, त्याला चकवून पळून गेले, परत आल्यावर सोडलेले गड परत जिंकण्याच्या खटपटीला लागले. हा इतिहास ध्यानात घेतला असता तर प्रतिष्ठा, स्वमान या शब्दांचा बाऊ केला नसता. सीमा संघर्ष टळला असता.

ब्रिगेडियर दळवी यांचे अनुभव

ब्रिगेडियर दळवी यांना 1960 मध्ये पदोती मिळाली आणि त्यांची रवानगी लडाखमध्ये करण्यात आली. नंतर त्यांची बदली नेफात होऊन 70 व्या ब्रिगेडचे ते कमांडर झाले आणि पुढील कार्यवाहीला सुरुवात केली. जन. प्रसाद तेथे आले आणि त्यांनी चिन्यांना हुसकावण्याचे काम त्वरित हाती घ्या, असा जनरल सेनचा आदेश दिला. दळवी नि प्रसाद या दोघांनाही चिन्यांना हुसकावण्याचे काम करण्याचे आदेश मूर्खपणाचा आहे हे दिसत होते. युद्ध साहित्याचा पुरवठा झाला नाही तर चिनी सैन्याला हुसकावण्याचे काम सहा महिन्यानंतर हाती घ्यावे लागेल असे दळवी यांनी स्पष्टपणे आपल्या योजनेच्या कागदावर लिहिले. पुढे जन. उमराव सिंग हेलिकॉप्टरने दळवींच्या कार्यालयात आले.

त्यांनी "आवश्यक गोष्टींचा पुरवठा अधिक दाखव. काम जरा दमाने घे” असा सल्ला देऊन आणि थोडी बदल केलेली योजना घेऊन जन. उमराव सिंग पूर्व विभागाचे सेनापती सेन यांच्या कार्यालयात आले. ज. सेननी योजना अव्हेरली. तेव्हा उमराव सिंगांनी आपल्या निषेध पत्रात अडचणींची जंत्री दिली. तेव्हा जन. थापर नि जन. सेन यांनी उमराव सिंगांची बदली केली. त्यातून जनरल कौल यांना नवीन सैन्य देऊन नेफाचे सर्वेसर्वा म्हणून पाठवण्याचे ठरले.

पुढे जन. कौलसमोर उमराव सिंगांनी आपली योजना मांडली. ज. कौलनी ती धुडकावली. मग ते दळवीकडे गेले आणि सेनेला कूच करण्याचा आदेश दिला. आणि स्वत: सैन्याबरोबर चालू लागले. चढताना शिपाई थकत होते. कौलची दोनदा दमछाक झाली आणि पोर्टरच्या पाठीवर बसून उंचीचे अंतर कापावे लागले. रणक्षेत्र किती अवघड आहे याची दिल्लीत बसून कल्पना येत नाही. हे कौलना मनोमन पटले. आणि दळवीचे प्रतिपादन अगदी सत्य आहे हे पटले. पुढे जन. कौलनी लढाईची सूत्रे ब्रिगेडियर दळवींना सोपवली. त्यांना कारवाई स्थगित करण्याचा आदेश दिला नि पुढील हुकूम दिल्लीहून येतील असे सांगून जन. कौल; जन. प्रसादला घेऊन दिल्लीला आले. तिथे त्यांना आदेश मिळाला - "लढत रहा, पण हटू नका.”

प्रसादनी दळवींना सांगितले की, "आता कार्यवाहीत दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कोर्ट मार्शल होईल.'

पुढे चीनच्या प्रचंड हल्ल्याखाली सातव्या ब्रिगेडचा धुव्वा उडाला. ती विखुरली गेली. ब्रिगेडियर दळवी एका तुकडीसह चौथ्या डिव्हिजनला मिळायला जात होते ते वाटेतच पकडले गेले. मॅक्सवेल लिहितात, "जे खरे लढाऊ सेनानी होते त्यांनी जे भविष्य केले होते ते खरे झाले. द फॉरवर्ड पॉलिसी नि ऑपरेशन लेगहॉर्न ही संपुष्टात आली.'

ले. कर्नल श्याम चव्हाण यांनी आपल्या वॉलॉंग ग्रंथात भारतीय सेनेचे चित्र काढले आहे. ते भारतीय शासन यंत्रणेच्या कामावर आरोपपत्र आहे. ते लिहितात, "त्यांच्या (चीनच्या) फौजा अनुभवी होत्याच, पण त्यांची हत्यारे आधुनिक होती. आमच्या सेनेत दुसऱ्या महायुद्धातील हत्यारे व तोफा वापरल्या जात होत्या. वायरलेस सेटस्‌ तेव्हाचेच होते. बिटिशांच्या वेळचेच कपडेलत्ते व इतर लष्करी साहित्य आम्ही वापरत होतो. पण तेही पुरेसे नव्हते.'” (पृ. 10).

या युद्धाचा विषय निघाल्यावर दोन व्यक्तींना कधीही विसरता येणार नाही.

सुभेदार जोगिंदर सिंग व मेजर सैतानसिंग.

१९६२ ला चीनने बुम्लावर पहिला हल्ला चढवला. सुभेदार जोगिंदर सिंग आपल्या प्लाटूनसह चीनी आक्रमणाचा निकराने सामना करत होता. तोंग्पेंग ला (Tongpeng La)ह्या (Bum La) बुम्ला जवळील एका कोपऱ्याशी ते सर्वं दबा धरून होते.

२३ ऑक्टोबरला सकाळी साडे पाच वाजता चीनी सैन्यांनी प्रचंड हल्ला या भागावर केला त्याला तोफखान्याची साथ होती. सुभेदार जोगिंदर सिंगाच्या सर्व साथीदारांनी निकराने लढत तो हल्ला परतून लावला. चीनी सैन्याचे खूप नुकसान पण झाले.पण परत थोडया वेळात चिन्यांनी परत हल्ला केला. एखाद्या अडिग अशा भिंती प्रमाणे सुभेदार जोगिंदर सिंग व त्याचे साथीदार पाय रोखून लढत होते. तोफखाना व आधुनिक शस्त्र त्यात सैनिकांची संख्या खूप अधिक असल्याने चीनी सैन्याला सुभेदार जोगिंदर सिंगच्या प्लाटून मधील अर्धे जवान शहीद झाले. सुभेदार जोगिंदर सिंगांना अनेक जखमा झाल्या होत्या पण मर्द काही आपली जागा सोडायला तयार नव्हता त्यांनी दुसरा हल्ला पण परतून लावला. आता सुभेदार जोगिंदर सिंगच्या सोबत खूप कमी सैनिक राहिले होते. चीनी सैन्यांनी आता स्वतःच्या नुकसानीचा विचार न करता तिसरा हल्ला चढवला. सुभेदार जोगिंदर सिंगनी आपल्या लाईट मशिनगन सज्ज करत अनेक चीनी सैनिकांना यम सदनी पाठवले. त्यांच्या जवळचा दारूगोळा जवळपास संपला होता. शेवटी सुभेदार जोगिंदर सिंग व त्यांचे साथीदार वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेहचा घोष कसत सरळ शत्रूवर तुटून पडले. सुभेदार जोगिंदर सिंगांच्या शरीराच्या अनेक भागांना गोळ्या भेदून गेल्या होत्या. त्यांचे हात व पाय पूर्णतः निकामी झाले व ते शत्रूच्या ताब्यात सापडले. पण मर्दाला वाटत होते की एक न एक दिवस तो परत भारतीय सैन्यात येणार व वरचा हुद्दा मिळवून शत्रूशी चार हात करणार पण नियतीला ते मान्य नव्हते. सुभेदार जोगिंदर सिंगचा चीनी बंदीगृहातच मृत्यू झाला.

१७ नोव्हेंबरला चुशूल (लडाख) भोवतालच्या पहाडांवर चिन्यांनी आपल्या तोफा उघडल्या, त्यानंतर चिनी पायदळाने समोरासमोर चढाई केली. पण ती आपल्या जवानांनी उधळून लावली. चुशुल विमानदळाला लागून असलेल्या रेझांग या पहाडावर चिन्यांनी प्रचंड हल्ला चढविला. तेथे कुमाऊ बटालियनची अवघी एक कंपनी होती.... (मेजर) सैतानसिंग यांचा कित्ता ठेवून रक्ताचा अखेरचा थेंब शरीरात असे तो त्यांनी चिन्यांशी सामना दिला. दिवस हिमपाताचे होते. तीन महिन्यानंतर भारतीय अधिकारी पहाडावर गेले, तेव्हा सर्व जवान आपल्या संरक्षण मोर्चात शस्त्र हातात असलेल्या स्थितीत मरणाधीन झाल्याचे आढळले.

मेजर सैतानसिंग व सुभेदार जोगिंदर सिंग यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी पुतळ्या पासून सुरु झालेला छत्रपती शिवाजी मार्ग शहीद सुभेदार जोगिंदर सिंगांच्या शहीद भूमीतून जातो. सध्याच्या राज्यपालांचे नाव पण जोगिंदर सिंग हा काय विलक्षण योगायोग आहे.

अरुणाचलमध्ये तसा एप्रिल मध्येच पाऊस सुरु होतो. जून मध्ये तो एन भरात असतो. एप्रिल पासून नद्या, नाले भरभरून वाहायला लागतात. डोंगर कोसळण्याचे प्रमाण खुपच असते. रस्ते अनेक वेळा व अचानक बंद होतात. प्रवासाचा नेमके नियोजनकरणे अगदीच अशक्य. आम्ही शक्यतो कुणालाच या काळात अरुणाचलला भेट देण्यासाठी बोलवत नसुत. सप्टेंबर ते डिसेंबर सुरुवातीपर्यंतचा काळ म्हणजे अगदी स्वर्गीय आनंद तर एप्रिल ते ऑगस्ट शेवट पर्यंत म्हणजे अगदीच अवगड. डिसेंबर नंतर मात्र उंच डोंगराळ भागात बर्फ पडायला सुरुवात होते.

१ जुलै माझा जन्मदिवस. तसा तो विवेकानंद केंद्रात गेल्यापासून फारसा कधी साजरा केलाच नव्हता. जून १९९७ मध्येच विवेकानंद केंद्र पुण्याहून मोसमीदिदीचा फोन,

“प्रसाद भैय्या, १ जुलै को पूना केंद्र के कार्यकर्ते अरुणाचल आ रहे है.”

मोसमी दीदी आसाम मधील गोलाघाटची. ती जीवनवृत्ती कार्यकर्ता म्हणून पुण्यात होती. दीदीला जुलै मधील अरुणाचल माहित होता. मला प्रश्न पडला या वेळी हे लोक का येतायेत ?

“दीदी अभी क्यू भेज रही हो ? बाद में भेजो न ......”

“नही भैय्या वो लोग अभी आना चाहते है .....”

“दीदी बहोत दिगदारी होगी ... यहाँ का हाल तो आपने उन्हे बताया है न ?”

“हा, भैय्या.....आप उनके साथ रहेना ....”

मी हसतच उत्तर दिले

“होगा दीदी.....चलो पुनाके लोगोंको भी अरुणाचल की एक दुसरी सुरत दिखाई देगी ”

मी १ जुलैला तिनसुखियालाच्या विवेकानंद विद्यालयात सकाळीच पोहोंचलो. तिथे पुण्याहून कुणी आले आहे का याची चौकशी केली. कळले कुणीच नाही. काय झाले कुठे अडकले का हे लोक? तस पाहता आज काही कुठ आसाम बंद पण नाही. थोडी विचारपूस केल्यावर कळले की पुण्यातील टीम १ जुलैला गुवाहाटी मध्ये पोहोंचली. थोडी माहिती देण्यात गडबड झाली होती.

२ जुलैला सकाळीच महेश बर्दापूरकर,जयदीप साळी, संतोष कीर्तने, अर्चना पाटसकर, वीणाताई गर्भे, मधुमती पराडकर आणि पूर्वी लोणकर असे सात मराठी वीर तिनसुखियाला पोहोंचले.

महेश थोडा बुटका, सावळा व गोल चेहऱ्याचा तर संतोष बुटका व गोरापान जयदीप चांगलाच उंच तिघंही माझ्याच वयाचे २६ वर्षांचे. अर्चना, मधुमती व पूर्वा २३ वर्षांच्या असतील तर वीणाताई गर्भेनां पाहिले तर धक्काच बसला. चांगलेच पांढरे केस झालेल्या त्या ६२ वर्षांच्या आजीबाई होत्या. येणारे १० दिवस यांचे काय होईल अशी एक भीती मनात निर्माण झाली. महेश दैनिक सकाळ मध्ये काम करायचा तर संतोष भावाच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवसायात भावाला मदत करायचा.जयदीप, अर्चना, मधुमती व पूर्वा आजून महाविद्यालयात शिकत होते त्यांच्या सोबत आयुष्याचा रापलेला अनुभव असलेल्या वीणाताई.
पुढचे ११ दिवस या सर्वांबरोबर अरुणाचलचा प्रवास करायचा.

नियोजन अगदी मस्त केले होते. अरुणाचलच्या दोन भागात प्रवास करायचा. एक वाँलाँग पर्यंतचा व दुसरा तवांग पर्यंतचा. दोन्ही ही भाग दोन वेगळ्या दिशेचे भारताचे अंतिम स्थाने. १९६२ च्या युद्धात चीनचा मुख्य हल्ला या दोन भागातून झाला होता.चीन युद्धाला ३५ वर्षं होणार होती.

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही वाँलाँगला जाण्यासाठी अरुणाचलच्या लोहित जिल्ह्यातील तेजू या गावासाठी निघालो. तिनसुखिया ते वाँलाँग ३३० किलोमीटरच्या आसपास तसे पहिले तर हे अंतर जायला सपाट भागात केवळ सहा तास पुरे. तिनसुखिया ते तेजू ११५च्या आसपास. मिनीबसने आम्ही धोला घाट पर्यंत पोहोंचलो. वातावरण चांगले होते. आकाश पण निरभ्र होते. त्यामुळे फारशी चिंता नव्हती. गेल्या दोन तीन दिवसात पाऊस पण फार नव्हता. एकंदरीत सुरवात चांगली झाली.आमची टीम आरामात धोलाघाटावर पोहोंचली. ब्रम्हपुत्रचे ते पात्र पाहून सर्वं जणांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या ठिकाणी पात्र फार मोठे नाही. पण ब्रम्हपुत्र तो ब्रम्हपुत्रच. आम्ही सकाळी ९ च्या आसपास पोहोंचलो. घाटावर फार गर्दी नव्हती. मात्र फेरी वाहतूक बंद होती. नदीचे पाणी कमी झाल्याने फेरी जाणे अवघड होते. विचारपूस केल्यावर कळले की फेरी सुरु होण्यासाठी पाणी वाढण्याची वाट पाहावी लागेल.

सोबतच्या पुणेकरांना ब्रम्हपुत्रने आपले पहिले रूप दाखवले. शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मी त्यांना या धोला शब्दावरून माहिती द्यायला सुरवात केली.

भारतचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या फॉरवर्ड पॉलिसीवर याच जून १९६२ मध्ये बरेच बोलणे चालू होते. जून १९६२ मध्ये चीनने गृहीत धरलेल्या तिबेटच्या सीमेच्या आत धोला (Dhola) येथे पहिले ठाणे भारतीय सैनिकांनी उभे केले. चीनी सैनिकांनी त्याला फार विरोध केला नाही या काळात आपण पुढे जात होतो व चीन मात्र शांतपणे सावध होत होता.

जेव्हा शत्रू आक्रमण करतो तेव्हा माघार घ्या. जेव्हा तो थांबतो तेव्हा त्याच्या भोवती घिरट्या घाला, त्याला हैराण करा. तो हैराण झाल्यावर त्याच्यावर हल्ला करा. तो माघार घेईल तेव्हा त्याचा पाठलाग करा आणि त्याला नष्ट करा..... - माओ.

आता माझ्या सोबतच्या मंडळीना कशा अवस्थेत भारतीय सैन्यांनी पावसाळ्यात (मे ते ऑगस्ट २००९ ) फॉरवर्ड पॉलिसीवर काम करणे सुरु ठेवले असेल याची कल्पना येणार होती. नदीचे पात्र फार मोठे नव्हते १००० फुटाचे असेल पण पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यातून पोहत जाणे अशक्यच. हळहळू घाटावर गर्दी वाढू लागली. आर्मीचे काही शक्तिमान ट्रक पण आले त्यातून अनेक जवान उतरले. त्यांनी पटापट आपले सामान उतरवले व एका बाजूस ठेवले. गणवेशावरून ते मराठा लाईट इन्फंट्रीचे गणपत आहेत हे नक्की कळले.

पुण्यातील मंडळीना तसे सैन्य व लष्कर हा प्रकार काही माहितच नव्हता असा प्रकार नव्हता पण प्रत्यक्ष कृती करताना फारसे त्यांनी कधी पहिले नव्हते. जवानांच्या जलद कृती ते अचंबित होऊन पाहत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तोडे काहीतरी वेगळे पहिल्याने त्यांच्यातील उत्साह वाढला. माझे काम खरे त्यांना सोबत करण्याबरोबर त्यांना उत्साही ठेवणे हे पण होते.

मी त्यांना मराठा लाईट इन्फंट्री बद्दल थोडे सांगाया सुरुवात केली.


आपल्या सैन्यदलातील सगळ्यात जूनी रेजिमेंट “मराठा लाईट इन्फंट्री”. लाईट इंन्फंट्री म्हणजे निवडलेल्या मोजक्या सैनिकांची पलटण जे सैनिक चपळपणे हालचाली करू शकत,किंवा संधीचा फायदा उठवून शत्रूवर अचानक हल्ला करून त्यांना नामोहरम करू शकत. याच सैनिकांच्या पुढे वेगाने आक्रमणे करणार्‍या पलटणी झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या वेगाने हालचाली करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना “लाईट इन्फंट्री”असे बहुमानाने ओळखले जाऊ लागले. ब्रिटीश सैन्याच्या त्या वेळेच्या जनरल्सना मराठ्यांचा काटकपणा व गनिमीकाव्याने लढण्याच्या गुणांचा त्यांच्याबरोबर झालेल्या लढायांमुळे भरपूर अनुभव होताच. ते गुण हेरून त्यांनी आपल्या सैन्यात मराठा रेजिमेंट चालू केली.

एकूण सहा अशा बटॅलियन्सची लाईट इनफंट्रीमधे रुपांतर झाले. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चींग मधे मिनीटाला १२० पावले टाकतात.चीन युद्धा नंतर खास करून हीरेजिमेंट या भागात आहे.
आमच्या सोबतच जवळपास तास भर सर्वं जवान फेरी सुरु होण्याची वाट पाहत होते. आम्ही मराठीत बोलत असल्याचे पाहून एक जवान आमच्या जवळ आला व विचारले,
“तुम्ही मराठी का ?”
“हो”
“कुठले?”
मी “पुण्याचे आहेत हे सारे, मी अरुणाचल मध्येच असतो ” मी उत्तर दिले व विचारले आपले नाव काय?
“सुभेदार दिनकर खोत, इतक्या लांब मराठी माणसं येत नाहीत फार अवघड भाग आहे हा.”
“तसे काही नाही महाराष्ट्रातील अनेक लोक विवेकानंद केंद्रात काम करतात. केंद्राची सुरुवातच विदर्भातील माननीय एकनाथजी रानडे यांनी केली. गेल्या २५ वर्षांपासून अनेक लोक काम करत आहेत इथे या सर्वांना घेऊन तेजू, अमिलीयांग, हायलीयांग, वाँलाँग पर्यंत जायचे आहे ” मी केंद्रा बद्दल थोडी माहिती दिली.
“आमचे अनेक कॅम्प रस्त्यात आहेत.माझा कॅम्प नमसाईला आहे.” सुभेदार खोतनी आम्हाला परत असताना कॅम्पला भेट देण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या सोबतचे सुभेदार मेजर कदमची पण चांगली ओळख झाली. सर्वं पुणेकर सैनिकांशी गप्पा मारण्यात दंग झाले. वीणाताई मात्र शांत बसल्या होत्या. अल्लड असलेल्या ब्रम्हपुत्रकडे पाहात.

शेवटी एक फेरी थोडे जास्त भाडे घेऊन जायला तयार झाली. एकदाचे आम्ही फेरीत बसलो. ४० मिनिटाचा प्रवास करून आम्ही थोडे पुढे गेलो. पुढे फेरी जाणे अशक्य होते. आता खाली उतरून पाण्यातून जावे लागणार होते. आम्ही सर्वांनी आपले सामान डोक्यावर घेतले व पाण्यातून मार्ग काढत पुढे निघालो. मला सर्वात काळजी होती वीणाताईंची या वयात त्यानां हे जमेल का ? वीणाताई सावकाश येत होत्या. सुभेदार मेजर कदम त्यांना मदत करत होते. जवळपास कंबरेपर्यंतच्या पाण्यातून आम्ही सावकाश जात होतो. जवळ पास १५ मिनिटाचा असा प्रवास करून आम्ही पुढे जाणाऱ्या पक्क्या रस्त्या पर्यंत पोहोंचलो.

सुभेदार मेजर कदमचे साथीदार चपळ हालचाली करून आपले अवजड सामान रस्त्यावर आणत होते. तिथे त्यांना नेण्यासाठी शक्तिमान ट्रक आलेले होते. त्यांनी आम्हाला अलुबारीघाटा पर्यंत पोहोंचवण्याची विनंती मान्य केली. शक्तिमान मध्ये बसून आम्ही अलुबारी घाटापर्यंत आलो. आता आमचा व मराठा लाईट इन्फंट्रीचा मार्ग वेगळा होता. आम्ही पुढची फेरी पकडून दुसऱ्या काठावर पोहोंचलो. नदीच्या दुसऱ्या बाजूस आमची वाट पाहत असलेले श्री. दिक्षितजी व रंजनाताई बऱ्याच वेळापासून बस सोबत उभे होते. दिक्षितजी ताफ्रागाव विवेकानंद केंद्र विद्यालयाचे(VKV) प्राचार्य तर रंजनाताई अरुण ज्योती प्रकल्पाची जीवनवृत्ती. सकाळी ७ च्या आसपास आम्ही तिनसुखिया सोडले होते आता पाच वाजत आले होते. जाताना दांगलट बस्ती मध्ये मिश्मी बांधवाना थोडावेळ भेटलो. त्यांची घरं पाहिली व पुढे तेजू कडे निघालो. तेजुत पोहांचेपर्यंत सूर्यास्त झाला होता.

रात्रीचा आमचा निवास VKV ताफ्रागावला होता ही मुलींची दहावी पर्यंतची शाळा. आम्ही शाळेत एकदाचे पोहोंचलो. प्रार्थनेची तयारी सुरु होती. आम्ही लगेच तयार होऊन प्रार्थना व भजनासाठी गेलो. सुरुवातीचा एकात्मता मंत्र झाल्यानंतर एक मिश्मी भजन एका मुलीने म्हटले. सर्वत्र एक भावपूर्ण वातावरण होते. मिश्मी भजन संपले आमच्या कानावर अचानक “केशवा माधवा तुझ्या नावात रे ” चे सूर पडले. ताफ्रागावच्या शाळेतील मुली सुंदर मराठी भजनं गायच्या. आमच्या दापोरीजोची लिसा लोंमदक तर इतक्या अफलातून मराठी भजनं म्हणायची की जर तिला न पाहता फक्त आवाज ऐकला तर कुणी प्रख्यात मराठी गायिका म्हणते का असे वाटेल. गाण्याचे शिक्षण आजिबात नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे “रुणझुण रुणझुण ए भ्रमरा” तर तिच्या तोंडून ऐकताना मन एका प्रशांत अवस्थेत जायचे. पुढे लिसा पुण्याला फर्ग्युसन मध्ये शिकण्यासाठी आली.

अरुणाचली बांधवांचे मराठी लोकांशी एक अतूट नाते जुळले होते. बाबुजी (सुधीर फडके) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट काढत होते. एन भरात पैशाची कमतरता जाणू लागली. आई(बाबुजींच्या पत्नी)अनेकांना पैशासाठी फोन करत होत्या. एक फोन त्यांनी न चुकता अरुणाचलला लावला.
“ नमस्कार दीपक मी आई बोलते.”
“नमस्कार आई कशा आहेत तुम्ही, बाबूजी व श्रीधर”
“आम्ही ठीक आहोत. बेटा बाबुजी चित्रपट काढतायेत पैसा कमी पडतो आहे. तू किती देणार ?”
“किती देऊ आई ?“
“तुला जमेल तेवढा दे.”
दिपकजीनी लगेच दोन लाख रुपये चित्रपटासाठीचे आपले पहिले योग दान म्हणून पाठून दिले.
हे दीपकजी म्हणजे श्री लेखी पुंसो तवांगचे बाबूजींचे मोठे चिरंजीव. लहानपणा पासूनच तवांगचे लेखी पुंसो बाबूजींच्या घरीच शिकण्यासाठी राहिले. बाबूजी व आईच्या निर्मळ प्रेमाने ते फडके घरातील दीपक बनले.
बाबूजींनी आपली शेवटच्या काळात दिपकजीना आपल्या बोटातील हिऱ्याची अंगठी काढून दिली. ती खुपच किंमती होती. श्रीधर फडकेंना त्यांना ती परत देऊ केली तर ते म्हणाले,
“ त्या अंगठीवर अधिकार घरातील मोठया मुलाचा आहे त्यामुळे बाबूजींनी ती अंगठी तुम्हाला दिली.”
श्री लेखी पुंसोची भाच्ची आता अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत आहे व तिचा स्थानिक पालक मी आहे.
असे अनेक उदाहरण आहेत.

आमचा दुसरा दिवस तेजू व परिसर पाहण्यात गेला. संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पुणेकर मंडळीनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला तर शाळेतील मुलीनी अरुणाचलची. वीणाताई नऊवारीत अगदी आजीबाई दिसत होत्या. मला कधी कधी प्रवासात शंका यायची या नक्की ६२ वर्षांच्याच आहेत का ? तसे महिला खरे वय लपवतात असे मी बऱ्याच वेळा ऐकले होते !!!!!

दिनांक ५ जुलै २००९ सकाळी मी, रंजनाताई व ७ पुण्याचे शिलेदार VKV अम्लीयांगच्या जीप ने ताफ्रागावहून अम्लीयांगसाठी निघालो. मोसम बहोत सुहाना था !!!! आणि रस्ता मोकळा व शांत. वेगात आमचे मार्गक्रमण होत होते. हायलीयांगचा रस्ता. ९० किलोमीटरवर VKV अम्लीयांग होते.थोडा सपाटीचा रस्ता संपल्यावर

डोंगररांगातून प्रवाससुरु झाला. महेश, जयदीप, संतोष व माझ्या तर वीणाताई, अर्चना, मधुमती व पूर्वा यांच्या रंजनाताई बरोबर गप्पा मस्त सुरु होत्या. थोड्यावेळानी मराठी गाणे सुरु झाले. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या लोहितच्या सोबतच पण तिच्या उगमाकडे आम्ही जात होतो.

आता जीप चा वेग कमी झाला होता पण जंगलाचा एक सुंगंध दरवळत होता. वातावरणात एकदम थंडावा आला होता. Last View of Planes अशी पाटी मी पाहिली व चालक अनुपला जीप थांबवायला सांगितली. सर्वं जण खाली उतरले व पश्चिमेकडे खाली अथांग पसरलेले लोहितचे पात्र पाहून सर्व जण अवाक झाले.

परशुरामाने आपले कर्तव्य पूर्ण झाल्यावर आपला रक्त्नाने माखलेला परशु या लोहित नदीत धुतला होता त्यामुळे ही लाल रंगाची म्हणचे लोहित झाली. तेजू पासून जवळच परशुराम कुंड आहे. मकरसंक्रांतीच्या वेळेला मोठी यात्रा भरते.

लोहितचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो ७० किलोमीटर गेल्यावर पूर्वेकडील डोंगरांगाचे मनोहर दृश्य दिसत होते.तिथे उभा केलेल्या एका लाकडी शेड मधील बाकांवर आम्ही मनाच्या एक तरल अवस्थेत एकमेकाशी हसत गप्पा मारत बसलो. मन विशाल झाल्याचा अनुभव विस्तीर्ण निसर्गामुळे येत होता.

आमचा पुढचा प्रवास सुरु झाला आत्ता पर्यंतचे अंतर आम्ही काही तासात पूर्ण केले होते. अम्लीयांग आता ७ किलोमीटरवर होते. एक वळण घेऊन आम्ही सरळ रस्त्याला लागलो तेच खाडकन काही तरी आवाज आला. मी चालक अनुपकडे पहिले तो स्टेअरिंगकडे पाहत होता. जीपच्या स्टेरिंगचा दांडा तुटून त्याच्या हातात आला होता. जीप सपाट रस्त्यावर आल्याने आम्ही वाचलो. एक दोन मिनिटे आधी हे घडले असते तर .....आम्ही जीपसह दरीत कोसळलो असतो.अनुपने ब्रेक दाबून गाडी थांबवली. अपघाताची तीव्रता पुणेकरांना न जाणवू देता मी हसत खाली उतरलो व सर्वांना उतारवयास सांगितले. अम्लीयांग ७ किलोमीटरवर होते. पण डोंगरातून एक जवळचा रस्ता होता. त्या रस्त्याने आम्ही शाळेत पोहोंचलो. ही प्राथमिक शाळा असल्याने मुलांचा खुपच चिवचिवाट होता. डोंगर माथ्यावरच्या सपाट भागावर ही शाळा,समुद्र सपाटी पासून ७५० मीटर वर.

सुरुवारीच्या दिवसामुळे आम्ही नियोजनाच्या एक दिवस मागे होतो. तो दिवस अम्लीयांग मध्ये राहून आम्ही पुढे प्रवासाला जाणार होतो आता जीप पण खराब झाली होती . दुरस्तीसाठी अनुप तेजुला गेला. आत्ता दुसरा पर्याय होता बस ने जाणे. दुसऱ्या दिवशी त्याबद्दल माहित होणार होते.
रात्री आम्ही सर्वं जण मुलांमध्ये मस्त रमलो. अरुणाचलच्या छोट्या मुलांमध्ये प्रचंड उत्साह असतो. मी एक जोशपूर्ण गीत सर्वांना सांगितले ते सगळे माझ्या पाठोपाठ म्हणत होते.

खून भी देंगे जान भी देंगे, देश की मिट्टी कभी नही देंगे.
याहू याहू वो याहू याहू
ओं ओं ओं ओं ओं ओं ओं ओं
जहाँ हुये बलिदान भगतसिंग वो पंजाब हमारा है ......
याहू याहू वो याहू याहू
ओं ओं ओं ओं ओं ओं ओं ओं
जहाँ हुये बलिदान जोगिंदर वो अरुणाचल हमारा है......
याहू याहू वो याहू याहू
ओं ओं ओं ओं ओं ओं ओं ओं
मुंबई हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी
अपना देश अपनी माटी

मुलं अगदी फुल जोशात गीत गात होते तर सर्वं पुणेकर भावनिक एकात्मतेचा अनुभव घेत होते.
निसर्गाला पण शहिदांचे बलिदान ऐकून गहिवरून आले असेल. त्याने आकाशातून बरसायला सुरुवात केली. थोडी रिमझिम सुरु झाली. रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर आम्ही झोपण्यासाठी अतिथी कक्षात गेलो. मला काही झोप लागत नव्हती. पुढचे नियोजन कसे करायचे या बद्दल विचारांनी मेंदूचा पूर्ण ताबा घेतला होता. अमृतांजन कपाळाला चांगलेच लेपून मी झोपायचा प्रयत्न करत होतो. पावसाने पण चांगलाच जोर धरला होता. आता तर अधिकच अस्वस्थ वाटत होते.

१९६२ मध्ये कसे आपले जवान या भागात पुढे जात असतील त्यावेळी एवढे चांगले रस्ते पण नव्हते. अम्लीयांगच्या काही अंतर आधी आशियातील सर्वात लांब झुलता पुल ही (Longest Balanced Bridge in Asia) बॉम्बे साप्पेर्स ( The Bombay Engineering Group, or the Bombay Sappers)

या भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी शाखेनी उभारलेले एक जबरदस्त बांधणी त्यावेळी नव्हती. कर्नल श्याम चव्हाण व त्यांचे साथीदार कसे लढले हे त्यांच्या पुस्तकातून वाचलेले डोळ्यासमोर चित्रपटा सारखे येत होते.
सकाळी ३च्या आसपास मला झोप लागली असेल व सकाळी सव्वा पाचला प्रार्थनेसाठी उठलो. चांगलाच पाऊस सुरु होता. अरुणाचल मधील वातावरण कधी बदलेले हे निश्चित असे कधीच सांगता येत नसे. पुण्याचे मित्र खूप उत्साहात होते त्यांना पुढे येणाऱ्या समस्या माहित नव्हत्या. माझ्या मनातील चिंता चेहऱ्यावर न येवू देण्याचा मी परोपरीने प्रयत्न करत होतो.

अरुणाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या हायलीयांग येथील कार्यालयात वॉलॉंगसाठीच्या बसची चौकशी केली तर कळले की काल गेलेली बस परत आलेली नाही. बऱ्याच ठिकाणी Land Slide (डोंगर कोसळणे) झाल्याने रस्ता बंद आहे. जवळच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कार्यालयात गेल्यावर कळले की हायलीयांग ते वॉलॉंग रस्ता बंद आहे. एकही वाहन अजून पोहांचू शकले नाही अंदाज आहे की पुढील दोन तीन दिवस तरी रस्ता चालू होणे अशक्य. वॉलॉंग आत्ता रद्दच करावे लागणार.

त्या दिवशी आम्ही हायलीयांग परिसरात फिरलो. बांबू व तारेचा झुलता पूल, मिश्मी बांधवांची घरे त्यांचे लोक जीवनांचा परिचय करून घेतला. इथलाच एक केंद्राच्या शाळेचा विद्यार्थी खोपे ताले हा पुण्यात वकिली शिकायला पुढे आला. प्रबोधिनीच्या प्रशालेचे प्राचार्य पोंक्षेसरांच्या घरीच तो अनेक वर्षं राहिला. पोंक्षेसर म्हणजे ईशान्य भागातील अनेक मुलांचे पुण्यातील पालक. दर वर्षी कुणी न कुणी विद्यार्थी त्यांच्या घरी राहायला असत. पुण्यातील ईशान्य भागातील मुलांची हेल्पलाईन म्हणजे श्री विवेक पोंक्षे. ते स्वतः अरुणाचल मधील केंद्राच्या शाळेत अनेक वर्षं शिक्षक होते. दर वर्षी एकदा तरी ते पूर्वांचल मध्ये जाऊन येतात. तेथील अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांना प्रबोधिनीच्या माध्यामातून पोंक्षेसर सर्वं प्रकारची मदत करत असतात.

मिश्मी बांधवांची हातमागावर तयार केलेली गुलाबी, लाल,काळ्या रंगाची कपडे खूप सुंदर असतात. स्वभावाने खुपच शांत व सरळ आहेत हे लोक. कामन मिश्मी बांधवांची “दुयाया” (Duyaya ) ही समृद्धीची देवता आपल्याकडील लक्ष्मी. फारसे जगाचे अनुभव नसल्याने असलेले सगळे चांगले गुण त्यांच्यात तर त्यामुळे मात्र भौतिकदृष्टया मात्र हा भाग जास्तच अविकसित राहिला.

दिवसभरात एकही वाहन वॉलॉंगहून आलेले नव्हते. रस्ता मोकळा होईल याची खात्री संध्याकाळी पण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कमांडरला नव्हती. आत्ता काय करणार?जयदीप, संतोष व महेश खुपच नाराज होते.
मध्ये मध्ये मी त्यांना मजेत म्हणायचो,

“अरे उगाच महाराष्ट्रत मजा करायची सोडून इथे जंगलात आलात.”

शेवटी दुसऱ्या दिवशी परत तेजुला जायचे ठरले. पण मंडळाची बस तेजुला गेलेली परत काही आली नाही. रात्री पर्यंत आली तर परत जाता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी कळले की तेजूहून निघालेली बस नदीच्या पाण्यात वाहत गेली. पाण्याचा वेग अचानक खूप वाढल्याने चालकाने बस मधून उडी घेऊन काठ गाठला थोडावेळ आधी बस मधील सगळे जण पाण्यातून हळूहळू चालत आले होते म्हणून प्राणहानी झाली नाही.

आता परतायला बस पण नाही. प्राचार्य सुब्रमण्यमनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कमांडरला त्यांची गाडी तेजुला जाणार आहे का याची चौकशी केली. आमचे भाग्य थोर म्हणून लगेचच दोन तासात गाडी निघाली. पाऊस काही थांबलेला नव्हता. शक्तिमान खुपच हळूहळू चालला होता. अशा पावसात ती भली मोठी ट्रक चालवणे फारच अवघड. आमच्या बरोबर सैनिकांचे काही कुटुंब होते ते कॅम्प पर्यंत काल १५ किलोमीटर चालत आलेले होते.

ट्रक अचानक थांबली. आम्ही मागे बसलो असल्याने समोरील काहीच दिसत नव्हते. मी,जयदीप, संतोष व महेश उद्दी मारून खाली उतरलो. समोर पाहतो तो काय डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला होता. काही वेळा पूर्वीच हे झाले असल्याचे जवानांना लक्षात आले. आता काय करणार ? जवानांनी सांगितले आता पुढे चालत जावे लागणार. त्यांनी एका कोपऱ्याने पाऊल वाट करून दिली. पुढे आमची टीम चालत निघाली. रंजनाताईच्या पायाला काहीच दिवसांपूर्वी अपघात झाल्याने खूप मोठी दुखापत झाली होती तिला चालणे अवघड होत होते. सगळ्यांच्या जवळ चांगलेच ओझे होते. पण चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ५ किलोमीटर चालून गेल्यावर डीम्बें येथील बोर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)चा मोठा बेस कॅम्प लागला. तिथे चवकशी केल्यावर कळले की ३ किलोमीटरवरील दोरा नाला (पगली नदी ) खूप भरून वाहतो आहे. पाणी कमी झाले असल्यास पुढे जाता येईल.

अर्चना,वीणाताई, मधुमती, पूर्वी व रंजनाताईला तिथेच बसून आम्ही नाल्याच्या दिशेने चालू लागलो. अरुणाचल मध्ये विविध उपनद्यांना नाला किवा पगली नदी म्हणत असत. पगली नदी म्हणजे पाऊस नसला की नदी असल्याची काहीच खुण रहात नाही व पाऊस सुरू झाला ती एकदमं रौद्र रुपात वाहणारी छोटी नदी. उंच डोंगररांगातून प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याचा वेग तुफान असतो. अशा थोडया थोडया अंतरावर वाहणाऱ्या अनेक पगल्या नद्या अरुणाचलच्या सपाट भागात अनुभवता येतात. तीन किलोमीटर चालत गेल्यावर वेगाने वाहणारी पगली नदी ऊर्फ नाला आम्हाला दिसला. काठावर अनेक लोक होते. त्यांना विचार पूस केल्यावर कळले की पाण्याचा वेग प्रचंड आहे. नदी पार करणे दुरापास्त होते. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने २०० मीटरवर काल वाहून गेलेली परिवहन मंडळाची बस उलटलेल्या अवस्थेत दिसली. प्रचंड आवाज करत नदीचा प्रवाह वेगाने वहात होता. अशी वेगवान नदी पुणेकरांनी उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती.

शेवटी परत फिरण्याशिवाय गत्यंतर नव्हते.आम्ही परत डीम्बें कॅम्पला आलो .आता परत अम्लीयांगला पण नाही व तेजुला पण नाही आमची त्रिशंकूची अवस्था झाली होती. येथील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कॅम्प मध्ये राहावयास मिळेल का म्हणून प्रवेशद्वारावर चौकशी केली पहिल्यांदा उत्तर आले नाही. सोबत महिला आहेत व वृद्ध आजीबाई आहेत असे सांगून विनंती केली. प्रवेशद्वारावरील रक्षकाने आपल्या वॉकीटॉकीवरून कॅम्प प्रमुखाशी संपर्क साधला. आम्हाला मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळाली.अंधार बराच पडला होता.सकाळी निघालेलो आम्ही ८ तासानी कॅम्पपर्यंत पोहोंचलो होतो.

कॅम्प मध्ये गेल्यानंतर मी व रंजनाताई कॅम्प प्रमुखांशी बोलायला गेलो. त्यांना सर्वं परिस्थिती सांगितली. त्यांना माझे ओळखपत्र पाहिले. तेथून त्यांनी VKV ताफ्रागावचे प्राचार्य दिक्षितजीना फोनवर संपर्क केला. ओळखपरेड झाल्यावर आम्हाला राहण्याची परवानगी मिळाली पण आमच्या सोबत महिला असल्याने परत पंचाईत. तेथील एका जवानाने प्रमुखांना दोन दिवसांपूवी रिकामे झालेले एक निवास असल्याचे सांगितले. आमची सर्वांची व्यवस्था त्या निवासगृहात करण्यात आली. दोन खोल्या होत्या. आजचा दिवस काहीच न पाहता म्हणजे प्रेक्षणीय ! संपला होता. रात्रीचे जेवण घेऊन शांत झोप लागली. सकाळी उठलो तर महेशनी पहिल्यांदा पहिले पाऊस थांबला का ? पाऊस काही थांबला नव्हता. एकदा कॅम्प मधील वाहतूक प्रमुखाला भेटून मार्ग मोकळा झाला का याची विचार पूस केली.

“भाई साब दो दिन से एक भी गाडी नीचे गयी है .....हमारे आर्मी वाले भी नही.”

सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री राजमाची भाजी व व रोटी व मधल्या काळात अगदी सर्वं विषयांवर गप्पा,खेळ, गाणे म्हणणे व मध्ये मध्ये पाऊस थांबला का नाही हे बघण्यासाठी थोडं बाहेर फेर फटका मारणे व चौकशीकरणे.
आज दहा तारीख होती गेले तीन दिवस आम्ही ताफ्रागावच्या पासून १२ किलोमीटर वरील बोर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कॅम्प मध्ये होतो. महेश तर खुपच ताणात होता.

“अरे हा पाऊस कधी थांबणार?”

असे तो मध्ये मध्ये म्हणत असे. सगळ्यांचीच खूप विचित्र अवस्था झाली होती. आर्मीची सुद्धा एकही गाडी तेजू कडे जाऊ शकली नव्हती. १९६२ च्या भारत चीन युद्धा नंतर ३५ वर्षांनी अशी अवस्था होती तर मग नेहरुजीनी फॉरवर्ड पॉलिसी नुसार सैन्यदलला जून १९६२ मध्ये कसल्याही अवस्थेत पुढे जा म्हणून सांगितले त्यावेळी तर स्थिती कशी असेल ? एखादा तरी दिल्लीतील नेता त्या वेळी या भागाची पाहणी करण्यासाठी आलेलेला असेल का ? असे अनेक प्रश्न मनात होते.

१० तारखेला थोडे उजाडले. पाऊस थांबला. सकाळी ११च्या दरम्यान आर्मीच्या एका गाडीत बसून आम्ही दोरा नाल्याच्या काठी आलो. पाणी थोडे कमी झाले होते. सोबत राजपूत जवान होते. त्यांनी थोडा अंदाज घेतला. गाडी पाण्यातून जाणे शक्य नव्हते. काही जवानांना पुढे जाणे आवश्यक होते. आम्ही दोरा नाल्याच्या चढवा कडे निघालो. एका ठिकाणी पाणी थोडे कमी होते. राजपूत जवानांनी पाण्याचा अंदाज घेतला व एक एक जवान पाण्यात उतरत होता. अंतर फार नव्हते १०० मीटर असेल फार तर.खोली पण फार नव्हती. पण वेग प्रचंड होता.पन्नासच्या आसपास जवान एकमेकाचे हात धरून पुढे पुढे सावकाश जात होते. अखेर पहिला जवान दुसऱ्या काठावर पोहोंचला. मग आम्ही एक एक जण जवानांच्या हाताची मदत घेत पाण्यातून चालू लागलो. मी मध्यावर आलो तर एकदम एका जवानाचा जोरात आवाज आला,

“अरे भाई संभल के ........”

मी मागे पहिले तर संतोषचा हात सुटला होता. त्याच्या पाठीवर मोठी ब्याग होती. त्यात त्याचा पाय निसटला व तो पाण्यात वाहत जात होता. माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. संतोष १०० फुट तर पाण्यासोबत वाहत गेला असेल. पण त्याचे व आमचे दैव बलवत्तर होते. एका दगडाला त्याची ब्याग अडकली व तो तेथेच अडकला. हळूच जवानांच्या मदतीने तो परत आला. मी एकदाचा दुसऱ्या काठावर पोहोंचलो तोच माझ्या मागे असलेल्या रंजनाताई व वीणाताई पाण्यात पडल्या पण जवानांनी त्यांना लगेच सावरले. रंजनाताईच्या पायाला परत चांगलीच दुखापत झाली. पण आम्ही सर्व जण सुखरूप पोहोंचलो.

आत्ता पुढे १० किलोमीटरचालत जावे लागणार होते. थोडे अंतर गेल्यावर रंजनाताईला जास्त त्रास होऊ लागला. शेवटी आम्ही काही जण पुढे जायचे ठरले. आम्ही चालू लागलो सगळ्याताई मात्र तिथेच बसल्या. आम्ही एखादे वाहन मिळते का ते पाहण्यासाठी पुढे निघालो. दोन तास सलग चालल्यावर ताफ्रागावचे वळण लागले. पण समोर एकदम आनंदाचा धक्का बसला. सगळ्या VKV च्या मुली समोर दिसत होत्या. काही शिक्षकांसोबत त्या लोहित नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आलेल्या होत्या. दिक्षितसर बरोबर होते व VKVची बस पण.मी पहिल्यांदा बस घेऊन सर्वं ताईनां आणण्यासाठी गेलो व त्यांना घेऊन आलो. कालपर्यंत लोहित नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते.

संध्याकाळ झाली होती. आम्ही परत VKV ताफ्रागावला निघालो. बस मध्ये मुली गच्च भरल्या होत्या. येताना काही मुली चालत आल्या होत्या त्या पण बस मध्ये बसल्याने चांगलीच गर्दी झाली. मी, जयदीप, संतोष व महेश व शाळेतील काही भैय्या लोक गाडीच्या टफावर बसून शाळेकडे निघालो. दिवस मावळतीला आम्ही शाळेत पोहोंचलो होतोत. संध्याकाळी जेवण केले. १३ जुलैचे पुणेकरांचे परतीचे आरक्षण गुवाहाटी पासून चे होते. आता फक्त दोनच दिवस मध्ये होते. सगळे जण मोठया चिंतेत होते काय होणार? महेश तर गेल्या काही दिवसांपासून फार बोलतच नव्हता. संतोषला मात्र अनेक प्रश्न असत. जयदीप तसा शांत. अर्चना व पूर्वा बऱ्यापैकी गप्पा मारायच्या पण मधुमती अगदीच शांत. वीणाताई मात्र खुपच प्रगल्भ होत्या.

दुसऱ्या दिवशी शाळेच्या बस ने आम्ही अलुबारी घाटाच्या एका काठावर पोहोंचलो पण संध्याकाळ पर्यंत एकही फेरी मिळाली नाही. शेवटी दिवस मावळताना एक फेरी नमसाई घाटा पर्यंत मिळाली. त्या पुढे वाहन मिळणे अशक्यच होते. शेवटी आम्हाला सुभेदार मेजर कदमच्या आमंत्रणाची आठवण झाली व आम्ही नमसाईला पोहोंचलो तेथील स्थानिकांनामराठा लाइट इन्फन्ट्रीचा कॅम्प विचारला. चांगलाच अंधार पडला होता. आम्ही कॅम्पच्या जवळ पोहोंचलो गेटच्या कमानीवर नाव होते “शिवनेरी” एकदम उर भरून आले. आम्ही चौकीवरील जवानाला सुभेदार मेजर कदमने बोलावले असल्याचे सांगितले. त्यांनी लगेचच सुभेदार मेजर कदमंना बोलावले. त्यांनी आमचे हसत हसत स्वागत केले. आम्ही शिवनेरीवर प्रवेश केला. कॅम्पचे प्रमुख मेजर जाधवांशी आमची ओळख करून देण्यात आली. आमच्यासाठी एक खास खोली मोकळी करून दिली. सर्वत्र मराठी वातावरण होते.

संध्याकाळी कॅम्प मधील मंदिरात नित्यनेमाने भजनांचा कार्यक्रम असे. आम्ही सर्वं भजनासाठी मंदिरात गेलो. एकदम खड्या आवाजात तुकोबाची व इतर संतांची भजने त्यांनी म्हणली. आम्हाला पण एक भजन त्यांना म्हण्यायला सांगितले. आमचे भजन अगदी शांत व संथ चालीत होते. एक जवान हसत म्हणाला,

“आम्हाला इथे जोशात राहण्यासाठी खड्या आवाजातलीच भजनं लागतात. तुमच्यासारखी भजन म्हटली तर नक्की झोप लागेल !!!”

भजना नंतर मस्त भोजन झाले व आता झोपण्याची तयारी.मला मेजर जाधवांनी गप्पा मारण्यासाठी बोलवले त्यावेळी बाकीचे सगळे इतर जवानांशी गप्पा मारण्यात दंग झाले. प्रत्येक जवान जिथे झोपलेला होता त्याच्या बाजूला त्याची मशीनगन होती. जयदीपने विचारले,

“हे असे का ?”

“गन सोबतच लागते. सतत सावध असावे लागते.....अहो तिच्याशीच तर आमचे पहिले लग्न लागले.”

३००० किलोमीटर असणाऱ्या आपल्या कुटुंबाबद्दल विचारल्यावर ते भाऊक झाले. सुभेदार मेजर कदम तर आमच्या पाहुणचारात इतके तत्पर होते की आम्ही त्यांचे खुपच जवळचे नातेवाईक आहेत का असे मेजर जाधवांना वाटले.
उद्या कोणत्याही हालतीत तिनसुखियाला पोहोचणे आवश्यक होते. मी सुभेदार मेजर कदमनां माझी समस्या सांगितली. त्यांनी मला आश्वासन दिले, “नक्की पोहोचते करू”

झोपण्यासाठी आडवा झालो. चीन युद्धाचा विचार करत करतच झोप कधी लागली ते कळले नाही. सकाळी उठून सगळे जण तयार झालो. सुभेदार मेजर कदमनी आमच्यासाठी खास पुरीभाजीचा नाष्टा तयार करावयास सांगितला होता. मस्त गरम गरम पुरीभाजी खाऊन व दुधाच्या पावडरचा चहा घेऊन आम्ही एका पेट्रोलिंगच्या जीपने निघालो. थोडे पुढे गेल्यावर एक छोटा नाला होता. दोन फळ्यांनी जोडलेल्या छोट्या होड्यांच्या सहाय्याने जीप दुसऱ्या काठावर नेली व तेथून नमसाई गावातील बस स्थानकाजवळ. तेथून लगेच आम्हाला बस मिळाली.
प्रत्येकजण सुभेदार मेजर कदमचा हात हातात घेऊन म्हणत होते,

“परत भेटू.”

सुभेदार मेजर कदमच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते. आमची बस निघेपर्यंत ते थांबले. खिडकीतून बराच वेळ हात हलवत आम्ही त्यांचा निरोप घेतला.

परत आमच्या पेकी कुणाचीच प्रत्यक्ष भेट त्यांच्याशी झाली नाही पण पत्र रुपाने मात्र ते भेटत राहिले. अर्चना,वीणाताई, मधुमती, पूर्वी मात्र त्यांना पुढे अनेक दिवस राखी पौर्णिमेला नियमित राखी पाठवत असत.
सुभेदार मेजर कदमचे खूप भाऊक उत्तर त्यांना येत असत.

दुपारी आम्ही तिनसुखियाला पोहोंचलो व तेथून दिब्रुगडला. संध्याकाळच्या गुवाहाटीच्या बसचे तिकिटे काढली. नमसाई सोडल्या पासून महेश परत पहिल्यासारखे हसत बोलू लागला. पूर्ण प्रवासात फार काही न बोललेली मधुमती चांगल्याच गप्पा मारू लागली. संतोषचे प्रश्न थोडे कमी झाले होते तो थोडा शांत शांतच होता. अर्चना, पूर्वा व जयदीप पण अनोख्या अनुभवामुळे प्रसन्न दिसत होती. वीणाताई शांत पण एक चांगली तीर्थयात्रेत अनेक जनांन मध्ये जनार्धनदर्शन झाल्याने आनंदी व दृढ चित्त दिसत होत्या.

रात्रीच्या बसने महेश बर्दापूरकर,जयदीप साळी, संतोष कीर्तने, अर्चना पाटसकर, वीणाताई गर्भे, मधुमती पराडकर आणि पूर्वी लोणकर हे सात मराठे परत अरुणाचलची मोहीम करण्याचे ठरून गुवाहाटीला निघाली. त्यांना दुसऱ्या दिवशीची ट्रेन पण मिळाली पण बराच अरुणाचल पहायचा राहून गेला.

प्रश्न विचारून भंडावून सोडणारा संतोष मात्र पुढे विवेकानंद केंद्राचा सेवावृत्ती म्हणून केंद्रात दाखल झाला. वीणाताईच्या आयुष्यात केंद्राचे एक वेगळेच स्थान निर्माण झाले. बाकी सर्वं जण अरुणाचल बंधू परिवाराचे सक्रिय सदस्य झाले. महेश बर्दापूरकरने एक सुंदर लेख दैनिक सकाळच्या रविवारच्या पुरवणी मध्ये लिहिला. तो पुण्यातील अनेक ईशान्य भागातील विद्यार्थ्यांचा मित्र झाला. सह्याद्री व हिमालयाची मैत्री अशीच पुढे चालू राहिली.

२७ फेब्रुवारी २००९ मध्ये सकाळमध्ये महेशचा एक लेख वाचला व मन खूप विशिन्न झाले. त्याने अनेक ईशान्य भागातील मुलांच्या समस्या माडल्या होत्या. तो लिहितो,

“भारताच्या ईशान्य टोकाला असलेले एक निसर्गसंपन्न राज्य...अरुणाचल प्रदेश! हे राज्य या आठवड्यात स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त पुण्यात राहणाऱ्या या राज्यातील विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समोर आले जळजळीत वास्तव आणि चिनी, नेपाळी म्हणून हेटाळणी सहन करून करून देशापासून तुटल्याची भावना बळावलेल्या तरुणांच्या आग ओकणाऱ्या प्रतिक्रिया. "चीन आमचा नाहीच, भारतीय आम्हाला आपलं मानायला तयार नाहीत...आम्ही जायचं तरी कुठं?' या त्यांच्या प्रश्‍नांचं उत्तर पुणेकरांना शोधावंच लागेल...खूप उशीर होण्यापूर्वी...अरुणाचल प्रदेश व त्याचबरोबर ईशान्य भारतातील सातही राज्यांतील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आधारित लेख काही वर्षांपूर्वी लिहिला होता. दरम्यानच्या काळात त्यांचा "आयडेंटिटी क्रायसिस' कमी झाला असेल, अशा समजुतीत होतो; मात्र पहिल्याच विद्यार्थ्याशी बोलताना झटका बसला.

ताया माघे संयत प्रतिक्रिया देताना म्हणतो, ""आम्ही इंडो-मंगोलाइड वंशाचे असल्यानं इतरांपेक्षा वेगळे दिसतो, हे मान्य. सुरवातीला आम्हाला "चिनी-नेपाळी'चा धक्का बसतो. विद्यार्थ्यांनी तो पचवायला शिकलं पाहिजे. आमच्या राज्यातील अनेक सैनिक १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात लढले आहेत. चीन आम्हाला कायमच आमचा शत्रू वाटला आहे. असं असताना इतर भारतीय आम्हाला आपलं मानायला तयार नसल्यानं आमची परिस्थिती बेटावर अडकल्याप्रमाणं झाली आहे.'' लिचा ताफम, ताना तेरा, जेनी ब्युनायी हे सर्वच विद्यार्थी पुण्यात आलेल्या वाईट अनुभवांबद्दल बोलत होते. कोणाच्या डोळ्यांत अंगार दिसत होता, तर कोणाच्या अश्रू. हा प्रश्‍न पुढील काही वर्षांत सुटणं गरजेचं आहे, हे प्रत्येकाचंच मत होतं, मात्र त्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना सांगणं कठीण जात होतं.

मयूर कर्जतकर या कार्यकर्त्याच्या मदतीनं गोखलेनगर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला गेलो. विद्यार्थी बदलले, कॉलेज बदलले तरी प्रतिक्रिया त्याच होत्या. स.प. महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकणारा ताया बागांग आपल्या पुण्यातील वास्तव्याचं विश्‍लेषण करतो. "पुण्यात आल्यावर इतकी वाईट वागणूक मिळेल, असं अपेक्षित नव्हतं. रस्त्यावर आणि कॉलेजमध्ये लोकांच्या चिडवण्यामुळं खूपच निराश झालो. आठ-दहा दिवस कॉलेजमध्येच गेलो नाही. शिक्षण अपरिहार्य असल्यानं हिंमत करून कॉलेजमध्ये जाऊ लागलो. वर्गातील मुलांना अरुणाचल प्रदेशाबद्दल सांगायला सुरवात केली. हळूहळू परिस्थिती सुधारली. पहिलं वर्ष संपेपर्यंत मी काही मराठी शब्द शिकून घेतले. काही मराठी मित्र मिळाले. संदेश या उस्मानाबादच्या मित्राच्या घरी आठ दिवस राहून दिवाळी साजरी करून आलो. भाषा लोकांना जवळ आणते हे पटलं.'' तायाचा रूममेट तिलू लिंगी याच्या मते सांस्कृतिक देवाण-घेवाणीतून आयडेंटिटीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटू शकतो. मात्र, हे नव्वद टक्के पुण्यातील नागरिकांवरच अवलंबून आहे. "

मुलींच्या समस्या अधिक गंभीर

अरुणाचलमधील विद्यार्थिनींच्या समस्याही जाणून घ्यायच्या होत्या. रुक्‍मिणी लिंगी, रेबे,सोनिया मिबॅंग व मणिपूरची हेमलता लोरेमबाम या विद्यार्थिनींशी भेट झाली. त्यांच्या समस्या अधिकच गंभीर असल्याचं लगेचच जाणवलं.
"कॉलेजमधील शिक्षकांपासूनच आमच्या समस्या सुरू होतात. परीक्षा असो वा खेळाचं मैदान,आम्हाला वेगळी वागणूक मिळते. रस्त्यावरून जाता-येता टोमणे ऐकावे लागतात. अनेकदा रूमवर येऊन रडत बसते. एकदा रस्त्यावर एका मुलानं मुद्दाम धक्का मारला. मी त्याच्या कानाखाली ठेवून दिली. मात्र, सिनिअर विद्यार्थ्यांनी भांडण ओढवून न घेण्याची सूचना केली. आता मी इतर मुलींना कोणी काही बोलल्यास दुर्लक्ष करण्याचा सल्ला देते. केवळ दिसण्यावरून वेश्‍याव्यवसायात ईशान्येच्याच मुली असतात. असं म्हटलं जातं, याचा खूप त्रास होतो,'' असं रुक्‍मिणी सांगते. विद्यार्थी संघटनेचं उपाध्यक्षपद भूषविलेली सोनिया म्हणते, ""आमच्याकडे मुला-मुलींना एकत्र वावरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. त्यामुळं इथं आल्यावर आमच्याविषयी विनाकारण शंका घेतल्या जातात. बहिणीबरोबर गप्पा मारणाऱ्या भावालाही टोपणे व अनेकदा मार खावा लागला आहे. आमच्या समस्यांवर कोणतेही थेट उत्तर मला सापडत नाही.''

पुण्यात गेली आठ वर्षे राहणारी व एका कंपनीमध्ये उच्चपदावर काम करणारी रेखा बोरा म्हणते, "मी पुण्यात आल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीच्या नेटवर्कमध्ये होते. त्यामुळं मला कोणतीही अडचण जाणवली नाही. मात्र, या नेटवर्कच्या बाहेर समस्या आहेतच. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या समस्यांना सामोरं जावं लागतं व त्यामुळं ते निराश होतात, कोशात जातात. एकत्र राहत असल्यानं त्यांच्या या समस्या आणखी विस्तारतात. आता फेसबुक व ब्लॉगसारख्या माध्यमांतून ते स्वतःला व्यक्त करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळं त्यांच्या भावनांना वाट मिळेल व भविष्यात हा प्रश्‍न राहणार नाही, असा विश्‍वास मला वाटतो.''

महेश सारखे आपल्याला अरुणाचल मध्ये जाऊन अरुणाचली बांधवांचे आपल्या प्रतीचे भाव समजणे थोडे अवघड आहे पण त्याने जे त्याच्या लेखाच्या शेवटी सांगितले आहे ते आम्ही छत्रपती शिवरायांचे मराठी बांधव नक्कीच भविष्यात करू जेने करून रेखा बोराचा विश्वास नक्की खरा ठरेल.

आपण हे करू शकतो....

शिक्षण संस्था :- ईशान्य भारतातून शिक्षणासाठी आलेल्या मुलांसाठी गट तयार करून इतर विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करून देणे. त्यांच्या राज्याची माहिती करून देणे.
पालक :- आपल्या पाल्याला जमेल तेव्हा ईशान्येतील सात राज्यांची माहिती देणे व केवळ वेगळे दिसतात म्हणून त्यांचा अवमान होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगणे.
विद्यार्थी :- सर्वप्रथम ईशान्येतील राज्यांची ओळख करून घेणे. या राज्यातील विद्यार्थ्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे, त्यांच्या संस्कृतीची ओळख करून घेणे.
सामान्य नागरिक :-वेगळी दिसणारी प्रत्येक व्यक्ती परदेशीच असेल हा गैरसमज दूर करावा. त्या व्यक्तीला "तुम्ही कोठून आलात,' हा प्रश्‍न विचारून ती नक्की कोठून आली आहे हे जाणून घ्यावे. त्यांना मदतीचा हात द्यावा व फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.

शत्रूच्या घोड्यांना पण पाणी पिताना पाण्यात मराठे दिसतात एवढी जरब मर्द मराठयांची आहे.तर मित्रांना व बंधूना सदैव आधार वाटणाऱ्या शिवबाचे आपण अनुयायी आहोत याचा क्षणभर पण विसर आपल्यालाही पडता कामा नये......

गुलमोहर: 

उत्तम लेख.
एक विनंति, असा लेख २/३ भागात विभागता आला तर उत्तम. ऑफिसमधल्या सर्वरवर एकदम डाऊनलोड होत नव्हता. अनेकांना हा प्रॉब्लेम आला असणार.

प्रसाद चिक्षे,

अतीव सुंदर लेख! सोबत अंतर्मुख करणाराही!! 'आपण काय करू शकतो' या सूत्राने समारोप केलेला आवडला. पूर्ण लेखच वाचनीय आणि मननीय आहे.

१९६२ च्या युद्धाच्या कथा ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या ऐकीव माहितीवर आधारित अंधुकशा आठवणीप्रमाणे भारतीय सैन्याने बोमदिला खिंड अडवून परतणार्‍या चिनी सैन्याला कोंडीत पकडायची योजना आखली होती. तिचं पुढे काय झालं माहीत नाही. बहुधा चिन्यांना तिचा सुगावा लागला आणि त्यांनी गाशा चटकन गुंडाळला. अर्थात आपण सांगितलेलं कारणही त्यामागे असेल. मात्र एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून थोर उपकार केल्याचा अगदी व्यवस्थितपणे आव आणला.

आ.न.,
-गा.पै.

प्रसादजी - लेख उत्तमच आहे, ....
पण एक विनंती - या लेखाचे किमान चार भाग करुन येथे पोस्ट केलेत तर खूप बरे होईल सगळ्यांना वाचायला.

केवढा दुर्गम भाग, कसे आपले जवान लढले असतील या भूमीवर - खूपच रुखरुख लागली १९६२ चे युद्ध आठवून.

विवेकानंद केंद्राचे काम ही अभिमानास्पद ....
मनापासून धन्यवाद....

लेख आत्ताच वाचला. ईशान्येकडच्या विद्यार्थ्यांच्या समस्या आतपर्यंत पोहोचल्या. तुमच्या संयत लिखानाचेच यश आहे हे.

'आपण हे करू शकतो' मधील सूचना नक्कीच अमलात आणीन. आणि मित्रपरिवारालासुद्धा त्या बद्दल माहीती देईन हे नक्की.

प्रसाद, अतिशय सुंदर लेख.
महाराजांच्या पुतळ्याचे फोटो पाहताना आणि मराठा लाईट इनफंट्रीचे स्फूर्ती गीत वाचताना अंगावर अक्षरश: शहारे आले.

माझ्या निवडक दहात.

आपण हे करू शकतो.... नक्कीच प्रसादजी , माहीती पुर्ण लेख आवडला Happy
१९६२ चे युद्ध आठवून कसे असेल आठवुन वाइट वाटले पण सुभेदार जोगिंदर सिंग व मेजर सैतानसिंग
यांचा अभिमानही वाटतो.

तेथे कुमाऊ बटालियनची अवघी एक कंपनी होती.... (मेजर) सैतानसिंग यांचा कित्ता ठेवून रक्ताचा अखेरचा थेंब शरीरात असे तो त्यांनी चिन्यांशी सामना दिला. दिवस हिमपाताचे होते. तीन महिन्यानंतर भारतीय अधिकारी पहाडावर गेले, तेव्हा सर्व जवान आपल्या संरक्षण मोर्चात शस्त्र हातात असलेल्या स्थितीत मरणाधीन झाल्याचे आढळले.
>>> या जवानांना सलाम जय हिंद...........

अप्रतिम लेख आहे........................... असेच लिहित जावा............

उत्कृष्ट समयोचित लेख Happy
>>>>पण एक विनंती - या लेखाचे किमान चार भाग करुन येथे पोस्ट केलेत तर खूप बरे होईल सगळ्यांना वाचायला. >>>
अनुमोदन. विषयानुरुप/आशयानुसार भाग होऊ शकतील

खूप खूप धन्यवाद ...मला पण हे पटले आहे की लेखाचे दोन तीन भाग करायला हवे होते आणि ते करता आले ....पण थोडे आरंभीचा उत्साह आहे ....काय काय सांगू असे होते ...पण आपल्या सर्वांसारखे योग्य मार्गदर्शन करणारे असतील तर नक्कीच ......नेमके व योग्य लिहिण्याचा प्रयत्न करेन ...... धन्यवाद

अरुणाचलप्रदेश ४ :-"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत." >>>> हे हेडिंग वाचतानाच अंगावर काटा आला.

प्रसाद चिक्षे .. नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख आहे. ह्या पुतळ्याबद्दल कुठेसे वाचले होते. लेख वाचुन सविस्तर माहिती मिळाली. आभार.

अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण लेख प्रसादजी !
तुम्ही केंद्र कार्यकर्ते म्हणजे घरचेच निघालात. Happy
विवेकानंद केंद्राच्या निवासी शाळा अजुन कुठे कुठे आहेत अरुणाचलम मध्ये? मला वाटते २८ की ३० निवासी शाळा होत्या आपल्या अरुणाचलम मध्ये. तुम्ही विवेकानंद केंद्रासाठी कधीपासून काम करता आहात? ९१ ते ९७ पर्यंत मी केंद्राशी संबंधीत होतो. मला वाटते एम. लक्ष्मीकुमारीजी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या अध्यक्षा होत्या त्यावेळची ही गोष्ट असावी. सोलापूर केंद्रातून आम्ही काही जण, म्हणजे सर्वश्री. बाळासाहेब भागवत आणि त्यांच्या पत्नी, वल्लभदास गोयधानी काका, किर्लोस्कर काका, बसवराज देशमुख, सुहास देशपांडे, विजय वैद्य आणि मी विशाल कुलकर्णी असे आम्ही केंद्राचे काम पाहात होतो. ९३-९४ च्या दरम्यान झालेल्या भारत परिक्रमेतही आम्ही सहभागी झालो होतो (नागपूर ते सोलापूर या प्रवासात)
ते दिवस खरंच ग्रेट होते. खुप काही शिकायला मिळाले केंद्र कार्यकर्ता म्हणुन काम करताना. अजुनही अनुभव ऐकायला, वाचायला आवडतील Happy
धन्यवाद !

९१ ते ९७ पर्यंत मी केंद्राशी संबंधीत होतो.>>>> अरे वा विशाल, तुझा हा पैलू आताच कळला - खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही...... हार्दिक अभिनंदन व अशा कामांकरता मनापासून शुभेच्छा....

प्रसादजींप्रमाणे कंटीन्यु करु शकलो असतो तर ते अभिमानास्पद होते शशांकदादा. आम्हाला नाही जमले ते. शेवटी आम्ही फक्त व्यवहारीच ठरलो Sad
म्हणुनच प्रसादजी जे करताहेत ते नक्कीच स्पृहणीय आणि अभिमानास्पद आहे ! Happy

अरुणाचलप्रदेश ४ :-"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत." .......

अगदी हिच भावना माझ्याही मनात आली. महाराष्ट्रात नाही पण अरुणाचलात मात्र महाराजांच्या ह्या पुतळ्याची रोज पुजा होते, पाऊस, वारा, थंडी, बर्फ कशालाही न जुमानता ..... हे ऐकून खरतर मन खिन्न झाल, लाजच वाटली महाराष्ट्र - मराठी ह्याविषयी बोलण्याची.

लेख अतिशय सुंद्र झाला आहे आणि ह्या प्रदेशाला भेट दिल्यामुळे खरतर परत तेथे फिरत असल्यासारखेच वाट्ले.

मी आता मात्र परत अरुणाचल भेटीचा विचार करते आहे, तेव्हा आपणास जरुर कळवेन.
पु.ले.शु. Happy

अश्विनी के खूप खूप धन्यवाद ...तवांगला नक्की भेट द्या उर भरून येतो.......महाराजांना पाहताना मुठ आवळली जाते व तसेच आनंदाश्रू पण डोळ्यात येतात ......

Pages