अरुणाचलप्रदेश १......."ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग"
http://www.maayboli.com/node/34433
अरुणाचलप्रदेश २..... " आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो "
http://www.maayboli.com/node/34595
१४ एप्रिल १९४४ हा ईशान्यभारतासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस.मणिपूर मधील मोईरंग (Moirang) या गावी आझाद हिंद सेनेच्या कर्नल शौकत मलिक यांच्या हस्ते व श्री मैरेमबाम कोईरेंग सिंग यांसारख्या अनेक ईशान्य भारतातील आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसमोर तिरंगा फडकावला गेला. सुभाषबाबूंचे स्वप्न पहिल्यांदा जिथे पूर्ण झाले ती पुण्यभूमी ही ईशान्य भारत.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताच्या बांगलादेशच्या निर्मितीमुळे स्वतंत्रतेचा पाहिजे तसा आनंद येथील जनतेला घेता आला नाही. इंग्रजांनी आपल्या दोन शतकाच्या काळात दोन भली मोठी भूतं ईशान्य भारतासाठी निर्माण केली. त्यातील एक म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि दुसरे पुढे सांगेन.
पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीमुळे, इंग्रजांच्या इनरलाईन परमिटसारख्या अनेक कुटील कारस्थानांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण भारतभर चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहिलेला आमचा लढवय्यांचा हा भूभाग अजून दूरस्थ झाला.
अरुणाचल याबाबतीत अनेक ठिकाणी अपवाद ठरला. तसं पाहिले तर या भूभागाकडे शांतीदूतांचे लक्ष पण फार व्यवस्थित होते असे नाही म्हणता येत. दापोरीजो तर या बाबतीत अजून उपेक्षित. ब्रिटीश भारतातून गेल्यापासून ऑक्टोबर १९५३ पर्यंत या भागाकडे बरेच दुर्लक्ष केले गेले. २२ ऑक्टोबरला मात्र दिल्ली एकदम हादरली ती अचीन्गमोरी (Achingmori) या बस्तीतील घटनेमुळे. आसाम राईफल्सचा एक गट इथे विश्रांतीसाठी थांबला होता. त्यांच्या बरोबर असलेल्या अबोर जनजातीच्या लोकांनी तेथील तागिन लोकांना हकनाक त्रास दिला होता. आसाम राईफल्सचे जवान स्थानिक लोकांशी मैत्री व्हावी म्हणून विनाशस्त्र स्थानिक लोकांमध्ये मीठ वाटत होती. तागीन बांधवांना वाटले की आधीच्या लोकांप्रमाणे हे परत त्रास द्यायला आले आहेत. त्यांनी आपल्या दाव ( तलवार ) व विषारी बाणाच्या साथीने हल्ला केला व त्यात ४७ जवान मृत्यमुखी पडले. अशा प्रकारच्या हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून पूर्ण बस्तीच जाळून टाकण्याची ब्रिटीश काळात रीत असायची. त्यावेळचे गव्हर्नर जैरामदास दौलतराम यांनी वनवासी बांधवांचा चांगला अभ्यास असलेल्या नरी रुस्तोजी यांच्या सांगण्यावरून शांततेची भूमिका घेतली.याचा परिणाम तागीन बांधवांवर खुपच चांगला झाला व त्यावेळीपासून भारतीय सैन्य आणि तागीन बांधवात चांगले मैत्रीचे बंध बांधले गेले.
१९६२च्या चीन सोबतच्या युद्धात भारतीय सैन्य सीमारेषेवरून अगदी दापोरीजो पर्यंतच्या ताल्लीहा (Talliha) पर्यंत माघार घेत आले होते. ताल्लीहा नदीच्या एका बाजूला तर अचीन्गमोरी दुसऱ्या बाजूला. शेरे थापा (Shere Thapa) या भारतीय सैनिकाने तागीन बंधूंच्या मदतीने साध्या लाईट मशीनगनच्या साह्याने अनेक चीनी सैनिकांना यमसदनी पाठवले होते. यात शेरे थापाला वीर मरण आले.
१९५३ नंतर १९९६ ला मी तिथे गेल्यापर्यंत निदान माझ्या तरी ऐकिवात नाही की अतिशय रागीट समजल्या जाणाऱ्या तागीन बांधवांनी देशाच्या विरुद्ध कोणते कट कारस्थान केले,बंड केले किंवा साधा निषेध केला. तसं पाहिले तर या भूभागाने आपणा सर्वांना खूप काही दिले. हे फक्त दापोरीजो पुरतेच नाही तर उर्वरित ईशान्य भागाबाबत पण लागू आहे.
१९७२ पर्यंत सर्वात जास्त परकीय चलन(Rs 455,00,00,000.00 ) मिळून देणारा व बहुतांश भारतीयांना उत्तेजना देणारा चहा हा सर्वात जास्त या भूमीतून पिकतो. आपले घर सजवण्यासाठी लागणाऱ्या प्लायवूडच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या लाकडाचे हे देशातील सर्वात मोठे केंद्र. देशाच्या भौगोलिक दृष्ट्या केवळ २३ % भूमी वर जंगल आहे त्यात मुख्यतः ईशान्य भारतातील ५३ % जंगलाचा भूभाग येतो. देशातील एकूण बांबू उत्पादनात ६७% वाटा ईशान्य भारताचा आहे. मला माहित असलेल्या माहिती नुसार (२००१) ३४,५०,८७,५१,०००.०० रुपयांच्या किमतीची खनिजे (तेल,नैसर्गिक वायू,कोळसा,सिमेंटसाठी चुनखडी) हे ईशान्य भारताचे “भारतनिर्माण” मधील योगदान. भारत रबर उत्पादकतेत जगात दुसऱ्या स्थानावर व उत्पादनात चौथ्या स्थानावर आहे. यात आपल्या भूभागाच्या ९.८ % भूमीत रबराचे उत्पादन करणारा ईशान्य भाग उठून दिसतो. घराघरातून कापड निर्मिती व्हावी हा गांधींचा संदेश आजही परंपरेने इथले बांधव जपतात. भारतात सर्वात जास्त कापड निर्माण करणासाठी हातमाग वापरात आपले ईशान्य भागातील बांधव आघाडीवर आहेत. सहज आपण पाहिले तर ईशान्य भारत किती तरी आपल्या सर्वांच्या जीवन जगण्याच्या गरजा भागवतो पण आपल्याला माहित नसते की ही ईशान्य भारताची देण आहे.
२६ जानेवारी १९९६, आदल्या दिवशीच मी दापोरीजोहून कुपोरीजोला गेलो होतो. सकाळचे झेंडा वंदन विवेकानंद केंद्र विद्यालयातच केले. दापोरीजो मधील मुख्य कार्यक्रम रीजो मैदानात होता. रीजो म्हणजे भूमीचा सपाट भाग. नेहमी शाळेतील कार्यक्रम झाला की विद्यार्थी व शिक्षक सर्वजण या रीजो मैदानात मोठया उत्साहात पार पडणाऱ्या राष्ट्रीय सणाच्या सोहळ्यासाठी जात असत. अख्खे गावच्या गाव २६ जानेवारी व १५ ऑगस्टला रीजो मैदानावर असे. लहान मुलांपासून मोठया व्यक्तींपर्यंत अनेक लोकांचे अभिव्यक्ती सादरीकरण व्हायचे. एकच जोश असायचा. भारतमाता की जय व जय हिंदच्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन जायचा. राष्ट्रगीत सुरु असताना सर्वजण खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचे.त्यानंतर केशरी, पांढरा व हिरवा पारंपारिक वेश घालून पोनुंग नृत्य करत महिला राष्ट्रध्वज अवतरित करायच्या. सर्व गावाचा तो सण. अशा प्रकारे संपूर्ण गावाच्या सामुहिक देशभक्तीच्या अनुभवांनी मन शांत व प्रसन्न व्हायचे.
पण आज हे सर्वं होणार नव्हते. अरुणाचलच्या विद्यार्थी संघटनांनी २६ जानेवारी १९९६ या दिवसावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. शाळेतील झेंडा वंदन झाल्यावर मी दापोरीजोला निघालो. गावात पोहोंचलो तर सर्वत्र शांतता. नेहमी दिसणारी वर्दळ एकदम अजिबात नव्हती. बाजार पूर्ण बंद. एरव्ही ह्या दिवशी खूप मोठया प्रमाणात सजून धजून लोक रस्त्यावर येत पण आज चिटपाखरू नव्हते. त्या शांत रस्त्यावरून मी पुढे गेलो तर पोलिसांनी मला अडवले. त्यातील काही ओळखीचे असल्याने त्यांनी मला काही न विचारता पुढे जाण्यास सांगितले. रीजो मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुलांचा घोळका होता ते शासकीय अधिकारी सोडून कुणालाही मैदानाकडे जाऊ देत नव्हते.त्यात बरीच नवखी मुलं दिसत होती. तितक्यात पोलिसांची गाडी परत आली, मुलं तिथून पळाली. मी रीजो मैदानाकडे निघालो आहे म्हटल्यावर पोलिसांनी मला ओळख पत्र विचारले. मी काही शासकीय कर्मचारी नाही व मैदानात काही गडबड होऊ नये म्हणून कुठल्याही इतरांना रीजो मैदानावर जाण्यास बंदी होती. त्यात मोटारसायकल घेऊन तर अजिबात नाही. त्यांनी मला परत जाण्यास सांगितले.
“सर, बहोत दिकदारी है, आप वापस जाओ. बच्चे लोक झमेला करेंगे तो गडबड होगा.”
मी कार्यालयात मोटारसायकल लावून चालत रीजो मैदानावर निघालो. मैदानात केवळ बोटावर मोजण्या येवढे सरकारी कर्मचारी होते. विद्यार्थी संघटनांचा बराच धाक लोकांमध्ये होता. ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत सुरु झाले तर अचानक मोठमोठ्यांनी वेडे वाकडे आवाज लपून बसलेली मुलं काढत होती. कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लाऊन त्यांना मैदानात सोडण्यात आले. सर्वं काही बदलल्यासारखे आणि विचित्र वाटत होते. मन हे सर्वं स्वीकारायला तयार नव्हते. सर्वत्र हतबलता होती. राष्ट्रगीत संपले व मैदान पूर्ण ओस झाले.
आज मनात काहूर होता. खूप अस्वस्थ होतो. का घडले असे? मनात सारखे प्रश्न होते. जानियाला विचारले,
“अरे, आज बंद में जो लोग शामिल थे, वे कौन थे?”
“सर, वो लोग तो शिलाँग के कॉलेज में पढे हुए भाई लोग है”
डोकं परत सुन्न झाले. २६ जानेवारीवर बहिष्काराचा निर्णय हा तिराप व चांगलांग जिल्ह्यातील बांगलादेशी चकमा व हजोंग निर्वासितांची हकालपट्टी अरुणाचल प्रदेश मधून करण्यासाठी होता. ९ जानेवारीला न्यायालयाने या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला विरोध व चकमा व हजोंग निर्वासितांची हकालपट्टी यासाठी हे आंदोलन सुरु झाले होते.
माझे अस्वस्थ मन मला काही शांत बसू देत नव्हते. मी जिल्हा ग्रंथालयात जाऊन या बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. चकमा व हजोंग हे मूळ पूर्व पाकिस्तानातील चितगाव हिल्स भागातील बौद्ध नागरिक. तेथील त्यांची जमीन खूप सुपीक. त्या भागात पूर्व पाकिस्तानी शासनाने कर्नाफुली (Karnaphuli) नदीवर १९६० मध्ये काप्ताई (Kaptai) धरण बांधण्याचा निर्णय घेतला व त्या धरण्याच्या पाण्याखाली चकमा व हजोंग लोकांच्या जमिनी बुडाल्या. या सर्वाला चकमा व हजोंग यांचा विरोध होता. त्यांच्या विरुद्ध मोठा हिंसाचार घडून आणून त्यांना देशातून परागंदा होण्यास भाग पाडले. चकमा व हजोंग निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात येऊ लागले. अरुणाचल मधील दियुम (Diyum) भागात मुख्यत्वे करून त्यांचे पुनर्वसन भारत सरकारने केले. त्यावेळी अरुणाचलला राज्याचा दर्जा मिळाला नव्हता. आता त्यांची संख्या चांगलीच वाढली होती व त्यांना नागरिकत्वाचे सर्वं अधिकार द्यावेत असा निर्णय न्यायालयाने दिला. अरुणाचल मधील अनेक लोकांना हे रुचणारे नव्हते. त्यातल्या त्यात ते ज्या भागात होते त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांचे भविष्य पण धोक्यात येणार होते. पण यामुळे अशा प्रकारचे आंदोलन होईल असे मात्र वाटत नव्हते. मी मग या आंदोलनावर असलेल्या परिणामकारी घटकांचा अभ्यास करायला लागलो.
या आंदोलनांवर एकूणच ईशान्य भागात झालेल्या सर्वं दहशतवादी आंदोलनांचा बराच प्रभाव होता. पण अरुणाचली जनतेवर तो फार काळ टिकला नाही.
१) नागालँड
देशात सशस्त्र बंडाचे पहिले निशाण उभारले तर ते नागा रहिवाशांनी. इतिहासात कधीच नागालँड भारताचा भाग नव्हता, असा नागा बंडखोरांचा दावा आहे. तसेच ब्रिटिशांकडून नागालँडचे भारताकडे झालेले हस्तांतर योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. चालत्या-बोलत्या नागरिकांच्या भविष्याचे, आशा-आकाक्षांचे हस्तांतर होऊ शकत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. याच कारणाने नागा बंडखोरांनी भारतातून बाहेर पडून स्वतंत्र नागा राज्याची स्थापना करण्यासाठी सशस्त्र लढ्याचा मार्ग अवलंबला. स्वातंत्र्यप्राप्तीवेळीच अंगामी झापू फिझो याच्या नेतृवाखालील नागा नॅशनल कौन्सीलने हा लढा सुरू केला. या परिस्थितीशी सुरक्षा दलांना योग्य पद्धतीने निपटता यावे म्हणूनच आता ज्यावरून गदारोळ माजला आहे तो आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅगक्ट १९५८ साली लागू करण्यात आला. फिझो डिसेंबर १९५६ मध्ये त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात (सध्याचे बांग्लादेश) आणि जून १९६० मध्ये लंडनला पळून जाण्यात यशस्वी ठरला.
नागालँडला १ डिसेंबर १९६३ रोजी राज्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर केंद्राने नागा बंडखोरांशी चालवलेल्या वाटाघाटी १९६७ साली निष्फळ ठरल्या आणि केंद्राने पुन्हा लष्करी कारवाई सुरू केली. त्याचा परिणाम होऊन नागा नॅशनल कौन्सिल आणि नागा फेडरल गव्हर्न्मेंट (त्यांची लष्करी शाखा - नागा फेडरल आर्मी) यांनी केंद्राशी शांतता करार केला. तो शिलाँग करार नावाने ओळखला जातो आणि त्यानुसार नागा बंडखोरांनी भारतीय राज्यघटना मान्य करून शस्त्रे खाली ठेवण्याचे मान्य केले. पण नागा नॅशनल कौन्सिलच्या चीनमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या सुमारे १४० सदस्यांच्या गटाने हा करार धुडकावून लढा सुरू ठेवण्याचे ठरवले. त्यापैकी थ्युएंगलिंग मुईवाह, आयझॅक स्वू आणि एस. एस. खापलांग या नेत्यांनी मिळून १९८० साली म्यानमारच्या भूमीवर नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) ची स्थापना केली. मात्र नागा अनेक गटांत विभागले गेले होते आणि त्यातील वैमनस्यातून १९८८ साली एनएससीएनमध्ये फूट पडली. आयझॅक स्वू आणि थ्युएंगलिंग मुईवाह यांच्या नेतृत्वाखाली एनएससीएन- आयएम तर खापलांग याच्या नेतृत्वाखाली एनएससीएन- के अशा दोन गटांत ती विभागली गेली. एनएससीएनच्या फुटीमुळे काही सदस्य नाराज होते. त्यापैकी सुमारे २०० जणांनी एकत्र येऊन २३ नोव्हेंबर २००७ रोजी एनएससीएन- युनिफिकेशन हा गट स्थापन केला. मात्र त्याला एनएससीएन- आयएम व खापलांग गटाने मान्यता दिली नाही. आता या तिन्ही गटांत आपसांत वैमनस्य सुरू झाले आहे. सध्या या गटांनी केंद्र सरकारशी शस्त्रसंधी केली असून वाटाघाटी सुरू केल्या आहेत. पण खापलांग हा मूळचा म्यानमारमधील असल्याने भारत सरकार त्याला नागांचा अधिकृत प्रतिनिधी मानत नाही.
२) आसाम
बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी :- पूर्वांचलातील सात राज्यांपैकी बरोबर मध्यभागी असलेला आसाम व बांगलादेशास लागून असलेला त्रिपुरा ही राज्ये बहुतांशी मैदानी राज्ये आ॑हेत. प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशांमध्ये घुसखोरीने अक्राळविक्राळ् स्वरुप धारण केल्याचे दिसते. २ कोटी २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये आजमितीस ७५ लाख बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत.
आसाममध्ये एक मोठे जनआंदोलन बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध झाले होते. तेथील विद्यार्थी संघटनांनी ते केले होते.प्रचंड संख्येने आसामात येणाऱ्या बांगलादेशींना भारतातून बाहेर काढा म्हणून हे आंदोलन उभे राहिले पण त्यातून उभी राहिली उल्फा. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम (उल्फा किंवा अल्फा). उल्फाची स्थापना भीमकांत बडगोहेन, अरबिंद राजखोवा, अनुप चेतिया, प्रदीप गोगोई आणि परेश बरुआ यांनी ७ एप्रिल १९७९ रोजी सिबसागरमधील रंगघर येथे केली. उल्फाला सुरुवातीचे प्रशिक्षण एनएससीएन, चीन आणि म्यानमारमधील कचिन बंडखोरांकडून मिळाले. याशिवाय उल्फाचे संबंध श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम (एलटीटीई) बरोबरही होते. उल्फा आणि एनएससीएन दोघांनाही चीन, पाकिस्तान (आयएसआय), अफगाणिस्तान आणि बांग्लादेश आदींकडून सहकार्य मिळाले. उल्फा म्यानमार, थायलंड आणि कंबोडियात पसरलेल्या अंमली पदार्थांच्या व्यापारातून शस्त्रखरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा उभा करत असे. उल्फाचा उच्छाद हाताबाहेर गेल्यावर भारताने नोव्हेंबर १९९० मध्ये उल्फाविरुद्ध ऑपरेशन बजरंग नावाने लष्करी कारवाई केली. एका रात्रीत आसाममध्ये ३० हजार सैन्य ओतून जोरदार मोहिम राबवण्यात आली. मात्र उल्फाला याचा सुगावा आधीच लागला होता. त्यामुळे लष्कराच्या हाती बंडखोरांची मोकळी शिबिरे, कागदपत्रे आणि काही संशयितांपलिकडे फारसे काही लागले नाही. पण यातून धडा घेऊन लष्कराने तयारी केली आणि सप्टेंबर १९९१ मधील ऑपरेशन -हाइनो, डिसेंबर २००३ मधील ऑपरेशन ऑल क्लिअर आणि त्यानंतर ऑपरेशन -हाइनो - २ अशा कारवाया यशस्वी केल्या. त्यात उल्फाचे कंबरडे मोडले गेले. त्यानंतर उल्फाचे अनेक नेते पकडले गेले किंवा शरण आले. आता त्यांनी केंद्राशी शांतता वाटाघाटी चालवल्या आहेत. मात्र उल्फाच्या परेश बरुआ याला या वाटाघाटी मंजूर नाहीत. तो उल्फाचा लष्करी विभागाचा प्रमुख असून सध्या चीनमध्ये परागंदा आहे. त्याने नुकताच वाटाघाटींचा निषेध करून स्वत:चा गट अधिक सक्रिय केला आहे.
राजकीय दुर्लक्षामुळे गेल्या साठ वर्षात या भागामध्ये विकासाची पायाभूत साधनेदेखील उपलब्ध झाली नाहीत. विकासापासून वंचित असणाऱ्या भागात राष्ट्रविघातक शक्ती जन्माला येतात. यामुळेच आसाममध्ये बोडो अतिरेक्यांचा जन्म झाला.
त्रिपुरा
त्रिपुरा हे राज्य बहुतांशी मैदानी आ॑हे. निम्मा त्रिपुरा डोंगराळही आहे पण तो भाग मिझोरम व बांगलादेशाच्या चकमांनी व्यापलेल्या चितगौंग हिल्सट्रैकला लागून आहे. प्रामुख्याने मैदानी असलेल्या प्रदेशांमध्ये घुसखोरीने अक्राळविक्राळ् स्वरुप धारण केल्याचे दिसते.३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले आहेत.बऱ्याच वेळा राज्यात रात्री पाच नंतर public transport बंद होतात किंवा पडतात. तुम्हाला तेथून बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त सकाळी सहाची बस पकडावी लागते कारण पुढचा सारा प्रवास साधारण १२ ते १४ तासांचा आहे व तोही पूर्णपणे पोलीस संरक्षणात. या आणि इतर अनेक राज्यात तुम्हाला सीमा सुरक्षा दलाच्या अनेक अंगझडतीतून जावं लागतं. ATTF, NLFT, BNCT सारख्या विघटनकारी संघटना सशस्त्र संघर्ष करत आहेत.
मणिपूर
एन.एस.सी.एन.चा नेता टी. मुईवाह याचं सोमाडाल हे मूळ गाव मणिपूरच्या उख्रुल जिल्ह्यात येतं आणि त्यामुळे उत्तरी मणिपूरचे नागाबहुल जिल्हे हे ग्रेटर नागालँडमध्ये समाविष्ट झालेच पाहिजेत असा नागा संघटनांचा दुराग्रह आहे. यासाठी आपल्या शस्त्रबळावर या संघटना मणिपुरी जनतेला सतत वेठीस धरतात, साहजिकच मणिपूरची नागालँड सीमा हा नेहमी राजकीय वादाचा मुद्दा असतो. सशस्त्र सेना विशेषाधिकार कायदा हाही इथला एक वादग्रस्त मुद्दा. सर्व राजकीय पक्षांना या कायद्याचं महत्त्व समजत असूनही आणि कायदा काढून घेतला तर काय होईल याची पुरेपूर कल्पना असूनही केवळ मतांवर डोळा ठेऊन प्रत्येक निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उठवत असतात.
सशस्त्र सेना विशेषाधिकार कायदा १९५८ हा कायदा भारतीय संसदेने १९५८ साली असम आणि आजूबाजूच्या ७ राज्यांत लागू केला. या सात राज्यांमधील रोज बिघडणारी परिस्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण आणताना सैन्याला कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये हा या कायद्याचा उद्देश होता.
या कायद्यान्वये सैनिक कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाच्या लिखित आदेशाशिवाय अटक करू शकतात, कोणत्याही व्यक्तीची झडती, तपासणी करू शकतात, आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही घराची झडती घेऊ शकतात. अतिरेकी कारवायांना प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता यावे हा या कायद्याचा उद्देश होता. यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात त्रास होत असला तरी, आज असम आणि इतर राज्यांमध्ये जी शांतता नांदत आहे ती फक्त आणि फक्त या कायद्यामुळेच आहे हे सगळयांनी लक्षात घ्यायला हवं.
मणिपूरच्या उत्तरेला नागालँड आणि दक्षिणेला मिझोरम आहे. खुद्द मणिपूरचे उत्तरेचे चार जिल्हे सेनापती, उख्रुल, चंडेल आणि तामेंगलोंग हे नागबहुल आहेत या नागबहुल जिल्ह्यांमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.39 नाग संघटना सतत बंद करतात, त्यामुळे मणिपूरच्या लोकांच्या गळयाभोवती फास अडकवल्यासारखी स्थिती निर्माण होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती दहा ते वीस पट वाढतात.
मणिपुरीच्या बाजूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवायला कुठलं जिम्मी कार्टर फौंडेशनही नाही!!! जसं नागा अतिरेक्यांसाठी उपलब्ध आहे.(जिम्मी कार्टर फौंडेशन नागा अतिरेक्यांना मोठा आंतरराष्ट्रीय आर्थिक, राजनैतिक पाठिंबा मिळवून देण्याचं काम करतं - त्यांनी केलेल्या अनेक भारतीयांच्या कत्तलीसाठी !!!)
मणिपूर राज्यात एकूण दहा आतंकवादी गट आहेत. राज्यामध्ये नागा आणि कुकी या जमातींचे प्राबल्य आहे. नागा जमातीला नागा प्रदेशाशी आपली नाळ जोडली जावी, असे वाटते आणि त्या दृष्टीने त्यांच्या चळवळी चालू असतात. त्यांच्या चळवळींना कुकी जमातीचा विरोध असल्यामुळे या दोन जमातींमधील संघर्ष अधून मधून उफाळून येत असतो. त्यामुळे राज्यात अराजकसदृश वातावरण नेहमीच असते.
म्यानमारच्या सीमांना मणिपूर राज्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. या स्थितीत राज्याला घुसखोरीची किंवा स्थलांतराची भीती नेहमीच आहे. मणिपूर राज्य हे टेकड्यांचा प्रदेश असून रस्ते फारच नगण्य आहेत. या टेकड्यांच्या मध्यभागी इंफाळ खोरे असून त्या खोर्याेतील जनता ही मईती जनजातीची आहे. त्यांच्या संस्कृतीवर घाला येत असल्याची भीती त्यांना वाटत असून त्यातून हिंसक कारवाया होत असतात. टेकड्यांवरील आदिवासी गट आणि खोर्याततील गट यांच्यात नेहमी संघर्ष चालू असतात. त्यातच १९९३ मध्ये मुसलमान फुटीरतावादी कारवायांची भर पडल्यापासून स्थिती चिंताजनक बनली आहे. हे मुसलमान आले कोठून ? राज्यापासून जवळच असलेल्या बांगलादेशी घुसखोरीचा हा परिणाम आहे.
मणिपुरातील युवा पिढी मोठया संख्येने अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. यातून मोठ्याप्रमाणात एड्सची लागण या भागातील लोकांना झाली आहे.
मिझोराम
मिझोराममधल्या कहाणीही धक्कादायक आहेत. १९५९ मध्ये मिझोरम मध्ये भयंकर दुष्काळ पडला. याचे कारण होते त्याभागात आलेल्या बांबूला मोहोर (Bambu Flowering). मोहोराच्या फुलांच्या बियांचा रस उंदरांना इतका मानवतो की त्याच्या खाण्याने उंदरांची संख्या भरमसाट वाढते. ते इतकं भयानक असतं की नव्या दमाची फौज शेतांवर आक्रमण करते व भीषण दुष्काळ पडतो. स्थानिक सरकारने याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केले.
याचा फायदा मिशनरीजनी घेतला. मदतीच्या हाताबरोबर त्यांचे धर्मांतरण केले. याचा दोष मिशनरीजला द्यायचा की सरकारच्या निष्क्रीयतेला? या रागाने घनघोर भारतद्वेषाला जन्म दिला. 'भारत' ही तिथे शिवी बनली . लालडेंगाच्या दहशतवादाचा उगमही इथेच. मिझो नॅशनल फ्रण्टच्या दहशतवादी कारवायांत एकेकाळी सामील असलेल्या दोन पिढ्या बरबाद झाल्या.
राजीव गांधींनी लालडेंगांशी करार केल्याने दहशतवाद संपलेला मिझोराम आज पूर्ण शांत आहे.
मिझोरामचे मुख्यमंत्री असताना लालथान हवला यांना एकदा मुंबईतल्या तारांकित हॉटेलात पासपोर्ट विचारला गेला. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना भारतातच आम्हाला विदेशी समजलं जातं असं विधान त्यांनी सिंगापूरमध्ये केले. यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली पण त्यांनी घेतलेल्या कडवट अनुभवाचे काय?
मिझोरम मधील ३५०००(पस्तीस हजार) रियांग जमातीच्या लोकांना , हिंसाचार घडवून आणून , मिझोरमच्या सीमेबाहेर आश्रय घेण्यास भाग पाडण्यात आले. आज मिझोरम सरकार, केंद्र सरकारच्या दबावामुळे निर्वासीत झालेल्या रियांग नागरिकांचे पुनर्वसन करण्यास (निदान वर वर आणि कागदोपत्री तरी) तयार आहे. परंतु त्रिपुरातील शरणार्थी शिबीरात भयानक परिस्थितीत जगणारे हे रियांग इतके भयभीत झालेले आहेत की, मिझो सरकारवर आणि स्पष्ट शब्दात म्हणायचे तर मिझोंवर ते विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि अर्थातच मिझोरम मधील आपापल्या मूळ गावी परत जाण्यास तयार नाहीत.
मेघालय
१९८० मध्ये HNLC (Hynniewtrep national liberation council) खासी,जैनतिया,भोई यांची व ANVC (Achik national volunteer council) गारोंच्या दहशतवादी संघटना निर्माण झाल्या. या दोन संघटना आपली पाळेमुळे मेघालयाभर पसरवत होत्या त्यामुळे खासी,जैनतिया,भोई यांच्यात व गारोंमध्ये दुही निर्माण झाली. HNLC ‘खासीलँडची’ NSCN(IM)च्या मदतीने तर ANVC ‘गारोलँडची’ NDFB आणि ULFA च्या मदतीने मागणी करू लागले.
पुढे राज्यात गारो टेकड्यांमध्ये गारो नेशनल लिबरेशन आर्मीचा आतंक पसरला आहे.त्यांचा वेगळे गारोलैंड राज्य मागणीसाठी सशस्त्र संघर्ष चालू आहे. गारो नेशनल लिबरेशन आर्मीचा प्रमुख चैंपियन संगमा बांग्लादेशात पळून गेला आहे.
आपण जर वरील सर्वं घटक लक्षात घेतले तर आपल्याला हे नक्की समजेल की या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान ,चीन उत्सुक आहेत व त्यांचे मोहरे बनून भुतान, बांगलादेश, म्यानमार ही छोटी छोटी राष्ट्रे षड्यंत्रात सहभागी झाली आहेत.
अमेरिकेचे कुटील कारस्थान, याला काही आधार आहे का ?
पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेची शक्ती प्रचंड वाढत होती. युरोपियन वसाहतवाद संपुष्टात येऊन अमेरिका या जगाचा लष्करशहा म्हणून उदयास येत होती. जगावर राज्य करणाऱ्या पण बाजारू व्यवस्थेचा मुख्य दावेदार म्हणून अमेरिका जगाकडे पहात होती. जगातील फक्त ४ लोकसंख्या% असलेली अमेरिका जो जगातील ४०% नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेण्यासाठी अगदी सर्वं जगातील बुद्धिमान पण लालची लोकांच्या मदतीने अनेक योजना आखत होती. याची खरी सुरवात झाली अमेरिकन नागरी युद्धानंतर. आपल्या लोकांना मोठे स्वप्न (दुसऱ्यांच्या जीवावर मोठे होण्याचे ) दाखवल्याशिवाय ते आपसातील भांडणे बंद करणार नाहीत हे त्यांना चांगलेच समजले होते.
अमेरिकेतील बाप्टिस्ट (Baptist) चर्चचे राष्ट्रीयीकरण करून त्याचे अमेरिकन बाप्टिस्ट मिशन असे नामकरण केले. या मागे एक मोठे गुप्त धोरण होते ते पुढे उघडकीस आले, या विषयी अनेक विचारवंतांनी लिहून ठेवले आहे. सुप्रसिध्द गांधीवादी अर्थशास्त्रज्ञ श्री.जे.सी. कुमारप्पा हे स्वत: ख्रिश्चन होते. त्यांनी चर्चला पाश्चात्य राष्ट्रांची भूसेना, वायुसेना व जलसेना या बरोबरची चौथी सेना म्हटले आहे. रशियाचा हूकुमशहा जोसेफ स्टॅलिन याने चर्चला 'अदृश्य सेना' म्हटले आहे. 'वर्ल्ड् कौन्सिल ऑफ चर्चेस' ने प्रसिध्द केलेल्या 'ख्रिश्चॅनिटी एण्ड एशियन रेव्हॉल्युशन" या पुस्तकात आशिया खंडात बहुसंख्य ख्रिश्चन झालेल्या समाजाने मूळ राष्ट्राशी नाते तोडण्याचा कसा प्रयत्न केला हे एबोनी (इंडोनेशिया), करेन(म्यानमार) व नागा (भारत) या तीन उदाहरणांवरुन स्पष्ट केले आहे.
पहिल्या महायुद्धानंतर रशियाची (USSR) ताकद पण वाढत होती. रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव मोठया प्रमाणात जवळच्या चीनवर होत होता. त्यावेळच्या चीनी राज्यकर्त्यांना छुपी मदत अमेरिकेकडून चालू होती. तेव्हा चीन व रशियापासुन जवळ असा प्रदेश, जेथून अनेक प्रकारच्या गुप्त हालचाली करता येतील , त्यांना हवा होता. आशिया खंडात आपले प्रभाव क्षेत्र असलेला प्रदेश म्हणून भारताचा ईशान्य प्रदेश अमेरिकेला अत्यंत आवश्यक वाटला. याच काळात जपान पण आशिया मधील एक मोठया शक्तीच्या रुपाने उदयास येत होते. जपानच्याही विस्तारकांक्षा वाढत होत्या. चीन,व आशियातील दक्षिण पूर्व आशियाच्या भूमीवर त्याची वाकडी नजर होती.भारतावर इंग्रजांची सत्ता होती.
ईस्ट इंडिया कंपनीला फक्त व्यापारात रुची होती. खास करून ईशान्य भागातील चहाबागांमध्ये. परंतु ब्रिटीश शासनाने ज्यावेळी पासून ईस्ट इंडिया कंपनीची जागा घेतली त्यावेळी पासून व्यापाराबरोबर त्याभागातील लोकांच्या ज्ञानाचा उपयोग ब्रिटीश जागतिक सत्तेला होईल, त्याभागात स्थानिक काळ्या कातडीचे इंग्रज तयार करणे आणि त्या भूभागात चर्चच्या माध्यमातून आपल्याला व आपल्या धर्माला अनुकूल वातावरण निर्माण करून स्थानिक लोकांचे धर्मांतरण करायचे या गोष्टींना पण प्राधान्य द्यायला सुरु केले .
डेविड स्कॉत्त (David Scott) ह्या आसामच्या पहिल्या कमिशनरने काही इंग्रज मिशनरी ईशान्य भागात आणली. पण त्यांना फारसे यश नाही मिळाले. ब्रिटीश लष्करी अधिकारी अमेरिकेचे हस्तक होते. भारतातील असे अनेक हस्तक अमेरिकेला अमेरिकन बाप्टिस्ट चर्चच्या माध्यमातून गुप्त मदत करत असत. अशांपेकी एक मेजर जेनकिन्स (Jenkins) हा आसामचा दुसरा कमिशनर त्याने १८३६ मध्ये अमेरिकन बाप्टिस्ट चर्चच्या तीन मिशनर्यां ना सादियाला धर्मांतरण करण्यासाठी आणले.
रेव्हरंड क्लर्कने(Rev. EW clark) १८७२ पासून धर्मांतराचे काम नागालँडमध्ये सुरु केले.तो ३ दशके नागालँड मध्ये होता व त्याला ब्रिटीश अधिकाऱ्यांचा खूप पाठींबा होता. पण तरीही त्यांना पाहिजे तसे यश मिळत नव्हते. अमेरिकेचा पैसा आणि धर्मप्रसारक व ब्रिटीश राज्यकर्ते थोडे गुपचूप हे सर्वं करत होते. १९३० पर्यंत या भागातील अनेक ठिकाणी धर्मांतराला बंदी होती. तसेच या भागात अमेरिकन लष्कराचा कोणी मोठा अधिकारी पण येऊन गेल्याचे वाचण्यात किवा ऐकिवात नाही.
जुलै १९३७ मध्ये जपानने चीन बरोबर दुसरे युद्ध पुकारले. त्यावेळेसचा चीनी नेता चिआंग (Chiang Kai-shek)हा जपानच्या विरुद्धच्या लढाईचा प्रमुख होता. जपानचा हल्ला प्रचंड होता. एक लाखाहून अधिक चीनी सैनिकांची कत्तल त्यांनी केली. चीनचा मोठा भूभाग जपानच्या ताब्यात आला. १९४० मध्ये चिआंगच्या (Chiang Kai-shek) अमेरिकेत शिकलेल्या बायकोने (Soong Mei-ling) अमेरिकेला मदतीचे आवाहन केले. तसे पाहता अमेरिका आपल्या अमेरिकन स्वयंसेवी गटातर्फे (American Volunteer Group) काही मदत आधीच करत होती. १९४० नंतर मात्र अमेरिकेचा जनरल जोसेफ वार्रेण स्टिलवेलची (General Joseph Warren Stilwell) चिआंगचा (Chiang Kai-shek) मुख्य लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्याला चांगले चीनी बोलता येत होते. त्याआधी पण तो चीनमध्ये अनेक वेळा येऊन गेलेला होता.
१९४१ पर्यंत जपानने ब्रम्हदेश व इंडोनेशिया पूर्ण ताब्यात घेतला होता. ७ डिसेंबर १९४१, रविवार सकाळी ८ वाजता जपानने पर्ल हार्बरवर (Pearl Harbor) जबरदस्त हल्ला चढवला व अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली.
जनरल जोसेफ वार्रेण स्टिलवेल (General Joseph Warren Stilwell) चीन –ब्रम्हदेश –भारत व थायलंड या भागातील मित्र राष्ट्रांच्या सेनेचा प्रमुख झाला (Chief of Staff to Allied Forces in China-Burma-India- Siam (Thailand)). त्याने या भागाचा भौगोलिक अभ्यास प्रचंड केला व जपान विरुद्ध रणनीती आखली. डिसेंबर १९४२ मध्ये त्याने पुरवठ्याची सेवा 'Service of Supply' (SOS) म्हणून १७२७ किलोमीटर लांबीचा रस्ता बनवायचे काम युद्ध पातळीवर हातात घेतले. अतिशय निष्णात लोकांना त्यांनी या कामासाठी नेमले. भारतातून हा रस्ता अरुणाचल व आसाममधून ६१ किलोमीटर लांबीचा जातो. यासाठी मोठे नियोजनाचे काम आसाम अरुणाचल येथील लिडो या गावी झाले. त्यावेळी या रस्त्यासाठी १३७,०००,००० डॉलर्स येवढा खर्च आला.पुढे या रस्त्याचे नामकरण स्टिलवेल रोड म्हणून करण्यात आले. अनेक अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचे या निमित्त ईशान्य भागात येणे होऊ लागले. त्यांना या भूभागाचे चांगलेच महत्व पटले. या भागातील नागा लोक आधीच अमेरिकन बाप्टिस्ट चर्चच्या प्रभावाखाली होते त्यामुळे त्यांचे व अमेरिकन लोकांचे नाते अधिक जुळले व त्यांनी जपान विरुद्धच्या युद्धात बरीच मदत मित्र राष्ट्रांच्या सेनेला केली. आशियाच्या या भागातील ईशान्य भारत,फिलीपिन्स व इंडोनेशियातील तिमूरचे एकंदर या भागातील लष्करी महत्त्व त्यांना चांगलेच पटले होते. त्या बरोबर या भागात मोठया प्रमाणात धर्मांतरित झालेले स्थानिक लोक व त्यांच्यावर प्रभाव असणारे अमेरिकन बाप्टिस्ट चर्चचे अमेरिकन धर्मगुरू यांची त्यांना बरीच मदत होणार होती. १९४५ मध्ये जपानचा पाडाव झाला.
१५ ऑगस्ट १९४७या दिवशी भारत स्वतंत्र झाला तेंव्हा नागालँड मधील ५०% ख्रिश्चन झालेल्या नागांनी स्वतंत्र नागालँड राष्ट्राची मागणी केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही वर्षातच मिझोरामने देखील बहुसंख्याक ख्रिश्चन झाल्यावर अशीच मागणी केली. स्वातंत्र्यानंतर नागालैंड आणि मिझोराम राज्यांनी, केंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून , स्वतःला ख्रिश्चन स्टेट, असे अधिकृत आणि जाहीरपणे म्हणवून घेतले. या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना, एखादे राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे कसे म्हणवून घेवू शकते?
अगदी ताजे उदाहरण म्हणजे मेघालय सरकारनेही मेघालय हे ख्रिश्चन स्टेट आहे, असे अधिकृत उत्तर मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते, निवृत्त व्यवस्थापकीय अधिकारी श्री हरिश्चंद्र पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली मेघालय सरकारला एक प्रश्न विचारला होता. त्याला लिखीत स्वरुपात उत्तर देताना, जनसंपर्क आणि माहिती विभागाच्या उपसचिव श्रीमती मणी यांनी 'आमचे राज्य ख्रिश्चन स्टेट असल्यामुळे आमच्या इथे रविवारीच सार्वजनिक सुट्टी असते. सर्व बाजार रविवारी बंद असतात त्यामुळे रविवारी कामकाज सुरू ठेवण्याचा प्रश्नच उदभवत नाही' असे उत्तर दिले आहे.
प्रश्न असा आहे की असाच पायंडा पडत गेला आणि प्रत्येक राज्यसरकार स्वतःला 'धर्माधिष्ठित राज्य' म्हणवून घेऊ लागले तर या देशाच्या घटनेतील सेक्यूलर संकल्पनेचे काय होईल?
नागा टेकड्यांमध्ये जी उघडउघड बंड चालू आहेत, त्याचे सूत्रधार ख्रिस्ती मिशनरीच आहेत, ही गोष्ट पंडित नेहरूंनीही मान्य केली होती. आसाममध्ये एखादी आगगाडी लुटल्याची, एखादा पूल उडवून लावल्याची किंवा काही सैनिकांना घेरून ठार केल्याची वार्ता (बातमी) येते.
एवढी प्रचंड शस्त्रसामग्री आणि दारुगोळा या बंडखोरांनी कोठून मिळवला? असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला, तेव्हा शासनाच्या वतीने असे सांगण्यात आले की, गेल्या महायुद्धाच्या शेवटी शेवटी जपानी लोकांना पळ काढावा लागला त्या वेळी आपली अवजड युद्धसामग्री सोबत घेऊन जाणे त्यांना अशक्य झाल्याने त्यांनी ती अरण्यात फेकून दिली. ती शस्त्रसामग्री नागांनी आपल्या कह्यात घेतली; परंतु बंडखोरांशी झालेल्या एका चकमकीत काही बंडखोर ठार झाले आणि त्यांची शस्त्रे आपल्या सैनिकांच्या हाती आली. ती शस्त्रे अद्ययावत अमेरिकन बनावटीची होती आणि त्यावर ती कोणत्या वर्षी बनवण्यात आली, ते वर्षही कोरलेले होते. १९५५-५६ या वर्षी बनवण्यात आलेली ती शस्त्रे होती आणि आमचे नेते आम्हाला सांगतात की, १९५५-५६ वर्षी तयार केलेली ती शस्त्रे १९४४ या वर्षी नागांच्या हाती सापडली होती.
जपानच्या संपूर्ण पाडावानंतर चीनमध्ये १९४७ मध्ये मोठे नागरी युद्ध झाले व त्यात कम्युनिस्ट चीनचा उदय झाला व १९५० मध्ये त्यांनी रशिया( USSR) बरोबर तह करून १९५० ते १९५३ दरम्यानच्या कोरियाच्या युद्धातून कम्युनिस्ट उत्तर कोरियाची निर्मिती झाली. ब्रम्हदेशात पण मोठया प्रमाणात कम्युनिस्ट मूळ धरू लागले होते. या सर्वामुळे चीन व अमेरिकेच्या अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधाचा शेवट झाला व चीनी भूमीतील अमेरिकेचे स्थान संपुष्टात आले. शीतयुद्धाचा काळ सुरु झाला. चीनने पैन-मंगोलाईड चळवळीद्वारे ईशान्य भारतातील जनतेला आपल्या जवळ खेचण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास प्रांरभ केला.
स्वातंत्र्यप्राप्ती वेळीच अंगामी झापू फिझो याच्या नेतृवाखालील नागा नॅशनल कौन्सिलने स्वतंत्र नागालँडचा लढा सुरू केला.नागा नॅशनल कौन्सिलचे शेकडोनी सदस्य १९६० पर्यंत चीनमध्ये प्रशिक्षण घेत होते. १९६२ला चीनने भारतावर आक्रमण केले व सर्व भारत जागा झाला. पण या सर्व आणीबाणीच्या काळात सर्वात फावले ते भारतविरोधी काम करणाऱ्या, अमेरिकेशी निष्ठा जपणाऱ्या मिशनरीजचे.
ख्रिस्ती मिशनर्यांिचे षडयंत्र - मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीने सुमारे दिडशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला. शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली. १`) पूर्वांचलातील जनजाती भारतीय नसून मैंगोलॉईडस आहेत. २) भारतीय समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतोय व आर्थिक शोषण करतोय. ३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या भारतीयांना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे. शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.
ब्रिटिशांच्या अख्ख्या कारकीर्दीत जेवढे धर्मांतर झाले नसेल त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त धर्मांतर स्वातंत्र्यानंतर झाले ते भारत द्वेषाच्या जोरावर. आज अख्ख्या जगतात सर्वात जास्त अमेरिकन बाप्टिस्ट श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांची टक्केवारी असणारे राज्य नागालँड आहे. मिसिसिपी हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य. तर मोठया संख्येत जगात ख्रिश्चन धर्मांतर होणारे भूभाग म्हणजे ईशान्य भारत,फिलीपिन्स व इंडोनेशियातील ईस्ट तिमूर. शेवटच्या दोन भूभागावर आता अमेरिकेची लष्करी केंद्र आहेत.
अंगामी झापू फिझो याचे १९९० मध्ये निधन झाल्यावर नागा नॅशनल कॉन्सिलही फुटली. दरम्यानच्या काळात एनएससीएन या भागातील सर्वांत प्रभावी दहशतवादी संघटना बनली आणि मोठा रक्तपात घडवला. नागालँडसह मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमधील नागा वस्तीचा भाग एक करून स्वतंत्र नागालिम (ग्रेटर नागालँड) स्थापन करणे हा एनएससीएन- आयएमचा उद्देश आहे. नागालिम फॉर ख्राईस्ट हा त्यांचा नारा आहे आणि अशा नागालिमला अमेरिकेची मान्यता आहे.त्यांच्या वेबसाईट वर जाऊन आपण हे सत्य समजून घेऊ शकतो.
ख्रिश्चन मिशन्स जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम सुरु करतात तेव्हा तेथे ओतलेला पैसा ही त्यांची 'गुंतवणूक' असते. मात्र पुरेसे मतांतरण झाल्यावर ते त्या समाजावर अनेक प्रकारच्या वर्गण्या लादून आर्थिक शोषणास सुरुवात करतात. 'मेघालय ' राज्यातील सर्व चर्चेसना मिळणारा मासिक निधी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.या व्यतिरिक्त परदेशातून येणारा पैसा! मिशनर्यांवना मिळणार्याि पैशावर सरकारचे नियंत्रण नाही. घटनेतील अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सवलतींनुसार या पैशाचा जमाखर्च सरकारला दाखविण्यास ते बांधिल नसल्याने या पैशाचा वापर अतिरेकी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी देखील होत असतो.
मेघालयातील पश्चिम खासी पहाड जिल्ह्यामध्ये काही वर्षापूर्वी युरेनियम हे खनिज मोठ्या प्रमाणावर आढळले. भारत सरकारने तेथे अणुऊर्जा प्रकल्पाची योजना सुरु केली. मात्र त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे चारही मार्ग काम करु लागले. सर्व प्रथम 'खासी स्टुडंट्स युनियन' या विद्यार्थी संघटनेने या प्रकल्पास विरोध करुन 'मेघालयातील' युरेनियम काढण्याचा 'भारताला ' अधिकार नसल्याचे घोषित केले. व त्यासाठी आंदोलन छेडले. त्यानंतर बुध्दिजीवींनी स्थानीय प्रसार माध्यमांच्या दुसर्यान मार्गांद्वारे ही मागणी योग्य असल्याचा प्रचार केला व जनमत जागृती केली. तिसरा मार्ग म्हणजे स्थानीय राजकीय पक्षांनी या मागणीस राजकीय घोषणापत्रकावर स्थान दिले व चौथ्या दहशतवादाच्या मार्गाद्वारे धमकावण्यात आले की मेघालयातील अणूउर्जा प्रकल्पात जर शास्त्रज्ञ व इंजिनिअर्स आले तर त्यांच्या जिवास धोका असेल. मात्र काही दिवसातच बातमी आली की बांगलादेशाच्या सीमेवर अडीच किलो युरेनियमचे खनिज चोरुन नेत असलेले अतिरेकी पकडले गेले व अधिक चौकशीनंतर ते खनिज पुढे अमेरिकेत जाणार असल्याचेही लक्षात आले!
जर आपण एकूण शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले तर ईशान्य भारतातील अरुणाचल, आसाम सोडले तर शिक्षणक्षेत्र बऱ्यापैकी मिशनरीजच्या ताब्यात आहेत. ही केंद्र खरे नीट पहिले तर चांगल्या शिक्षणाची केंद्र बनण्यापेक्षा तिथे युवकांना भ्रमित केले जाते व त्यांच्यात फुटीरतेची बीज संक्रमित केली जातात. शिलॉंगमध्ये हे प्रकार तर मोठया प्रमाणावर चालतात.
ज्या राज्यात मिशनरीज शिक्षण संस्था जास्त आहेत तिथे विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. तिथे बेरोजगारी, व्यसनाधीनता, एड्स सारखे भर तारुण्यात मरण आणणारे रोग यांचे प्रमाण मोठे आहे. याचे मुख्य कारण त्यांचा शिक्षणाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाऐवजी त्यांचे मतपरिवर्तन करणे व भारतद्वेष विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणे हे आहे.
पूर्वांचलात अशा अनेक विद्यार्थी संघटना उभ्या राहिलेल्या दिसतात की ज्यांच्या मागण्यांतून फुटीरता डोकावत असते. आंदोलनात्मक मार्गांनी या संघटना अस्थिरता व अशांतता पसरवतात. विद्यार्थी आंदोलनाला समाजाची सहानुभूती लगेचच मिळत असते
.
स्थानीय बुध्दिजीवी, वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमे तेथील समाजाची दिशाभूल करतात. विद्यार्थी आंदोलनाच्या देशद्रोही मागण्यांना स्वातंत्र्य संग्रामाची संज्ञा देऊन जनमत विकृत करण्याचे काम या मार्गातून केले जाते.
प्रत्यक्ष कृतीचा मार्ग हा दहशतवादाचा मार्ग असतो. समाजातील असंतुष्ट तरुणवर्गाला चिथावून अद्ययावत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून नेले जाते. गेली पन्नास वर्षे अशाप्रकारे दहशतवादी निर्माण करणारी प्रशिक्षण केंद्रे शेजारी राष्ट्रांमध्ये चालू आहेत. हे दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आल्यावर आंदोलने व मागण्यांच्या पूर्तीसाठी समाजामध्ये दहशत निर्माण करतात. लुटालूट, हत्यासत्र यांचे दुष्टचक्र चालू करतात.
मादक द्रव्यांचा व्यापार व त्यांचा प्रसार करुन त्या बदल्यात कोट्यावधी रुपये अतिरेक्यांना पुरविले जातात. मादक द्रव्यांच्या प्रसारातून आपल्याच समाजाच्या युवा पिढीला बरबाद करण्याचे काम अतिरेकी करतात. पूर्वांचलातील प्रामुख्याने पहाडी राज्यांच्या शहरी भागांत मादक द्रव्यसेवनाचे प्रमाण भयंकर वाढले आहे. काही शहरातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या ६०% विध्यार्थी मादक द्रव्यांचे सेवन करतात. मादक द्रव्यांचा व्यापार करण्यास नकार दिल्यास प्रशिक्षण केंद्रे व परकीय मदत ताबडतोब बंद करण्याची धमकी देण्यात येते.
अशा व्यवस्थेत तयार झालेली मुले मग देशविरोधी कारवाया करण्यात सक्रिय होतात व २६ जानेवारी १९९६ला जे अनुभवले ते अनेक ठिकाणी नियमित अनुभवायास मिळते. काय केले पाहिजे? हा प्रश्न भेडसावत राहतो. मन खूप विषण्ण होते, अस्वस्थता जाता जात नाही.
या अस्वस्थतेतून अनेक कल्पना सुचू लागल्या. अरुणाचली बांधवांची परस्परांबद्दल अधिक ओळख करून देणे. अरुणाचलात एकूण २८ वेगळ्या वेगळ्या परंपरा पाळणारे बांधव आहेत. त्यांना एकमेकाच्या बद्दल फारसे माहित नसते. उदा.आदि लोकांना तागिन लोकांना बद्दल माहित असणे.भूभाग खुपच मोठा आणि वस्ती खुपच विरळ त्यामुळे एकमेकांशी संपर्क कमी येतो. स्थानिक इतिहास,परंपरा याबद्दल फारसे लिखाण नाही, ते स्थानिक बांधवांकडूनच लिहून घेणे.विविध चर्चासत्रांचे आयोजन करणे.
एक मोठी गोष्ट युवकांशी बोलताना लक्षात आली की त्यांना आपल्या भागापेक्षा शिलॉंग, गुवाहाटी, पुणे, मुंबई,चेन्नई,कोलकत्ता,दिल्लीबद्दल जास्त माहिती आहे. तसेच खूप कमी लोकांनी अरुणाचलचे विविध भाग पाहिले आहेत. त्यांच्यातील बहुसंख्य युवकांना म्यानमार, बांगलादेश, भूतान, चीन भागातील लोकांची स्थिती माहित नाही. ते जेव्हा महानगरात जाऊन शिकतात व सहलीसाठी तिथे जातात त्यावेळी त्यांना आपल्या भागात काहीच विकास झाला नाही असे वाटते.
अशा काही गोष्टी लक्षात आल्यावर मी एक योजना आखली. विवेकानंद केंद्र विद्यालय बालीजान मधील युवकांना घेऊन अरुणाचलच्या व आसामच्या विविध भागात जायचे. त्या भागातील लोकांना भेटायचे. त्या भागाचा सर्वांगीण अभ्यास करायचा. बालीजानहून दोन मिनीबसमध्ये ४० मुले व आम्ही काहीजण अशी आमची विवेकयात्रा निघाली. सेजोसाच्या शाळेत पहिला मुक्काम मग तेथील जंगलात भ्रमंती. सेजोसा मध्ये मोठया प्रमाणात हत्ती व अरुणाचलचा राज्यपक्षी हॉर्नबिल पाह्वावयास मिळतात. निशी बांधवांचा हा भाग. सेजोसा शाळेतील लहान मुलांशी खूप गप्पा मारल्या व त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही पाहिला व आमचा त्यांना दाखवला. त्यानंतर भूपेनदाचे शोणितपूर म्हणजे आजचे तेजपूरला गेलो. तेजपूर हे आसाममध्ये. ईशान्य भागातील वायुसेनेचे महत्वाचे ठिकाण. मिग २१,जग्वार सारख्या विमानाचे उड्डाण व जमिनीवरचे उतरणे पाहतानाचा एक जबरदस्त अनुभव आम्ही घेत होतो. वैमानिकांशी गप्पा, नियंत्रण कक्ष व विमानाची देखरेख अगदी जवळून पाहता आली. चिता व चेतक हेलीकॉप्टर मधून थोडया कालावधीसाठी केलेले उड्डाण खुपच रोमहर्षक होते. विमानविरोधी अस्त्र, रडार यासर्वांची ओळख करून घेत असताना भारताच्या वायुसेनेची प्रगती प्रेरणा देणारी होती.
वायुसेनेची गगनभरारी पाहून आम्ही रक्षा संशोधन प्रयोगशाळेकडे(DRL) निघालो. डॉक्टर कलाम ज्याचे मुख्य मार्गदर्शक होते अशा DRDO ची ही तेजपूर मधील शाखा. मुलांनी तेथील प्रमुख डॉक्टर चचारकर यांना खूप प्रश्न विचारले. पोखरण-२ परीक्षणापासून ते अरुणाचलातील विविध भागातील त्यांनी केलेले काम. एका वेगळ्याच विश्वात आम्ही होतो. त्यानंतर साडेतीन किलोमीटरचा ब्रम्हपुत्रवर बांधलेल्या पुलावरून आम्ही चालत गेलो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेवाच्या साक्षीने सूर्यपुत्र, ब्रम्हपुत्रचे अथांग पात्र व त्यावरचा तो विस्तीर्ण सेतू पाहता भूपेनदाचे गाणे “विस्तीर्ण पाराबे” म्हणत चालत होती.
तिनसुखिया व दिब्रुगडमधील चहाबागा व तेथील जनजीवन हे त्यांना फार नवीन नव्हते पण विवेकानंद केंद्राच्या तेथील आसामी बंधूंशी त्यांनी मारलेल्या गप्पातून एक नवीन भावनिक बंध त्यांच्यात निर्माण झाले.
खर्सांग हे अरुणाचल मधील एक गाव. तिथे विवेकानंद केंद्र विद्यालय, येथील लोक मुख्यतः तांगसा. दांगेरीया बाबाचे भक्त. त्या भागातील एक महाप्रचंड वडाचे झाड, ३० मुलांनी आपले हात एकमेकांना धरून त्याच्या महाकाय बुंध्याला आपल्या कवेत घेतले. या भागातील दैवत दांगेरीयाबाबा या वृक्षराजावरच निवास करतो. खर्सांगच्या नैसर्गिक तेल विहिरी व दिग्बोईची रिफाईनरी पाहताना भूमातेची (तागीन मध्ये तिला सी म्हणतात व तिचे पूजन करतात. सी-दोनि हा तागीन बांधवांचा सर्वात मोठा सण.) आपल्यावरची कृपा सहज लक्षात येत होती. खर्सांगच्या तांगसा बांधवांबरोबर बऱ्याच गप्पा झाल्या व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. या भागात चकमा,हजोंग व काही तिबेटचे निर्वासित राहतात. तिबेटी निर्वासितांच्या छावणीला भेट दिली व त्यांच्याकडून चीन समजाऊन घेतला. चीनचे सत्य दर्शन त्यांच्या शिवाय अधिक चांगले कुणाला असणार?
पुढचा टप्पा जयरामपूर. ज्या रस्त्याने आम्ही निघालो तो होता आत्ताचा लिडो रस्ता म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात जनरल जोसेफ वार्रेण स्टिलवेलच्या (General Joseph Warren Stilwell) मार्गदर्शनातून निर्माण झालेला स्टिलवेलरोड (SOS). जयरामपुरची विवेकानंद विद्यालय उच्च माध्यमिक शाळा, इथली मुलं बालीजानच्या मुलांच्या समवयस्क.दिवसभराचा क्रिकेटचा सामना मस्त रंगला. जयरामपूर व बालीजानमधील मुले बहुतेक अरुणाचलच्या सर्व भागातून आलेली असत. त्यामुळे जयरामपुरला छोट्या अरुणाचलचे स्वरूप आले. सर्वं मुलांनी रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपापल्या सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण केले. अरुणाचलच्या सर्वं नद्यांच्या काठावर नांदत असलेल्या परंपरांचा एक सुरेख संगम जयरामपूर मध्ये अनुभवता आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सगळे तयार होते. सहाच्या आसपास बिहार रेजिमेंटच्या दोन शक्तिमान (मोठया ट्रक) आल्या. आज आम्ही स्टिलवेलरोडहून म्यानमार मध्ये जाणार होतो.शिक्षक, दोन्ही शाळांचे मुलं असे आम्ही जवळपास १००च्या आसपास जणानी जयरामपूर सोडले व नामपोंग (Nampong) साठी निघालो. नामपोंगला (Nampong) बिहार रेजिमेंटच्या कमांडरचे कार्यालय होते. त्यांच्याशी आम्ही भेटलो व मग पंगसौ पास (Pangsau Pass) ह्या स्टिलवेलरोडच्या १२ किलोमीटरच्या अतिशय दुर्गम भागातून आम्ही जाणार होतो. दोन देशातील सीमेवरचा रस्ता असल्याने खूप काळजी घ्यावी लागणार होती. आमच्या बरोबर आमच्या एवढेच किंबहुना जास्तच असतील एवढे बिहार रेजिमेंटचे सैनिक, अर्धे आमच्या गटाच्या पुढे व अर्धे आमच्या गटाच्या पाठीमागे असा आमचा पायी प्रवास सुरु झाला.
आम्ही ज्या रस्त्याने प्रवास करणार होतो त्याला नरकाचा रस्ता ("Hell gate" or "Hell Pass") असे दुसऱ्या महायुद्धात म्हटले जायचे. घनदाट जंगलातून या रस्त्याने जाणे खुपच धोकादायक होते. कमांडर सरांनी दिलेल्या सर्वं सूचनाचे पालन करत आम्ही शांतपणे निघालो. मी मुलांना जाताना काही किस्से त्या रस्त्याचे,जनरल स्टिलवेल बद्दल व एकंदरीत काही ऐतिहासिक घटनांबद्दल सांगत होतो. ३ ते ३.३० तासांचे ते अंतर तसे अरुणाचलच्या मुलांसाठी फार अवघड बाब नव्हती.
नामपोंग (Nampong) पासून हा सुरू झालेला रस्ता म्यानमार मधील पंगसौ (Pangsau)या गावापर्यंतचा म्हणून या भागाला पंगसौ (Pangsau) पास असे म्हणतात. मुलांचे व शिक्षकांचे दोन गट झाले एक गट समोर असलेल्या सैनिकांशी गप्पा मारत तर दुसरा गट शेवटी असलेल्या सैनिकांशी गप्पा मारत चालला होता. मस्त गप्पा रंगल्या अगदी त्यांच्या गावापासून ते म्यानमार, चीन, अतिरेकी या सर्वांबाबत चांगली प्रश्नोत्तरे होत होती. सैनिक त्यांचे जिवंत अनुभव सांगत होते तर मुलं त्यांना त्यांच्या ऐकिवात असलेल्या महितीच्या आधारे प्रश्न विचारत होते.
दीड तासानंतर आम्ही नाष्टा करण्यासाठी एक झऱ्याच्या ठिकाणी थांबलो. मुलांचे सैनिकांना प्रश्न विचारणे संपून ते आता सैनिकांच्या प्रत्येक वस्तू पाहत होते. पायातील बुटांपासून स्वयंचलित मशीनगन पर्यंत. एक छान मैत्रीचे नाते मुलांचे आणि सैनिकांचे झाले होते. ज्याची आम्ही कधीही उत्तरं मुलांना देऊ शकत नव्हतो ती उत्तरं त्यांना भारतीय सैनिक देत होते. पतकाई(Patkai) डोंगररांगातून चाललेला प्रवास तसे पाहता अवघड होताच. डोंगर चढणे खूप थकवणारे असते आणि त्यात सतत चढाई असल्यावर जास्त थकवा येतो पण भारतीय सैनिक व आमचे अरुणाचली युवा सैनिक यांच्या जोशाने आलेला थकवा पार निघून जायचा.
आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पंधरा मिनिटे झाले असतील.एकदम जंगलातून काही हालचाली जाणवल्या. सैनिक लगेच दक्ष झाले. त्यांनी आम्हाला शांत पडून राहण्यास सांगितले. काही सैनिक जंगलात घुसले. पुढचे पाच दहा मिनिटे मात्र सगळ्यांच्या हृदयाची ठोके चांगलीच वाढली होती. सर्वत्र शांतता होती. जंगली किड्यांचा फक्त आवाज येत होता.
सैनिक बांधव जंगलातूनच दोघांना पकडून घेऊन आले. त्यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचे चट्टे पट्टे होते. हात डोक्यावर ठेऊन त्यांना मेजरच्या समोर उभे करण्यात आले.त्यांच्या पाठीवर बांबूच्या पिशव्या होत्या. मेजरनी त्यांना गुडघ्यावर बसायला सांगितले. आम्ही लांबून हे सगळे पाहत होतो. सुभेदारांनी त्यांच्या पाठीवरील पिशव्या त्यांना उलट्या करायला सांगितले. त्यांनी त्या जमिनीवर रिकाम्या केल्या. हे सगळे चालले होते खाणाखुणा करून. पकडलेल्यांच्या आवाजावरून त्या स्त्रिया आहेत येवढ मात्र समजले. मेजरने आम्हा सर्वांना जवळ बोलावले व जमिनीवर पडलेल्या वस्तू दाखवल्या. त्यात मिठाचे पुडे, आगपेटीचे पुडे अशा वस्तू होत्या.
मेजर सांगू लागले, “म्यानमारच्या या महिला आहेत.त्या नेहमी अशा चोरून भारताच्या सरहद्दीत येतात मुख्यतः मिठाचे पुडे, आगपेटीचे पुडे घेण्यासाठी. अगदी जीवावर उदार होऊन येतात. त्यांच्या देशात ह्या वस्तू फार जास्त किमतीत मिळतात आणि ते ही बराच प्रवास केल्यावर. भारतातील व्यापाऱ्यांना त्या कोंबड्या विकून त्याबदल्यात हे सामान घेऊन जातात.”
मुलांसाठीच काय माझ्यासाठी अचंबित करणारी ही गोष्ट होती. मीठ देऊन, आगपेटीचे पुडे देऊन ईशान्य भागातील बांधवांना १९व्या शतकात मिशनरीज धर्मांतरीत करायची हे वाचले होते, ऐकले होते. आज त्याचा अनुभव घेत होतो. अगदी जीवावर उदार होऊन त्या दोन महिला या गोष्टी घेण्यासाठी भारताच्या हद्दीत आल्या होत्या. मेजर व इतर सैनिकांना हे नवीन नव्हते. मी नामपोंगमध्ये राहणाऱ्या मुलांना त्या महिलांशी त्यांच्या भाषेत बोलायला सांगितले तर आम्हाला समजले त्यांचे बोलणे त्या महिलांना समजत नव्हते व महिलांचे त्यांना. १२ किलोमीटर वरील लोकांचे बोलणे एकदम न समजणारे कसे? हा प्रश्न मी मुलांना विचारला तर मुलांनी मला सांगितले, “सर वो लोग अलग है”
“मग या भागातील सगळे नागा एक आहेत हे एक असत्यच आहे की? कारण ग्रेटर नागालँडची मागणी करणारे लोक हे कसे काय म्हणतात आम्ही सगळे एक आहोत?”
“सर वो लोग हमारी भाषा के कारण एक है या हमारी संस्कृती एक है बोलके नागलीम नही मांगते. वे सब ख्रिस्तान है ना इसलिये नागालीम मांग रहे है.”
मी पुस्तकात वाचलेलं प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्या महिलांना मेजरने सोडून दिले. पण तो आम्हाला हे सांगायला विसरला नाही की कधी कधी अशाच महिला अंमली पदार्थ पण घेऊन येतात. पकडले व शिक्षा केली केली तर Human right वाले ओरडतात. म्यानमार,लाओस आणि थायलंड या तीन देशाला गोल्डन ट्रँगल म्हणतात. अफुच्या उत्पादनात हा भाग जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी या भागातून होते.
आमचा प्रवास चालू होता व समोर एकदम विस्तीर्ण क्षितीज दिसू लागले. थोडे पुढे गेलो तर एक दगड दिसला त्यावर लिहिले होते,
“यहाँ भारतकी सीमा समाप्त होती है”
आम्ही चढून खूप उंचावर आलो होतो. घामेघूम झालो होतो. थंड हवेच्या स्पर्शाने एकदम हलके हलके वाटले. आमचे स्वागत तिथे असलेल्या भारतीय सैनिकांनी केले. तिथला सैनिकी तळ, टेहळणी नाका आम्ही पाहिला.
“बर्मा जायेंगे क्या ? और देखेंगे क्या है ?” मेजरने मुलांना विचारले. एका जोशात मुलांचा आवाज होता.
“बिलकुल जायेंगे ...”
काही औपचारिक गोष्टी मेजरने म्यानमारच्या पंगसूच्या कमांडरशी बोलून पूर्ण केल्या व आम्ही पंगसूच्या एका चेक पोस्ट वर पोहोंचलो. तेथील म्यानमारच्या काही सैनिकांशी भेटलो ते होते आपल्या कडील रामोश्यांसारखे. त्यांची भाषा काही समजत नव्हती. इकडे तिकडे फक्त आम्ही पहात होतो. दुरून लेक ऑफ नो रीटर्न दिसत होते व चीन-जपान युद्धात अनेक विमानांना जलसमाधी करून दिल्याचे आठवण करून देत होते.
आम्ही परतायला निघालो. भारतात परत आलो व सीमेवरच्या त्या अंतिम दगडाजवळ जाऊन मी थांबलो. एकटाच, शांत, थोडा वेळ डोळे बंद करून.
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज !
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार !
इतके यश तुला रगड
जवळ कुणी आल्याची जाणीव झाली. बालीजान मध्ये दहावीत शिकत असलेला तासो जवळ आला व मला म्हणाला, “ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”
त्याच्या छोट्या डोळ्याकडे, मी पहिले जे तो बोलत होता तेच ते डोळे बोलत होते.
वेळ मिळाला तर नक्की पहा ..
http://prasadchikshe.blogspot.in/2012/05/blog-post.html
अतिशय उत्कृष्ट लेखमाला. इथे
अतिशय उत्कृष्ट लेखमाला. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
प्रसाद्,खूप माहितीपूर्ण
प्रसाद्,खूप माहितीपूर्ण लेखमालिका!!!
तुझ्यामुळे या उपेक्षित प्रदेशांबद्दल फर्स्ट हॅण्ड माहिती मिळत आहे.
तू आणी तुझ्यासारख्या कित्येकांमुळे ,आपण माबोकर्स असण्याचा अभिमान वाटतो!!
खुप छान माहितीपुर्ण लेख.
खुप छान माहितीपुर्ण लेख. ब्लॉग वरील हाच लेख सचित्र आहे. वाचायला तो जास्त आवडला.
साधना धन्यवाद ..... अनेकांना
साधना धन्यवाद .....
अनेकांना या भागा बद्दल माहितच नाही .....म्हणून लिहितो आहे.
महागुरु धन्यवाद मायबोलीवर पण
महागुरु धन्यवाद
मायबोलीवर पण चित्रांसह टाकायला पाहिजे पण इथे चित्र चिटकवणे थोडे अवगड जाते ......त्यात ते थोडे वेळ खाऊ पण आहे ....
त्या बद्दल समस्त मायबोलीकरांची क्षमा मागतो.
सावली धन्यवाद खूप भारतीय लोक
सावली धन्यवाद
खूप भारतीय लोक प्रयत्न करतात ...काही जणांनी तर त्यांचे आयुष्याच्या आयुष्य या कामासाठी दिले आहे.
तिथे टुरिझम वाढवल्याने आणि इतर राज्यांच्या जास्त संपर्कात आणण्याने / दळणवळण वाढवण्याने फरक पडेल का? हो नक्कीच .....
चैतन्य ईन्या आपण म्हणताय ते
चैतन्य ईन्या आपण म्हणताय ते योग्यच आहे ...योग्य नेतृत्वाचा अभाव ही नेहमीचाच प्रश्न आहे. पण पूर्वांचलचे प्रश्न अधिक विचित्र होतात कारण त्यात धर्म, अमेरिका ,चीन सारख्या बलशाली देशानाचा या भागावर डोळा .....
जर तुम्ही नीट अभ्यास केला तर जगाचे गुरुत्वीय मध्य आत्ता आशियाकडे येत आहे कारण १० पेकी ७ मोठया आर्थिक सत्ता या भागात आहेत व ८ पेकी ६ अण्वस्त्रे असणारे देश या भागात आहेत .....
भौगोलिक रचना पाहता ईशान्य भारत हा आशियाचा भौगोलिक मध्य येतो .....त्यामुळे धोरणात्मक दृष्टया हा भाग अधिक संवेदनशील व महत्वाचा ठरतो.
वर्षू नील खूप खूप धन्यवाद....
वर्षू नील खूप खूप धन्यवाद....
जीएस धन्यवाद
जीएस धन्यवाद
प्रसाद, हाही लेख फार सुरेख
प्रसाद, हाही लेख फार सुरेख आहे. व माहिती पूर्ण.
अश्विनीमामी खूप खूप धन्यवाद
अश्विनीमामी खूप खूप धन्यवाद
सर्वं मायबोलीकरांना विनंती की
सर्वं मायबोलीकरांना विनंती की त्यांनी खालील लिक पहावी
http://www.slideshare.net/prasaddada/north-east-india-indian-security
लिहा... आम्ही वाचतो, जमले तर
लिहा... आम्ही वाचतो, जमले तर काही करतो...
कृपया खालील बातम्या वाचा
कृपया खालील बातम्या वाचा ..
http://articles.economictimes.indiatimes.com/2012-05-12/news/31679871_1_...
http://www.echoofarunachal.com/?p=17511
http://timesofindia.indiatimes.com/india/Home-ministry-upset-with-MEA-fo...
(No subject)
Pages