वेताळाचे प्रश्न (भाग १) - पती परमेश्वराचा "न्याय" चूक कि बरोबर

Submitted by Kiran.. on 10 May, 2011 - 12:41

ऑफीसमधल्या प्यूनने ही गोष्ट सांगितली तेव्हां त्याला मी आधी लेक्चर देणार होतो.. आपली सवयच असते ना, कमी शिकलेला म्हणजे त्याचं चुकत असणार. काय कळतय. पण खरं तर त्यानेच मला विचारात पाडलं.

झालं असं, विश्वास या विषयावर चर्चा चालू होती. याने मधेच येऊन एक गोष्ट सांगायला सुरूवात केली. झालेली घटना आहे आणि सत्यकथा मधे येऊन गेलेली आहे इतकच त्याच्या दृष्टीने खूप होतं. तर.. त्याची गोष्ट ना.. सांगतो ना !

एका गावात एक बुवा राहत होते. लोक त्यांना बाबा म्हणत. बाबांवर गावाचं प्रेम होतं. वय तरूणच होतं. पण कुठल्याही गोष्टीचं तार्किक विश्लेषण, न्यायबुद्धी यामुळं गावातच काय पंचक्रोशीत त्यांचं नाव झालेलं होतं. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे कोर्टाची पायरी चढणंच बंद झालं होतं.

गावाला बुवांचा अभिमान होता. त्यांना रहायला घर बांधून दिलं होतं. शेतजमीन दिली होती. लोक स्वतःहून ती जमीन कसत आणि उत्पन्न बुवांच्या चरणी आणून ठेवत. बुवा नको नको म्हणत असताना त्यांचं बँकेत खातं उघडलं होतं. त्यात पैसे जमा होत होते. अन्नधान्य, दूधदुभतं ..कशाचीच कमी नव्हती. बुवांचं म्हणणं काय करायचंय मला सडाफटिंगला हे ?

गावाचं म्हणणं सडाफटिंग राहू नका. एक दिवस बुवांमुळे शेजारच्या गावातल्या एका कुटुंबाला न्याय मिळाला. त्यांच्यावरचं सावकाराचं अरिष्ट नाहीसं झालं. लग्नासाठी काढलेलं कर्ज आणि मोडलेलं लग्न यात त्यांनी सावकार आणि सासरकडची मंडळी यांना योग्य तो दंड दिल्याने पंचक्रोशीत त्या न्यायाची चर्चा झाली. न्याय तर झाला पण वधूपित्याचं म्हणणं असं पडलं कि आता मुलीशी कोण लग्न करणार ?

मुलगी सुशील, सुंदर होती. बुद्धिमान होती. इतक्या चांगल्या मुलीचं वाटोळं होत होतं. सासरकडच्यांची शिक्षा अंमलात आणल्यास लग्न होतच नव्हतं. आणि लग्न केल्यास चुकीचा संदेशा जाउन न्याय होत नव्हता. गावाने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि काहीही केल्या बुवांच्या न्यायाची हेळसांड होऊ नये असा चंग बांधला.

गावाने तोडगा काढला.. मुलगी चांगली आहे. मुलगा तिच्या लायकीचा नव्हताच. बुवा देखील एकटेच आहेत. अशी मुलगी चालून आलीये. बुवांनाच बोहल्यावर चढवलं तर क्या बात है !!

झालं सगळ्यांनीच हा विचार उचलून धरला. बाहेरच्या पाहुण्यांनाही हे आवडलं. बुवांना गळ घातली गेली. बुवांचा नकार आला. पाटील, सरपंच.. सर्वांनी गळ घातली पण बुवा नाहीच म्हणाले. मुलीचा चेहरा कसानुसा झालेला..

अचानक वधुपित्याने येऊन बुवांचे पाय धरले. न्याय तर झाला पण माझी पोरगी देशोधडीला लागली. तिचा स्विकार करावा अशी विनवणी केली. मग बुवांवर मोठा दबाव आला. एक वेळ अशी आली कि बुवांचा नकार क्षीण पडला आणि तोच होकार समजून सर्वांनी जल्लोष केला.

सर्वांनाच आनंद झालेला. पण बुवा खूष दिसत नव्हते.

लग्न झालं
बुवा नाराज
बायको धास्तावलेली..

एक दिवस झाला.
बुवा चिंताग्रस्त होते.

पाच दिवस झाले.
बुवांनी बायकोकडे पाहीलंदेखील नाही.

महिना होऊन गेला

बायको रडत होती. काय चुकलं ?
दाद तरी कुणाकडे मागावी ?
धर्माधिकारी तर स्वतःच बुवा !!

वर्षभर वाट पाहील्यावर बायकोने धीर करून विषय काढला...
बुवांच्या चेह-यावर तीव्र नाराजी..
विषाद
आणि चक्क अपराधीपणाची भावना

कसे बसे शब्द उच्चारत त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून बायकोला धरणीकंप झाल्यासारखं झालं. बुवा नपुंसक होते. ते कधीच तिला वैवाहीक सुख देऊ शकणार नव्हते.
त्यांच्या स्वरात अन्याय झाल्याची भावना होती.
फसवणूक झाल्याची बोच होती.
अपराधी ते स्वतःच होते
आणि फिर्यादी कुणीच नव्हतं..

त्यांनी स्वतःच न्याय करायचं ठरवलं.

त्यांनी तिला सांगितलं.. जेव्हा तुला आई व्हावंस वाटेल तेव्हा मला सांगून तू कुणाशीही संबंध कर. त्या मुलाला मी माझं नाव देईन.

तिला एका वर्षानंतर मुलगा झाला.
घरात लहान मूल आल्याने वातावरण बदललं.
गावालाच काय सर्वांनाच आनंद झाला.

बुवांच्या मुलाचं खूप कौतुक झालं

सत्य काय ते बुवांना माहीत होतं.

वर्ष उलटून गेल्यावर तिने आणखी एका मुलाची परवानगी मागितली.

एक देखणं कन्यारत्न जन्माला आलं.

नाही म्हटलं तरी बुवांना मुलांची आवड होतीच. वर्षं उलटून जाऊ लागली.
मुलं मोठी झाली

आणि तिला आणखी एका मुलाची इच्छा झाली. एवीतेवी बुवांचा काही उपयोग नव्हताच. मग विचाराचा सोपस्कार पार न पाडताच यावेळी पुन्हा ते सर्व घडलं..

यावेळी मुलगा झाला...

मात्र बुवा चिडले.
त्यांना अपमान झाल्यासारखं वाटू लागलं.

तिस-या मुलाकडं त्यांनी पाहीलंही नाही.
बुवा खचले.
म्हातारे दिसू लागले.

त्यांनी मृत्युपत्र बनवलं. दोन मुलांच्या आणि पत्नीच्या नावे सगळं करून ते निघाले. गाव सोडून, देश सोडून..

गाव दु:खी झालं. सर्वांनाच दु:ख झालं

आणि बायकोने बुवांकडे चावडीवर तक्रारनामा दाखल केला.
खळबळ माजली.
बुवांनी तिस-या मुलाच्या नावावर संपत्ती का केली नाही.

बुवांनी गावासमोर आपली असमर्थता उघड केली. लग्नाला असलेल्या नकारामागच कारण सांगितलं. बायको आणि त्यांच्यात झालेला करार त्यांनी सांगितला.
तो करार तिने मोडला होता.
ते मूल त्यांचं नव्हतं असा बुवांचा दावा होता.
बुवांनी हा न्याय केला होता....

तुम्हाला काय वाटतं ?
बुवांचा हा न्याय बरोबर कि चूक ??
आणि का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

^^^^

आरामात या. घाईचं काम सैतानाचं....
( वेताळाचे प्रश्न अशी मालिका पूर्वी चालू केली होती. त्या मालिकेतलं हे पहिलं पुष्प समजावे )

मला आधी वाटलेलं हे विनोदी लिखाण आहे.. Sad
सिरियस प्रतिसाद असा -

बुवांनी प्रथम चूक केलीच, लग्नापुर्वी निदान त्या मुलीला विश्वासात घेऊन आपण नपुंसक आहोत हे सांगायला हवं होतं. पण कदाचित सर्वांच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी होकार दिला असावा. जरी त्यांनी चूक केली होती, तरी ती सुधारली, आणि पत्नीला मोकळीक दिली.

पत्नीने मात्र बुवापेक्षाही मोठी चूक केली असं वाटतं. बुवाने प्रामाणिकपणे आणि विश्वासाने एवढी सवलत दिली होती, तर तिने तिसर्‍या वेळी बुवाला गॄहीत धरून चालणं योग्य नाही. एक प्रकारे विश्वासघात केल्यासारखंच आहे हे. मला वाटतं बुवा तिसर्‍या वेळी पण नाही नसते म्हणाले !

बरोबर.

त्यांच्या बायकोने त्यांच्यातील करार मोडला. बुवांचा काही उपयोग नव्हता तरी सुद्दा स्वतःचे नाव आणि मानसिक पित्रुत्व ते स्विकारत होते

त्यांच्या बायकोने त्यांची परवानगी घ्यायला हवी होती. ती येथे चुकली

उत्तर दिलेल्या सर्वांचे आभार.

प्रफुल्ल शिंपी यांना सर्वाधिक ७ मतं मिळाल्याने सध्या ते पुढे आहेत. रिमझिमला सहा मतं मिलालेली आहेत. एकाच मताचा फरक आहे ... अर्थातच सर्वोत्तम उत्तरासाठी आणखी प्रतिसादांची गरज आहे...
विचार करून उत्तर द्याल हे काय सांगायला पाहीजे ?

१. गाववाल्यांची चूक - कोणाच्या इतक्या खाजगी गोष्टीत एवढं लक्ष घालून दबाव आणायचा.
२. बुवांची चूक - कोणालाही आपली अक्षमता खाजगीत समावून न सांगता दबावाला बळी पडायच.
३. बायकोची चूक - करार मोडायचा.

गाववाल्यांची चूक... चूक मोट्ठी

बुवांची चूक त्याहुनही मोठी.... त्यांनी लग्ना आधीच का नाही सांगितले? पुढचे सर्व प्रश्न निर्माणच झाले नसते. मला सर्वात जास्त राग बुवा या संस्थेचा आलेला आहे. ते कुणी जरी असले, तरी त्यांना स्वत: चे असे काहीच मत नाही आहे का? प्रत्येक वेळेला लोकांच्या दबावाला बळी पडलेले दिसत आहे.

बायकोची काहीही चूक वाटत नाही... लग्नाला तिची परवानगी, तिची ईच्छा जणली होती कां? तिच्यावर भयंकर अन्याय झालेला आहे. करार केला आहे पण तो मुळात लग्न झाल्यावर केला गेला आहे. या परिस्थितीत तो सर्वकाळ पाळायलाच हवा असे बंधन अमानविय आहे. तिच्या लग्ना बद्दलच्या आणि पती या संस्थे बद्दलच्या अपेक्षांची कोण काळजी करतो आहे? तिच्या संसारा बद्दलच्या स्वप्नांची चुराडा वा राख रांगोळी झाली याला सर्वस्वी गांव आणि बुवा जबाबदार आहे. तिच्यावर काय मानसिक आघात झाला असेल केवळ कल्पनाच करवत नाही.

या प्रतिसादाची वजागुणांची संख्या वाढल्याने व आता इथे आवश्यकता न वाटल्याने संपादित करीत आहे.

धन्यवाद!

कालपर्यंत निवडुंग यांचे उत्तर सर्वोत्तम उत्तम म्हणून तारांकित करण्यात आलेले होते. आता उदय यांच्या उत्तराने ते स्थान पटकाविले आहे. या उत्तराला मागे टाकेल असा प्रतिसाद आल्यावर अर्थातच तारांकित उत्तर बदलले जाईल....

आलेल्या प्रतिसादानंतर असं दिसतंय कि उदय यांचं तारांकित उत्तर हेच सर्वाधिक पसंतीचंही उत्तर ठरलेलं आहे. मला स्वतःला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही. पण उदय यांच्या मताच्या काही भागाशी सहमत आहे.

ही कुठल्या गावातील स्टोरी आहे? तिथे अजुन कुटुंब नियोजनाची साधने पोहोचली नाहीत काय?

बुवाला कशाला दोष द्यायचा? अडचनीच्या वेळी गडबडीने लग्न करताना मुलीला कुंकवापुरता आधारच तर हवा होता ना? वय, जात, धर्म, पैसा... काही बघितलं होतं? नाही.. नुस्ता एक नवरा हवा होता . शिवाय बुवा लग्नाला नाहीच म्हणत होते, कारण सांगणे त्याना बंधनकारक तर नव्ह्त आणि तरीही लग्न लावले.

तिसर्‍या अपत्याची जबाबदारी तर आजकाल सरकारही घेत नाही.

इथं प्रश्न नैतिकतेचा नसून

इथं प्रश्न नैतिकतेचा नसून न्यायाचा आहे. न्याय म्हणजे अन्यायाचं निरसन हा प्राथमिक मुद्दा आहे. मग, ह्या सर्व प्रकारात खरा अन्याय कोणावर झालाय ? माझ्या मते बुवांच्या पत्नीवर. कारण वधूपिता, गावातले लोक व बुवा याना आपलं मत मांडण्याचं, त्याकरता दबाव आणण्याचं/ दबाव झुगारण्याचं स्वातंत्र्य होतं व त्यामुळे जे होईल त्याचे परिणाम त्यांच्यावर बंधनकारक होते. पत्नीला हे स्वातंत्र्य नि:संशय नाकारण्यात आलं होतं व त्यामुळे गावाने किंवा बुवानी घालून दिलेली चौकट तिला बंधनकारक होऊं शकत नाही. बुवानी लग्नानंतर तिला दिलेलं मर्यादित स्वातंत्र्य हेंही मुळात तिला दिलेलं स्वातंत्र्य नव्हतंच; त्यांची चूक त्याच्या मनाला खात होती म्हणून बुवानी स्वतःसाठीच धरलेली ती केवळ एक ढाल होती. व त्यातच खरं तर बुवानी पत्नीची शारिरीक व मानसिक गरज न्याय्य असल्याचं स्वतःच मान्य केलंय. पत्नीनं पहिल्या दोन वेळीं त्यांची परवानगी घेतली याचा अर्थ तीची शारिरीक व मानसिक गरज किती आहे हे ठरवण्याचा अधिकार तिने बुवाना दिला किंवा बुवाना पति म्हणून तो मिळाला असा होऊं नये. त्यामुळे, तिसर्‍या मुलाच्या बाबतीत केवळ त्यांची परवानगी घेतली नव्हती म्हणून तिसरं मूल अनौरस ठरवण्याचा बुवाना अधिकार नाही.
शिवाय, कोणताही 'करार' दोन स्वतंत्र व्यक्तींमधे - ज्याना इतर पर्यायांचा विचार करून तो करार करण्याचं व न करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे - झाला असेल तरच कायद्यानं बंधनकारक असतो. इथं , तथाकथित 'करार' होताना त्या पत्नीला तसे पर्याय खुले होते का व ते निवडण्याचं स्वातंत्र्य होतं का, या प्रश्नाचं उत्तरही नकारात्मकच येतं.

भाउंचा प्रतिसाद काही पटला नाही. बुवाकडून इतर गरजा भागल्या. बाहेरुन शारीरीक सुखाची गरज भागली. एवढं असुनही माझ्यावर अन्याय झाला हे म्हणायला बाई मोकळी! लग्नच जर अन्यायपूर्वक लावले असेल, तर तेंव्हा विरोध का नाही केला त्या बाईनं?आणि आता तिसर्‍या अपत्याच्या पोटापाण्याची चिंता आल्यावर मात्र लग्नापासुन इतर गोश्टींपर्यंत सर्व काही अन्यायाने केले असे म्हनायला बाई मोकळी.

कायद्यानुसार, व्यभिचार हा गुन्हा घडला, तर विवाह लगेच संपुष्टात येऊ शकतो. बाईने रीतसर घटस्फोट घ्यावा आणि ज्यांच्याकडून शारीर सुख आणि मुले घेतली त्यांचीच बायको म्हनून रीतसर लग्न करुन रहावे. बाईला नवराही मिलाला, बुवाही मोकळा झाला.. आणि अजुन पुढे मुले होऊ देण्यास बाईही मोकळी झाली, मुलाना रीतसर पितृत्व मिळेल. गावालाही बाईच्या आणखी एका लग्नातले जेवण मिळेल. सगळेच खुष , नाही का? Proud

तर तेंव्हा विरोध का नाही केला त्या बाईनं?

आपल्या समाजव्यवस्थेत तिला काही मत असतं का ? किमान ग्रामीण जीवन डोळ्यापुढं ठेवून पहा.

आपल्या समाजव्यवस्थेत तिला काही मत असतं का

नसायला काय झालं? आता तिसरे मूल झाल्यावर अचानक बाईला कंठ फुटला, तेंव्हा काय समाजरचना अचानक बदलली का?

बुवाचे मन खात होते म्हनून त्याने बाईला परवानगी दिली, हेही पटत नाही.. बुवाला लग्नाला विरोध करायचा अधिकार होता,त्याप्रमाणे त्याने केला होता. कारण तेंव्हा सांगितलेच पाहिजे, असे बंधन नसते, त्यामुळे त्याने कारण सांगायची गरज नव्हती.

बाकी, गाव मात्र कुठलं अजुन कळलं नाही. कुटुंब नियोजनाची साधने द्यायला केमिस्ट नाही, घटस्फोट द्यायला वकील नाही. असल्या गावात बुवासारख्यानीच राहणं योग्य! Proud

लग्नाचा अर्थ लक्षात घेतला तर लग्नासाठी लायक नसलेल्याने कारण न सांगणे हे न्यायाला धरून आहे का ? त्याचा संकोच म्हणजेच संकटाला आमंत्रण. या गोष्टी कुणी विचारत नसतं. शक्यतो नॉर्मल म्हणूनच गृहीत धरून चालतात लोक. बुवांना माहीत असताना त्यांनी लग्नाला उभे राहणे हा सर्वात मोठा अन्याय होय. जरी तो परिस्थितीच्या रेट्याने झाला असेल तरीही..

गावकर्‍यांची चूक : बुवाला जबरदस्ती बळी पाडणे, त्यात हा बूवा कुठेही लबाडी करतोय असे नाही , त्यात तोही या लग्नाला विरोध करतोय तरीही जबरदस्ती करणे आणि दबाव आणणे

बुवाच्या दोन चूका : १) आपली असमर्थता कोणाला तरी, अगदीच नाही तर मुलीच्या वडिलांना तरी सांगायला हवी होती..... २) मुलीला विचारले पाहिजे होते की हे लग्न तिच्या मना विरुध्द आहे का

यापुढील गोष्टीत चूक असे म्हणता येणार नाही १) माणुस असला की न्यूनगंड हा असणारच, बुवाला वाटले असेल की, ही गोष्ट गावात पसरली तर आपली नाचक्की होईल......
२) एवढे दिवस सत्पुरुष म्हणत असलेले तेच गाव आपल्याकडे बोटं दाखवतील.....
३) मुलीचा कोणीच स्विकार करत नाही त्या घराची अब्रु वाचवण्यासाठी
४) एक गोष्ट लक्षात घ्या ही पुढील ओळ वाचा >>>>>>>>>एक वेळ अशी आली कि बुवांचा नकार क्षीण पडला आणि तोच होकार समजून सर्वांनी जल्लोष केला. सर्वांनाच आनंद झालेला. पण बुवा खूष दिसत नव्हते.>>>>>>>>> यावरुन स्पष्ट होतं ही शेवटी बुवांचा नाईलाज झाला
५) कदाचित बुवांनी हा विचार केला असेल की आता या गावकर्‍यांच्या रोषाला बळी पडण्यापेक्षा आपण लग्नानंतर आपल्या पत्नीला सुट देऊया.... तसे त्याने केलेही आणि तब्बल दोन ते तीन वर्षे (हे दोन मुलाच्या अंदाजे ) सर्व व्यवस्थित चाललं होतं याचा अर्थ जरी बुवाने सुरुवातीला चूक केली असली तरी ती दबावात होती पण त्याने पत्नीला स्वातंत्र्य देऊन न्याय केलेला आहे

आता मुलीची चूक :- १)आता ही पुढील ओळ वाचा म्हणजे कळेल >>>>>>>>>बायको रडत होती. काय चुकलं ?
दाद तरी कुणाकडे मागावी ?
धर्माधिकारी तर स्वतःच बुवा !!वर्षभर वाट पाहील्यावर बायकोने धीर करून विषय काढला..>>>>>>>>>>>>> म्हणजे मुलीचा लग्नाला विरोध नव्ह्ता..... नाहितर हीच स्टेटमेंट उलटी झाली असती तिने महिनाभर त्याच्याकडे पाहिलं नसतं (हम दिल दे चूके सनम आठवतोय ना?)
२) बुवाने तिला सांगितले होते जेव्हा तुला आई व्हावेसे वाटेल ........ हा जेव्हा सगळ्या मर्यादा मोडतो....... त्या मुळे तिसरं आपत्य बुवाने नाकारलं नसतंच पण त्यासाठी तिने परवानगी घेतली नाही त्या मुळे शेवट वाईट होण्यास बुवाची पत्नीच जबाबदार आहे..... आणि त्यानंतरही बुवाने सर्व दोन मुलांच्या आणि पत्नीच्या नावे केल्याने त्या तिसर्‍या मुलाला तिला सहज काही देता आले असते......पण तीची मजल चावडीवर बुवांविरुध्द तक्रार नामा करण्यापर्यंत गेली ..... यावरुन सहज कळते की तिचीच वैचारीक पातळी बदलली होती....

सारांश एवढाच सांगावासा वाटतो : औषधात काही अत्यल्प प्रमाणात अल्कोहोल असते पण ते फायद्यासाठी असते.... पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने असते म्हणुन योग्य असते .... पण म्हणुन कोणी अल्कोहोलच प्यायलं तर चूकी कोणाची डॉक्टरची की पिणार्‍याची

.

वैभव.... .

दडपणाखाली केला तरी खून हा खूनच ठरतो ना ? आणि इथे कुणी सामान्य व्यक्ती नाही तर इतरांचा न्याय करणारी व्यक्ती स्वतःच त्या मुलीवरच्या अन्यायाला जबाबदार आहे. एक अन्याय दूर करताना दुसरा अन्याय लादणे हा न्याय कसा होईल ?

आणि इथे कुणी सामान्य व्यक्ती नाही तर इतरांचा न्याय करणारी व्यक्ती स्वतःच त्या मुलीवरच्या अन्यायाला जबाबदार आहे. एक अन्याय दूर करताना दुसरा अन्याय लादणे हा न्याय कसा होईल ?>>>>>>>>>>>>>>>>माफ करा मग तसं कथेत नमुद करा ....कारण कथेत कुठेही त्या मुली बद्द्ल असं काही लिहीलेलं नाही. आता पर्यंत आलेली उत्तरं ही जर- तर ......... मला असं वाटलं - मला तसं वाटलं ..... हा माझा अंदाज यावरच आधारित आहेत.... काही जण अंदाज बांधत आहेत की मुली चा लग्नाला विरोध असणार पण आपण म्हणुन काही होत नाही .... आणि तसं असेल तर कथेत नमुद करा..अंदाजाने उत्तरं मिळणार नाहीत (म्हणुन मी दिलेली उदाहरणं पहा ....... मुलीची चूक मधील पहिला पॉईंट पहा) Happy

.

औषधात काही अत्यल्प प्रमाणात अल्कोहोल असते पण ते फायद्यासाठी असते.... पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने असते म्हणुन योग्य असते .... पण म्हणुन कोणी अल्कोहोलच प्यायलं तर चूकी कोणाची डॉक्टरची की पिणार्‍याची

अल्कोहोल पिणारा पु आहे की स्त्री यावर ते अवलंबून असते. पुरुषाने दोन चार थेंब जरी प्याले तरी गुन्हा आणि बाईने तीन वेळा अख्खी बाटली प्याली तरी आपल्या देशात तो गुन्हा नाही.

समजा, हेच उदाहरण उलट असते तर? म्हणजे बुवा नॉर्मल आणि बाईच्या शरीरात काही मोठा दोष वगैरे .. आनि बुवाने बाहेरख्यालीपण केला असता तर? तर त्या केसमध्येही बाईलाच सहाउनुभुती मिळाली असती. बाई शरीर सुखाशिवाय राहू शकते, तर नवर्‍याला बाहेर जाऊन सुख घ्यायला लाज वाटत नाही का? असे प्रश्न इथेच त्या बुवाला विचारले गेले असते.. मुलच पाहिजे तर दत्तक का नाही घेतला वगैरे प्रश्नानाही इथे वाचा फुटली असती. Happy

गावातील पुरुषही त्या बाईला पुरेपूर 'ओळखून' असावेत. म्हनून तर लग्नाला एकही पुरुष ( बुवा वगळता) तयार झाला नव्हता आणि मूल द्यायच्या वेळी मात्र हेच पुरुष पुढे आले, यातच सगळे काही आले. Proud

हे आर्टिकल कॉपी पेस्ट करुन मिपावर कौल लावला तर चालेल का? लेखक महोदयानी कृपया परवानगी द्यावी.

बाईला न्यायदान करायच्या नादात काही टेक्निकल मुद्दे विसरले गेलेत..

१. बुवांची संपत्ती स्व अर्जित आहे, ते ती कुणालाही देऊ शकतात/ कुणालाही नाकारु शकतात.

२. नाव देण्याबाबतही तसेच आहे. मूल त्यांचे नाही, म्हनून ते नाव नाकारु शकतात.

मुळात प्रष्ण हा आहे तिसर्या मुलाचा सम्पत्ति मधे वाटा आहे का? सम्पत्ति बुवान्चि आहे ति कोणाल द्यायचि ते ठरव्ण्याचा अधिकार त्यान्ना आहे.