मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जुनेच ललित. अजून काय फारसा फरक पडलेला नाही. Wink
----------------------------------------------------
"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.
पहिल्या पावसात, नव्याकोर्‍या लेदर सीटस असलेल्या बीएमडब्ल्यूमधे मोगर्‍याचा गजरा हातात घेऊन बसायचं.. सुखाची परमावधीच की. झालं! ठरलं! हे कधीतरी जमलं पाहिजेच.

पैसा कमवायचाच हे परत एकदा अधोरेखित झालं होतं डोक्यात. बास झालं आता कलेसाठी समर्पण.
इतकं खपलो, आत्ता पैसा नाही कमावला तर कधी?
येणार्‍या कामाचं बजेट विचारल्याशिवाय बाकी काही बोलायचंच नाही असा परत एकदा मी निश्चय केला. आणि मोबाइल वाजला. नोकियाचं ते जुनं पुराणं मॉडेल बघत मी स्वत:लाच वचन दिलं की आता बास ही गरीबी.

नृत्यांगना अमुक तमुक नवीन बॅले करतायत त्यासाठी त्यांनी डिझाइन करायला बोलावलं. शक्यच नव्हतं वेळेचं. घरात एका पाठोपाठ एक ८ दिवसाच्या अंतरानी दोन लग्नं होती. अगदी जवळची. पण घरातली धावपळ बाजूला ठेवून मी गेले धावत. जेवढं शक्य तेवढं करून दिलं. हाती आला एक चेक ज्यावरची रक्कम बघून स्पॉटबॉय पण लाजला असता. वर 'तुला वेळ नव्हताच ना तपशीलात सगळं करायला त्यामुळे या ताइंनीच सगळं निभावून नेलं.' अशी उगाच गिल्टी वाटायला लावायची मखलाशी. निश्चय गेला तेल लावत!

नंतर दिल्लीहून फोन होता. एका बाइंचा. कुठूनकुठून त्यांना माझा संदर्भ मिळाला होता. आणि आता त्यांना त्यांच्या पुस्तकातल्या महाराष्ट्राच्या विभागासाठी माझ्या 'एक्सपर्टीज' ची गरज होती.
दिल्लीवाला फोन, मधाळ हिंदी आणि माझ्या 'एक्सपर्टीज' चा उल्लेख. पैशाचं विचारायचं राहूनच गेलं ना.
बाईंच्या सहायिकेबरोबर इकडे फिर, तिकडचे फोटो काढ असं करत करत ४ - ५ दिवस नुसतेच निघून गेले. यातच मराठी साडी नेसवून दाखवायला त्या मागच्या नृत्यांगनेच्या एका नवख्या शिष्येचे दोन तास मागितले तर नृत्यांगना बाई म्हणतात, "पैशे किती देणार?"
"मी नंतर फोन करते!"
आता आयत्यावेळेला काही प्रात्यक्षिक स्वत:वर काही अश्याच एका दत्तूवर दाखवून. दिल्लीवालीचं काम पूर्ण झालं. दिल्लीहून एक इमेल आला (यावेळेला फोन नाही!) आभाराचा.
आमचा खिसा रिकामाच राह्यला.

मराठी फिल्म करायचीये म्हणून जुनी ओळख सांगत एक जण आला. ऐतिहासिक चित्रपट. आणि बजेट म्हणाल तर डोकीच्या वस्तूलाही पुरणार नाही. इथे आमचा निश्चय होता मोठा. कपड्यांचे एवढे, माझे एवढे. जमत असेल तर ठिक नाहीतर जाउदेत. "आपली जुनी ओळख म्हणून मी तुझ्याकडे आलो. आणि तू एवढं बजेट सांगतेस?" "अरे पण ऐतिहासिक करायचं तर बजेट लागतं तेवढं. नगाला नग वस्तू वापरायच्यात का? शेवटी माझ्या reputation चा पण प्रश्न आहे." "पण ही काय रक्कम झाली?" "तुला १०० चा मॉब हवा, २५ ब्रिटिश शिपाई आणि २५ ब्रिटिश पोलिस हवेत, महत्वाच्या व्यक्तिरेखा १०, भरपूर अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस म्हणजे कपडे डबल डबल एवढं सगळं जमवायचं/ बनवायचं तेही इतिहासाप्रमाणे तर किमान दोनेक लाख तरी नकोत? आणि मी, माझे असिस्टंट राबणार ५० दिवस मग मला काहीतरी पैसे मिळायला नकोत? माझ्या असिस्टंटस ना काहितरी द्यायला नको?" "ते काय मला माहित नाही. तुझ्या पेमेंटसकट कपड्याचं सगळं ८०००० मधे भागव!" "शक्य नाही तू दुसरी व्यक्ती बघ!"
माझ्यावर पैशाची हाव असल्याचा शिक्का बसला.
माझा खिसा रिकामाच होता तेव्हा.

तशी तक्रार अशी काहीच नाही. पण चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.

सध्या मला मोगरा परवडतो. पावसाचा वास आपला आपण येत असला तरी तो उपभोगायला सवड होत नाही आणि बीएमडब्ल्यू चं चित्रही मी विकत घेतलेलं नाही.

- नी

प्रकार: 

मार्केटिंग नाही ग. खूप भावना प्रधान झाले त्यामुळे त्यातून बाहेर यायला काहीतरी लिहीले. सोला आने सच लिखा है.

ओ.... मामी, बरं झालं तुम्ही अत्तर ईकडे विकताय. त्या तिकडे वोल्वोच्या बिबिवर विकला असता ना, तर त्या इतर वासा सोबत अत्तरही झोडपलं जाण्याची शक्यता.

नीरजा..... बघ गं बाई.... मामी अत्तर घेऊन आली ईकडे. यावर दोन ओळी येऊंदे.

हे वाचलं होतं पूर्वी. तेंव्हाही ही आवडलं आणि आताही.
स्वतःच्या कामाचे पैसे हक्काने मागणं मलाही जमायचं नाही पूर्वी. हल्ली मात्र शिकायला लागलेय.

BMW मधे लावलेल्या मोगर्‍याच्या वास मिळेल ग तुला, हमे यकीन है ..

माझ्यावर पैशाची हाव असल्याचा शिक्का बसला.<<<
कृपया हा शिक्का कायम ठेवा. दुसर्‍याना पैशाची हाव असल्याचा शिक्का ज्याना ओळखीतुन स्वस्तात कसेतरी काम करुन घ्यायचेय असेच लोक मारतात. असे लोक जवळ फिरकले नाहीत तर काही नुकसान होणार नाही. उलट जास्त पैसे देउन चांगल्या प्रतीच्या कामाची अपेक्षा असलेले लोक येतील. असे लोक आल्यावर मग बी एम डब्ल्यु काही फार लांब नाही. शुभेच्छा!

हम्म्म्म
अतिशयच आवडला लेख!
आवडीचं काम आणि मनासारखा पैसा हे कॉम्बो कठीणच..
तुम्हाला दोन्ही मिळोत अशा शुभेच्छा Happy

आधी वाचल्याचा आठवलाही आणि नाहीही म्हणून नवीन समजूनच वाचला.

पाऊस आहेच, मोगर्‍याचा गजराही मिळणं सोप्पंय तेव्हा BMW ही दाराशी नक्कीच झुलेल.

नी, BMW घेशील तेव्हा त्यात मोगर्‍याचा गजरा बिजरा नको नेऊस. नव्याकोर्‍या लेदरचा वास मारला जाइल.

नी,
छान लिहीलयस. Happy
साजिर्‍याच्या संपूर्ण प्रतिक्रियेला अनुमोदन!

नी,छानच लिहिलयस Happy
आवडीचं काम आणि मनासारखा पैसा हे कॉम्बो कठीणच..<<<<<<सोल आने सच बात Happy
अमा, मिट्टीका अत्तर चं टेस्टर पाठवायला विसरु नका Proud

पैसा ठणकावून मागा.
मिळतो-नोकरीत अन धन्द्यात्-आपल्यात स्टफ आहे यावर स्वतःचाच विश्वास पहिल्यांदा हवा.
माझा ३० वर्षांचा अनुभव बोलतोय.दिल्ली बिल्लीत तर असलेच नाणे चालते-नव्हे पळते__

पण चांगलं काम तेच ज्यात पैसे मिळतात मग ते कितीही अ आणि अ का असेना हे आता पटायला लागलंय.>>>
एवढं काय पटलं नाय. बाकी तळमळ पोहचली.
खरंतर bmw हवी तर हेच काम का? (ज्यात पैसे कमी मिळतात असं) इतर दुसरी कामं करावीत, कुणी अडवलंय?
कायेना, आज आशा bmw पर्यंत लांबलीये, उद्या तीही भेटली कि अजून काहीतरी.
खरंच काही हवं असेल तर ते आहे समाधान. अन् ते आवडत्या कामातच मिळतं, कमी-जास्त पैसे मिळून नाही.
बाकी प्रामाणिकपणे काम करा पैसा मिळतोच. फक्त त्याचा मोबदला घ्यायला खंबीर रहा!

नी, लेख छान आहे आवडला. हे मी वर जे काही लिहलंय, ते काही काळापुर्वीचं माझंच मला दिलेलं उत्तर. जास्त मनावर नका घेऊ. पटलं तर बघा.. नाहीतर सोडून द्या!

अत्यंत प्रांजळ आणि मस्तच!!!
माझ्या बाबतीत उलटा प्रकार झालाय. पन्हाळ्यात काम करीत होतो ते सर्वात आनंदाचे आणि सुखाचे दिवस होते पण पैसे कमी. आता पैसे आहेत पण ती मजा नाही, तो मन भरुन टाकणारा आनंद नाही. काय मिळवले आणि काय गमावले याचा ताळमेळ लागत नाही.
'कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कभी जमीं तो कभी आसमां नही मिलता'

आगावा, निखिल खैरेच्या एका कवितेत त्याने लिहिलं होतं.. कविता करून तो कागद खाण्याचे दिवस...
हेच दिवस तर सगळ्यात इंटरेस्टिंग असतात.. Happy

माझा स्वतःचा अनुभव गमतीशीर आहे..

आम्ही चारचाकी घेतली तेव्हा अर्थातच खुशीत होतो....पण त्यात कधीच टू व्हिलरचा रोमँटिक फिल येत नाही.......

स्पष्टिकरण....

दोन चाकीवर नवर्‍याला छान खेटून बसता येतं Wink

त्याचीही काही तक्रार नसते

चारचाकी चालवताना तो सारखं म्हणत असतो...जरा तिकडे सरक.. गियर बदलायला त्रास होतो Sad

तात्पर्य...

आपल्याला काय हवंय ते महत्त्वाचं......................

Pages