स्काऊट - १

Scout म्हणजे बालवीर. (मुलगी असेल तर तिला Guide म्हणतात.) स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि समाजाला उपयोगी पडणे हे त्याचे ब्रीद असते. बदल्यात तो कसलीही अपेक्षा ठेवत नाही. स्काऊटची शिकवण आम्हाला शाळेतून दिली जायची. प्रत्येकाने आपण समाजात राहतो, त्याशिवाय जगूच शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, आपण समाजासाठी काही करतो म्हणजे समाजावर उपकार करत नाही तर आपण त्या समाजाचे देणे लागतो आणि त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्यच आहे. हे आमच्या मनावर बिंबवले जाई.

वर्षातून एकदा स्काऊटचा मेळावा भरायचा. (त्याचं खरं नाव स्काऊट मेळावा असं असलं तरी आमच्या तोंडी फक्त 'स्काऊट' असंच बसलेलं... स्काऊटला जायचं!) जिल्हा परिषदेतल्या सगळ्या शाळा त्यात सहभागी होत असत. हा स्काऊट मेळावा म्हणजे एक अतिशय सुंदर असा सोहळा असतो. तो एखाद्या गावाशेजारील विस्तीर्ण मोकळ्या पठारावर भरवण्यात येतो. मेळाव्याची तारीख आणि कोणत्या गावी भरणार हे ठिकाण सगळ्या शाळांना कळवण्यात येई. आणि मग सगळ्या शाळांतून उत्साहाचे भरते येई. हा मेळावा तीन दिवसांचा असायचा. त्यात विविध स्पर्धा ठेवलेल्या असायच्या. पहिला दिवस हा त्या ठिकाणी दाखल होऊन आपल्या शाळेच्या तंबूसाठी आखून दिलेली जागा स्वच्छ करून शाळेचा तंबू टाकायचा, तंबूचे अंगण, आजूबाजूचा परिसर ठाकठीक करायचा (या टापटिपीला काही गुण राखून ठेवलेले असत) , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची असा स्थिरस्थावर होण्यात जाई. रात्री प्रकाशासाठी या मेळाव्याच्या केंद्रस्थानी एक विजेचा शक्तिशाली दिवा असला तरी तंबूत प्रकाशाकरता मशाली असायच्या. पहिल्या दिवशी हळूहळू ते पठार युनीफॉर्ममधल्या असंख्य उत्साही विद्यार्थ्यांनी फुलून जाई... प्रत्येक दिवशी सायंकाळी सगळ्या शाळांची सामुहीक कवायत व्हायची. काटेकोर रांगांमध्ये उभे राहून एवढ्या जणांनी एकाच लयीत केलेल्या कवायती पाहणे हा एक नयनरम्य अनुभव असतो. (एकदा अगदी चुकून माझ्या सुदैवाने मला या मेळाव्यात पुढे येऊन, 'एक साथ सावधान!', 'विश्राम!', 'पिछे मुड', 'बैठेंगे बैठ जाव!' अशा ऑर्डर्स या प्रचंड ताफ्याला द्यायची संधी मिळाली तेव्हा मला कळले की आपल्या या कवायती नुसत्या बघायलाही किती सुंदर दिसतात!)

या मेळाव्यात मुख्य आकर्षण असायचे ते दुसर्‍या दिवशी रात्री होणार्‍या सांस्कृतीक कार्यक्रमांचे! रात्री मोठी शेकोटी पेटवून तिच्या भोवती फेर धरून म्हटलेल्या शेकोटीगीताने या स्पर्धेला प्रारंभ होई. सगळ्या शाळांच्या सहभागामुळे या स्पर्धेत मोठीच चुरस असायची. सगळ्यांमधून आपल्या शाळेला बक्षीस मिळावे यासाठी आधी जो तो मजबूत तयारी करीत असायचा. हा कार्यक्रम बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. त्यामुळे प्रत्येकासमोर इज्जत का सवाल असायचा. तिसर्‍या दिवशी सकाळी सहभोजनाची पंगत उठायची. त्यानंतर शोभायात्रा नावाची एक स्पर्धा असायची आणि मग शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीत एखाद्या मान्यवर व्यक्तीच्या हस्ते होणार्‍या बक्षीस समारंभाने या सोहळ्याची सांगता व्हायची.

...तर त्यावर्षी सांस्कृतीक रात्रीसाठी आपण एक शेतकरी गीत बसवायचे असे आमच्या शाळेत घाटत होते. एक शेतकरी असतो त्याची बायको माहेरी जाण्यासाठी रुसून बसलेली असते. पण हा शेतकरी काही ऐकायला तयार नसतो. आधी हे काम कर आणि मग जा! हा त्याचा हेका. त्याच्या कामाची जंत्री काही संपत नसते. पण माहेरी जायला मिळेल म्हणून ती तो जे सांगेल ते सगळे करते आणि मग माहेरी जाते, असे ते गीत होते. त्यावर समुहनृत्य बसवायचे होते. आणि गायनही अर्थात आम्हालाच करायचे होते. कारण कॅसेट टाकून रेडीमेड गाण्यावर नुसतं येऊन नाचून जाणार्‍या शाळेला कधीच बक्षीस मिळायचे नाही. नाचताना दमल्यावर शेवटी शेवटी नीट गाता येत नाही त्यामुळे असे गाणे असेल तर गाण्यासाठी विद्यार्थ्यांची स्वतंत्र टीम सहभागी करण्याची मुभा असायची. वाद्यांची साथ देण्यासाठी मेळाव्यातर्फे वादकांची टीम असायची. आवश्यक वाटल्यास त्यांची मदत घेण्याचीही मुभा असे. आमच्या गाण्यात एक शेतकर्‍यांची रांग आणि एक शेतकरणींची अशा दोन रांगा होत्या. शाळेत, आपल्याला या स्काऊट मेळाव्याला जायला मिळावे असे प्रत्येकाला वाटे. पण सहलीप्रमाणे सगळ्यांनाच जाता यायचे नाही. स्पर्धांमध्ये ज्यांचा सहभाग असेल त्यांना आणि संबंधितांनाच फक्त जायला मिळे. मुलींना पाठवायला पालक तयार नसत. पर्यायाने गाण्यातील शेतकरणीचे काम पण मुलांनाच करायला लागणार होते.

क्रमशः

(पुढच्या भागासाठी येथे टिचकी मारा :- http://www.maayboli.com/node/736)